Archive for September, 2006

चित्रगुप्त नावाचा संगीतकार

September 29, 2006

पुण्याचे डॉ. प्रकाश कामत हा एक वेडा माणूस आहे. त्यांचे हे वेड आहे जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे. त्यांच्या ‘सूरविहार’ या स‌ंस्थेतर्फे संगीतकार चित्रगुप्त यांच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गेल्या महिन्यात सादर झाला. विभावरी आपटे-जोशी, योगिता गोडबोले-पाठक, अपूर्वा गज्जाला या गायिका आणि प्रशांत नासेरी व सलील भादेकर हे गायक ही नावे वाचूनच आठवड्याचा मधला दिवस असूनही कार्यक्रमाला जायचं मी नक्की केलं.
शहनाईनवाज उस्ताद बिसमिल्ला खांसाहेबांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रशांतचा स्वच्छ, मनमोकळा रफीस्वर सभागृहात घुमू लागला.
‘चल उड जा रे पंछी
के अब ये देस हुवा बेगाना’
या गाण्याची तलतनं म्हटलेली आवृत्तीही निघाली होती ही माहिती मला नवीन होती. नंतर लगेचच सादर झालेलं तलतचंच ‘दो दिल धडक रहे हैं और आवाज एक हैं’ हे द्वंद्वगीत सलील आणि योगिताने छान खुलवलं. सलील भादेकर हा मुळात गुलाम अलींच्या गजला सादर करणारा गायक. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो गायकांची शैली हुबेहूब उचलतो खरी, पण त्यांची नक्कल करत नाही. तलतचं गाणं सादर करताना काय किंवा पुढचं ‘ऑपेरा हाऊस’ मधलं मुकेशचं ‘देखो मौसम क्या बहार है’ हे द्वंद्वगीत विभावरीबरोबर सादर करताना काय, त्यानं आवाजात खोटा कंप किंवा सानुनासिकपणा आणण्याचा कृत्रिम प्रयत्न केला नाही. त्याचा स्वर म्हणूनच सच्चा वाटला.
ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य. अपूर्वा गज्जला या दहावीत शिकत असणाऱ्या किशोरीनं म्हटलेलं ‘दिवाने हम दिवाने तुम, किसे है गम, क्या कहे ये जमाना’ हे गाणं आणि विभावरीनं म्हटलेलं चंद्रकंस रागावर आधारित ‘बलमा माने ना’ हे गाणं याचीच साक्ष देणारी. ‘बलमा…’ ला तबल्याची आणि ढोलकची साथ तर अफलातूनच.
‘दिल को लाख संभाला जी’ हेही असंच एक नटखट गाणं. पण कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं मानकरी ठरलं ते बाकी सलीलनं झकास रंगवलेलं किशोरकुमारचं ‘अगर सुन ले, तो एक नगमा, हुजूर-ए- यार लाया हूं’! पण या मानाला स्पर्धाही तशी जोरकस होती बरं का! ‘मै चुप रहूंगी ‘ मधलं ‘कोई बता दे दिल है जहाँ’, ‘काली टोपी लाल रुमाल’ मधलं ‘दगा दगा वई वई वई’, प्रशांतच्या घुमत्या आवाजातलं ‘जाग दिले दिवाना’, ‘बरखा’ मधलं सदाबहार ‘इक रात में दो दो चांद खिले’, खटकेबाज ‘तडपाओगे, तडपालो’, लता-उषाचं लाजवाब ‘दगाबाज हो, बांके पिया…’ आणि चित्रगुप्त यांच्या ऑल टाईम हिटस मधलं ‘तेरी दुनियासे दूर…’!
चित्रगुप्त श्रीवास्तव या बिहारमधील करमैनी गावात १६ नोव्हेंबर १९१७ रोजी जन्मलेल्या इंग्रजी साहित्यात एम.ए. झालेल्या संगीतकारानं आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. पण भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येते. मध्यांतरानंतर सादर झालेल्या ‘वासना’ चित्रपटातील ‘मैं सदके जांऊ’ या गाण्यातले बासरीचे मधुर स्वर अमर ओकने हुबेहूब उचलले. ‘आ जा रे मेरे प्यार के राही’ हे त्यानंतर सादर झालेलं गाणंही असंच अत्यंत श्रवणीय या वर्गात मोडणारं.
निवेदिका त्यानंतर म्हणाली की लताबाईंनी चित्रगुप्त यांच्याकडे अनेक गाणी म्हटली, पण हे एकच गाणं जरी त्या गायल्या असत्या, तरी त्यांच्या गायकीचं आणि चित्रगुप्तांच्या चालीचं सार्थक झालं असतं. विभावरीनं लताबाईंचा हाँटिंग आवाज लावला…
‘दिल का दिया
जला के गया
ये कौन मेरी
तनहाईमें…’
मालकंस रागातल्या ‘अखियन संग अखियां लागे आज’ या रचनेत प्रशांतनं जान ओतली. तशीच मझा आणली ‘मै चुप रहूंगी’ मधल्या ‘चांद जाने कहां खो गया’ ने आणि ‘सजना, काहे भूल गये दिन प्यार के’ या आर्त रचनेनं. ‘आधी रात के बाद’ मधलं ‘ओ गोरी तेरी बांकी’ हे हिंदुस्थानी स्वर आणि पाश्चात्य वाद्यरचना यांचं मनाडेंचं फ्यूजनगीत सलीलनं मजेत म्हटलं आणि मग एक अजरामर गाणं सुरु झालं…

‘ये परबतोंके दायरे
ये शाम का धुंवा
ऐसे में क्यों न छेड दे
दिलों की दासताँ…’

मंडळी, हे लिहितानाही अंगावर काटा आला बघा! शायरीप्रधान गीताला तितक्याच ताकदीचा स्वरसाज मिळाला की मधात केशर खलावं तशा रचना तयार होतात.

जरा सी जुल्फ खोल दो
हवा में इत्र घोल दो…

व्वा साहिरसाहेब, व्वा!

‘पतंग’ मधलं ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ असंच मजा आणून गेलं आणि माझं खास आवडतं ‘मुझे दर्द-ए-दिल का पता न था’ हे तर काळजाला हातच घालून गेलं. पुढचं नटखट ‘छेडो ना मेरी जुल्फें’ आणि ‘शादी’ मधलं सोज्वळ ‘आज की रात नया चांद लेके आयी है’ हीसुद्धा गुणगुणत रहावी अशी गाणी.
किशोरकुमारनं शास्त्रीय संगीतावर आधारित फार कमी गाणी म्हटली आहेत. ‘एक रात’ मधलं मारुबिहाग रागावर आधारित ‘पायलवाली देखना’ सलीलनं ज्या तयारीनं म्हटलं त्याचा जवाब नाही!

चित्रगुप्त यांच्या अशा एकापेक्षा एक रचनांचा कार्यक्रम कोणत्या गाण्यानं संपवावा हा तसा अवघडच प्रश्न. ‘सूरविहार’नं तो सोडवला तो ‘लागी छूटे ना अब तो सनम’ या अवीट गाण्यानं!

‘सोच ले फिर से, एक गरीब, दिवाना है तेरा
सोच लिया जी, सोच लिया, तेरी कसम’

कार्यक्रम संपला.

‘जीवन की आपाधापी में, कब वक्त मिला, कहीं पर बैठ, कभी ये सोच सकूं, जो किया, कहा, माना, उसमें क्या बुरा, भला’ अशी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे. माझ्या आयुष्यातल्या काही संध्याकाळी तरी संगीताच्या अशा सोनस्पर्शाने पावन झाल्या आहेत.पण मानवी मनाचा हव्यास काही सुटतो का हो? मन हे लोभीच असतं. चित्रगुप्तांचे सूर कान तृप्त करत होते, आणि घरी परत येताना लालची मन विचारत होतं, ‘आता हे तलतच्या आवाजातलं ‘चल उड जारे पंछी’ कुठून बरं मिळवावं?’

नारायण धारप – अमानवी अज्ञाताचा आलेख – १

September 16, 2006

‘रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते. मिट्ट काळोख. खोलीत दुसरं कुणीतरी असल्याची तुम्हाला शंका येते. मेणबत्तीच्या दिशेनं तुम्ही हात पुढं करता आणि तुमच्या उघड्या तळहातावर कुणीतरी काडेपेटी ठेवतं ……’

जगातली सर्वात छोटी भयकथा म्हणून ही इंग्रजी गोष्ट प्रसिद्ध आहे.  इंग्रजी साहित्यात भयकथा, गूढकथा, रहस्यकथा या साहित्यप्रकारांना दुय्यम समजले जात नाही. मराठी साहित्यात मात्र हे प्रकार रंजनप्रधान आणि म्हणूनच काहिसे उथळ मानले जातात. एकतर जे जे लोकप्रिय ते ते दर्जाहीन असा एक समीक्षकी समज आहे. तो अगदीच गैरवाजवी आहे असे नाही ( कलाप्रकारांची लोकप्रियता आणि त्यांचा दर्जा यावर नुकताच झालेला एक प्रदीर्घ वाद ‘मनोगतीं’ च्या स्मरणात असेलच!). पण अशा सरसकट वर्गीकरणामुळे या प्रकारचे लेखन करणारे सगळे लेखकही सुमार दर्जाचे मानले जाणे हे बाकी चुकीचे आणि अन्यायकारक आहे. नारायण धारप हे अशा अन्यायाचे (कदचित सर्वात मोठे ) उदाहरण आहे. धारपांचा वाचकवर्ग मोठा असला तरी आपल्या आवडत्या लेखकांच्या यादीत धारपांचा समवेश करणे किंवा धारपांची पुस्तकं विकत घेऊन वाचणं असं करायला मराठी वाचकाला अजून संकोच वाटतो असंच चित्र आहे. ‘भयकथा’ या प्रकाराची उणीपुरी चाळीस वर्षे ‘समर्थ’ पणे हाताळणी करूनही धारपांना मराठी साहित्यविश्वात मानाचे पान नाही हे मराठी साहित्याचे आणि पर्यायाने मराठी वाचकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
नारायण धारप यांच्यावर प्रामुख्याने भयकथा लेखक असा शिक्का बसला असला तरीही धारपांची प्रतिभा ही त्याहून अधिक कितीतरी क्षेत्रांना स्पर्श करून जाते.  गूढकथा, विज्ञानकथा, रहस्यकथा, सामाजिक कादंबऱ्या एवढेच काय पण ‘चोवीस तास’ नावाचे एक नाटकही धारपांनी लिहिले आहे. स्वतः विज्ञान शाखेचे पदवीधर आणि केमीकल इंजीनिअर असलेल्या धारपांनी विस्तृत वाचन केले आहे. अर्थात धारपांचा ‘बायो-डाटा’ देण्याचे हे काही स्थळ नव्हे, पण धारपांच्या लिखाणातली तर्कसंगती, काल्पनिक कथा लिहितानाही त्यांनी विज्ञानाशी राखलेले इमान आणि त्यांची वस्तुनिष्ठता ही  धारपांची ही पार्श्वभूमी कळाल्यावर समजून येते. याशिवाय कुशाग्र कल्पनाशक्ती आणि मानवी स्वभावाचे, वागण्याबोलण्याचे अचूक आकलन हे कोणत्याही साहित्यीकाला आवश्यक हे गुणही धारपांमध्ये आहेतच.
या लेखात मी फक्त भयकथाकार धारपांविषयी लिहिणार आहे.  इतर सर्व रसांप्रमाणेच ‘भय’ ही मानवी मनाला उत्तेजित करणारी, कदाचित त्यातल्या अनपेक्षिततेच्या छटेमुळे जास्तच उत्कंठावर्धक असणारी भावना आहे.  अज्ञाताचे भय – ‘फिअर ऑफ दि अननोन’ हे समजातील सर्व थरांमध्ये दिसून येते. लहानपणी दाराआड लपलेल्याने ‘ कूक..’ केल्यावर वाटणाऱ्या हव्याहव्याशा भीतीपासून ते रोलर कोस्टरमधील ‘स्केरी राइडस’ पर्यंत भयाचा माणसाने मनोर‍ंजनासाठी  वापर करून घेतला आहे. अमानवी शक्ती किंवा सामान्यांच्या भाषेत ‘भूत’ ही तर भयाची फारच जुनी संकल्पना. धारपांच्या भयकथेमधल्या अमानवी शक्ती रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भुतांप्रमाणे हिडीस आणि किळसवाण्या नसतात ( काहीवेळा असतातही! ). बहुदा त्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे, कधीकधी तर त्या अमानवी असल्याबद्दल चुटपुट लागावी अशा लोभसवाण्या असतात. या शक्तींचा उल्लेख करतांना धारप बऱ्याच वेळा ‘ते आलं होतं …’ अशी वगैरे वाक्यं लिहून जातात. धारपांच्या कथेची बांधणी इतकी घट्ट आणि पिळदार असते की वाचक जणू एका अदृष्य(अमानवी?) शक्तीने कथेबरोबर खेचला जातो. आयुष्यभर कटकट्या बायकोच्या वचकाखाला राहिलेली नवरा अखेर मरतो आणि तिच्याच शरीरात शिरून तिच्या देहाचा ताबा घेतो ( ‘कवटीतला कैदी’), कुणीतरी  गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कवठाच्या झाडाच्या आसपास वावरणारी शक्ती रात्री तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आत्महत्येला प्रवृत्त्त करते (‘कवठीचे वळण’), चंद्रप्रकाशात खून झालेली स्त्री चांदण्यात सर्व सजीवांना आपल्या विश्वात खेचून नेते (‘चंद्राची सावली’), विमान अपघातात सापडून आपल्या आईवडीलांना मदतीची हाक देत वेदनेने तडफडत मरण पावलेली छोटी मुलगी आख्खे गावच आपल्या ताब्यात घेते (‘सैतान’)….धारपांच्या अमानवी सृष्टीची अशी किती उदाहरणे सांगावीत!

‘सैतान’ वरून आठवले. मी ‘सैतान’ कादंबरी वाचली त्या दरम्यानच ‘श्री’ नावाच्या पाक्षीकात मी ‘आँड्री रोज’ नावाच्या सिनेमाची गोष्ट वाचली होती. ‘सैतान’ शी या गोष्टीचे साम्य पाहून मी अस्वस्थ झालो व तसे मी धारपांना कळवले. उत्तरादाखल मला लिहिलेल्या पत्रात ते लिहीतात ” माझ्या ‘सैतान’ कादंबरीतील काही प्रसंगांसाठी मी फ्रँक डी फेलिटा यांच्या ‘आँड्री रोज’ या कादंबरीतील काही प्रसंग वापरले आहेत. तसेच जेम्स हर्बर्ट यांच्या ‘सर्व्हायव्हर्स’ या कादंबरीतील काही प्रसंगही वापरले आहेत. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी लेखकाने काहीही साहित्य वापरावे या मताचा मी आहे. तुमच्या पत्राबद्दल आभार. केंव्हाही लिहीत जा. पत्राचे स्वागतच होईल”

एक वाचक म्हणून मला धारपांचा हा प्रामणिकपणा अतिशय भावणारा वाटतो.
धारपांच्या भयकथांचे रसग्रहण त्यांच्या समर्थ व अप्पा या जोडगोळीच्या उल्लेखाशिवाय पूर्णच  होऊ शकणार नाही. शेरलॉक होम्स व डॉ. वॅट्सन यांच्या धर्तीवर उभी केलेली ही धारपांची पात्रे अगदी जिवंत, तुमच्याआमच्यातली आहेत. इतकी की समर्थांचा पत्ता मागणारी पत्रे धारपांना आजही येतात. दुष्ट आणि सुष्ट शक्तींच्या या सनतन मुकाबल्यात खचलेल्या, घाबरलेल्या, हतबल झालेल्या सामान्य माणसापाठी पहडासारखे उभे रहाणारे गोरेपान, उंच,कृश असे समर्थ आणि त्यांचा सहायक, भक्त, मित्र अप्पा… सगळेच आयुष्याच्या किती जवळचे आणि किती आनंद देणारे!

आणि शेवटी धारपांच्या कथाकदंबऱ्यातून येणाऱ्या व्यक्तिरेखांविषयी. याबाबतीत आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी धारपांना लिहिलेल्या पत्रातला काही भाग उधृत करतोः

तुमच्या लेखनातील ‘ह्यूमन टच’ मला अत्यंत लोभसवाणा वाटतो. माणसामाणसांमधील नाती, त्यांचे संबंध, त्यांच्या विविध भावनांचे पदर अतिशय साध्या शब्दांतून उलगडून दाखवण्याचे कसब तुमच्याकडे आहे. तुमच्या लिखाणातील काल्पनिक व्यक्ति आपल्या आसपास वावरणाऱ्यांपैकीच वाटतात. ‘अरेच्च्या, हे तर आपले बापू’, ‘हे बोलणं अगदी आपल्या बाळीमावशीसारखं…’
‘ हा तर आपला सदामामा..’ असं सारखं वाटत रहातं. लेखक म्हणून मला तुमचे सगळ्यात महत्वाचे  यश ते हे वाटते‌. संवेदनशील वाचक तुमच्या पात्रांमध्ये गुरफटून रहातो. तुमच्या पात्रांबरोबर त्याला आनंद होतो, दुःख होते. त्यांच्याबरोबर तो चिडतो, घाबरतोही! ती पात्रे जिथे गहिवरतात तिथे त्यालाही गहिवर येतो. लेखकाकडे आपली नस सोपवून खुशीने त्याच्या हातातील खेळणे बनून रहाणे हा वाचकाचा फार मोठा आनंद आहे.

अशा आनंदाचे कित्येक क्षण, धारप तुम्ही आम्हाला दिले आहेत. आज लायब्ररीतून तुमचे ‘पडछाया’ हे पुस्तक आणले. त्यातली ‘अनाहूत’ ही कथा वाचायला घेतली. शेवटच्या दोन तीन वाक्यांशी थबकलो.

“तिला आशा होती की (त्या मुलांचे) ते क्षण सुखाचे गेले असतील. तिला आता त्यांचा राग वाटत नव्हता, भीती वाटत नव्हती – मनात एक अनिवार करुणा दाटून आली होती. शब्दांत मांडता न येणारी, पण डोळ्यात पाणी आणणारी”

मला वाटलं की शब्दांत मांडता न येण्यासारखी म्हणतानाच तुम्ही किती नेमक्या शब्दांत हे मांडलं आहे! नायिकेबरोबर माझ्याही मनात त्या मुलांविषयी करुणा होती, माझ्याही डोळ्यांच्या कडांना पाणी साचले होते!
मग वाटले, आपल्या जागेवर बसल्याबसल्या आपल्या नजरेसमोर असले गारूड उभे करणाऱ्या धारपांचे आभार मानले पाहिजेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
तेंव्हा थँक्स, धारप.
माणसाच्या आयुष्याला समृद्ध करणाऱ्या गोष्टींविषयी मी परवा एका पत्रात लिहीत होतो. आर्थर कॉनन डॉईलची तळपती भाषा, बिसमिल्लाखांच्या सनईचे हळवे सूर, तेंडुलकरचा अफलातून कव्हर ड्राइव्ह, अमिताभचा पहाडी अभिनय, लक्षमणच्या कुंचल्याचे प्रभावी फटके  अशी काहीशी ती यादी होती. तुमचे लिखाणही त्या यादीत घातले की ती यादी पूर्ण होईल, असे आज मला वाटते.   

सन्जोप राव

जी.एं. च्या कथांमधील नियतीवाद

September 16, 2006

चित्रकार सुभाष अवचट हे जी.एं. चे (त्यातल्या त्यात ) मित्र. त्यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण जी.एं. ना पाठवले. जी.ए. लग्नाला उपस्थित रहाण्याचा प्रश्नच नव्हता. जी.एं. नी अवचटांना जे उत्तर पाठवले त्यात म्हटले आहे
‘आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे मर्यादित सामर्थ्य ध्यानात घेता आपण फारशी तक्रार करू नये. पण या तडजोडी जेथे आंतडे गुंतलेले नाही अशा बाबतीत घडल्यास त्याचे सोयरसुतकही फारसे नसते. पण प्रत्येक इमानदार व्यक्तीच्या जीवनात एक लहानमोठा कोपरा असा असतो की त्याठिकाणी तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छीत नाही – निदान त्यानी येऊ नये म्हणून त्याची अविरत धडपड असते. जी व्यक्ती हे इमान शेवटपर्यंत अनाघ्रात ठेवू शकते, तिला ( मग तिचे लौकिक यश काहीही असो ) मी अत्यंत भाग्यवान समजतो. याचे एक कारण म्हणजे अशा या जिव्हाळ्याच्या जागी तडजोड असहायपणे करावी लागली की सारे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. (नंतर ही शरमदेखील हळूहळू नाहीशी होऊन मन निबर होऊन बसते ही माणसाची खरी शोकांतिका)’
जी.एं. च्या लिखाणात सगळीकडे दिसून येणाऱ्या नियतीशरणतेचेच हे उदाहरण आहे. जी.एं. च्या कथांतील माणसे दुःखाने, वेदनेने, दारिद्र्याने पिचलेली, हतबल, असहाय झालेली असतात. नियती नावाच्या अदृष्य शक्तीच्या फटकाऱ्याने मोडून पडलेली असतात. जेथे प्रयत्न आणि आशा संपून जाते अशा ओलसर, अंधाऱ्या कोपऱ्यात कशीबशी जगत मरणाची वाट पहात पडलेली असतात. हाडेकातडी टाकायला एक हक्काची जागा, दोन वेळचे गोळाभर अन्न आणि कुणाचातरी मायेचा एखादा शब्द अशा माफक अपेक्षाही ती नियती नावाची चेटकीण पूर्ण होऊ देत नाही आणि माणसाचे आयुष्यच दुःखाने गच्च गच्च होऊन जाते.
जी.एं. च्या टीकाकारांनी याला जी.एं. चा एकसुरीपणा, निराशावाद, क्वचित पलायनवादही म्हटले आहे. पण जी.एं. चे लिखाण वाचताना तसे वाटत नाही. ‘सगळी सुखी माणसे एकाच पद्धतीने सुखी असतात, पण प्रत्येक दुःखी माणसाच्या दुःखाचे तऱ्हा वेगळी असते’ या अर्थाचे टॉलस्टॉयचे वाक्य जी.एं. नी ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहाच्या पहिल्या पानावर लिहिले आहे. जी.एं. च्या कथांमधील व्यक्ती दुःखाच्या अशाच वेगवेगळ्या जात्यांखाली भरडल्या गेल्या आहेत. संसार उद्वस्त झालेल्या सण्ण्याच्या आयुष्यात वरून धुळीत नाणे पडावे तसे आलेले, केवड्यासारख्या अंगाचे आणि शिंपल्यासारख्या पायाचे कबूतर पैजेच्या इर्षेत शिकारी ससाण्याचा घास होते (चंद्रावळ), आपले जीर्ण, म्हातारे, नकोसे झालेले आयुष्य रेटणाऱ्या भाऊन्च्या आंधळ्या डोळ्यांआड त्यांची हसरी, सोनकेळीसारखी नात अचानक निवर्तते (राणी), लंगड्या गोविंदाचार्याची उठवळ बायको त्याच्या पदरात काळे, वातीसारखे अशक्त पोर टाकून कुणा गणागणपाचा हात धरून निलाजरेपणाने निघून जाते आणि ते पोरही बघताबघता पोट फुगून मरून जाते ( अवशेष),  सगळे आयुष्य शिक्षकी आदर्शात काढलेल्या नाडगौडा मास्तरांचा तरणाताठा मुलगा परीक्षेत तिसऱ्यांदा नापास होण्याच्या भीतीने विहीरीत जीव देतो (सांगाडा), नरसूभटाच्या पहिल्या बायकोप्रमाणेच दुसरी बायको कावेरीही मेस्त्रीच्या उग्र, रानवट हातून कुस्करली जाते (काकणे), आयुष्यभर कुरूप, हाडकुळे, सरड्यासारखे पाय घेऊन, बापाच्या तुच्छतेचे वळ झेलणाऱ्या काशीची बापाच्या मृत्यूनंतर सुटका होते तोच नामूच्या विखारी वासनेची काळी अभद्र सावली तिच्यावर पडते ( शलॉट), कंजूषपणे पै पै करून जगलेल्या गोविंदरावांच्या एकुलत्या एका बापूला वेड लागते आणि गोनिंदरावांचे सगळे आयुष्यच दरिद्री, भिकारडे होऊन जाते (जखम), मानेवर कोड असलेल्या मेधाला फसवून कंटाळवाण्या रूपवान लिलूशी लग्न करणाऱ्या माधवला मेधाची आई निरोप घेण्याआधी सगळेच गुपीत उघडे करून सांगते आणि मग माधवचे अस्तित्वच जणू शरमेने बुळबुळीत होऊन बसते (रातराणी), गैरसमजातून आपल्या जन्मदात्या आईविषयी मनात फक्त विषारी तिढे घालत बसलेल्या रुक्मिणीचा शेवटी नियतीकडून पराभवच होतो (पराभव), आपल्या हाताला जणू कातडीप्रमाणे चिकटलेले अपयश सोडवण्याच्या डॉक्टर दादा पाठकांची सुटका शेवटी मृत्यूच करतो (सोडवण), वाईट नजरेची म्हणून समाजाने वाळीत टाकलेली राधी शेवटी तिने माया लावलेले कुत्र्याचे पिलू चावून तडफडून मरते ( राधी), आयुष्यभर घरगुती गिऱ्हाइकांना खमंग, झणझणीत मसाला भजी, चरचरीत उसळ आणि जाड, कापडाच्या पट्टीसारखा चहा देणाऱ्या गावठी सदूभाऊंचे त्यांचा मुलगा ताब्यात घेतो आणि त्याच्या धंद्याच्या नवीन गणितात कुठेच जागा नसलेले सदूभाऊ आणि सीताबाई अगदी बेवारस, पोरके होऊन जातात ( माघारा), वांझोटी म्हणून जगाकडून हिणवून घेणारी करेव्वा एका आगळ्या तिरीमिरीत अंधाऱ्या रात्री गावाबाहेरच्या रानमारूतीसमोर नवस बोलायला जाते, पण तिच्या हाती अपेक्षाभंगासोबतच येते ते एक भयाण जळते सत्य (वंश)……
जी.एं. च्या पात्रांची दुःखे अशी बहुपेडी, सर्वस्पर्शी आहेत.  मानवी भावभावना, विकार, वासना यांचे इतके जिवंत चित्रण करणारा दुसरा साहित्यिक माझ्या तरी वाचनात नाही. एक मात्र खरे, जी.ए. हा केवळ मनोरंजन म्हणून वाचण्याचा लेखक नव्हे. दुपारच्यी झोपेपूर्वी डोळ्यासमोर धरायला चार अक्षरे पाहिजे असतील तर त्यांनी जी.एं. च्या वाट्याला न गेलेले बरे.
जी.एं. च्या व्यक्तीरेखांना अस्सल खानदानी मराठमोळी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या पात्रांची भाषा, त्यांवरचे संस्कार,  परंपरागत, क्वचित जुनाट आहेत. त्यांच्या मराठीवर कानडीची एक गोड झाक आहे. जी.एं. नी भाषेला तर गारूडी नागाला जसा डोलावतो तसे डोलायला लावले आहे. त्यांच्या प्रतिमा, भाषेवरची त्यांची हुकुमत थक्क करून टाकणारी आहे. सर्पप्रतिमा ही जी.एं. च्या आवडत्या प्रतिमांपैकी एक. जयवंत दळवींच्या लिखाणात जसे वारंवार वेड्यांचे उल्लेख येतात तसे जी.एं.च्या  लिखाणात सापांचे. आणि हे इतके जिवंत की जणू डोळ्यासमोर ते साप सळसळत जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर दानय्या गारूड्याचे चित्रण करणाऱ्या ’तळपट’ या कथेतले हे वर्णन पहाः
‘दानय्याचे पावले थांबली. त्याच्यावर पुटाप्रमाणे चढलेली वर्षे गळून पडली. सारे अंग इशारा दिल्याप्रमाणे खडबडून जागे झाले अणि एक पीळ होऊन प्रसंगासाठी तयार झाले. अंग असे खबरदार झाले, हातावर असा हलकाच फुलोरा झरझरून गेला की जवळच कुठे तरी नाग आहे हे त्याला जाणवे. थोड्याच वेळात दगडांच्या ढिगाऱ्यात त्याला धगधगीत केशरी रंगाचा एक वळसा दिसला. तो वळसा पिंढरीएवढा जाड होता व त्यावर खवल्यांची उग्र कुसर होती’
जी.एं. चे शब्दसामर्थ्य हे असे दिपवून टाकणारे आहे. ही दैवदत्त देणगी तर खरीच, पण त्याबरोबर जी.एं. चा शब्दांचा आणि भाषेचा सखोल व्यासंग हेही त्यामागचे एक कारण आहे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी…

सन्जोप राव  

‘दिल जो न कह सका’- संपन्न संगीतानुभव

September 13, 2006

संगीतकार अनिल विश्वास यांच्या ‘माधुर्य’ परंपरेतील ( ‘मेलडी’ स्कूल ) एक प्रमुख शागिर्द संगीतकार रोशन यांच्या हिंदी चित्रपटगीतांवर आधारित ‘दिल जो न कह सका’ हा कार्यक्रम काल रात्री पुण्यात झाला. उपजत गुणवत्ता, वाद्यांवरची हुकुमत, शास्त्रीय संगीताची तयारी, अर्थपूर्ण काव्य देणारे शायर आणि रफी, लता, आशा, मुकेश, तलत असे उपलब्ध असलेले एकाहून एक सरस गायक या सगळ्याच्या आधारावर रोशनचं संगीत कमालीचं श्रवणीय बनून राहिलं आहे. यात सर्वाधिक वाटा अर्थातच रोशनच्या गुणवत्तेचा आणि मेहनतीचा. पण अवीट गोडीचं संगीत देणाऱ्या या संगीतकाराच्या माथी देखील ‘आर्थिक दृष्ट्या अपयशी’  असाच शिक्का बसला आहे.  अर्थात यामुळं रोशनचं मोठेपण कमी होत नाही, हा भाग वेगळा.

अशा मनात घर करून राहिलेल्या गाण्यांचे कार्यक्रम ऐकण्यामध्ये एक मोठा धोका असतो. ही गाणी सादर करणारे गायक-वादक जर तितक्या तयारीचे नसतील, तर आपल्या मनातल्या त्या गाण्यांच्या प्रतिमेलाच तडा जाण्याची शक्यता असते. म्हणूनच की काय, पण रोशनच्या संगीताच्या शिवधनुष्याला हात घालण्याचं धाडस आजपर्यंत कुणी केलेलं नव्हतं. ‘हमलोग’ ने सादर केलेल्या या कार्यक्रमात विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार आणि प्रमोद रानडे हे तर परिचित आणि तयारीचे कलाकार होते. प्रशांत नासेरी हा बाकी मी न ऐकलेला गायक. म्हणून तो रफीचा आवाज कसा काय पेलेतो ही उत्सुकता होती.

(पुण्याच्या परंपरेनुसार) वीस मिनिटं उशीरा पडदा बाजूला गेला आणि निवेदिका मंजिरी धामणकरनं सूत्रं हाती घेतली. निवेदक या जातीला मी पत्रकारांपेक्षा जास्त घाबरतो. तलतच्या गाण्याचे श्रीकांत पारगावकरांचे कार्यक्रम मी इतक्या वेळा ऐकले, पण प्रत्येक वेळी त्यातला निवेदक स्वतःच पायात चाळ बांधून तलतच्या आवाजाला फरफटत नेतोय असं वाटलं होतं. मंजिरीनं बाकी ‘दोन रेशमी सुरावटींमधली एक सुरावट’ ही भूमिका अतिशय सुरेख बजावली. ‘चित्रलेखा’ च्या ‘मन रे तू काहे ना’ चा पहिला आलाप प्रशांतच्या स्वरात ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला. ‘कारवाँ गुजर गया’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मंगेश तेंडुलकरांनी म्हटलंय,’ जी माणसं १९५० ते १९७० या काळात इथल्या चित्रपट संगीताशी पार गाण्यापासून ऐकण्यापर्यंत संबंधित होती, ती संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात सर्वाधिक भाग्यवान असावीत’. त्याची प्रचिती यावी अशी ही गाणी. त्यानंतरचं विभावरीनं म्हटलेलं ‘हमलोग’ मधलं ‘ छुन छुन छुन बाजे पायल मोरी’ ही असंच रंगलं. त्या मानानं प्रमोदचं ‘अनहोनी’ मधलं ‘मैं दिल हूं इक अरमान भरा’ हेच फिकं वाटलं. तलतच्या आवाजाचा बाजच वेगळा आहे. ती प्रयत्नानं साध्य होणारी गोष्ट नव्हे. तो परीसस्पर्श अल्लातालाच्या घरूनच व्हावा लागतो.

त्यानंतरचं’ सुन बैरी बलम’ हे राजकुमारीचं गाणं मधुरानं कमालीच्या ठसक्यात म्हटलं. त्यातला ‘इब क्या होगा’ मधल्या ‘इब’ चा नखरा तिनं जोरदारपणे सादर केला. ‘हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे के कयामत हो और तू आये’ ‘बहू बेगम’ मधलं हे जोरदार गाणं, प्रशांतचा दाणेदार मनमोकळा स्वर, ‘कयामत या शब्दावर त्याने सहीसही घेतलेली फिरकी.. व्वा!

प्रसाद गोंदकरच्या हातात जिवंत झालेल्या सतारीतून बाहेर पडलेल्या स्वरलडींनी ‘टिळक स्मारक’ चं छप्पर कुठल्याकुठं उडवून दिलं आणि आषाढसरींच्या जोडीनं ‘कलावती’ चे सूर प्रेक्षागृहात बरसू लागले.
‘काहे तरसाये..
जियरा
काहे तरसाये..’
‘चित्रलेखा’ मधील ही अवीट सुरावट मधुरा आणि विभावरीने ज्या तयारीने सादर केली त्याला जवाब नाही!
नंतर तर एकाहून एक गाण्यांची चुरसच सुरु झाली. ‘बावरे नैन’ मधलं मुकेशनं सैगलच्या शैलीत गायलेलं ‘ तेरी दुनिया में दिल लगता नही’, ‘अजी बस शुक्रीया’ मधलं गोड ‘सारी सारी रात तेरी याद सताये’ ‘रागरंग’ मधील यमनची पारंपारिक बंदिश  ’एरी आली पियाबिन’..

रोशनच्या गाण्याचं कव्वाली हे एक मोठं आकर्षण असतं. त्यात मधुराच्या आवाजात ‘दिल ही तो है’ मधली ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ ऐकणं म्हणजे म्हणजे मेजवानीच. तिनं पहिला आलाप घेतला आणि टाळ्या आणि शिट्ट्या यांनी ‘टिळक स्मारक’ दणाणून गेलं
‘राज की बात है, महफिल में कहें या न कहें
बस गया है कोई इस दिल में , कहें या न कहें’  …

या गाण्याचा कैफ जरा कमी होतो न होतो तोवर विभावरी आणि प्रमोदनं ‘मल्हार’ मधलं ‘कहाँ हो तुम जरा आवाज दो’ हे विलक्षण आर्त पण सुमधुर गाणं सुरु केलं. हे मला वैयक्तिक अतिशय आवडणारं गाणं. त्यातल्या लता-मुकेशच्या सुरावटींनी हृदय पिळवटून निघतानिघताच ‘आरती’ मधल्या ‘आपने याद दिलाया..’ चे सूर खुणावु लागले!

एकाच गायकाची, एकाच गीतकाराने लिहीलेली, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेली आणि एकाच रागातली दोन गाणी किती भिन्न परिणाम साधून जातात याचं उदाहरण म्हणजे या कार्यक्रमात सादर झालेली मन्नाडेंची साहिरने लिहिलेली भैरवी रागातली रोशनची दोन गाणी. ‘फुल गेंदवा ना मारो’ हे विनोदी अंगाचं गाणं आणि सदाबहार ‘लागा चुनरी में दाग’. प्रमोदने जबरदस्त तयारीने ही गाणी गायली. आता यातल्या ‘लागा चुनरी में दाग’ ला, त्यातल्या तबला व सतारीच्या तुकड्यांना व तराण्याला ‘वन्स मोसर’ मिळाला हे सांगायला नकोच.

त्यानंतर सादर झालेली पाच गाणी केवळ डोळे मिटून ऐकत रहावी या दर्जाची. ‘कारवाँ गुजर गया..(नई उमर की नई फसल)’,'दिल जो न कह सका ( भीगी रात )’, अब क्या मिसाल दूं..(आरती)’,'एरी मैं तो प्रेमदिवानी (नौबहार)’ आणि ‘बहारोंने मेरा चमन लूटकर (देवर)’. त्या मानानं त्यानंतरचं ‘ममता’ मधलं ‘इन बहारोंमें अकेले ना फिरो’ आणि ‘रागरंग’ मधलं ‘यही बहार है’ दुय्यम वाटलं.

बेफिकीरीने सिगारेट्चा धूर फेकणारा तरणाबांड देखणा राज कपूर आणि त्याभोवती पिंगा घालणारी त्याची प्रिया यांच्यावर चित्रित झालेलं ‘बावरे नैन’ मधलं ‘खयालोंमे किसीके’, रोशनच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने ध्वनीमुद्रीत केलेलं ‘अनोखी रात’ मधलं ‘महलों का राजा मिला..’ ( यातलं ‘ओहरे ताल’ आणि ‘मिलें ना फूल तो..’ का नाही? मी स्वतःशी!),’ताजमहाल’ मधलं अप्रतिम ‘जो बात तुझमें है’, ‘बरसात की रात’ मधलं शीर्षकगीत, ‘चित्रलेखा’ मधलं ‘संसार से भागे फिरते हो’ ‘एको इफेक्ट’ ने ध्वनीमुद्रीत केलेले ‘ममता’ मधले ‘रहे ना रहे हम’ अशी लागोपाठ गाणी ऐकली आणि तृप्त झालो. रात्रीचा पाऊण वाजला होता. या आकंठ मेजवानीनंतर ‘आता फक्त एक मघई जोडी…’ ही फर्माईश पूर्ण केल्यासारखी हार्मोनिअमवर एक स्वरमाला उलगडली आणि प्रमोदनं आपल्या कसलेल्या आवाजात सुरुवात केली…

‘ना तो कारवाँ की तलाश है
ना तो हमसफर की तलाश है..’

‘ बरसात की रात’ मधली ही कव्वाली म्हणजे दंगाच. एकीकडे आशा व सुधा मलहोत्रा मागणी करत असतात..

‘जो दवा के नाम पे जहर दे
उसी चारागर की तलाश है…’

हां, हां.. या हसिनांच्या शब्दांवर विश्वास नका हं ठेवू, साहिर मध्येच बजावतो. यांचं काय, आज एक आणि उद्या एक…

‘नाजो-अंदाज से कहते के जीना होगा
जहर भी देते हैं  तो कहते हैं के पीना होगा
जब मैं पीता हूं तो कहते है के मरता भी नही
जब मैं मरता हूं तो कहते है की जीना होगा’

अपेक्षेप्रमाणे ही कव्वाली रंगतच गेली. शिट्ट्या, टाळ्या आणि पावलांनी धरलेला ठेका यांनी प्रेक्षागृह दुमदुमून गेलं. प्रशांतचा आवाज टिपेला पोचला..

‘इन्तेहा है ये के बंदे को खुदा…
करता है इश्क…’

प्रचंड कडकडाटात पडदा सरकत मध्यभागी आला. एका सुरेल, संपन्न स्वरसंध्येची सांगता झाली!

काळ्या चष्म्याआडचा माणूस

September 13, 2006

‘आजारी माणसांना किंवा आजाराची शंका असणाऱ्यांना औषध घेण्यापासून परावृत्त करणे हे डॉक्टरचे एक महत्वाचे काम आहे’ या अर्थाचे वरकरणी विरोधी भासणारे एक इंग्रजी वचन आहे. यश आणि यशातून मिळणारी प्रसिद्धी याबाबतही थोड्याफार फरकाने हेच म्हणता येईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जेवढी तपश्चर्या करावी लागते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसिद्धी पचवण्यासाठी, ती डोक्यात जाऊ न देता पाय जमिनीवर रहावेत यासाठी करावी लागते.’अपयशापेक्षा यशानंच माणसं अधिक मुर्दाड होतात’ असं पु. लं. म्हणतात.प्रसिद्धीच्या मागं लसलसून लागणारी आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी माणसं बघीतली की आभाळाएवढी प्रतिभा असूनही जाणीवपूर्वक अज्ञानाच्या काळोखात रहाणारी माणसं अधिकच मोठी वाटायला लागतात.
जी.ए. उर्फ गुरुनाथ आबाजी कुलकर्णी या खरेतर मराठी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळण्याची योग्यता असलेल्या पण आयुष्यभर गूढपणाच्या वलयात लपून राहून  अचानक लुप्त पावलेल्या लेखकाविषयी हेच म्हणता येईल. जी.एं विषयी तुसडा, माणूसघाणा, उर्मट असे असंख्य गैरसमज होते. ‘आय लिव्ह ऑन प्रिज्युडिसेस’ असे मानणाऱ्या जी.एं नी ते दूर करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मराठी साहित्यातील अनेक सन्मान त्यांच्याकडे  चालून आले. पण ते नम्रतेने स्वीकारताना जी.एं नी त्या सन्मानासोबत आलेली झळाळी कटाक्षाने बाजूला ठेवली. साहित्यसंमेलने, चर्चा, परिसंवाद, सत्कार याकडे ते फिरकलेही नाहीत. काही मोजके अपवाद सोडले तर जी.एं नी आपले छायाचित्रही कुणाला काढू दिले नाही. ‘रावसाहेबां’ प्रमाणे हार पडले ते त्यांच्या मृतदेहावरच.
कोण होता हा माणूस? १९५० पासून १९८०-८५ पर्यंत मुंबई- पुणे- नाशिक या मराठी साहित्याच्या केंद्रबिंदूपासून कित्येक मैल लांब धारवाडसारख्या अमराठी ठिकाणी राहून मराठी प्रतिभेच्या इतक्या उत्तुंग भराऱ्या घेणारा? आपले लिखाण खूप लोकप्रिय झाल्यानंतरही बरेच दिवस आपल्या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तेच्या छपाईला नकार देणारा? अफाट प्रतिभा, ती व्यक्त करण्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी व क्षमता, जगातले सर्व प्रकारचे साहित्य, कला, संगीत याचा अत्यंत सखोल अभ्यास, अव्याहतपणे केलेले अर्थपूर्ण आणि प्रचंड वाचन, कांदेपोह्यापासून चमचमीत कोंबडीपर्यंतची खाद्यरसिकता आणि हे इतके सगळे असतानाच काटेकोरपणे आपले ‘खाजगीपण’ जपणारा?
जी.एं च्या कथांप्रमाणे त्यांचे आयुष्यही एका कोड्यासारखे वाटते. आणि ते तसे आहेही. घरची अत्यंत गरीबी, आई-वडीलांचे अकाली मृत्यू, मायेच्या अशा दोन सख्ख्या बहिणींचेही पाठोपाठ निघून जाणे, त्यामुळे आयुष्यात एक विलक्षण एकाकीपणा, काहीसा कडवटपणाही येणे, पण त्यामुळे जीवनात सगळीकडे भरून राहिलेल्या दुःखाची  जाणीव अधिक टोकदार  होणे…. हे सगळे जे. एं च्या एखाद्या कथेसारखेच वाटतें. नंदा आणि प्रभावती या दोन मावसबहिणींबरोबर जी.ए. बरीच वर्षे धारवाडात राहिले. स्वतःचे कुटुंब करण्याचा विचार त्यांच्या मनात आला  नसेलच असे नाही. पण त्या विषयावर त्यांनी कधी चर्चाही होऊ दिली नाही. ( कदचित यामागेही त्यांचे काही ‘खाजगी गूढ?’ ). धारवाडमध्ये ते एक अत्यंत लोकप्रिय  इंग्रजीचे प्राध्यापक होते. धारवाडमधील कडेमनी कम्पाउंडमेधील त्यांची ती जुनाट बंगली, तीभोवती जी.एं नी स्वतः खपून केलेली छोटीशी बाग, कर्नाटक विश्वविद्यालयाचे मुक्त वाचनालय, त्यांचा तो खाजगी क्लब, त्यांचे लिखाण,त्यांच्या सिगारेटस, पुण्यामुंबईच्या त्यांच्या साहित्यीक (पत्र)मित्रांशी असलेला अखंड पत्रव्यवहार ,…जी.ए. आनंदात होते. .
पण जी.एं च्या कथेत शोभावासा शोकांत याही गोष्टीला लाभला होता‍. जी.एं ची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्यांना त्यांच्या सर्वात नावडत्या गावी – पुण्याला यावे लागले. आपल्या हातून आता फारसे काही काम – विशेषतः लिखाण होणार नाही हे जी.एं नी ओळखले आणि ल्युकेमियासारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्याचे साफ नाकारले. एवढेच काय, पण आपल्या बहिणींनाही त्यांनी आपल्या आजाराची कल्पना दिली नाही. नाइलाजाने एकदोन दिवस इस्पीतळात काढून जी.ए. अगदी गुपचुप ‘खाजगीपणाने’ आयुष्यभर त्यांना ज्याची ओढ होती त्या अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले!  
पण जी.एं चे वेगळेपण – कुणी त्याला विक्षिप्तपणाही म्हणेल -एवढेच नाही. जी.एं च्या कुठल्याही पुस्तकातले कुठलेली  पान काढून बघा.. हे पाणी काही वेगळे आहे हे पटकन लक्षात येते. एवढेच कशाला, जी.एं च्या पुस्तकांची नावे व त्यांच्या अर्पणपत्रिका जरी बघीतल्या तरी या सोनेरी पंखाच्या पक्षाची गगनभेदी झेप दिसून येते. ’पिंगळावेळ’ हा कथासंग्रह आपल्या वडीलांना अर्पण करताना ते लिहीतातः

तीर्थरूप आबांस,
डोळे उघडून उठून बसत मी तुम्हाला नीट पहाण्यापूर्वीच
तुमची पावले उंबऱ्याबाहेर पडली होती.


‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना ते म्हणतातः

कै. तीर्थरूप ताईस,
रात्री उशीरा घरकाम करताना
तुला सोबत व्हावी म्हणून
लहनपणी मला समोर बसवून
तू पुष्कळ कथा सांगितल्यास
आता तू गेल्यावर
मला त्या कथांची सोबत आहे

‘काजळमाया’ हा जी.एं चा खूप गाजलेला कथासंग्रह त्यांनी आपल्या मावशीला अर्पण केला आहे. त्याची छोटीशी पण चटका लावणारी पत्रिका पहाः

सोनूमावशीस,
तू आम्हाला आणखी एक आई होतीस.

असाच चटका आपल्याला ‘निळासावळा’ ची पत्रिकाही लावते. फार अकाली गेलेल्या आपल्या तीन बहिणींना हा संग्रह जी.एं नी अर्पण केला आहेः

इंदू, सुशी व जाई
या तीन आठवणींना


आणि ज्या पत्रिकेशिवाय हे लिखाण पूर्णच होऊ शकणार नाही ती ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहाची केवळ अविस्मरणीय, डोळ्यात पाणी आणणारी अर्पणपत्रिकाः


स्पर्धेच्या धुंदीत आपल्या हातानी आभाळात सोडलेली, पण जिचा मृत्यू असहायपणे खालून पहावा लागला ती गुलाब पाकळ्यांच्या चोचीची चंद्रावळ, मघापर्यंत उत्साहाने पाऊल स्थिर न ठेवणारा पण आकस्मिक वेदनेने तडफडत ओंजळीत निपचिप झालेला, माणके बसवलेल्या कवडशाप्रमाणे दिसणारा लाल डोळ्यांचा पिवळा पक्षी, अजाण संतापाने पाठीवर सपासप वेत मारल्यावरही ते वळ अंगावर घेऊन आपुलकीने अंगाला अंग घासू लागणारी क्षमाशील कृष्णी गाय, आपल्या वासाने पहाट ओली करणारा, पण घरबांधणीच्या वेळी तो काढून टाकायचे ठरताच त्याआधीच दोनचार दिवस आपण होऊन मूकपणे आडवा झालेली पारिजातक, जत्रेमधील फिरते चक्र मला पहायला मिळावे म्हणून मला खांद्यावरून सात मैल घेऊन जाणारा लंगडा हाडकातडी म्हातारा बसलिंग, ‘कसा पोट जाळतो बघा’ असे आईने म्हणताच ताडकन पानवरून उठून तीन मजली बारा खणी घरातून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडून शेवटपर्यंत एकवस्त्री रहाणारा, लाकडे फोडून पोट भरत असता अर्ध्या गावाला जातिवंत मोत्यांची पारख सांगणारा आणि शेवटी एका धर्मशाळेत शेजारे कुऱ्हाड ठेवून संपून जाण्यापूर्वी मला साबणाचे फुगे कसे करायचे हे शिकवून जाणारा दत्तू इनामदार, आतड्याच्या चोवीस माणसांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिलेली, आता उरलेल्या दोनचार जिव्हाळ्याच्या माणसांना तरी आपल्या प्रेमापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याप्रमाणे मलाही हिडीसफिडीस करण्याची केविलवाणी धडपड करणारी काकाची आई, ‘अरेबियन नाईटस’ मला प्रथम वाचायला देणारा, फुटबॉल खेळण्यासाठी जीव टाकणारा, पण एका अपघातात नेमके दोन्ही पाय गमवून घेतलेला भागिरथ देशपांडे, माझ्या आयुष्यातील पहिली पूर्ण लांबीची शिसपेन मला देणारा रुद्राप्पा बेलीफ, स्वतः निरक्षर असूनदेखील मी खूप शिकावे असे दत्ताजवळ सतत मागणे करणारी, मे पहिलीची परीक्षा पास होताच पै पै जमा केलेले पुष्कळसे पैसे खर्च करून पेढे वाटणारी. ठीकठीकाणी वार लावून जेवणारी, आणि एक दिवस अचानक नाहीशी झालेली, कापऱ्या अंगाची, तोतरी, अनाथ, वेडसर रखमाकाकू यांस….
तुम्ही सगळेच जण पुढे निघून गेलात. मी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही मात्र माझ्याकडे कधी येणार नाही. आपण पुढे पुन्हा कधीतरी भेटू.

जी.एं च्या कथा आणि त्यांच्या व्यक्तिरेखा यावर पुन्हा कधीतरी….

सन्जोप राव   

‘पाडस’ आणि ‘हरीणबालक’

September 13, 2006

मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेची ‘द इयर्लिंग’ ही कादंबरी जागतिक साहीत्यविश्वात महत्वाची मानली जाते. १९३८ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा संस्थानाचे एक वेगळेच, अपरिचित रूप रेखाटले आहे. या कादंबरीचा काळ शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा. जंगलात एकटे रहाणारे बॅक्स्टर कुटुंब. जवळपास शेजार असा नाहीच. घनदाट आरण्य, हिंस्त्र पशू, आक्राळविक्राळ निसर्ग. या सगळ्याशी टक्कर देत, त्याबरोबर त्याच्याशी थोडीशी मैत्रीही करत जगणे. बॅक्स्टर कुटुंबातला जिगरबाज पण शरीराने थोडासा कमकुवत कुटुंबप्रमुख पेनी, त्याची व्यवहारचतुर पण थोडीशी भांडकुदळ बायको ओरी आणि त्यांचा एकुलता एक छोटा मुलगा ज्योडी. त्या वयात सगळी मुलं असतात तसा खोडकर आणि व्रात्य. आसपास खेळायला कुणी नसल्यामुळे एकटा पडलेला आणि समवयस्क कुणाच्या तरी सोबतीला आसावलेला.
बॅक्स्टर कुटुंबाचे आयुष्य हे खडतरच. थोडीशी जमीन साफसूफ करून जमेल तितके धान्य पिकवणे, एखादी गाय, काही डुकरे, काही शिकारी कुत्री पाळून, मिळेल ती शिकार करून स्वतःला व त्यांना जगवणे, हरणाचे, अस्वलाचे खारीचे, डुकराचे, कासवाचे- जे मिळेल त्याचे ताजे, सुकवलेले, खारवलेले किंवा धुरकटवलेले मांस, रताळ्याची रोटी, मक्याची खिचडी असे काहीबाही खाऊन जगणे,जंगली प्राण्यांपासून त्यांना व स्वतःला वाचवणे…’भक्षक व्हा किंवा भक्ष्य व्हा’ हा जंगलचा कायदा. तुम्हाला आवडो किंवा न आवडो!
ज्योडीला एखाद्या प्राण्याचे पिल्लू पाळावे  असे फार वाटत असते. आपल्याच खाण्याची भ्रांत, तेथे त्या पिल्लाला कोण खायला घालणार या विचाराने ओरी त्याला ते करू देत नसते. अपघाताने एक दिवस ज्योडीला हरणाचा एक नुकताच जन्मलेला बच्चा सापडतो. कशीबशी आईची मनधरणी करून ज्योडी त्या बछड्याला घरी आणतो. ज्योडीचे सगळे आयुष्यच त्या पाडसाभोवती गुंतून जाते. त्याच्या बावट्यासारख्या पांढऱ्या शेपटीवरून त्याचे नाव ‘फ्लॅग’ ठेवले जाते. छोट्या ज्योडीचे छोटे आयुष्य आनंदाने काठोकाठ भरून जाते.
पण गोष्टी इतक्या सरळ सोप्या थोड्याच असतात? ते हरणाचे पाडस मोठे होऊ लागते. बघताबघता त्याचा एक तरणाबांड पाडा होतो. त्याची भूकही वाढते आणि मग तो बॅक्स्टर कुटुंबियांनी लावलेल्या पिकांचाच फन्ना उडवायला लागतो. त्याला कोंडून ठेवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ होतात. आता बॅक्स्टर कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा रहातो. क्रूर नियती पेनीला दुःखद पण अपरिहार्य निर्णय घ्यायला लावते.
पेनी ज्योडीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्योडीला काहीच समजत नाही. मग नाइलाजाने ओरीच फ्लॅगला गोळी घालते. फ्लॅगची तडफड होते. ज्योडीला ते बघणे अशक्य होते. फ्लॅगच्या मानेवर बंदुकीची नळी ठेवून तो चाप ओढतो. फ्लॅगच्या डोळ्यात क्षणभर अविश्वास तरळतो आणि मग ते डोळे निर्जीव होतात.
ज्योडीचे सगळे जग उलटेपालटे होते. दिशा दिसेल तिकडे तो पळत सुटतो. आपल्या एकमेव सुखाच्या आड येणाऱ्या कुटुंबापासून दूर जाण्याचा तो निर्णय घेतो.  बापाची, आईची, स्वतःची..सगळ्या जगाची त्याला घृणा वाटत असते. सगळ्यापासून दूर दूर दिशाहीन तो दोन दिवस भटकत रहातो. फ्लॅगला विसरण्याचा प्रयत्न करत…फ्लॅगला आठवत..
आणि मग त्याला भूक लागते.
भुकेचे हे भीषण रूप ज्योडीला नवीन असते.त्याला आतापर्यंत माहिती असलेल्या किंचित सुखद भुकेच्या जाणिवेपेक्षा अगदी वेगळे आणि भयानक. ‘आपल्या सगळ्याना भुकेनं मरावं लागेल’ ओरी म्हणालेली असते. ते जणू पटवून देणारी, आपल्या तीक्ष्ण नखांनी पोटात ओरबाडणारी भूक, कितीही खाल्लं तरी संपणार नाही असे वाटणारी भूक… 
या भुकेच्या नव्या जाणिवेने जणू ज्योडीचे पोरपण संपते. जीवनसंघर्ष म्हणजे काय हे त्याला हा एकच अनुभव शिकवून जातो. स्वप्नाळू, काल्पनिक जगाच्या जागेवर खरेखुरे, जिवंत जग येते. रुक्ष, रंगहीन पण अपरिहार्य. बालीश, पोरकट, अल्लड ज्योडीच्या जागी एक पोक्त, जबाबदार ज्योडी जन्म घेतो.  
हा नवा ज्योडी शांतपणे घरी येतो. बाप आजारी असतो. आई नव्या पेरणीसाठी बियाणे आणायला गेलेली असते. शेतातली कामे खोळांबलेली असतात.
चाचपडत पेनी पोराला जवळ घेतो आणि त्याला चार गोष्टी सांगतो. बाप्याबाप्यांमधल्या गोष्टी.
‘ जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पोरा. जीवन सुंदर आहे, फार सुंदर आहे. पण ते सोपं मात्र नाही.एका फटक्यात ते आपल्याला जमीनदोस्त करतं. आपण उठतो, आणि जीवन आण्खी एक फटका मारतं. काय करायचं? आपल्या वाट्याला येईल तो भोग स्वीकारायचा आणि पुढं चालू लागायचं!’
ज्योडीला हे केंव्हाच कळालेलं असतं. बापाच्या अंगावर तो पांघरूण घालतो. ‘झोप आता तू पा.’ तो म्हणतो. ‘सकाळी मला लवकर उठायचं आहे, दूध काढायचं आहे, लाकडं आणायची आहेत, शेतात काम करायचं आहे – पण तू नको काळजी करु. मी करीन ते सगळं…’
ज्योडी आपल्या खोलीत येतो. कुणाची तरी चाहूल घेण्याचा प्रयत्न करतो. पण ती आता त्याला कधीच येणार नसते. झोपता झोपता रुद्ध कंठानं तो साद घालतो
‘फ्लॅग…..!’
पण तो आवाज त्याचा नसतो. तो एका कोवळ्या पोराचा असतो. त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत एक कोवळा पोरगा आणि त्याचं पाडस पळत पळत येतात आणि झाडामागं दिसेनासे होतात..

मराठीत राम पटवर्धनांनी ‘पाडस’ या नावानं तर भा.रा. भागवतांनी ‘हरीणबालक’ या नावानं या कादंबरीचा अनुवाद केला आहे. दोन्ही अनुवाद आवर्जून वाचण्यासारखे. जागेवर खिळवून ठेवणारे आणि पुस्तक संपतासंपता डोळ्याच्या कडा पुसायला लावणारे…..
सन्जोप राव

कृतार्थ…

September 13, 2006

डिस्क्लेमरः खालील मजकूर म्हणजे काय आहे ते मला माहिती नाही. माझ्या काही शंकेखोर मित्रांच्या मते ती चोरून केलेली कविताच आहे. माझ्याकडून बरेच पैसे उसने घेऊन ते आजवर परत न केलेल्या एका मित्राला बाकी तो मजकूर म्हणजे ‘माझ्यातल्या विद्रोही स्फुल्लिंगाचा लयबद्ध आविष्कार’ वाटतो. खरे काय ते बा वाचकाने ठरवावे. २० जून १९९७ रोजी मुंबई – पुणे प्रवासात मी हे लिहीले होते. 

कृतार्थ
नमस्कार.
ओळखलं मी तुम्हाला.
तुमच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला
होतो ना मी.
अमुकतमुक कंपनीत
‘पस्तीस वर्षाची निष्ठा…’ वगैरे
चांगले बोलले तुमचे साहेब.
पँटचं कापडही रेमंडचं आहे मला वाटतं…

ब्लॉक डोंबिवलीलाच ना?
आणि दीपाचं सासर कल्याणला, हो माहित्येय मला …
उमेशसाठी बघताय म्हणे यंदा
नोकरीवाली शक्यतो आपल्यातलीच बरी…

सकाळंचं फिरणं बाकी चुकत नाही हो तुमचं
आणि हल्ली काय हास्यक्लब वगैरे जोरात
दुपारच्या पोळ्या अडीच मोजून
तीनचा पाऊणच कप कोमट चहा
संध्याकाळी पाय मोकळे करून येतायेता
देवदर्शनही जमून जाते बुवा तुम्हाला

भात आणि गोड खाणं तर सोडलंयच तुम्ही
डायबिटीसची शंका असतानसताना
बीपीवरची एकच दुबळी गोळी सकाळी
बरी आपली मनःशांतीला..

वर्षातून एकदा कोकणात
आणि शिर्डीही, हो, म्हणाला होतात तुम्ही…
महिनाभर आधी रिझर्वेशन्स करता ना
दोन्ही वेळच्या प्रवासाची

जूनमध्ये छत्रीशिवाय
बाहेरही पडत नाही तुम्ही
आणि ऑक्टेबरमध्येच बाहेर काढून ठेवता
स्वेटर, मफलर आणि कानटोपीसुद्धा
डांबरगोळ्यांचा वास घालवण्यासाठी…

सोडण्यासारखं व्यसन तर कधी नव्हतंच तुम्हाला…
परेराकडं चोरून खाल्लेलं मटण एकदाच
ऑफिसच्या पार्टीत घेतलेला अर्धा पेग स्कॉचचा
घाबरत तोही पण असते कशी ते बघू म्हणून
तेवढ्यानंही डोकं जडावलं होतं तुमचं
दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत
सिग्रेटच्या वासानंही मळमळल्यासारखं होतं तुम्हाला
हां, तशी अधूनमधून
तपकीर ओढता तुम्ही, गंमत म्हणून
पण तीही हल्ली नाहीच.

जाग्रणामुळं पित्त.. हो, ते आहे बुवा तुमचं पहिल्यापासून
गाण्याला, अहो, सिनेमालासुद्धा वहिनी आणि मुलं एकटी यायची.
चौपाटीवरही मी पाहिलं  होतं तुम्हाला एकदा
पाणीपुरी नको, सोसणार नाही, म्हणत होता तुम्ही
तुमच्या लाल रंगाच्या गरम पाण्याच्या थर्माससह…
मोठी पिशवी होती बघा तुमच्या हातात
म्हणत होता बघा, आता भेळेचे पैसे ‘विवेक’ आणि ‘सनातन प्रभात’ च्या रद्दीतून असं काहीतरी..

आणि आता दहाच्या ठोक्याला
दोनदोनदा कड्याकुलुपं तपासून दिवा मालवताना
आपण किती सार्थ, कृतार्थ आयुष्य जगलो असं वाटत असेल ना तुम्हाला…
चांगलं आहे
चांगलंच आहे की
पण माझी एक शंका..
हे सार्थ वगैरे सगळं ठीक आहे
पण जगणं म्हणजे काय जगलात हो तुम्ही?
नक्की?

नाही सांगता येणार?
नाहीच म्हणता?
असो.
नमस्कार.

रात्र झाली गोकुळी

September 13, 2006

‘कारट्या, किती भूक भूक करशील…’ घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे करताना बघणे यातून आईवडीलांना खूप खूप समाधान मिळत असते.
पण हे झाले सर्वसामान्य, खाऊनपिऊन सुखी घरातले चित्र. जिथे या भुकेमागे भयाण दारिद्र्याचा काळाकुट्ट भेसूर पडदा असतो तिथे ही नैसर्गिक भूक अगदी भयानक, विदारक रूप धारण करते. शाळकरी वयातला कृष्णा हा असाच वाढत्या वयाचा मुलगा. त्याचे पोरपण अजून संपलेले नाही. दारिद्र्य, गरीबी याची त्याला जाणिवही नाही. भूक लागली की खायला हवे इतक्या निरागस त्याच्या भावना. तो शाळेतून घरी येतो तोच भुकेने कलकलून. त्याचे घर म्हणजे तरी काय,एका बाजूला तट्टे आणि दुसऱ्या बाजूला रॉकेलच्या डब्यांचे गंजलेले पत्रे लावून कसाबसा केलेला आडोसा. त्यातच सतत धूर ओकणारी ओलसर चूल. खोकल्याच्या उबळीने प्राण कंठाशी आलेली त्याची आई, खंगत चाललेली त्याची बहीण दुर्गी, जिच्या दवाखान्यातल्या नोकरीच्या तीस रुपये महिना पगारावर कसाबसा संसार चालतो ती कामाने दमून चिंब झालेली दुसरी बहीण शकी आणि अठराविश्वे दारिद्र्याबरोबर झट्या घेणारा, छातीत डाव्या बाजूला तापलेली सुई खुपसावी तसे होत असताना हेडक्लार्कच्या घरी दोन गाड्या लाकडे माळ्यावर रचून लोळागोळा झालेला त्यांचा बाप दाजी….
कृष्णाला घरी खायला काही नसते. त्याचा चहाही गरम झालेली नसतो.कोमट काळसर गुळाच्या चहाचा कप त्याच्यासमोर आई आदळते. “अगदी दुष्काळात जन्मलंय कारटं..” ती करवादते. “नुसता चहाच प्यायचा? ते कालचे चिरमुरे संपले?” कृष्णा चिडून विचारतो. तेलहळद लावलेले ते मूठभर चिरमुरे कधीच संपलेले असतात. कृष्णा परसात जाऊन उभा रहातो. समोरच्या घरातली मुले पोह्याच्या ताटल्या घेऊन बाहेर आलेली असतात. भूक असह्य होऊन आपल्या घराकडे भीतभीत पहात कृष्णा एकापुढे हात करतो. तो मुलगा आपला रिकामा हात फटदिशी कृष्णाच्या हातावर मारतो….
शेजारच्या वकीलांच्या परसात दोडके, दुधी भोपळे फोफावलेले असतात. ते चोरून भटाच्या भाजीच्या दुकानात विकले की भट दोन आण्याचे बटर, बिस्कीटे देत असतो. या वेळी कृष्णा ते चोरत असताना भोपळ्याचा मांडवच कोसळतो आणि वकीलांचा गडी कृष्णाला बेदम मारतच घरी घेऊन येतो. “मी कशाला घेऊ यांची भाजी?” हुंदके देत कृष्णा खोटे बोलतो…
कृष्णाची आई कण्हत कसाबसा स्वयंपाक करत असते. स्वयंपाक म्हणजे काय..घरात भातापुरते तांदूळही नसतात. दुपारच्याच अपुऱ्या भाकरी, तुरट, बियाळ वांग्याच्या फोडी आणि मूठभर डाळ  घातलेली लालसर बेचव आमटी आणि गाठी झालेल्या एवढ्याशा डांगराच्या पिठात घातलेले थेंबभर काळसर ताक…. हेच त्यांचे जेवण.तेही अपुरे. दुर्गीला अन्नाची वासनाच नसते. तिचा भाकरीचा चूर खाऊनही कृष्णाची भूक तशीच रहाते. वाढत्या वयातील मुलाच्या पोटातील न संपणारी भूक…
सगळेच अंधारात आडवे होतात. कृष्णाला काही झोप येत नाही. अंधारातच तो खुडबुड करू लागतो.चुरमुऱ्याच्या डब्यातले खालचे उरलेले तिखट, आईने ठेवलेले उपासाचे दाणे..त्याला काही काही सापडत नाही. घटघटा पाणी पिऊन तो परत आडवा होतो. शेजारची आचरट  पोरे कृष्णाच्या घराच्या पत्र्यावर दगड फेकण्याचा खेळ सुरु करतात. गल्लीतली कुत्री वचावचा ओरडू लागतात..
“खीर खीर म्हणून बाळाने हट्ट धरला, म्हणून केली कपभर, पण त्याने बोटसुद्धा लावलं नाही. शिवाय ही बटाट्याची भाजीदेखील उरली” शेजारच्या घरातून आवाज येतो “काय करायचं आता?”
“आता असं कर.. सकाळी ते सगळं देऊन टाक शेजारी..”
कृष्णा एकदम खुलतो. ‘सकाळी देण्याऐवजी आत्ताच का देत नाहीत? मी स्वतः जाऊन आणतो हवे तर..’पण शेजारचे घर बंद होते..
घरात घुशींची खरखर सुरु होते. आईला बरगड्या बाहेत पडतील की काय अशी खोकल्याची ढास लागते. न संपणारी लांबलचक काळी रात्र सुरु होते..
कशाने तरी कृष्णाची झोप चाळवते. “उजाडलं आई?” तो आशेने विचारतो. अजून रात्रच आहे हे पाहून तो हिरमुसतो आणि काही तरी बडबडत पुन्हा झोपतो..त्याच्या झोपेत येते ती खीर. शेवयांची, केशरी रंगाची, मधून-मधून बेदाणे असलेली चांगली पातेलेभर दाट खीर..

“उजाडलं आई?” हा कृष्णाचा प्रश्न कृष्णाची सारी वेदना व्यक्त करून ह्रदय कापीत जातो. अशी ही ह्रदय पिळवटून काढणारी कृष्णाची आणि त्याच्या गोकुळाची कहाणी. असे कोट्यवधी कृष्णा महान सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या भारत-भूमध्ये केविलवाणे जीवन निमूटपणे जगत आहेत. स्वातंत्र्य आले, योजना आल्या आणि गेल्या, कार्यक्रम आले, राबताहेत, पण कृष्णा आहे तिथेच आहे. रात्र संपून उजाडण्याची वाट पहात आहे. केशरी रंगाची दाट खीर….

कथेचे नाव ‘रात्र झाली गोकुळी’ लेखक अर्थातच जी.ए.कुलकर्णी. कथासंग्रह ‘पारवा’. वरील शेवटच्या परिच्छेदाचे लेखक धनंजय आचार्य.

जीएकथांमधले भाषासौंदर्य -१

September 13, 2006

जी. एं. वरील माझ्या याआधीच्या लेखानंतर जी.एं. चे साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर का गेले नाही असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. मला वाटते जी.एं. ची विलक्षण शब्दकळा हेसुद्धा त्यामागचे एक कारण असावे. जी.एं. ची पात्रे जितकी अस्सल मराठी मातीतली आहेत, तितकीच त्यांची भाषाही झपाटून टाकणारी आणि अनुकरण किंवा अनुवाद करता न येण्यासारखी आहे. जी.एं. च्या कथांचे अनुवाद करणे हे (अनुवादकर्त्याच्या कुवतीविषयी शंका न घेताही) जवळजवळ अशक्यच आहे.

जी.एं. च्या कथांमधील भाषा ही उपमा-उत्प्रेक्षांनी खच्चून भरलेली तरीही घरगुती साधी आणि नैसर्गिक आहे. बऱ्याच वेळा त्यांनी वापरलेल्या उपमा वाचताना वाचक थबकतो, थोडेसे मागे जाऊन ते वाक्य परत वाचतो आणि ‘या माणसाला हे कसे सुचले असेल?’ असा विचार करू लागतो.

‘अमुकसारखे’ किंवा ‘तमुकप्रमाणे’ याशिवाय जी.एं. ची कथा पुढे सरकतच नाही. ही मानली तर जी.एं. ची मर्यादाही आहे, पण जी.एं. च्या या उपमा यज्ञात हात घालून जळता निखारा बाहेर काढावा तशा अति तेजस्वी जळजळीत असतात. मग त्यांच्या कथेत कधी ‘गाव एका कुशीवर घेऊन पसरलेली वाळू आणि तिच्यावर वाळत घातलेल्या निळसर चुणीदार वस्त्राप्रमाणे दिसणारा’ समुद्र असतो, ‘कुत्सित, कपटी डोळ्यांप्रमाणे दिसणाऱ्या खिडक्या असलेले एखाद्या अजस्त्र जबड्यासारखे दिसणारे जुने घर’ असते, ‘भिंतीला हात लावताच मोगरा फुलवणारी आणि एका मृदू शब्दाने ऐकणाऱ्याच्या मनावर कशिदा काढणारी बहिण’ असते, ‘भरतीच्या वेळी मोठमोठे हिरवे फणे काढून वाढणारे पाणी’ असते, ‘प्रदर्शनातील काकडीप्रमाणे जाड, निबर दिसणारी मुलगी’ असते आणि ‘मुठी घट्ट आवळून सोवळ्याच्या काठीप्रमाणे ताठ, निर्जिव उभी असलेली’ रुक्मिणी असते.

एखाद्याने महिनाभर विचार करून शोधाव्या अशा या उपमा जी.एं. च्या ‘पराभव’ या एका कथेत येतात. ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहातील ‘सोडवण’ या पुढच्या कथेत जुनेऱ्याची घडी करून त्यावर स्वच्छ धुतलेले तांदळाचे दाणे रांगेने मांडावेत तसे टाके घालणारी डॉ. फाटकांची आई आहे, एखाद्या फळावर अळी बसावी तसे उभट, ठिपक्यांसारखे डोळे घेऊन बसलेले डॉक्टर दाते आहेत, चेहऱ्याच्या कडा मोडून बाहेर पडणार असे वाटण्यासारखा टवटवीतपणा असलेली वृंदा आहे, डॉक्टर पाठकांवर दुपारी येऊन आदळणारा काळ्या, जळजळीत लाटेसारखा त्यांचा भूतकाळ आहे, जमिनीवर फोड उठावेत तशी त्यांच्या आसपास विखुरलेली सिगारेटीची थोटके आहेत, स्वतःच्या लालसर, गुळगुळीत चेहऱ्याच्या जागी आपल्या आयुष्याचा तसलाच कंद बाळगणारा दिवगी आहे, अंगात मॅग्नेशियमची तार जळाल्याप्रमाणे भाजत उजळून डॉक्टरांची ‘सोडवण’ करणारा मृत्यू आहे…

जी.एं. च्या कथांमधील उपरोध हा कमालीचा टोकदार आणि उकळत्या तेलासारखा तप्त आहे. ‘जन्म’ या कथेत भाबड्या आदर्शवादाची टिंगल करताना ते लिहितात की ‘ व्यंक्याच्या खाटेतील ढेकणांप्रमाणे भारतात सुपुत्रांचा नुसता बुजबुजाट झाला आहे…’ पोलिसाच्या अंगावरील न शोभणाऱ्या खाकी कपड्यांचे वर्णन ते ‘अंगावर पातळ शाडू ओतल्याप्रमाणे दिसणारे खाकी कपडे’ असे करतात. ‘राधी’ त्यांच्या या कथेतला गणेशवाडीभट हा तर सगळ्या भटाब्राह्मणांना पोचवून आलेला खराखुरा विद्रोही भट. दत्तजयंतीला गावातली मंडळी पूजेसाठी वाट बघत बसलेली असताना शेजारच्या गावी कुस्तीच्या फडात कुस्ती खेळून त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ताटकळवणारा. त्यावर भुकेने कळवळून ‘भटजी, दत्तजन्म करण्याची ही वेळ आहे, की काय आहे?’ या परशाच्या प्रश्नावर गणेशवाडी भटाने दिलेले उत्तर मुळातून वाचण्यासारखे आहे. तो खवळून म्हणतो,
“अरे जा रे जा फुसकीच्या! मला आलाय विचारायला! दत्तारामाचा जन्म अमुक वेळी झाला अशी त्याच्या आयांनी काय येऊन तुमच्या कानात कुजबुज केली होती काय रे भडव्यांनो? दत्त जन्मतही नाही, संपतही नाही. संपतो तो दिवस. तुम्हाला लेको खादीला उशीर झाला, म्हणून तुमची ही ओरड! जा आता घरी आणि पिंडाएवढे गोळे गिळून पडा मढ्यासारखे! म्हणे ही वेळ की काय!” हाच गणेशवाडी भट पुढे कथानायकाला डॉक्टरनी खायला सांगितलेली पण त्याच्या घरी निषिद्ध असलेली अंडी आणून देतो. तीपण कशी? तर पूजेहून येताना एका ताम्हनात फोडलेला नारळ, दोनचार फुले, पळी पंचपात्र याच्या जोडीला तीन शुभ्र अंडी! त्यावर आबांनी कुरकुर करताच तो पुन्हा गरजतो,
“आब्या, याद राख हं! मला अक्कल शिकवशील तर हाडं सैल करून देईन बघ एक दिवस! हाडं आहेत की नाहीत कुणास ठाऊक म्हणा! पण असा यमासारखा एक दणका देईन की कापडानं जमिनीवरचा तुझा डाग तेवढा पुसावा लागेल बघ! लोकांची भीती तुला! परसात तांब्या घेऊन जाताना चोरी करायला निघाल्यासारखा लपूनछपून जातोस तू बेट्या! आणि मला शिकवायला आलाय! फुलं, नारळ देवानं उत्पन्न केली आणि अंडी मात्र कुणी उपटसुंभानं तयार केली होय?”
हाच गणेशवाडी भट कथानायकाने ‘एकसमयावच्छेदेकरून’ या शब्दाचा चुकीचा उच्चार केला म्हणून दम भरतो ” ही मराठी भाषा, या तुझ्या आबानं चहा पिता पिता कणीक मळून ठेवावी तशी खाजगी मळून ठेवली होय रे तुझासाठी?….”
राधीच्या काळ्या कुत्र्याला फिरायला कशाला घेऊन जाता असे नाकखुपशा गणू शिंप्याने विचारताच हा गणेशवाडीभट त्याच्या रानवट भाषेत उत्तरतो,
“तू चिंधीचोर तेवढा उपटसुंभासारखा मला शिकवायचा बाकी राहिला होतास बघ! अरे, त्या कुत्र्याला काही खायला दिलं तर ते जाणेल तरी. मी मरायला लागलो तर एकदा येऊन जाईल, घसा ताणून ओरडेल तरी. पण तुमच्यासारख्यांची ढुंगणं धूत जन्म काढला तर करंगळीवर तुम्ही मुतायला तयार होणार नाही, डुक्करचंदानो! अरे लडदू, चार कुत्री भोवती ठेऊन फोटो काढून घ्यायला दत्ताला लाज वाटत नाही. एक कुत्रं बरोबर घेऊन हिंडायला मला सोट्या रे कसली लाज?”
या गणेशवाडीभटाचा नाऱ्या म्हणजे गावावरून ओवाळून टाकलेले, आडदांड, होळीत अर्धवट जळालेल्या ओंडक्यासारखे पोर असते. गंगव्वाच्या फुलाच्या पुड्यात दोन मोठ्या बेडक्या घालून तो पुडा तिच्या खिडकीतून आत फेकणारा, भास्कराचार्य ज्योतिष्याच्या घरावरील ‘येथे रमल सांगितले जाईल’ ही पाठी काढून तेथे ‘सदरे-चोळ्या शिवणार’ ही पाटी लावणारा. त्याचे वर्णन करतानाही जी.एं. ची लेखणी अशीच फुलून आली आहे. वास्तविक ‘राधी’ ही अत्यंत करूण आणि काळजाला हात घालणारी कथा, पण तीवर जी.एं. नी विनोदाची आणि उपरोधाची अशी काही लाजवाब पखरण केली आहे की ज्याचे नाव ते!
जी.एं या च्या चार कथांमधील भाषासौंदर्य असे भूल पाडणारे आहे.

वर्तुळ

September 13, 2006

हातातला डबा मी हळुवारपणे पाण्यात सोडला. कृष्णेच्या पाण्यात राख आणि अस्थींचा एक लहानसा पांढरा ठिपका उमटला. निश्चल नजरेनं मी समोर पहात राहिलो. बघता बघता समोरच्या देखाव्याचा तुकड्यातुकड्यांचा कॅलिडोस्कोप झाला. काळेपांढरे, रंगीबेरंगी तुकडे एकमेकात मिसळून थरथरत, तरंगत राहिले‍. जराशानं त्याचा एकच धूसर, हलता पडदा झाला ड़ोळे मिटले तसं डोळ्यातलं पाणी ओघळून गालावर आलं.

आक्का गेली. तशी ती एकदोन वर्षं कधीही जाईल अशीच होती.महिन्यातून एखाद्या वेळी तिची भेट होई, तेंव्हा काळाच्या वरवंट्याखाली भरडला जाणारा तिचा जीव पाहून काळजाला हिसका बसे.दम्यासारख्या निर्दयी विकाराबरोबर तिच्या दुबळ्या फुफ्फुसांनी चालवलेली झुंज पाहून वाटे, यातून ही सुटली तर बरं होईल.तिच्या डोळ्यांना तर केंव्हाच दिसेनासं झालं होतं. गेल्या काही वर्षांत तर तिचे पायही गेले होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिला उचलून न्यावं लागे. तिचा एके काळचा सुखवस्तू देह वाळून-कोळून बाहुलीइतका राहिला होता.म्हाताऱ्या, निस्तेज आंधळ्या डोळ्यांनी तू क्षितिजापलिकडल्या दूतांची वाट बघत बसलेली असे. नात्यातलं, परिचयाचं कुणी वृद्धापकाळानं गेल्याचं कळालं की ‘सुटला बिचारा, बरं झालं’ असं ती म्हणत असे. रात्री खोकल्याची ढास अनावर झाली की तिचा थकलेला जीव घाबराघुबरा होई.त्या अंधाऱ्या माजघरातली रात्ररात्र चाललेली ‘आई अंबाबाई, आई अंबाबाई…’ अशी क्षीण विनवणी ऐकताना काळजाचा ठाव सुटत असे.

आक्काविषयी लिहिताना असं वाटतं की एवढं आवर्जून जिच्याविषयी लिहावं अशी ती कोण होती? एका साध्या घरात जन्मून साधेपणानं संपून गेलेली सामान्य स्त्री. आपला प्रपंच, मुलबाळं, नातेवाईक याच्यातच आयुष्यभर गुंतून राहिलेली. मुक्ती, स्वातंत्र्य, सुधारणा, क्रांती यांचा दूरान्वयानंही संबंध नसलेली. व्यासंग वगैरे तर सोडाच, पण संसाराच्या धबडग्यात अक्षरओळखही हरवून बसलेली. इतर लेखांच्या नायिकांप्रमाणं तिला कधी समाजाशी संघर्ष करावा लागला नाही, की कधी चार घरची धुणी-भांडी करून मुलाबाळांना वाढवावं लागलं नाही. उलट आयुष्यभर आपला संसार, कुळाचार, लग्नंकार्यं, श्राद्ध-पक्ष, चटण्या-कोशिंबिरी, पापड-लोणची यातच ती बुडून गेली. पाठीला पाठ लावून आलेल्या मुलांसाठी, मग नातवंडांसाठी, मग परतवंडांसाठी खस्ता खात आली.त्यातूनच देवधर्म, पैपाहुणे, शेतावरचे वाटेकरी आणि आपल्या प्रज्ञावंत पण कलंदर नवऱ्याचा संसार सांभाळत राहिली. खेड्यातला जन्म, लहानपणी झालेलं लग्न, त्या काळातल्या गैरसोयी, मुलांचे आजार, कडक सोवळं-ओवळं या सगळया सांसारिक अडचणींच्या फत्तरांतून आक्काची मधाळ माया पाझरत राहिली.म्हणून वाटतं की आक्काबद्दल लिहावं. व्यवहार आणि हिशेबांवर नातेसंबंध उभे करण्याच्या जमान्यात निखळ प्रेमाचा हा शेवटचा दुवा ‘नाही चिरा नाही पणती’ असा विसरला जाऊ नये.

  आक्का ही माझ्या आईची आई. माझ्या आठवणींच्या आजोळच्या वाटेवर आजही आजी आजोबांच्या प्रेमाची सावली आहे. माझ्या लहानपणी आमच्या गावात प्राथमिक औषधोपचारांचीही सोय नव्हती. आम्हा मुलांच्या आजारपणात आमच्या तोंडात औषधाचा पहिला डोस पडायचा तो आक्काच्या मांडीवरच. तेंव्हापासून अगदी अलीकडेपर्यंत आक्काच्या मांडीवरच्या नातवंडांचे फक्त चेहरे बदलत राहिले. आक्काचा हात सुगरणीचा होता. चिंचगूळ घाळून केलेली तिची साधी तुरीच्या डाळीची आमटी कुठल्याही मसालेदार रश्श्याच्या तोंडात मारेल अशी असे. तिच्या चपातीचे तर पदरन पदर मोजून घ्यावेत.माझे आजोबा खाण्यापिण्याचे रसिक होते. विद्वान वकील म्हणून त्यांचे तालुकाभर नाव होते. पण त्यांचा संसार बाकी तुकारामाचा. आक्काच्या जबाबदाऱ्या कधी संपल्याच नाहीत. लहानलहान मुलं, आजोबांचे पक्षकार, त्यांचे मित्र, घरी रहायला आलेले कुणी आश्रीत, वेळी-अवेळी जेवायला येणारी शेतावरची कुळं, घरातली मांजरं, आजोबांनी पाळलेला कुत्रा… हा सगळा आक्काचा संसारच होता. या सगळयाची उस्तवारी करताकरता आक्का पिचून जायची. जोडीला अनुवंशिकतेनं आलेला दमा होता. प्रत्येकाच्या आयुष्यात येतात तसे सुखदुःखाचे, बरेवाईट प्रसंग आक्काच्या आयुष्यातही आले. पण यातून कडवट होण्याऐवजी आक्का मात्र पिकणाऱ्या फळासारखी अधिकाधिक गोड होत गेली.

आक्का गेल्याचं खरं दुःख हे आहे. हा शोक एका व्यक्तीसाठी नाही, एका वृत्तीसाठी आहे. आक्कासारखं सुपाएवढं काळीज घडवायचं म्हणून घडवता येत नाही. शिक्षण, संस्कार, अनुभव… कशाकशानं ते मिळत नाही. येतानाच कुणी ते घेऊन येतो, आणि जाताना घेऊन जातो.

आक्का गेली आणि आणि माझं आजोळ संपल्याची जाणीव झाली. आजोळच्या घासावर नातवंडांचा हक्क असतो असं म्हणतात. आजी- आजोबांनंतरही नाती रहातात, नाही असं नाही, पण सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा निसटलासं वाटतं. पाची बोटांना जोडणारा पंजा निखळला असं वाटतं.

माणसामाणसांमधील नाती सुध्दा, काही लाभतात, काही नाही लाभत. जिथं ओलावा मिळेल, तिथली मुळं आपोआप घट्ट होतात. तिथल्या पायांना आपोआप नमस्कार घडतो. आणि एक दिवस अचानक जाणवतं- आज पाठीवर आशीर्वादाचा कापरा हातच नाही. धागे तुटत चालल्याची जाणीव काळीज भेदून जाते.

अलीकडं आक्का फारच थकली होती. आपलं परावलंबित्व तिला नकोसं वाटे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तिला सावकाश उचलून ठेवलं की ‘माझा पांग फिटला की रे पोरा…’ असं ती म्हणे. ‘असंच मला नंतरही उचल बरं का…’ ती गंमतीने म्हणायची. ‘काही काळजी करू नकोस आक्का.. अगदी सावकाश उचलीन.. तुला कळणारही नाही…’ मीही तिची चेष्टा करायचो. आज या आठवणीने घशात हुंदका अडकतो!

मी तिला भेटायला गेलो, तेंव्हा ती अर्धवट ग्लानीत होती. वैद्यकीय उपचार थकले होते. तिचा मऊ, सुरकुतलेला हात मी हातात घेतला. ‘आक्का, मी आलोय. मला ओळखलंस का? डोळे उघड बघू…’ मी म्हणालो. आक्कानं कष्टानं डोळे उघडले.  ’पोरं बरी आहेत..?’ तिनं खोल गेलेल्या आवाजात विचारलं. तिचा नेहमीचा प्रश्न! जीवनमृत्यूच्या सीमेवरही तिला माझ्या मुलांची खुशाली विचारायचं भान होतं. दिवसभर तिनं तिच्या मोठ्या बहिणीची, काशीताईची आठवण काढली होती. ‘काशीताई, मला खेळायला ने गं…’ आक्का अर्धवट बेशुद्धीत म्हणत होती. पण काशीताई चारपाच दिवसांपूर्वीच पैलतीरावर पोचली होती. आक्काचा आठवणीच्या खोल कप्प्यातली चारपाच वर्षाची छोटी मुलगी तिच्या ताईला म्हणत असावी ‘ ताई, मला खेळायला ने गं…’

अवघ्या काही तासांतच काशीताईपर्यंत आपल्या धाकट्या बहिणीची हाक पोचली!

दूर कुठेतरी, तर्कांच्या पलीकडे, अज्ञाताच्या बागेत बहिणीबहिणींची भातुकली रंगली असेल का? ‘चिंगुताई, तू भाकरी कर, मी पोरांना वाढते’ म्हणून काशीताईनी लुटुपुटुची पंगत घेतली असेल का? आक्काच्या त्या खोट्याखोट्या चुलीवरची भाकरी तशीच टम्म फुगली असेल का?

‘तुझा थोरला भाऊ अगदी देखणा दिसायचा लहानपणी…’ आक्का सांगत असे.’गोरापान, राजबिंडा.. मग सगळे घ्यायचे त्याला उचलून. तू असा किरकिऱ्या. सदानकदा आजारी. मग कुठं जायचं झालं की तुला माझ्याजवळच ठेवून जायची तुझी आई. लहान होतास, पण  रहायचास तू चांगला माझ्याजवळ. माझ्या मांडीवरच झोपायचास. तुला मांडीवर थोपटून थोपटून हाडं झिजली बघ माझी…’

वाळलेल्या, झिजल्यासारख्या दिसणाऱ्या अस्थी प्रवाहाला लागल्या होत्या. मी हात जोडले. कृष्णेकाठी फुललेलं एक आयुष्य कृष्णेत विसर्जित झालं.कालचक्राचं एक वर्तुळ पूर्ण झालं.