Archive for February 7th, 2007

अपरिचित तलत

February 7, 2007

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात पुरुष पार्श्वगायकांमध्ये महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश हे नेहमीच सम्राटपदी राहिले. त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार, मन्नाडे, तलत महमूद, महेंद्र कपूर यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा अर्थ त्यांची प्रतिभा कमी होती असा नाही. पण यश हे नेहमी फक्त प्रतिभा आणि गुणवत्ता यावरच अवलंबून असत नाही. चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवशाच्या व्यवसायात तर नाहीच नाही. हेमंतदांचा धीरगंभीर ‘बेस’ हीच त्यांची मर्यादा ठरली. चॉकलेटी चेहऱ्याच्या देव आनंदसाठी आपण हेमंतदांचा खर्ज चालवून घेतला खरा, पण तो केवळ त्या दोघांवरच्या आणि एकंदरीतच संगीतावरच्या आपल्या प्रेमाखातर. मन्नाडे तर फारच कमनशिबी. शास्त्रीय संगीताचा जबरा अभ्यास, सुस्पष्ट, दाणेदार आवाज, रागदारीची उत्तम जाण.. यशस्वी गायक होण्यासाठी लागणारे सगळे गुण असूनही या गायकाला शेवटी मेहमूदसारख्या विनोदी नटासाठी आवाज द्यावा लागला. तलत महमूदसारख्या लखनवी अदबीत वाढलेल्या शापित गंधर्वाच्या पदरी तर दुसरे काही पडणे शक्यच नव्हते. एकतर यश ओरबाडून घेण्यासाठी जो कावेबाजपणा लागतो, प्रसंगी दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढण्याचा जो संधीसाधूपणा लागतो, तो या मवाळ आणि मृदू स्वभावाच्या गायकाच्या वृत्तीतच नव्हता. कुठल्या कंपूत सामिल होणं त्याला कधी जमलं नाही, लोकांनी पसरवलेल्या अफवांवर, टीकेवर त्वेषानं वार करणं त्याला कधी योग्य वाटलं नाही. त्याला स्वतःला बंगाली पार्श्वभूमी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बंगाली गटानंही त्याच्या प्रतिभेला कधी झुकतं माप दिलं नाही. अगदीच रहावलं नाही तेंव्हा तो त्याच्या नेहमीच्या मृदू स्वरात म्हणाला – सलीलदांना ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ च्या वेळी माझी आठवण कशी झाली नाही, कुणास ठाऊक! बस्स, एवढंच! तलतचा आवाज निर्दोष नव्हता. त्याच्या आवाजालाही असंख्य मर्यादा होत्या. पण या सर्वांसकट तलतचा आवाज खानदानी होता. त्याच्या आवाजात एक सुसंस्कृतपणा होता.आवाजातला दैवदत्त गोडवा, शास्त्रीय संगीताचे त्यावर झालेले संस्कार आणि संगीताचे इमान पाळण्याचा त्याचा (हळूहळू कालबाह्य होत गेलेला) विश्वास यामुळं तलतचा रसिकांनी त्याच्या सर्व दोषांसकट स्वीकार केला. रफी, मुकेश, किशोरच्या तुलनेत तलतची फिल्मी गाणी फारच कमी आहेत – जेमेतेम चारएकशे. पण एकोणीसशे सत्तरच्या आसपास पार्श्वगायन सोडून दिल्यानंतरही आजही तलतचे जगभर चहाते आहेत. त्याच्या ध्वनीमुद्रिकांचा खप अजूनही कमी झालेला नाही. मला वाटते, तलतच्या गायकीचे सर्वात मोठे यश हेच आहे. लखनौमध्ये शास्त्रीय संगीताचे बाकायदा शिक्षण घेतलेल्या तलतने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती कलकत्त्यात. १९४९ साली तो मुंबईला आला. अनिल विश्वास यांनी त्याला ‘ आरजू’ मधील ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल..’ या गाण्यासाठी पहिली संधी दिली. तलत आयुष्यभर अनिलदांचे हे ऋण मानत राहिला. ( त्याच्याच शब्दात सांगायचं तर ‘ मेरी तो सारी दुनिया घूम फिर कर अनिलदां के पास आती है’ अनिल विश्वास हाही तितकाच विनयशील माणूस – बाबूजींच्या संगीतरचनांना ‘ मच ऑफ व्हॉट ही कंपोजेस इज प्युअर गोल्ड’ म्हणणारा – तलतच्या या कृतज्ञतेवर अनिलदा म्हणतात ‘ यह तो तलतका बडप्पन है – मैं तो एक बहाना हूं जिसके जरीये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं!) त्यानंतर तलत हिंदीत बऱ्याच संगीतकारांकडं गायला. इतरही भाषात गायला. पण बाबूजींच्या गाण्यासारखंच – मच ऑफ व्हॉट ही सँग इज प्युअर गोल्ड. तलतच्या गाण्याबाबतीतली एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट अशी की तलतची वाईट गाणी फारच कमी आहेत. मला स्वतःला तर तलतची ‘मैं पीके नही आया( कवी )’ आणि ‘सुनो भाई हमने ( रूप की रानी, चोरों का राजा)’ एवढी दोनच गाणी वाईट म्हणावी इतकी टाकाऊ वाटतात. तलतच्या फिल्मी आणि गैरफिल्मी गाण्यांची संख्या लक्षात घेता अगदीच नगण्य. बाकी तलतची गाणी कमालीची सुमधूर आणि त्यामुळंच लोकप्रियही. पण या लेखात मी चर्चा करणार आहे ती तलतच्या फारशा लोकप्रिय नसलेल्या पण तरीही अत्यंत श्रवणीय अशा काही गाण्यांची. प्रथम तलतची काही द्वंद्वगीतं. तलत – लता जोडीचं ‘ सीनेमें सुलगते हैं अरमाँ…’ ( तराना- अनिल विश्वास )हे बहुदा या जोडीचं सर्वात लोकप्रिय गीत असेल. पण याच सिनेमात याच जोडीचं ’ ‘नैन मिले नैन हुए बावरे…’ हेही गाणं अतिशय गोड आहे. तलत -लता जोडीचं ‘ये नयी नयी प्रीत है…’ ( पाकिटमार – मदनमोहन ) हे उडत्या लयीचं असंच एक श्रवणीय आणि मुद्दाम ऐकण्यासारखं गाणं . संगीतकार नौशाद यांनी तलतला फार कमी वेळा संधी दिली. त्यामागे त्यांचे अत्याधिक रफीप्रेम असेल किंवा ‘बाबुल’ च्या ध्वनीमुद्रणाच्यावेळी तलतला सिगरेट ओढताना पाहून त्यांच्या मनात बसलेली अढी असेल. पण त्यांनी ‘बाबुल’ साठीच स्वररचना केलेले तलत-शमशाद बेगमचे ‘मिलते ही आँखे…’ कोण विसरेल? एका बाजूला तलतचा मुलायम आवाज तर दुसरीकडे शमशादचा खडा पहाडी स्वर.. पण यातून जन्मली ती एक अजरामर स्वररचना. तलत – सुरैयाची ‘ मन धीरे धीरे गाये रे…’ (मालिक – गुलाम महंमद ) आणि ‘दिल-ए-नादाँ तुझे हुवा क्या है…’ ( मिर्जा गालिब – गुलाम महंमद)  हीपण नितांतश्रवणीय गाणी. तलतची एकट्यानं गायलेली, फारशी प्रसिद्ध नसलेली पण जीव वेडावून टाकणारी बरीच गाणी आहेत. ‘सुनांऊ किसको अफसाना.’ ( शिरी-फरहाद – एस. मोहिंदर ), ‘जीवन है मधुबन..’ ( जासूस – अनिल विश्वास ), ‘बेरहम आसमाँ ..’ ( बहाना – मदनमोहन – उत्तम काव्यरचना – काही ओळी पहा – ” अब कोई भी तमन्ना नही, अब यहाँ हमको जीना नहीं, जिंदगी तेरे जाम से,  एक कतरा भी पीना नहीं ), ‘सपनों की सुहानी दुनिया को ( शिकस्त – शंकर जयकिशन ), ‘उन्हे तू भूल जा ऐ दिल..’ ( नया घर -  शंकर जयकिशन  ), ‘भरम तेरी वफाओं का’ (अरमान – एस. डी. बर्मन – साहिरची उत्तम कव्यरचना उदाः ‘तेरी उम्मीद पर जीने से हासिल कुछ नही लेकिन, अगर यूं भी न दिल को आसरा देते तो क्या होता’) ,’गर तेरी नवाजिश हो जाये’ ( गुलबहार – धनीराम व खैयाम), ‘तेरे दर पे आय हूं फरियाद लेकर’ ( चोर बाजार – सरदार मलिक - त्याच त्या उचल्या अनु मलिकचे वडील), कोणत्याही तालवाद्याची साथ न घेता एस. डी. बर्मनने रचलेले ‘देवदास’ मधील कमालीचे आर्त ‘मितवा..’, साहिरच्या अप्रतिम ओळी असणारे’ मुहब्बत तर्क की मैंने, गरेबा सी लिया मैंने, जमाने अब तो खुश हो, जहर ये भी पी लिया मैंने’ ( दो राहा – अनिल विश्वास) …. अशी ही न संपणारी यादी! संध्याकाळ असावी. दिवसाभराच्या कामानं थकून घरी यावं. सुस्नात होऊन शांत बैठक घालावी. तलतच्या निळसर सुगंधी स्वरांचं धुकं आसपास दरवळू लागावं, सोबतीला ( आपल्या व तलतच्या मध्ये न येणारा / री ) ‘तो’ किंवा ‘ती’ असावी, जमल्यास समोर एखादा फेसाळता सोनेरी चषक असावा. दिवसाभरातल्या चिंता, कटकटी तलतच्या गोडगहिऱ्या आवाजात वितळून जाव्यात!

मिलिंद बोकील -आश्वासक लेखन

February 7, 2007

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कारणाने मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. दूरदर्शनवरचे रटाळ कार्यक्रम आणि आपण सातत्याने हरणारे क्रिकेटचे सामने बघून मी बऱ्यापैकी कंटाळलो होतो. त्याच त्याच लेखकांच्या पुस्तकांच्या वाचनातही मन लागत नव्हते. अशातच मिलिंद बोकील या नव्या लेखकाचे ‘उदकाचिया आर्ती’ या नावाचे पुस्तक हाती लागले. पुस्तकाच्या नावाने कुतुहल चाळवले गेले. सहज म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि पहातापहाता त्यात गुंतत गेलो. दोनएकशे पानांचा कथासंग्रह मी एकटाकी वाचून काढला आणि भारावून गेलो. हे काहीतरी वेगळेच रसायन होते. थोडीशी नेमाडेंची वैचारिक स्पष्टता, थोडीशी अनिल अवचटांची तळमळ आणि तरीही एक संपूर्ण स्वतःची वेगळी अशी शैली. त्या कथांमधले अचूक वैज्ञानिक संदर्भ, कथांचे विषय, त्यातली व्यक्तीचित्रे.. सगळेच अगदी नैसर्गिक आणि आपल्या आसपासचे आणि तरीही काहीसे वेगळेच.  चळवळीच्या धुंदीत घरदार विसरून कलंदर,वैराण  झालेल्या पण आपल्या मुलाच्या जन्माने आयुष्याला जणू एक हिरवागार कोंभ फुटावा तसे ओलावलेल्या शशिकांतची ‘भावी इतिहास’ ही कथा, जबरदस्तीने हा देश सोडाव्या लागणाऱ्या धर्मोपदेशक फादरची ‘भूमी’ ही कथा,  अमेरिकन संस्कृतीचा बळी पडून शेवटी नाइलाजाने घटस्फोट घ्यावा लागणारे ‘विदेश’ या कथेतले सीमा आणि चंद्रशेखर, मेधा पाटकरांवर लिहिलेली ’उदकाचिया आर्ती.. या सगळ्याच कथा मला अतिशय आवडल्या. हा कोण नवीन लेखक हे जाणून घ्यावेसे वाटले. पुढे बोकिलांचा ‘झेन गार्डन’ हा कथासंग्रह वाचून तर ‘उदकाचिया आर्ती’ चे अस्सलपण हा ‘फ्लूक’ नव्हता याची खात्री पटली. हाही कथासंग्रह तेव्हढाच आवडला.
मिलिंद बोकील हे पिंडाने खरे तर कथाकार नव्हेत. विविध सामाजिक प्रश्नांशी संबंधीत ते सखोल अभ्यासकर्ते आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत. पण बहुतेक वेळा अशा कामांतून मिळणारे अनुभव खऱ्या प्रतिभावंताच्या सुप्त प्रतिभेला लिहायला उद्युक्त करतातच. बरोबरीने जर भाषाप्रभुत्व आणि कल्पनाशक्तीची देणगी असेल तर कसदार लेखन सहजी लिहिले जाते. बोकिलांच्या बाबतीत हेच झाले आहे.
त्यानंतर आलेल्या बोकिलांच्या ‘शाळा’ या कदंबरीने खरे तर थोडी निराशाच केली. प्र. नां संतांच्या धर्तीवर लिहिलेली ही कादंबरी वाईट नाही. पण बोकिलांच्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मला ती फिकी वाटली. दरम्यान बोकिलांनी इतरत्र, विशेषतः दिवाळी अंकांमधून जोरकसपणे लिखाण केले आहेच. आणि ताज्या ‘साप्ताहिक सकाळ’ (२४ जूनपर्यंचा आठवडा) मधील ज्या लेखामुळे मला हे लिहावेसे वाटले तो बोकिलांचा ‘जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण रोखायला आपापल्या भाषा सांभाळा‘ तो लेख तर आवर्जून वाचावा असा आहे.
एकतर जागतिकीकरणाला बोकिलांनी वापरलेला ‘सपाटीकरण’ हा शब्द मला फार आवडला.  जागतिकीकरणात प्रामुख्याने सगळे जग ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ असा विचार केला जातो. मग या बाजारपेठेत जर आपला माल विकायचा असेल तर तो शक्यतोवर एकसारखा, सपाट असावा. जगात लोकांच्या पोषाखापासून खाण्यापिण्याच्या पद्धतींपर्यंत सगळे कसे सारखे होत आहे याची बोकील काही मनोरंजक, पण विचार करायला लावणारी उदाहरणे देतात.  जगभर लोकांचे विचारही कसे एकसारखे होत आहेत यावरही ते प्रकाश टाकतात.

सपाटीकरणामध्ये विविधता हाच कसा मोठा अडथळा ठरतो आहे, याचे बोकिलांनी बरेच दाखले दिले आहेत. उदाहरणार्थ जागतिक बाजारपेठेत प्रामुख्याने गहू, मका, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो यांनाच मागणी आहे. त्यात कुळीथ, हुलगे, वरी, नाचणी, एवढेच नाही, तर ज्वारी-बाजरीलाही स्थान नाही‌. सपाटीकरणात सगळ्यांनी फक्त पॅन्ट, शर्ट, बूट घालावेत; धोतर, बंडी, लुंगी. फेटा यांना जागा नाही. सगळ्यांनी जल्लोष करायचा जगभर एकच दिवस – ३१ डिसेंबर. नागपंचमी, वसूबारस, बैलपोळा, ऋषीपंचमी, तुळशीचे लग्न हे सगळे सण बाद. ते मागासलेले, अंधश्रद्धाळू लोकांचे सण. आधुनिक जगात त्यांना स्थान नाही. भारत, ब्राझील अशा जैवसमृद्ध राष्ट्रांसाठी हा धोक्याचा इशारा मानला पाहिजे. पण सपाटीकरण हे अपरिहार्य असल्याने त्याला विरोध कण्यात उर्जा वाया न घालवता सपाटीकरणातही आपल्याला आपली स‌ंस्कृती शाबूत कशी ठेवता येईल यावर या लेखात विचार केला आहे. 
महत्वाचे म्हणजे सपाटीकरणाला विरोध म्हणून लोकांनी धोतर नेसणे सुरु करावे किंवा मुलांना सकाळसंध्याकाळ संध्या करायला लावावी यासारखे कोणतेही आततायी मार्ग बोकील सुचवत नाहीत. याउलट विविधतेने समृद्ध असलेल्या भारतासारख्या देशात, किंबहुना सगळ्या भारतियांनी – मग ते जगात कुठेही असोत – आपापल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करावे असा अतिशय सुजाण मार्ग त्यांनी सुचवला आहे.
‘मनोगत’ ची स्थापना आणि ‘मनोगत’ वर वेळोवेळी व्यक्त झालेले विचार यांच्या संदर्भात मला हा मर्ग फार महत्वाचा वाटतो. भाषचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी बोकिलांनी सुचवलेले उपाय काही फार नवीन नाहीत, पण या निमित्ताने ते अधोरेखित करावेसे वाटतात. सर्व ठिकाणी आपली भाषा हिरिरीने बोलणे, भाषेच्या सर्व बोली – मराठीचाच विचार केला तर वऱ्हाडी, अहिराणी दख्खनी, भिली, डांगी, मालवणी इ.- सांभाळणे, आपली भाषा नवनवीन बदलांना उघडी ठेवणे आणि आपल्या भाषेत दर्जेदार साहित्य निर्माण करणे असे हे काही उपाय आहेत. आपली भाषा जगली तर आपणही जगू, आपली संस्कृतीही जगेल हा विचार मला स्वप्नाळू नव्हे तर आशावादी वाटतो.
शेवटी बोकिलांच्या लेखातला मला आवडलेला एक उतारा. बोकिलांच्या या लेखाचे सारच या उताऱ्यात आले आहे असे म्हणता येईलः
‘आपण जे काही आहोत – राकट, कणखर, दगडांच्या देशांचे, ज्वारी बाजरीचे, बांगड्या सुरमईचे, ओव्या अभंगांचे, लावणी गौळणींचे, गाथा गीताईचे, श्यामच्या आईचे, मोटेवरच्या गाण्यांचे, शेतकऱ्याच्या आसूडाचे, बटाट्याच्या चाळीचे आणि बनगरवाडीचे – ते सगळे आपल्या भाषेमुळे आहोत’


ज्याच्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा ठेवता येतील असा हा लेखक आहे, असे मला वाटते.

शिर्डीचा समूहउन्माद

February 7, 2007

नगरहून कोपरगावला जाताना रहाता गाव ओलांडलं तशी शिर्डीची चाहूल लागू लागली.आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्मोठी हॉटेल्स , रिसॉर्टस, त्यातही त्यांची नावं अपेक्षेप्रमाणं साईलीला, साईरंग अशी. बाकीच्या देवस्थानांच्या मानानं ही भलतीच झकपक आणि पंचतारांकित.रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या परप्रांतातल्या नवीन गाड्या आणि त्यावरचे भलेमोठे फुलांचे हार.

शिर्डीचं बसस्थानक ओलांडून पुढं आले तसा शेजारी बसलेल्या राजेंनी हात जोडून , डोळे घट्ट मिटून नमस्कार केला. शिर्डी सोडून बरेच पुढे आलो तरी राजेंचे हात जोडलेले आणि डोळे मिटलेलेच होते.

संध्याकाळी परत येताना शिर्डीत थांबलो. सहा वाजताच्या आरतीचे व्हीआयपी पास मिळवण्याची राजेंनी व्यवस्था केली होती. असा पास (फुकट) मिळवण्यासाठी स्पेशल कॉन्टॅक्ट्स असावे लागतात असे राजे अभिमानानं म्हणाले. संस्थानाच्या काही लोकांनी असे पासेस बाहेर दोन्दोन हजार रुपयांना विकले आणि त्यांचं एक भलंमोठं रॅकेट पकडलं गेलं असे ते म्हणाले.

हॉटेलमधल्या बऱ्याचशा खोल्या आंध्र प्रदेशातून आलेल्या भक्तांनी भरलेल्या होत्या.त्यात दोन पाच वर्षांची काही लहान मुलंही होती. काही लहान मुलांच्या डोक्याचं पूर्ण मुंडन केलेलं होतं. डोक्याची आगाआग होत असल्यानं ती मुलं अखंड रडत होती. त्यांच्याबरोबरचे बाप्ये आणि बाया त्यांच्यावर हेंगाड्या भाषेत खेकसत होत्या. आंध्रातल्या लोकांनी हा काहीतरी नवीन चावटपणा सुरु केला आहे, असं राजे म्हणाले.

साडेपाच वाजता हॉटेलातून मंदिराकडे जायला निघालो. व्हीआयपी पासमुळं फक्त मंदिराच्या गाड्यांनाच प्रवेश असलेल्या राखीव प्रवेशद्वारातून आत गेलो. आतल्या बांधकामाच्या पाटीवर व्यवस्थापक मंडळीत अजित पवार असं एक नाव वाचून हे राजकारणी आता इथं पण का असं मी राजेंना विचारलं. तेंव्हा हे वेगळे आणि ते वेगळे असे राजे म्हणाले. या अजित पवारांनी देवस्थानाच्या विकासासाठी फार प्रयत्न केले, पण ते नंतर शिर्डीच्या राजकारणात पडले, आणि मग इथल्या लोकल मंडळींनी त्यांना सरळ केलं असंही त्यांनी सांगितलं. 

सहा वाजत आले तशी गर्दी वाढू लागली. ‘स्पेशल कॉन्टॅक्ट्स ‘ वापरून आलेल्या भक्तांचे कपडे आणि रुबाब बाकीच्यांपेक्षा वेगळाच दिसत होता. त्यातल्या मध्यमवयीन बायका टीव्ही सीरीयलसारखा संपूर्ण मेकअप करून आल्या होत्या. दोनतीन तरूण मुली तंग टी शर्टस आणि जीन्स घालून आल्या होत्या.रांगेतले लोक वळूनवळून त्यांचाकडं बघत होते. एका मुलीच्या टी शर्टवर ‘खरंतर तुम्हाला माझं तीव्र आकर्षण वाटत आहे, तर मग ते लपवता कशाला ‘ अशा आशयाचं इंग्रजीत लिहीलेलं होतं. पण तेही बाबांच्या संदर्भात असावं असं समजून मी गप्प राहिलो.तेवढ्यात राजे येऊन माझ्या कानात ‘लुक ऍट दोज बिचेस. दे हॅव कम फॉर द दर्शन ऑफ बाबा ऑर गिव्ह देअर दर्शन टू अदर बाबाज ‘ असं कुजबुजले.

मंदिराचं दार उघडलं तसे संगमरवरी पायरीवरून व्हीआयपी आत घुसले‌. स्टेनलेसस्टीलच्या जाड नळ्यांच्या रेलिंगचं छोटं गेट अजून बंदच होतं.तिथून पुढं संपूर्ण चांदीच्या पार्श्वभूमीवर बाबांची संगमरवरी मूर्ती दिसत होती. तेवढ्यात मागून जनता गेट उघडलं आणि प्रचंड पळापळ सुरु झाली. काही मिनिटातच पूर्ण मंडप भरून गेला.मंदिरातला धुपाचा वास, धूर, बाबांची चकचकीत मूर्ती, त्यांच्या डोक्यावरील सोन्याचा मुगुट, त्यावरचं सोन्याचं छत्र, क्लोज सर्किट टीव्हीमधून मागे दूरवर दिसणाऱ्या  बाबांच्या असंख्य प्रतिमा आणि प्लेअरवर वाजणारा एकसंध खर्जातला ओम साईनाथाय नमः असा जप यानं वातावरण एकदम संमोहित झाल्यासारखं झालं. तेवढ्यात भालदार चोपदारांसारखा गणवेश घातलेले आणि हातात चांदीचा मानदंड घेतलेले दोन पगडबंद बाबांच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिले. पेटी-तबला असा सरंजाम होताच. माइकसमोर येऊन एका तरतरीत चष्मावल्या पुजाऱ्यांनी सराईतपणे आता आरती सुरु होत आहे, सर्वांनी एकसाथ आरती म्हणावी, आरती चालू असताना फोटो काढू नयेत असं आळीपाळीनं मराठी व हिंदीतून सांगितलं. तेवढ्यात आमच्याही पुढं असलेलं एक अतिअतिविशिष्ट लोकांसाठीचं दार उघडलं आणि त्यातून चारपाच लोक आत घुसले. त्यात एक सिनेमानटासारखा दिसणारा लाल रंगाची जर्सी घातलेला तरुण होता. आपल्याला आरतीला उशीर झाला की काय या कल्पनेने तो घाबराघुबरा झाल्यासारखा वाटत होता.

तेवढ्यात आरती सुरु झालीच. माझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या झांजवाल्यानं इतक्या जोरात झांज वाजवायला सुरुवात केली की मी दचकलोच.बऱ्याच लोकांकडे आरतीचं छोटं पुस्तक होतं. पण लोकांना चालीचा अंदाज नसल्यानं ते थोडेथोडे चुकत होते. माझ्या समोरच्या लाल जर्सीवाल्यानं सिनेमातले भक्त देवापुढं गाणं म्हणताना जसे हात फैलावून धरतात तसे धरले होते. मधूनच तो कॅच पकडल्यासारखंही करत होता. माझ्या शेजारचा तुळतुळीत डोक्याचा तरुण आपल्या गालावर तौबा तौबा करताना मारून घेतात तसं सरळ आणि उलटं मारत होता.आरती संपून अचानकच ‘घालीन लोटांगण..’ सुरु झालं आणि लोक स्वतःभोवती फिरायला लागले. हात व डोळे जोडलेली असंख्य मानवी सिलींडर्स एखाद्या राक्षसी यंत्राच्या सुट्या भागांसारखी दिसत होती. नेमक्या किती गिरक्या घ्यायच्या याचा अदमास नसल्यानं काही लोक मध्येच थांबले होते. त्यांना शेजारच्याचं डोकं, कोपर लागल्यावर ते वैतागत होते.

आरती संपली आणि दहा कडव्यांचं एक साईस्तोत्र सुरु झालं. प्रत्येक कडव्याची सुरुवात पुसो न आम्हा अमुकतमुक अलाणाफलाणा न पुसो तरीपण साईनाथ आमच्यावर न रुसो अशी होती. त्यातल्या पुसो आणि रुसो या शब्दांची गंमत वाटून ते स्तोत्र मी पूर्ण बघीतलं. पुढेपुढे पुसो मधल्या गोष्टी संपल्यानं डसो – नसो – ठसो अशी जुळवाजुळव केली होती.

आता बराच वेळ झाला होता. मागं एक्दोन मुलं रडण्याचा आवाज येत होता. पगडबंद परत एकदा ललकारी दिली आणि बाबांचा मुगुट आणि चांदीचे दंड बंदोबस्तात आत पाठवले.मुगुट काढल्यावर आतल्या केशरी वस्त्रात बाबा अगदी घरगुती दिसू लागले. आता दर्शनाची लैन सुरु झाली. हिरवं वस्त्र पांघरलेल्या समाधीवर दोन्ही बाजूला हात टेकवून लोक डोकं, गाल समाधीवर घासत होते. लाल जर्सीवाल्यानं समाधीच्या दोन्ही बाजूला हात रोवून धरले आणि उभ्याउभ्या तो सूर्यनमस्कार घातल्यासारखं करू लागला. राजे त्या समाधीला आलिंगन दिल्यासारखे जे आडवे झाले ते उठेतनाच. मागचे लोक कुरकुर करू लागले तसे राजे नाइलाज झाल्यासारखे उठले , एखादं पाऊल पुढं आले आणि परत झटका आल्यासारखे समाधीवर जाऊन आडवे झाले. पुजाऱ्यानं त्यांना डोक्याला धरून उठवलं तसे ते नाइलाज झाल्यासारखे उठले.

आम्ही मंदिराच्या बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसलो. राजेंच्या चेहऱ्यावरून समाधान निथळत होतं. काही जाणवलं की नाही तुला, का नुसताच पुतळ्यासारखा उभा होतास? त्यांनी मला जाब विचारल्यासारखं विचारलं. काही नाही बुवा, मी म्हणालो. राजे एकदम चिडल्यासारखे झाले. चूक केली तुला इथं आणून, ते म्हणाले. हे बघा, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आहे हं काहीतरी असं मी म्हणू शकलो असतो, मी म्हणालो. पण तुम्ही मानता त्या पवित्र ठिकाणी खरं बोलणं जास्त योग्य आहे. राजे जास्तच वैतागल्यासारखे झाले. थोड्या वेळाच्या शांततेनंतर म्हणाले, कसे रे अश्रद्ध तुम्ही, घरात संध्याकाळी दिवा तरी लावता का देवासमोर? माझ्या घरात देवघर नाही हो, मी अपराधीपणानं म्हणालो. कर, एक देवघर, किमान एक फोटो लाव महाराजांचा, आणि दिवा लावत जा रोज संध्याकाळी त्याच्यासमोर. मग बघ तुला कसं शांत आणि समाधानी वाटेल ते. ते म्हणाले.

अहो, पण असलं काही न करताच मला शांत आणि समाधानी वाटतंय, मी म्हणालो.

बघ, मी म्हणालो नव्हतो का की तुला कसला तरी दृष्टांत होईलच म्हणून, राजे विजयी हसले.

मी गाडी सुरु केली. झांजेच्या आवाजानं एक कान बधीर झाला होता. मनाशी म्हणालो, दोन्ही कान बधीर झाले तरी चालेल, कानांच्या मधला भाग बधीर न होता शाबूत राहो, की वाचलो!