Archive for February 23rd, 2007

पहिला दिवस -२

February 23, 2007

रीतू नाडगौडाच्या स्वर्गिय सौंदर्यानं पुरुषवर्गाची अशी पाडापाड चाललेली असताना सर्किट व टग्या अद्यापि गोळेकाकांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या भाषांतरातच अडकले होते.
“हे बघ,
डोळ्यातल्या डोळ्यात संकेत झाला गं
बसल्या बसल्या जगण्याचा आधार झाला गं…” सर्किट.

“हां, असं त्या केशवसुमाराच्या हातात कोलित दे ,म्हणजे तो आहेच लगोलग विडंबन पाडायला..

‘डोक्यातल्या डोक्यात उवा झाल्या गं
नाव सटवे तुझे ‘केशवा’ ला कळ्ळंय गं’..”
“वृत्तात बसत नाही हां”
“केशवाची विडंबनं तरी कुठं बसतात वृत्तात?”
“अरे, पण बाटली, लोळणे, माडी यातलं काही नाही? मग ते केशवाचं विडंबन कसलं म्हणायचं?”
“हां, ते बाकी खरंय म्हणा”

आता एक नवीनच चेहरा समोर आला होता. तरुण वयाचा पण अत्यंत गंभीर चेहऱ्याचा हा कोण असावा याचा श्रोत्यांना काही अंदाजच येईना.आपल्या चेहऱ्याइतक्याच गंभीर आवाजात त्या तरुणाने बोलायला सुरुवात केली
“एखाद्या जख्ख पुरातन काळसर्पाने आपली एखाद्या पाकळीइतकीइतकी पातळ कात टाकून द्यावी तसे माझे कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखे आयुष्य त्यागून मी इथे आलो आहे. गतायुष्याचे चिकट हिरवे विषारी गोळे मी एकेक करून कालपुरुषाच्या कराल जबड्यात फेकून दिले आहेत. एखाद्या लूतभरल्या उंटाने वाळूच्या वादळात आपल्या फुरफुरणाऱ्या नाकपुड्या बंद करून घ्याव्यात तसे भूतकाळाचे लसलशीत लाल झापड मी कायमचे ओढून घेतले आहे. पण हे करत असताना माझ्या मनात एक अस्वस्थ, सुगंधी, पोपटी उत्सुकता आहे. आता पुढे दिसते आहे ते चुळूकभर मृगजळ की आईच्या पदराएवढा महासागर, माझ्या हातात येणार ती नम्र, शांत पूजानिरांजने की आंधळ्या डोळ्यांनी सरपटणाऱ्या बिलबिलीत गोगलगायी, माझ्या पावलांवर पडेल ते स्निग्ध, सुगंधी चंदनशिंपण की लालभडक, जळजळीत तप्त तेलाची धार— कुणास ठाऊक…”
त्याच्या एकेक वाक्यासरशी सवत पोटुशी आहे हे कळाल्यावर एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर उमटावा तसा मत्सर प्रदीप. सन्जोप आणि कोलबेरच्या चेहऱ्यावर उमटत होता. आपल्या खास राखीव कुरणात शिरलेला हा अनाहूत खोंड कोण हेच त्यांना कळत नव्हते. आणि दुसरेकडे त्या गंभीर तरुणाचे भाष्य सुरुच होते.
” एखाद्या प्राण्याच्या सडत चाललेल्या शरीरावरचा मांसाचा शेवटचा तुकडा एखाद्या हावरट तरसाने हिसकावून घ्यावा तशी माझ्या आयुष्यावरची कृतज्ञता माझ्या भूतकाळाच्या करवती कवटीने गिळून टाकली आहे. पण मूळ त्वचेपेक्षा सांगाडाच अधिक तेजाने तळपावा तसे माझे विनापाश, वस्त्रहीन मन आता चिंचेने घासलेल्या तांब्याच्या तबकासारखे स्वच्छ. निर्मळ झाले आहे.एखाद्या एकाकी पडावावरील लुकलुकत्या दिव्यावर असंख्य कीटकांनी झेप घ्यावी तशी माझ्या मनाची पाकोळी आता सतत एकाच दिशेने अविचल उडू पहात आहे. या दिशेला  मराठी भाषेची कुसर केलेली अतितलम पण रेखीव पावले उमटली आहेत. सुतरफेणीच्या पदरासारखे हे मराठी भाषेचे झुळझुळीत वस्त्र या महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर पायघड्यांसारखे अंथरताना मी स्वतःच अगदी मऊ, बिनसुरकुतीचा झालो आहे. आता अपेक्षा इतकीच, या वस्त्रावर सरस्वतीच्या मोरपंखी सुरांनी कशिदा विणला जावा. रोख, व्यवहारी अभंड हुच्च पावलांनी हे वस्त्र अगदी मलिन होऊ नये…”
श्रोते अवाक होऊन ऐकत होते. तो गंभीर चेहऱ्याचा तरुण एक पायरी खाली उतरला आणि तेराव्याचे मंत्र म्हणणाऱ्या गुरुजींच्या गंभीरपणे म्हणाला, ” माझे अस्तित्व अति पिकलेल्या जर्दाळूसारखे नगण्य पण अस्सल आहे, माझ्या डोक्यावरचा सूर्य तीव्र दाहक पण स्वयंप्रकाशित आहे…” आणि एखादा खिळा ठेकून बसवावा तसे तो शेवटचे वाक्य म्हणाला, “आणि माझे नाव छू आहे!”
प्रत्येकजण शेजाऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजू लागला. पहिल्या रांगेत बसलेल्या कारकून आणि मीरा फाटक यांचे बोलणे बाकी ध्वनिवर्धकामुळे सगळ्यांच्या कानावर पडले.
” काय म्हणत होता गं हा?”
“काही नाहे गं, इथं मराठी शिकवणार आहे म्हणे हा!”

दरम्यान महाविद्यालयाचे प्रणेते कुठेतरी गायब झालेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. ‘मराठीतल्या कुठल्या शिव्या सभ्य आणि कुठल्या असभ्य ‘ याविषयीची अद्यावत माहिती मिळवण्यासाठी ते आणि रीतू कुठेतरी गेल्याची चर्चा सुरु होती. विशेषतः ‘माय…’ या अक्षरांपासून सुरु होणाऱ्या शिव्यांविषयी त्यांना विशेष प्रेम असल्याचे कुणीसे म्हणाले. ” बरोबरच आहे. ‘माय..’ विषयी त्यांना आता विशेष आपुलकी असणारच” सर्किट म्हणला. “माय म्हणजे माझे, माय म्हणजे आई…”
“आणि माय म्हणजे मायबोली! खि… खि…खि…” मारणाऱ्याचा हात धरता येतो हो पण…

“जे इतिहास विसरतात, त्यांना लवकरच भूगोल विसरावा लागतो” खणखणीत आवाजात सर्वसाक्षीने सुरुवात केली. चिनी भाषेत याला एक फार समर्पक म्हण आहे. ‘ जे हिंग टुंग, ते पिंग दोन टुंग…’
“गालिब म्हणतो, ‘वदाअते गुल्दुस अता खुल्दुस ता मुंगुस…’” दिगंभाच्या कानात चित्त 
“सह्याद्रीच्या दगडादगडावर इथल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडले आहे,इथल्या मातीच्या कणाकणावर इथल्या क्रांतिकारकांचा घाम सांडला आहे, इथल्या फत्तराफत्तरावर इथल्या शहिदांचे…” इथे काहीतरी सांडवून सर्वसाक्षीला तो तिय्या जमवायचा होता. पण ते न जमल्याने तो उगीचच खाकरला  “शहिदांचे अं…..नाव कोरलेले आहे. पण आज या शहिदांची याद कोणाला आहे?  जो तो आपल्या ह्याच्यात आहे. अरे, हे शहीद नसते तर आजवर गुलामगिरीत खितपत पडलो असतो आपण! आणि स्वराज्य म्हणे अहिंसेने मिळालं! स्वराज्य काय असं उपास करून मिळतं? अबे छोड!” इथे सर्वसाक्षीचे आवेशयुक्त हातवारे खेडुताच्या गालाला निसटता स्पर्श करून गेले. खेडुत “बायलीला..” का असं काहीसं पुटपुटला. सर्वसाक्षीच्या हाताला झिणझिण्या आल्या. ” आज या शहिदांच्या आठवणीने डोक्याला झिणझिण्या – आपलं- मुंग्या येतात. हीच राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात पेटली पाहिजे. या अपृष्ठवंशीय तरुणांच्या पाठीचे कणे ग्रॅनाईटचे झाले पाहिजेत. या राष्ट्राच्या अभिमानाचा – जाज्वल्य अभिमानाचा…”
“जाज्वल्य? ह्या म्हमईकराला ह्यो पुनेरी शबुद कसा गावला म्हनायचा? वातकुक्कुट ह्योच तर न्हवं?” खेडुताचा माधव कुळकर्णीला प्रश्न.

“ओ, मुद्द्याचं बोला…” 
“ओळख करून द्या आणि बसा हो खाली”
“तुमची राजकारणी मतं ऐकायला नाही आलो हो इथे…”
“वाटलं तर तुम्ही नका गांधिगिरी करु..”
“हो.. पोष्टाची तिकिटं उलटी लावा”
” नोटा वापरू नका”
“घेऊही नका… खि…खि…खि…”
“ड्राय डे पाळू नका…”
अशा गदारोळात इतिहासाचे प्राध्यापक सर्वसाक्षी खाली बसले.