Archive for March, 2007

गुलजार नावाचा कवी

March 25, 2007

फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी’एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा’ नावाचा एक कार्यक्रम लागत असे. ‘सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार’ हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, की त्यांची गाणी फार दुर्बोध, कळायला अवघड अशी असतात. उदाहरणार्थ ‘पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकोंके नशेमन तक इस मोड पे जाते है’ म्हणजे काय? गुलजार यांनी याचं काय स्पष्टीकरण दिलं हे लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितल्याचं आठवतं की माझ्या ओळींचे शब्दशः अर्थ घेऊ नका. ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे’ मधल्या ‘आवाज’ चा अर्थ स्वरयंत्रातून बाहेर पडणारा ध्वनी असा नाही. ‘हमारा देश हमें आवाज दे रहा है’ मधला ‘आवाज’चा अर्थ काय आहे पहा! ‘है नाम होटोंपे अब भी लेकिन, आवाज में पड गयी दरारें’ मधल्या ‘आवाज’ चा अर्थ पहा! ‘मोरा गोरा अंग लइ ले, मोहे शाम रंग दइ दे ‘ पासून गीतलेखनाला सुरुवात करणाऱ्या गुलजार यांची ओळख अशी सांकेतिक गाणी लिहिणारा गीतकार अशीच आहे. यातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं, पण तो झाला नसता तरी ती तितकीच आशयसंपन्न राहिली असती असं वाटतं. अर्थात या पहिल्या गाण्यावर असलेली शैलेंद्रच्या लोकगीतांची छाप लपून रहात नाही. (तोहे राहू लागे बैरी, मुसकाये जी जलायके) पण नंतर बाकी गुलजार यांची गीते अगदी स्वतंत्र अंगाने गेलेली दिसतात. खरंतर हा माणूस आधी कवी आणि मग गीतकार. म्हणून गुलजार यांच्या गाण्यांत काव्यगुण विपुलतेने आढळतो. गुलजार यांच्या रचना समजून घ्यायच्या तर त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता कळावी लागेल. ‘वो यार है जो खुशबू की तरहा, जिस की जुबाँ उर्दू की तरहा’ याचा अर्थ काय हे समजावून सांगणं कठीण आहे. ‘उर्दू की तरहा’ म्हणजे उर्दू की गैरउर्दू असा प्रश्न इथे गैरलागू आहे. ‘तावीज बनाके पहनूं उसे, आयत की तरह मिल जाये कहीं’ याचा आपल्याला कळालेला अर्थ आणि गुलजार यांना अभिप्रेत असलेला अर्थ एकच आहे का? मग अशा वेळी गालिबसारखे गुलजार यांचेही काव्य ‘या तो आप समझे या खुदा समझे’ म्हणून सोडून द्यायचे का? संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. ‘जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे, मुस्कराये तो मुस्करानेके कर्ज उतारने होंगे’ असं लिहून जाणारे गुलजार ‘वक्त के सितम कम हसीं नही,आज यहां है कल कहीं नही’ असंही लिहितात. ‘सुरमई अंखियोंमें नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे’ ही लोरी ‘सदमा’ ला काय करूण झालर देऊन जाते! ‘आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है’ हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि ‘सीधे सीधे रास्तोंको हल्का सा मोड दे दो, बेजोड रूहोंको थोडासा जोड दे दो’ हा अबोल प्रेमभाव! गुलजार यांच्या गीतांमध्ये रात्र, स्वप्न. चंद्र यांचे उल्लेख अनेकवेळा येतात.कुठे सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश ‘कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने’ म्हणतो तर कुठे किशोरकुमार कधी ‘चांद चुराके लाया हूं, चल बैठे चर्च के पीछे’ म्हणतो तर कधी ‘फिर वही रात है ख्वाबोंकी’! गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही ‘छुप जाउंगी रात ही में, मोहे पीहा संग दई दे’ आहे आणि ‘बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा’ हेही आहे!रस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. रस्ता वळाला की चाल वळणे हे तुमचेआमचे झाले. ‘मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी’ हा तो खास गुलजार टच! ‘इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते , कुछ तेज कदम राहे’ इथेही रस्ते आहेतच ,पण ‘इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’ यातला हळुवारपणा पहा! तीच गोष्ट ‘जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है’ या गाण्याची. ‘प्यार की तुम इंतेहा हो, प्यार का आगाज हम’ या ओळीतले सौंदर्य जसे मोहवणारे तसेच ‘जीने की तुमसे वजह मिल गयी है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी’ या ओळीतलेही. गालिबचा गुलजार यांच्या शायरीवरील प्रभाव हाही एक फार मनोरंजक विषय आहे. ‘दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन, बैठे रहे तसव्वरे जाना किये हुये’ या गालिबच्या मुखड्याचा वापर करून गुलजार यांनी एक स्वतंत्र गीत लिहिले आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. पण उपमा उत्प्रेक्षांचा चमत्कारिक वाटावा असा कल्पक वापर हेही दोघांचे समान वैशिष्ट्य आहे. गालिबप्रमाणेच गुलजार यांच्या प्रतिमा सांकेतिक असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, पण अगदी वेगळ्या असतात. प्रेयसीच्या आगमनाला आम शायरांनी थंड हवेच्या झुळुकीची उपमा सर्रास दिली आहे. गुलजार बाकी याला ‘तेरा आना भी गर्मियोंकी लू है’ म्हणतात! प्रेयसीच्या बोलण्यात इतरांना चंदनाचा, वाळ्याचा वगैरे सुगंध दिसतो, गुलजारना बाकी ‘तेरी बातों में किमाम की खुशबू है’ असे म्हणावेसे वाटते. या किमामच्या आणि जर्द्याच्या खुशबूमध्ये जे रंगीलेपण आहे ते इतर सुगंधांत नाही!याच गीतात दिल्लीचा उल्लेख ते ‘बल्लीमारा’च्या गल्लीसकट करतात. याच गल्लीत गालिबचे वास्तव्य होते हे आपण जाणतोच. धडकत्या हृदयावर तर शेकड्यानी गाणी लिहिली गेली आहेत, पण या जळत्या हृदयातल्या आगीवर बिडी पेटवून घे असं आवाहन करणाऱ्या प्रियेची कल्पना गुलजारच करू जाणोत! (‘बीडी जलायले जिगरपे पिया, जिगरमां बडी आग है’- इथेही ती बिडी आहे, सिग्रेट नव्हे – हे सिग्रेट सोडून बिडी ओढायला लागणाऱ्या चांगदेव पाटलाइतके – किंवा सिग्रेटीचे मचूळ ब्रँड सोडून वडारणीच्या रासवट अलिंगनासारखी चार मिनार ओढणाऱ्या दत्तू जोशीसारखे साक्षात्कारी!) गुलजार यांची ही सांकेतिक संवेदनशीलता कधीकधी त्यांची मर्यादा होते की काय अशीही शंका येऊ लागते. ‘जब तारें जमीं पर चलते हैं, आकाश जमीं हो जाता है, उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है’ हे थोडेसे उबवलेले वाटते. ‘आंखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है’ हे नकोसे वाटते. मग तेवढ्यात वसंतरावांनी बांधलेले सुरेल ‘पपीहरा’ आठवते. इक घन बरसे, इक मन प्यासा इक मन प्यासा, इक मन तरसे सावन तो संदेसा लाये मेरे आंख से मोती पाये दान मिले बाबुलके घरसे गुलजार यांच्या गैरफिल्मी रचनांतून त्यांच्यातला गीतकाराआधीचा कवी दिसतो. ‘स्पर्श’ मालिकेसाठी वापरलेल्या हाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते वक्त की शाख से लम्हे नही तोडा करते या ओळी किंवा शाम से आंख में नमी सी है आज फिर आपकी कमीसी है या ओळी पहा. इथली ‘कमीसी’ या शब्दाची निवड हीच ती गुलजार शैली. ‘जिंदगी यूं हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा’ हीपण एक शीच सुरेख गजल. आणि शेवटी गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा: सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखा सरहद के उस पार से कुछ मेहमान आये है आंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये पांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये और तंदूर पे मकई के कुछ मोटे मोटे रोट पकाये पोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे आंख खुली तो देखा घर में कोई नही था हाथ लगाकर देखा तो तंदूर अभीतक बुझा नही था और होटोंपर मीठे गुड का जायका अबतक चिपक रहा था ख्वाब था शायद, ख्वाबही होगा सरहद पर कल रात सुना है चली थी गोली सरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है

कवीमनाचा व्यापारी-राज कपूर

March 11, 2007

वुडहाऊससारखा राजकपूरही एकतर संपूर्ण आवडावा लागतो, नाहीतर अजिबात नाही. ‘दे गयी धोखा हमें नीली नीली आंखे’ हे एकतर संपूर्ण पटते किंवा अजिबात नाही ‘तुम्हारा कसूर नही है रीटा, मेरी सूरत ही ऐसी है’ यावर पूर्ण विश्वास बसतो, किंवा अजिबात नाही!
पैशाच्या राक्षसी जबड्यात आदर्शवादाचा बळी जाणे, हे आपण किती वेळा पाहिले आहे! ‘श्री ४२०’ काढणारा राज कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ काढू शकतो याला काय म्हणावे? ‘केलेवाली, अगर मैने तुम्हारा पैसा नही दिया तो?’ ‘तो हम समझेगा, हमारा बेटा खा गया’ हा प्रसंग चित्रीत करणारा हळवा दिग्दर्शक झीनत अमानसारख्या नायिकेला घेऊन सिनेमा काढतो हा कुणाचा पराभव म्हणायचा? ‘मोती कुत्ता नही है…’ यामागची वेदना तुम्हाला कळत नाही, तर मग घ्या लेको डिंपलपासून सोनिया सहानीपर्यंत सगळ्यांचे वस्त्रहरण केलेला आंबटशौकीन ‘बॉबी’!’ हा कुणी कुणावर उगवलेला सूड म्हणायचा?
पण ते असो. तो संवेदनशीलतेची भळभळती जखम वागवणारा राज कपूर आपल्याला आठवायचा नाही. ही जखम होण्याआधीचा, तळहातावर हृदय घेऊन प्रेमाच्या शोधात वावरणारा राज कपूर आपण आठवू. ‘आज गरीब भी गरीब को नही पहचानता’ ही व्यथा बाळगणारा, ‘ये घर तो ईट पत्थर का है, लेकिन उस सोने के घर से तुम हम को कैसे निकालेगा मिस डिसा?’ अशी माया लावणारा, ‘दिलपे मरनेवाले, मरेंगे भिखारी’ म्हणत हसणारा… प्रेमभंग आणि विरह यातच धन्यता मानण्याच्या त्या जमान्यात राज कपूरकडं दु:ख आणि वेदना व्यक्त करण्यासाठी एक अमोघ अस्त्र होतं ते म्हणजे हास्य. एकीकडे खुरटलेली दाढी आणि वर्षानुवर्षे बरा होत नसणारा बद्धकोष्ठ असल्यासारखा चेहरा घेऊन ‘ टूटे हुवे ख्वाबोंने’ म्हणत ‘दलीप’ फिरत होता. दुसरीकडे चुकून दोन वेळा कायम चूर्ण घेतल्यासारखा चेहरा घेऊन ‘दुखी मन मेरे’ म्हणत देव आनंद प्रेमाचे ‘गली कूंचे’ धुंडाळत होता. त्यात ‘टूटा जिस तारे पे नजर थी हमारी’ म्हणून राज कपूर हसला आणि देवदास होण्याची तमन्ना बाळगणारी एक पिढी ‘ अपना आदमी है, भिडू…’ म्हणत गारद झाली.  ‘ऐ दिल की लगी क्या तुझ को खबर, एक दर्द उठा भर आई नजर’ म्हणत हातातल्या चाकूनं त्यानं नारळाच्या झाडावर प्रियेच्या नावाची अक्षरं खोदत स्मित केलं आणि लोकांचे डोळे पाणावले. ‘जाण्याआधी मला तुझे न रडणारे डोळे पाहू दे’ असं त्या रशियन पाहुणीनं म्हणताच त्यानं डोळ्यावरचा काळा चष्मा काढला आणि तो हसला…. असा हसला की व. पु. काळ्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यापेक्षा त्यानं एखादा हुंदका दिला असता, तर जास्त बरं झालं असतं!

राज कपूरचं हेच हास्य कधीकधी कमालीचं जहरी आणि कडवट होत असे. ‘ओ मेरे सनम…’ या गाण्याच्या वेळी
‘सुनते थे प्यार की दुनिया में दो दिल मुश्किल से समाते है
क्या गैर वहां, अपनों तक के, साये भी न आने पाते है
हमने आखिर क्या देख लिया
क्या बात है क्यूं हैरान है हम”

असं म्हणत हातातला व्हिस्कीचा ग्लास फिरवत राज कपूरनं केलेलं छद्मी हास्य कोण विसरेल?

राज कपूरचा चेहरा नुसताच देखणा नव्हता, तर तो कमालीचा लवचिक होता. श्री ४२० मध्ये मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या सुशिक्षित तरुणाला एक भिकारी जीवनातले एक कडवट सत्य सांगतो, ‘पढे-लिखे, इमानदार. मेहनती इन्सान को यहां काम नही मिल सकता. क्योंकि ये बंबई है मेरे भाई, बंबई!’. या प्रसंगात राज कपूरने चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि दु:ख याचं काय बहारदार मिश्रण दाखवलंय! याच सिनेमात ‘इचक दाना बिचक दाना’ या गाण्याच्या वेळी नर्गिसने घातलेल्या उखाण्याचे उत्तर तो चुकीचे देतो, तेंव्हाचे त्याचे शरमणे, लाजणेही असेच लक्षात राहून गेले आहे.

‘भोला-भाला छोरा’ च्या भूमिका करताना राज कपूरच्या चेहऱ्यावरची निरागसता पहात रहावी अशी असे. त्यात त्याला मिळालेले संवादही आशयपूर्ण आणि प्रवाही होते. ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्ये फटाकडी कम्मो त्याला ‘तुम कौन जात हो – मरद के औरत?’ असं विचारते तेंव्हा ‘अभी तक तो मरद हूं जी, आगे शिवजी मालिक है’ असं तो म्हणतो ते अगदी लाजवाब. ‘माफ करना कम्मोजी, मुझे अंदर की बात समझनेमे जरा टैम लगता है..’ हेही पालुपद अगदी लोभस.

आणि राज कपूरची माझ्या मते सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे ‘जागते रहो’.  ही तर काय, सेल्युलॉइडवर बंदिस्त झालेली एक कविताच आहे. जबरदस्त बांधीव पटकथा आणि शंभू मित्रांचे हळुवार दिग्दर्शन यांनी हा चित्रपट ‘आर. के. ‘ च्या ‘क्लासिक्स’ या यादीत जाऊन बसला आहे. खेडेगावातून रोजगाराच्या शोधात आलेला आणि एक पेलाभर पाणी प्यायला मिळावे म्हणून कासावीस झालेला एक तरुण – त्याला शहराचे कायकाय रंग एका रात्रीत बघायला मिळतात! सभ्यतेचे बुरखे पांघरून आपले हिडीस चेहरे लपवणाऱ्या या लोकांच्या गर्दीत त्याला एका रात्रीत धडा मिळतो तो बेईमान होण्याचा! या महाचोरांनी ‘चोर, चोर’ म्हणून आळ घेतलेला हा तरुण शेवटी सकाळच्या प्रकाशापासूनही लपू पहातो. मग तिथे येते एक छोटी निरागस मुलगी  त्याला विचारते : ‘डरते हो? क्यों? तुमने तो कुछ नही किया है!’ अरे, खरंच की! ‘मन सुद्द तुझं.. ची आठवण यावी असा प्रसंग! मग हा निष्पाप तरुण ताठ मानेने त्या चोरबाजारातून बाहेर पडतो. एका रात्रीत पर्दाफाश झालेल्या संभवितांना पोलीस पकडून नेत असतात. ते सगळं मागं टाकून, जणू त्या रात्रीबरोबर रात्रीचे सगळे अनुभव मावळल्यासारखे मागे टाकून हा तरुण प्रकाशात येतो  आणि त्याला समोरच्या मंदिरात झाडांना पाणी घालणारी एक तरुणी दिसते. पाणी! ज्यामुळे हे सगळं रामायण घडलं ते घोटभर पाणी! व्याकुळ झालेला हा तरुण तिच्याकडे पाण्याची याचना करतो. भिकाऱ्यासारखा दिसणारा हा तरुण बघून ती तरुणी क्षणभर बावरते. मग तिच्या चेहऱ्यावर करुणा दाटून येते. अपार, कैवल्यस्वरूपी करुणा!  ती घागरीतल्या पाण्याची धार त्याच्या हातात धरते आणि तो तहानलेला, थकलेला तरुण ओंजळीने ते पाणी घटाघटा पिऊ लागतो. चित्रपट संपतो.
‘जागते रहो’ मधला ‘जिंदगी ख्वाब है’ म्हणत झिंगणारा मोतीलाल जसा कायमस्वरूपी लक्षात राहिलाय तसाच हा गावंढळ, अशिक्षित अनामिक राज कपूर! मळके, फाटकेतुटके कपडे, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर भीती आणि कोरडा पडलेला घसा आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो.

‘नसीब’ या तद्दन बाजारू सिनेमात मनमोहन देसाईनं आख्खी फिल्म इंडस्ट्री एका गाण्यात गोळा केली. त्या वेळी वेटर अमिताभनं आग्रहानं ऍकॉर्डियन राजकपूरच्या गळ्यात अडकवलं आणि त्या थकलेल्या, बेडौल शरीराच्या शोमननं त्यावर बोटं फिरवत चार पावलं टाकली….. काळ सर्रकन मागे गेला. निळ्या डोळ्यांचा, लालबुंद चेहऱ्याचा एक देखणा प्रेमी आपल्या प्रेमाचा जाहीर इजहार करीत गायला लागला
‘आप हमारे दिल को चुराकर, ख्वाब चुराये जाते हैं
ये इकतर्फा रस्म-ए-वफा हम, फिरभी निभाये जाते हैं
चाहत का दस्तूर है लेकिन, आपको ही मालूम नही
जिस महफिल में शमा हो, परवाना जायेगा’

हाच राज कपूर आपण आठवू आणि लक्षात ठेवू. ‘आज तुम्हे विद्या की नही, माया की जरूरत है’ हा साक्षात्कार होण्यापूर्वीचा ‘सीधी सी बात, ना मिर्ची मसाला’ सांगणारा एक दिलवाला!’रंजो गम मेरे जीवन साथी, आंधियोंमे जली जीवन बाती, भूख ने है बडी प्यार से पाला’ म्हणत अगदी तस्से हसणारा!

काव्य ज्यात…

March 10, 2007

संदर्भ: ‘मनोगत’

आमची प्रेरणा:  ’दैवजात दु:खे भरता’

काव्य अर्थहीनहि लिहिले
दोष हा कुणाचा
हात धुवुनि घेतो जोवर
जोर प्रवाहाचा

मायबोली ही ना दोषी, नव्हे दोषी ‘तात’
बालहट्ट, राजहट्ट, सर्व कर्मजात
जो तो अपुल्या मरणी मरतो, न्याय हा जगाचा

व्यक्तिगत मजकुर इथे, होत ’आपापसात’
ज्याचे लेख्नन शाबूत राही, तोच भाग्यवंत
काय शोक करिशी वेड्या, हरपल्या विदाचा

लेख लिहुनि सुटला का रे कुणी प्राणिजात?
हाणामारी, खेचाखेची यावरी ना मात
प्रतिसादाचे अपुले कंपू , मार्ग तो व्यनिचा

दोन दांडग्यांची जुंपे इथे क्षणार्धात
प्रशासकी बडगा हाणी दोघा मुस्कटात
खजिल दोन्ही चोळिती गाल, एक दुसऱ्याचा

आखातात रे तू आता मुसाफिर व्हावे
दिवस रम्य आठवताना आसवांनी न्हावे
भुतांमुखी भरवी पिवळ्या घास बिर्याणीचा

गडे नको पाडु कविता, पाककृती खास
गूज सर्व संचाराचे पूस ‘माधवा’स
होई मेंबर तोवर अथवा ‘याहू’ गटाचा

टाक भाषांतरे थोडी, परीक्षणे चार
जाणत्यांच्या टाळ्या थोड्या, अजाणांच्या फार
असह्य रे झाला जाच, शब्दसाधनेचा

तरी बरे ज्ञानेश्वरी, अता शांत आहे
गीत हिंदीमधले अजुनि, हिंदीतच आहे
अर्थ कोणि लावावा बा, मुक्तसुनिताचा

‘खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’

March 4, 2007

निखळ मनोरंजक विनोदी चित्रपटांचा जमाना निघून गेला आहे असे ‘चष्म-ए-बद्दूर’ या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना मी म्हटले होते. क्रिकेटनध्ये जसा ‘कॉमेंट्रेटर्स कर्स’ नावाचा एक प्रकार आहे, की कॉमेंट्रेटरने म्हणावे, की काय फालतू बोलिंग आहे, आणि बोलरने दुसऱ्याच चेंडूवर अफलातून स्विंगने त्रिफळा उडवावा, तसे काहीसे माझ्या बाबतीत झाले आहे.  ’खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा̮. लि.’ हे दोन चित्रपट माझ्या पहाण्यात आले आणि ‘चित्रपट हे संपूर्णत: दिग्दर्शकाचे माध्यम आहे’ हे जणू सिद्ध करणाऱ्या या नव्या पिढीच्या दिग्दर्शकांकडून आता नव्या अपेक्षा ठेवता येतील, असे मला वाटू लागले आहे.
‘खोसला का घोसला’ ही दिल्लीत रहाणाऱ्या कमल किशोर खोसला या पापभिरु, मध्यमवर्गीय माणसाची कथा. आयुष्याची पुंजी एकत्र करून त्याने कुठेतरी एक प्लॉट विकत घेतला आहे. खुराणा नावाचा एक बिल्डर तो प्लॉट बळकावतो.तो प्लॉट परत पाहिजे असेल तर तो खोसलाला विकत घ्यावा लागेल, असे खुराणा आणि त्याचे बगलबच्चे खोसलाला सांगतात. हैराण झालेला खोसला पोलिस, कोर्टकचेरी एवढेच काय तर काही गुंडांचीही मदत घेऊन तो प्लॉट परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यात त्याचे पैसे तर जातातच, पण त्याला स्वतःलाच तुरुंगात जायची वेळ येते. मग हताश होऊन तो प्लॉटचा नाद सोडून देतो. पण आता त्याची मुले जिद्दीला पेटलेली आहेत. त्यातला थोरला खुशालचेंडू आणि बऱ्यापैकी नाकर्ता, तर धाकटा एकतर ‘चिरोंजीलाल’ या आपल्या चमत्कारिक नावाने वैतागलेला, आणि भारतातल्या या सगळ्या कटकटींना वैतागून अमेरिकेत जायला निघालेला. आसिफ इक्बाल हा व्हिसा एजंट, चिरोंजीलालची मैत्रिण आणि तिचा नाट्यकंपू आता खुराणाकडून पैसे वसूल करण्याचा प्लॅन तयार करतात. असले बेकायदेशीर काहीही करायला खोसलाचा विरोध असतो, पण कशीबशी त्याची समजूत घालून ही टोळी एक भन्नाट प्लॅन तयार करते. मग तो प्लॅन प्रत्यक्षात आणताना झालेल्या गमतीजमती आणि शेवटी खुराणासारख्या पेशेवर बिल्डरला पाणी पाजून त्याच्याच पैशाने त्याचाच प्लॉट परत विकत घेणे – ही आहे ‘खोसला का घोसला’ ची कथा.
‘खोसला का घोसला’ हा संपूर्णपणे अनुपम खेर आणि बोमन इराणी या दोन खांबांवर पेललेला तंबू आहे. या दोघाही नैसर्गिक अभिनेत्यांना कोणताही भूमिका  द्या, ते तिच्यात एकसंध मिसळून जातात. ‘सारांश’ ची पातळी अनुपम खेरला नंतर फारशी कधी गाठता आली नाही हे खरे, पण तो तिच्या फार खालीही कधी घसरला नाही. दिल्लीतही अशी मध्यमवर्गीय, ‘गॉडफिअरिंग’ माणसे आहेत हे पटवून घ्यायचे असेल तर अनुपमचा हा रोल बघावा. गुंडांकडून फसवले गेल्याबद्दल त्याच्या मनात चीड आहे, पण त्याची वसुली म्हणून आपणही बेकायदेशीर वागावे, हे त्याला पटण्यासारखे नाही. घरात खुराणाकडून पैसे वसूल करण्यासाठी चाललेले ‘प्लॅनिंग’ तर त्याला बिलकुल पसंत नाही. पण यामागे केवळ भाबडा आदर्शवाद नाही. आपली मुले कशात तरी अडकतील अशी काळजी आहे. हा अवघड रोल अनुपमने बहारदार केला आहे. घराच्या बांधकामाची योजना करतानाचा त्याचा स्वप्नाळूपणा, खुराणासमोरची त्याची हतबलता, आपल्या मुलांविषयी त्याची काळजी, त्यातूनच अस्पष्टपणे प्रगट होणारा त्याचा अभिमान हे सगळे अनुपमने सुरेख दाखविले आहे.
बोमन इराणीबाबत सांगायचे तर हा माणूस आता ‘टाईपकास्ट’ होतो की काय, अशी भीती बाळगणे चुकीचे आहे, हेच जणू तो वारंवार सिद्ध करून देतो, असे वाटते. ’लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘खोसला का घोसला’ या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिका सारख्या आहेत, पण त्या अगदी वेगळ्या माणसाने केल्या असाव्या असे रंग त्यांत बोमनने भरले आहेत. ‘खोसला का घोसला’ मधील खुराणा दिल्लीतला ‘टिपिकल’ बिल्डर आहे. त्याची गुर्मी, मस्ती, माज, ‘कायदा माझ्या खिशात’ ही वल्गना… हे मुळातून बघावे असे आहे. अशा व्यक्तींचे एक कुणीतरी गुरुजी, बाबाजी किंवा माताजी वगैरे असतात. मग त्यांच्या समोर ते नतमस्तक वगैरे होतात. पण त्यांची ही श्रद्धाही उथळ, बटबटीत असते. हे अचूक निरीक्षण अर्थात दिग्दर्शकाचे, पण ते तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर उतरवले आहे ते बोमन इराणीने. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ मध्ये बोमन त्याच्या देहबोलीतून तंतोतंत एका मेडिकल कॉलेजचा डीन आणि एक यशस्वी सर्जन वाटतो आणि इथे एक हावरा, लंपट बदमाष. दिल्लीची पंजाबी लहेज्याची हिंदी त्याने सहजपणाने पकडली आहे. ‘ मल्टीप्लैक्स, शॉपिंग कॉंप्लैक्स…’ असे शब्द तो असे उच्चारतो की डोळ्यासमोर त्याचे ‘सौथ एक्स्टैंसन’ मधले संपन्न पण भडक, अंगावर येणारे अभिरुचीहीन घर उभे रहाते! 
‘खोसला का घोसला’ मध्ये इतर सहकलाकारांच्या भूमिकाही छान आहेत. त्यात मुद्दाम उल्लेख करावा तो म्हणजे नवीन निश्चलचा. नायकाच्या भूमिका करताना त्याने कधी अभिनयाच्या प्रयत्नाचाही आळ स्वतःवर येऊ दिला नाही. पण इथे एका नाटक कंपनीच्या प्रमुखाची – बापूची- भूमिका त्याने मजेत केली आहे. त्याला दुबईस्थित एका एन. आर. आय. चे सोंग आणावे लागते आणि ते करत असताना ‘यार मेरी फट रही है’ हे त्याचे विधान अगदी पटावे, अशी त्याने धमाल केली आहे.  

‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’ हा एक वेगळाच प्रकार आहे.रीमा कागती या नव्या दिग्दर्शिकेने हे काहीतरी भलतेच आपल्या पोतडीतून बाहेर काढले आहे. ‘हनिमून..’ मधील विनोद हा वेगळा, ‘सटायर’ च्या अंगाने जाणारा आहे. खरे तर हा विनोद नव्हेच, हे दैनंदिन आयुष्याचेच एक प्रतिबिंब आहे, पण ते नेहमीच्या आरशातले नव्हे तर ‘लाफिंग हाऊस’ मधील आरशांसारखे – उंच, ठेंगणे, जाड, कृश – म्हटले तर हसवणारे – म्हटले तर गंभीर, अंतर्मुख करणारे. हनिमूनला निघालेल्या जोडप्यांच्या आयुष्यांत डोकावून बघायचे हे तसे धाडसाचे काम. पण हे करताना या नव्या दिग्दर्शकांना बुजल्यासारखे होत नाही, ही कौतुकाची बाब. या चित्रपटात येणारे समलिंगी संबंधासारखे उल्लेख म्हणूनच उसने आणल्यासारखे वाटत नाहीत. सहा जोडप्यांच्या हनिमूनची ही कथा अनपेक्षित धक्के देते पूर्ण होते, तेंव्हा आजचे हिंदी चित्रपटही बघण्यासारखे असू शकतात, हा तिने दिलेली सगळ्यात मोठा धक्का असतो!
‘हनिमून..’ ला कथा अशी नाहीच. आहे ते प्रसंगांनुरुप खुलत गेलेले एक झकास नाट्य. मग हे नाट्य कधी ‘फँटसी’ च्या वळणाने जाते तर कधी आयुष्याच्या जळत्या वास्तवाच्या किनाऱ्याने. पण एक बाकी खरे, हे रसायन सगळ्यांनाच रुचेल असे नाही. जशा इतर सगळ्याच कल्पना वेगाने बदलत आहेत, तशा विनोदाच्याही. दर्जा न गमावता विनोदनिर्मिती आणि करमणूक करता येते हाच धडा ही नवी पिढी गिरवते आहे. ‘टेक्स्ट’ तेच आहे, फक्त ‘फाँट’ वेगळा आहे, तेवढे आपण समजून घेतले की झाले.
काल ‘हनिमून…’ पाहिला. थिएटर गच्च भरलेले होते.  चित्रपट संपल्यावर बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होते. तीन तासांपुरते का होईना, चार-पाचशे लोकांना आपल्या चिंता कटकटींचा विसर पडल्यासारखे वाटले. जणू प्रत्येकाच्या मनातल्या होळीत रोजचे रुक्ष आयुष्य एका दिवसापुरते जळून गेले होते!

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

March 1, 2007

‘श्रद्धेच्या परीक्षणाला विरोध का?’ या माझ्या लिखाणाला आलेल्या प्रतिसादात काही लोकांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या व्याख्या स्पष्ट कराव्यात असे म्हटले आहे. काहींनी ते व्यक्तिसापेक्ष असून तसे करता येणार नाही असे म्हटले आहे.

माझ्या मते ते इतके अवघड नाही. प्रयत्न तर करूया.

एक ताजे उदाहरण घेऊ. नुकतेच दिवंगत झालेले भाजपचे तरूण नेते प्रमोद महाजन यांच्यासंदर्भात विविध मते व्यक्त करण्यात आली. महाजन यांचे वाद्ग्रस्त व्यक्तिमत्व, शिवानी भटनागर हत्येशी त्यांचा जोडला गेलेला संबंध, रिलायन्स इंड्स्ट्रीजशी त्यांच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर उडालेले शिंतोडे, सोनिया गांधींची मोनिका लेविन्स्कीबरोबर त्यांनी केलेली तुलना, त्यांनी सांभाळलेली भाजपची २००० कोटींची व्यवस्था…यामुळे त्यांचे टीकाकारही भरपूर होते. पण यातल्या कशावरही विश्वास न ठेवता किंबहुना असे काही असूच शकणार नाही अशा भूमिकेचे लोकही आहेत. तसेच या सगळ्याची कल्पना असूनही ‘शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच…पण तरीही पंतप्रधान होण्याची योग्यता असलेला एक मराठी राजकारणी गेला’ अशी व्यवहारी भूमिका घेणारेही लोक आहेत.

मला वाटते या एकाच उदाहरणातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक दिसून येतो. महाजन आजारी असताना श्रद्धा व अंधश्रद्धा याचे दुसरे उदाहरण दिसून आले. आपण स्वतः व आपले कुटुंबीय अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना ( व एकीकडे महाजनांवर शक्य ते सगळे वैद्यकीय उपचार सुरु असताना – प्रयत्नवाद सोडलेला नाही!) त्यांचा मुलगा राहुल देवळात, दर्ग्यात, गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत होता. स्वतःची मानसिक गरज म्हणून आणि आपल्या संबंधितांना आधार मिळावा म्हणून.

ही श्रद्धा.

त्याचवेळी देशभर जप-जाप्य, मृत्युंजय मंत्राचे पठण याचे पेव फुटले होते. महाजन वाचणे ही ‘मेडीकल इम्पॉसिबिलिटी’ झाल्यावरसुद्धा ‘आमच्या मंत्रांनी ते परत येतीलच’ असे म्हणून लोक पुन्हापुन्हा मंत्रजागर करत होते, यज्ञात परत परत तूप ओतत होते.

ही अंधश्रद्धा.

संकटकाळात अमुक एका व्यक्तिच्या / नामाच्या स्मरणाने मला बळ मिळते, आधार मिळतो व त्या संकटावर मात करण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नात भर पडते.

ही श्रद्धा.

संकटकाळात देवाला नवस बोलणे, नवस न फेडल्यास देवाचा कोप होतो असा समज करून घेणे, भूतबाधा, मांत्रिक, भगत, भानामती, प्लँचेट यावर विश्वास ठेवणे, दृष्ट लागणे, दृष्ट काढणे, नजर वाईट असते असे मानणे, जन्मपत्रिका, कुन्डली, रास, गृह – तारे यांची स्थिती, नियतीवाद, उपास-तापास, व्रतवैकल्ये, गंडे, दोरे, ताईत यांनी आपल्यावरील संकटांचे मोचन होईल असा विश्वास ठेवणे, शकुन- अपशकुन, शुभ-अशुभ, पाप-पुण्य, तीर्थ- प्रसाद, पूजा-अर्चा, मासिक धर्माच्या काळात स्त्रीला अपवित्र समजणे, मनुष्यरूपी कुठल्याही प्राण्यामध्ये परमेश्वराचा अंश असतो म्हणून त्याची आराधना करणे….

आणि सर्वात महत्वाचे- ‘हे असे का? ‘ हा प्रश्न न विचारणे

ही अंधश्रद्धा.

भारतीय घटनेमद्धे शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे व चौकस बुद्धी वाढवणे ही भारतीय नागरिकाची प्रमुख कर्तव्ये म्हणून दिली आहेत. ‘मी हे का करु’ हा प्रश्न प्रत्येकाने प्रथम स्वतःला आणि नंतर इतरांना विचारण्याचे धाडस केल्यास हा गुंता पट्कन सुटू शकेल. पण हा प्रश्न विचारण्याचे धाडस न झाल्याने समाजाचे आजपर्यंत अपरिमीत नुकसान झाले आहे.पुरुषांपेक्षा बायकांना दात कमी असतात असे ऍरिस्टॉटलने म्हटले. कित्येक वर्षे ते समाजाने मान्य केले. किमान दोघांचे दात मोजून बघावे इतकेही धाडस दाखवणे कुणाला जमले नाही. विमानातून पक्ष्यांची मोजदाद करत असताना डॉ. सलीम अली म्हणाले खाली दिसणाऱ्या एका थव्याकडे पाहून म्हणाले ‘लिहा— सत्तर पक्षी’. कुणीसे विचारले ‘ सर, सत्तर कशावरून?’ सलीम अली म्हणाले ‘ बिकॉज सलीम अली सेज सो’. समाजाला मागे नेणाऱ्या अशा असंख्य घटना घडल्या आहेत….

घडत आहेत.

गप्प रहा… बोलू नका… हे असे का हा प्रश्न विचारू नका….

‘का?’ हा प्रश्न समाजपंडीतांना कधीच आवडला नाही. विवेकबुद्धीच्या निकषावर कोणतेही तत्व, देवाचे अस्तित्वदेखील पारखून पहावे असे म्हणणाऱ्या सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यावा लागला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते एवढेच म्हणण्याचा अपराध करणाऱ्या गॅलीलीओला एकांतवासात आंधळा, करूण मृत्यू आला. युरोपातील चिकित्सावादही त्यानंतर कित्येक शतके निपचिप पडून राहिला. भारतातील तर बातच सोडा. इंग्रज सैंन्याच्या गोळ्या थोपवायच्या असतील तर पुण्याच्या तटाभोवती जानवी व सोवळी बांधायला सांगणऱ्या पळपुट्या बाजीरावाचे उदाहरण पुरेसे आहे.

मग करावे तरी काय?

विवेकाची एक आचारसंहिता सांगतो – पटते का बघा.

मी आजपासून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती मान्य करणार नाही.

जर गेल्या सहा महिन्यात तुम्ही आजवर ज्याच्यावर गाढ श्रद्धा ठेवली आहे अशा एकाही बाबतीतले तुमचे मत अजिबात बदलले नसेल, तर तुमची नाडी तपासून पहा- कदाचित तुम्ही मृत झालेले असाल!

हे वाक्य माझे ब्रीदवाक्य असेल.

आईच्या गर्भातले बालक सर्वात लवचिक असते तर मरण पावलेल्या माणसाचे शरीर हे सर्वात अलवचिक. हेच मनाच्या आणि विचारांच्या बाबतीही खरे आहे. लाइफ इज अ जर्नी फ्रॉम फ्लेक्सीबिलिटी टू रिजीडीटी. त्यामुळे मी माझे मन , माझे विचार तरूण ठेवण्याचा प्रयत्न करीन.

देवळात / दर्ग्यात / चर्चमद्धे गेल्यावर मला बरे वाटते, कारण असे केल्याने बरे वाटले पाहिजे असे माझ्या मनाचे कंडीशनींग झाले आहे. एखाद्या बागेत किंवा स्मशानात गेल्यावरही मला तितकेच बरे वाटू शकेल पण त्यासाठी मला माझ्या मनावरचे आधीचे संस्कार पूर्ण पुसून टाकले पाहिजेत आणि तसे करण्याची माझी मानसिक तयारी नाही./ इच्छा नाही. किंबहुना तसे करून बघितल्यानंतर्ही मला बाग/ स्मशानापेक्षा देवळात जास्त बरे वाटत असेल तर तो देवळाचा गुणधर्म असू शकेल किंवा माझ्या मनाची तयारी पूर्ण न झाल्याचे लक्षण – हे मी मान्य करीन.

माझी श्रद्धा ही नम्र व लवचिक असेल. काशी विश्वेश्वराच्या देवळातली प्रचंड घाण, शिर्डीच्या साईमंदिरातले उबग आणणारे व्यापारीकरण, पंढरपूरच्या विठ्ठ्लमंदिरातली बडव्यांची पुंडगिरी हे बघून अशा ठिकणी देवाचे वास्तव्य कसे असेल हा प्रश्न मला पडल्यास तो दडपून न टाकता त्याला नैसर्गिक मानून त्याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न करीन.

श्रद्धेचा अंगिकार करताना मला पटलेल्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मला असले पाहिजे, तसेच न पटलेल्या गोष्टी इतरांच्या दबावापुढे न झुकता नाकारण्याचेही. पण हे करत असताना मी प्रत्येक गोष्टीवर विचार आणि चिकित्सा करून माझे वैयक्तिक निष्कर्ष काढीन. त्याबाबत माझी भूमिका ही आग्रही किंवा न्यायाधिशी असणार नाही.

माझ्या मताशी पूर्ण विसंगत किंवा माझ्या मतांवर आघात करणारे एखादे मत अंतिम सत्य असू शकेल याची मी जाणिव ठेवीन. गुरोर्वाक्य प्रमाणम या वृत्तीचा मी त्याग करेन. इन्ग्रजी नवाचा आकडा मला नऊ दिसतो, पण टेबलापलीकडल्या माणसाला तो सहा दिसतो. हा दृष्टीकोनातला फरक मी मान्य करीन.

कुसुमाग्रजांच्या दोन कवितांचा उल्लेख करून हा लांबलेला विचार संपवतो

व्यर्थ गेला तुका

व्यर्थ ज्ञानेश्वर

संतांचे पुकार

वांझ गेले

(जिज्ञासूंनी पूर्ण कविता वाचावी)

आणि

इतिहासाचे अवजड ओझे

डोक्यावर घेऊन ना नाचा

करा पदस्थल त्यांचे आणिक

चढुनि त्यावर भविष्य वाचा.