Archive for April, 2007

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद ५

April 30, 2007

अनुकरणाचाच विचार करतो आहोत तर आणखी एक – दोन उदाहरणे बघू. गीतकार राजा मेहंदी अलि खान यांनी  “आपकी परछाईयाँ” चित्रपटासाठी लिहिलेले एक गीत

“अगर मुझसे मुहब्बत है मुझे सब अपने गम दे दो
इन आखोंका हर एक आँसू मुझे मेरे सनम दे दो”

आणि साहिरने “शगुन” साठी लिहिलेले

“तुम अपना रंजो गम अपनी निगेबानी मुझे दे दो
शाम -ए – गम की कसम ये दुख ये हैरानी मुझे दे दो”

ही दोन्ही गीते बरीच लोकप्रिय झाली. पण “आपकी परछाईयाँ” १९६४ चा व “शगुन” १९६७ चा हे गीतकोशात वाचल्यावर साहिर माझ्या मनातून उतरला.

साहिरने नवीन “दाग” साठी लिहिलेले

“जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग” 

 हे (एकच) गाणे मला आवडले होते. पण माधव मोहोळकरांनी त्यांच्या साहिरवरच्या लेखात या गाण्याभोवती संशयाचे धुके असल्याचे लिहिले आहे. हीच गजल त्यांनी रेडिओ पाकिस्तान वर कतिल शिफाईची म्हणून ऐकल्याचे लिहिले आहे. मनोगतावर मिलींद फणश्यांनी या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी कतिल शिफ़ाईच्या असून अंतरे साहिरने लिहिले असल्याची माहिती दिली आहे.

कधी कधी मला कम्युनिस्ट विचारांच्या कवींचे मेहमी आश्चर्य वाटते. एकाच कल्पनेचा/विचाराचा  निरनिराळ्या भाषेत आणि शब्दांत आविष्कार त्यांच्या कवितातून होतो हे “great men think alike” म्हणायचे की अनुकरण म्हणायचे? “ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है”चे एक उदाहरण साहिर, नीरज, फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या कवितातून दाखवले आहेच. आपल्या कुसुमाग्रजांची “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात” ही मला त्याच पंगतीतली वाटते.

दुसरे उदाहरण ताजमहालाविषयी दृष्टीकोनाचे. आतापर्यंत सर्वसामान्य माणसाचा दृष्टीकोन

“बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल” किंवा

“एक शहनशाह ने बनवाके हँसी ताजमहल
सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है” (कवी – शकील बदायुनी)

असा होता. पण कम्युनिस्ट विचाराच्या कवींना अचानक ताजमहाल हे बादशहाच्या पैशाच्या उधळपट्टीचे, सामान्य मनुष्याच्या/मजुरांच्या शोषणाचे, प्रतीक वाटायला लागले. साहिरने लिहिले

“एक शहेनशहाने दौलत का लेकर सहारा
हम गरीबोंकी मुहब्बत का उडाया है मजाक
मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझ को”

कुसुमाग्रजांच्या “ताजमहाल” कवितेत नक्की ओळी आठवत नाहीत पण असाच विचार आहे. तसेच सुमित्रानंदन पंतांच्या “ताज” मधल्या या ओळी पहा.

” हाय! मृत्यू का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पडा हो जग का जीवन
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर , वासविहीन रहे जीवित जन”

(ह्या ओळी माधव मोहोळकरांच्या पुस्तकातून घेतल्या आहेत). आता हा प्रकार तर रविकिरण मंडळापेक्षाही वाईट दिसतो. कारण रविकिरण मंडळातले कवी विषय एकच असला तरी अभिव्यक्ती आणि विचार वेगवेगळे  असत, इथे विषय तोच, विचारही तोच, फक्त शब्दकळा आणि भाषा थोडीशी वेगळी. अशा गोंधळात साहिरची कविता कितपत स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार मानायची हे ठरवणेही कठीण आहे.

“एक शहेनशाने दौलत का लेकर सहारा..” हे गीत “गझल” चित्रपटात महंमद रफ़ीने गायले आहे. संगीतकार मदनमोहन. तो एक भलताच विनोदी प्रकार झाला आहे. गाण्याचा मूड संतापाचा, चिडीचा आहे. कवी चिडून म्हणतो “मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझ को” आणि चित्रपटातल्या गाण्याची चाल चक्क रोमँटिक आहे. मदनमोहनला गाण्याचा मूडच समजला नाही की आपल्यापेक्षा एक रुपया रुपया साहिरने जास्त घेतल्याचा सूड उगवला आहे कळत नाही.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद – ४

April 30, 2007

साहिरला जिथे कवी म्हणून अमाप यश मिळाले त्या “प्यासा”, “बरसात की रात”, “शगुन” “कभी कभी” वगैरे चित्रपटात मुख्य पात्र एका कवीचे होते. त्यामुळे त्याला बऱ्याच प्रमाणात स्वातंत्र्य होते. ज्या ठिकाणी भावनाशील पात्रे आली तिथे साहिर कमी पडला. “देवदास” आणि “लैला मजनू” ही त्याची उदाहरणे. २००२ मध्ये शाहरुख खानचा ” देवदास” प्रदर्शित झाला तेव्हा आमच्या न्यूजग्रुपवर एकूणच आधीच्या देवदासांवर चर्चा सुरू होती. सैगलच्या देवदासचे संगीत थोर आहे असे सर्वांचे एकमत होतेच, त्यामानाने दिलीपकुमारच्या “देवदास”चे संगीत फिके पडले. त्याचे कारण सचिनदेव बर्मन असे बहुतेकांचे मत पडले. तिथे मी “गीतकार म्हणून साहिरची निवड चुकली” असे लिहिले, बराच गदारोळ झाला, साहिरचे चाहते चिडले इतके की माझ्यावर न्यूजग्रुप सोडून जायची वेळ आली. एक तर सैगलच्या जादुई आवाजापुढे तलत काय दुसरा कोणीही गायक फिकाच पडला असता. पण देवदासच्या तोंडी असलेली साहिरने लिहिलेली “मितवा, लागी रे कैसी ये अनबुझ आग” किंवा “किसको खबर थी ऐसे भी दिन आयेंगे” ही गाणी आज कोणालाही फारशी आठवत नाहीत. उलट आठवतात ती “आन मिलो आन मिलो श्याम साँवरे”, “गोरी साजन की हो गई” ही भजने, आणि “जिसे तू कबूल कर ले”. आज इतक्या वर्षांनंतर मी सहज विचार केला की आज जर माझ्या हातात देवदास ने कुठली गाणी म्हणावीत हे ठरवणे असते तर मी “कोई सागर दिल को बहलाता नहीं बेखुदी में भी करार आता नहीं”, आणि “गुजरे है आज इश्क में हम उस मकाम से, नफरत सी हो गई है मुहब्बत के नामसे” या शकीलने लिहिलेल्या गाण्यांची निवड केली असती आणि ती “देवदास” च्या प्रेमभंग झालेल्या व दारूत बुडालेल्या व्यक्तिरेखेशी जास्त सुसंगत ठरली असती. “लैला मजनू” नावाच्या जुन्या चित्रपटामध्ये शकीलने गाणी लिहिली आहेत, संगीतकार गुलाम महंमद (“पाकिजा”वाले). “चल दिया कारवाँ रुक गये हम यहाँ”, “आसमाँ वाले तेरी दुनिया से जी घबरा गया”, “बहारोंकी दुनिया पुकारे तू आजा”, देख ली ऐ इश्क तेरी मेहरबानी देख ली” ही तलत – लता, तलत – आशा, यांची गाणी आजही अजरामर आहेत. (हो, या चित्रपटात शम्मीकपूर चक्क तलतच्या आवाजात गायलाय). उलट नवीन “लैला मजनू”ची गीते साहिरने लिहिली आहेत, संगीतकार मदन मोहन – जयदेव. “कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानेको”, “तेरे दर पे आया हूँ झोली भर के जाऊँ गा” वगैरे गाणी खराब आहेत. कुठल्याच बाबतीत दोन लैला मजनूंची तुलना करू नये हे उत्तम.

साहिर – श्री.विनायक यांचा प्रतिसाद – ३

April 26, 2007

“प्यासा”ची गाणी प्रसिद्ध झाली. त्याआधी त्याने विद्रोही गाणी लिहिली नव्हती. चकले, परछाईया, ताजमहल वगैरे कविता लिहिल्या होत्या. खरे तर मला फक्त “जिन्हे नाज़ है हिंद पर” आवडते. ते अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. पण “प्यासा” चे यश साहिरच्या डोक्यात गेले. आपण कोणाही संगीतकाराची कारकीर्द घडवू किंवा बिघडवू शकतो अशी बढाई तो मारू लागला. संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त मानधन घेऊ लागला. बर्मनदादांशी भांडण झाले. देव आनंद, गुरू दत्त दुरावले. नया दौर, सोने की चिडीया नंतर ओ. पी. पण साहिरबरोबर काम करणार नाही म्हणाला. गुणी संगीतकार जयदेवशीही भांडण झाले. गाण्यासाठी जयदेवने आपल्या घरी तबला पेटी घेऊन यावे या क्षुल्लक कारणावरून. मदनमोहन, अनिल बिस्वास, हेमंतकुमार, सी. रामचंद्र पण एक दोन चित्रपटांनंतर त्याच्याजवळ फिरकले नाहीत. अर्थात त्याने खय्यामला फिर सुबह होगी द्यावा अशी सूचना त्याच्या निर्माता दिग्दर्शकाला केली होती हे खरे. पण खय्यामनेही तो व शगुन सोडून पुढे  “कभी कभी” पर्यंत साहिरबरोबर काम केले नाही.

अशा परिस्थितीत साहिर पुनरागमन करू शकला ते रोशनमुळे. बिचारा रोशन. बरसात की रात च्या आधी ३२ चित्रपटांमध्ये ४४ गीतकारांबरोबर काम केले, उत्तमोत्तम गाणी दिली, पण व्यावसायिक यश काही मिळाले नाही. बरसात की रात प्रसिद्ध झाल्याने दोघांनाही फायदा झाला. रोशन – साहिर यांनी अत्यंत दर्जेदार गाणी दिली आणि ती लोकप्रिय पण झाली. बाबर, चित्रलेखा, ताजमहल, दिल ही तो है, बहू बेगम, दूज का चाँद, सर्वच चित्रपटांबद्दल हे खरे आहे. तीच गोष्ट जयदेवच्या  जोरू का भाई, हम दोनो आणि मुझे जीने दो ची. पण मला सर्वात आवडलेली गाणी म्हणजे खय्यामच्या फिर सुबह होगी आणि शगुन मधली.

रोशनचे १६ नोव्हेंबर १९६७ ला निधन झाले आणि साहिरला उतरती कळा लागली. रवी आणि एन. दत्ता यांनी दिलेली बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटातली गाणी मला खास आवडत नाहीत. त्यानंतर कभी कभी चा अपवाद वगळता साहिरने १९८० पर्यंत खास कामगिरी केली नाही.
तुम्ही जर ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्या (धक्का – कलाटणी तंत्रवाल्या)वाचत असाल तर साहिरबाबत माझे मत असेल याचा अंदाज येईल. आधीची प्रस्तावना यासाठीच होती की साहिरची बहुतेक चांगली गाणी मला माहिती आहेत हे वाचकाला समजावे. तरीही गीतकार म्हणून शैलेंद्र, शकील काही प्रमाणात मजरूह हे मला जास्त आवडतात. साहिरची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातले सामाजिक विचार सांगणे हे एक. पण साहिर ते करताना कधी कधी अकलात्मक पातळीवर उतरतो. “औरत ने जनम दिया मर्दोंको”, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा” वगैरे याची उदाहरणे आहेत.

माझा दुसरा आक्षेप असा आहे की तो चक्क अनुकरण (वाङमयचौर्य?) करतो. “जिसे तू कबूल कर ले” मधल्या ओळींचे शकीलच्या “जो खुशी से चोट खाये” मधील ओळींशी साम्य आहे ते आधी लिहिलेच आहे. दुसरे उदाहरण “दीदी” मधल्या “तुम मुझे भूल भी जाओ” मधल्या

ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है
ज़ुल्फ़ो रुख्सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है

आणि फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या “मुझसे पहली सी मुहब्बत मेरे मेहबूब ना माँग” मधल्या या ओळी पहा.

और भी गम है दुनिया में गमे मुहब्बत के सिवा
राहते(सुख) और भी है वस्ल( मीलन) की राहत के सिवा

फ़ैज़ ची कविता आधीची आहे. तसेच साहिरच्या गाण्यातला “मैने तुमसेही नहीं सबसे मुहब्बत की है” हा बचावही लंगडा वाटतो. कवी नीरजनेही “नई उमर की नई फसल” मध्ये (संगीतकार – रोशन) एक याच प्रकारचे गाणे लिहिले आहे. “आज की रात बडी शोख बडी नटखट है”. त्यातला प्रियकर प्रेयसी ला काय म्हणतो पहा.

“पर ठहर वो जो वहाँ लेटे है फुटपाथों पर
लाश भी जिनकी कफ़न तक न यहाँ पाती है
और वो झोपडे छतभी न है सरपर जिनके
छाते छप्पर ही जहाँ जिंदगी सो जाती है
पहले इन सब के लिये एक इमारत गढ लूँ
फिर तेरी माँग सितारों से भरि जाएगी”

हे जास्त आवडले.

साहिरचा कल  गाण्यातून विचार मांडण्याकडे जास्त आहे. त्याला भावना मांडता येत नाहीत. त्याबाबतीत शकीलला तोड नाही. मात्र काही प्रसिद्ध कवितांवर parody  प्रकारच्या रचना छान केल्या आहेत. उदा. महंमद इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी झाल्यावर त्यांनी लिहिले होते
“चीनो अरब हमारा हिंदोस्ताँ हमारा
मुस्लिम है हम सारा वतन हमारा सारा जहाँ हमारा”

त्यावर साहिरचे “चीनो अरब हमारा” गाणे म्हणजे जबरदस्त चपराक आहे. किंवा ब्राउनिंगच्या प्रसिद्ध ओळी आहेत

god is in the heaven and all is right with the world

त्यावर साहिर यांनी लिहिले “आसमाँ पे है खुदा और जमींपे हम, आजकल वो इस तरफ़ देखता है कम”. हाच धागा पकडून गुलजार यांनी “हालचाल सब ठीकठाक है” (मेरे अपने) लिहिले. त्यात

“अल्लामिया जाने कोई जिये या मरे
आदमी को तो खूनबून सब माफ़ है” अशा ओळी आहेत.

“देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इन्सान” चे विडंबन ” देख तेरे भगवान की हालत क्या हो गई इन्सान कितना बदल गया भगवान” (रेल्वे प्लॉटफॉर्म) असे केले आहे.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद -२

April 26, 2007

गीतकार साहिरच्या कारकीर्दीचे मी चार टप्पे मानतो.

१. १९५० ते १९५७ – याला सचिनदेव बर्मन पर्व म्हणू या. कारण या काळात त्याने प्रामुख्याने त्यांच्यासाठीच गीते लिहिली. यातील अजूनही बरीचशी गाणी मलाही माहिती नाहीत. “सजा” मधल्या ” तुम न जाने किस जहाँ में खो गये” पासून सुरूवात झाली. मग देव आनंदच्या बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, फंटुश, घर नं. ४४, मुनीमजी, जाल बऱ्याचशा चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली. देव आनंदच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत अशी हलकीफुलकी गाणी लिहिली, ती बरीच लोकप्रिय पण झाली. पण “जाये तो जाये कहाँ”, “दुखी मन मेरे, सुन मेरा कहना” वगैरे गाणी मला कविता म्हणून सामान्य वाटतात. मात्र “जाल”मधले “पिघला है सोना दूर गगन में फैल हरे है शाम के साये”, घर. नं ४४ मधले “फैली हुई है सपनोंकी बाहे”, तसेच “मुनीमजी” मधले ” साजन बिन नींद न आए” ही मला अतिशय आवडतात.

देव आनंद शिवाय इतर चित्रपटांपैकी “देवदास” मधली जास्त प्रसिद्ध झाली. संजोप रावांनी “जिसे तू कबूल कर ले” चा आवडत्या गाण्यांमध्ये उल्लेख केला आहे म्हणून एक मजा सांगतो. शकील बदायुनींनी १९५३ सालच्या दिल ए नादान मध्ये एक गाणे लिहिले होते “जो खुशीसे चोट खाए वो जिगर कहाँ से लाऊँ”. त्यातल्या ह्या ओळी पहा.

मुझे तेरी आरजू है
मेरे दिल में तू ही तू है
बसे गैर जिस में आकर
मैं वो घर कहाँ से लाऊँ

आता १९५५ सालच्या “देवदास” मधल्या “जिसे तू…” मधल्या या ओळी पहा.

तुझे और की तमन्ना
मुझे तेरी आरजू है
तेरे दिल में गम ही गम है
मेरे दिल में तू ही तू है

आता याला काय म्हणावे?

बाकी “अंगारे ” मध्ये तलत चे एक सुंदर गीत आहे, ” डूब गये आकाश के तारे जाके न तुम आये”. त्यातल्या

बहते बहते चाँद की कश्ती दूर गगन में खोने लगी
आस की इक नन्हीं सी किरन थी वो भी ओझल होने लगी

अशा सुंदर ओळी आहेत. आणखी राधाकृष्ण, शहेनशहा, जीवनज्योती वगैरे चित्रपटातली गीते मीच जास्त ऐकली नाहीत.

सचिनदेव बर्मन सोडून त्या काळात मदनमोहनसाठी “रेल्वे प्लॅटफॉर्म” मध्ये, अनिल बिस्वास साठी “दो राहा” मध्ये (एकच गाणे), जयदेव साठी “जोरू का भाई” व श्यामसुंदर “अलिफ़ लैला” साठी गाणी लिहिली. यातील बरीचशी गाणी अप्रसिद्ध असली तरी देव आनंदच्या वर सांगितलेल्या चित्रपटातल्या गाण्यांपेक्षा जास्त सुंदर आहेत. ज्यांनी “चाँद मध्यम है”, “मुहब्बत तर्क की मैंने”, “अब तेरा इंतजार कौन करे” आणि “बहार आई खिली कलियाँ” ज्यांनी ऐकली आहेत त्यांना मी काय म्हणतो ते समजेल.

त्यानंतर १९५७ मध्ये ‘प्यासा’ आला.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद -१

April 26, 2007

साहिरवर मी लिहिलेल्या लेखाला विविध प्रतिसाद आले. त्यातील श्री. विनायक यांचा दीर्घ आणि अभ्यासू प्रतिसाद इथे टप्प्याटप्प्याने देत आहे.

 आपण नेहमीच माझ्या परखड मताचा आदर करता. म्हणूनच ते इथे देतो. लेख अपुरा वाटला. एखाद्या पी. एच. डी. करणार्‍या विद्यार्थ्याने लिटरेचर रिव्ह्यूच नीट केला नसावा तसे झाले आहे. एकूण ३-४ प्रतिसाद लिहिण्याचा विचार आहे.

पहिल्याने एक दोन चुका झाल्यात ते सांगतो.

दिल जो न कह सका’ (भीगी रात),- हे गाणे साहिरचे नाही. हे अफलातून सुंदर गीत मजरूह ने लिहिले आहे. संगीतकार रोशनमुळे अनेकांचा असा गोंधळ होतो.

हम दर्द के मारों का’ (दाग) – हे गाणे हसरत जयपुरींनी लिहिले आहे. साहिरने नाही. हे गाणे जुन्या “दाग” मधले आहे – गीतकार – शैलेंद्र – हसरत. साहिरने गाणी लिहिलेला “दाग” नवीन आहे.

आणखी कुठली गाणी हवी होती ते प्रथम लिहितो.

१. तुम न जाने किस जहाँ में खो गये – सजा
२. तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले – बाजी
३. चांद मध्यम है आसमाँ चुप है नींद की गोद में ये जहाँ चुप है – रेल्वे प्लॅटफॉर्म
४. बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाये बंजारा – रेल्वे प्लॅटफॉर्म
५. बहार आयी खिली कलियाँ हँसे तारे चले आओ – अलिफ़ लैला (संगीतकार श्यामसुंदर)
६. पिघला है सोना दूर गगन में फैल रहे है श्याम के साये – जाल
७. ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिल की दास्ताँ – जाल
८. वो देखे तो उनकी इनायत ना देखे तो रोना क्या, जो दिल गैर का हो उस दिल का होना क्या और न होना क्या – फंटुश (दुखी मन मेरे – अगदीच सुमार आहे यापुढे)
९. फैली हुई है सपनों की बाहे आजा चल दे कहीं दूर वहीं मेरी मंज़िल वही तेरी राहे – घर नं ४४ (अति सुंदर गीत)
१०. साजन बिन नींद न आए बिरह सतावे – मुनीमजी (यात शैलेंद्र व साहिर दोघांची गाणी आहेत आणि हे गाणे शैलीवरून हे शैलेंद्रने लिहिले असावे असा माझा ठाम समज आहे. पण ऑफिशियली साहिरने लिहिले आहे)
११. जीवन के सफर मे राही – मुनीमजी
१२. सुरमयी रात ढलती जाती है रूह गम से पिघलती जाती है, अब तेरा इंतजार कौन करे – जोरू का भाई (तलत, संगीतकार – जयदेव)
१३.सुबह का इंतजार कौन करे – जोरू का भाई (लता)
१४. इंतजार और अभी और अभी और अभी – चार दिल चार राहे (लता, संगीतकार अनिल बिस्वास)
१५. कभी तो सुध लेता जा मोरे बलमा – चार दिल चार राहे (मीना कपूर)
१६. मुहब्बत तर्क की मैने गरेबाँ सी लिया मैने – दो राहा (संगीतकार – अनिल बिस्वास)अनेकांच्या मते हे तलत चे सर्वोत्कृष्ट गीत आहे.
१६. कश्ती का खामोश सफ़र है शाम भी है तनहाई भी दूर किनारे पर बजती है लहरोंकी शहनाई भी आज मुझे कुछ कहना है – गर्ल फ़्रेंड (संगीतकार – हेमंतकुमार)
१७. उम्र हुई तुम से मिले फिर भी जाने क्यूँ ऐसे लगे जैसे पहली बार मिले हम – बहुरानी (संगीतकार – सी. रामचंद्र)
१८. आसमाँ पे है खुदा और जमीं पे हम आजकल वो इस तरफ़ देखता है कम – फिर सुबह होगी
१९. फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझ को – फिर सुबह होगी
२०. दो कलियाँ बचपन की – फिर सुबह होगी
२१. वो सुबह कभी तो आएगी – फिर सुबह होगी
२२. जो “बोर” करे यार को उस प्यारसे तौबा – फिर सुबह होगी (एक धमाल विनोदी कव्वाली)
२३. तुम चली जाओगी परछाईयाँ रह जाएगी कुछ ना कुछ हुस्न की रानाईयाँ रह जाएगी – शगुन
२४. तुम अपना रंजो गम – शगुन
२५. बुझा दिये है खुद अपने हाथो मुहब्बतों के दिये जला के – शगुन
२६. जिंदगी जुल्म सही जब्र सही गम ही दिल की परियाद सही रूह का मातम ही सही… हम ने हर हाल में जीने की कसम खायी है – शगुन
२७. पर्वतोंके पेडों पर शाम का बसेरा है – शगुन
२८. ये पर्बतोंके दायरे ये शाम का धुआँ ऐसे में क्यूँ न छेड दे दिलों की दास्ताँ – वासना (संगीतकार चित्रगुप्त)
२९. अश्कोंमें जो पाया है वो गीतोंमें दिया है उस पर भी सुना है के जमाने को गिला है – चाँदी की दीवार
३०. अब कोई गुलशन ना उजडे अब वतन आज़ाद है – मुझे जीने दो
३१. रात भी है कुछ भीगी भीगी चाँद भी है कुछ मध्यम मध्यम – मुझे जीने दो
३२. नदी नाले न जाओ श्याम तोरे पैया पडूं – मुझे जीने दो
३३. माँग में भर ले रंग सखी री आँचल भर दे तारे मीलन रितु आ गयी- मुझे जीने दो
३४.यहाँ तो हर चीज बिकती है बाबुजी तुम क्या क्या खरीदोगे – साधना
३५. मितवा, मितवा, लागी रे कैसी ये अनबुझ आग – देवदास
३६. किस को खबर थी ऐसे भी दिन आएंगे – देवदास
३७. आन मिलो आन मिलो श्याम साँवरे – देवदास
३८. मैने चाँद और सितारोंकी तमन्ना की थी मुझ को रातोंकी सियाही के सिवा कुछ ना मिला – चंद्रकांता (संगीतकार – एन. दत्ता)
३९. जब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग – दाग
४०.मायूस तो हूँ वादेसे तेरे, मैं अपने खयालोंके सदपे तू पास नहीं और पास भी है – बरसात की रात (या चित्रपटातील माझे अत्यंत आवडीचे गाणे)
४१. मैंने शायद तुम्हे पहले भी कहीं देखा है – बरसात की रात
४२. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात
४३. गरजत बरसत सावन आयो रे – बरसात की रात (साधारण अशाच मुखड्याचे गीत रोशनच्या “मल्हार” मध्ये लताने गायले आहे. “गरजत बरसत भीगत आईलो” ती पारंपारिक रचना आहे, मला ती जास्त आवडते)
४४. ऐसी खुशी लेके आया चाँद – बरसात की रात
४५. मेरे साथी खाली जाम, तुम आबाद घरोंके वासी मैं आवारा बदनाम – दूज का चाँद (रोशन)
४६. गीत मेरा सुलाए जगाए तुझे प्यार के पालने में झुलाए तुझे – सुरत और सीरत ( या चित्रपटात हे एकच गीत साहिरचे आहे, बाकी सर्व शैलेन्द्रची, संगीतकार – रोशन)
४७. निगाहें मिलाने को जी चाहता है – दिल ही तो है
४८. तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नहीं – दिल ही तो है
४९. तुम्हारी मस्त नज़र गर इस कदर नही होती – दिल ही तो है
५०. संसारसे भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे – चित्रलेखा
५१. छा गये बादल नील गगन पर घुल गया कजरा साँझ ढले – चित्रलेखा
५२. कहे तरसाए जियरा – चित्रलेखा
५३ मन रे तू काहे न धीर धरे – चित्रलेखा

यापैकी प्रत्येक गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. पण आपण म्हटल्याप्रमाणे फक्त गाणे लिहून सलाम करावा हेच उत्तम.

कवी गीतकार २: साहिर

April 21, 2007

सकारात्मक दृष्टीकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, म्हणजे काय? तर एका तरुणीला तणावाखाली असताना नखे कुरतडण्याची सवय होती. ती जावी म्हणून कुणीतरी तिला योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी तिच्या बोटांची न कुरतडलेली नखे पाहून कुणीतरी विचारले की आता ती तुझी सवय गेलेली दिसतेय. त्यावर उदासवाणे हसून ते तरुणी म्हणाली की नाही, पण योग शिकायला लागल्यापासून आता मी पायाची नखे कुरतडते!

विनोद सोडा, पण साहिर लुधियानवी या गुणी गीतकाराच्या बाबतीत आपल्याला असेच काहीसे म्हणता येईल. साहिरच्या स्वभावात त्याच्या  वडीलांचे सरंजामी वर्तन (निदा फाजलींच्या शब्दांत ‘फ्यूडल रवैय्या’ (रवैया – काय शब्द आहे!)) आणि  त्याच्या आईला त्यांनी दिलेली कनिष्ठ वागणूक यामुळे एक कडवटपणा आणि प्रस्थापितांविरुद्ध बंडाची भावना जन्माला आलेली दिसते. लहानपणीच्या अशा घटनांनी मन करपले जाणे ही काही चांगली गोष्ट नाही, पण यात चांगले बघायचेच झाले तर त्यामुळे साहिरच्या उत्तमोत्तम क्रांतिकारी रचना आपल्याला वाचायला मिळाल्या. स्त्रीचे पुरुषाकडून होणारे शोषण यावर साहिरने लिहिलेल्या या ओळी आजही अंगावर शहारा आणतात….

औरत ने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उसे बाजार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया

औरत म्हणजे काय? तर एक ऐयाशीची चीज! आणि चीज म्हटले की तिला विकता आणि विकत घेता येते! साहिर म्हणतो…

तुलती है कहीं दीनारोंमें, बिकती है कहीं बाजारोंमें
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारोंमें
ये वो बेईज्जत चीज है जो, बट जाती है इज्जतदारोंमें

राजपूत स्त्रियांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी केलेलेया अग्निप्रवेशाचे आपल्याला केवढे कौतुक! पतीच्या चितेवर सती जाणाऱ्या स्त्रीला आपण केवढे महान करुन ठेवले आहे! पण या जिवंत जळण्यातली वेदना कोण लक्षात घेतो?

औरत के जिंदा जलने पर, कुर्बानी और बलिदान कहा
इस्मत के बदले रोटी दी और उसको भी अहसान कहा

(इस्मत म्हणजे अब्रू – धन्यवाद चित्त!)

आणि ही सगळ्या श्रद्धा चुरगाळून टाकणारी, मनाला खोल  भेगा पाडणारी ओळ.. कसली नाती घेऊन बसलात? जगात खरं नातं एकच! पुरुष आणि स्त्री… नर आणि मादी.. माणूस आणि पशु यात काय फरक आहे?

औरत संसार की किस्मत है, फिर भी तकदीर की हेटी है
अवतार पयंबर जनती है, फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो, बेटोंकी सेजपे लेटी है     (साधना)

म्हणूनच का कुणास ठाऊक, साहिरच्या गीतांमधला दर्द इतर भावनांपेक्षा अधिक प्रभावीपणे उमटलेला दिसतो. अर्थात असे लिहिणे म्हणजे साहिरच्या उत्तुंग प्रतिभेवर अन्याय करण्यासारखे आहे.

इतनी हसीन इतनी जवां रात क्या करें
जागे है कुछ अजीब से जजबात क्या करें
सासों में घुल रही है किसी सास की महक
दामन को छू रहा है कोई हाथ क्या करें     (आज और कल)

ही रफीच्या आवाजाने चार चांद लावलेली बेचैनी असो किंवा

 तुझमें जो लोच है तेरी तहरीर में नही
जो बात तुझमें है तेरी तसवीर में नही     (ताज महल)

ही पुन्हा रफीच्या आवाजातलीच नक्षीदार नजाकत असो, तिथे साहिरच्या लेखणीची आपली एक छाप आहेच, पण

हम गमजदा हैं लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम

हे बाकी साहिरचे खास स्वतःचे वाटते!

मैं दूं भी तो क्या दूं ऐ शोख नजारों
ले दे के मेरे पास कुछ आंसू हैं कुछ आहें

असो किंवा

इसको ही जीना कहते है तो यूंही जी लेंगे
उफ न करेंगे लब सी लेंगे आंसू पी लेंगे
गम से अब घबराना कैसा गम सौ बार मिला   (प्यासा)

यातला दु:खाच्या अतीव टोचणीतून आलेला कोडगेपणा असो, तिथे साहिर निखाऱ्यासारखा फुलून आलेला दिसतो. ‘प्यासा’ त साहिर

सनसनाहट सी हुई
थरथराट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी  

किंवा

मोहे अपना बना लो
मेरी बांह पकड
मैं हूं जनम जनम की दासी
मेरी प्यास बुझा दो, मनहर गिरिधर
मैं हूं अंतर्घट तक प्यासी
प्रेम सुधा इतनी बरसा दो
की जग जल थल हो जाये    

किंवा

हम आप के कदमों पर गिर जायेंगे रश खा कर
इस पर भी हम अपने आंचल की हवा दे तो 

अशा तरल ओळीही लिहितो आणि

ये पुरपेच गलियां, ये बदनाम बाजार
ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झनाकार
ये इसमत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है

ये सदियों से बेखौफ सहमी सी गलियां
ये मसली हुई अधखिली जर्द कलियां
ये बिकती हुई खोखली रंगरलियां
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है   

अशा दुभंगून टाकणाऱ्या ओळीही. यातल्या ‘मसली हुई अधखिली जर्द कलियां’ ने तर मनावर एक न पुसला जाणारा चरचरीत डाग पडतो! ‘जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामनेसे हटा दो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया….’ हे आक्रंदणारे कविमन ‘प्यासा’ ला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

एकीकडे ते तसे तर दुसरीकडे तलतच्या स्वर्गीय आवाजात साहिरच्या अर्थवाही ओळी आहेत…
कही ऐसा न हो पांव मेरे थर्रा जाये
और तेरी मरमरी बाहोंका सहारा न मिले
अश्क बहते रहें खामोशा सियाह रातोंमें
और तेरे रेशमी आंचल का किनारा न मिले    (सोने की चिडिया)

काहीकाही गाण्यांचं नशीबच असं असतं की गाणं ‘हिट’ होण्यासाठी आवश्यक सगळं त्यात असूनही ते म्हणावं तितकं लोकप्रिय होत नाही. ‘तराना’ मधल्या ‘नैन मिले नैन हुए बावरे’ चा मी यापूर्वी असाच उल्लेख केला होता. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ मधलं ‘दिल से मिलाके दिल प्यार कीजिये’ हे असंच एक कमनशिबी गाणं. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ म्हटलं की लगेच ‘ जाये तो जाये कहां’ गुणगुणावसं वाटतं. ते गाणं थोर आहे याबाबत वादच नाही. पण ‘दिल से मिलाके दिल’ काही कमी गोड नाही. ‘शरमाना कैसा, घबराना कैसा, जीने से पहले मर जाना कैसा’  हे साहिरचे शब्द, लताचा शोख आवाज आणि सचिनदांची नटखट रचना.. क्या कहने!

‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने’ मध्ये ‘मैं तुझे दूध ना बक्षूंगी तुझे याद रहे’ असले जळते शब्द लिहिणारा साहिर ‘कभी कभी’ मध्ये शायराबाबतचे काय पण आपणा सर्वांबाबतचे एक निष्टुर पण अपरिहार्य सत्य सांगून जातो…

कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करे क्यूं कोई मुझको याद करे
मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहाँ बरबाद करे     

‘हम दोनो’ मधील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याचा रंग काही वेगळाच आहे. ‘हर फिक्र को धुंए मे उडाता चला गया’ ही एखाद्या चित्रासारखी डोळ्यापुढं उभी रहाणारी कल्पना तर
‘गम और खुषी में फर्क न महसूस हो जहां
मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया ’ इथं युद्धात सगळ्या भावभावना बेचिराख झालेल्या सैनिकाची मनस्थिती! ‘वो सुबह कभी तो आयेगी’ हा दुर्दम्य आशावाद एकीकडं तर
‘जो भी है वो ठीक है जिक्र क्यूं करें
हम ही सब जहान की फिक्र क्यूं करें
जब उसे ही गम नही क्यूं हमें हो गम (फिर सुबह होगी)
ही बेफिकिरी दुसरीकडं! साहिरच्या लेखणीचे हे रंग थक्क करुन टाकतात.’क्या मिलिये ऐसे लोगोंसे जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे’ (इज्जत) असे लोकांच्या दिखाऊपणावर आघात करणारा साहिर ‘ आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू,जो भी है , बस यही इक पल है ’ (वक्त) अशा काव्यमय ओळीही लिहितो आणि ‘दूर रहकर न करो बात करीब आ जाओ, याद रह जायेगी ये रात करीब आ जाओ’(अमानत) असेही. ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ असं साहिर म्हणतो आणि ‘जहां में ऐसा कौन है के जिस को गम मिला नही’ (हम दोनो) हेही साहिरच म्हणतो! ‘के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये’ असं साहिर म्हणतो आणि  ’मैं जानता हूं की तू गैर है मगर यूंही’ (कभी कभी) हेही साहिरच म्हणतो! ‘उनका भी गम है, अपना भी गम है,अब दिल के बचने की उम्मीद कम है एक कश्ती, सौ तूफां, जाये तो जाये कहां..’ (टॅक्सी ड्रायव्हर) लिहिणाराच साहिर ‘ये शोखियां ये बांकपन, जो तुझमें है, कहीं नहीं’ (वक्त) असंही लिहितो!

आणि ज्या काही गाण्यांच्या उल्लेखाशिवाय साहिरवरचा लेख म्हणचे चुन्यावाचून पान ठरेल त्या गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ना तो कारवांकी तलाश है’ ही ‘बरसातकी एक रात’ मधली कव्वाली! त्या कव्वालीविषयी लिहायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती कव्वाली जशीच्या तशी उतरवून काढायची आणि एक सलाम ठोकून बाजूला उभं रहायचं!’मेरे नामुराद जुनून का, है इलाज कोई तो मौत है, जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर की तलाश है’ काय किंवा ‘इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे, कोई लैला किसी दीवार से रोकी ना गयी’ काय… हे साहिरनं कोणत्या कैफात लिहिलं कुणास ठाऊक! ‘धूल का फूल’ मधलं ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हेही माझं अत्यंत आवडतं गाणं. कुणाला ते प्रचारकी थाटाचंही वाटेल. वाटू दे! यातल्या किती लोकांना ‘कुरान न हो  जिसमें वो मंदिर नही तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नही है’ असं लिहिता येईल? यातला साहिरचा प्रस्थापितांविरुद्दचा विखार रफीच्या टिपेल्या पोचलेल्या आवाजात आपल्या आत मृतवत झालेल्या एका माणसाला गदागदा हलवतो…’इन्सानोंके लाशोंसे कफन बेचनेवाले… ये महलोंमें बैठे ये कातिल ये लुटेरे…’ छे!

तलतची जशी वाईट गाणी फारच कमी आहेत तसंच साहिरचंही आहे. करपलेलं बालपण, गरीबी, विफल प्रेम, त्या काळात इस्लाममध्ये न स्वीकारला जाणारा नास्तिक स्वभाव, जवळजवळ गर्वाच्या जवळ जाणारा अत्यंत तीव्र स्वाभिमान आणि उणंपुरं साठ वर्षाचं आयुष्य या सगळ्यात साहिर नावाच्या एका जादुगारानं  जे काय तयार केलं ते अफलातून आहे. मग हे सगळं बघतानाच आपण सैरभैर होऊन जातो. ‘दिल जो न कह सका’ (भीगी रात), ‘जिसे तू कबूल कर ले ’ (देवदास) -त्यातलं ‘मेरी बेबसी है जाहिर, मेरी आहें बेअसरसी’ हे खास- ‘देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से’ (एक महल हो सपनोंका), ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही’ (दिल ही तो है), ‘चीन -ओ -अरब हमारा’ (फिर सुबह होगी), ‘तेरी दुनिया में जीने से’ (हाऊस नं ४४), ‘छू लेने दो’ (काजल), ‘चलो इक बार फिर से’ (गुमराह), ‘हम दर्द के मारों का’ (दाग) अशी एकाहून एक रत्नं आठवत जातात. पारिजातकाच्या झाडाखाली बसलं असताना कुणीतरी ते झाड गदागदा हलवावं तसं सगळं आयुष्यंच नाजूक सुगंधी फुलांनी भरुन जातं!  ते प्रतिभेचं झाड हलवणारा अदृष्य हात असतो साहिर लुधियानवीचा!  

अरे, आपल्याला आपली संस्कृती वगैरे काही आहे की नाही?

April 20, 2007

“बरोबरच आहे, मी तर म्हणतो की अशा लोकांना नंगे करुन चाबकाने फटके हाणले पाहिजेत. अरे, त्या गोऱ्याला एक काही लाजलज्जा नसेल, पण तुमचे हात काय केळी खायला गेले होते काय? तुम्हाला सांगतो, या बायकांच्या हात चार पैसे पडले की या लाजलज्जा कोळून पिणार बघा! मागे तो चार्ल्स का कुणीतरी आला होता तेंव्हा अशीच एक आपली बया त्याच्या गळ्यात पडली होती. हो! ती तर चांगली कोल्हापूरची मराठमोळी पोरगी! आणि आता हे… मग? कर्नाटक काय हिंदुस्थानात नाही? अरे तुम्हाला काय नंगानाच करायचा तो बंद दाराआड करा की! हे परदेशी वारं आपल्या संस्कृतीला उडवून लावेल बघा! सांगून ठेवतो मी! मी? मी काही नाही असलं चालू देत बुवा! घरी पहिल्या दिवसापासून बायकोला बजावून ठेवलंय. नाही…. असशील म्हटलं तू काय ते सॉफ्टवेअर इंजिनियर बिंजीनियर, पण घरात नखरे नाही पायजेत! कुळाचार, सणवार अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजेत. महिन्यातले चार दिवस तुझी शिवाशीवसुद्धा चालणार नाही म्हटलं! तेच पोरीला! परवा कोपऱ्यावर कुठल्या तरी पोराशी बोलत होती. घरी आल्यावर चांगली फोडून काढली! म्हणत होती काहीतरी मित्र आहे चांगला वगैरे… म्हटलं बापाला शिकवू नकोस! त्या मुसलमानाशी मैत्री? असली थेरं चालू दिली तर उद्या कुणाचा तरी हात धरुन पळून जाशील आणि माझ्या तोंडात शेण घालतील लोक! तर तर! अगदी! श्राद्धं, पक्ष, अनंताची पूजा, झालंच तर श्रावणातला सत्यनारायण – काही म्हणजे काही चुकत नाही! सत्यनारायणाचा प्रसाद तर पायलीच्या हिशेबानं करतो आपण! घरातल्या पूजेचा प्रसाद आईकडं पोचवल्याशिवाय पानावर बसत नाही मी! ती? ते यार जरा लफडंच आहे. जरा कटकटीच आहे म्हातारी! दोन वर्षांपासून शेवटी वृद्धाश्रमातच टाकलंय. सांगीन तुला कधीतरी डीटेलमध्ये! बसू एकदा निवांत! तर सांगत काय होतो, अरे तुम्हाला तुमच्या परंपरा, तुमचे संस्कार असलं काही आहे की नाही? कोण रे ती? नेन्यांची वसू वाटतं! आयला, काय भरलीय रे! चान्स घेतला वाटतं कुणीतरी! अरे आणि तुझ्या त्या देशमुखाची बायको बघीतली रे परवा! माल आहे रे माल! कुठं म्हणजे? सिद्धीविनायकाच्या रांगेत उभा होतो तिथंच दिसली. संकष्टी आणि चतुर्थीलापण! पंधरा वर्षात एक खाडा नाही मिस्टर! एकदा तर अंगात दोन ताप होता, पण म्हटलं, कुछ नही! कुठलं काम? अरे ते सचिवालयातलं होय? ते झालं की! आला होता तो चोरडिया परवा. त्याला सागितलं सरळ, म्हटलं भैय्या, साहेबांचे दहा टक्के आणि माझे पाच! तीनवर तोडा म्हणत होता साला.. शेवटी फाईल दाबून ठेवली आठ दिवस आणि झक मारत पाकीट घेऊन आला! आपलं तत्त्वंच आहे बंधो… एक हाथ दो एक हाथ लो! या शनिवारी? नाही जमणार रे! सत्संगाला चाललोय नगरला! अरे दादांची कृपा आहे म्हणून हे दिवस बघतोय!  पण संध्याकाळपर्यंत परत येणार आहे. रात्री चालेल की! कर्नलला सांग, म्हणावं या वेळी दुसरा कुठला ब्रॅंड नको – आर सीच आण! अरे मिलिट्री काय, शेवटी आपल्याच बापाची! बसू माझ्याकडेच! सोमवारपासून बाकी नाही हां… नवरात्र फुल असतं आपल्याकडे! अरे, आपल्याला आपली संस्कृती वगैरे काही आहे की नाही? 

काबुल एक्सप्रेस

April 15, 2007

कबीर खान या दिग्दर्शकाच्या ‘सेहर’ या चित्रपटाविषयी मी पूर्वी लिहिले होते. त्याचाच ‘काबुल एक्सप्रेस’ हा चित्रपट पाहिला. ९/११ या घटनेनंतर अल-कायदा आणि तालिबानची पाळेमुळे उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. त्या कारवाईत पाकिस्तानी सैन्यही सामिल झाले होते. तालिबान हे अमेरिका आणि पाकिस्ताननेच उभे केलेले भूत- पण आता मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक नाही असे म्हणून हात झटकून टाकले. तालिबानच्या उभारणीसाठी पाकिस्तानातून गेलेल्या सैनिकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. या सगळ्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातून वार्ताहर अफगाणिस्तानमध्ये गेले. असेच दोन भारतीय तरुण  आणि एक अमेरिकन वार्ताहर तरुणी, त्यांना काबुलपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतलेला एक अफगाणी ड्रायव्हर आणि या सगळ्यांना ओलीस धरुन पाकिस्तानी सीमेपर्यंत पोचण्याची धडपड करणारा एक पाकिस्तान आर्मीचा ‘तालिब’ यांची ही कथा.

या कथेत नायक-नायिका नाहीत, खलनायकही नाही.(गाणे-बिणे तर नाहीच नाही!) या वार्ताहरांना ओलीस धरणारा तालिबही तसा क्रूर वगैरे नाही. परिस्थितीच्या आणि नियतीच्या अगम्य चक्रात भरडले जाणारे हे अगदी साधे लोक आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्वार्थ यात त्यांची आयुष्ये होरपळून निघालेली आहेत. या साध्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांची ही चटका लावणारी कथा. यातल्या पात्रांच्या बोलण्यातून आजूबाजूच्या परिस्थितीला स्पर्श होत जातो. अफगाणिस्तानमधील भग्न इमारती, उध्वस्त झालेली शहरे आणि त्याबरोबरच ढासळलेले लोक पाहून अंगावर शहारा येतो. काय दोष आहे या लोकांचा? त्यांना ना तर तालिबानशी काही मतलब आहे, ना अमेरिकेशी. का त्यांचा आयुष्याची अशी न संपणारी फरफट सुरु आहे? आणि कधीपर्यंत?

‘काबुल एक्सप्रेस’ अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत नाही. पण तो तुम्हाला मुळापासून हादरवून टाकतो. अफगाणिस्तानच्या पाकिस्तानी सीमेवर अमेरिकन सैनिकांनी पकडून आणलेल्या ‘तालिब’ मध्ये ‘आपले’ किती लोक आहेत या चिंतेने तडफडणारा पाकिस्तानी सैनिक – पण एकही पाकिस्तानी ‘तालिब’ नाही असे सरकारनेच जाहीर केल्याने त्याला तसे सांगताही येत नाही- त्या ‘तालिब’ पैकी पळून जाणाऱ्या एकावर गोळ्या मारतो, पण त्या त्याला लागू नयेत अशा बेताने. न जाणो तो ‘आपला’ असला तर! पण अमेरिकन सैनिकांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. एक अमेरिकन सैनिक सहजपणे गोळी मारुन त्या ‘तालिब’ ला ठार करतो. तो अफगाणी असे, की पाकिस्तानी! युद्धाची ही अपरिहार्य निष्ठुरता आपल्याला स्पर्श करुन जाते. अस्वस्थ करुन जाते.

‘अ गुड क्राफ्टसमन कॅन प्रोड्यूस अ मास्टरपीस विथ इंफिरिअर टूल्स’ हे पटावे अशी कबीर खानची या चित्रपटातली कामगिरी आहे. अर्थात अर्शद वारसी हे काही ‘इंफिरिअर टूल’ नाही – नॉट बाय एनी स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन! पण जॉन अब्राहम या माणसाविषयी बाकी आदर वाटावा असे त्याने आत्तापर्यंत काही केल्याचे स्मरणात नाही.( बिपाशा बसूशी मैत्री सोडून!) पण ‘काबुल एक्सप्रेस’ हा संपूर्ण दिग्दर्शकाचाच चित्रपट आहे. अफगाणिस्तानच्या भग्न अवशेषांमध्ये  व्यायाम करणारा जॉन आणि त्याच्याकडे मान वळवून कुतुहलाने पहाणारा एक अफगाणी छोकरा. तुलाही करायचाय व्यायाम माझ्याबरोबर? ये… जॉन त्याला खुणेनेच बोलावतो. तो छोकरा उठून उभा रहातो. त्याच्या एका पायाच्या जागेवर पोकळी आहे… कुबडीवर रेलून तो जॉनकडे बघतो आणि आपल्या आत कुठेतरी काहीतरी तुटतं..  काबुलच्या त्या खडबडीत रस्त्यावर तालिबच्या हातातल्या रेडिओवर कुठल्यातरी हिंदुस्थानी रेडिओ स्टेशनची खरखर ऐकू येते.. नंतर अस्पष्टपणे काही ओळखीचे सूर ऐकू येतात…
‘मै जिंदगीका साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवेमें उडाता चला गया..’
नकळत हे दोन्ही भारतीय स्वतःशी गुणगुणायला लागतात. हळूच त्यात एक तिसरा सूर मिसळतो. तो असतो त्या ‘तालिब’ चा. तुमची हिंदी गाणी, तुमचे हिंदी चित्रपट.. अहो, आमचंच आहे तेही सगळं… आम्ही तर म्हणतोच की ‘माधुरी दिक्षीत दो, काश्मीर लो…’ मग हा भेसूर चेहऱ्याचा पाकिस्तानी तालिब आपल्याला सरहदीपलीकडचा आपलाच कुणी सगा वाटायला लागतो. गुलजारच्या ‘सरहद…’ ची आठवण येते.. अर्शद तर त्याला शेवटी म्हणतोच, इम्रान साहेब, तुम्ही काही एवढे वाईट नाही आहात. तुम्ही जर तालिब नसतात, तर कदाचित आपण चांगले दोस्तही होऊ शकलो असतो…. एक दीर्घ सुस्कारा टाकून तालिब म्हणतो. ” ते तुम्ही लोक म्हणता ना, तसं… अगले जनममें…” 

‘काबुल एक्सप्रेस’ चे संवाद ‘सेहर’ सारखेच लक्षात रहाणारे आहेत. तालिबने आपले नाव ‘इम्रान खान अफ्रीदी’ म्हणून संगितल्यावर ‘नाव तर जबरदस्त आहे तुमचं… क्रिकेट वगैरे खेळत असालच…’ असं त्याला अर्शद वारसी विचारुन जातो ” तो क्या तुम्हारे मुल्क नें जिसका नाम सचिन होता है वो हर बच्चा बल्लेबाज होता है?” हा तालिबचा प्रश्न त्या वातावरणातही आपल्याला हसवून जातो. ‘मी कोकही पीत नाही आणि पेप्सीही’ असं त्या अमेरिकन तरुणीनं सांगितल्यावर ‘व्हॉट टाईप ऑफ अमेरिकन यू आर?’ हा अगदी नैसर्गिक प्रश्न आणि ‘दी सेन्सिबल टाईप, आय गेस….’ हे तिचं उत्तरही लक्षात रहाण्यासारखं. त्या जीवनमरणाच्या खाईत कपिल देव श्रेष्ठ की इम्रान खान हा अर्शद आणि तालिबचा वाद अगदी आपला वाटणारा.

काल ‘काबुल एक्सप्रेस’ पाहिला. आनंद तर झालाच, पण अस्वस्थही झालो. ‘बिटरस्वीट एक्सपिरिअन्स’ यालाच म्हणत असावेत. अशा प्रकारच्या चित्रपटांचं हे यशच म्हणायला पाहिजे. ‘यशराज फिल्म्स’ सारख्या मोरपंखी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला असा चित्रपट काढावासा वाटला हेही.

दिवाकरांच्या नाट्यछटा

April 4, 2007

१९११ ते १९३१ या काळात दिवाकर यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिल्या.इतक्या वर्षांच्या कालौघात त्या आजही टिकून आहेत. त्यानंतर बाकी बावन्नावी टिकून रहाणारी (बावनकशी) नाट्यछटा कुणी लिहिल्याचे ऐकिवात नाही. दिवाकरांना नाट्यछटा हा प्रकार सुचला तो ब्राऊनिंगच्या ‘मोनोलॉग’ या काव्यप्रकारावरून. ब्राऊनिंगकडून उसने घेतलेले हे बीज त्यांनी अस्सल मराठी बाजाने फुलवले. It does not matter what you borrow, but what you make of your borrowing हे सिद्ध् व्हावे असे. नाट्यछटा म्हणजे नाटकाची संक्षिप्त आवृती नव्हे, स्वगतासारखे एकांगी संभाषणही नव्हे. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दांत एखाद्या प्रासंगिक वर्णनातून अधिक व्यापक सूत्र समोर मांडणारा एक स्वतंत्र साहित्यप्रकार. नाट्यछटेत वापरली जाणारी विरामचिन्हे, बोलीभाषेतले शब्द, तात्कालिन संदर्भ, मधूनमधून घेतले पॉजेस यातून एक मोठे चित्र उभे रहाते.
दिवाकरांनी हा प्रकार आपल्या अभिव्यक्तीसाठी का निवडला असावा? मला समजते त्यानुसार दिवाकर हे अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कमालीचे संवेदनशील होते. त्या काळातील इतर साहित्यप्रकारांचा विचार केला तर त्यांत त्या वेळी एक साचेबंदपणा, तोचतोचपणा आलेला असावा – अपवाद अर्थात केशवसुतांचा- त्या काळात वर्डस्वर्थ्, शेली, कीट्स् वगैरे कवींच्या वाचनाने दिवाकरांना लिखाणाच्या या नवीन प्रकाराची निर्मिती करण्याची स्फूर्ती मिळाली असावी. त्याआधी त्यांनी शेक्स्पिअरच्या नाटकांवर आधारित काही नाटके लिहिण्याचा प्रयत्नही केला होता. तो मात्र काही सफल झाला नाही. स्वभावाने अबोल आणि भिडस्त असणार्‍या दिवाकरांना आपले अंतरंग, त्यातली सुखदु:खे – म्हणजे सुखे कमी, दु:खेच जास्त – व्यक्त करण्यासाठी नाट्यछटेचा जिवंतपणा आणि त्यातली किंचित सांकेतिकता अधिक भावली असावी.
दिवाकरांच्या नाट्यछटा समजून घ्यायच्या म्हणजे त्या काळातली स्थिती समजून घ्यायला हवी. एका बाजूला परकीय साम्राज्यामुळे समजलेले इंग्रजी लेखकांचे विचार आणि त्यामुळे आपल्या समाजातील न्यूनांची होत असलेली जाणीव असावी. दुसरीकडे जानवी, सोवळी, एकादष्ण्या आणि श्रावण्या यात करकचून बांधलेला समाज असावा. एकीकडे बालविवाह आणि बालविधवा, केशवपन आणि विधवांचे सर्व प्रकारांने शोषण हे राजरोसपणे चाललेले असावे, तर दुसरीकडे बाळंतरोगाने तान्ह्याला जन्म देऊन मरणारी तरुण आई आणि इन्फ्लुएंझा ते प्लेगाने पटापट मरणारी माणसे असावीत, असे हे कोणत्याही संवेदनशील माणसाला कमालीचे अस्वस्थ करणारे विसंवादी सामाजिक वातावरण असावे. या सगळ्यातून दिवाकर तरले ते केवळ वाचनामुळे. या अफाट वाचनातूनच त्यांना लेखनाची स्फूर्ती मिळाली असावी. नाट्यसंवाद हा नाट्यप्रसंगांसारखा प्रकार त्यांनी हाताळल्याचे दिसते. ‘कारकून’ हे नाटक आणि ‘सगळेच आपण ह्यः ह्यः’, ‘ऐट करू नकोस!’ या नाटिका त्यांनी लिहिल्याची माहिती आहे. मेटरलिंकच्या ‘ द साइटलेस’ या नाट्यकृतीचे त्यांनी भाषांतर केल्याचीही माहिती आहे,आज हे सगळे कुठे आहे कोण जाणे!
दिवाकर हे इंग्रजीचे उत्तम शिक्षक होते. शिक्षक म्हटल्यावर त्याचा व्यासंग असलाच पाहिजे अशा जुन्या विचारसरणीचे हे लोक. ऑस्कर वाइल्ड, पुशकिन, पिनिअरो, गॉर्की वगैरे लेखकांचे साहित्यही दिवाकरांनी वाचल्याचे उल्लेख आहेत. रविकिरण मंडळाचेहही ते सदस्य होते. दिवाकरांच्या नाट्यछटा ‘उद्यान’ मासिकात आणि ‘ज्ञानप्रकाशा’त छटेमागे एक रुपया या मानधनाने प्रसिद्ध झाल्या. शेवटी दिवाकरांनी काही भावकथाही लिहिल्या. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी इन्फ्लुएंझाने दिवाकर मरण पावले.
आता थोडेसे ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’ या नाट्यछटेविषयी. या कथेला संदर्भ आहे तो रमाबाई रानडे यांच्या मृत्यूचा. पण तोही केवळ संदर्भ म्हणून. या छटेच्या निमित्ताने दिवाकर माणसाच्या दुटप्पी स्वभावावर, दिखाऊपणावर नेमके बोट ठेवतात.”चला! मोठी एक कर्तीसवरती बाई गेली!” असे म्हणून रमाबाईंच्या मोठेपणाचे गळे काढणारे हे प्राध्यापकमहोदय त्यांच्या अंत्यदर्शनाला जायचा विषय काढतात, पण त्यातला त्यांचा हेतू वेगळाच आहे. मृतांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या तथाकथित प्रतिष्ठित माणसांची – बव्हंशी प्राध्यापकांची – यादी ‘ज्ञानप्रकाशा’त प्रसिद्ध् होत असे. या निमित्ताने का होईना, आपले नाव या वर्तमानपत्रात छापून यावे अशी ती प्रसिद्धीची लालसा आहे. ‘पेज थ्री’ या सिनेमात सोनी राजदानने आत्महत्या केल्याचा निरोप येतो तेंव्हा डॉली ठाकूर कपड्यांची खरेदी करत असते. आता अंत्यदर्शनाला जावे लागणार, मग तिथे नवे कपडे नकोत का असा तात्काळ थेट रोख विचार करून ती त्या विक्रेत्याला ‘शो मी समथिंग इन व्हाईट’ असे निर्विकारपणे सांगते – तेच हे माणसात लपलेले गिधाड! “मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा!” यात त्याचा हिडीस चेहरा दिसतो, पण पुढे “कारण आता गेले काय अन् न गेले काय सारखेच!” अशी फिलॉसॉफिकल सारवासारव केल्याने तो अधिकच बेगडी आणि भेसूर दिसू लागतो! ‘प्यासा’ मध्ये जिवंत असताना ज्या भावाला हिडीसफिडीस केली त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कवितेच्या रॉयल्टीच्या रकमेवर घासाघीस करणारे त्याचे भाऊ याच वैश्विक कुटुंबातले!
अडीचएकशे शब्दांच्या दिवाकरांच्या या नाट्यछटेत हे इतके सगळे लपलेले आहे. संभाषण सुरु आहे असे वाटावे अशी भाषा हे तर नाट्यछटेचे वैशिष्ट्यच असते. “…हो, बरोबर….” अशी सुरुवात, “-केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास?” असा प्रश्न. “….बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा!” अशी वाक्ये, यांनी या छटेला एक ‘परफॉर्मिंग क्वालिटी आली आहे. असे वाटते, की हा माणूस समोर आहे, बोलतो आहे!
नुसत्या संवादांतून स्वभाव आणि प्रसंग रेखाटन हे चांगल्या नाट्यछटेचे गमक आहे. दिवाकरांना ते इथे उत्तम रीत्या साधले आहे ‘तेवढेच ‘ज्ञानप्रकाशा’ त!’ मला दिवाकरांच्या सर्वोत्तम छटांपैकी एक वाटते ती त्यामुळेच.

तेवढेच ‘ज्ञानप्रकाशां’ त

“… हो, बरोबर, दोनदा आपल्याकडे येऊन गेलो मी. – नाही, काल नाही, संध्याकाळी आलो होतो ते परवा आणि सकाळचे जे म्हणता ती कालची गोष्ट. असो, गाठ पडली. चला. – हो ते विचारणारच होतो, की शेजारी एवढी गडबड कसली? सारख्या मोटारी अन् गाड्या येताहेत! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे! – केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास? – नाही बोवा, तुम्ही सांगेपर्यंत वार्तासुद्धा नव्हती याची मला! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जात-येत नाहीत, येवढे ठाऊक होते! पण इतक्यात काही होईलसे.. बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा! …साठ का हो! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या!..असो.चला! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली! पेशवाईनंतर महाराष्ट्रात इतक्या योग्यतेची मला नाही वाटत दुसरी कोणी असेलशी! खरे आहे.अगदी खरे आहे! मनुष्य आपल्यामध्ये असते, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते! – स्वभावाने ना? वा! फारच छान! अतिशय मनमिळाऊ आणि शांत! कटकट म्हणून नाही! – हळूहळू, थोडं थोडं , पण खरोखर मोठं कार्य केलं! अन् फारसा गाजावाजा न करता! – आधीच थोरामोठ्यातली ती! अन् रावसाहेबांचे वळण! मग काय विचारता! – बोलणे काय, चालणे काय आणि – हो! लिहिणेसुद्धा – तेच म्हणतो मी – की ‘आठवणी’ कशा नमुनेदार लिहिल्या आहेत! – मराठीत असे पुस्तक नाही आहे! – ते काय विचारायला नको! आज गर्दी म्हणजे – सगळा गाव लोटायचा आता! मोटारी आणि गाड्यांचा चालला आहे धडाका! – काय? खूपच लोटली आहे हो! दर्शनासाठी दिवाणखान्यातच ठेवलेले दिसते आहे त्यांना! चला येत असलात तर… जाऊ म्हणतो! इतकी माणसे जात आहेत तेंव्हा- हो गर्दी तर आहेच्! – राह्यलं. तब्येत बरोबर नसली तर नाही गेले! मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा! कारण आता गेले काय, अन् न गेले काय सारखेच! पण् बोवा ‘अमुक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला!’ तेवढेच ‘ज्ञानप्रकाशा’त….’