Archive for May, 2007

पाय मातीचे! -१

May 31, 2007

“मी, बबनराव तुकाराम अडसूळ,ईश्वराला साक्षी ठेऊन अशी शपथ घेतो की….” राज्यपालांच्या मागोमाग बबनराव मंत्रीपदाच्या शपथीचे शब्द म्हणत होते. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेल्या विश्वासरावांनी आजूबाजूला एक समाधानाची नजर टाकली. बहुतेक नेहमीचे, अपेक्षित चेहरे. नामदेवराव, सोपानआबा, गजाननतात्या, सुभानराव, जगन्नाथबापू…  काही नवीन चेहरे. काही अगदी अनपेक्षितही! आता येती पाच वर्षं यांच्याच भरवशावर गाडा हाकायचा आहे. आता पाच वर्षे हे आपले सहकारी, मित्र आणि कार्यकर्तेही! आता यातले किती बरोबर टिकतात ते बघायचं! राजकारणात कुणी कायमचा मित्र नाही की कुणी कायमचा शत्रू नाही!

शेजारच्या खुर्चीत बसलेल्या आनंदरावांनी झब्ब्याच्या खिशातून रुमाल बाहेर काढला तसा कुठलासा इंपोर्टेड परफ्यूम हवेत दरवळला. जरासा उग्र, किंचित मादक. आनंदराव! विश्वासराव गालात हसले. आजपासून राज्याचे उपमुख्यमंत्री! त्यांचे भडक कपडे, रेबॅनचे  चकचकीत गॉगल, करकरत्या वहाणा! पण सत्ता पाहिजे तर अशा कालपर्यंतच्या विरोधकांना बरोबर घेऊनच चालावं लागणार! निवडणुकीपूर्वी नांदेडच्या सभेत याच आनंदरावांनी त्यांच्यावर केलेली जहरी टीका विश्वासराव विसरले नव्हते. “हा कसला विश्वासराव? हा तर विश्वासघातराव!…”  आणि आता? विश्वासरावांचं हास्य रुंदावलं. राजकारणात हे चालायचंच! ‘बेरजेचं राजकारण’ मिडीयावाल्यांनी त्यांच्या बाबतीत लोकप्रिय केलेला शब्दप्रयोग त्यांना आठवला.”विश्वास, लोकशाहीत डोक्यांच्या संख्येला महत्त्व असतं” दादा त्यांना सांगत असत. ” डोक्याच्या आत मग काही नसलं तरी चालेल!”…तडजोड! तडजोड!  पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज…

क्षणभर विश्वासरावांनी डोळे मिटले. निवडणुकीचा ताण अद्यापि शरीरात आणि मनात ठसठसत होता. साठी आली विश्वासराव! ते मनाशीच म्हणाले. राजकारणात माणसाला दमून चालत नाही. आणि इथं तर आपण स्वतः उभं केलेलं हे विश्व. इतक्या वर्षांनंतर हातात आलेली सत्ता! ज्याची आजवर कामना केली ते मुख्यमंत्रीपद! आपल्या सगळ्याच राजकीय प्रवासाचा पट विश्वासरावांच्या मनात उलगडून गेला. किती झगडा! किती संघर्ष! मनात असो वा नसो, शेवटी हवं ते मिळवण्यासाठी केलेलं राजकारण! विरोधकांना कधी गोंजारुन समजावणं तर कधी चलाखीनं त्यांची राजकीय कारकीर्दच संपवणं. आणि केवळ विरोधकांचाच बळी का? शेवटी तर नाईलाजानं आपल्या राजकीय गुरुचाच… विश्वासराव थोडेसे अस्वस्थ झाले. राजभवनातील दादांच्या छायाचित्रातला  हसरा चेहरा आपल्याकडं उपहासानं बघतोय असं त्यांना वाटलं. पण ते क्षणभरच. सराईत राजकारण्याच्या चपळाईनं त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांचं ते सुप्रसिद्ध स्मितहास्य परत त्यांच्या चेहऱ्यावर आलं. कॅमेरे लखलखत होते. टाळ्यांचा कडकडाट झाला. बबनराव मंत्रीपदाची शपथ संपवून खाली उतरत होते.

पुढचे काही दिवस तर अधिकच धावपळीचे गेले. ‘प्रशासकीय खर्चात काटछाट’ हे निवडणूकपूर्व जाहिरनाम्यातलं आश्वासन पाळण्यासाठी मंत्रीमंडळानं सत्काराची मोजकीच निमंत्रणं स्वीकारावीत अशी सूचना त्यांनी शपथविधीच्या आधीच देऊन ठेवली होती. पण आपल्या मतदार संघातला सत्कार टाळणं त्यांनाही शक्य झालं नाही. कार्यकर्त्यांचा सळसळता जोष, बैलगाडीतून निघालेली खास जंगी मिरवणूक, कासरा हातात घेऊन बसलेले स्वतः उपमुख्यमंत्री आनंदराव टोळपे – पाटील, औक्षण करताना पत्नीच्या कौतुकभरल्या डोळ्यात डोकावून गेलेलं पस्तीस वर्षांचं सहजीवन, अलाबला घेऊन आपल्या कानशिलावर कडाकडा बोटं मोडताना म्हाताऱ्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी, जुन्या घरातला आबांचा कृतार्थ फोटो आणि मग महात्मा गांधी मैदानावर झालेली सत्काराची ती जंगी सभा…. भावनांचं जाहीर प्रदर्शन न करण्याबाबत प्रसिद्ध असलेले विश्वासरावही आतून जरासे हलले. आता लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा, आपण दिलेल्या वचनांची आता करायची पूर्ती, रेंगाळलेली विकासकामे, सुस्त शासकीय यंत्रणा प्रभावी करण्याचं आपलं कित्येक वर्षांचं स्वप्न.. 

मुंबईत परतल्यावर विश्वासराव झपाटल्यासारखे कामाला लागले. निवडणुकींच्या दोनेक महिन्यांच्या काळात एकूणच विकासकामांकडे दुर्लक्ष झालं होतं. ती सगळीच कामं मार्गी लावायची होती. त्यातून आधीच्या सत्ताधारी पक्षानं घेतलेल्या काही संशयास्पद निर्णयांवर पुनर्विचार करायला लागणार होता. विजेचा आणि पाण्याचा प्रश्न तर ऐरणीवर होताच. मेळघाटातलं कुपोषण, विदर्भातल्या आत्महत्त्या, जादा उसाचा प्रश्न, तोंडावर आलेला पावसाळा, मुंबईत पुन्हा डोकं वर काढू लागलेली गुन्हेगारी, पुण्यात नव्यानंच पसरत चाललेलं ड्रग्जचं जाळं, परप्रांतियांचा विरोधकांनी लावून धरलेला मुद्दा… विश्वासरावांना चोवीस तास पुरेनासे झाले….

(क्रमशः)

दोनो जवानी की मस्ती में चूर…

May 14, 2007

‘दोनो जवानी की मस्ती में चूर…’ या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न! ‘दोनो जवानी की मस्ती में चूर तेरा कसूर न मेरा कसूर ना तूने सिग्नल देखा, ना मैने सिग्नल देखा ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा ऍक्सीडेंट हो गया, ऍग्रीमेंट हो गया, पर्मनंट हो गया रब्बा रब्बा’ शब्बीरकुमारचा आवाज म्हणजे क्या कहने! जुन्या काळात रफी का कोणीतरी होऊन गेला म्हणे, पण शब्बीरच्या आवाजाला जी गेहराई आहे ती रफीच्या आवाजात कुठली यायला! या गाण्यात त्याच्या घनघोर आवाजाला आशा भोसलेची साथ आहे (की अनुराधा पौडवाल? पण काय फरक पडतो?), पण खरं सांगायचं तर ती विशोभितच दिसते. पण ते आपण सोडून देऊ. आता या ओळींमधल्या भावसौंदर्याकडे वळू. किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. जवानीची आंधळी करुन टाकणारी धुंदी! त्यात सिग्नलकडे कुठलं लक्ष असायला! सिग्नलचा दिवा लाल असतानाच गाडी पुढं ढकलली आणि व्हायचं तेच झालं! पण या अपघातातून पुढं काय झालं ते पहा. या दोघांच्या प्रेमाचं ऍग्रीमेंटही झालं आणि ते पर्मनंटही झालं! ‘ऍक्सीडेंट, ऍग्रीमेंट आणि पर्मनंट’ यातली यमकाची गोडी काळजाला हात घालून जाते! आता पुढच्या ओळी पाहू.. ‘हम दो अनाडी न देखा अगाडी, न देखा पिछाडी पटरी पे डाल दी ये दिल की गाडी ना तूने बत्ती देखी, ना मैने झंडी देखी ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा…’ प्रेमात पडलेल्याला गाढवाची, खुळ्याची, कशाची वाट्टेल त्याची उपमा दिली जाते. सौंदर्य हे बघणार्‍याचा नजरेत असतं हे इथं कवीनं किती सूचकपणे मांडलं आहे पहा! ‘अगाडी’ आणि ‘पिछाडी’ या शब्दांच्या निवडीतला सूचकपणा पहा! प्रियकराचे किंचित सुटलेले पोट पहा, त्याचे जीनच्या प्यांटीतून बाहेर डोकावणारे टेर पहा, पण तरीही प्रेयसीने प्रेमाच्या पटरीवर दिलची गाडी घातलीच! वा! हृदयाला अगदी भिडून जाणारा प्रकार! त्यातून शब्बीरच्या सुराचा घुमाव! खरंच मंडळी, स्वरांची जादू काही औरच! क्या बात है.. आता पुढे चलू! ‘राहें शबाब थी उम्रे हिजाब थी तू बेनकाब थी मौसम की भी कुछ नीयत खराब थी ना तूने खतरा देखा, ना मैने खतरा देखा ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा…’ ‘मौसम की नीयत खराब’ ही किती ओरिजीनल कल्पना आहे पहा! तुझ्या चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला झाला आणि तुझा पिंपलाळलेला चेहरा दृष्टीस पडला! मग मौसम तर कसा काबूत राहील? वा! क्या बात है! गाणं लिहिलंही उत्तम आहे. त्याचा अर्थ मनाला भिडतो. गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. मंडळी, गाण्याचं ऍरेंजिंग हेदेखील संगीत दिग्दर्शनाइतकंच महत्वाचं असतं तरच चालीचा परिणाम उत्तमरीत्या साधला जाऊ शकतो. एकंदरीतच या गाण्याची भट्टी मस्तच जमली आहे हे निर्विवाद! चला आता पुढे जाऊ! ‘अरे, नुकसान सारा तो भरना पडेगा, ओ भरना पडेगा अब प्यार हमको करना पडेगा ना तूने सीटी मारी ना मैने सीटी मारी ऍक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा…’ ‘नुकसान सारा’ या शब्दांतला श्लेष पहा. ‘सारा’ म्हणजे शेतसारा – जमीनीचा फाळा हा अर्थ आपण ओळखतोच. सारा म्हणजे संपूर्ण. आता हा अपघात तर झाला पण त्याचा दंड आपल्याला भरायला लागणार, कारण ना तो शिट्टी वाजवली, ना मी. आता उरलेलं आयुष्य आपल्याला शिट्ट्या मारतच घालवायला लागणार असं तर कवीला म्हणायचं नसेल? मंडळी हा तर्क कवीनं किती खुबीनं आपल्यावर सोडला आहे ते पहा! हा लेख मी माझा मित्र चंदू भांदिग्रे याला समर्पित करत आहे. छ्या! कधी कधी ही व्यावसायिक लोकं खूप त्रास देतात. चंदू आता पुढच्या महिन्यात सुटेल. अगदी माफक नवसागराचा वापर ही त्याची खासियत होती. त्या साल्या सावंत इन्स्पेक्टरनं खायचे ते हप्ते खाल्ले आणि पहिल्या धारेच्या मालाला काही जागला नाही. दुनिया ही अशी बेईमान आहे मंडळी! का माहीत नाही, पण आज अचानक चंद्याची खूप आठवण झाली. त्याला खरंच आज मी खूप मिस करतोय! त्याची आठवण झाली की मंडळी हातातली स्कॉच कडू लागत नाही हो! शेवटी माणसं जपली पाहिजेत हेच खरं. गाणं तरी माणसाला अजून वेगळं काय शिकवतं?!

‘उपक्रम’ चा पहिला वाढदिवस

May 10, 2007

‘उपक्रम’ च्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी रंगात आली होती. भारतीय बैठकीवर पांढरेशुभ्र पलंगपोस अंथरले होते. मखमलीचे लोड ठेवलेले होते. चांदीच्या दोन उंच समया तेवत होत्या – अर्थातच मंदपणे. कुठल्याशा नवीनच उदबत्तीचा वास रेंगाळला होता. खांसाहेबांचा मालकंस म्हटलं तर समारंभाबरोबर, म्हटलं तर थोडासा अलिप्त, असा वावरत होता. उपक्रमरावांनी फराळाची तयारी जय्यत केली होती. काजूच्या तुकड्यांची आणि बेदाण्यांची सढळ पेरणी केलेले मोतीचुराचे लाडू, खुसखुशीत चकल्या, देशी तुपात तळलेले आणि मऊ पिठीसाखर पेरलेले चिरोटे, फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा, वेगवेगळ्या प्रकारची फळं, मसाला दूध…. कशाची कमी म्हणून नव्हती.

“आपले अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. ” उपक्रमरावांनी चिवड्याचा बकाणा भरताभरता आपले पेटंट वाक्य टाकले. “ललितलेखन, कथा, कविता.. असले काही इथे अपेक्षित नाही.” “छा, कविता नाही म्हणजे विडंबनपण नाही! मग साली काय मजा? ” केशवसुमाराने हातातला चिरोटा खाली ठेवला.

“विडंबने नाहीत? दे टाळी! सुटलो आपण!” ‘आतल्या’ आवाजात सर्किट सन्जोपला. सन्जोप आणि सर्किट फक्त चिवडा आणि चकली खात होते.

 ”पण मी काय म्हणतो उपक्रमशेठ…” विसोबाने मोतीचुराचा लाडू फोडताफोडता सुरुवात केली. “च्यामारी तुम्ही मराठी संकेतस्थळ सुरु करता आणि फोकलिच्यानो तिथे कविता नाही म्हणजे काय? अरे, असला मस्तवालपणा सुरु झाला म्हणून तर साला आपण मनोगतवरुन बाहेर पडलो. नाहीतर मनोगत आजही आपलं फर्स्ट लव्ह आहे यार!”

“चला, इथंही सुरु झालं याचं! “ऐहिक चाणक्यच्या कानात कुजबुजला. “हा एकीकडे ‘आपण फुलं वेचली तिथं साला गोवऱ्या वेचणार नाही’ असलं बकत असतो आणि प्रत्येक दुसऱ्या चर्चेत मनोगत आणि तो फोकलीचा प्रशासक हे आहेच त्याचं…”

“ते तर आहेच रे…” चाणक्याने एक केळे उचलले. ” मला एक सांग, याचा साल्याचा कवितांशी काय संबंध? याच्या कविता म्हणजे काय माहिती आहे ना? ‘तू अमुक, मी तमुक, तू ढमुक, मी समुक’ बरं त्याही आपल्या नाहीत बरं का! कुणीतरी मेलने पाठवलेल्या! आता मला पन्नास मेल येतात रोज अशा. त्या काय सगळ्या इथं देत बसू की काय मी?”

“या रोखठोक सवालाबद्दल मी विसोबाचे अभिनंदन करतो” सर्किट जोरात म्हणाला.सन्जोपने सर्किटकडे चमकून पाहिले.

“हे काय नवीनच?” वरुण आता ऐहिक आणि चाणक्याच्या चर्चेत सहभागी झाला होता. “ही वाट इकडे कशी काय वळली म्हणे?” “काय लेका वरुण्या तू…. ” ऐहिक म्हणाला, “अरे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! तो फोकलीचा प्रशासक घे, ‘संवाद साधण्याची कला’ शिकवणारा घे…”

“शिव्या देणे आणि शिव्या खाणे यातून माणसाला नक्की कसला आनंद मिळत असेल? च्यायला आपल्याला लोक असं काहीबाही बोलले असते तर आपलं तर ब्लडप्रेशर वाढलं असतं राव!” योगेश म्हणाला.

“आवं, विसोबाला काय समदीच श्या देनारी हायत व्हय? हितंबी त्याचा फ्यान क्लब हायच की! आगदी प्राध्यापक, डाक्टर सगळी मंडळी हायत बगा त्यात. आन ब्लडप्रेसरचं म्हनत असाल तर हप्त्याचं ‘साती’ दिस आयुर्वेद रसशाळंच्या ‘मादवी’ त्येलानं डोक्याला मालिस करुन घेतुया म्हनं ह्यो बाबा!” खेडूत म्हणाला.

विसोबाचे लक्ष डाव्या बाजूच्या खिडकीकडे गेले. तो. एकटाच खिडकीतून बाहेर बघत उभा होता. आल्यापासून तो. ना कुणाशी काही बोलला होता, ना त्याने काही खायला घेतले होते.

“अहो, तो‌. शेठ, जरा इकडे मैफिलीत या की राव! एकटेच का उभे आहात?” विसोबांनी नेहमीची मासेमारी सुरु केली.

“तो. मराठी विकिपिडीयाचा सदस्य आहे” तो. न वळताच म्हणाला. “कमळे, कमळे, किती गोड खाशील?” सर्किट म्हणाला.
“अरेच्चा, मग त्यात काय विशेष?”
“तो. मराठी विकिपिडीयाचा सदस्य आहे” तो. पुन्हा म्हणाला. “कमळे, कमळे, किती गोड खाशील?” सर्किट म्हणाला.
“अस्सं, मग मी गमभन वापरतो” चाणक्य चिडून म्हणाला. “आप्पा, तुम्ही फसलात… साखर,साखर, साखर… अरे थांबा, थांबा….” सर्किटला सात्त्विक संताप आला. “असंबद्ध प्रतिसाद आणि विषयांतर या माझ्या कुरणात इतर कुणालाही प्रवेश नाही याची कृपया नोंद घ्यावी…”
“मी…. बोलू का जरा?” एक अगदी हळुवार आवाज आला. “इथे प्रामुख्याने माहितीची देवाणघेवाण होणे अपेक्षित आहे ना? मग माझ्याजवळ ही माहिती आहे पहा…”
“कोण रे हा?” निनादने योगेशला विचारले. “काही कल्पना नाही बुवा…”
त्या अनोळखी माणसाचे मृदू बोलणे सुरु होते. “एक उपक्रमी चार दिवसांत एक चर्चाविषय लिहितो. त्याला पुढील दोन दिवसांत चार अर्थपूर्ण आणि सत्तावीस निरर्थक प्रतिसाद येतात. तिसऱ्या दिवशी त्यातील तेरा प्रतिसाद उडवले जातात. चौथ्या दिवशी त्यातील दोन प्रतिसादांचे स्वतंत्र चर्चाविषयांत रुपांतर होते. पाचव्या दिवशी मूळ चर्चाविषयाला दुसरे तीन प्रतिसाद येतात आणि पहिल्या दोन दिवसांत आलेल्या प्रतिसादांपैकी सहा प्रतिसादांना प्रत्येकी एक उपप्रतिसाद येतो, तर
१. एका महिन्यात मूळ चर्चाप्रस्तावाला किती प्रतिसाद आणि उपप्रतिसाद येतील?
२. या कोड्यातील कोणता विदा अत्यंत आवश्यक आणि कोणता अत्यंत अनावश्यक आहे? हे कोडे तोंडी सोडवावे.लेखी आकडेमोड आवश्यक नाही…”
“हां.. हा तर आपला यनावाला” वरुणने बरोब्बर ओळखले.
“काय रावशेठ, जमतंय का?” विसोबा.
“तात्या, एकच उत्तर जमतंय बघ..”
“कोणतं?”
“हे कोडंच अनावश्यक आहे!”
तेवढ्यात चित्तरंजन, कुमार जावडेकर आणि मिलिंद फणसे आत येताना दिसले. “काय चित्तोबा, ही काय येण्याची वेळ झाली का? वाजले किती?” केशवसुमाराने त्यांना दारातच धरले.
“जाऊ दे रे…” खिरे मध्ये पडला ” एक तर बिचाऱ्यांना गजला पाडतापाडता नाकी नऊ येत असतील. त्यातून आपला व्यवसाय सांभाळून हे सगळं करायचं..”
“व्यवसाय? कसला व्यवसाय?”
“म्हणजे? या तीघांचा रियल इस्टेट कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे ना पार्टनरशिपमध्ये?”
“तुला कुणी सांगितलं?”
“सांगितलं नाही बुवा कुणी, पण हे सारखे एकमेकाला म्हणत असतात ना की जमीन चांगली आहे, ही जमीन तुला दिली, म्हणून मला वाटलं बुवा तसं!”
अत्त्यानंदबुवा चित्तच्या स्वागताला सरसावले होते. “चित्तरंजन, ते फार्शीचं बाकी झकास काढलंस हां तू! आता मीही मराठीत फार्शीतून आलेल्या काही शब्दांचा उगम शोधून काढणारे. आता हे शब्द बघ.थातुरमातुर. हा शब्द फार्शीतून आला असेल की नाही? दुसरा बघ – गोलगप्पा. किंवा हुमदांडगा. मला तर असं वाटतं चित्त, ‘सुक्काळीच्या’ या शब्दाचा उगम देखील मूळ फार्शीच असणार!” चित्त कोलमडायच्या बेताला आला होता. तेवढ्यात पुन्हा एकदा सर्कितचा उंच आवाज ऐकू आला ” समजा मनोगत हे संकेतस्थळ उपक्रम या संकेतस्थळाने १६० कोटी डॉलर्सना विकत घेतले. नंतर समजा उपक्रम हे संकेतस्थळ मायबोली या संकेतस्थळाने ४२३ कोटी डॉलर्सना विकत घेतले. नंतर समजा मायबोली हे संकेतस्थळ माझे शब्द या संकेतस्थळाने ६५८ कोटी डॉलर्सना विकत घेतले. नंतर समजा मायबोली हे संकेतस्थळ पुन्हा मनोगतनेच १०४२ कोटी डॉलर्सना विकत घेतले. आणि समजा या सगळ्या फेरफाराचा कार्यक्रम सुरु असताना या सर्व संकेतस्थळांवर होणाऱ्या सदस्यांच्या वर्दळीचा विदा माझ्या संगणकावर आपोआप उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली तर अ) मला नक्की किती रिकामा वेळ आहे असे तुम्हाला वाटते?
ब) मी मॅक वापरणे बंद करुन परत विंडोज वापरायला लागावे असे तुम्हाला का वाटते?
क) तुम्ही उपक्रमवर का येता?”
“तुझं तुणतुणं जरा थांबवशील का सरक्या?” आता धोंडोपंत मैदानात उतरला होता ” एक तर आमच्या कोकणातल्या सुपाऱ्या हल्ली पूर्वीइतक्या प्राणघातक राहिलेल्या नाहीत. त्याचा आमच्या फलज्योतिषाच्या तंत्राने विचार करता खालील गोष्टी स्पष्ट होतात २७.४.२००६ पासून मकरेने कमरेवर घेतलेला गुरु आता लघु होऊन आता शेन वॉर्नच्या फ्लिपरप्रमाणे उलटा फिरला आहे. त्यामुळे आजवर वृषभ राशीच्या लोकांना असणारे त्रास – उदा. रात्री जास्त झाल्यास सकाळी डोके दुखणे, चष्मा न घातल्यास अस्पष्ट दिसणे, मळमळल्यासारखे होत असल्यास उलटी होणे आता कमी होतील किंवा त्यांची आतापर्यंत सवय झालेली असल्याने त्याचे काही वाटणार नाही. मग असं असूनही ‘आम्हाला येथे भेट द्या’ असे लिहूनही कुणी काळे कुत्रेही तिकडे का फिरकत नाही?
“तोंड सांभाळून धोंडोपंत. सरक्या कुणाला म्हणतोस?”
“हे बघा, अशी हमरीतुमरी नको. ऐच्छिक अपत्यहीनतेविषयी चर्चा करुया का आपण?”
“पर्यावरणाचं काय ते बोला आधी…”
“बाबुजी एकदा मला काय म्हणाले…”
“जय भोलेनाथ!”
“साहिरच्या गाण्याचा दुसरा टप्पा…”
“लैंगिक शिक्षणसुद्धा बरं का…”
“हा वेलणकर म्हणजे तुला सांगतो..”
“अरे, पुरे रे तुमचं!”
“चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं..”
तेवढ्यात कुणीतरी दार गच्च ओढून घेतले!

साहिर- श्री. विनायक यांचा प्रतिसाद – ६

May 3, 2007

पहिला किस्सा आहे तो साहिरला कॉलेज का सोडावे लागले याबद्दलचा. साहिर लुधियानाच्या सरकारी कॉलेजचा विद्यार्थी. त्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या आज ६० – ६५ वर्षे वय असलेल्या लोकांकडून समजलेली हकीकत अशी. साहिरचे एका मुलीवर प्रेम होते. ते साहिरने तिच्याकडे व्यक्त केले. मुलीचे वडील श्रीमंत असल्याने प्रिन्सिपॉलने साहिरला बोलावून समज दिली. पुन्हा साहिरने तिची छेड काढल्यावर साहिरला प्रिन्सिपॉलने पुन्हा असे करशील तर कॉलेजमधून काढू शी धमकी दिली. त्यावेळी ती मुलगी विजयी मुद्रेने साहिरकडे पाहत होती. साहिरने तिथल्या तिथे उत्तर दिले ” फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला, देखिये आपने फिर प्यारसे देखा मुझे”. त्यानंतर साहिरला कॉलेजातून काढून टाकण्यात आले.

दुसरा किस्सा साहिब बिबी और गुलाम कसा हातातून गेला त्याबद्दलचा. ” प्यासा”नंतर साहिरचे बर्मनदादांशी भांडण झाले. गुरूदत्तने कैफ़ी आज़मी – शैलेंद्र याना घेऊन “कागज़ के फूल” काढला (हो, त्या चित्रपटात शैलेंद्रचेही एक गाणे आहे, अर्थात तितके खास नाहीये). तो म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. त्यामुळे “साहिब बिबी और गुलाम” साठी पुन्हा एकदा साहिर- बर्मनदादा यांना घेऊन काम करावे असा विचार केला. दोघे एकमेकांबरोबर काम करायला तयार होईनात. शेवटी साहिरसाठी गुरूदत्तने बर्मनदादांना बदलून हेमंतकुमारला घेतले.  साहिर गाणी घेऊन येईल म्हणून गुरूदत्त – हेमंतकुमार यांनी महिनोनमहिने वाट पाहिली. पण साहिरची प्रतिभा आटली म्हणा किंवा इतर काही कारण असेल,  तो गाणे लिहीचना. शेवटी कंटाळून गुरूदत्तने शकीलला बोलावणे पाठवले. शकील गुरूदत्तच्या ऑफिसमध्ये आला नेमका त्याच वेळी साहिर गाणे घेऊन गुरूदत्तचा सहाय्यक अब्रार अल्वीच्या ऑफिसमध्ये आला. अल्वीने गुरूदत्तला फोन करून साहिर आल्याचे सांगितले. तेव्हा गुरूदत्तने साहिरला परत पाठव, मी शकीलशी शेवटची बोलणी केली आहेत असे सांगितले. याच गुरूदत्तने “प्यासा” च्या मुख्य भूमिकेसाठी निवडलेला दिलीपकुमार चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी उशीरा आल्याकारणाने त्याला हाकलून दिले होते व शेवटी ती भूमिका स्वतः करण्याचा निर्णय घेतला होता.

तिसरी आठवण आहे ती गीतकार जावेद अख्तर साहिरवर एक कार्यक्रम दूरदर्शनवर करत होते तेव्हाची. साहिरच्या बहिणी, तसेच इतर काही मान्यवर व्यक्ती यांच्या मुलाखती झाल्या. गीतकार मजरूह यांच्याशीही थोडीशी बातचीत झाली. “साहिरका गाना याने क्या, किताबसे कोई गज़ल या नज्म उठाई, एक दो लब्ज इधर उधर किये, तो हो गया इनका गाना” अशा शब्दात मजरूह यांनी तोफ डागली. जावेद अख्तर यांनी अत्यंत घाईघाईने “शुक्रिया मजरूह साब, आपसे फिरसे बातचीत करेंगे” म्हणून ती बातचीत आवरती घेतली. कठोर वाटले तरी मजरूह यांचे निरीक्षण अचूक आहे. पुस्तकातून “चलो इक बार फिर से अजनबी बन जाये”, “प्यार पर बस तो नहीं है मेरा”, कभी कभी मेरे दिल में खयाल आता है”, जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ है” (मूळ – सनी ख्वाने तकदीसे मशरिक कहाँ है), “इक शहनशाह ने दौलत का लेकर सहारा हम गरीबोंकी मुहब्बत का उदाया है मज़ाक” अशी अनेक गाणी आली आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याने सर्वाधिक १०, ००० गाणी लिहिली असल्याचा प्रवाद आहे अशा मजरूहच्या ५४ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त ” हम है मताए कूचा बाजार की तरह” हे एकच गाणे पुस्तकातून घेतले आहे.

शेवटी गुलज़ार साहिरबद्दल काय म्हणतो हे सांगून या लेखमालेचा शेवट करतो. “Sahir was literary figure and he remained literary figure till the end. He did not accept the film medium as much as the medium accepted him”

इथे विनायक यांचा साहिरवरील दीर्घ प्रतिसाद संपतो. या प्रतिसादातील सर्वच मतांशी मीही सहमत आहे असे नाही. विनायक यांचा अभ्यास जबरा आहे आणि विश्लेषण करण्याची हातोटीही विलक्षण आहे, पण कलाक्षेत्रात सर्वच गोष्टी अशा मोजूनमापून होत नसतात.काहीकाही वेळा तर्काच्या पलीकडे जाऊन कला ही निव्वळ कला म्हणून पहाण्यातच मजा असते. काव्यासारख्या क्षेत्रात तर तुलना करण्याचा मोह वारंवार होत असला तरी तसे करणे योग्य नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. शिवाय कलाकार हा त्याच्या कलेतून बघावा, त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी त्याच्या कलेची सांगड घालणे योग्य नाही, असे माझे मत आहे.
असो. इतका अभ्यासपूर्ण आणि माहितीप्रधान प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तो इथे प्रसिद्ध करण्याची मुभा दिल्याबद्दल मी विनायक यांचा अत्यंत आभारी आहे.