Archive for June, 2007

माझे मराठीचे प्रयोग

June 17, 2007

घरात ‘मी मराठी ‘ वाहिनी दिसायला लागल्यापासून आमच्या रक्तात मराठी भाषेचे चैतन्य पुन्हा एकदा सळसळू लागले होते. ‘अमृताशी पैजा जिंकणारी’ मराठी आज वाघिणीच्या दुधाची मोलकरीण म्हणून धुणीभांडी करत फिरते आहे या जाणिवेने आमच्या रक्तातले सगळे ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत आणि राजेश मुजुमदार अस्वस्थ झाले होते. भरजरी पठणी ल्यालेल्या माझ्या मायबोलीने वर मात्र खणाची चोळी न घालता आंग्लभाषेचे बिनबाह्याचे पोलके घालून फिरावे याचे शल्य आम्हाला डाचू लागले होते. (अशी पश्चातापदग्ध आच रविवारी सकाळी अधिक बोचू लागते असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आमच्या एका वैद्यकशास्त्रपंडित मित्राच्या मते त्यात रक्तातील मद्यार्कअंशाचा मोठा वाटा असतो, पण आम्ही ते मत फारसे गंभीरपणे घेत नाही) त्यातच बाबासाहेब पुरंदऱ्यांची पुस्तके वाचनात आल्याने आमच्या इतिहासाप्रमाणे आमची मराठीही घराघरांत, खोल्याखोल्यांत, फोडणीच्या – ज्याला विदर्भात मिसळणीच्या म्हणतात – डब्यांडब्यांत, एवढेच काय पण आमच्या ज्या भगिनी गरोदर असतील त्यांच्या गर्भांपर्यंत पोचली पाहिजे या जाणिवेने  आम्ही बेचैन झालो होतो. गर्भांपर्यंत मराठी पोचवण्याच्या दृष्टीने प्रथम आमच्या सहनिवासातील कोणकोण महिला गर्भवती आहेत याची एक खानेसुमारी करावी म्हणून आम्ही गच्चीत उभे राहून टेहळणी सुरु केली. गच्चीतूनच चहाच्या तिसऱ्या कपाची मागणी केल्यावर सौभाग्यवतीला संशय आला. ‘शोभतं का हे या वयात…’ इथपासून सुरु झालेल्या ध्वनिमुद्रिकेचे ‘मुलं बरोबरीला आली तरी.. जनाची नाही तरी मनाची तरी..’ हे कडवे सुरु झाल्यावर आम्ही आत आलो.

“अगं, तुझ्या भलत्या शंका! अजून माझ्यावर विश्वास म्हणून नाही.. मी फक्त गर्भांपर्यंत मराठी पोचावी म्हणून साधारण अंदाज घेत होतो, म्हणजे त्या दृष्टीने…”
“इश्श..मला हो काय ठाऊक?  आणि आता ही कुठली नवीन एजन्सी घेतली?” भार्येचा काहीतरी समजुतीचा घोटाळा झाल्याचे आमच्या ध्यानात आले पण स्त्रीमुखातून वहाणाऱ्या अखंडित वाक्प्रपातात भेद करणे कसे अशक्यप्राय असते हे समदु:खी विवाहीत जाणतातच..

“आणि मला बोलला नाहीत ते! सदा मेलं आपलं आपल्यापाशी. कुण्णाला काही सांगायचं म्हणून नाही, काही नाही. आणि काही विचारलं की डोक्यात राख घालायची! तुमचं हे नेहमीचंच आहे हं! परवा शकूवन्सं आल्या तेंव्हाही अस्संच…”
“अगं, माझं ऐकून तर घे! शकूचा काय संबंध इथे? आणि ही काय भाषा की काय तुझी? एजन्सी म्हणे! अगं मराठी लोक आपण, मराठी बोलावं. मराठी शब्द वापरावेत…”
“मग मी काय इंग्रजीत बोलले? मराठीच तर बोलत होते…”
“एजन्सी हा काय मराठी शब्द आहे? किती बोजड वाटतो बघ ऐकतानाही! गुमास्तेपणा म्हणावं, नाही तर अडत म्हणावं, अगदी गेलाबाजार प्रतिनिधीकार्यालय म्हणावं… “

‘शनिवार एक दिवस म्हणून मी काही बोलत नाही, पण हल्ली झेपत नाही हो तुम्हाला’ हे एवढं सगळं पत्नी एका कटाक्षात बोलून गेली.

“अंघोळ करुन घ्या.” थंड पाण्याची अंघोळ हे अशा परिस्थितीवरचं उत्तर आहे हा तिचा समज आहे.
“न्हाणीघर रिक्त आहे का पण?”
“क्काय? राहुल, बघ रे बाबा असं काय करतात ते…”
कुलदीपक चलतहास्यचित्रमालिका बघण्यात मग्न होते. पडद्यावरील नजर न हटवताच ते बोलते झाले. “काय बाबा?”
“अरे, सकाळीच तू दूरवस्तूदर्शकयंत्र काय सुरु करुन बसलायस?
“पण बाबा, मी तर टीव्ही बघतोय…”
“तेच ते. काय रे भाषा तुमची. अरे, मराठी लोक आपण. मराठी बोलताना परभाषीय शब्द वापरु नयेत आपण. आणि गृहपाठ झाला का तुझा?”
“म्हणजे?”
“गृहपाठ म्हणजे काय कळत नाही तुला? अरे शाळेत घरी करण्यासाठी म्हणून दिलेला अभ्यास…”
“होमवर्क?”
“हां. तेच”
“बाबा, पकवू नका ना हो प्लीज. ए आई बघ ना गं..आई, बाबांनी गोळ्या घेतल्या होत्या का गं काल?”
“अरे राहुल, मला काही धाड भरलेली नाही. मला काळजी आहे ती तुझ्या भाषेची. गृहपाठ म्हणजे काय कळत नाही तुला. ते जाऊ दे. तुमच्या चमूला त्या ह्याच्यासाठी जो विषय दिला होता त्यावर काही विचार केलास का?”
“कशाचा विषय, बाबा?”
कसा कोण जाणे ‘प्रोजेक्ट’ ला प्रकल्प हा शब्द काही आम्हाला ऐनवेळी आठवला नाही. डोक्याला ताण दिल्यावर आमच्या मनात हस्तव्यवसाय हा शब्द चमकून गेला. पण घोळात घोळ नको म्हणून आम्ही तो शब्द वापरायचे टाळले.
चिरंजीव अद्याप मालिकाग्रस्तच होते. अंघोळ टाळायची असेल तर सत्त्वर काहीतरी कृती करणे आवश्यक होते.
“अगं ए, ऐकलंस का? मी उष्णोदकयंत्र सुरु करतोय. काही पळे जाऊ देत, मग जाईन अंघोळीला. तोवर जरा संगणक उघडतो..”
आतमध्ये फोडणीचा ‘चर्र.. ‘ असा आवाज आला. लसणीचा खमंग वास आला. लबेदे पाकसिद्धीत गुंतले असावे. मी संगणकाची कळ दाबली. माझ्या मराठीची महती आता किमान माहितीजालावर तरी नोंदवावी म्हणून माहितीजालाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु केले. पण वारंवार यत्न करुनही संपर्क प्रस्थापित होईना. ‘दूरचा संगणक प्रतिसाद देत नाही’ असा संदेश येऊ लागला. ‘पुन्हा तबकडी फिरवा’ हे बऱ्याच वेळा करुन झाल्यावर सेवाप्रदात्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे असे लक्षात आले. मी दूरध्वनी उचलला.
“हालू..”
“नमस्कार. मी काशीनाथ पटवर्धन बोलतोय. दिगंबर सहनिवास, माहिम पश्चिम येथून. माझी माहितीजाल सेवा विस्कळीत झाली आहे..”
“सायेब, ह्ये केबलवाल्याचं हापिस हाये…”
” अहो तेच पाहिजे आहे मला. तुमच्याकडूनच मी महापट्टी माहितीजालजोड घेतला आहे. पण तो चालत नाही आहे. बहुदा तुमचा संदेशतंतुपुंज सदोष असावा…”
“सायब, तुम्ही काय म्हनताय कायबी कळना बगा. विंटरनेट म्हनत असाल तर सगलीकडंच डाऊन हाय. केबल फाल्ट हाय. दुरुस्त व्हायला टायम लागन..”

आमचे वैफल्यग्रस्त मन क्लैब्याने दाटून आले. विमनस्क मन:स्थितीत आम्ही गवाक्षातून बाहेर बघत राहिलो. दरम्यान आतली पाकसिद्धी संपन्न झाली असावी. “जळ्ळं मेलं एका रविवारी लवकर आवरुन घ्या म्हटलं तर ते काही ऐकायचं नाही, आता मीच जाते अंघोळीला” हे उद्गार आपल्याला उद्देशून म्हटलेच नाहीत अशी आम्ही स्वतःची समजूत करुन घेतली.

अतिथीआगमनसूचकघंटिकेच्या ध्वनीने आम्ही भानावर आलो. शेजारच्या नेने वहिनी होत्या.
“जान्हवीताई… अगंबाई, कुठं बाहेर गेल्यात का?” त्यांनी विचारलं.
“आं?”
“अहो, थालिपीठ करत्येय, चार कांदे पाहिजे होते…”
सकाळच्या न्हाणीघराच्या उल्लेखाने झालेला घाव अद्याप ताजा होता. आम्ही दुसरा प्रयत्न करावयाचे ठरवले.
“मला वाटते, ती शौचकुपात आहे..” आमच्याकडे ‘ते’ व ‘ते’ ठिकाण एकत्र आहे.
नेने वहिनी गोऱ्यामोऱ्या झाल्या. “मी… येते..” त्या निघाल्याच.
एकंदरीत आजचा दिवस काही आपला नव्हे हे माझ्या लक्षात आले. माझ्या मराठीप्रेमाला घरातूनच सुरुंग लागत असतील तर बाहेर या प्रयोगांचे काय होणार या चिंतेत आम्ही बुडून गेलो. 

पाय मातीचे! -४

June 8, 2007

पुढच्या आठवड्यात विश्वासरावांना अचानक थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. सगळ्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. “काही विशेष नाही…” डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितलं “थोडंसं ब्लडप्रेशर वाढलंय, पण काही खास नाही. मुख्य म्हणजे थकवा आणि ताण. विश्रांती हेच खरं औषध. मुख्यमंत्र्यांना सुट्टीची गरज आहे”. मंत्रीमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत विश्वासरावांनी खरं तर डॉक्टरांचं म्हणणं हसण्यावारीच नेलं असतं, पण आनंदराव काही ऐकायला तयार नव्हते. “दादा, हत्ती ओढून आणलाय तुम्ही, आता काही नाही, वहिनीसाहेबांना घ्या बरोबर आणि मस्त महिनाभर अमेरिकेला मुलाकडं जाऊन या बघा!” (केवढा बटबटीतपणा! तेवढ्यातही विश्वासरावांच्या मनात येऊन गेलं!) मग होय नाही करता करता एक पंधरा दिवस तरी राहुलकडं फ्लॉरिडाला जाऊन यायचं विश्वासरावांनी मान्य केलं. दोन दिवसांत सगळी तयारीही झाली. ‘स्वखर्चानं सुट्टीवर जाणारा पहिला मुख्यमंत्री!’ जाधवांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये  झकास कॉपी दिली. विश्वासराव अमेरिकेला निघाले.

या सगळ्या गडबडीत दिल्लीहून आठवड्यात दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गुपचूप त्यांच्या घरी रात्री उशीरा येऊन गेलेल्या एका उंच, गोऱ्या तरुणाकडं कुणाचं लक्षही गेलं नाही.

फ्लॉरिडात पोचल्यावर विश्वासरावांनी राहुलच्या घरी दोन दिवस अगदी मनसोक्त विश्रांती घेतली. वहिनीसाहेबही श्रुतीचे लाड करण्यात रमून गेल्या होत्या. वीकएंडला राहुलने डिस्नी वर्ल्डचा कार्यक्रम आखला होता. अचानकच विश्वासरावांनी आपल्याला काही कामानिमित्त न्यूयॉर्कला जायला लागणार असल्याचं जाहीर केलं. राहुलला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण वहिनीसाहेबांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. त्यांनी काही न बोलता विश्वासरावांची बॅग भरायला घेतली.
न्यूयॉर्कहून स्विसएअरच्या विमानानं विश्वासराव रविवारी संध्याकाळी जिनिव्हात दाखल झाले. एका सामान्य हॉटेलात त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली. त्या दिवशी रात्री विश्वासरावांना अस्वस्थ, वेड्यावाकड्या स्वप्नांनी भरलेली झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर  त्यांनी भानुप्रताप रावांनी दिलेल्या यादीतल्या पहिल्या बँकेला फोन केला. चेअरमननी भेटीसाठी दुपारी बाराची वेळ दिली.
बाराला दहा मिनिटं कमी असताना विश्वासराव बँकेच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरले. “गुड मॉर्निंग. वेलकम टु अवर बँक, मिस्टर चीफ मिनिस्टर…” करड्या रंगाचा सूट घातलेल्या एका उमद्या तरुणानं त्यांचं स्वागत केलं. “चेअरमन तुम्हाला पाचच मिनिटात भेटतील. जरा बसून घ्या, प्लीज. तुमची ब्रीफकेस आणि पाऊच मी घेऊ का हातात?”
“अं.. मला वाटतं ते माझ्याकडंच राहू द्यावं” विश्वासराव म्हणाले. किंचित अनिश्चिततेनं.
“जशी तुमची मर्जी. कॉफी?”
विश्वासरावांची कॉफी संपेपर्यंत चेअरमनच्या केबीनचा दरवाजा उघडला. पांढऱ्या विरळ केसांचे, संपूर्ण पाश्चिमात्य वेशभूषा केलेले सत्तरीतले चेअरमन बाहेर आले. म्हातारा अजून लिंबाच्या खोडासारखा टणक होता. “विश्वासराव जगदाळे, राईट?” त्यांनी हात पुढे केला. अगदी अचूक उच्चार. सकाळच्या फोननंतर आतापर्यंत जेमेतेम काही तास उलटले होते. तेवढ्यात आपल्या नावाचा उच्चारदेखील शोधून काढला या लोकांनी! विश्वासरावांना प्रथमच आपल्या कामाच्या यशाविषयी शंका आली. “आपण, आत बसू या का?” चेअरमन म्हणाले.  
आतल्या खोलीत दोन तरुण होते.
चेअरमननी त्यांची ओळख करुन दिली. “ही माझी मुलं.”
“विश्वासराव जगदाळे”
“चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, इंडिया.” चेअरमन म्हणाले. “आपण बसू या का?”
विश्वासरावांनी घड्याळात बघीतलं. “मी आपला फारसा वेळ घेणार नाही चेअरमनसाहेब.  मला आपल्याकडून काही माहिती हवी आहे.”
चेअरमनच्या कपाळावर एक आठी आली. ”माहिती?”
विश्वासरावांनी सरळ मुद्द्याला हात घातला. महाराष्ट्रातला सत्तापालट, नवीन मंत्र्यांवरचा संशय, यशवंतचा रिपोर्ट… सगळंच. चेअरमन शांतपणे ऐकत होते.
“चेअरमनसाहेब, यातली काही खाती आपल्या बँकेत असावीत असा आमचा अंदाज आहे. मामला कदाचित लक्षावधी डॉलर्सचा असेल…”
“मग?” चेअरमन साहेबांचा स्वर अगदी कोरडा होता.
“मला ही माहिती हवी आहे, चेअरमनसाहेब.” विश्वासरावांनी यशवंतने पाठवलेली लिस्ट बाहेर काढली. “आपल्या बँकेत यापैकी कुणाकुणाची खाती आहेत, त्यातल्या रकमा आणि त्यांची लेटेस्ट ट्रान्झक्शन्स.”
“मिस्टर चीफ मिनिस्टर..” (आता ‘विश्वासराव’ नाही, विश्वासरावांच्या ध्यानात आलं),” ”तुमच्याकडून असल्या बाळबोध गोष्टींची अपेक्षा नव्हती मला” चेअरमन कठोरपणे म्हणाले. “स्विस बँकांविषयी तुमचा काय समज आहे, मला माहिती नाही, पण गुप्तता हे आमचं पहिलं तत्त्व आहे. आमच्या ग्राहकांविषयी कसलीही माहिती आम्ही तो ग्राहक किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस याशिवाय कुणालाही देत नाही.”
विश्वासरावांची हीच अपेक्षा होती. त्यांनी खिशातून एक पत्र बाहेर काढलं. ” हे जरा बघता का…” ते म्हणाले. “आमच्या पंतप्रधानांचं तुमच्यासाठी खाजगी पत्र आहे…”
“काय उपयोग आहे त्याचा मिस्टर चीफ मिनिस्टर?” चेअरमनसाहेबांचा दहा मिनिटांपूर्वीचा मृदूपणा आता अगदी मावळला होता. “माझ्या लेखी तो फक्त एक छापील कागद आहे” ते म्हणाले. “तुमच्या देशात तयार झालेला एक कागद फक्त. अशा गोष्टी इथं होत नसतात, मिस्टर चीफ मिनिस्टर. आता तुमचं जर दुसरं काही काम नसेल, तर आपण उठू या का?”
“एक मिनिट चेअरमनसाहेब” विश्वासरावांच्या नजरेत आता कणखरपणा आला. “तुम्हाला माहिती असेलच. आमच्या देशात इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची मोठी कामं सुरु आहेत. एका मोठ्या, फारच मोठ्या धरणाचा एन्व्हायरमेंटल इंपॅक्ट सर्व्हे आहे, साडेचार हजार किलोमिटर लांबीचा फ्रीवे बांधायचा आहे, इतरही काही कामं आहेत… त्यातली बरीच कामं स्टीवन्सन असोसिएटसकडं आहेत. तुम्ही त्यांचे बँकर आहात, मिस्टर चेअरमन. तुम्ही जर असं आखडूपणाचं धोरण स्वीकारणार असाल, तर आम्हाला ही कामं स्टीवन्सन असोसिएटला द्यायची की नाही याचा परत विचार करावा लागेल…”
चेअरमन आता कंटाळल्यासारखे झाले होते. “तो तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही. असलं काहीतरी सांगून तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही.” 
“आणि अर्थातच तुम्ही सहकार्य करणार नसाल, तर तुमच्या देशाशी असलेले सगळे राजकीय संबंध तोडायलाही आम्ही मागेपुढे बघणार नाही” विश्वासराव म्हणाले.
“हे जरा जास्तच होत नाही का मिस्टर चीफ मिनिस्टर? पण असो, आता मला तुम्हाला सांगणं भाग आहे, की तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. तुमच्या असल्या कुठल्याही घाणेरड्या मार्गानं तुम्ही आमच्या क्लायंटची माहिती मिळवू शकणार नाही.”
“हम्म…” विश्वासरावांनी पाऊच उचलला. “आता सगळे मार्गच खुंटले म्हणायचं”  चेअरमनसाहेबांनी हात पुढे केला आणि ते जागेवरच थिजले. विश्वासरावांच्या हातात आता रिव्हॉल्व्हर होतं.
“दोन मिनिटांच्या आत मला पाहिजे ती माहिती मला मिळाली पाहिजे, चेअरमन. नाहीतर तुझ्या चिंधड्या उडतील…”
चेअरमन आणि त्यांचे दोन्ही सहकारी अविश्वासानं बघत होते.  चेअरमनच्या चेहऱ्यावर आता घामाचे लहानबिंदू दिसू लागले. टेबलवरचा त्यांचा हात आता सूक्ष्मपणे थरथरु लागला होता. पण त्यांनी तरीही नकारार्थी मान हलवली.
“प्लीज, चेअरमनसाहेब, ही माहिती माझ्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे. माझं राजकीय भवितव्य, माझ्या लोकांचं भविष्य, माझं आयुष्यच अवलंबून आहे यावर…” विश्वासराव अगतिकतेनं म्हणाले.
“माझंही… पण, नाही.” घामानं डबडबलेले चेअरमन म्हणाले.
“ठीक आहे मग… आता भोगा याची फळं” विश्वासरावांनी चाप ओढला. चेअरमननी डोळे मिटले….

‘क्लिक’ रिव्हॉल्वरच्या रिकाम्या चेंबरमध्ये पिस्टनचा आवाज आला.”एक्सलंट!” विश्वासराव म्हणाले.  त्यांनी रिकामं रिव्हॉल्वर टेबलवर ठेवलं. आतापर्यंत कुणाच्या लक्षात न आलेली एक मळकट ब्रीफकेस त्यांनी टेबलवर ठेवून उघडली. आत अमेरिकन डॉलर्स खच्चून भरले होते.

“तुमच्या बँकेत एक जॉइंट अकाउंट उघडायचं आहे मिस्टर चेअरमन. टु बी ऑपरेटेड बाय आयदर ऑर सर्व्हायव्हर. आमच्या दोघांच्या नावे. मी आणि वीरेन तलवार.” विश्वासराव म्हणाले.
(समाप्त – मूळ कथाकल्पना जेफ्री आर्चर – कथा ‘क्लीन स्वीप इग्नॅटिय

पाय मातीचे! -३

June 2, 2007

विश्वासराव हादरुन गेले होते. आनंदराव – ठीक आहे, आपण त्यांचं काहीसं रेप्युटेशन ऐकून आहोत, पण गुलाबराव? आणि सोपानआबासुद्धा?…. नगर जिल्ह्यातल्या खेडेगावातलं सोपानआबांचं साधं घर विश्वासरावांना आठवलं. अद्यापि शेतावर काम करणारी त्यांची बायको, ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी त्यांची मुलं… सगळं ढोंग, सगळं नाटक! शेवटी प्रत्येकाचे पाय मातीचेच! मातीचेच पाय!
राजकारणी लोकांना न शोभणारी एक विलक्षण विषण्णता विश्वासरावांच्या मनावर दाटून आली. कसं बदलणार हे सगळं आपण? कशाकशाविरुद्ध आणि कुणाकुणाविरुद्ध लढणार?  कुठपर्यंत आणि कुणाच्या भरवशावर?  त्यांच्या सभांसाठी शंभरशंभर मैल उन्हातानातून आलेले गरीब, केविलवाणे लोक त्यांना आठवले. त्यांचे वाळके चेहरे, चोपलेली शरीरं, फाटके, मळके कपडे….या राज्यातली शेकडो एकर कोरडी, भेगाळलेली जमीन…वाळवीच्या वारुळासारखी बजबजलेली महानगरं..‍.जहर ओकणाऱ्या इंडस्ट्रीज… आणि हे चित्र बदलण्याचं आपण स्वतःलाच दिलेलं वचन…आणि हे आपले अगदी सख्खे सहकारी…पाण्यातलं प्रतिबिंब बघून आपण माणसांची पारख करतो असा लौकिक आहे आपला, आणि आपल्या हातून अशी चूक व्हावी? इतकी?
“रिलॅक्स, विश्वासराव.” भानुप्रताप राव त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. “ही फक्त संशयितांची लिस्ट आहे. बातमी अजून कन्फर्म्ड नाही. स्विस बँकांची गुप्तता तर तुम्हाला माहितीच आहे. खातेदारांची माहिती तर इतर कुणालाच मिळत नाही. या बँकांवर फेडरल बँकिंग कमिशनचं नियंत्रण आहे, तिथंही आपण प्रेशर टाकतो आहोत.  डिप्लोमॅटिक लेव्हलवर आपले प्रयत्न सुरुच आहेत, पण मला नाही वाटत या सगळ्याचा काही उपयोग होईल.आपल्याला एखाद्या प्रॉसिक्यूटरची  किंवा जजची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी या खातेदारांची काहीतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं सिद्ध करावं लागेल … एकंदरीत कठीण मामला आहे.”
“मग, सर…. आपण काय करणार आहोत?”
“आय वाँट यू टू पर्सनली हँडल धिस विश्वासराव. तुम्ही स्वतः लक्ष घाला यात. एकतर ही बातमी खरी आहे का हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. या लोकांनी कुठलीकुठली डील्स हँडल केली आहेत ते बघीतलं पाहिजे. जर ही नावं खरी असतील तर हा उघडउघड काळा पैसा आहे, भ्रष्टाचारातून जमवलेला. ही कीड आपल्याला संपवलीच पाहिजे. त्यासाठी कितीही, कुठलीही किंमत द्यायला लागली तरीही.”
“यस सर.”
“तुम्ही स्वतः जिनिव्हाची एक व्हिजिट प्लॅन करा. झुरिकपेक्षा तिथंच या लोकांचा पैसा जास्त आहे, अशी खबर आहे. तुमची व्हिजिट ऑफिशिअल नको. खाजगी कारणासाठी म्हणून जा. मेडीकल रीझन वुड बी अ गुड कव्हर अप. फॅमिलीतले एकदोन लोक बरोबर न्या. दॅट विल लुक मोर कन्विन्सिंग.  आणि डायरेक्ट स्वित्झर्लंडलाही नका जाऊ. यू.एस. मार्गे जा हवं तर, पण कुणाला संशय यायला नको. तिथल्या चार बँकांची यादी तुम्हाला जाण्यापूर्वी मिळेल. चारही खाजगी आहेत. त्यांच्या चेअरमनना भेटा.  आय ट्रस्ट युवर निगोशिएशन स्किल्स. पण आपल्याला पक्की माहिती पाहिजे. तुम्हाला मदत म्हणून आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करण्यासाठी आपण एक स्पेशल सेल तयार करतो आहोत. ‘नॅशनल ऍंटी करप्शन सेल.’ एकच सदस्य असेल या सेलचा. अगदी माझ्या विश्वासातला खास माणूस – वीरेन तलवार. ही विल रिपोर्ट डायरेक्टली टू यू. आपल्या तीघांशिवाय यात कुणीही इन्व्हॉल्व्ह्ड असणार नाही.”
“मला वाटतं सर, आपण आमच्या गृहमंत्र्यांना तरी याची कल्पना द्यावी. अशोक चलाख माणूस आहे सर. तो नजर ठेवेल इथं…”
भानुप्रताप राव हसले. देशाच्या पंतप्रधानांचं, आणि राजकारणातले पन्नास पावसाळे पाहिलेल्या माणसाचं हास्य. या माणसाला कुठलीही गोष्ट धक्का देऊ शकणार नाही, असं एखाद्याला वाटेल असं हास्य.
“तुम्ही लिस्ट पूर्ण वाचली नाही, विश्वासराव. दुसऱ्या पानावर तुमच्या अशोक गावडेंचंही नाव आहे….”
हे ऐकण्याची विश्वासरावांच्या मनाची तयारी झाल्यासारखीच होती. जवळजवळ अपेक्षितच होतं हे.  व्हेन स्मॉल पीपल बिगिन टू कास्ट लाँग शॅडोज, इट इस टाईम फॉर द सन टू सेट. मातीचे पाय! मातीचे पाय असलेली माणसं!
कसला तरी निर्णय झाल्यासारखे विश्वासराव उठले.  
“ट्रस्ट मी सर. मी हे सगळं खणून काढीन. या बेईमानांना आपण नंगे करू. जनतेचा पैसा गिळणाऱ्या या सापांना आपण ठेचून काढू.”
“मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, विश्वासराव. परवा वीरेन तुम्हाला भेटेल. घरी, ऑफिसमध्ये नाही. दोन आठवड्यांनंतर तुमची व्हिजिट प्लॅन करा.आणि तुम्ही फक्त मला रिपोर्ट कराल. कीप धिस इन माईंड”.
“यस सर.”
“गुड लक, विश्वासराव….”
“थँक यू, सर” विश्वासराव उठले
“आणि विश्वासराव…”
“यस सर?”
“मी जरा जास्तच करतोय असं वाटेल तुम्हाला कदाचित, पण सांभाळून. इथं धोका आहे. हे भ्रष्ट लोक कुठल्या पातळीवर जातील सांगता येत नाही. तेंव्हा काळजीपूर्वक रहा. कुणावरही पूर्ण भरवसा ठेवू नका. अगदी तुमच्या बॉडीगार्डसवर पण. स्वतःजवळ…. स्वतःजवळ..” हे शब्द बोलतांना भानुप्रताप रावांना जड जात होतं हे विश्वासरावांना जाणवलं.
“स्वतःजवळ काय, सर?”
“स्वतःजवळ एखादं वेपन ठेवा. जस्ट इन केस.”
विश्वासरावांनी हातातलं पाऊच उघडलं. आत एक छोटसं चकचकीत रिव्हॉल्वर होतं.
“लोडेड आहे सर. स्मिथ ऍंड वेसन”
“गुड.”
(क्रमश:)

पाय मातीचे! -२

June 1, 2007

विश्वासरावांचा कामाचा झपाटा तर त्यांच्या कट्टर विरोधकांनाही थक्क करुन टाकणारा होता. आणि कामं तशी बरीच करायची होती. एका जर्मन कंपनीचा पॉवर प्रोजेक्ट लाल फितीत अडकला होता. पाटबंधारे खात्याचेही बरेच फंडस मार्गी लावायचे होते. महामार्गाचं सहा पदरीकरण सुरु होऊन रखडलं होतं, तेही बघायचं होतं. वर्ल्ड बँकेच्या मदतीसाठीचं एक प्रपोजलही नजरेखालून घालायचं होतं.
अशाच घाईघाईत अचानक पंतप्रधान भानुप्रताप राव यांचे पी.ए. सिन्हा यांचा तातडीनं दिल्लीला येण्यासाठीचा निरोप आला तेंव्हा विश्वासरावांना जरा आश्चर्यच वाटलं. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटलं ते ही भेट शक्यतोवर गुप्त ठेवण्याच्या सूचनेचं.  आधीच्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भानुप्रताप राव त्यांना सविस्तर भेटले होते. निवडणुकीतल्या यशाबद्दल हायकमांड तर खूष होतेच, पण स्वतः भानुप्रताप रावांनी विश्वासरावांच्या संघटनाकौशल्याचं विशेष जाहीर कौतुक केलं होतं. राजकीय वर्तुळात वरकरणी तरी शांतता होती. विरोधक तर अजून निवडणुकीतल्या जबरदस्त पराभवातून सावरलेच नव्हते. अशात पंतप्रधानांचं इतक्या तातडीचं काय काम असावं याचा विश्वासरावांना अंदाजच येईना. त्यांनी इंटरकॉम उचलला. जाधवांनी संध्याकाळी पाचच्या फ्लाइटमध्ये दोन सीटस सांगूनच ठेवल्या होत्या. न सांगता कामं करण्याच्या या गुणामुळं तर जाधव मुख्यमंत्रांचे लाडके असिस्टंट होते. रात्री नऊची भेट ठरली होती.
दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांच्या खास ताफ्यातली एक अँबेसिडर विलासरावांना न्यायला आली होती. संपूर्ण काळ्या काचा. साध्या पोशाखातला एक ड्रायव्हर. बस्स. इतर कोणी एस्कॉर्ट नाही, काही नाही.  इतक्या कमी लवाजम्यात प्रवास करण्याची विश्वासरावांची ही पहिलीच वेळ होती. मागच्या सीटवर विश्वासराव रेलून बसले. जाधवांनी दार ओढून घेतलं. भरभर मागं पडत जाणारी अंधुक दिल्ली पहात विश्वासराव शांतपणे बसून राहिले. गप्प. विचारमग्न.
रात्रीचे नऊ वाजले तरी सिन्हा नुकतेच आंघोळ करुन आल्यासारखे ताजेतवाने होते. कदाचित त्यांनी नुकतीच आंघोळ केलीही असेल, विश्वासरावांना वाटलं. “आईये, आईये, सर, गुड इव्हिनिंग.” त्यांनी मिठ्ठास स्वागत केलं. “पी. एम. साहब आपकाही इंतजार कर रहे हैं. गो स्ट्रेट इन, सर. तबतक जाधवसाब, कॉफी हो जाये?”
आणखी एक नवल. कितीही नाजूक मामला असला तरी आजवर जाधवांना कधी बाहेर बसण्याची वेळ आली नव्हती. जाधवांच्या कपाळावर नाराजीची एक आठी उमटली. त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटल्यासारखं करून विश्वासराव आत गेले.
आपल्या विशाल डेस्कमागं पंतप्रधान भानुप्रताप राव बसले होते. आजूबाजूला फायलींचा ढिगारा तर होताच, पण या वेळी विश्वासरावांना नव्यानं दिसला तो भानुप्रतापरावांच्या टेबलवरचा अत्याधुनिक लॅपटॉप.  
“या, या विश्वासराव, बसा.” भानुप्रताप रावांनी हात पुढे केला. खम्मम तालुक्यातल्या एका खेडेगावात जन्मलेल्या या पंतप्रधानांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं होतं. मराठी ते चांगलेच बोलत असत. विश्वासरावांशी तर ते आवर्जून मराठीतच बोलायचे. “बोला, काय म्हणतोय तुमचा महाराष्ट्र?” भानुप्रताप राव मोकळेपणाने म्हणाले. विश्वासराव आणखीच तणावाखाली आले. एखादा मोठा बॉंब टाकायचा असला की भानुप्रताप रावांची सुरुवात अशीच खेळीमेळीची असायची. ‘ब्रेक दी बॅड न्यूज जेंटली’ व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात शिकलेलं विश्वासरावांना आठवलं.
“ठीक आहे…. सर…”
“आणि तुमचे उपमुख्यमंत्री? आनंदराव?”
“तेही बरे आहेत सर…”
“बरे म्हणजे… नक्की कसे?”
“मी… समजलो नाही सर”
“हे बघा विश्वासराव…” भानुप्रताप रावांनी चष्मा काढून हातात घेतला. “काही गोष्टी स्पष्टच बोलतो. जाधव आलेत ना तुमच्याबरोबर? ठीक. त्यांना मी बाहेर थांबायला सांगितलं याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कदाचित वाईटही. पण विश्वासराव, बाबच तशी आहे. चारचौघात गेली तर नुकसान आहे. पक्षाचं… आणि… तुमचंही” भानुप्रताप रावांचा स्वर नेहमीसारखाच होता. शांत, संयमी तरीही खंबीर.
आता काहीही न बोलता ऐकण्यातच शहाणपण आहे हे विश्वासरावांना कळालं. भानुप्रताप रावांनी लॅपटॉप विश्वासरावांकडं वळवला. एक क्लिकसरशी पडद्यावर काही चौकोन उमटले. ” मेसेज आहे. यशवंत शर्मा. स्वित्झर्लंडमधले आपले राजदूत. एनक्रिप्टेड आहे, पण हे सॉफ्टवेअर टाकलं की…” भानुप्रताप रावांनी दोन की दाबल्या. आता चौकोनांच्या जागी अक्षरं दिसायला लागली. कसली तरी लिस्ट.
“गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरु आहे त्यांचं या प्रोजेक्ट्वर. आता नावांसकट लिहिताहेत ते.”
“कसली नावं आहेत ही, सर?”
“स्वित्झर्लंड, विश्वासराव, स्वित्झर्लंड. जिनिव्हातल्या काही मेजर स्विस बँकांमध्ये ज्यांचा बेहिशेबी पैसा आहे त्या संशयितांची नावं. यादीतलं दुसरं नाव बघा, विश्वासराव. आनंदराव टोळपे – पाटील. सहावं बघा, गुलाबराव शिंदे. तेरावे सोपानाआबा फडतरे… सगळे तुमचे विश्वासातले मंत्री, सगळे तुमचे सहकारी, विश्वासराव…”