Archive for October, 2007

रुपेरी पडद्यामागचा सिनेमा – गुड्डी

October 29, 2007

गुड्डी म्हणजे गुडिया. बाहुली. दहावीत शिकणारी कुसुम अशी बाहुलीसारखीच आहे. निरागस, निष्पाप – काहीशी भोळीही – जे बघेल, ऐकेल त्यावर विश्वास ठेवणारी. वास्तवाशी जाण नसलेली, किंबहुना स्वप्ने सोडून जगात काहीतरी इतर वास्तव असते हेही माहिती नसणारी. हे वयच असे स्वप्नप्रधान असते. या वयात मन असे स्वप्नांत रमते. गुलाबाची अर्धवट उमललेली कळी, मावळत्या सूर्याचे रंग, एखाद्या लहान बालकाचे हास्य असे काही पाहिले की मनाचे फुलपाखरू होते. अशा वयात कवितांच्या पुस्तकात गुलाबाचे फूल वगैरे ठेवले जाते. मग या स्वप्नांत एखाद्या अबलख वगैरे घोड्यावरून स्वार होऊन कुठलासा राजकुमार येतो…

गुड्डीच्या स्वप्नात असाच एक उमदा राजकुमार आहे. धर्मेंद्र. तोच तो रुपेरी पडद्यावरचा हीरो धर्मेंद्र. आता तो आपल्याला अप्राप्य आहे, इतके गुड्डीला कळते आहे, त्याचे लग्न झालेले आहे, हेही तिला ठाऊक आहे. पण त्याने काय बिघडते? गुड्डीचे प्रेम हे मीरेच्या प्रेमासारखे पवित्र आहे. तिच्या हिंदीच्या पुस्तकात मीरेचा धडाच आहे ‘प्रेम सच्चे असले की जगाची सगळी बंधने आपोआप गळून पडतात…’ धर्मेंद्रच्या प्रेमात असाच सर्वस्वाचा त्याग करून संन्यासिनीचे आयुष्य जगणे ही गुड्डीची महत्त्वाकांक्षा आहे. पण हे सगळे तिच्या मनात, अगदी आतल्या आत आहे. तिच्या घरातल्या इतर लोकांना – तिचे वडील, मोठा भाऊ व वहिनी यांना याची अजिबात कल्पना नाही. गुड्डीवर आईसारखी माया करणाऱ्या तिच्या वहिनीच्या मनात गुड्डीसाठी आपला भाऊ नवीन आहे. नवीन हा इंजिनिअर – नोकरी शोधतो आहे -स्वभावाने जरासा गंभीर – वाचन, लेखन यांच्यात रमलेला -त्यालाही गुड्डी आवडते आहे. हे सगळं जमून आलं तर बरंच आहे, पण या सगळ्यात मध्येच घुसलेला तो धर्मेंद्र – त्याचं काय?

मग कधी ना कधी तरी फुटणारे हे बिंग फुटतेच. नवीन गुड्डीला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करतो. स्वप्न आणि वास्तव यातला फरक. पण गुड्डीला हे काही कळतच नाही. तिचे वयच तसे आडनिडे आहे…

मग नवीनच्या मदतीला धावून येतात त्याचे मामा आणि मित्र प्रोफेसर गुप्ता. हे मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण माणूस प्रोफेसर म्हणून शोभणार नाही इतका हसतमुख आणि गमत्या. त्यांना गुड्डीच्या मनातली ही उलघाल बरोबर समजते. या मुग्ध बालिकेला वास्तव म्हणजे काय हे समजून तर सांगायचे, पण ते करत असताना तिला त्यात कुठेही मानसिक धक्का बसू द्यायचा नाही यासाठीची योजना ते आखतात. आणि त्यात त्यांना साथ मिळते ती खुद्द धर्मेंद्रची! अपेक्षेप्रमाणे ही योजना यशस्वी होते, गुड्डीच्या मनातले सिनेमाचे खूळ निघून जाते, तिला वास्तव आणि त्यातला तिचा हीरो नवीन दिसू लागतो, आणि त्या दोघांचे गोड वगैरे मीलन होते..
अशी ही गुड्डीची कथा.

तेजस्वी नायिकेसमोर केवळ एखाद्या शामळू बंगाली तरुणाला फिल्म लायनीत ‘चान्स’ द्यायचा म्हणून नायक म्हणून सादर करणे हे अगदी बिमल रॉयपासून (परख) सगळ्या बंगाली दिग्दर्शकांनी केले आहे. जया भादुरीसमोर समीत भांजा म्हणजे जी. ए. कुलकर्णींसमोर वि. आ. बुवा, कुसुमाग्रजांसमोर चंद्रशेखर गोखले, शेरलॉक होम्ससमोर ‘साता जन्माच्या गाठी’, चिकन बिर्याणीसमोर फोडणीची पोळी, स्मिरनॉफसमोर आंबलेली ताडी… या सिनेमात अमिताभला हीरो म्हणून न घेण्याचा ऐनवेळी हृषीदांनी घेतलेला निर्णय त्यांच्या कारकीर्दीमधील (‘झूट बोले कौव्वा काटे’ बनवण्याच्या निर्णयाखालोखाल) सर्वात चुकीचा ठरला असेल. सुमीता संन्याल बाकी या सिनेमात गुड्डीची सालस वहिनी म्हणून अगदी शोभून दिसते.

उत्पल दत्तविषयी काय लिहावे? कुणालाही आपला मामा असाच असावा असे वाटेल. एकमेलांना ‘स्टॅच्यू’ करून थांबवण्याची तशी बालीश कल्पना उत्पल दत्त आणि जया भादुरी यांनी काय पातळीवर नेली आहे! चांगला दिग्दर्शक , चांगले संवाद असले की जातीचा कलाकार कसा लखलखून उठतो, ते उत्पल दत्तचा अभिनय पाहून शिकावे. एकच प्रसंग लिहितो. गुड्डी आणि नवीनच्या लग्नाची डायनिंग टेबलवर चर्चा सुरू असते. उत्पल दत्त पुडिंग खात असतात. गुड्डी या चर्चेविषयी नाराज होऊन फुरंगटून “मामाजी..” असे म्हणते. त्यावर हा प्रोफेसर मामा म्हणतो,”अरे भाई, इतनी जल्दी भी क्या है, पहले पुडिंग तो खत्म करने दो, फिर देख लेते है..” या सहजसुलभ संवादाला आणि दत्तसाहेबांच्या ‘टायमिंगला’ दाद द्यावी तितकी कमीच. आपल्या भाच्याला, नवीनला, प्रत्येक वेळी नवीन नावाने बोलावण्याची -कधी ‘रामप्रसाद’ कधी ‘मुरारीलाल’ त्यांची अदाही भन्नाटच.  

असे लहानलहान पण चिरोट्यासारखे अरळ आणि पदर सुटलेले प्रसंग ही हृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटांची खासियत. गुड्डीचे निवृत्त वडील हंगलसाहेब. सतत बुद्धीबळात गुंतलेले. नवीन गावाहून आल्याआल्या त्यांच्याशी खेळायला बसतो. दोघेही खेळात हरवून जातात. नवीनची बहीण तिथे येते. “मामाजीका क्या हाल है?” ती विचारते. खेळात बुडालेला नवीन म्हणतो,”बहुत बुरा है, घोडा मर गया है”! गुड्डी धर्मेंद्रच्या प्रेमात पडली आहे हे ऐकून मामाजी खदखदून हसत विचारतात, “धर्मेंद्र? वो शरमीला धर्मेंद्र? फिल्म हीरो?”, धर्मेंद्रला भेटण्यासाठी फिल्म लायनीत ओळख असलेल्या आपल्या देशपांडे नावाच्या मित्राला गुप्ताजी फोन लावतात तेंव्हाचे देशपांडेंचे फिल्म लायनीविषयीचे विचार मुळातूनच ऐकले पाहिजेत. “….अंत में जब हीरो विलन का पीछा करता है… कुछ घोडोंपर, कुछ ट्रेनोंमें, कुछ पैदल…” असे सगळेच कमर्शियल सिनेमाची खिल्ली उडवणारे. प्रत्यक्षात धर्मेंद्रला भेटल्यावर गुड्डीसारख्या हजारो मुली तुमच्या प्रेमात पडल्या आहेत (हे ऐकून धर्मेंद्र मिश्किलपणे म्हणतो” मै तो आजकल राजेश खन्ना का नाम सुन राहा हूं!)  याची मानसशास्त्रीय कारणे गुप्ताजी सांगतात, “तुम्ही लोक विमानातून उडी मारता आणि तुम्हाला काहीही होत नाही …. इतनाही नही उठके फिर गानाभी शुरू कर देते हैं.” गुड्डीला फिल्मी दुनियेतला खोटेपणा कळावा म्हणून मामाजी तिला शूटिंग दाखवायला नेतात, त्यावेळी छोट्या छोट्या प्रसंगांत दिसणारे दिलीपकुमार, नवीन निश्चल, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना गंमत आणतात. अशोककुमारचा एक सीन तर खलासच.

जया भादुरीचा हा पहिला चित्रपट. इंग्लंडविरुद्ध्च्या ट्वेंटी ट्वेंटी मॅचमध्ये युवराजसिंगने जसे केले तसे काहीसे या सामान्य चेहऱ्याच्या, लहानखुऱ्या चणीच्या आणि भावपूर्ण डोळ्यांच्या मुलीने केले आहे. धर्मेंद्रची ‘डाय हार्ड’ फॅन असलेली ही मुलगी दिलीपकुमारच्या चित्रपटांविषयी बोलताना ‘दलीप’ ची नक्कल करते तो एकच प्रसंग आठवा. जया भादुरीची यापुढील स्तुती करणे वाचकांच्यावर सोपवतो…

असरानी या चित्रपटात ‘हीरो’ बनण्याच्या स्वप्नाने पछाडलेल्या आणि मुंबईत येऊन स्वप्नभंग झालेल्या एका प्रातिनिधिक तरुणाची भूमिका करतो. त्याचे कपडे, विस्कटलेले केस –  जुल्फेंच म्हणाना – , त्याच्या स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पना … हे असले कित्येक ‘कुंदन’ आपल्या आसपास वावरत असतात. आपण हीरो होणार आहोत हे आपल्या आईला सांगताना आपली हीरोईन म्हणून “सुना है साधना से बात कर रहे हैं वो लोग..” हे त्याचे किंचित लाजून म्हणणे ऐकावे. यावर त्या अडाणी निरक्षर आईचे “साधना? कौन? वो बन्सी की चाची?” हा खास हृषीदा पंच! केश्तो मुखर्जीही एकाच प्रसंगात जबरदस्त भाव खाऊन जातो. 

‘गुड्डी’ मध्ये हृषीदांनी फिल्म लायनीवर काही गंभीर भाष्यही केले आहे. प्राणसारख्या अट्टल खलनायकाचा सज्जनपणा (प्राण बाकी या सीनमध्ये प्रचंड अवघडलेला आणि कृत्रीम वाटतो, ते सोडून द्या!), कवडीचुंबकाचा रोल करणाऱ्या ओमप्रकाशचा दिलदारपणा आणि शिराजसारख्या गेल्या जमान्यातल्या नटावर दुय्यम -तिय्यम रोल करण्याची आलेली वेळ… या सगळ्यात ‘हीरो’ चे फोटो काढण्यासाठी धडपडणाऱ्या फोटोग्राफरची अगतिकता आणि जळून खाक झालेल्या स्टुडिओमध्ये भूतकाळात हरवून गेलेला धर्मेंद्र… हे सगळे कुठेतरी खोल जाऊन पोचते. आपल्यालाही थोडे थांबून सगळेच तपासून बघावे असे वाटते. 

‘गुड्डी’ मधली गाणी गुलजार यांची आहेत आणि संगीतकार वसंत देसाई. ‘पपीहरा’ तर ऑल टाईम ग्रेट आहेच, पण ‘हमको मनकी शक्ती देना’ ही प्रार्थनाही सुरेख. ‘आजा रे परदेसी’ हे बाकी हृषीदांना यात का घ्यावेसे वाटले असेल, काही कळत नाही.

कधी वाटते की गुड्डीसारखी एक धाकटी बहीण असावी. तिचा हात हातात घ्यायला नवीनसारखा एखादा सज्जन मुलगा सामोरा यावा. तिच्या आयुष्यातील गुंता सोडवणारा एखादा देवमाणूस प्रोफेसर गुप्ता भेटावा, आणि शेवटी ‘आणी मग राजा-राणी’ सुखाने नांदू लागली’ च्या धर्तीवर सगळे आबादीआबाद व्हावे, आणि आपण गुप्तासरांसारखेच आभाळाकडे हात जोडून कृतज्ञतेने म्हणावे, “जय धर्मेंद्र!”
हृषीदांचा ‘गुड्डी’ असा माणसातल्या चांगुलपणावर परत  विश्वास टाकावा, असे वाटायला लावणारा आहे.

संवादकला २ – शब्दसामर्थ्य आणि वाचन

October 28, 2007

भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो. म्हणजे मग ‘कॅच देम यंग’ या न्यायाने शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने अगदी लहान वयापासून प्रशिक्षण देणे / घेणे आवश्यक आहे. नियमित वाचनाची सवय / आवड हे अर्थातच शब्दसंग्रह वाढवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. घरातील लहान मुले ही घरातल्या प्रौढांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे घरात वाचनसंस्कृती असेल तर मुलांना आपोआप वाचनाची गोडी लागते. आपले आई-वडील रोज काहीतरी नवे वाचतात हे निरीक्षण मुलांना वाचनाची प्रेरणा देण्यास पुरेसे ठरते. मग वाचन हा त्या संपूर्ण कुटुंबाचा एक दैनंदिन व्यवहारातील घटक बनून जातो.

अगदी अपवादात्मक व्यक्ती सोडल्या तर जे लोक हा लेख वाचू शकतील त्यांना आपल्या मिळकतीमधील एक छोटा हिस्सा पुस्तके विकत घेण्यावर खर्च करणे कठीण असणार नाही. पुस्तकांच्या वाढत्या किमती वगैरेबाबत तक्रार करत न बसता जेवढी जमतील तेवढी पुस्तके विकत घेण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. एकदा का खिशाला भोक पाडून पुस्तक विकत घेतले की मग ते आपोआपच काळजीपूर्वक वाचले / सांभाळले जाते. वैयक्तिक जीवनात अतिशय साधेपणाने राहिलेल्या पु. ल. आणि सुनीताबाईंनी ‘आम्ही अजिबात हात आखडता न घेता खरेदी करतो ती फक्त पुस्तकांची’ असे या जोडप्याविषयी आधीच असलेला डोंगराइतका आदर वाढवणारे वाक्य लिहिले आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या साडेचार -पाच हजार (इंग्रजी) पुस्तकांची लायब्ररी होती, आणि नाईलाजांने धारवाड सोडून त्यांना पुण्यात यावे लागले त्या वेळी त्यांना ती पुस्तके (विनामूल्य!)स्वीकारणारे लोक मिळेनात, अशी एक दुर्दैवी कहाणी आहे. तर ते असो, पण पुस्तके वाचणे, शक्यतोवर विकत घेऊन वाचणे, हे सुजाण मराठी माणसाने आपल्या भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावे असे कर्तव्यच आहे, असे मला वाटते.

ज्या घरांत वाचनसंस्कृती नाही, आणि ज्यांना नवीन वाचायला सुरुवात करायची आहे, असे उत्साही लोक ‘आम्ही आता काय वाचू?’ असा काहीसा भाबडा प्रश्न घेऊन येतात. खरे सांगायचे तर अशा लोकांना ‘तुम्ही ज्यात भेळ बांधून आणता त्या कागदापासून सुरुवात करा’ असे सांगण्याचा मोह मला होतो. हे अगदी शब्दशः नसले तरी खरेच आहे. मराठी वाचनात इसाप -पंचतंत्रातून एकदा का माणूस सुटला, की मग तो आपापल्या वाचनवाटेने जायला मोकळा होतो. मग कुणी व. पु., पु. ल., दळवी या धोपटमार्गाने जातो, कुणी बाबुराव अर्नाळकर, एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक (आणि क्वचित नजर चुकवून चंद्रकांत काकोडकरही), असा गुप्तहेरी पवित्रा घेतो, कुणी योगिनी जोगळेकर, गिरिजा कीर, सुमती क्षेत्रमाडे असा ‘वामकुक्षीवाचक’ होतो , कुणी सुहास शिरवळकर, बाबा कदम असा तद्दन जनता क्लास धरतो तर कुणी खानोलकर, माडखोलकर, माडगूळकर अशी अनवट वाट पकडतो. यात बरोबर-चूक असे काही नसते. काहीही वाचा, पण त्यातून तुम्ही थोडेसे तरी वाढत गेला पाहिजे, अशी चांगल्या वाचनाची एक ढोबळ व्याख्या करता येईल.

जी कथा मराठी वाचनाची, तीच इंग्रजीचीही. ‘रीडर्स डायजेस्ट आणि होम्सकथा या तर चिरतरुण आहेतच, पण अमेरिकन बेस्टसेलर्सही त्यांना टीकाकारांनी कितीही दर्जाहीन म्हटले तरी अत्यंत चुरचुरीत आणि कमालीची मनोरंजक आहेत. जेफ्री आर्चरही तसाच. तिथून पुढे कुणी दोस्तोव्हस्कीच्या मार्गे जाईल, तर कुणी वुडहाऊसच्या. त्यातही गंमत बघा, ‘वुडहाऊसची पुस्तके म्हातारी व्हायलाच तयार नाहीत’ असे पु. ल. म्हणतात, तर ‘वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की मला किमान सहा महिने त्याचे दुसरे पुस्तक हातातही धरवत नाही’ असे जी. ए. म्हणून यात ‘व्यासंग वाढवणे’ वगैरे गटणेध्येय डोळ्यासमोर न ठेवता गवतात तोंड घालून चरत जाणार्‍या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत जावे. प्रत्येकाला शेवटी आपापली वाट सापडतेच.

‘इंग्रजी वाचताना शब्द समजत नाहीत, त्यामुळे वाचलेले कळत नाही’ अशी एक सामान्य तक्रार असते. शेजारी शब्दकोष घेऊन अडलेले शब्द त्यात बघून, अर्थ टिपून वगैरे ठेवणारे नवशिके वाचक बघितले की मंत्रांचे अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे लग्नाचे विधी करणार्‍या ज्ञानप्रबोधिनी पद्धतीची आठवण येते. दोन्हीही तितकेच विनोदी प्रकार. जगात जशी दारुबंदी कुठेही, कधीही शंभर टक्के यशस्वी झालेली नाही, तशी ही शब्दसंग्रह वावण्याची पद्धतही. मला पटलेली पद्धत म्हणजे समजो वा न समजो, मुसंडी मारुन वाचत रहाणे. कधी ना कधी प्रकाश हा पडतोच.

एकदा शब्दांची बर्‍यापैकी ओळख झाली, की मग त्यांतली गंमत कळायला लागते. विविध भाषांमधले शब्द, त्यांतले साधर्म्य, विविध भाषांमधल्या लेखक – कवींनी एकमेकांपासून स्फूर्ती घेऊन एकाच किंवा एकसारख्या विचारांची वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेली मांडणी अशा गमतीजमती दिसायला लागतात. आता हेच बघा: ‘क्रोकोडॉइल टिअर्स’ हा इंग्रजी, ‘मगरमछके आंसू’ हा हिंदी, ‘नक्राश्रू’ हा संस्कृत आणि ‘मोसळेकण्णिरु’ हा कानडी हे सगळे वाक्प्रचार / शब्द एकाच अर्थाचे आहेत. ‘कॅट ऍंड माऊस प्ले’, ‘मांजराचा होतो खेळ आणि उंदराचा जातो जीव’ आणि ‘बेक्केग आटा इलिग प्राणसंकटा’ हेही तसेच एक उदाहरण. एवढेच काय, पण अर्थाअर्थी संबंध नसलेल्या अरेबिक आणि गुजराथी भाषेतले नमस्कार-चमत्कार (‘सलाम-वालेखुम – वालेखुम सलाम’ आणि ‘केम छे -शांति छे’) साधारण एकाच अर्थाचे आहेत. एका कवीने दुसर्‍या भाषेतील कवीपासून एखादी कल्पना उसनी – चोरुन नव्हे- घेऊन त्यावर स्वतंत्र बांधकाम केल्याची उदाहरणेही वाचतांना गंमत वाटते. “टू अ स्कायलार्क’ या कवितेतले उदाहरण मी यापूर्वी दिले होते. शेलीच्या या कल्पनेचा शांताबाईनी मराठीत आणि शैलेंद्रने हिंदीत काय सुरेख विस्तार केला आहे! ( ‘शेली -शांताबाई – शैलेंद्र’ हा अनुप्रासही गमतीदार!) रॉबर्ट फ्रॉस्टच्या ‘दी रोड नॉट टेकन’ मधली ‘टू रोडस डायव्हर्जड इन अ वुड ऍंड आय, आय टुक दी वन लेस ट्रॅव्हल्ड बाय, ऍंड दॅट हॅज मेड ऑल दी डिफरन्स’ ही कल्पना आणि हरिवंशराय बच्चन यांची ‘ जीवन की आपाधापी में , कब वक्त मिला, कुछ देर, कहीं पर बैठ, कभी यह सोच सकूं, जो किया, कहा, माना, उसमें क्या बुरा भला’ यातले साधर्म्य असेच गमतीदार, आणि दोघांविषयीचा आदर वाढवणारे. ‘दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन’ यातला गालिबचा अस्सल जोरदार मुखडा आणि त्यावर गुलजार यांनी विणलेले तितकेच काव्यमय अंतरे अशी गंमत कळायला लागते. शब्दसंग्रह वाढवायचा म्हणून वाचन अशी ती सर्कस न रहाता, वाचायला आवडते म्हणून वाचन, त्यातून शब्दसंग्रह वाढतो, हा त्यावर मिळालेला बोनस असे सगळे आनंदीआनंद होऊन जाते!

संवादकला -१: सभाधीटपणा

October 28, 2007

समाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा. ‘वक्ता दससहस्त्रेषु’ याचे कारण हेच असावे. चार लोकांसमोर देण्याचे प्रेझेंटेशन असो किंवा हजार लोकांच्या सभेत करायचे भाषण असो, नवीन वक्त्याची अवस्था साधारण सारखीच असते. हृदयाची धडधड वाढणे, तोंडाला कोरड पडणे, आवाज थरथरणे, पाय कापणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्मरणशक्तीने पूर्ण दगा देऊन काहीही न आठवणे. याचा परिणाम म्हणून मग तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, अतिशय गडबडीने बोलणे आणि लवकरात लवकर आपले भाषण संपवणे अशी नवख्या वक्त्याची प्रतिक्रिया होते. ‘नको ती सभा आणि नको ते बोलणे’ म्हणून असे प्रसंग टाळण्याकडेच लोकांचा कल असतो.

या सगळ्या प्रतिक्रियेचे कारण अतिशय आदिम आणि भौतिक आहे. संकटाला सामोरे जायची वेळ आली की एकतर त्याचा सामना करणे किंवा त्याच्यापासून पळून जाणे हे प्राणिमात्रांच्या रक्तात फार पूर्वीपासून भिनले आहे. ‘फाईट ऑर फ्लाईट’ रिस्पॉन्स म्हणतात तो हाच. दोन मांजरे एकमेकांची भांडताना जशी आपल्या अंगावरचे सगळे केस फुलवून आपला आकार आहे त्यापेक्षा मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसेच हेही. संकटाशी सामना करायची वेळ आली की अंगावरचे केस उभे रहाणे, रक्तातल्या विशिष्ट हार्मोन्सचे प्रमाण वाढून हृदयाच्या स्पंदनाचा वेग वाढणे, मलमूत्र विसर्जनाची भावना होणे (अनावश्यक वजन कमी करुन अधिक वेगाने पळून जाता यावे या कारणासाठी) ही सगळी अगदी सामान्यतः आढळणारी लक्षणे आहेत. भीती वाटली की थोड्याफार प्रमाणात सगळ्यांची हीच अवस्था होते.

पण चार लोकांसमोर बोलताना हे असे का व्हावे? ही भीती नेमकी कशाची आहे? भीतीचे कारण कळाले की भीतीवर मात करणेही सोपे जाते असे सोपे मानसशास्त्र आहे. अंधार्‍या बोगद्यात जायची आपल्याला भीती वाटते याचे कारण अंधार नव्हे. अंधारात भिण्यासारखे काही नाही, हे आपल्यालाही माहिती असते. हे भय असते अंधारात दबा धरुन बसलेल्या अज्ञाताचे. विजेरीच्या प्रकाशात बोगद्यात काही नाही हे कळाले, की हे भयही नष्ट होते. ‘फिअर ऑफ दी अननोन’. सभेत बोलण्याचेही असेच आहे. ही भीती चार लोकांसमोर बोलण्याची नाही. तर बोलताना आपले काहीतरी चुकेल आणि श्रोते आपल्याला हसतील आणि आपल्या आत्मसन्मानाला जखम होईल, हे ते भय आहे. आता भयाचे हे कारण समजून घेतले तर त्या भयावर मात करणेही शक्य झाले पाहिजे. सभेत बोलण्याचे भय कमी करुन सभाधीटपणा कसा वाढवता येईल याची काही सूत्रे आपण येथे पाहू.

एकतर श्रोते आपल्याला हसतील, आपली टिंगल करतील ही भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करा. असे करण्याचे बरेच मार्ग तज्ञांनी सुचवले आहेत. श्रोते अजिबात महत्वाचे नाहीत अशी कल्पना करणे, श्रोते हे विदूषकी टोप्या घातलेली तीन चार वर्षांची मुले आहेत अशे चित्र डोळ्यासमोर आणणे किंवा ते चक्क नग्नावस्थेत बसले आहेत अशी कल्पना करणे वगैरे. माझ्या मते हे सगळे मार्ग नकारात्मक आहेत. माझ्या मते सगळ्यात योग्य मार्ग म्हणजे सगळे श्रोते हे आपल्या बाजूने आहेत, आपले मित्र आहेत आणि आपण एखादी चूक केली तरी फारसे गंभीर काही होणार नाही अशी कल्पना करणे. येथे भीती या नकारात्मक उर्जेचा आपण सकारात्मक उपयोग करुन घेतो. एकदा असे झाले की मग तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची देहबोली सुधारते आणि हळूहळू तुमचे भाषण अधिकाधिक प्रभावी होऊ लागते.

पण फक्त श्रोत्यांची भीती गेली म्हणजे सगळे झाले असे नव्हे. एखादे छोटेसे प्रेझेंटेशन असो, किंवा दीड तासाचे व्याख्यान असो, कसून तयारी करण्याला पर्याय नाही. तुमच्या विषयातली सखोल आणि अद्यावत माहिती मिळवा, भाषणाचा कच्चा आराखडा तयार करा,( ‘टेल देम व्हॉट यू आर गोईंग टु टेल देम, टेल देम, टेल देम व्हॉट यू हॅव टोल्ड देम’) त्यातले कच्चे दुवे शोधा, कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील याचा अंदाज घ्या, त्याची उत्तरे तयार करा. शक्य होईल तेंव्हा पॉवर पॉइंट, किमान ओएचपीच्या स्लाईडस वापरा. पण सर्वस्वी त्यांवर अवलंबून राहू नका. पीपीटी न उघडणे, वीज जाणे असे होऊ शकते. बॅकअप म्हणून एका छोट्याशा कार्डवर महत्वाचे मुद्दे लिहून ते स्वतःजवळ ठेवा. भाषण पाठ करु नका, फक्त महत्वाचे मुद्दे लक्षात ठेऊन उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न करा. सवयीने हे जमते.

तुम्ही पहिल्यांदाच भाषण देत असाल किंवा एखादे महत्वाचे भाषण द्यायचे असेल तर त्याची रंगीत तालीम जरुर करा. आरशासमोर राहून स्वतःशी अधिकाधिक नेत्रसंपर्क साधण्याचा सराव करा. श्रोत्यांशी सहजसोपा आणि नैसर्गिक नेत्रसंपर्क साधता येणे हे आत्मविश्वासाचे द्योतक आहे. जमिनीकडे, छताकडे किंवा खिडकीबाहेर बघत बोलणारा वक्ता न्यूनगंडाने पीडित असतो. किमान श्रोत्यांना तरी तसेच वाटते. तुम्हाला जर विशिष्ट कालमर्यादेत भाषण द्यायचे असेल तर तुमचे भाषण रेकॉर्ड करा. भाषणाची कालमर्यादा न पाळणे हे अव्यावसायिक समजले जाते. अगदी शेवटी काही जवळच्या मित्रांसमोर तुमच्या भाषणाची रंगीत तालीम करा. मित्र असे असावेत की जे तुमचे दोष आणि तुमच्या चुकाही तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतील.

एखाद्या नवीन ठिकाणी भाषण द्यायचे असेल तर त्या ठिकाणाला आधी जरुर भेट द्या. व्यासपीठ, श्रोत्यांची बसण्याची रचना, ध्वनीवर्धक हे तुमच्या परिचयाचे होऊ द्या. व्यासपीठावरील जागेचा तुम्हाला प्रभावी वापर करता आला पाहिजे.

आणि अगदी भाषणाच्या आयत्या वेळी तणावरहित रहाण्याचा प्रयत्न करा. पाणी प्यावेसे वाटले तर ते भाषणाच्या आधी किंवा नंतर प्या. अगदीच मोठे भाषण असेल तर गोष्ट वेगळी. आपल्या जागेवरुन उठण्याआधी, प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आणि प्रत्येक वाक्यानंतर एक मोठा श्वास घ्या. व्यासपीठावर पोचल्यावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी काही सेकंद शांत उभे रहा. याने श्रोत्यांचे लक्ष आता हा माणूस काय बोलणार आहे या उत्सुकतेने तुमच्यावर केंद्रित होईल. एखाद्या मित्राकडे पहा (गरज वाटत असेल तर अशा एखाद्या मित्राला मुद्दाम पहिल्या रांगेत बसवण्याची व्यवस्था करा), नंतर इतरांकडेही पहा आणि हसर्‍या मुद्रेने बोलायला सुरुवात करा. एखादा दर्जेदार आणि बहुतेकांना माहिती नसलेला विनोद, एखादा खेळकर प्रश्न यांनी भाषणाची सुरुवात करता आली तर पहा, पण ओढूनताणून तसा प्रयत्न करु नका. सावकाश आणि स्पष्टपणे बोला. भाषणाची सुरुवात नेहमी सकारात्मक ठेवा. ‘हे माझे पहिलेच भाषण आहे, कृपया सांभाळून घ्या’,'हा काही फारसा रंजक विषय नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे’ अशी सुरुवात टाळा. आधी झालेल्या भाषणांशी तुमच्या भाषणाची तुलना करु नका. धर्म, जात, राजकीय मते, शारिरीक व्यंग असे उल्लेख टाळा. स्वतःचे भाषण तुम्हाला स्वतःला ‘ऍन्जॉय’ करता आले पाहिजे. भाषणाचा शेवट एखाद्या हुकमी एक्क्याने करा. आपल्याला नक्की कुठे थांबायचे आहे याचे भान असू द्या, आणि तेथेच थांबा.

वक्तृत्वकला ही काही अंशी तरी प्रयत्नसाध्य आहे. एखादे सुरेख भाषण संपवल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट मनात केवढे मोठे कारंजे फुलवतो, हे शब्दांत सांगता येणार नाही. आणि इतरांकडून होणारी प्रशंसा कशाला, ‘दि रिवॉर्ड ऑफ अ जॉब वेल डन, इज हॅविंग डन इट’ या न्यायाने एक चांगले भाषण संपवून खाली उतरताना हलकी झालेली पावले त्या भाषणाच्या तयारीसाठी घेतलेले सारे श्रम आनंदाने विसरायला लावतात, हे काय कमी आहे?

शुभेच्छा.

परतफेड

October 14, 2007

डॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक तरुण तिच्याकडे उपचारासाठी येतो. त्याच्या पायावरची जखम खोल आहे. ती साफ करताना त्याला वेदना होतील म्हणून डॉक्टर सुधा त्याला भुलेचे इंजेक्शन देऊ लागते. तो तरुण ते घ्यायला नकार देतो. “जखम फार खोल आहे, तुला फार वेदना होतील…” डॉक्टर सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तो तरीही ऐकत नाही. “व्हाय डोंट यू अंडरस्टँड?” ती चिडून विचारते. आपण कुठे, कोणा अडाण्यांच्या वस्तीत आहोत हे क्षणभर विसरुन…
“व्हाय डोंट यू अंडरस्टँड डॉक्टर?” भेदक नजरेचा तो तरुण खोल खर्जातल्या आवाजात विचारतो. “पेन इज माय डेस्टिनी अँड आय कॅनॉट एस्केप इट…”

आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला तो. त्याच्या बदल्याला निव्वळ रोख व्यवहारी स्वरुप आलेलं आहे. पैसा हेच सर्वस्व आहे ना, मग पैसा मिळवूनच दाखवतो अशा जळत्या संतापानं त्यानं जन्मदात्या बापाला संपवण्यासाठी तोच पैसा वापरायला सुरुवात केली आहे. त्याची सेक्रेटरी- आणि कदाचित मैत्रिण- असलेल्या गीताला यातलं काहीच माहीती नाही. “कशाला एवढा पैसा पैसा करतोस?” ती त्राग्यानं विचारते. मी? मी पैसा पैसा करतोय? तो गीताला आपल्या आईच्या फोटोसमोर घेऊन येतो. “माझी आई फार गरीब होती गीता. लेकिन उसके इस गुनाह के लिये उसे किसीने माफ नही किया…” त्याचा खर्जातला धीरगंभीर आवाज भरुन येतो. त्याचा करारी चेहरा क्षणात व्याकुळ, घायाळ होतो. त्याच्या डोळ्यांच्या कडांना पाणी साठून येतं….

आगापीछा नसलेला भणंग फिरस्ता तो. सज्जनांच्या गल्लीत त्याला एका वेगळ्याच मुखवट्याखाली सादर केलं आहे. बघताबघता तो एका मोठ्या खेळातलं प्यादं बनून गेलाय. पण आता त्याला सगळं समजून चुकलंय. हे राजकारणी, हे कारखानदार, त्यांचे लालसी राक्षसी चेहरे आणि यात चिरडले जाणारे अगणित सामान्यजन. मग तो बंडाला उभा राहिलाय. पण त्याच्याबरोबर कुणी आहे की नाही ते उद्या पहाटे कळणार आहे. रात्रभर तो जागाच आहे. त्याला या खेळात आणणारी, पण आता त्याच्या बाजूने असणारी सुभाषिणी त्याच्यासोबत आहे. रात्र संपता संपत नाही. तो अस्वस्थपणे फेऱ्या मारतो आहे. थोडा वेळ पडत का नाहीस? सुभाषिणी विचारते. “मेमसाब..” तो परत तशाच आवाजात म्हणतो. “रात्रीच्या सरत्या प्रहरात, काळोखात. एखाद्या भुकेजलेल्या बालकाचं रडणं ऐकू येतं तेंव्हा…” त्याचा गळा दाटून येतो. “तब रात बहोत लंबी लगती है मेमसाब..”

कारखानदार बापाचा एकुलता एक मुलगा ‘तो’. युनियन लीडरकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं आपल्या मित्राला – सोमूला – कामागारांचा नेता बनवलं. पण सोमूला अचानक त्या कामगारांचा काय पुळका आला कुणास ठाऊक! तो आता खरोखरच त्यांच्यातला एक होऊन गेलाय. ‘त्या’ची  तगमग, तडफड होते. भेटायला आलेल्या सोमूला तो आत बोलावतो, पण ‘त्या’चं मन कडवटून गेलंय . सगळा जहरी विखार  चेहऱ्यावर घेऊन तो एक पायरी खाली उतरतो आणि अत्यंत कुत्सितपणे एकच शब्द म्हणतो “नमकहराम……”

निवृत्ती अगदी जवळ आलेला एक तत्त्वनिष्ठ पोलीस अधिकारी. आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक रहाण्याच्या त्याच्या वृत्तीने त्याला कायम मागे पडावे लागले आहे. आता एक शेवटची महत्त्वाची जबाबदारी त्याच्या शिरावर आहे. एका तथाकथित दहशतवाद्याला न्यायालयापर्यंत सुरक्षित पोचवण्याची. त्यातही असंख्य अडथळे येतात.भ्रष्ट राजकारणी आणि त्यांना संपूर्ण विकल्या गेलेल्या पोलीस यंत्रणेसमोर तो एकटा आहे. त्या दहशतवाद्याला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला आमची ड्यूटी करु द्या… तसाच एक किडलेला अधिकारी त्याला हुकूम सोडतो. ड्यूटी? काय ड्यूटी आहे तुमची? ‘त्या’च्या म्हाताऱ्या डोळ्यांत पुन्हा एकदा अंगार उसळतो. ‘सदरक्षणाय, खलनिर्दलणाय’ हीच ना? ‘वो.. उधर लिखा हे … पीछे’ तो गरजतो.

‘तो’ एक बुद्धीमान शिक्षक अधिर. त्याची एक विद्यार्थिनी आपल्या मादक जाळ्यात ओढू पहाते. तो बधत नाही. ती सगळं त्याच्यावरच उलटवते. तिचा बाप त्याला चाबकानं बेदम मारतो. त्याच्या डोक्यात स्फोट होतो. आता तो मानसिक संतुलन हरवून बसलाय. वेड्यांच्या इस्पितळात. त्याचा भाऊ त्याला भेटायला येतो. ‘सुधीर…’ ‘त्या’च्या डोळ्यात फक्त एक वेडसर चमक आहे. ‘तुझं नाव सुधीर असायला नको होतं. तुझं नाव असायला होतं अधिर. आणि माझं? गर्दभ!… तू बदला का घेत नाहीस सुधीर? एक चाबूक घेऊन जा हं तिच्याकडे… बदला… चाबूक…’ 

तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अट्टल गुन्हेगार. त्याचा बदला घेण्यासाठी आणि त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार झालेली एक तरुणी. तिचा उपभोग घेऊन झाल्यावर तो तिला अगदी निरागसपणे विचारतो, ‘तीन तासांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो, आणि आता तू इथे .अशी… का?’ ‘तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार…’ ती काहीतरी बहाणा करते. ‘त्या’च्या चेहऱ्यावर एक छद्मी, कुजकट हसू उमटतं ‘ रोमँटिक बातें मुझे बहोत बोर करती है सोनिया…’

मूकबधिरांना प्रशिक्षण देणारा तो एक अत्यंत प्रतिभावान, पण विक्षिप्त शिक्षक. त्याच्या एका अंध आणि मूकबधिर विद्यार्थिनीच्या बहिणीचा साखरपुडा आहे. त्या विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला लिहिलेले एक पत्र तो वाचून दाखवतो आहे. ‘माझ्या नशिबात नाही हे सगळं. पण तुझ्या तर आहे…’ त्याचा आवाज दाटून येतो. ‘नवरी नाही होऊ शकणार मी कधीच, पण नवरीची बहीण तर होईन….’ ‘त्या’चे कमालीचे बोलके डोळे पाणावतात. ‘आय प्रॉमिस, दॅट आय विल नॉट क्राय, ऍज यू वॉक विथ मार्क टोर्डस अ न्यू लाईफ..’ तो चष्मा काढून डोळे पुसतो. एक विलक्षण वेदनापूर्ण हास्य त्याच्या चेहऱ्यावर येतं. ‘सो, ऑन धिस हॅपी नोट…. अ टोस्ट… फॉर सारा… अँड मार्क..’ तो ग्लास उंचावतो.

असे आठवणीतले अनेक तुकडे. आमच्या निरर्थक आयुष्यांना अर्थ देणारे. त्याच्या पासष्टीनिमित्त त्याची परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न. अत्यंत दुबळा, अपुरा, पण प्रामाणिक. 

एक हवाहवासा ‘बावर्ची’

October 14, 2007

शिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आणि विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच म्हणा ना, कन्या मीता. सीतादेवींचे सारखे सांधे धरलेले असतात, त्यामुळे त्यांना फारसे काम होत नाही.मीता नृत्य शिकते आहे. त्या नृत्याची तालीम आणि नटणेमुरडणे यातच ती मश्गुल आहे. त्यातून रामनाथबाबूंना जरा..अं.. घ्यायची सवय आहे. संध्याकाळ झाली की त्यांची बाटली उघडते. काशिनाथसर तत्त्ववादी प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी शोभाताई जरा सुखवस्तू आहेत. त्यांचा मुलगा पिंटू शाळकरी आहे. विश्वनाथरावांचे अजून लग्न झालेले नाही. त्यांची संगीतातली कुवत बेताचीच, पण एकंदरीत थाट कलंदर आहे.
आता इतकी सगळी आत्ममग्न माणसे एका घरात असताना घरातले काम कुणी करायचे हा जटील प्रश्न आहे. शिवनाथजी आपल्या सुनांवर वैतागतात, पण बिचाऱ्यांचे वय झाले आहे, त्यांचे कोण ऐकणार? त्यातून दोन्ही मुले आपापल्या बायकांच्या ताटाखालची मांजरे आहेत. येऊनजाऊन घरातल्या कामाला जुंपली जाते ती कृष्णा. ही पण शिवनाथजींची नातच. बिचारीचे आईवडील नाहीत, मग काय? काहीही पाहिजे असले की ‘कृष्णा, कृष्णा…’ अशा झाल्या हाका सुरु. पण पोरगी सालस, अगदी गुणी आहे हो. सगळ्यांच्या सेवेला सारखी हजर असते. मीता तिच्याच बरोबरीची, पण कृष्णाने मीतासाठी ओव्हलटीन करुन आणले तरी मीताबाईंचे डोळेसुद्धा उघडलेले नाहीत. एवढं सगळं करुन कृष्णा कॉलेजला जाते आहे. तिथल्या एका प्राध्यापकाबरोबर तिचे काही हळुवार बंध गुंफले जाताहेत…

पण एवढ्या मोठ्या खटाल्यात ती तरी एकटी काय पुरी पडणार?  घरातल्या कामाची, विशेषत: स्वयंपाकाची अगदी दैना उडाली आहे. भात आहे, तर भाजी नाही, भाजी आहे तर पोळी नाही…. काही विचारु नका. रामनाथबाबूंना रोज कामावर जायला उशीर होतो आणि साहेबाच्या शिव्या खाव्या लागतात. काशिनाथसर कसेबसे धावतपळत मस्टर गाठतात. विश्वनाथराव कित्येक दिवस उकडलेल्या अंड्यांवर नाश्त्याचं भागवून नेताहेत आणि शिवनाथजींना तर सकाळचे आठ वाजले तरी चहासुद्धा मिळालेला नाही.

मग शेवटी सगळे मिळून ठरवतात की काही नाही, आता एक चांगला स्वयंपाकी ठेवायचा. पण  या इतक्या तऱ्हेवाईक लोकांच्या हाताखाली कुणी टिकला तर पाहिजे! जो येतो, तो महिना पंधरवड्यात गाशा गुंडाळून परत जातो. मग कृष्णा आहेच भांडी घासायला.

अशात एक दिवस रघू येतो. दिसायला देखणा, हसतमुख आणि बोलणं तर  जिभेवर बर्फी ठेवलेली असावी असं. बरं, पगाराची फार अपेक्षा म्हणाल तरे हा पठ्ठ्या चक्क अर्ध्या पगारावर काम करायला तयार झालाय. आणि कुणी सांगितली काय माहीत, पण याला घरातल्या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे. घरात तर एक भाजी करावी म्हटलं तर चार वांगीही नाहीत. पण रघू डगमगत नाही. काही कच्ची केळी आणि सुरण यातूनच तो असे फर्मास कबाब तयार करतो की रामनाथबाबूंना वाटतं की मटणाचेच कबाब आहेत!
पण ही आखुडशिंगी, बहुगुणी गाय या पागलखान्यात टिकणार का, ही खरी शंका आहे. सुना तर हा कुणीतरी जादूटोणा करणारा तांत्रिक आहे, या शंकेने भेदरल्या आहेत, अहो, दोन रुपयात हा पिशवीभर भाजी घेऊन आला मंडईतून! रामनाथबाबूंनी संध्याकाळी बाटली उघडली आणि रघूने त्यांना कोकाकोला आणि लिंबू पिळून फर्मास कॉकटेल बनवून सर्व्ह केले. शिवाय तोंडात टाकायला मसाला डाळही आहे. काशिनाथसर दमून आले आणि एक कपभर चहा मिळेल का हा त्यांचा प्रश्न संपायच्या आत रघू चहा घेऊन हजर. शिवाय बरोबर खायला कचोरीपण.

अगदी स्वप्नातला देवदूत वाटावा असा हा ‘बावर्ची’ शर्मांच्या घरी चक्क टिकून राहिला. नुसताच टिकला नव्हे तर घरातलाच एक होऊन गेला. फक्त स्वतःसाठीच जगणाऱ्या या लोकांना त्यानं दुसऱ्याला आनंद देण्यातला आनंद समजावून सांगितला. त्यांच्यातले ताणलेले, तुटत चाललेले संबंध पुन्हा घट्ट केले आणि शेवटी कृष्णाच्या आयुष्याचे भले व्हावे म्हणून स्वतःवर वाईटपणा घेऊन निघून गेला. दुसऱ्या गावी, दुसऱ्या घरी, दुसऱ्या नात्यांवर फुंकर घालण्यासाठी…

१९७२ साली प्रदर्शित झालेला हृषिकेश मुखर्जींचा ‘बावर्ची’ हा असा साधा, पण अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. ‘इट इज सो सिंपल टु बी हॅपी, बट सो डिफिकल्ट टु बी सिंपल’ हे साधे सूत्र सांगताना कुठेही प्रचारकी थाट न आणणारा. आनंद, नमकहराम आणि (त्या मानाने फारसा गाजावाजा न झालेला) बावर्ची या त्रिसूत्रीतला तितकाच प्रभावी  आणि नि:संशय आणि संपूर्णपणे राजेश खन्नाचा चित्रपट. यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्नाला हृषीदांनी अर्धी खाकी तुमान, गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या वेशभूषेत सादर करण्याचे धाडस केले. (याआधी राजकपूरने ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्येही असेच धाडस यशस्वी करुन दाखवले होते) राजेश खन्नाच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक यात शंका नाही. जया भादुरीची कृष्णाही अशीच बावनकशी. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणजे काय ते ही भूमिका पाहून शिकावे. दुर्गा खोटे आणि उषा किरण यांनी साकारलेल्या सुनाही अगदी आपल्या घरातल्या वाटाव्या अशा. दुर्गाबाईंचा फणकारा तर बघत रहावा असा. आपण निष्पाप आहोत हे कळवळून सांगताना माझ्या हातून काही भलतंसलतं घडलं असेल तर मी मरुन जाईन असं कृष्णा सांगते त्यावर’ सुनो, शाम के वक्त लडकी की बातें सुनो’ हा संवाद दुर्गाबाईंनी असा म्हटलाय की ज्याचं नाव ते! पोरक्या पोरीविषयी माया, काळजी आणि एकंदरीत झाल्या प्रकाराबद्दल गलबलून आलेलं मन हे सगळं एका वाक्यात कसं सांगता येतं हेच जणू त्या दाखवून देतात. ए. के. हंगल यांचे रामनाथजी आणि असरानीचे विश्वनाथराव असेच मझा आणून जातात. काशिनाथसर झालेल्या (आणि कुठेही नामोल्लेख नसलेल्या) गुणी आणि नैसर्गिक पुढे अभिनेत्याचे काय झाले हे काही केल्या कळत नाही. काली बॅनर्जीची मीताही अगदी मोकळी आणि दिलखुलास. तिच्या किंचित बायली नृत्यशिक्षकाच्या भूमिकेतला पेंटलही लक्षात रहातो. त्याचे आणि राजेश खन्नाचे उर्दू आणि हिंदी भाषा या विषयावरचे संवाद असेच अर्थपूर्ण.अर्थात हे इतके भरताड लिहिण्यापेक्षा संवाद गुलजार यांचे आहेत, इतके लिहिले तरी पुरे. 

पण मला विचाराल तर ‘बावर्ची’ चा खरा हीरो आहे तो हरिंद्रनाथ चटोपाध्याय. शिवनाथ शर्माच्या खट भूमिकेत हरिंद्रनाथांनी धमाल केली आहे. त्यांचा कवडीचुंबकपणा, कृष्णाविषयी त्यांच्या पोटात असलेली अपार माया, आळशी सुना आणि त्यांना घाबरुन असणारी नालायक मुले यांच्यांवरचा त्याचा राग हे सगळे हरिंद्रनाथजींनी सुरेख दाखवले आहे.  मुलांना आणि सुनांना धारेवर धरताना हा म्हातारा आपल्या ओळखीच्या एखाद्या खडूस आजोबांची आठवण करुन देतो. ‘भोर आयी गया अंधियारा’ या गाण्यात चटोपाध्यायबाबू अगदी रंगून गायलेपण आहेत. एकंदरीतच निखळ आनंद मिळवून देणारी ही भूमिका.

 

आणि ‘बावर्ची’ चा उल्लेख मदनमोहन यांच्या संगीताविषयी आणि कैफी आजमींच्या गाण्यांविषयी न लिहिता केला तर त्या गुन्ह्याला क्षमा नाही. मन्नाडे यांचा आवाज या चित्रपटात राजेश खन्नाला एकदम ‘सूट’ होतो. ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ हे मन्नादांचे सोलो आणि बिलावल रागावर आधारित ‘भोर आयी..’ ही दोन्ही गाणी नितांतसुंदर. ‘मोहे नैना बहाये नीर’ आणि ‘काहे कान्हा करत बरजोरी’ हीही गाणी सुंदर.

तर असा हा हवाहवासा वाटणारा ‘बावर्ची’ पहावा आणि मन आनंदाने भरुन जावे. या चित्रपटातला शेवटचा ‘पंच’ आणि अमिताभ बच्चनचे निवेदन अशा गोष्टी नसत्या तरी काही बिघडले नसते असे वाटते, यातच सगळे आले.