Archive for October, 2009

माझे खाद्य-पेय जीवन-२

October 30, 2009

डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत.
वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit!

सकाळची आन्हिकं उरकली आणि नवाच्या आधी आरशासमोर उभा राहून माणूस कमरेच्या पट्ट्याशी ओढाताण करु लागला की शरीराचा कणनकण ‘खायला द्या…खायला द्या…’ म्हणून कल्लोळ करु लागतो. (महिलांनाही हेच होत असावे, पण तो अनुभव मला नाही!) ही नाश्त्याची वेळ आहे. नाश्त्याचे न्याहारी, नाश्ता आणि ब्रेकफास्ट असे तीन उपप्रकार आहेत. शिळी भाकरी गरम दुधात कुस्करुन त्याबरोबर लसणीची चटणी घेतली की ती न्याहारी. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ वाचतावाचता काटेचमच्यानी पोटात ढकलायचे बेचव अन्न म्हणजे ब्रेकफास्ट. (त्यानंतर फळाचा रस – चुकलो, फ्रूट ज्यूस- आणि ब्लडप्रेशरची किंवा मल्टिव्हिटॅमिनची गोळी नसली तरे ब्रेकफास्टच्या टायचा सामोसा नीट जमत नाही!) आणि तुम्हीआम्ही सकाळीसकाळी जे हाणतो, तो नाश्ता. नाश्ता हे तुमच्या रोजच्या जेवणातले सगळ्यात मोठे जेवण असावे, नाश्त्याला तुम्ही दिवसाभरात जेवढे खाता त्याच्या चाळीस टक्के खावे, नाश्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्स घ्या, फळे घ्या.. विज्ञान असले बरेच काही सांगते. पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे. उत्साही सकाळची उदात्त परीपूर्ती म्हणजे नाश्ता. नाश्ता असा असावा, की जो करुन झाला की त्या इंग्रजी कवीप्रमाणे ‘स्वर्गात देव आहेत, आणि एकंदरीत जगाचं बरं चाललं आहे’ असं वाटायला लागावं!
पारंपारिक मराठी नाश्त्याचे उपमा आणि पोहे हे म्हणजे पणशीकर-घाणेकर आहेत. सदासर्वदा लोकप्रिय. उपम्याचे उपमा आणि उप्पीट असेही उपप्रकार आहेत, आणि बारीक पंडुरोगी रव्याचा उडुपी उपमा आणि सणसणीत देशी जाड गव्हाचा उपमा असेही. सपक मिरचीचे लहान तुकडे आणि कढीलिंबाच्या भरड पानांनी भरपूर असा पांढरट रंगाचा शेवेने सजवलेला उपमा हे उडुपी मंडळींनी दिलेले प्रकरण आहे. गावरान देशी उप्पीटाला असली कलाकुसर परवडत नाही. त्यातल्या भरड रव्यासोबत मजबूत देशी शेंगदाणे आणि तिखट मिरचीचे मोठेमोठे तुकडे असतात. ते तुकडे बाजूला काढून ठेवायचे नसतात. फारफारतर ते दाढेखाली आले की ‘स्स..’ असे म्हणून पाण्याचा एक घोट घ्यायचा असतो. अश उप्पीटात कधीकधी आमसुलही येते. अशा उप्पीटाबरोबर काही घेणे म्हणजे अशा उप्पीटाचा अपमान केल्यासारखे आहे. पण जरा बुजरी मंडळी अशा उप्पीटावर साईचे दही घेतात, तेही बरे लागते. उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. आंबोलीहून गोव्याला जाताना घाट उतरायच्या आधी कामतांचे हाटेल आहे. तिथल्या उपम्यात वेलदोडे घातलेले असतात. तीही एक वेगळीच चव लागते.
पोहे बाकी अजरामर आहेत. कांदेपोहे आणि ‘मुलगी पाहाणे’ हा संबंध तर सर्वश्रुतच आहे. कोणत्याही गोष्टीत बटाटा घालून खाण्यार्‍या मुंबईकरांनी बटाटापोहे नावाचा एक धेडगुजरी पदार्थ बनवला. पण खरे पोहे दोनच. भरपूर ओले खोबरे आणि हिरव्या मिरच्या घालून ‘वरुन लावलेले’ ‘आलेपाक’ या अर्थहीन नावाचे विशेषेकरुन महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात खाल्ले जाणारे पातळ पोहे आणि दहीपोहे. आलेपाक हा पदार्थ बाकी नाश्यापेक्षा दुपारच्या वेळेचे खाणे म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. ‘दडपे पोहे’ हे याचे शहरी नाव. फोडणी घातल्यावर काही वेळ हे दडपून ठेवायचे असतात आणि मग कपबशीतल्या बशीतून वाढायचे असतात. किंवा चक्क वर्तमानपत्राच्या कागदावर. वाढताना बाकी वर पुन्हा खोबर्‍याची पेरणी पाहिजे. लिंबू आणि कोथिंबीर हे या पोह्यांचे प्राण. ‘है इसीमे प्यारकी आबरु, वो जफा करे, मै वफा करुं’ असे गुणगुणत हे पोहे सवडीने, रेंगाळत रेंगाळत खावे, अर्धा कप चहा घ्यावा, आणि ‘इट्टला, पांडुरंगा’ म्हणत हात झाडत उठावे. आलेपाक हा हातानेच खायचा असतो. चमच्याने आलेपाक खाणार्‍याला जो कोणी आदिबल्लवाचार्य असेल, त्याचा भीषण शाप लागतो म्हणे!
दहीपोहे हे पोहेमंडळीतले दुर्लक्षित धाकटे भावंड आहे. अगदी गुणी, पण थोरल्या भावांच्या कर्तबगारीने झाकोळून गेलेले. त्यामुळे दहीपोह्याचे काही नखरे नाहीत. दहीपोहे कसेही खावेत. फक्त ते चांगले भिजलेले असावेत. प्रेमभंगासारखेच दहीपोहे जितके मुरतील तितके अधिक स्वादिष्ट होत जातात. भिजवलेले पोहे, दूध, दही आणि मीठ ही बेसिक एडीशन. त्यावर मेतकूट, तळलेल्या मिरच्यांची फोडणी, लिंबाचे तिखट लोणचे किंवा चक्क लालभडक मसाल्याचे तिखट – हे सगळे ‘अ‍ॅड ऑन’स. फोडणीच्या दहीपोह्यात चिमूटभर साखर पाहिजे. आणि बरोबर मुरलेले माईनमुळ्याचे लोणचे असले तर क्या बात है! नरकचतुर्थीला आजही असले दहीपोहे सकाळी सात वाजता पानात येतात आणि फराळाचे सार्थक होते!
पोहे -उपम्याच्या जोडीला साबुदाण्याची खिचडी , मिसळ, दोसे-उत्ताप्पे आणि थालीपीठ ही मंडळी म्हणजे भट, दुभाषी, लागू, गोखले या लायनीतली. दर्जाने उत्तम, पण ते रोजचे काम नव्हे. खिचडी आणि मिसळ यावर सगळे बोलून लिहून झाले आहे. ईश्वराचा शोध जसा कुणाला कुठे लागेल याचा नेम नाही, तशी आपल्या चवीची मिसळ कुणाला कुठे मिळेल हेही सांगता येत नाही. ‘कोल्हापुरात कुठेही जा, मिसळ चांगलीच मिळणार’ असा अभिमान बाळगणारा मी, खुद्द कोल्हापुरात एकदोन ठिकाणी जाड फरसाण, मृतावस्थेतले पोहे, जाड कापलेला कांदा आणि कावीळ झालेला ‘कट’ याचा फुळकावणी लगदा अर्धवट टाकून उठलो आहे. आणि अगदी अपेक्षा नसताना इंदौरात तीनतीनदा रस्सा मागून घेतलेला आहे. मिसळीचे बाकी एक आहे. अस्सल कुलीन गायकाला जशी तानेगणिक दाद पाहिजे असते आणि मैफिलभर शांतता पाळून शेवटी फक्त ‘कर्टन कॉल’ करण्याने त्याचे समाधान होत नाही, तसे मिसळीला दाद घासागणिक आणि घसागणिक गेली पाहिजे. मिसळीच्या पहिल्या घासात पंचेद्रिये जागृत होत नसतील, तर त्यापेक्षा उकडलेला बटाटा खावा.
फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी ‘उठाव लुंगी-बजाव पुंगी’ म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्‍यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा. दोश्याच्या रंगावरुन आणि त्याच्या कडकपणावरुन त्याचे घराणे कळते. चेंबूरच्या एका हाटेलात (मला वाटते ‘गीता भवन’ ) राजकपूरला असा कुरकुरीत मसाला दोसा हाताने तोडून खाताना पाहिले आणि ‘दिलका हाल सुने दिलवाला’ हे पटून गेले! रवा दोसा हाही जितका कुरकुरीत आणि जाळीदार तितका अधिक चविष्ट. रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. उत्तप्पावरील कांदाही असाच खरपूस कडक झाला असला पाहिजे. ‘ओनियन टमाटो उत्तप्पा’ हा बाकी खरपूसपणाला मारकच प्रकार. एकतर त्या बियाळ टमाटोच्या चकत्या नीट शिजत नाहीत, आणि दुसरे त्या ओलसर टमाटोने त्या खरपूस उत्तप्प्याचाच लगदा होऊन जातो. आमच्या कराडचा शेट्टी त्या उत्तप्पावर तो तव्यावर असतानाच शेंगदाण्याची तिखट चटणी पेरायचा. ते गणितही झकास जमून जायचे. पण दोसा उत्तपा हे स्वयंप्रकाशित जीव. चटणी-सांबार असल्यास उत्तम, नसल्यास एकेकटेही तबीयत खुश करुन जाणारे. इडलीचे तसे नाही. इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे. सांबारस्वरुपी नवरा कायम संतापी, पण त्याच्याशिवाय इडलीला अस्तित्व नाही. हल्ली उडप्याकडे ‘सांबार मिक्स या सेबरेट?’ असा एक अपमानजनक प्रश्न विचारला जातो . इडली वेगळी आणि सांबार वेगळे म्हणजे एखाद्या सुंदर बाईने खालच्या आणि वरच्या ओठाला वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक लावण्यासारखे आहे.इडली ही सांबाराने न्हालेली नव्हे तर सांबारात बुडालेली पाहिजे. एकेक तुकडा इडली सांबाराच्या चमच्याबरोबर खाणे हे नवख्याचे काम. जाणकार कोण काय म्हणेल याची पर्वा न करता इडली आणि सांबार यांची आधी जिवाशिवाचे ऐक्य करुन घेतो. हे झाले की आणखी एक प्लेट सांबार मागवावे आणि मग जीभ रतिक्लांत होईस्तोवर हे मिश्रण हाणावे. मधून चटणी घेणे वगैरे ऐच्छिक बाबी. पुण्यातल्या ‘स्वीट होम’ने इडली सांबारात बारीक शेव घालून वेगळेपणा आणला, पण तेही तसे दुय्यमच. एरवी कळकट शेट्टीच्या हातची वाफाळती इडली आणि सुक्या मिरचीचे तुकडे घातलेले सांबार याला तोड नाही. सांबारातले भोपळ्याचे, वांग्याचे अगदी वेळीप्रसंगी दोडक्याचे तुकडेही खाता येतात, पण सांबारातल्या शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्यांचे काय करायचे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ‘जादा चटणी- सांबारला एक्स्ट्रा चार्ज पडेल’ या मेनूवरील ओळीच्या निषेधार्थ तर मनसेला सुपारी दिली पाहिजे. मटणथाळीतला पांढरा आणि तांबडा रस्सा जसा मागायला लागू नये, आणि कांदा-लिंबू तर कायम वाढता असावा, तसे इडली-मिसळीतले सांबार हे न मागता पानात आले पाहिजे. काय जादा पैसे घ्यायचे, ते नंतर घ्या ना लेको!
थालीपीठ हा समस्त शहरी समाजाची कीव करावी असा विषय आहे. पुणे -कोल्हापूर रस्त्यावरच्या भुईंजजवळच्या ‘विरंगुळा’ हाटेलातल्या थालिपिठाचे तर ‘सारेगामा’ तल्या अल्पजीवी तार्‍यांइतके अवास्तव कौतुक झाले आहे. तेलाने थबथबलेली ती कडक पिठाची तबकडी म्हणजे थालीपीठ नव्हे. खरे थालीपीठ ज्याचे होते ती नुसती भाजणी तशीच खावी इतकी खमंग असते. थालीपिठातला कांदा बाकी पांढरा पाहिजे, कोथिंबीर कोवळी आणि नुक्ती तोडलेली पाहिजे आणि लसूण-मिरची गावरान पाहिजे. असे थालिपीठ करताना त्यात तव्यावरच मधेमधे भोके पाडून त्यात तेलाची थेंब सोडला पाहिजे. आणि सोबतीला लोणी किंवा दही तर पाहिजेच पाहिजे. असे एकच थालीपीठ खावे आणि त्याच्या आठवणीवर सहा महिने काढावेत.
या बिनीच्या शिलेदारांबरोबर शेवयाचा उपमा, मक्याच्या कणसांचा उपमा, लाह्याच्या पिठांचा उपमा, धिरडी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी, कसलेकसले वडे आणि अगदीच आयत्या वेळचे म्हणून आम्लेट-ब्रेड असे नाश्त्याचे इतरही प्रकार आहेत. पण नाश्ता कोणताही असो, त्याने ‘अन्नादाता सुखी भवः’ असे म्हणावेसे वाटले पाहिजे. सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच ‘बनके पंछी गाये प्यारका तराना’ म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!

माझे खाद्य-पेय जीवन-१

October 27, 2009

‘गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट’ हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात आले होते. त्यातून आई, बहीण, आजी हा घरातला समग्र स्त्रीवर्ग खाना बनवण्यात आणि खिलवण्याचा शौकीन असल्याने जिभेचे मुद्दाम लाड करावे लागले नाहीतच; ते आपोआपच झाले. सणवार, व्रतवैकल्ये आणि त्यांची उद्यापने, गावच्या जत्रा आणी शेतावर होणारा विहिरीच्या पूजेचा तो कार्यक्रम ‘पारडी’ या विविध निमित्तांनी घरात आणि घराबाहेर खाल्लेल्या विविध पदार्थांच्या आस्वादाला चटावलेली आणि सोकावलेली जीभ पुढे मुर्गीमटणातही रमली. आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली. वर काजू बदामाची पेरणी केलेली बरेलीतली मलईदार ‘दीनानाथ की मशहूर लस्सी पिऊन जसा संतोष झाला, तसाच कोल्हापुरातल्या ‘ओपल’ मधला कडकडीत पांढरा रस्सा पिऊनही.
आता खाण्यात इर्षा करण्याचे दिवस मागे पडले. जीभ अजूनही चावट आहे, पण आता ‘क्वांटिटी’ पेक्षा ‘क्वालिटी’ ला अधिक महत्व देण्याचे दिवस आले. आजही मुर्ग-मसालाबरोबर पचडी तशीच लागते, पण आता कोंबडीच्या त्या घासांबरोबर ‘फायबर’ हा विचारही चावला जातो. आजही सुका मेवा तितकाच चविष्ट लागतो, पण तो खाताना ‘अक्रोड हार्टला बरे म्हणे!’ हे मनात आल्याशिवाय राहात नाही. पण ते असो. कधीतरी या लाडावलेल्या जिभेलाच आता ‘काय तुझा तेगार’ म्हणून विचारावे असे वाटले आणि आजवरच्या आयुष्यातल्या खाण्यापिण्याच्या या रंगरंगिल्या प्रवासवाटेवर मन मागेमागे रेंगाळत गेले.
कुणाकुणाला म्हणे आपले स्वतःचे उष्टावणही आठवते. कुणाला स्वतःच्या बारशात वाटलेल्या घुगर्‍यांची चवही आठवत असेल, काय सांगावे! मला असले काही आठवत नाही. पण खान पान यात्रेची (हा शब्द ‘भारतीय रेल’ कडून साभार!) सुरवात होते ती चहापासून. मुखमार्जनानंतर (हा शब्द ‘सारे प्रवासी घडीचे’ मधून साभार!) काही क्षणांतच वाफाळता चहाचा मोठा मग समोर आला नाही तर सगळे जग व्यर्थ वाटू लागते. दुधा-दह्याच्या प्रदेशात बालपण गेले असल्याने लहानपणी या चहात चहा नावापुरताच आणि भरघोस दूध असायचे. कपातल्या गोडमिट्ट चहावर खापरीसारखी दाट साय ही कल्पना आज ओशट वाटते, पण अंगाभोवती पांघरुण घट्ट गुंडाळून घेऊन असा चहा चाखतमाखत पिणे आणि रिकामा कप कुठेतरी भिरकावून परत पांघरुणात गुडुप होणे यापरते सुख नसे. शहरी चहात चहाचा स्वाद वगैरे महत्वाचा, पण गावाकडच्या आतिथ्याच्या कक्षा चहातल्या साखरेच्या प्रमाणानुसार रुंदावतात. ‘खडे चम्मचवाली चाय’ ही काही उत्तर भारतीयांची मक्तेदारी नव्हे. गावाकडच्या चहात एकवेळ चहा लहान चमच्याने पडेल, पण साखर पडते ती मुठीने. पुढे मग तारांकित हाटेलातला उंची पण मचूळ चहा, गुजरातमधली गोड आणि सुगंधी ‘मसालानु चाय’, तीन आकडी किंमत असलेला ‘ब्लॅक’ किंवा ‘आईस टी’ असले अनेक प्रकार चाखले, पण चहा तो चहाच. सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे. रविवारी बाकी चहाच्या तीन-चार फेर्‍या व्हाव्यात. शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत ‘कशी गं माझी बाय गुणाची!’ म्हणावेसे वाटते! कॉफी – तीही आसक्या दुधातली आणि वेलदोडे जायफळ घातलेली- कधीकधी मजा आणून जात असे. विशेषतः गावाकडच्या तंबूतला शिणेमा बघून रात्री परत आल्यावर असली कॉफी केवळ अफलातून लागे. कॉफी हे उच्चभ्रू लोकांचे पेय आहे आणि चहा हे जनतेचे, हा सूक्ष्म फरक कळायला बराच वेळ लागला. न कळणार्‍या चित्रांचे वातानुकूलित प्रदर्शन बघताना त्या वेळी लोक कॉफी पीत असत. (आता वाईन पितात!) नुकत्याच प्रेमात पडलेल्या (किंवा नुकतेच लग्न ठरलेल्या) युगुलांना हाटेलात जाऊन चहा पिणे जरा कमीपणाचे वाटे; म्हणून असे लोक महागड्या हाटेलांत जाऊन न परवडणारी कॉफी पीत असत. डोळ्यांत डोळे घालून बघणे, चोरटे स्पर्श, ‘एक मुलगी हवीच हं मला.. आणि नावही ठरवून ठेवलंय मी – नेहा!’ वगैरे सगळ्या साईड डिशेस. एकंदरीत काय, तर कॉफी जराशी शिष्टच. चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही. पुढे ‘ब्रिष्टॉल – विल्स – गोल्ड फ्लेक’ या प्रवासाला साथ दिली ती तर केवळ चहानेच. ‘चहा-बिडी’ हा शब्दप्रयोग काळाच्या ओघात टिकून आहे ही तर अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावावी अशी दैदिप्यमान घटना आहे!
चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही. बोर्नव्हिटा चॉकलेटच्या स्वादाचा म्हणून जरा बरा वाटे पण हॉर्लिक्स, प्रोटिनेक्स वगैरे मंडळी आजारीपणाची कडवट आठवण घेऊन येतात. कोको ही तर शुद्ध फसवाफसवीच होती. शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा कोको.
तात्पर्य काय, की कोणताही ऋतू असावा, विचारहीन शांत झोप व्हावी, ‘आज आपण जग जिंकणार’ या आत्मविश्वासाने जागे व्हावे आणि तोंड खंगाळेपर्यंत हातात ते ताम्रवर्णी अमृत हजर व्हावे. घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो! ‘उत्तेजक पेयांपासून दूर’ असणारे लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. शेवटी ‘कंबख्त तूने पीही नही’ हे काय फक्त वारुणीलाच लागू आहे? ‘कंबख्त तूने चाय पीही नही’ हेही तितकेच समर्पक आहे की! आणि व्याकरणदृष्ट्या बरोबरही!

समजत नाही… समजत नाही…

October 11, 2009

“म्हणत राहा, मित्रांनो, श्रीराम, जयराम जयजयराम..श्रीराम, जयराम जयजयराम.. ” अद्वैतच्या वडिलांनी शववाहिकेच्या खिडकीतून बाहेर बघत हात जोडले. हळू हळू वेग घेत ती गाडी  इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर पडली. आजूबाजूला हुंदके देत उभ्या  मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी ठेवली. चौदा पंधरा वर्षांची ती मुलं मुसमुसत  रडू लागली.
पुन्हा डोळे पुसून मी वर पाहिलं. निरभ्र आभाळ. चांदण्यांचे क्षीण डोळे. हवेत किंचित गारवा. डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून दिसणारी इस्पितळाची भव्य इमारत. वेगवेगळ्या विभागांच्या पाट्या. त्यातल्या पहिल्या मजल्यावरचा अतिदक्षता विभाग. त्यातली एकशे तीन क्रमांकाची खोली. आणि आता त्या खोलीत नसलेला अद्वैत. कुठेच नसलेला अद्वैत. सर्व जाणिवांच्या पलीकडे गेलेला अद्वैत. 
हे असं होणार याची मानसिक तयारी करायला दोन आठवडे मिळाले होते. पंधरा दिवसांपूर्वी अद्वैत रानडेला बसची धडक बसली आणि तेंव्हापासून तो अत्यंत गंभीर अवस्थेतच होता. रोज त्याच्याविषयी वेगवेगळ्या, पण निराशाजनकच बातम्या येत होत्या. त्याच्या शाळेतले मित्र आणि त्या मित्रांचे आमच्यासारखे पालक – आम्ही सगळेच प्रचंड तणावाखाली होतो. काही चमत्कार झाला, तरच तो यातून वाचेल, हे उघड झालं होतं. पण  असला काही चमत्कार सहसा होत नाही, हे वैज्ञानिक मत खोटं ठरावं, असं अंतर्मन सतत म्हणत होतं.
आणि आता हे सत्य पचवताना मन बधीर झालं होतं. मानवी प्रयत्न, योजना, अभिलाषा, महत्त्वाकांक्षा यांच्यातला फोलपणा ध्यानात यावा असा हा क्षण. सगळं समजून काहीच न समजण्याचा हा क्षण.
अद्वैत हा माझ्या मुलाचा वर्गमित्र. दहावीतला. या वयातली मुलं जशी उत्साहानं आणि जीवनरसानं रसरसलेली असतात तसा. बोलक्या डोळ्यांचा हा चुणचुणीत मुलगा लहानपणापासून घरी यायचा. त्याची बुद्धीमत्ता, त्याने मिळवलेली बक्षिसं, त्याचं गाणं, लहानपणापासून त्यानं नाटकात केलेली कामं याचं कौतुक वाटायचं. वाढदिवसाला एखाद्याच्या घरी जमायचं, काहीतरी भरपूर हादडायचं,एका खोलीत जमिनीवर गाद्या घालायच्या आणि रात्रभर गप्पा, मोठमोठ्यांदा हसणं, रात्री मध्येच उठून रस्त्यावर भटकायला जाणं असं करून रात्र जागवायची असले या मुलांचे  प्रकार बरेच दिवस होत असत.  पुढं ही मुलं मोठी झाली तशी हळूहळू पालकांपासून सुटी होत गेली. मग त्यांचे आपापसात चाललेले खालच्या आवाजातले संवाद, एकमेकांना टाळ्या देऊन मोठ्यांदा हसणं, वरती घरात न येता तासनतास फाटकाशी आपापल्या सायकलींना रेलून गप्पा मारत राहाणं , एकमेकांना एसेमेस फॉरवर्ड करणं व  नेटवर चॅटिंग करत राहाणं सुरू झालं. त्यांचे कोवळे चेहरे आता काहीसे निबर होऊ लागले. बऱ्याच दिवसांनी त्यांच्यापैकी कोणी दिसला तर तो अचानकच ताडमाड उंच झाल्यासारखा वाटत असे. लहानपणी गोबरे गाल असलेल्या कुणाचा चेहरा एकदम बदलल्यासारखा वाटे. कुणाच्या ओठावर मिशीची रेघ उमटल्यासारखी वाटे. धड बालपण नाही, धड तारुण्य नाही अशा या आडनिड्या वयातली ही मुलं, त्यांचे कधी बालीश तर कधी प्रौढ असे विचार, त्यांचे ग्रूप्स आणि त्यातली घट्ट मैत्री हे बघताना मजा येत असे.  स्वतःच्या भूतकाळात चालत जाण्यासारखेच असे ते. दहावीचं वर्ष, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या शिकवण्या, पुढचे बेत यात गढून गेलेला असे. त्यातूनच एकत्र येऊन कधीतरी त्यांची धमाल चाले. आता त्यांचे वाढदिवस मॅक्डोलाल्डसमध्ये व्हायला लागले होते. मध्येच कधीतरी ही मुलं गंभीरपणानं ‘ आता आम्ही सगळे एकत्र असं हे शेवटचंच वर्ष. पुढया वर्षी कोण कुठल्या कॉलेजात असेल, मग आम्ही सगळे एकत्र असे कसे भेटणार? ‘ असा विचार करत.

आणि अचानक एखादा आघात व्हावा तशी अद्वैतच्या अपघाताची बातमी आली. तो अतिदक्षता विभागात आहे आणि अत्यंत गंभीर अवस्थेत आहे हे सांगताना माझ्या मुलाचा आवाज कापरा झाला होता. आणि ते कापरेपण लपवणे काही त्याला जमत नव्हते. शर्थीचे वैद्यकीय उपचार सुरुच होते. शाळेत त्याच्यासाठी प्रार्थना सुरू झाल्या. एरवी उत्साहानं फुललेल्या या मुलांचे चेहरे एकदम काळवंडून गेले. त्याला इस्पितळात भेटण्याची तर कुणालाच परवानगी नव्हती. पण त्याच्या पालकांना भेटून आलेली ही मुलंही दबकल्यासारखी झाली होती.  ’आपण त्याला हाका मारू आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ते त्याच्या उशाशी वाजवत राहू म्हणजे तो लवकर जागा होईल’ असं या मुलांचं त्याच्या मित्रांशी बोलणं ऐकलं  आणि मी त्या खोलीतून बाहेर पडलो. ‘बाबा, ही इज सिंकिंग’ असं माझ्या मुलानं मला नजर टाळत सांगितलं आणि त्याचाकडं बघून काही बोलणं मलाही जमलं नाही.  

आणि आज हे. 

इस्पितळात अद्वैतच्या वडिलांना सामोरं जायचा धीर होत नव्हता. सर्वस्वाची होळी होत असताना गुढग्यांना मिठी घालून एकटक नजरेने समोर पाहात ओढ्याकाठी बसलेले ‘बिटाकाका’ आठवले. ‘त्याला भेटा, तो एकशे तीनमध्ये आहे.. ‘ ते कसेबसे म्हणाले. त्यांच्या ‘भेटा’ या शब्दाने आतवर खोल काहीतरी भळभळू लागलं.

भेटलो. मृत्यूची चिरशांती पांघरलेला अद्वैत. पंधरा वर्षांत संपून गेलेलं एक आयुष्य. मन पूर्ण कोरं करणारा क्षण.

परत निघालो. गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. माझ्या मुलाशेजारी त्याचा एक मित्र बसला होता. एरवी दिवसेदिवस तरुण होत जाणारी ही मुलं आता अगदी लहान, अगदी असहाय वाटत होती. हवा अगदी स्वच्छ होती. माझ्या चष्म्यामागे मात्र मळभ दाटून येत होते. 

घरी आलो. अंथरुणावर पडलो. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. विविध प्रसंगांचे, आठवणींचे तुकडे मनात उलटेसुलटे फिरत होते. मृत्यूच्या विक्राळ दर्शनाने बावरलेल्या, हादरून गेलेल्या त्या कोवळ्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोरून हालत नव्हते. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.
शेवटी उठलो. एक आवडते पुस्तक काढले. शेवटचे पान उघडले आणि वाचू लागलो…

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मिकी नाहीसे झाले. त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठेतरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.
अशव्त्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित ‘समजत नाही, समजत नाही’ असे म्हणत एक उच्छ्वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात’ समजत नाही, समजत नाही, समजत नाही’
की ‘समजत नाही, समजत नाही ’ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील?  ते देखील समजत नाही .