वर्तुळ

हातातला डबा मी हळुवारपणे पाण्यात सोडला. कृष्णेच्या पाण्यात राख आणि अस्थींचा एक लहानसा पांढरा ठिपका उमटला. निश्चल नजरेनं मी समोर पहात राहिलो. बघता बघता समोरच्या देखाव्याचा तुकड्यातुकड्यांचा कॅलिडोस्कोप झाला. काळेपांढरे, रंगीबेरंगी तुकडे एकमेकात मिसळून थरथरत, तरंगत राहिले‍. जराशानं त्याचा एकच धूसर, हलता पडदा झाला ड़ोळे मिटले तसं डोळ्यातलं पाणी ओघळून गालावर आलं.

आक्का गेली. तशी ती एकदोन वर्षं कधीही जाईल अशीच होती.महिन्यातून एखाद्या वेळी तिची भेट होई, तेंव्हा काळाच्या वरवंट्याखाली भरडला जाणारा तिचा जीव पाहून काळजाला हिसका बसे.दम्यासारख्या निर्दयी विकाराबरोबर तिच्या दुबळ्या फुफ्फुसांनी चालवलेली झुंज पाहून वाटे, यातून ही सुटली तर बरं होईल.तिच्या डोळ्यांना तर केंव्हाच दिसेनासं झालं होतं. गेल्या काही वर्षांत तर तिचे पायही गेले होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिला उचलून न्यावं लागे. तिचा एके काळचा सुखवस्तू देह वाळून-कोळून बाहुलीइतका राहिला होता.म्हाताऱ्या, निस्तेज आंधळ्या डोळ्यांनी तू क्षितिजापलिकडल्या दूतांची वाट बघत बसलेली असे. नात्यातलं, परिचयाचं कुणी वृद्धापकाळानं गेल्याचं कळालं की ‘सुटला बिचारा, बरं झालं’ असं ती म्हणत असे. रात्री खोकल्याची ढास अनावर झाली की तिचा थकलेला जीव घाबराघुबरा होई.त्या अंधाऱ्या माजघरातली रात्ररात्र चाललेली ‘आई अंबाबाई, आई अंबाबाई…’ अशी क्षीण विनवणी ऐकताना काळजाचा ठाव सुटत असे.

आक्काविषयी लिहिताना असं वाटतं की एवढं आवर्जून जिच्याविषयी लिहावं अशी ती कोण होती? एका साध्या घरात जन्मून साधेपणानं संपून गेलेली सामान्य स्त्री. आपला प्रपंच, मुलबाळं, नातेवाईक याच्यातच आयुष्यभर गुंतून राहिलेली. मुक्ती, स्वातंत्र्य, सुधारणा, क्रांती यांचा दूरान्वयानंही संबंध नसलेली. व्यासंग वगैरे तर सोडाच, पण संसाराच्या धबडग्यात अक्षरओळखही हरवून बसलेली. इतर लेखांच्या नायिकांप्रमाणं तिला कधी समाजाशी संघर्ष करावा लागला नाही, की कधी चार घरची धुणी-भांडी करून मुलाबाळांना वाढवावं लागलं नाही. उलट आयुष्यभर आपला संसार, कुळाचार, लग्नंकार्यं, श्राद्ध-पक्ष, चटण्या-कोशिंबिरी, पापड-लोणची यातच ती बुडून गेली. पाठीला पाठ लावून आलेल्या मुलांसाठी, मग नातवंडांसाठी, मग परतवंडांसाठी खस्ता खात आली.त्यातूनच देवधर्म, पैपाहुणे, शेतावरचे वाटेकरी आणि आपल्या प्रज्ञावंत पण कलंदर नवऱ्याचा संसार सांभाळत राहिली. खेड्यातला जन्म, लहानपणी झालेलं लग्न, त्या काळातल्या गैरसोयी, मुलांचे आजार, कडक सोवळं-ओवळं या सगळया सांसारिक अडचणींच्या फत्तरांतून आक्काची मधाळ माया पाझरत राहिली.म्हणून वाटतं की आक्काबद्दल लिहावं. व्यवहार आणि हिशेबांवर नातेसंबंध उभे करण्याच्या जमान्यात निखळ प्रेमाचा हा शेवटचा दुवा ‘नाही चिरा नाही पणती’ असा विसरला जाऊ नये.

  आक्का ही माझ्या आईची आई. माझ्या आठवणींच्या आजोळच्या वाटेवर आजही आजी आजोबांच्या प्रेमाची सावली आहे. माझ्या लहानपणी आमच्या गावात प्राथमिक औषधोपचारांचीही सोय नव्हती. आम्हा मुलांच्या आजारपणात आमच्या तोंडात औषधाचा पहिला डोस पडायचा तो आक्काच्या मांडीवरच. तेंव्हापासून अगदी अलीकडेपर्यंत आक्काच्या मांडीवरच्या नातवंडांचे फक्त चेहरे बदलत राहिले. आक्काचा हात सुगरणीचा होता. चिंचगूळ घाळून केलेली तिची साधी तुरीच्या डाळीची आमटी कुठल्याही मसालेदार रश्श्याच्या तोंडात मारेल अशी असे. तिच्या चपातीचे तर पदरन पदर मोजून घ्यावेत.माझे आजोबा खाण्यापिण्याचे रसिक होते. विद्वान वकील म्हणून त्यांचे तालुकाभर नाव होते. पण त्यांचा संसार बाकी तुकारामाचा. आक्काच्या जबाबदाऱ्या कधी संपल्याच नाहीत. लहानलहान मुलं, आजोबांचे पक्षकार, त्यांचे मित्र, घरी रहायला आलेले कुणी आश्रीत, वेळी-अवेळी जेवायला येणारी शेतावरची कुळं, घरातली मांजरं, आजोबांनी पाळलेला कुत्रा… हा सगळा आक्काचा संसारच होता. या सगळयाची उस्तवारी करताकरता आक्का पिचून जायची. जोडीला अनुवंशिकतेनं आलेला दमा होता. प्रत्येकाच्या आयुष्यात येतात तसे सुखदुःखाचे, बरेवाईट प्रसंग आक्काच्या आयुष्यातही आले. पण यातून कडवट होण्याऐवजी आक्का मात्र पिकणाऱ्या फळासारखी अधिकाधिक गोड होत गेली.

आक्का गेल्याचं खरं दुःख हे आहे. हा शोक एका व्यक्तीसाठी नाही, एका वृत्तीसाठी आहे. आक्कासारखं सुपाएवढं काळीज घडवायचं म्हणून घडवता येत नाही. शिक्षण, संस्कार, अनुभव… कशाकशानं ते मिळत नाही. येतानाच कुणी ते घेऊन येतो, आणि जाताना घेऊन जातो.

आक्का गेली आणि आणि माझं आजोळ संपल्याची जाणीव झाली. आजोळच्या घासावर नातवंडांचा हक्क असतो असं म्हणतात. आजी- आजोबांनंतरही नाती रहातात, नाही असं नाही, पण सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा निसटलासं वाटतं. पाची बोटांना जोडणारा पंजा निखळला असं वाटतं.

माणसामाणसांमधील नाती सुध्दा, काही लाभतात, काही नाही लाभत. जिथं ओलावा मिळेल, तिथली मुळं आपोआप घट्ट होतात. तिथल्या पायांना आपोआप नमस्कार घडतो. आणि एक दिवस अचानक जाणवतं- आज पाठीवर आशीर्वादाचा कापरा हातच नाही. धागे तुटत चालल्याची जाणीव काळीज भेदून जाते.

अलीकडं आक्का फारच थकली होती. आपलं परावलंबित्व तिला नकोसं वाटे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तिला सावकाश उचलून ठेवलं की ‘माझा पांग फिटला की रे पोरा…’ असं ती म्हणे. ‘असंच मला नंतरही उचल बरं का…’ ती गंमतीने म्हणायची. ‘काही काळजी करू नकोस आक्का.. अगदी सावकाश उचलीन.. तुला कळणारही नाही…’ मीही तिची चेष्टा करायचो. आज या आठवणीने घशात हुंदका अडकतो!

मी तिला भेटायला गेलो, तेंव्हा ती अर्धवट ग्लानीत होती. वैद्यकीय उपचार थकले होते. तिचा मऊ, सुरकुतलेला हात मी हातात घेतला. ‘आक्का, मी आलोय. मला ओळखलंस का? डोळे उघड बघू…’ मी म्हणालो. आक्कानं कष्टानं डोळे उघडले.  ‘पोरं बरी आहेत..?’ तिनं खोल गेलेल्या आवाजात विचारलं. तिचा नेहमीचा प्रश्न! जीवनमृत्यूच्या सीमेवरही तिला माझ्या मुलांची खुशाली विचारायचं भान होतं. दिवसभर तिनं तिच्या मोठ्या बहिणीची, काशीताईची आठवण काढली होती. ‘काशीताई, मला खेळायला ने गं…’ आक्का अर्धवट बेशुद्धीत म्हणत होती. पण काशीताई चारपाच दिवसांपूर्वीच पैलतीरावर पोचली होती. आक्काचा आठवणीच्या खोल कप्प्यातली चारपाच वर्षाची छोटी मुलगी तिच्या ताईला म्हणत असावी ‘ ताई, मला खेळायला ने गं…’

अवघ्या काही तासांतच काशीताईपर्यंत आपल्या धाकट्या बहिणीची हाक पोचली!

दूर कुठेतरी, तर्कांच्या पलीकडे, अज्ञाताच्या बागेत बहिणीबहिणींची भातुकली रंगली असेल का? ‘चिंगुताई, तू भाकरी कर, मी पोरांना वाढते’ म्हणून काशीताईनी लुटुपुटुची पंगत घेतली असेल का? आक्काच्या त्या खोट्याखोट्या चुलीवरची भाकरी तशीच टम्म फुगली असेल का?

‘तुझा थोरला भाऊ अगदी देखणा दिसायचा लहानपणी…’ आक्का सांगत असे.’गोरापान, राजबिंडा.. मग सगळे घ्यायचे त्याला उचलून. तू असा किरकिऱ्या. सदानकदा आजारी. मग कुठं जायचं झालं की तुला माझ्याजवळच ठेवून जायची तुझी आई. लहान होतास, पण  रहायचास तू चांगला माझ्याजवळ. माझ्या मांडीवरच झोपायचास. तुला मांडीवर थोपटून थोपटून हाडं झिजली बघ माझी…’

वाळलेल्या, झिजल्यासारख्या दिसणाऱ्या अस्थी प्रवाहाला लागल्या होत्या. मी हात जोडले. कृष्णेकाठी फुललेलं एक आयुष्य कृष्णेत विसर्जित झालं.कालचक्राचं एक वर्तुळ पूर्ण झालं.

यह प्रविष्टि Akka, Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

7 Responses to वर्तुळ

 1. रावसाहेब,
  आजपर्यंतचं तुम्ही केलेलं हे माझं सर्वात आवडतं लिखाण!

  अत्यंत टचिंग आणि केवळ सुरेख!!

  अन्य शब्द नाहीत!

  सध्या चंचीमुळे, पिरंगुटमुळे आपण दोस्त झालो आहोत ही गोष्ट वेगळी, पण भविष्यात पुढे कधी आपण कट्टर दुष्मन जरी झालो, तरी हा लेख माझ्या मनातल्या पहिल्या दहा लेखांपैकीच एक नेहमी असेल!

  तात्या.

 2. Pradeep कहते हैं:

  Sanjop-raav,

  Brought a lump in my throat as I read this. You have a flair for writting (and honestly, I envy you for that). But my envy apart, I wish you happy writtings in future….

 3. techmilind कहते हैं:

  संजोप,

  तुम्हाला मी तुमच्या ह्या लेखाबद्दल माझे मत आधीच कळवले आहे. माझी मावशी ह्या अक्कांसारखीच होती. ह्या लेखाबद्दल, माझेच विचार आपल्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्याबद्दल मी आपला आजन्म ऋणी आहे. वहिनींना नमस्कार सांगा.

  – मिलिंद

 4. yogesh कहते हैं:

  This is undoubtedly the best article from you.

 5. abhijit कहते हैं:

  भिडला भिडला रे..काळजाला.

  निशब्द झालोय…अजून काय लिहू?

  अभिजित

 6. छान!!! कहते हैं:

  तुमच्या ब्लॉगवर उपक्रमावरून आले. आणि तात्यांच्या ब्लॉग नंतर तुमच्या ब्लॉगची फॅन झाले. एकाहून एक सुंदर पोस्ट्स आहेत. ही पोस्ट मनाला भिडून गेली

 7. शुचि कहते हैं:

  वाचताना कसतरीच होत होतं. मला तरी दु:खाला सामोरं जाता येत नाही. जवळच्या व्यक्तीच्या नाहीच नाही मग माझी उलटी प्रतिक्रिया होते, मी त्या व्यक्तीवरच चिडते/रागवते , मी अन्क्म्फर्टेबल होते. मला दु:खात असलेल्या व्यक्तीचा तिरस्कार का काहीतरी विचित्र वाटतं.

  ही कथा वाचताना इतकी गुंतले की तसच काहीसं होऊ लागलं. : ( ……. !!! it evoked certain discocomfort in me….acute discomfort. something somewhere is aching not sure what & where. it must be a lump in throat. पण तो ना धड गिळता येतोय ना रडवतोय.

  गुड जॉब!!!

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s