‘सेहर’ आणि ‘कुछ मीठा हो जाये’

‘लगे रहो मुन्नाभाई’ बघीतला. आवडला. पण अर्शद वारसीसारखा गुणी कलाकार आता लोक फक्त ‘सर्किट’ या एकाच भूमिकेत स्वीकारणार की काय अशी शंका आली. ‘मुन्नाभाई’ च्या दोन भागांमध्ये वारसीचे बरेच चित्रपट येऊन गेले, पण ‘सलाम नमस्ते’ सोडला तर त्यातला इतर कोणताच चालला नाही. ‘सलाम नमस्ते’ (‘नाईन मंथस’ ची भ्रष्ट नक्कल, पण ते जाऊ द्या!) च्या यशातही वारसीचा वाटा किती हाही एक प्रश्नच. या लेखात मला लिहायचे आहे ते बाकी वारसीच्या ‘सेहर’ आणि ‘कुछ मीठा हो जाये’ या दोन चित्रपटांविषयी.
‘सेहर’ हा एक वेगळाच सिनेमा आहे. उत्तर प्रदेशातले माफिया गट, सत्तेच्या वर्चस्वासाठी त्यांचा सतत सुरु असलेला संघर्ष, सत्तालोलुप राजकारण्यांचा त्यांना मिळणारा आश्रय आणि काही कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना आपले कर्तव्यपालन करत असताना द्यावी लागणारी आहुती या तसा जुनाच विषय. पण ‘सेहर’ मध्ये याची अगदी वेगळीच मांडणी आहे. कलाकारांची निवड, दिग्दर्शन, चित्रिकरण यातले या चित्रपटातले वैविध्य बघीतले, की असा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारावा याचे वैषम्य वाटते. पण ‘सेहर’ मधले मला सर्वाधिक भावले ते संवाद. हिंदीचा इतका सुरेख वापर कदाचित सध्याच्या लेखकांमध्ये गुलजारसाहेबच करू शकतील ( आठवा. ‘साथिया’ मधले संवाद- ‘हमारे और आपके  पिताजी मिले थे – जैसे वाजपेयीजी मिले थे मुशर्र्फजींसे – आगरा समेट से कम न थी उनकी मुलाकात!) उत्तर भारतात बोलल्या जाणाऱ्या हिंदीची नजाकतच काही और आहे. शुद्ध हिंदीचा हा लेहजा संवादलेखकाने फार सुरेख पकडला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सेलफोनविशेषज्ञ प्राध्यापक तिवारी यांना पोलीस वापरतात त्या हत्यारांविषयी एक भयगंड असतो. अशा एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीपमधून जाताना डॅशबोर्डवर ठेवलेल्या रिव्हॉल्वरने तिवारी अस्वस्थ होतो. ती अस्वस्थता लक्षात येऊन तो अधिकारी त्याला  विचारतो ‘आपको अब भी इन चीजोंसे परहेज है?’ ‘हां..मतलब…’ तिवारी चाचरतो. तो पोलीस अधिकारी रिव्हॉल्वर काढून घेताघेता विचारतो ‘लता मंगेशकरसे तो परहेज नही है ना?’ तिवारी खळखळून हसतो ‘ नही, उनसे कोई परहेज नही है’. पोलीस अधिकारी कॅसेट सुरु करतो ‘अजीब दासताँ है ये…’ जीप निघून जाते. अशा लहानसहान प्रसंगांतून पटकथा खुलत जाते.
‘सेहर’ मधल्या कलाकारांची आणि दिग्दर्शनाची विशेष दाद द्यावी लागेल. ए.एस.पी. अजयकुमारच्या भूमिकेत अर्शद वारसी, त्याच्या आईच्या भूमिकेत सुहासिनी मुळ्ये, खलनायक गजराज सिंगच्या भूमिकेत सुशांत सिंग आणि अनामिकेच्या भूमिकेत महिमा चौधरीने मझा आणली आहे. पण मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो बाकी राजेंद्र गुप्ता, नावेद अस्लम आणि पंकज कपूर यांचा. राजेंद्र गुप्ता हा इतका प्रतिभावान कलाकार थिएटर आणि छोट्या पडद्यावरच का गुदमरावा हे कळत नाही. शक्ती कपूर आणि कादरखानसारखे विदूषक मोठ्या पडद्यावर यशस्वी होतात, आणि राजेंद्र गुप्तासारख्याला मालिका करत रहावे लागते! जगा तुझी रीत सदा उरफाटी! असो. असिस्टंट डेप्युटी जनरल ऑफ पुलीस या भूमिकेचे गुप्ताने सोने केले आहे. गुणी कलाकाराला दिग्दर्शित करताना दिग्दर्शकाला फारसे कष्ट पडत नसावेत. गुप्ताने त्याच्या देहबोलीतून या भूमिकेचे लहनसहान कंगोरे फार सुरेख दाखवले आहेत. नावेद अस्लम हाही तसाच एक नैसर्गिक कलाकार. फार पूर्वी ‘हॉस्पिटल’ नावाच्या एका मालिकेत त्याची सुंदर भूमिका पाहिल्याचे स्मरते. त्यानंतर तो फारसा कुठे दिसला नाही. ‘सेहर’ मधली त्याची भूमिका तशी कमी महत्त्वाची. पण त्याने ती छान खुलवली आहे. वारसीच्या घरी फोन करून धमकी देणाऱ्या गुंडाबरोबरचा आणि किडनॅप झालेल्या बिल्डरबरोबरचा असे त्याचे प्रसंग खास दाद देण्यासारखे.
पंकज कपूर या माणसाविषयी काय लिहावं? त्याचा भूमिकांमध्ये इतकी विविधता असते की ज्याचं नाव ते. ‘सेहर’ मधला तिवारी हा अंतर्बाह्य प्राध्यापक आहे. पोलीस, गुंडगिरी, हिंसाचार याविषयी घृणा असलेला एक अत्यंत सुसंस्कृत प्राध्यापक. नाईलाजानं त्याला या चक्रात सामिल व्हावं लागतं. तिथलं काम करत असतानाचं त्याचं घुसमटणं. तरीही झोकून काम करण्याची त्याची वृत्ती आणि शेवटी हातात शस्त्र घ्यावं लागताना आलेली असहायता पंकज कपूरनं लाजवाब दाखवली आहे. सेलफोनच्या तंत्रज्ञानाविषयी तो लेक्चर घेताना असं वाटतं की हा खराच टेलीकम्युनिकेशनचा प्राध्यापक आहे! 
‘सेहर’ मध्ये कुठेही व्यावसायिक तडजोडी केलेल्या दिसत नाहीत. नायक नायिकेचे बागेतले गाणे, आयटम साँग, गरज नसताना घुसडलेली विनोदी पात्रे.. असले काही नाही. इतकेच काय, पण कथेची गरजच तशी असल्यामुळे गुंडांबरोबरच्या शेवटच्या चकमकीत नायकाचे आश्चर्यकारकरीत्या सहीसलामत वाचणेही दिग्दर्शकाने टाळले आहे. कदचित त्यामुळेच लोकांना हा चित्रपट आवडला नसावा!
‘कुछ मीठा हो जाये’ हाही असाच वेगळा चित्रपट. विमानात बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना रात्रभर विमानतळावर रहावे लागते, पहाट होते, विमानातला बिघाड दुरुस्त होतो, आणि प्रवाशांना घेऊन विमान निघून जाते- राज कपूरच्या ‘जागते रहो’ ची आठवण यावी अशी ही कथा. अर्शद वारसीने सतत दारूच्या अमलाखाली असणाऱ्या विमानतळावरील प्रमुख अधिकाऱ्याची भूमिका अगदी सहजपणे केली आहे. पण खरी गंमत आणली आहे ती त्याच्या सहकाऱ्याच्या भूमिकेतल्या जसपाल भट्टीनं. ‘कुछ मीठा…’ मधले संवादही असेच दाद देण्यासारखे. सरदार भट्टी वारसीला माचीस मागतो. वारसी आधी एक घोट घेतो आणि मग  म्हणतो.’ माचिस होती तो सारी दुनिया को आग न लगा देता मैं …’  मग चमकून विचारतो, ‘तुला कशाला रे पाहिजे माचिस? तू तर सरदारजी…’ भट्टी म्हणतो,’ दातात चिकनचा तुकडा अडकलाय, तो काढायला..’ ‘माझ्याकडं टूथपिक आहे की…’ वारसी म्हणतो. भट्टी सुस्कारा सोडतो ‘जो मजा माचिस में वो टूथपिकमें कहां सर…’
वाइन सर्व्ह करणाऱ्याला भट्टीला कर्नल विचारतो, ‘कौनसी वाईन पिला रहे हो, जवान?’ भट्टी त्याच्या लाजवाब टायमिंगने म्हणतो ‘पता नही सर, एक यही है जो हमारे सर की नजर से बची है!’
थोडासा हुरहुर लावणारा तरी वास्तववादी शेवट असलेला ‘कुछ मीठा…’ आवडून जातो, इतका की पाहुणा कलाकार म्हणून शेवटी आलेला शाहरुख खानही अनावश्यकच वाटतो!
जे कसदार असते त्याला नेहमीच लोकाश्रय मिळतो असे नाही. पण असे काही आहे, हे कळावे हेच या लेखाचे प्रयोजन.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

1 Response to ‘सेहर’ आणि ‘कुछ मीठा हो जाये’

  1. Sandeep Lele कहते हैं:

    Lekh avadala – khuup chhan ahe.

    Punyat lavakarach Asian Film Festival ahe… gelya varshi kahi uttamottam chitrapat pahayla milale hote. Ya varshi hi asech kahi baghayla milale tar bahar yeil. Aso, vishayantara baddal kshamaswa.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s