मिलिंद बोकील -आश्वासक लेखन

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कारणाने मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. दूरदर्शनवरचे रटाळ कार्यक्रम आणि आपण सातत्याने हरणारे क्रिकेटचे सामने बघून मी बऱ्यापैकी कंटाळलो होतो. त्याच त्याच लेखकांच्या पुस्तकांच्या वाचनातही मन लागत नव्हते. अशातच मिलिंद बोकील या नव्या लेखकाचे ‘उदकाचिया आर्ती’ या नावाचे पुस्तक हाती लागले. पुस्तकाच्या नावाने कुतुहल चाळवले गेले. सहज म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि पहातापहाता त्यात गुंतत गेलो. दोनएकशे पानांचा कथासंग्रह मी एकटाकी वाचून काढला आणि भारावून गेलो. हे काहीतरी वेगळेच रसायन होते. थोडीशी नेमाडेंची वैचारिक स्पष्टता, थोडीशी अनिल अवचटांची तळमळ आणि तरीही एक संपूर्ण स्वतःची वेगळी अशी शैली. त्या कथांमधले अचूक वैज्ञानिक संदर्भ, कथांचे विषय, त्यातली व्यक्तीचित्रे.. सगळेच अगदी नैसर्गिक आणि आपल्या आसपासचे आणि तरीही काहीसे वेगळेच.  चळवळीच्या धुंदीत घरदार विसरून कलंदर,वैराण  झालेल्या पण आपल्या मुलाच्या जन्माने आयुष्याला जणू एक हिरवागार कोंभ फुटावा तसे ओलावलेल्या शशिकांतची ‘भावी इतिहास’ ही कथा, जबरदस्तीने हा देश सोडाव्या लागणाऱ्या धर्मोपदेशक फादरची ‘भूमी’ ही कथा,  अमेरिकन संस्कृतीचा बळी पडून शेवटी नाइलाजाने घटस्फोट घ्यावा लागणारे ‘विदेश’ या कथेतले सीमा आणि चंद्रशेखर, मेधा पाटकरांवर लिहिलेली ‘उदकाचिया आर्ती.. या सगळ्याच कथा मला अतिशय आवडल्या. हा कोण नवीन लेखक हे जाणून घ्यावेसे वाटले. पुढे बोकिलांचा ‘झेन गार्डन’ हा कथासंग्रह वाचून तर ‘उदकाचिया आर्ती’ चे अस्सलपण हा ‘फ्लूक’ नव्हता याची खात्री पटली. हाही कथासंग्रह तेव्हढाच आवडला.
मिलिंद बोकील हे पिंडाने खरे तर कथाकार नव्हेत. विविध सामाजिक प्रश्नांशी संबंधीत ते सखोल अभ्यासकर्ते आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत. पण बहुतेक वेळा अशा कामांतून मिळणारे अनुभव खऱ्या प्रतिभावंताच्या सुप्त प्रतिभेला लिहायला उद्युक्त करतातच. बरोबरीने जर भाषाप्रभुत्व आणि कल्पनाशक्तीची देणगी असेल तर कसदार लेखन सहजी लिहिले जाते. बोकिलांच्या बाबतीत हेच झाले आहे.
त्यानंतर आलेल्या बोकिलांच्या ‘शाळा’ या कदंबरीने खरे तर थोडी निराशाच केली. प्र. नां संतांच्या धर्तीवर लिहिलेली ही कादंबरी वाईट नाही. पण बोकिलांच्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मला ती फिकी वाटली. दरम्यान बोकिलांनी इतरत्र, विशेषतः दिवाळी अंकांमधून जोरकसपणे लिखाण केले आहेच. आणि ताज्या ‘साप्ताहिक सकाळ’ (२४ जूनपर्यंचा आठवडा) मधील ज्या लेखामुळे मला हे लिहावेसे वाटले तो बोकिलांचा ‘जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण रोखायला आपापल्या भाषा सांभाळा‘ तो लेख तर आवर्जून वाचावा असा आहे.
एकतर जागतिकीकरणाला बोकिलांनी वापरलेला ‘सपाटीकरण’ हा शब्द मला फार आवडला.  जागतिकीकरणात प्रामुख्याने सगळे जग ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ असा विचार केला जातो. मग या बाजारपेठेत जर आपला माल विकायचा असेल तर तो शक्यतोवर एकसारखा, सपाट असावा. जगात लोकांच्या पोषाखापासून खाण्यापिण्याच्या पद्धतींपर्यंत सगळे कसे सारखे होत आहे याची बोकील काही मनोरंजक, पण विचार करायला लावणारी उदाहरणे देतात.  जगभर लोकांचे विचारही कसे एकसारखे होत आहेत यावरही ते प्रकाश टाकतात.

सपाटीकरणामध्ये विविधता हाच कसा मोठा अडथळा ठरतो आहे, याचे बोकिलांनी बरेच दाखले दिले आहेत. उदाहरणार्थ जागतिक बाजारपेठेत प्रामुख्याने गहू, मका, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो यांनाच मागणी आहे. त्यात कुळीथ, हुलगे, वरी, नाचणी, एवढेच नाही, तर ज्वारी-बाजरीलाही स्थान नाही‌. सपाटीकरणात सगळ्यांनी फक्त पॅन्ट, शर्ट, बूट घालावेत; धोतर, बंडी, लुंगी. फेटा यांना जागा नाही. सगळ्यांनी जल्लोष करायचा जगभर एकच दिवस – ३१ डिसेंबर. नागपंचमी, वसूबारस, बैलपोळा, ऋषीपंचमी, तुळशीचे लग्न हे सगळे सण बाद. ते मागासलेले, अंधश्रद्धाळू लोकांचे सण. आधुनिक जगात त्यांना स्थान नाही. भारत, ब्राझील अशा जैवसमृद्ध राष्ट्रांसाठी हा धोक्याचा इशारा मानला पाहिजे. पण सपाटीकरण हे अपरिहार्य असल्याने त्याला विरोध कण्यात उर्जा वाया न घालवता सपाटीकरणातही आपल्याला आपली स‌ंस्कृती शाबूत कशी ठेवता येईल यावर या लेखात विचार केला आहे. 
महत्वाचे म्हणजे सपाटीकरणाला विरोध म्हणून लोकांनी धोतर नेसणे सुरु करावे किंवा मुलांना सकाळसंध्याकाळ संध्या करायला लावावी यासारखे कोणतेही आततायी मार्ग बोकील सुचवत नाहीत. याउलट विविधतेने समृद्ध असलेल्या भारतासारख्या देशात, किंबहुना सगळ्या भारतियांनी – मग ते जगात कुठेही असोत – आपापल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करावे असा अतिशय सुजाण मार्ग त्यांनी सुचवला आहे.
‘मनोगत’ ची स्थापना आणि ‘मनोगत’ वर वेळोवेळी व्यक्त झालेले विचार यांच्या संदर्भात मला हा मर्ग फार महत्वाचा वाटतो. भाषचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी बोकिलांनी सुचवलेले उपाय काही फार नवीन नाहीत, पण या निमित्ताने ते अधोरेखित करावेसे वाटतात. सर्व ठिकाणी आपली भाषा हिरिरीने बोलणे, भाषेच्या सर्व बोली – मराठीचाच विचार केला तर वऱ्हाडी, अहिराणी दख्खनी, भिली, डांगी, मालवणी इ.- सांभाळणे, आपली भाषा नवनवीन बदलांना उघडी ठेवणे आणि आपल्या भाषेत दर्जेदार साहित्य निर्माण करणे असे हे काही उपाय आहेत. आपली भाषा जगली तर आपणही जगू, आपली संस्कृतीही जगेल हा विचार मला स्वप्नाळू नव्हे तर आशावादी वाटतो.
शेवटी बोकिलांच्या लेखातला मला आवडलेला एक उतारा. बोकिलांच्या या लेखाचे सारच या उताऱ्यात आले आहे असे म्हणता येईलः
‘आपण जे काही आहोत – राकट, कणखर, दगडांच्या देशांचे, ज्वारी बाजरीचे, बांगड्या सुरमईचे, ओव्या अभंगांचे, लावणी गौळणींचे, गाथा गीताईचे, श्यामच्या आईचे, मोटेवरच्या गाण्यांचे, शेतकऱ्याच्या आसूडाचे, बटाट्याच्या चाळीचे आणि बनगरवाडीचे – ते सगळे आपल्या भाषेमुळे आहोत’


ज्याच्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा ठेवता येतील असा हा लेखक आहे, असे मला वाटते.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

5 Responses to मिलिंद बोकील -आश्वासक लेखन

 1. Meghana Bhuskute कहते हैं:

  बोकील मस्तच लिहितात हे खरंय. पण मौजेच्या एका दिवाळी अंकात, उघड उघड गौरी देशपांडेवर बेतलेली एक दीर्घकथा / लघुकादंबरी वाचली होती. मला वाटतं तिचं नाव ’एकम्‌’. सई परांजपेच्या ’साझ’सारखा प्रकार होता. ती वाचून मात्र एक्दम संताप आला होता. कुणी वाचलीय का ती कथा? काही मत?

 2. भोचक कहते हैं:

  बोकीलांचं उदकाचिया आर्ती अनेकदा बघितलं. पण तेव्हा वाचायसाठी घेणं झालं नाही. पण शाळा वाचलं. ते मला आवडंल. कदाचित ते ज्या वातावरणाचं वर्णन आहे, ते माझ्या वातावरणालाही लागू असल्याने असेल आणि कदाचित त्यातलं वर्णन काही अंशी माझ्याही आयुष्याला लागू असेल म्हणून मला ते आवडलं. सा. सकाळमधला लेख मीही वाचला. छानच लिहिलाय. त्यांचं कातकर्‍यांवरचं पुस्तक वाचलं. ते आवडलं. आत्ताच एका दिवाळी अंकात त्यांचा ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींवरचा लेख वाचला तोही छान वाटला. स्थानिक विषय जागतिक संदर्भाने सांगण्याची त्यांची हातोटी छान आहे. लेखनही अर्थातच विचारप्रवर्तक.

 3. Amit कहते हैं:

  Good article !! by the way do you have the soft copy of the saptahik sakal article which you mentioned here?
  Thanks,
  Amit

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s