भात आणि बिर्याणी

भात या खाद्यप्रकाराचे का कुणास ठाऊक, ऐदीपणाशी एक नाते जोडले आहे. ‘गरमगरम तूपभात खाऊन…’ च्या समोर ‘झोपणे’ हेच क्रियापद आपसूकपणे येते! ‘चांगला रबरबीत कालवलेला दहीभात खाऊन तो रणरणत्या उन्हात सायकल हाणीत कामावर गेला’ हे वाक्य काही केल्या मनाला पटत नाही.भातासारख्या अद्वितीय खाद्यप्रकारावर हा जरासा अन्यायच आहे असे म्हणवे लागेल. भाताचा आजारपणाशीही असाच एक अनाकलनीय  संबंध जोडला गेला आहे. ‘जराशी कणकण वाटत होती, म्हणून वरणभात खाऊन गुरगुटून झोपलो…’ असे सांगणाऱ्याला ‘मित्रा, अरे कणकण यायची वाट कशाला बघतोस?  बरं वाटत असतानाही कधीकधी वरणभात खाऊन गुरगुटून झोपत जा…’ असं सांगावसं वाटतं! ‘मला भात आवडत नाही’ असे सांगणाऱ्यांकडे मी केवळ दयार्द्र करुणाकटाक्ष टाकतो!

  भात! नुसता उकडलेला तांदूळ, पण स्थळकाळ पाहून कसे फुलावे , ते माणसाने त्याच्याकडून शिकावे! सभ्य, समारंभी जेवणात तो पांढराशुभ्र कुडता घालून, वरणाचा पिवळाधमक फेटा नेसून कपाळाला उभे गंध लावून येतो. नारळीपौर्णिमेला तो ताज्या नारळाच्या किसाच्या जोडीने बहिणीच्या आग्रहाच्या ताटातून येतो.नारळीभात खाणे गावंढळपणाचे वाटते म्हणून लोक हल्ली साखरभात खातात. साखरभाताचे पेशवाई महत्त्व सोडले तर तो त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि त्यातल्या लवंग- काजूंमुळेच अधिक ध्यानात रहातो. पण नारळीभाताला कसे ‘कॅरॅक्टर’ आहे! बाकी एक खरे, एखाद्या कसलेल्या गवयाचे गायन जसे साथीला तितकेच तयार तबलजी असताना अधिक खुलते तशी या नारळीभाताची  खरी लज्जत त्यावर सढळ हाताने सोडलेल्या साजूक तुपाच्या चमचमच्यांबरोबर खुलत जाते! ‘कोलेस्टेरॉल’ हा शब्ददेखील विसरायची तयारी असेल तरच या वाटेने जावे. दाक्षिणात्य सांबारभाताचे गोळे रिचवणाऱ्या मद्रदेशीयाचे चित्र काही फारसे लक्षात ठेवावे असे नसते, पण काजूची फोडणी घेऊन  सकाळीसकाळीच  भेटायला येणाऱ्या पोंगलने जिभेचे जीवन धन्य होते.सुब्बालक्ष्मीचे वेंकटेशस्तोत्र लागले की हाच भात बिचारा डाळींच्या आणि कढीलिंबाच्या गराड्यात ’बिशीबेळी भाता’ होऊन सतरंज्या उचलायला लागतो. त्यापेक्षा काळा मसाला घालून केलेला कोल्हापूर सांगलीकडचा ‘काळा भात’ कधीही सरस. त्यातच तोंडली, छोटी छोटी वांगी किंवा दोडक्याचे छोटे काप घालून केलेले प्रकारही अप्रतिम.

‘दही भात’ हा लहानपणी जसा खाल्ला तसा परत कधीच खायला मिळाला नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असायचे, आते-मामे भावंडं रहायला आलेली असायची. ‘कारट्यानो, उन्हात वर वर हिंडू नका. कुठं नाही बाहेर जायचं आता…’ असा दम देऊन पोरांना दडपून झोपवलं जायचं . चार वाजता वडीलांनी माडीच्या पत्र्यावर टाकलेल्या चुळीचा  आवाज यायचा. सताड जागीच असलेली मुलं उठून बसायची. दुपारचा चहा ही फक्त मोठ्या माणसांची चैन असायची. मुलांसाठी सकाळचा उरलेला भात कालवला जायचा. खापरीसारखी साय धरलेलं म्हशीचं दूध, कवडीदार दही आणि अगदी होय की नाही इतके मीठ असं सगळं घालून आई किंवा आत्या भात कालवायच्या. ताटल्या भरल्या जायच्या. भरड भरड कुटलेल्या शेंगदाण्याच्या चटणीची – आम्ही त्याला ‘शेंगदाण्याचं तिखट’ म्हणत असू- त्या पांढऱ्याशुभ्र भातावर पेरणी व्हायची. बघता बघता ताटल्या रिकाम्या व्हायच्या. ताटलीत शेवटचे बोट फिरवून ते जिभेने चाटले, की हात धुवून चला क्रिकेट खेळायला! दही भात हा असा कुळाचार पाळून करावयाचा प्रकार आहे. स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने काचेच्या ‘बाऊल’ मध्ये दहीभात कालवणारे काय, आमटीतल्या शेवग्याच्या शेंगा सुरी आणि काटेचमच्याने देखील  खातील! लहानपणी खाल्लेला हा दही भात आजही माझ्या स्वप्नात येतो.

भाताची ‘पुणेरी मसालेभात’ नावाची एक झक्क फसवाफसवी आहे. ‘कोबी भात’. ‘पनीर भात. ‘मोती पुलाव’ हे एखाद्या संमेलनाच्या मेनूत शोभून दिसणारे प्रकार, पण त्यांना काही खानदान नाही. भातात अस्सल राजघराणे बिर्याणीचे. चारमिनारची किंवा हजरतगंजची वाट असावी, हवेत बेगम अख्तरच्या गजलेचे स्वर असावेत, कुठेतरी हुक्क्याचा सुगंध दरवळत असावा, शायरीच्या किताबाची काही पाने फडफडावीत, एखादा जाम किणकिणावा आणि मेंदीने रंगलेल्या दाढीवाल्या उस्तादांनी आपल्या बुजुर्ग हातानी बिरयानी पेश करावी! शाकाहार, आरोग्य, हिंदू संस्कृती आणि मुगल साम्राज्य अशा शेंड्या धारण करणारे उग्र आठ्याळ पंचेधारी आचार्य पंचक्रोशीतही नसावेत. ‘गोश्त’ म्हणायला जुबान चाचरावी अशा त्या चावलबरोबर हमसफर झालेल्या अन्नब्रम्हाने घासाघासाला जन्नतची याद द्यावी. तुपात तळलेल्या कांद्याने केलेली कुरकूरही कानाला तंबोऱ्याच्या सुराइतकी गोड लागावी. एखाद्या राजपुत्रासारख्या भेटीस आलेल्या खानदानी आख्ख्या काजूने अदब वाढवावी. मधूनच झणझणणाऱ्या मसाल्याने तोंड, नाक, कान व डोळे यांचे अद्वैत सिद्ध करावे. ‘कबाब गर्म हैं जनाब, शौक फरमायेंगे?’ अशी विचारणा व्हावी . कुठे शौकीनांनी दिलेल्या ‘वक्कटे तीस्कोंडी’ च्या फरमायशीने वातावरणातली जान वाढवावी. ‘आता पुरे’ असा शरीराने आणि मनाने खुषीचा इषारा द्यावा. नरम जिभेच्या लोकांनी मीठी लस्सी मागवावी आणि मर्दांनी जर्द्याचे खुशबोदार पान! 
‘मानवी जीवन धन्य झाले….’ म्हणून जगाला दुवा देत बाहेर पडावे!

‘कुठेतरी चार सुखाचे घास खायला मिळावेत..’ अशी कामना करणाऱ्यांना घास म्हणजे भाताचेच घास – मग तो दही भात असो की बिर्याणी – अभिप्रेत असावेत अशी माझी धारणा आहे!

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

20 Responses to भात आणि बिर्याणी

 1. प्रमोद देव कहते हैं:

  संजोपजी नमस्कार!
  भाताचीच निरनिराळी रूपे आपण छानच वर्णन केलेत. मुख्य म्हणजे बिर्याणी हा प्रकारच मी कधी खाल्ला नाही(मी पूर्ण शाकाहारी आहे हे त्याचे कारण) त्यामुळे त्या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही.
  मात्र अगदी वरण-भात,दही-भात,नारळीभात वगैरे भातांचे वर्णन मात्र मस्तच झालेय.आजारपण आणि गुरगुट्या भात ह्यांची सांगड आठवून थेट बालपणात पोचलो.

  “भात! नुसता उकडलेला तांदूळ, पण स्थळकाळ पाहून कसे फुलावे , ते माणसाने त्याच्याकडून शिकावे! सभ्य, समारंभी जेवणात तो पांढराशुभ्र कुडता घालून, वरणाचा पिवळाधमक फेटा नेसून कपाळाला उभे गंध लावून येतो”

  हे वर्णन खास! इथे आपण आपली खास ‘जीए’ शैली वापरलेली दिसतेय.
  एकूणात लेख मस्त जमलाय!
  प्रमोद देव.

 2. संजोपशेठ,

  सुंदर लेख..

  वरणभात, आमटीभात, लखनवी मटणबिर्याणी, दहीदूधभात, साखरभात हे सगळे माझेही भाताचे आवडते प्रकार! वा वा क्या बात है..

  जियो संजोपशेठ! लेख वाचून मस्त वाटलं. औरभी कुछ लिखना भिडू…

  तात्या.

 3. अरे हो,

  फोडणीच्या भाताचाही विजय असो.. साखरभात, नारळीभातासारखे दिग्गज जेव्हा सोबतीला नसतात तेव्हा फोडणीचा भातच फार सुरेख साथ देतो! 😉

  तात्या.

 4. yogesh कहते हैं:

  सुंदर लेख 🙂 लगेच तोंडाला पाणी सुटले :-‘

 5. sanjopraav कहते हैं:

  फोडणीच्या भाताबरोबर खिचडीचाही उल्लेख राहून गेला. शिळा भात वाया जाऊ नये म्हणून खरे तर त्याला फोडणीची कलाकुसर करायची, पण नवरीपेक्षा करवलीच तोरा अधिक असावा असा हा फोडणीचा भात कधीकधी मूळ जेवणापेक्षा अधिक भाव खाऊन जातो. कढीलिंबाची तळून खुसखुशीत झालेली पाने, फुटाण्याची डाळ ( याला पंढरपुरी ‘डाळे’ असेही म्हणतात ) आणि शेंगदाणे याची फोडणी ,वरुन पेरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एखादी रसाळ लिंबाची फोड- बस्स! स्वर्गाचे द्वार किलकिले होते! रविवारी साडेआठ नऊच्या सुमाराला असा डिशभर फोडणीचा भात मिळावा, वर पाऊण कप दाट चहा मिळावा, ‘महाराष्ट्र टाईम्स’ ची पुरवणी वाचतावाचता मनावर सुखाचा तवंग पसरत जावा – असा एकच रविवार महिन्यात असला तरी पुरे!
  खिचडीचा बाकी माहौल बनावा लागतो. धुवाँधार पाऊस असावा, चिंब भिजून घरी यावं, कोरडे कपडे घालून होईतो मुदपाकखान्यातून भाजलेल्या पापडांचा सुगंध दरवळावा, अल्युमिनियमच्या डेचकीत तांदूळ, तूरडाळ, मीठ, जिरे आणि हळद या पाचच जिनसातून साकारलेले वाफाळते अन्नब्रम्ह समोर यावे. सोबत गुजराथी कढी किंवा लसूण घालून केलेले अगदी पातळसर पिठले. लागल्यास मुरलेल्या आंब्याच्या लोणच्याची फोड घ्यावी किंवा कारळ्याची – जिला कोल्हापुरी भाषेत ‘कोरट्याची’ म्हणतात ती- किंवा ताज्या लसणाची चटणी! हात धुवून होताहोता डोळ्यांवर गुंगी यावी! असा पाऊस याद ठेऊन जातो!

 6. Archana कहते हैं:

  hmmm, sadha varanbhaat kahi mi titkasa aavadine khaan nahi. pan matarbhaat, fodnicha bhaat (kuthlyahi prakare kelela),dahibhaat vishesh aavadatat. chicken/mutton biryaani maatr ajun khalleli nahi. mumbait ha padarth changla kuthe milel he kuni sangu shakel ka?

 7. Archana कहते हैं:

  aani ho lekh aavadala he sangayala nakoch! pan sangayche visarle mhanun vegla pratisad 🙂

 8. शशांक कहते हैं:

  वा! मस्त लेख. “माझे खाद्यजीवन” चा पुढचा भाग वाचल्यासारखे वाटले.

  माझ्या मते भाताचे खरे रूप पाहायचे तर कानडीचे संस्कार असणाऱ्या घराचा रस्ता धरला पाहिजे. मसालेभात, भरल्या मिरच्यांची फोडणी दिलेला दहीभात, (बेळगाव/हुबळी/धारवाड अश्या ठिकाणच्या कुण्या आजी/काकू/मामीने केलेला “बिशिब्याळी अन्ना”) हे आणि असले प्रकार मऱ्हाटी गड्यांना (त्यात बायकाही आल्या) तितकेसे जमत नाहीत असे माझे प्रामाणिक मत आहे.

  अवांतर –

  >> शाकाहार, आरोग्य, हिंदू संस्कृती आणि मुगल साम्राज्य अशा शेंड्या धारण करणारे उग्र
  >> आठ्याळ पंचेधारी आचार्य पंचक्रोशीतही नसावेत.

  रानटी अवस्थेतला मनुष्य मांसाहरीच होता. तरी पोट भरण्यासाठी म्हणून मांसाहार करणारे आणि चवीसाठी मांसाहार करणारे यात काहीतरी फरक निश्चितच असावा.

  मोंगल साम्राज्याबद्दल काय बोलावे ? सरकारी शिक्षणखात्याच्या कृपेने मोंगलांचा इतिहास आपण “भारताचा इतिहास” म्हणून शिकतो. मोंगल साम्राज्य आवडणारे लोक शिवाजीच्या काळातही होते. शिवाय परकीय आक्रमक असले म्हणून त्यांच्या संस्कॄतीला विरोध करावा असे थोडीच आहे? साहेबी संस्कृती नाही आपण कवटाळली? बराचवेळ मराठीत बोललात तर ऐकणाऱ्यांची तोंडे मीठ जास्त झालेला फोडणीचा भात खाल्यासारखी होत नाहीत? (या पाककृतीत प्रतिसाद मिळवण्याजोग्या (वादग्रस्त/वादमूलक) उपपदार्थांची (ingredients) कमतरता जाणवल्याने अवांतर भाग लिहिला आहे. कृ. स. ह. घ्या. 🙂

 9. techmilind कहते हैं:

  बिर्याणी हैदराबादलाच खावी (चारमिनारपासून एका मैलाच्या परिसरात. अगदी सिकंदराबाद च्या बिर्याणीला देखील ती चव नाही.)

  भाताचा एक प्रकार आपल्या लेखात आला नाही. तो म्हणजे चंद्रपुरी वडाभात. ह्याला काही लोक अज्ञानातून “नाागपुरी वडाभात” म्हणतात. ते चुकीचे आहे. चंद्रपुरात देखील गोंड राजाने बांधलेल्या किल्ल्याच्या आत एखाद्या बोळात “मामीडवार”, “वरगंटीवार”, असे “वार”करी घर शोधून तिथे पत्रावळीवर पांढऱ्याशुभ्र भाताचा ढीग घेऊन चार-सहा डाळीचे वडे कुस्करावे. वर लसूण-मोहरीची फोडणी घ्यावी. सोबत हिंग गूळ घातलेले चिंचेचे सार प्यावे. अर्थात जेवणानंतर चार पाच तास रिकामे असतील तरच. कारण त्यानंतर “ताणून देणे” ही एकमेव कृती शक्य असते.

  भाताचा मधुमेहाशी संबंध जोडणाऱ्या डॉक्टरांना शिव्या शाप देत हा पदार्थ खावा.

  – सर्किट

 10. Koham कहते हैं:

  Sundar Lekh…….biryani khayalach havi ekada…

 11. सागर चन्द नाहर कहते हैं:

  संजोप जी
  एक कमी और भी है अभी, आफ पोस्ट करते समय Post Slug सही नहीं कर रहे हो, आप जहाँ पोस्ट लिखते हैं वहाँ साईड में Post Slug लिखा है देखिये, उस पर क्लिक कर लेख का शिर्षक अंग्रेजी में लिख दीजिये जैसे इस लेख के लिये bhatanibiriyani लिख दीजिये, बाद में उसे बन्द कर पोस्ट कीजिये जिससे आपकी पोस्ट का लिंक भी अच्छा होगा और पोस्ट भी सही खुलेगी। देखिये अभी आपका पोस्ट का लिंक है https://sanjopraav.wordpress.com/2007/02/26/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80/#comments
  मरे बताये तरीके से बदलने के बाद यही लिंक https://sanjopraav.wordpress.com/2007/02/26/bhatanibiriyani हो जायेगा।
  और हाँ हिट्स काऊंटर भी लगाइये यार कितने लोग आ रहे हैं या पढ़ रहे हैं कैसे पता चलेगा?

 12. माधव कुळकर्णी कहते हैं:

  आंबटवरण भात हा आमच्या आजोळचा प्रकार आठवला.
  कैरीचे आंबटवरण, भात, तळलेला पापड किंवा मिरची व लसुण-खोबऱ्याची सुकी कुटलेली चटणी….
  भरपेट जेवायचे व मस्त ताणून द्यायची !

 13. Prachi कहते हैं:

  mal atta khup bhuk lagali ahe.
  mulatch mala bhat khup avadato. ani evadhe sagle chavisht bhatache prakar vachlyavar mazya sarakhya bhat premi che ajun kay honar

 14. Sanket कहते हैं:

  कौतुक करायलाही शब्द नाहीत हो माझ्याकडे!!! अप्रतिम लेख!!

 15. शुचि कहते हैं:

  सुरेख लेख!!! माझ्या आवडत्या पदार्थावर.

  ह्म्म …. भाताचं नातं आजरपणाशी जोडलं जाण्याचं कारण म्हणजे “पचनास हलका”. त्याचं नातं ऐदेपणाशी किंवा मी तर म्हणीन लोदेपणाशी जुळलं जाण्याचं कारण म्हणजे “तो न चावता गपागप गिळता येणे”

  >>भात! नुसता उकडलेला तांदूळ, पण स्थळकाळ पाहून कसे फुलावे , ते माणसाने त्याच्याकडून शिकाव>>> ………. खल्लास मार डाला!!! मी समृद्ध झाले : )

  (यानंतर परत कधीही फुलण्याची लाज न वाटून घेणारी)
  ~शुचि

 16. abhiruchidnyate कहते हैं:

  हे काय भन्नाट वर्णन केलंय तुम्ही 😊 मजा आली वाचताना..

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s