‘खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’

निखळ मनोरंजक विनोदी चित्रपटांचा जमाना निघून गेला आहे असे ‘चष्म-ए-बद्दूर’ या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना मी म्हटले होते. क्रिकेटनध्ये जसा ‘कॉमेंट्रेटर्स कर्स’ नावाचा एक प्रकार आहे, की कॉमेंट्रेटरने म्हणावे, की काय फालतू बोलिंग आहे, आणि बोलरने दुसऱ्याच चेंडूवर अफलातून स्विंगने त्रिफळा उडवावा, तसे काहीसे माझ्या बाबतीत झाले आहे.  ‘खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा̮. लि.’ हे दोन चित्रपट माझ्या पहाण्यात आले आणि ‘चित्रपट हे संपूर्णत: दिग्दर्शकाचे माध्यम आहे’ हे जणू सिद्ध करणाऱ्या या नव्या पिढीच्या दिग्दर्शकांकडून आता नव्या अपेक्षा ठेवता येतील, असे मला वाटू लागले आहे.
‘खोसला का घोसला’ ही दिल्लीत रहाणाऱ्या कमल किशोर खोसला या पापभिरु, मध्यमवर्गीय माणसाची कथा. आयुष्याची पुंजी एकत्र करून त्याने कुठेतरी एक प्लॉट विकत घेतला आहे. खुराणा नावाचा एक बिल्डर तो प्लॉट बळकावतो.तो प्लॉट परत पाहिजे असेल तर तो खोसलाला विकत घ्यावा लागेल, असे खुराणा आणि त्याचे बगलबच्चे खोसलाला सांगतात. हैराण झालेला खोसला पोलिस, कोर्टकचेरी एवढेच काय तर काही गुंडांचीही मदत घेऊन तो प्लॉट परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यात त्याचे पैसे तर जातातच, पण त्याला स्वतःलाच तुरुंगात जायची वेळ येते. मग हताश होऊन तो प्लॉटचा नाद सोडून देतो. पण आता त्याची मुले जिद्दीला पेटलेली आहेत. त्यातला थोरला खुशालचेंडू आणि बऱ्यापैकी नाकर्ता, तर धाकटा एकतर ‘चिरोंजीलाल’ या आपल्या चमत्कारिक नावाने वैतागलेला, आणि भारतातल्या या सगळ्या कटकटींना वैतागून अमेरिकेत जायला निघालेला. आसिफ इक्बाल हा व्हिसा एजंट, चिरोंजीलालची मैत्रिण आणि तिचा नाट्यकंपू आता खुराणाकडून पैसे वसूल करण्याचा प्लॅन तयार करतात. असले बेकायदेशीर काहीही करायला खोसलाचा विरोध असतो, पण कशीबशी त्याची समजूत घालून ही टोळी एक भन्नाट प्लॅन तयार करते. मग तो प्लॅन प्रत्यक्षात आणताना झालेल्या गमतीजमती आणि शेवटी खुराणासारख्या पेशेवर बिल्डरला पाणी पाजून त्याच्याच पैशाने त्याचाच प्लॉट परत विकत घेणे – ही आहे ‘खोसला का घोसला’ ची कथा.
‘खोसला का घोसला’ हा संपूर्णपणे अनुपम खेर आणि बोमन इराणी या दोन खांबांवर पेललेला तंबू आहे. या दोघाही नैसर्गिक अभिनेत्यांना कोणताही भूमिका  द्या, ते तिच्यात एकसंध मिसळून जातात. ‘सारांश’ ची पातळी अनुपम खेरला नंतर फारशी कधी गाठता आली नाही हे खरे, पण तो तिच्या फार खालीही कधी घसरला नाही. दिल्लीतही अशी मध्यमवर्गीय, ‘गॉडफिअरिंग’ माणसे आहेत हे पटवून घ्यायचे असेल तर अनुपमचा हा रोल बघावा. गुंडांकडून फसवले गेल्याबद्दल त्याच्या मनात चीड आहे, पण त्याची वसुली म्हणून आपणही बेकायदेशीर वागावे, हे त्याला पटण्यासारखे नाही. घरात खुराणाकडून पैसे वसूल करण्यासाठी चाललेले ‘प्लॅनिंग’ तर त्याला बिलकुल पसंत नाही. पण यामागे केवळ भाबडा आदर्शवाद नाही. आपली मुले कशात तरी अडकतील अशी काळजी आहे. हा अवघड रोल अनुपमने बहारदार केला आहे. घराच्या बांधकामाची योजना करतानाचा त्याचा स्वप्नाळूपणा, खुराणासमोरची त्याची हतबलता, आपल्या मुलांविषयी त्याची काळजी, त्यातूनच अस्पष्टपणे प्रगट होणारा त्याचा अभिमान हे सगळे अनुपमने सुरेख दाखविले आहे.
बोमन इराणीबाबत सांगायचे तर हा माणूस आता ‘टाईपकास्ट’ होतो की काय, अशी भीती बाळगणे चुकीचे आहे, हेच जणू तो वारंवार सिद्ध करून देतो, असे वाटते. ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘खोसला का घोसला’ या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिका सारख्या आहेत, पण त्या अगदी वेगळ्या माणसाने केल्या असाव्या असे रंग त्यांत बोमनने भरले आहेत. ‘खोसला का घोसला’ मधील खुराणा दिल्लीतला ‘टिपिकल’ बिल्डर आहे. त्याची गुर्मी, मस्ती, माज, ‘कायदा माझ्या खिशात’ ही वल्गना… हे मुळातून बघावे असे आहे. अशा व्यक्तींचे एक कुणीतरी गुरुजी, बाबाजी किंवा माताजी वगैरे असतात. मग त्यांच्या समोर ते नतमस्तक वगैरे होतात. पण त्यांची ही श्रद्धाही उथळ, बटबटीत असते. हे अचूक निरीक्षण अर्थात दिग्दर्शकाचे, पण ते तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर उतरवले आहे ते बोमन इराणीने. ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ मध्ये बोमन त्याच्या देहबोलीतून तंतोतंत एका मेडिकल कॉलेजचा डीन आणि एक यशस्वी सर्जन वाटतो आणि इथे एक हावरा, लंपट बदमाष. दिल्लीची पंजाबी लहेज्याची हिंदी त्याने सहजपणाने पकडली आहे. ‘ मल्टीप्लैक्स, शॉपिंग कॉंप्लैक्स…’ असे शब्द तो असे उच्चारतो की डोळ्यासमोर त्याचे ‘सौथ एक्स्टैंसन’ मधले संपन्न पण भडक, अंगावर येणारे अभिरुचीहीन घर उभे रहाते! 
‘खोसला का घोसला’ मध्ये इतर सहकलाकारांच्या भूमिकाही छान आहेत. त्यात मुद्दाम उल्लेख करावा तो म्हणजे नवीन निश्चलचा. नायकाच्या भूमिका करताना त्याने कधी अभिनयाच्या प्रयत्नाचाही आळ स्वतःवर येऊ दिला नाही. पण इथे एका नाटक कंपनीच्या प्रमुखाची – बापूची- भूमिका त्याने मजेत केली आहे. त्याला दुबईस्थित एका एन. आर. आय. चे सोंग आणावे लागते आणि ते करत असताना ‘यार मेरी फट रही है’ हे त्याचे विधान अगदी पटावे, अशी त्याने धमाल केली आहे.  

‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’ हा एक वेगळाच प्रकार आहे.रीमा कागती या नव्या दिग्दर्शिकेने हे काहीतरी भलतेच आपल्या पोतडीतून बाहेर काढले आहे. ‘हनिमून..’ मधील विनोद हा वेगळा, ‘सटायर’ च्या अंगाने जाणारा आहे. खरे तर हा विनोद नव्हेच, हे दैनंदिन आयुष्याचेच एक प्रतिबिंब आहे, पण ते नेहमीच्या आरशातले नव्हे तर ‘लाफिंग हाऊस’ मधील आरशांसारखे – उंच, ठेंगणे, जाड, कृश – म्हटले तर हसवणारे – म्हटले तर गंभीर, अंतर्मुख करणारे. हनिमूनला निघालेल्या जोडप्यांच्या आयुष्यांत डोकावून बघायचे हे तसे धाडसाचे काम. पण हे करताना या नव्या दिग्दर्शकांना बुजल्यासारखे होत नाही, ही कौतुकाची बाब. या चित्रपटात येणारे समलिंगी संबंधासारखे उल्लेख म्हणूनच उसने आणल्यासारखे वाटत नाहीत. सहा जोडप्यांच्या हनिमूनची ही कथा अनपेक्षित धक्के देते पूर्ण होते, तेंव्हा आजचे हिंदी चित्रपटही बघण्यासारखे असू शकतात, हा तिने दिलेली सगळ्यात मोठा धक्का असतो!
‘हनिमून..’ ला कथा अशी नाहीच. आहे ते प्रसंगांनुरुप खुलत गेलेले एक झकास नाट्य. मग हे नाट्य कधी ‘फँटसी’ च्या वळणाने जाते तर कधी आयुष्याच्या जळत्या वास्तवाच्या किनाऱ्याने. पण एक बाकी खरे, हे रसायन सगळ्यांनाच रुचेल असे नाही. जशा इतर सगळ्याच कल्पना वेगाने बदलत आहेत, तशा विनोदाच्याही. दर्जा न गमावता विनोदनिर्मिती आणि करमणूक करता येते हाच धडा ही नवी पिढी गिरवते आहे. ‘टेक्स्ट’ तेच आहे, फक्त ‘फाँट’ वेगळा आहे, तेवढे आपण समजून घेतले की झाले.
काल ‘हनिमून…’ पाहिला. थिएटर गच्च भरलेले होते.  चित्रपट संपल्यावर बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होते. तीन तासांपुरते का होईना, चार-पाचशे लोकांना आपल्या चिंता कटकटींचा विसर पडल्यासारखे वाटले. जणू प्रत्येकाच्या मनातल्या होळीत रोजचे रुक्ष आयुष्य एका दिवसापुरते जळून गेले होते!

यह प्रविष्टि Bollywood में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

3 Responses to ‘खोसला का घोसला’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’

 1. माधव कुळकर्णी कहते हैं:

  नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन !
  आता हळूहळू आपल्या लेखनाचे वाचन करण्याचे व्यसनच जडलेय ….

 2. Mrudula Tambe कहते हैं:

  Khosala ka ghosala halli filmy var anekada lagto ani tarihi to parat parat pahavasa vatato. Filmy pratyek break madhye tya chitrapaTabaddal thodefar sangate. Tyatil don goshti 1] ha chitrapat sahani ji ki kahani navane release honar hota karan sahani navachya manasachi ashi jamin kharokhar geli matr ti tyala kadhich parat milali nahi 2] boman irani ne khurana vhayala nakar dila karan delhi kadacha dhokebaj banane kathin ase tyala vatat hote mag digdarshakane eka kharyakhurya chaplus delhi kar estate agent che gupchup video shooting kele ani te shooting boman la dakhavale ani tashich acting kar ase sangitale.

 3. Prachi कहते हैं:

  hi
  ‘Khosala ka ghosala’ madhala ajun ek prasang mala khup avadato. jenvha khurana pahilyanda tokan money deto tenva evhadhe paise baghun bapu ghabarun parat yeto. itar sagale ytala dhosh det asatat. pan tyachi avastha phakt Khosala lach kalate. ani ha prasang agadi khara vatato. karan bapu sarakhya sarvasamanya manasane aayushyat evadhi rakkam baghitalelli nasate.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s