फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी’एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा’ नावाचा एक कार्यक्रम लागत असे. ‘सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार’ हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, की त्यांची गाणी फार दुर्बोध, कळायला अवघड अशी असतात. उदाहरणार्थ ‘पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकोंके नशेमन तक इस मोड पे जाते है’ म्हणजे काय? गुलजार यांनी याचं काय स्पष्टीकरण दिलं हे लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितल्याचं आठवतं की माझ्या ओळींचे शब्दशः अर्थ घेऊ नका. ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे’ मधल्या ‘आवाज’ चा अर्थ स्वरयंत्रातून बाहेर पडणारा ध्वनी असा नाही. ‘हमारा देश हमें आवाज दे रहा है’ मधला ‘आवाज’चा अर्थ काय आहे पहा! ‘है नाम होटोंपे अब भी लेकिन, आवाज में पड गयी दरारें’ मधल्या ‘आवाज’ चा अर्थ पहा! ‘मोरा गोरा अंग लइ ले, मोहे शाम रंग दइ दे ‘ पासून गीतलेखनाला सुरुवात करणाऱ्या गुलजार यांची ओळख अशी सांकेतिक गाणी लिहिणारा गीतकार अशीच आहे. यातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं, पण तो झाला नसता तरी ती तितकीच आशयसंपन्न राहिली असती असं वाटतं. अर्थात या पहिल्या गाण्यावर असलेली शैलेंद्रच्या लोकगीतांची छाप लपून रहात नाही. (तोहे राहू लागे बैरी, मुसकाये जी जलायके) पण नंतर बाकी गुलजार यांची गीते अगदी स्वतंत्र अंगाने गेलेली दिसतात. खरंतर हा माणूस आधी कवी आणि मग गीतकार. म्हणून गुलजार यांच्या गाण्यांत काव्यगुण विपुलतेने आढळतो. गुलजार यांच्या रचना समजून घ्यायच्या तर त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता कळावी लागेल. ‘वो यार है जो खुशबू की तरहा, जिस की जुबाँ उर्दू की तरहा’ याचा अर्थ काय हे समजावून सांगणं कठीण आहे. ‘उर्दू की तरहा’ म्हणजे उर्दू की गैरउर्दू असा प्रश्न इथे गैरलागू आहे. ‘तावीज बनाके पहनूं उसे, आयत की तरह मिल जाये कहीं’ याचा आपल्याला कळालेला अर्थ आणि गुलजार यांना अभिप्रेत असलेला अर्थ एकच आहे का? मग अशा वेळी गालिबसारखे गुलजार यांचेही काव्य ‘या तो आप समझे या खुदा समझे’ म्हणून सोडून द्यायचे का? संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. ‘जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे, मुस्कराये तो मुस्करानेके कर्ज उतारने होंगे’ असं लिहून जाणारे गुलजार ‘वक्त के सितम कम हसीं नही,आज यहां है कल कहीं नही’ असंही लिहितात. ‘सुरमई अंखियोंमें नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे’ ही लोरी ‘सदमा’ ला काय करूण झालर देऊन जाते! ‘आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है’ हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि ‘सीधे सीधे रास्तोंको हल्का सा मोड दे दो, बेजोड रूहोंको थोडासा जोड दे दो’ हा अबोल प्रेमभाव! गुलजार यांच्या गीतांमध्ये रात्र, स्वप्न. चंद्र यांचे उल्लेख अनेकवेळा येतात.कुठे सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश ‘कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने’ म्हणतो तर कुठे किशोरकुमार कधी ‘चांद चुराके लाया हूं, चल बैठे चर्च के पीछे’ म्हणतो तर कधी ‘फिर वही रात है ख्वाबोंकी’! गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही ‘छुप जाउंगी रात ही में, मोहे पीहा संग दई दे’ आहे आणि ‘बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा’ हेही आहे!रस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. रस्ता वळाला की चाल वळणे हे तुमचेआमचे झाले. ‘मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी’ हा तो खास गुलजार टच! ‘इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते , कुछ तेज कदम राहे’ इथेही रस्ते आहेतच ,पण ‘इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’ यातला हळुवारपणा पहा! तीच गोष्ट ‘जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है’ या गाण्याची. ‘प्यार की तुम इंतेहा हो, प्यार का आगाज हम’ या ओळीतले सौंदर्य जसे मोहवणारे तसेच ‘जीने की तुमसे वजह मिल गयी है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी’ या ओळीतलेही. गालिबचा गुलजार यांच्या शायरीवरील प्रभाव हाही एक फार मनोरंजक विषय आहे. ‘दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन, बैठे रहे तसव्वरे जाना किये हुये’ या गालिबच्या मुखड्याचा वापर करून गुलजार यांनी एक स्वतंत्र गीत लिहिले आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. पण उपमा उत्प्रेक्षांचा चमत्कारिक वाटावा असा कल्पक वापर हेही दोघांचे समान वैशिष्ट्य आहे. गालिबप्रमाणेच गुलजार यांच्या प्रतिमा सांकेतिक असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, पण अगदी वेगळ्या असतात. प्रेयसीच्या आगमनाला आम शायरांनी थंड हवेच्या झुळुकीची उपमा सर्रास दिली आहे. गुलजार बाकी याला ‘तेरा आना भी गर्मियोंकी लू है’ म्हणतात! प्रेयसीच्या बोलण्यात इतरांना चंदनाचा, वाळ्याचा वगैरे सुगंध दिसतो, गुलजारना बाकी ‘तेरी बातों में किमाम की खुशबू है’ असे म्हणावेसे वाटते. या किमामच्या आणि जर्द्याच्या खुशबूमध्ये जे रंगीलेपण आहे ते इतर सुगंधांत नाही!याच गीतात दिल्लीचा उल्लेख ते ‘बल्लीमारा’च्या गल्लीसकट करतात. याच गल्लीत गालिबचे वास्तव्य होते हे आपण जाणतोच. धडकत्या हृदयावर तर शेकड्यानी गाणी लिहिली गेली आहेत, पण या जळत्या हृदयातल्या आगीवर बिडी पेटवून घे असं आवाहन करणाऱ्या प्रियेची कल्पना गुलजारच करू जाणोत! (‘बीडी जलायले जिगरपे पिया, जिगरमां बडी आग है’- इथेही ती बिडी आहे, सिग्रेट नव्हे – हे सिग्रेट सोडून बिडी ओढायला लागणाऱ्या चांगदेव पाटलाइतके – किंवा सिग्रेटीचे मचूळ ब्रँड सोडून वडारणीच्या रासवट अलिंगनासारखी चार मिनार ओढणाऱ्या दत्तू जोशीसारखे साक्षात्कारी!) गुलजार यांची ही सांकेतिक संवेदनशीलता कधीकधी त्यांची मर्यादा होते की काय अशीही शंका येऊ लागते. ‘जब तारें जमीं पर चलते हैं, आकाश जमीं हो जाता है, उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है’ हे थोडेसे उबवलेले वाटते. ‘आंखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है’ हे नकोसे वाटते. मग तेवढ्यात वसंतरावांनी बांधलेले सुरेल ‘पपीहरा’ आठवते. इक घन बरसे, इक मन प्यासा इक मन प्यासा, इक मन तरसे सावन तो संदेसा लाये मेरे आंख से मोती पाये दान मिले बाबुलके घरसे गुलजार यांच्या गैरफिल्मी रचनांतून त्यांच्यातला गीतकाराआधीचा कवी दिसतो. ‘स्पर्श’ मालिकेसाठी वापरलेल्या हाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते वक्त की शाख से लम्हे नही तोडा करते या ओळी किंवा शाम से आंख में नमी सी है आज फिर आपकी कमीसी है या ओळी पहा. इथली ‘कमीसी’ या शब्दाची निवड हीच ती गुलजार शैली. ‘जिंदगी यूं हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा’ हीपण एक शीच सुरेख गजल. आणि शेवटी गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा: सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखा सरहद के उस पार से कुछ मेहमान आये है आंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये पांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये और तंदूर पे मकई के कुछ मोटे मोटे रोट पकाये पोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे आंख खुली तो देखा घर में कोई नही था हाथ लगाकर देखा तो तंदूर अभीतक बुझा नही था और होटोंपर मीठे गुड का जायका अबतक चिपक रहा था ख्वाब था शायद, ख्वाबही होगा सरहद पर कल रात सुना है चली थी गोली सरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है
-
पुरालेख
- जनवरी 2014
- सितम्बर 2013
- जून 2012
- अप्रैल 2012
- नवम्बर 2011
- जुलाई 2011
- मई 2011
- अप्रैल 2011
- मार्च 2011
- जनवरी 2011
- दिसम्बर 2010
- मई 2010
- फ़रवरी 2010
- नवम्बर 2009
- अक्टूबर 2009
- अगस्त 2009
- जुलाई 2009
- जून 2009
- मई 2009
- अप्रैल 2009
- मार्च 2009
- दिसम्बर 2008
- सितम्बर 2008
- अगस्त 2008
- जुलाई 2008
- जून 2008
- मई 2008
- मार्च 2008
- फ़रवरी 2008
- अक्टूबर 2007
- सितम्बर 2007
- अगस्त 2007
- जून 2007
- मई 2007
- अप्रैल 2007
- मार्च 2007
- फ़रवरी 2007
- दिसम्बर 2006
- अक्टूबर 2006
- सितम्बर 2006
-
मेटा
अप्रतीम लेख आहे!
येवढ्या लेखावर फ़क्त एकदा नजर फिरवावी अशा विचाराने वाचायला सुरुवात केली होती. पण पहिल्या ओळीपासूनच नीट वाचल्यापासून रहावले नाही.
पुढच्या लेखाची वाट बघत आहे.
ुउत्तम लेख! गुलज़ारवरचा इतका सर्वांगसुंदर लेख आजवर वाचला नव्हता. त्यांच्या शब्दांचं, ओळींचं , कल्पनांचं सामर्थ्य – आणि क्वचित मर्यादा यांवर किती सखोल विचार केलायत तुम्ही! ग़ालिब तर गुलज़ारचं पहिलं प्रेम असावा असंच वाटतं. दूरदर्शनवरची ती मालिका किती साजरी बनवली होती त्यांनी -आणि ग़ालिबवरचं चरित्र-चित्रमय पुस्तकसुद्धा. तुम्ही म्हणताय तसा उपमा-उत्प्रेक्षांचा चमत्कृतिपूर्ण वापर हे दोघांमधलं साम्य तर आहेच – एक म्हणतो, “मेहरबाँ होकर मुझे बुला लो चाहे जिस वक्त, मैं वो गया हुआ वक्त नहीं जो आ भी न सकूँ” तर दुसरा “दिन का जो भी पहर गुज़रता है, एक एहसान सा उतरता है”! आणि त्याशिवाय दोघंही विलक्षण शब्दवेडे आहेत! त्यामुळे एखादा शेर किंवा दोन ओळींतच तो ‘ग़ालिब -स्पर्श’ किंवा ‘गुलज़ार-टच’ समजून जातो.
या लेखाबद्दल मनापासून धन्यवाद.
नेहमीप्रमाणेच हा लेखही आवडला सन्जोप राव,
येऊ द्या अजून असेच काही दर्जेदार लेखन !
लिहावं ते तुम्हीच…