काबुल एक्सप्रेस

कबीर खान या दिग्दर्शकाच्या ‘सेहर’ या चित्रपटाविषयी मी पूर्वी लिहिले होते. त्याचाच ‘काबुल एक्सप्रेस’ हा चित्रपट पाहिला. ९/११ या घटनेनंतर अल-कायदा आणि तालिबानची पाळेमुळे उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. त्या कारवाईत पाकिस्तानी सैन्यही सामिल झाले होते. तालिबान हे अमेरिका आणि पाकिस्ताननेच उभे केलेले भूत- पण आता मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक नाही असे म्हणून हात झटकून टाकले. तालिबानच्या उभारणीसाठी पाकिस्तानातून गेलेल्या सैनिकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. या सगळ्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातून वार्ताहर अफगाणिस्तानमध्ये गेले. असेच दोन भारतीय तरुण  आणि एक अमेरिकन वार्ताहर तरुणी, त्यांना काबुलपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतलेला एक अफगाणी ड्रायव्हर आणि या सगळ्यांना ओलीस धरुन पाकिस्तानी सीमेपर्यंत पोचण्याची धडपड करणारा एक पाकिस्तान आर्मीचा ‘तालिब’ यांची ही कथा.

या कथेत नायक-नायिका नाहीत, खलनायकही नाही.(गाणे-बिणे तर नाहीच नाही!) या वार्ताहरांना ओलीस धरणारा तालिबही तसा क्रूर वगैरे नाही. परिस्थितीच्या आणि नियतीच्या अगम्य चक्रात भरडले जाणारे हे अगदी साधे लोक आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्वार्थ यात त्यांची आयुष्ये होरपळून निघालेली आहेत. या साध्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांची ही चटका लावणारी कथा. यातल्या पात्रांच्या बोलण्यातून आजूबाजूच्या परिस्थितीला स्पर्श होत जातो. अफगाणिस्तानमधील भग्न इमारती, उध्वस्त झालेली शहरे आणि त्याबरोबरच ढासळलेले लोक पाहून अंगावर शहारा येतो. काय दोष आहे या लोकांचा? त्यांना ना तर तालिबानशी काही मतलब आहे, ना अमेरिकेशी. का त्यांचा आयुष्याची अशी न संपणारी फरफट सुरु आहे? आणि कधीपर्यंत?

‘काबुल एक्सप्रेस’ अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत नाही. पण तो तुम्हाला मुळापासून हादरवून टाकतो. अफगाणिस्तानच्या पाकिस्तानी सीमेवर अमेरिकन सैनिकांनी पकडून आणलेल्या ‘तालिब’ मध्ये ‘आपले’ किती लोक आहेत या चिंतेने तडफडणारा पाकिस्तानी सैनिक – पण एकही पाकिस्तानी ‘तालिब’ नाही असे सरकारनेच जाहीर केल्याने त्याला तसे सांगताही येत नाही- त्या ‘तालिब’ पैकी पळून जाणाऱ्या एकावर गोळ्या मारतो, पण त्या त्याला लागू नयेत अशा बेताने. न जाणो तो ‘आपला’ असला तर! पण अमेरिकन सैनिकांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. एक अमेरिकन सैनिक सहजपणे गोळी मारुन त्या ‘तालिब’ ला ठार करतो. तो अफगाणी असे, की पाकिस्तानी! युद्धाची ही अपरिहार्य निष्ठुरता आपल्याला स्पर्श करुन जाते. अस्वस्थ करुन जाते.

‘अ गुड क्राफ्टसमन कॅन प्रोड्यूस अ मास्टरपीस विथ इंफिरिअर टूल्स’ हे पटावे अशी कबीर खानची या चित्रपटातली कामगिरी आहे. अर्थात अर्शद वारसी हे काही ‘इंफिरिअर टूल’ नाही – नॉट बाय एनी स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन! पण जॉन अब्राहम या माणसाविषयी बाकी आदर वाटावा असे त्याने आत्तापर्यंत काही केल्याचे स्मरणात नाही.( बिपाशा बसूशी मैत्री सोडून!) पण ‘काबुल एक्सप्रेस’ हा संपूर्ण दिग्दर्शकाचाच चित्रपट आहे. अफगाणिस्तानच्या भग्न अवशेषांमध्ये  व्यायाम करणारा जॉन आणि त्याच्याकडे मान वळवून कुतुहलाने पहाणारा एक अफगाणी छोकरा. तुलाही करायचाय व्यायाम माझ्याबरोबर? ये… जॉन त्याला खुणेनेच बोलावतो. तो छोकरा उठून उभा रहातो. त्याच्या एका पायाच्या जागेवर पोकळी आहे… कुबडीवर रेलून तो जॉनकडे बघतो आणि आपल्या आत कुठेतरी काहीतरी तुटतं..  काबुलच्या त्या खडबडीत रस्त्यावर तालिबच्या हातातल्या रेडिओवर कुठल्यातरी हिंदुस्थानी रेडिओ स्टेशनची खरखर ऐकू येते.. नंतर अस्पष्टपणे काही ओळखीचे सूर ऐकू येतात…
‘मै जिंदगीका साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवेमें उडाता चला गया..’
नकळत हे दोन्ही भारतीय स्वतःशी गुणगुणायला लागतात. हळूच त्यात एक तिसरा सूर मिसळतो. तो असतो त्या ‘तालिब’ चा. तुमची हिंदी गाणी, तुमचे हिंदी चित्रपट.. अहो, आमचंच आहे तेही सगळं… आम्ही तर म्हणतोच की ‘माधुरी दिक्षीत दो, काश्मीर लो…’ मग हा भेसूर चेहऱ्याचा पाकिस्तानी तालिब आपल्याला सरहदीपलीकडचा आपलाच कुणी सगा वाटायला लागतो. गुलजारच्या ‘सरहद…’ ची आठवण येते.. अर्शद तर त्याला शेवटी म्हणतोच, इम्रान साहेब, तुम्ही काही एवढे वाईट नाही आहात. तुम्ही जर तालिब नसतात, तर कदाचित आपण चांगले दोस्तही होऊ शकलो असतो…. एक दीर्घ सुस्कारा टाकून तालिब म्हणतो. ” ते तुम्ही लोक म्हणता ना, तसं… अगले जनममें…” 

‘काबुल एक्सप्रेस’ चे संवाद ‘सेहर’ सारखेच लक्षात रहाणारे आहेत. तालिबने आपले नाव ‘इम्रान खान अफ्रीदी’ म्हणून संगितल्यावर ‘नाव तर जबरदस्त आहे तुमचं… क्रिकेट वगैरे खेळत असालच…’ असं त्याला अर्शद वारसी विचारुन जातो ” तो क्या तुम्हारे मुल्क नें जिसका नाम सचिन होता है वो हर बच्चा बल्लेबाज होता है?” हा तालिबचा प्रश्न त्या वातावरणातही आपल्याला हसवून जातो. ‘मी कोकही पीत नाही आणि पेप्सीही’ असं त्या अमेरिकन तरुणीनं सांगितल्यावर ‘व्हॉट टाईप ऑफ अमेरिकन यू आर?’ हा अगदी नैसर्गिक प्रश्न आणि ‘दी सेन्सिबल टाईप, आय गेस….’ हे तिचं उत्तरही लक्षात रहाण्यासारखं. त्या जीवनमरणाच्या खाईत कपिल देव श्रेष्ठ की इम्रान खान हा अर्शद आणि तालिबचा वाद अगदी आपला वाटणारा.

काल ‘काबुल एक्सप्रेस’ पाहिला. आनंद तर झालाच, पण अस्वस्थही झालो. ‘बिटरस्वीट एक्सपिरिअन्स’ यालाच म्हणत असावेत. अशा प्रकारच्या चित्रपटांचं हे यशच म्हणायला पाहिजे. ‘यशराज फिल्म्स’ सारख्या मोरपंखी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला असा चित्रपट काढावासा वाटला हेही.

यह प्रविष्टि Bollywood में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

4 Responses to काबुल एक्सप्रेस

 1. Abhijit Bathe कहते हैं:

  Hi –

  Congratulations on a wonderfull article! I saw this movie 2/3 months back and felt the same things that you have mentioned. I was hoping aginst hope that someone would write such good article about it without revealing too much of the story and you have exceeded all the expectations.

  Not only you have been able to express your opinions well (BTW, they also matched with the pace of the movie – I dont know if that was intentional in this article), you were able to capture many of the sensitive and well crafted spots in the movie – and were able to do justice to the directors role in the movie. (It is similar to the difference between Channel 9 cricket highlights vs doordarshan ones – they showhow a McGrath or Murali or Warne ‘sets up’ the batsman before claiming the wicket)

  After reading Yogesh’s writing about Shwashank Redemption – I thinks its not such a bad idea to include a movie poster if you are writing about the movie. The posters for this particular one are sensitively done which catch the essence of the movie. You can find them on imdb.com. However, its just an idea – the visual identity of the post is entirely up to you. It is beautiful even without it.

  Keep it up.

 2. माधव कुळकर्णी कहते हैं:

  चित्रपट खिळवून ठेवणारा होता. मुख्य म्हणजे त्या दिवशी केबलवर फारश्या जाहिरातीही आल्या नाहीत त्यामुळे सलग बघता आला. इम्रानचे संवाद जसेच्या तसे आठवले (सचिन/कपील बद्दलचे !) त्यांच्या गाडीच्या अफगाणी ड्रायव्हरचीही धमाल वाचायला मजा आली असती. चक्रपाणीने वर्णन केलेला मुलीच्या भेटीचा प्रसंगही अस्वस्थ करणारा होता. एक चांगला चित्रपट (सलग) बघीतल्याचे समाधान त्या दिवशी मिळाले.
  हा चित्रपट ‘चांगला’ च होता त्याचे समाधान आज !

 3. yogesh कहते हैं:

  संजोप सर… खरं सांगायचं तर चित्रपटापेक्षाही तुमचं परीक्षण जास्त आवडलं…

 4. Meghana Bhuskute कहते हैं:

  योगेशशी सहमत. खरं सांगायचं तर ’परीक्षण’ नाही, ’रसग्रहण’ झालंय.
  🙂

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s