कवी गीतकार २: साहिर

सकारात्मक दृष्टीकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, म्हणजे काय? तर एका तरुणीला तणावाखाली असताना नखे कुरतडण्याची सवय होती. ती जावी म्हणून कुणीतरी तिला योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी तिच्या बोटांची न कुरतडलेली नखे पाहून कुणीतरी विचारले की आता ती तुझी सवय गेलेली दिसतेय. त्यावर उदासवाणे हसून ते तरुणी म्हणाली की नाही, पण योग शिकायला लागल्यापासून आता मी पायाची नखे कुरतडते!

विनोद सोडा, पण साहिर लुधियानवी या गुणी गीतकाराच्या बाबतीत आपल्याला असेच काहीसे म्हणता येईल. साहिरच्या स्वभावात त्याच्या  वडीलांचे सरंजामी वर्तन (निदा फाजलींच्या शब्दांत ‘फ्यूडल रवैय्या’ (रवैया – काय शब्द आहे!)) आणि  त्याच्या आईला त्यांनी दिलेली कनिष्ठ वागणूक यामुळे एक कडवटपणा आणि प्रस्थापितांविरुद्ध बंडाची भावना जन्माला आलेली दिसते. लहानपणीच्या अशा घटनांनी मन करपले जाणे ही काही चांगली गोष्ट नाही, पण यात चांगले बघायचेच झाले तर त्यामुळे साहिरच्या उत्तमोत्तम क्रांतिकारी रचना आपल्याला वाचायला मिळाल्या. स्त्रीचे पुरुषाकडून होणारे शोषण यावर साहिरने लिहिलेल्या या ओळी आजही अंगावर शहारा आणतात….

औरत ने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उसे बाजार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया

औरत म्हणजे काय? तर एक ऐयाशीची चीज! आणि चीज म्हटले की तिला विकता आणि विकत घेता येते! साहिर म्हणतो…

तुलती है कहीं दीनारोंमें, बिकती है कहीं बाजारोंमें
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारोंमें
ये वो बेईज्जत चीज है जो, बट जाती है इज्जतदारोंमें

राजपूत स्त्रियांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी केलेलेया अग्निप्रवेशाचे आपल्याला केवढे कौतुक! पतीच्या चितेवर सती जाणाऱ्या स्त्रीला आपण केवढे महान करुन ठेवले आहे! पण या जिवंत जळण्यातली वेदना कोण लक्षात घेतो?

औरत के जिंदा जलने पर, कुर्बानी और बलिदान कहा
इस्मत के बदले रोटी दी और उसको भी अहसान कहा

(इस्मत म्हणजे अब्रू – धन्यवाद चित्त!)

आणि ही सगळ्या श्रद्धा चुरगाळून टाकणारी, मनाला खोल  भेगा पाडणारी ओळ.. कसली नाती घेऊन बसलात? जगात खरं नातं एकच! पुरुष आणि स्त्री… नर आणि मादी.. माणूस आणि पशु यात काय फरक आहे?

औरत संसार की किस्मत है, फिर भी तकदीर की हेटी है
अवतार पयंबर जनती है, फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो, बेटोंकी सेजपे लेटी है     (साधना)

म्हणूनच का कुणास ठाऊक, साहिरच्या गीतांमधला दर्द इतर भावनांपेक्षा अधिक प्रभावीपणे उमटलेला दिसतो. अर्थात असे लिहिणे म्हणजे साहिरच्या उत्तुंग प्रतिभेवर अन्याय करण्यासारखे आहे.

इतनी हसीन इतनी जवां रात क्या करें
जागे है कुछ अजीब से जजबात क्या करें
सासों में घुल रही है किसी सास की महक
दामन को छू रहा है कोई हाथ क्या करें     (आज और कल)

ही रफीच्या आवाजाने चार चांद लावलेली बेचैनी असो किंवा

 तुझमें जो लोच है तेरी तहरीर में नही
जो बात तुझमें है तेरी तसवीर में नही     (ताज महल)

ही पुन्हा रफीच्या आवाजातलीच नक्षीदार नजाकत असो, तिथे साहिरच्या लेखणीची आपली एक छाप आहेच, पण

हम गमजदा हैं लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम

हे बाकी साहिरचे खास स्वतःचे वाटते!

मैं दूं भी तो क्या दूं ऐ शोख नजारों
ले दे के मेरे पास कुछ आंसू हैं कुछ आहें

असो किंवा

इसको ही जीना कहते है तो यूंही जी लेंगे
उफ न करेंगे लब सी लेंगे आंसू पी लेंगे
गम से अब घबराना कैसा गम सौ बार मिला   (प्यासा)

यातला दु:खाच्या अतीव टोचणीतून आलेला कोडगेपणा असो, तिथे साहिर निखाऱ्यासारखा फुलून आलेला दिसतो. ‘प्यासा’ त साहिर

सनसनाहट सी हुई
थरथराट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी  

किंवा

मोहे अपना बना लो
मेरी बांह पकड
मैं हूं जनम जनम की दासी
मेरी प्यास बुझा दो, मनहर गिरिधर
मैं हूं अंतर्घट तक प्यासी
प्रेम सुधा इतनी बरसा दो
की जग जल थल हो जाये    

किंवा

हम आप के कदमों पर गिर जायेंगे रश खा कर
इस पर भी हम अपने आंचल की हवा दे तो 

अशा तरल ओळीही लिहितो आणि

ये पुरपेच गलियां, ये बदनाम बाजार
ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झनाकार
ये इसमत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है

ये सदियों से बेखौफ सहमी सी गलियां
ये मसली हुई अधखिली जर्द कलियां
ये बिकती हुई खोखली रंगरलियां
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है   

अशा दुभंगून टाकणाऱ्या ओळीही. यातल्या ‘मसली हुई अधखिली जर्द कलियां’ ने तर मनावर एक न पुसला जाणारा चरचरीत डाग पडतो! ‘जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामनेसे हटा दो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया….’ हे आक्रंदणारे कविमन ‘प्यासा’ ला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

एकीकडे ते तसे तर दुसरीकडे तलतच्या स्वर्गीय आवाजात साहिरच्या अर्थवाही ओळी आहेत…
कही ऐसा न हो पांव मेरे थर्रा जाये
और तेरी मरमरी बाहोंका सहारा न मिले
अश्क बहते रहें खामोशा सियाह रातोंमें
और तेरे रेशमी आंचल का किनारा न मिले    (सोने की चिडिया)

काहीकाही गाण्यांचं नशीबच असं असतं की गाणं ‘हिट’ होण्यासाठी आवश्यक सगळं त्यात असूनही ते म्हणावं तितकं लोकप्रिय होत नाही. ‘तराना’ मधल्या ‘नैन मिले नैन हुए बावरे’ चा मी यापूर्वी असाच उल्लेख केला होता. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ मधलं ‘दिल से मिलाके दिल प्यार कीजिये’ हे असंच एक कमनशिबी गाणं. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ म्हटलं की लगेच ‘ जाये तो जाये कहां’ गुणगुणावसं वाटतं. ते गाणं थोर आहे याबाबत वादच नाही. पण ‘दिल से मिलाके दिल’ काही कमी गोड नाही. ‘शरमाना कैसा, घबराना कैसा, जीने से पहले मर जाना कैसा’  हे साहिरचे शब्द, लताचा शोख आवाज आणि सचिनदांची नटखट रचना.. क्या कहने!

‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने’ मध्ये ‘मैं तुझे दूध ना बक्षूंगी तुझे याद रहे’ असले जळते शब्द लिहिणारा साहिर ‘कभी कभी’ मध्ये शायराबाबतचे काय पण आपणा सर्वांबाबतचे एक निष्टुर पण अपरिहार्य सत्य सांगून जातो…

कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करे क्यूं कोई मुझको याद करे
मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहाँ बरबाद करे     

‘हम दोनो’ मधील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याचा रंग काही वेगळाच आहे. ‘हर फिक्र को धुंए मे उडाता चला गया’ ही एखाद्या चित्रासारखी डोळ्यापुढं उभी रहाणारी कल्पना तर
‘गम और खुषी में फर्क न महसूस हो जहां
मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया ‘ इथं युद्धात सगळ्या भावभावना बेचिराख झालेल्या सैनिकाची मनस्थिती! ‘वो सुबह कभी तो आयेगी’ हा दुर्दम्य आशावाद एकीकडं तर
‘जो भी है वो ठीक है जिक्र क्यूं करें
हम ही सब जहान की फिक्र क्यूं करें
जब उसे ही गम नही क्यूं हमें हो गम (फिर सुबह होगी)
ही बेफिकिरी दुसरीकडं! साहिरच्या लेखणीचे हे रंग थक्क करुन टाकतात.’क्या मिलिये ऐसे लोगोंसे जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे’ (इज्जत) असे लोकांच्या दिखाऊपणावर आघात करणारा साहिर ‘ आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू,जो भी है , बस यही इक पल है ‘ (वक्त) अशा काव्यमय ओळीही लिहितो आणि ‘दूर रहकर न करो बात करीब आ जाओ, याद रह जायेगी ये रात करीब आ जाओ'(अमानत) असेही. ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ असं साहिर म्हणतो आणि ‘जहां में ऐसा कौन है के जिस को गम मिला नही’ (हम दोनो) हेही साहिरच म्हणतो! ‘के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये’ असं साहिर म्हणतो आणि  ‘मैं जानता हूं की तू गैर है मगर यूंही’ (कभी कभी) हेही साहिरच म्हणतो! ‘उनका भी गम है, अपना भी गम है,अब दिल के बचने की उम्मीद कम है एक कश्ती, सौ तूफां, जाये तो जाये कहां..’ (टॅक्सी ड्रायव्हर) लिहिणाराच साहिर ‘ये शोखियां ये बांकपन, जो तुझमें है, कहीं नहीं’ (वक्त) असंही लिहितो!

आणि ज्या काही गाण्यांच्या उल्लेखाशिवाय साहिरवरचा लेख म्हणचे चुन्यावाचून पान ठरेल त्या गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ना तो कारवांकी तलाश है’ ही ‘बरसातकी एक रात’ मधली कव्वाली! त्या कव्वालीविषयी लिहायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती कव्वाली जशीच्या तशी उतरवून काढायची आणि एक सलाम ठोकून बाजूला उभं रहायचं!’मेरे नामुराद जुनून का, है इलाज कोई तो मौत है, जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर की तलाश है’ काय किंवा ‘इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे, कोई लैला किसी दीवार से रोकी ना गयी’ काय… हे साहिरनं कोणत्या कैफात लिहिलं कुणास ठाऊक! ‘धूल का फूल’ मधलं ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हेही माझं अत्यंत आवडतं गाणं. कुणाला ते प्रचारकी थाटाचंही वाटेल. वाटू दे! यातल्या किती लोकांना ‘कुरान न हो  जिसमें वो मंदिर नही तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नही है’ असं लिहिता येईल? यातला साहिरचा प्रस्थापितांविरुद्दचा विखार रफीच्या टिपेल्या पोचलेल्या आवाजात आपल्या आत मृतवत झालेल्या एका माणसाला गदागदा हलवतो…’इन्सानोंके लाशोंसे कफन बेचनेवाले… ये महलोंमें बैठे ये कातिल ये लुटेरे…’ छे!

तलतची जशी वाईट गाणी फारच कमी आहेत तसंच साहिरचंही आहे. करपलेलं बालपण, गरीबी, विफल प्रेम, त्या काळात इस्लाममध्ये न स्वीकारला जाणारा नास्तिक स्वभाव, जवळजवळ गर्वाच्या जवळ जाणारा अत्यंत तीव्र स्वाभिमान आणि उणंपुरं साठ वर्षाचं आयुष्य या सगळ्यात साहिर नावाच्या एका जादुगारानं  जे काय तयार केलं ते अफलातून आहे. मग हे सगळं बघतानाच आपण सैरभैर होऊन जातो. ‘दिल जो न कह सका’ (भीगी रात), ‘जिसे तू कबूल कर ले ‘ (देवदास) -त्यातलं ‘मेरी बेबसी है जाहिर, मेरी आहें बेअसरसी’ हे खास- ‘देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से’ (एक महल हो सपनोंका), ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही’ (दिल ही तो है), ‘चीन -ओ -अरब हमारा’ (फिर सुबह होगी), ‘तेरी दुनिया में जीने से’ (हाऊस नं ४४), ‘छू लेने दो’ (काजल), ‘चलो इक बार फिर से’ (गुमराह), ‘हम दर्द के मारों का’ (दाग) अशी एकाहून एक रत्नं आठवत जातात. पारिजातकाच्या झाडाखाली बसलं असताना कुणीतरी ते झाड गदागदा हलवावं तसं सगळं आयुष्यंच नाजूक सुगंधी फुलांनी भरुन जातं!  ते प्रतिभेचं झाड हलवणारा अदृष्य हात असतो साहिर लुधियानवीचा!  

यह प्रविष्टि Bollywood में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

3 Responses to कवी गीतकार २: साहिर

 1. Abhijit Bathe कहते हैं:

  The first thing I did after reading this post was – to download all the Sahir songs I could get my hands on and listening to them over the weekend!

  Thanks for reminding Sahir.

  The other day I told someone that I like Javed Akhtar and got a reply that he is not even 20% of Sahir. Not that I agree with it, but I thought I never looked at Javed from the perspective of Sahir.

  Have you?
  What did you think?

 2. yogesh कहते हैं:

  Tumhala pan salaam 🙂

  Btw, ithalya ani upakramvarachya lekhaacha shevat vegvegala kasa kay?

 3. शुचि कहते हैं:

  You are p-a-s-s-i-o-n-a-t-e!!!! I don’t even feel like writing this response in marathee where all my feelings will get diluted while “correcting shuddhalekhan”.

  The article is damn HOT!!! it’s too good. ………

  यातल्या ‘मसली हुई अधखिली जर्द कलियां’ ने तर मनावर एक न पुसला जाणारा चरचरीत डाग पडतो! …………………. This sensitivity is what I like about Sanjop raav.
  I better write abt what i like abt the article rather than getting carried away….. the article is written with passion & love.

  heil sanjop raav!

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s