“प्यासा”ची गाणी प्रसिद्ध झाली. त्याआधी त्याने विद्रोही गाणी लिहिली नव्हती. चकले, परछाईया, ताजमहल वगैरे कविता लिहिल्या होत्या. खरे तर मला फक्त “जिन्हे नाज़ है हिंद पर” आवडते. ते अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. पण “प्यासा” चे यश साहिरच्या डोक्यात गेले. आपण कोणाही संगीतकाराची कारकीर्द घडवू किंवा बिघडवू शकतो अशी बढाई तो मारू लागला. संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त मानधन घेऊ लागला. बर्मनदादांशी भांडण झाले. देव आनंद, गुरू दत्त दुरावले. नया दौर, सोने की चिडीया नंतर ओ. पी. पण साहिरबरोबर काम करणार नाही म्हणाला. गुणी संगीतकार जयदेवशीही भांडण झाले. गाण्यासाठी जयदेवने आपल्या घरी तबला पेटी घेऊन यावे या क्षुल्लक कारणावरून. मदनमोहन, अनिल बिस्वास, हेमंतकुमार, सी. रामचंद्र पण एक दोन चित्रपटांनंतर त्याच्याजवळ फिरकले नाहीत. अर्थात त्याने खय्यामला फिर सुबह होगी द्यावा अशी सूचना त्याच्या निर्माता दिग्दर्शकाला केली होती हे खरे. पण खय्यामनेही तो व शगुन सोडून पुढे “कभी कभी” पर्यंत साहिरबरोबर काम केले नाही.
अशा परिस्थितीत साहिर पुनरागमन करू शकला ते रोशनमुळे. बिचारा रोशन. बरसात की रात च्या आधी ३२ चित्रपटांमध्ये ४४ गीतकारांबरोबर काम केले, उत्तमोत्तम गाणी दिली, पण व्यावसायिक यश काही मिळाले नाही. बरसात की रात प्रसिद्ध झाल्याने दोघांनाही फायदा झाला. रोशन – साहिर यांनी अत्यंत दर्जेदार गाणी दिली आणि ती लोकप्रिय पण झाली. बाबर, चित्रलेखा, ताजमहल, दिल ही तो है, बहू बेगम, दूज का चाँद, सर्वच चित्रपटांबद्दल हे खरे आहे. तीच गोष्ट जयदेवच्या जोरू का भाई, हम दोनो आणि मुझे जीने दो ची. पण मला सर्वात आवडलेली गाणी म्हणजे खय्यामच्या फिर सुबह होगी आणि शगुन मधली.
रोशनचे १६ नोव्हेंबर १९६७ ला निधन झाले आणि साहिरला उतरती कळा लागली. रवी आणि एन. दत्ता यांनी दिलेली बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटातली गाणी मला खास आवडत नाहीत. त्यानंतर कभी कभी चा अपवाद वगळता साहिरने १९८० पर्यंत खास कामगिरी केली नाही.
तुम्ही जर ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्या (धक्का – कलाटणी तंत्रवाल्या)वाचत असाल तर साहिरबाबत माझे मत असेल याचा अंदाज येईल. आधीची प्रस्तावना यासाठीच होती की साहिरची बहुतेक चांगली गाणी मला माहिती आहेत हे वाचकाला समजावे. तरीही गीतकार म्हणून शैलेंद्र, शकील काही प्रमाणात मजरूह हे मला जास्त आवडतात. साहिरची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातले सामाजिक विचार सांगणे हे एक. पण साहिर ते करताना कधी कधी अकलात्मक पातळीवर उतरतो. “औरत ने जनम दिया मर्दोंको”, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा” वगैरे याची उदाहरणे आहेत.
माझा दुसरा आक्षेप असा आहे की तो चक्क अनुकरण (वाङमयचौर्य?) करतो. “जिसे तू कबूल कर ले” मधल्या ओळींचे शकीलच्या “जो खुशी से चोट खाये” मधील ओळींशी साम्य आहे ते आधी लिहिलेच आहे. दुसरे उदाहरण “दीदी” मधल्या “तुम मुझे भूल भी जाओ” मधल्या
ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है
ज़ुल्फ़ो रुख्सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
आणि फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या “मुझसे पहली सी मुहब्बत मेरे मेहबूब ना माँग” मधल्या या ओळी पहा.
और भी गम है दुनिया में गमे मुहब्बत के सिवा
राहते(सुख) और भी है वस्ल( मीलन) की राहत के सिवा
फ़ैज़ ची कविता आधीची आहे. तसेच साहिरच्या गाण्यातला “मैने तुमसेही नहीं सबसे मुहब्बत की है” हा बचावही लंगडा वाटतो. कवी नीरजनेही “नई उमर की नई फसल” मध्ये (संगीतकार – रोशन) एक याच प्रकारचे गाणे लिहिले आहे. “आज की रात बडी शोख बडी नटखट है”. त्यातला प्रियकर प्रेयसी ला काय म्हणतो पहा.
“पर ठहर वो जो वहाँ लेटे है फुटपाथों पर
लाश भी जिनकी कफ़न तक न यहाँ पाती है
और वो झोपडे छतभी न है सरपर जिनके
छाते छप्पर ही जहाँ जिंदगी सो जाती है
पहले इन सब के लिये एक इमारत गढ लूँ
फिर तेरी माँग सितारों से भरि जाएगी”
हे जास्त आवडले.
साहिरचा कल गाण्यातून विचार मांडण्याकडे जास्त आहे. त्याला भावना मांडता येत नाहीत. त्याबाबतीत शकीलला तोड नाही. मात्र काही प्रसिद्ध कवितांवर parody प्रकारच्या रचना छान केल्या आहेत. उदा. महंमद इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी झाल्यावर त्यांनी लिहिले होते
“चीनो अरब हमारा हिंदोस्ताँ हमारा
मुस्लिम है हम सारा वतन हमारा सारा जहाँ हमारा”
त्यावर साहिरचे “चीनो अरब हमारा” गाणे म्हणजे जबरदस्त चपराक आहे. किंवा ब्राउनिंगच्या प्रसिद्ध ओळी आहेत
god is in the heaven and all is right with the world
त्यावर साहिर यांनी लिहिले “आसमाँ पे है खुदा और जमींपे हम, आजकल वो इस तरफ़ देखता है कम”. हाच धागा पकडून गुलजार यांनी “हालचाल सब ठीकठाक है” (मेरे अपने) लिहिले. त्यात
“अल्लामिया जाने कोई जिये या मरे
आदमी को तो खूनबून सब माफ़ है” अशा ओळी आहेत.
“देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इन्सान” चे विडंबन ” देख तेरे भगवान की हालत क्या हो गई इन्सान कितना बदल गया भगवान” (रेल्वे प्लॉटफॉर्म) असे केले आहे.