पहिला किस्सा आहे तो साहिरला कॉलेज का सोडावे लागले याबद्दलचा. साहिर लुधियानाच्या सरकारी कॉलेजचा विद्यार्थी. त्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या आज ६० – ६५ वर्षे वय असलेल्या लोकांकडून समजलेली हकीकत अशी. साहिरचे एका मुलीवर प्रेम होते. ते साहिरने तिच्याकडे व्यक्त केले. मुलीचे वडील श्रीमंत असल्याने प्रिन्सिपॉलने साहिरला बोलावून समज दिली. पुन्हा साहिरने तिची छेड काढल्यावर साहिरला प्रिन्सिपॉलने पुन्हा असे करशील तर कॉलेजमधून काढू शी धमकी दिली. त्यावेळी ती मुलगी विजयी मुद्रेने साहिरकडे पाहत होती. साहिरने तिथल्या तिथे उत्तर दिले ” फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला, देखिये आपने फिर प्यारसे देखा मुझे”. त्यानंतर साहिरला कॉलेजातून काढून टाकण्यात आले.
दुसरा किस्सा साहिब बिबी और गुलाम कसा हातातून गेला त्याबद्दलचा. ” प्यासा”नंतर साहिरचे बर्मनदादांशी भांडण झाले. गुरूदत्तने कैफ़ी आज़मी – शैलेंद्र याना घेऊन “कागज़ के फूल” काढला (हो, त्या चित्रपटात शैलेंद्रचेही एक गाणे आहे, अर्थात तितके खास नाहीये). तो म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. त्यामुळे “साहिब बिबी और गुलाम” साठी पुन्हा एकदा साहिर- बर्मनदादा यांना घेऊन काम करावे असा विचार केला. दोघे एकमेकांबरोबर काम करायला तयार होईनात. शेवटी साहिरसाठी गुरूदत्तने बर्मनदादांना बदलून हेमंतकुमारला घेतले. साहिर गाणी घेऊन येईल म्हणून गुरूदत्त – हेमंतकुमार यांनी महिनोनमहिने वाट पाहिली. पण साहिरची प्रतिभा आटली म्हणा किंवा इतर काही कारण असेल, तो गाणे लिहीचना. शेवटी कंटाळून गुरूदत्तने शकीलला बोलावणे पाठवले. शकील गुरूदत्तच्या ऑफिसमध्ये आला नेमका त्याच वेळी साहिर गाणे घेऊन गुरूदत्तचा सहाय्यक अब्रार अल्वीच्या ऑफिसमध्ये आला. अल्वीने गुरूदत्तला फोन करून साहिर आल्याचे सांगितले. तेव्हा गुरूदत्तने साहिरला परत पाठव, मी शकीलशी शेवटची बोलणी केली आहेत असे सांगितले. याच गुरूदत्तने “प्यासा” च्या मुख्य भूमिकेसाठी निवडलेला दिलीपकुमार चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी उशीरा आल्याकारणाने त्याला हाकलून दिले होते व शेवटी ती भूमिका स्वतः करण्याचा निर्णय घेतला होता.
तिसरी आठवण आहे ती गीतकार जावेद अख्तर साहिरवर एक कार्यक्रम दूरदर्शनवर करत होते तेव्हाची. साहिरच्या बहिणी, तसेच इतर काही मान्यवर व्यक्ती यांच्या मुलाखती झाल्या. गीतकार मजरूह यांच्याशीही थोडीशी बातचीत झाली. “साहिरका गाना याने क्या, किताबसे कोई गज़ल या नज्म उठाई, एक दो लब्ज इधर उधर किये, तो हो गया इनका गाना” अशा शब्दात मजरूह यांनी तोफ डागली. जावेद अख्तर यांनी अत्यंत घाईघाईने “शुक्रिया मजरूह साब, आपसे फिरसे बातचीत करेंगे” म्हणून ती बातचीत आवरती घेतली. कठोर वाटले तरी मजरूह यांचे निरीक्षण अचूक आहे. पुस्तकातून “चलो इक बार फिर से अजनबी बन जाये”, “प्यार पर बस तो नहीं है मेरा”, कभी कभी मेरे दिल में खयाल आता है”, जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ है” (मूळ – सनी ख्वाने तकदीसे मशरिक कहाँ है), “इक शहनशाह ने दौलत का लेकर सहारा हम गरीबोंकी मुहब्बत का उदाया है मज़ाक” अशी अनेक गाणी आली आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याने सर्वाधिक १०, ००० गाणी लिहिली असल्याचा प्रवाद आहे अशा मजरूहच्या ५४ वर्षांच्या कारकीर्दीत फक्त ” हम है मताए कूचा बाजार की तरह” हे एकच गाणे पुस्तकातून घेतले आहे.
शेवटी गुलज़ार साहिरबद्दल काय म्हणतो हे सांगून या लेखमालेचा शेवट करतो. “Sahir was literary figure and he remained literary figure till the end. He did not accept the film medium as much as the medium accepted him”
इथे विनायक यांचा साहिरवरील दीर्घ प्रतिसाद संपतो. या प्रतिसादातील सर्वच मतांशी मीही सहमत आहे असे नाही. विनायक यांचा अभ्यास जबरा आहे आणि विश्लेषण करण्याची हातोटीही विलक्षण आहे, पण कलाक्षेत्रात सर्वच गोष्टी अशा मोजूनमापून होत नसतात.काहीकाही वेळा तर्काच्या पलीकडे जाऊन कला ही निव्वळ कला म्हणून पहाण्यातच मजा असते. काव्यासारख्या क्षेत्रात तर तुलना करण्याचा मोह वारंवार होत असला तरी तसे करणे योग्य नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. शिवाय कलाकार हा त्याच्या कलेतून बघावा, त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी त्याच्या कलेची सांगड घालणे योग्य नाही, असे माझे मत आहे.
असो. इतका अभ्यासपूर्ण आणि माहितीप्रधान प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तो इथे प्रसिद्ध करण्याची मुभा दिल्याबद्दल मी विनायक यांचा अत्यंत आभारी आहे.
वा वा !
संजोपराव, तुमचेही आभार, विनायकरावांचे प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.
आता ह्या सर्वांचा मिळून एक पूर्ण लेख करावा, ही विनंती.
– मिलिंद
एक शंका: साहिरच्या जीवनात अमृता प्रीतम ह्यांचे काय स्थान होते ? अमृताजींवरचा लेख जसा साहिरविना अपूर्ण रहातो, तसा साहिरवरचा लेख त्यांच्या उल्लेखाविना अपूर्ण आहे, असे वाटते.
– मिलिंद
atishaya mahitipurna pratisad.
mahitipurna ha shabda ata shivisarakha vatato pan dusara samarpak shbdach suchala nahi 🙂
सर्वश्री. मिलिंद व योगेश (आणि अर्थात संजोपराव)
प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार!
अमृता प्रीतम व साहिर यांच्यात प्रेमसंबंध होते एवढीच ऐकीव माहिती आहे. अमृता प्रीतमने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात साहिर व इमरोज (चित्रकार) एवढेच दोन पुरुष आल्याचे सांगितले होते. यापेक्षा जास्त मला काहीही माहीत नाही.
दुसरी एक महत्त्वाची ऐकीव गोष्ट म्हणजे गाणी लिहिण्यासाठी आपल्या पदरी इतर कवी ठेवले असल्याचा आरोप ज्या दोन गीतकारांवर होतो त्यापैकी एक साहिर. दुसरा आनंद बक्षी. याबाबतीत जाँ निसार अख्तरकडून गाणी लिहून घेऊन साहिरने स्वतःच्या नावावर खपवल्याचा आरोपही जाँ निसारची बायको सोफ़िया (प्रसिद्ध कवी मजाज लखनवीची बहीण) हिने केला आहे. कदाचित जाँ निसार अख्तरला मदत करण्याच्या हेतूनेही साहिरने हे केले असेल.
विनायक
आजच विनायकरावांचे हे सर्व लेखन सलग वाचले आणि अक्षरश:थक्क झालो! एखाद्याचा असा व्यासंग पाहिला की मनापासून आनंद झाल्याशिवाय राहात नाही. आज माझीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही!
असो! संजोपशेठ आणि विनायकराव तुम्हा दोघांनाही धन्यवाद! आणि कधीकाळी मनोगतावर फुल्टू भांडण केलेले तुम्ही दोघं जण! पण आज एक दुसयाच्या ब्लॊगवर लिहितो आहे आणि दुसरा प्रेमाने लिहू देतो आहे हे पाहून माझ्यासारख्या मनोगती साक्षिदाराला किती आनंद झाला असेल हे कुणाला सांगून पटणार नाही! खरंच, संगीत, गाणं किंवा इतर कोणत्याही फाईन आर्टस माणसामाणसाला एकमेकांच्या किती सहजपणे जवळ आणतात!
क्या बात है.. जियो…
आपला,
(संजोप आणि विनायक या दोघांचाही!) तात्या.
विनायकांचा प्रतिसाद अत्यंत वाचनीय व माहितीपूर्ण आहे यात शंका नाही. त्यामागे त्यांचा वर्षानुवर्षांचा व्यासंग व स्वत:चा स्वतंत्र विचार आहे. त्यामुळे त्यांना साहिरवर टीका करायचा पूर्ण अधिकार आहे हे मी मान्य करतो.
त्याचवेळी हेही खरे की बहुतेक सर्व वस्तूंचा मुलामा खरवडून पाहिला की आत थोडाफार निकृष्ट पदार्थ दिसणे स्वाभाविकच आहे. माणसांचे, विशेषत: मोठ्या माणसांचे अनेकानेक पैलू असतात, कुठलातरी पैलू वेडावाकडा, विचित्र, असा असायचाच. एखाद्या दोषामुळे कितीतरी गुणी माणसे आपले आयुष्य वाया घालवतात.
पण खरा मुद्दा तो नाही. विनायकांची महत्वाची टीका आहे ती साहिरच्या कवित्वचौर्याबद्दल. याबद्दल मला असे वाटते की चित्रपट गीतकाराची भूमिका व कवीची भूमिका यातला फरक आपण पहावा. कवी स्वतंत्रपणे प्रतिभाविष्कार करू शकतो. गीतकार इतरांच्या गरजेप्रमाणे व हेतूपूर्तीसाठी लिहीत असतो. गीतकाराचे मूळ काम आवश्यकतेनुसार भावना व विचार यांचे कम्युनिकेशन हे असते. ओरिजिनॆलिटी ही मोठी मुश्किल गोष्ट आहे, पण गीतकारावर ती असण्याचे ओझे नसते, नसावे.
(आता ही कवित्वकामाठी करत असताना एखाद्याने प्रतिभा दाखवली तर ती त्याची महानता.)
गीताकडून माझी अपेक्षा एवढीच की ते सहज तोंडात बसणारे असावे, त्याला माझ्या दृष्टीने काही (जमेल तितका खोल) अर्थ असावा, त्यातून माझ्या जीवनाला, मनाला भिडणारे काहीतरी मिळावे, ते लक्षात रहावे.
ही अपेक्षा ज्या गीतकाराकडून पुरी होते तो मला चांगला गीतकार वाटतो -साहिर असो की जावेद अख्तर असो की आणखी कोणी. माझा विनायकांइतका मोठा व्यासंग असता तर मी कदाचित त्यांच्याप्रमाणे बोललोही असतो पण तसे नाही, म्हणून मी माझ्या जागी अल्पसंतुष्ट आहे.
तसेही कवितेतले आम्हाला/मला काय कळते म्हणून आम्ही कवित्वाबद्दल बोलावे?
-दिगम्भा
पण खरा मुद्दा तो नाही. विनायकांची महत्वाची टीका आहे ती साहिरच्या कवित्वचौर्याबद्दल. याबद्दल मला असे वाटते की चित्रपट गीतकाराची भूमिका व कवीची भूमिका यातला फरक आपण पहावा. कवी स्वतंत्रपणे प्रतिभाविष्कार करू शकतो. गीतकार इतरांच्या गरजेप्रमाणे व हेतूपूर्तीसाठी लिहीत असतो. गीतकाराचे मूळ काम आवश्यकतेनुसार भावना व विचार यांचे कम्युनिकेशन हे असते. ओरिजिनॆलिटी ही मोठी मुश्किल गोष्ट आहे, पण गीतकारावर ती असण्याचे ओझे नसते, नसावे.
(आता ही कवित्वकामाठी करत असताना एखाद्याने प्रतिभा दाखवली तर ती त्याची महानता.)
हे मान्य आहे. कवयित्री शांता शेळके यांनी पण एके ठिकाणी गीतकाराला ओरिजिनॅलिटीचे बंधन नसते, असे एका मुलाखतीत म्हटले होते. हिंदीमध्ये शैलेंद्र, मजरूह आणि मराठीत ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, मीराबाई, कबीर, क्वचित शेली वगैरे इंग्लिश कवी लोकांच्या प्रसिद्ध रचनांवरून तसेच लोकगीतांवरून स्फूर्ती घेतली. परंतु यापैकी कोणीही समकालीन कवीच्या लेखनावरून स्फूर्ती घेतल्याचे आठवत नाही. ग दि. मा. किंवा शांता शेळके यांनी चित्रपट गीते लिहिताना कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट वगैरे लोकांच्या कवितेतील ओळी/कल्पना वापरल्याचे मला माहिती नाही.
साहिरने शकील, राजा मेहंदी अलि खान, कतिल शिफ़ाई, फ़ैज़ अहमद फ़ैज़ वगैरे समकालीन कवींच्या काही ठिकाणी ओळी तर काही ठिकाणी कल्पना आपल्या गाण्यात वापरल्या हा आक्षेप आहे आणि हा प्रकार गालिबनंतरचा उर्दूतील सर्वश्रेष्ठ कवी असे बिरूद मिरवणाऱ्या साहिरला भूषणास्पद नक्कीच नाही.
दुसरे असे की, चित्रपटगीतात साहित्यचौर्य एक वेळ क्षम्य मानले तरी साहिरने कवितेच्या पुस्तकात पण फ़ैज़ अहमद फ़ैज़ चे विचार जवळपास तशाच प्रकारे मांडले हे क्षम्य मानता येईल का? एक उदाहरण देतो.
फ़ैज़ च्या “मुझसे पहलीसी मुहब्बत” मधल्या ओळी पहा.
“और भी ग़म है ज़मानेमें ग़मे मुहब्बत के सिवा
राहते और भी है वस्ल की राहत के सिवा”
आणि आता साहिरच्या पुस्तकातल्या या ओळी पहा.
“तुम्हारे ग़म के सिवा और भी तो ग़म है मुझे
निजात जिनसे मैं एक लहजा पा नहीं सकता”
आणि “दीदी” चित्रपटात
“ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है” वगैरे. आपण उपक्रम वर प्रतिसाद देताना “कभी खुद पे कभी हालात पे रोना आया” हे गाणे आवडल्याचे लिहिले आहे. ते छानच आहे. पण कधी कधी त्याने शकीलच्या प्रसिद्ध “ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया” या गज़लेची जमीन वापरली असे मनात आल्याशिवाय राहत नाही.
विनायक
जाता जाता – साहित्यात नाव कमावून मग चित्रपटात गाणी लिहायला लागलेल्या साहिर, कैफ़ी आझमी, जाँ निसार अख्तर या लोकांपेक्षा साहित्यात नाव नसलेल्या पण चित्रपट माध्यमाला वाहून घेतलेल्या शैलेंद्र व शकील यांनी उजवी कामगिरी केली आहे असे वाटते. हिंदी कवींमध्ये साहित्यात नाव असलेल्या नीरज व नरेंद्र शर्मा यांनी चित्रपटगीतेही सुंदर लिहिली.