‘उपक्रम’ च्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी रंगात आली होती. भारतीय बैठकीवर पांढरेशुभ्र पलंगपोस अंथरले होते. मखमलीचे लोड ठेवलेले होते. चांदीच्या दोन उंच समया तेवत होत्या – अर्थातच मंदपणे. कुठल्याशा नवीनच उदबत्तीचा वास रेंगाळला होता. खांसाहेबांचा मालकंस म्हटलं तर समारंभाबरोबर, म्हटलं तर थोडासा अलिप्त, असा वावरत होता. उपक्रमरावांनी फराळाची तयारी जय्यत केली होती. काजूच्या तुकड्यांची आणि बेदाण्यांची सढळ पेरणी केलेले मोतीचुराचे लाडू, खुसखुशीत चकल्या, देशी तुपात तळलेले आणि मऊ पिठीसाखर पेरलेले चिरोटे, फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा, वेगवेगळ्या प्रकारची फळं, मसाला दूध…. कशाची कमी म्हणून नव्हती.
“आपले अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. ” उपक्रमरावांनी चिवड्याचा बकाणा भरताभरता आपले पेटंट वाक्य टाकले. “ललितलेखन, कथा, कविता.. असले काही इथे अपेक्षित नाही.” “छा, कविता नाही म्हणजे विडंबनपण नाही! मग साली काय मजा? ” केशवसुमाराने हातातला चिरोटा खाली ठेवला.
“विडंबने नाहीत? दे टाळी! सुटलो आपण!” ‘आतल्या’ आवाजात सर्किट सन्जोपला. सन्जोप आणि सर्किट फक्त चिवडा आणि चकली खात होते.
“पण मी काय म्हणतो उपक्रमशेठ…” विसोबाने मोतीचुराचा लाडू फोडताफोडता सुरुवात केली. “च्यामारी तुम्ही मराठी संकेतस्थळ सुरु करता आणि फोकलिच्यानो तिथे कविता नाही म्हणजे काय? अरे, असला मस्तवालपणा सुरु झाला म्हणून तर साला आपण मनोगतवरुन बाहेर पडलो. नाहीतर मनोगत आजही आपलं फर्स्ट लव्ह आहे यार!”
“चला, इथंही सुरु झालं याचं! “ऐहिक चाणक्यच्या कानात कुजबुजला. “हा एकीकडे ‘आपण फुलं वेचली तिथं साला गोवऱ्या वेचणार नाही’ असलं बकत असतो आणि प्रत्येक दुसऱ्या चर्चेत मनोगत आणि तो फोकलीचा प्रशासक हे आहेच त्याचं…”
“ते तर आहेच रे…” चाणक्याने एक केळे उचलले. ” मला एक सांग, याचा साल्याचा कवितांशी काय संबंध? याच्या कविता म्हणजे काय माहिती आहे ना? ‘तू अमुक, मी तमुक, तू ढमुक, मी समुक’ बरं त्याही आपल्या नाहीत बरं का! कुणीतरी मेलने पाठवलेल्या! आता मला पन्नास मेल येतात रोज अशा. त्या काय सगळ्या इथं देत बसू की काय मी?”
“या रोखठोक सवालाबद्दल मी विसोबाचे अभिनंदन करतो” सर्किट जोरात म्हणाला.सन्जोपने सर्किटकडे चमकून पाहिले.
“हे काय नवीनच?” वरुण आता ऐहिक आणि चाणक्याच्या चर्चेत सहभागी झाला होता. “ही वाट इकडे कशी काय वळली म्हणे?” “काय लेका वरुण्या तू…. ” ऐहिक म्हणाला, “अरे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! तो फोकलीचा प्रशासक घे, ‘संवाद साधण्याची कला’ शिकवणारा घे…”
“शिव्या देणे आणि शिव्या खाणे यातून माणसाला नक्की कसला आनंद मिळत असेल? च्यायला आपल्याला लोक असं काहीबाही बोलले असते तर आपलं तर ब्लडप्रेशर वाढलं असतं राव!” योगेश म्हणाला.
“आवं, विसोबाला काय समदीच श्या देनारी हायत व्हय? हितंबी त्याचा फ्यान क्लब हायच की! आगदी प्राध्यापक, डाक्टर सगळी मंडळी हायत बगा त्यात. आन ब्लडप्रेसरचं म्हनत असाल तर हप्त्याचं ‘साती’ दिस आयुर्वेद रसशाळंच्या ‘मादवी’ त्येलानं डोक्याला मालिस करुन घेतुया म्हनं ह्यो बाबा!” खेडूत म्हणाला.
विसोबाचे लक्ष डाव्या बाजूच्या खिडकीकडे गेले. तो. एकटाच खिडकीतून बाहेर बघत उभा होता. आल्यापासून तो. ना कुणाशी काही बोलला होता, ना त्याने काही खायला घेतले होते.
“अहो, तो. शेठ, जरा इकडे मैफिलीत या की राव! एकटेच का उभे आहात?” विसोबांनी नेहमीची मासेमारी सुरु केली.
“तो. मराठी विकिपिडीयाचा सदस्य आहे” तो. न वळताच म्हणाला. “कमळे, कमळे, किती गोड खाशील?” सर्किट म्हणाला.
“अरेच्चा, मग त्यात काय विशेष?”
“तो. मराठी विकिपिडीयाचा सदस्य आहे” तो. पुन्हा म्हणाला. “कमळे, कमळे, किती गोड खाशील?” सर्किट म्हणाला.
“अस्सं, मग मी गमभन वापरतो” चाणक्य चिडून म्हणाला. “आप्पा, तुम्ही फसलात… साखर,साखर, साखर… अरे थांबा, थांबा….” सर्किटला सात्त्विक संताप आला. “असंबद्ध प्रतिसाद आणि विषयांतर या माझ्या कुरणात इतर कुणालाही प्रवेश नाही याची कृपया नोंद घ्यावी…”
“मी…. बोलू का जरा?” एक अगदी हळुवार आवाज आला. “इथे प्रामुख्याने माहितीची देवाणघेवाण होणे अपेक्षित आहे ना? मग माझ्याजवळ ही माहिती आहे पहा…”
“कोण रे हा?” निनादने योगेशला विचारले. “काही कल्पना नाही बुवा…”
त्या अनोळखी माणसाचे मृदू बोलणे सुरु होते. “एक उपक्रमी चार दिवसांत एक चर्चाविषय लिहितो. त्याला पुढील दोन दिवसांत चार अर्थपूर्ण आणि सत्तावीस निरर्थक प्रतिसाद येतात. तिसऱ्या दिवशी त्यातील तेरा प्रतिसाद उडवले जातात. चौथ्या दिवशी त्यातील दोन प्रतिसादांचे स्वतंत्र चर्चाविषयांत रुपांतर होते. पाचव्या दिवशी मूळ चर्चाविषयाला दुसरे तीन प्रतिसाद येतात आणि पहिल्या दोन दिवसांत आलेल्या प्रतिसादांपैकी सहा प्रतिसादांना प्रत्येकी एक उपप्रतिसाद येतो, तर
१. एका महिन्यात मूळ चर्चाप्रस्तावाला किती प्रतिसाद आणि उपप्रतिसाद येतील?
२. या कोड्यातील कोणता विदा अत्यंत आवश्यक आणि कोणता अत्यंत अनावश्यक आहे? हे कोडे तोंडी सोडवावे.लेखी आकडेमोड आवश्यक नाही…”
“हां.. हा तर आपला यनावाला” वरुणने बरोब्बर ओळखले.
“काय रावशेठ, जमतंय का?” विसोबा.
“तात्या, एकच उत्तर जमतंय बघ..”
“कोणतं?”
“हे कोडंच अनावश्यक आहे!”
तेवढ्यात चित्तरंजन, कुमार जावडेकर आणि मिलिंद फणसे आत येताना दिसले. “काय चित्तोबा, ही काय येण्याची वेळ झाली का? वाजले किती?” केशवसुमाराने त्यांना दारातच धरले.
“जाऊ दे रे…” खिरे मध्ये पडला ” एक तर बिचाऱ्यांना गजला पाडतापाडता नाकी नऊ येत असतील. त्यातून आपला व्यवसाय सांभाळून हे सगळं करायचं..”
“व्यवसाय? कसला व्यवसाय?”
“म्हणजे? या तीघांचा रियल इस्टेट कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे ना पार्टनरशिपमध्ये?”
“तुला कुणी सांगितलं?”
“सांगितलं नाही बुवा कुणी, पण हे सारखे एकमेकाला म्हणत असतात ना की जमीन चांगली आहे, ही जमीन तुला दिली, म्हणून मला वाटलं बुवा तसं!”
अत्त्यानंदबुवा चित्तच्या स्वागताला सरसावले होते. “चित्तरंजन, ते फार्शीचं बाकी झकास काढलंस हां तू! आता मीही मराठीत फार्शीतून आलेल्या काही शब्दांचा उगम शोधून काढणारे. आता हे शब्द बघ.थातुरमातुर. हा शब्द फार्शीतून आला असेल की नाही? दुसरा बघ – गोलगप्पा. किंवा हुमदांडगा. मला तर असं वाटतं चित्त, ‘सुक्काळीच्या’ या शब्दाचा उगम देखील मूळ फार्शीच असणार!” चित्त कोलमडायच्या बेताला आला होता. तेवढ्यात पुन्हा एकदा सर्कितचा उंच आवाज ऐकू आला ” समजा मनोगत हे संकेतस्थळ उपक्रम या संकेतस्थळाने १६० कोटी डॉलर्सना विकत घेतले. नंतर समजा उपक्रम हे संकेतस्थळ मायबोली या संकेतस्थळाने ४२३ कोटी डॉलर्सना विकत घेतले. नंतर समजा मायबोली हे संकेतस्थळ माझे शब्द या संकेतस्थळाने ६५८ कोटी डॉलर्सना विकत घेतले. नंतर समजा मायबोली हे संकेतस्थळ पुन्हा मनोगतनेच १०४२ कोटी डॉलर्सना विकत घेतले. आणि समजा या सगळ्या फेरफाराचा कार्यक्रम सुरु असताना या सर्व संकेतस्थळांवर होणाऱ्या सदस्यांच्या वर्दळीचा विदा माझ्या संगणकावर आपोआप उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली तर अ) मला नक्की किती रिकामा वेळ आहे असे तुम्हाला वाटते?
ब) मी मॅक वापरणे बंद करुन परत विंडोज वापरायला लागावे असे तुम्हाला का वाटते?
क) तुम्ही उपक्रमवर का येता?”
“तुझं तुणतुणं जरा थांबवशील का सरक्या?” आता धोंडोपंत मैदानात उतरला होता ” एक तर आमच्या कोकणातल्या सुपाऱ्या हल्ली पूर्वीइतक्या प्राणघातक राहिलेल्या नाहीत. त्याचा आमच्या फलज्योतिषाच्या तंत्राने विचार करता खालील गोष्टी स्पष्ट होतात २७.४.२००६ पासून मकरेने कमरेवर घेतलेला गुरु आता लघु होऊन आता शेन वॉर्नच्या फ्लिपरप्रमाणे उलटा फिरला आहे. त्यामुळे आजवर वृषभ राशीच्या लोकांना असणारे त्रास – उदा. रात्री जास्त झाल्यास सकाळी डोके दुखणे, चष्मा न घातल्यास अस्पष्ट दिसणे, मळमळल्यासारखे होत असल्यास उलटी होणे आता कमी होतील किंवा त्यांची आतापर्यंत सवय झालेली असल्याने त्याचे काही वाटणार नाही. मग असं असूनही ‘आम्हाला येथे भेट द्या’ असे लिहूनही कुणी काळे कुत्रेही तिकडे का फिरकत नाही?
“तोंड सांभाळून धोंडोपंत. सरक्या कुणाला म्हणतोस?”
“हे बघा, अशी हमरीतुमरी नको. ऐच्छिक अपत्यहीनतेविषयी चर्चा करुया का आपण?”
“पर्यावरणाचं काय ते बोला आधी…”
“बाबुजी एकदा मला काय म्हणाले…”
“जय भोलेनाथ!”
“साहिरच्या गाण्याचा दुसरा टप्पा…”
“लैंगिक शिक्षणसुद्धा बरं का…”
“हा वेलणकर म्हणजे तुला सांगतो..”
“अरे, पुरे रे तुमचं!”
“चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं..”
तेवढ्यात कुणीतरी दार गच्च ओढून घेतले!
😀 वाटलंच होतं.
हा हा… हसून हसून पुरेवाट.
हा हा हा !!!
संजोप काका,
…ह्यावेळेला बाकिच्या नावांची पेरणी निमीत्तमात्र असून.. मुख्य टार्गेट(लक्ष्य) खालील वाक्ये आहेत..इतपत आता आम्हालाही कळायला लागले आहे बरं का?
अ) मला नक्की किती रिकामा वेळ आहे असे तुम्हाला वाटते?
ब) मी मॅक वापरणे बंद करुन परत विंडोज वापरायला लागावे असे तुम्हाला का वाटते?
क) तुम्ही उपक्रमवर का येता?”
आणि सगळ्या लेखाचा गाभा हा आहे … :-))
“तुझं तुणतुणं जरा थांबवशील का सरक्या?”
-वरूण
संजोपा,
बाबारे तुझे पाय कुठे आहेत? नाही, त्यांचा एक फोटो काढून दे बाबा मला. घरात लावतो!
धन्य आहे तुझी! फक्कडच लिहिलं आहेस, आपण साला मानलं तुला! 😉
पुढचा भाग केव्हा? त्यात त्या गाढव वरकर्णी चं आणि माझं जोरदार भांडण दाखव. त्याच्या बाजूने ऐहिक, आणि चाणक्यला ठेव आणि माझ्या बाजूने तू आणि विनायक राहा. मध्यस्थ म्हणून यनावालाला ठेव! ;))
या शिंदळीच्या तात्याचं काय करायचं असा एक संवाद उपक्रमराव आणि उपसंपादक यांच्यात होतो आहे असाही एक शीन दाखव! 😉
वा! मस्त लेख. वाचून दोन घटका सुखाच्या गेल्या!
तुझा,
तात्या.
हसून हसून पुरेवाट झाली. निरीक्षणशक्ती, आणि उत्कृष्ट लेखनशैली! खालील वाक्ये विशेष:
सन्जोप आणि सर्किट फक्त चिवडा आणि चकली खात होते.
आन ब्लडप्रेसरचं म्हनत असाल तर हप्त्याचं ‘साती’ दिस आयुर्वेद रसशाळंच्या ‘मादवी’ त्येलानं डोक्याला मालिस करुन घेतुया म्हनं ह्यो बाबा!”
“तो. मराठी विकिपिडीयाचा सदस्य आहे” तो. न वळताच म्हणाला. “कमळे, कमळे, किती गोड खाशील?” सर्किट म्हणाला.
अ) मला नक्की किती रिकामा वेळ आहे असे तुम्हाला वाटते?
ब) मी मॅक वापरणे बंद करुन परत विंडोज वापरायला लागावे असे तुम्हाला का वाटते?
क) तुम्ही उपक्रमवर का येता?”
कीप इट अप !!
– सर्कीट
क्या बात है !
“समजा मायबोली हे संकेतस्थळ माझे शब्द या संकेतस्थळाने ६५८ कोटी डॉलर्सना विकत घेतले.”
आह !!!!!!!! अहो कमीत कमी १० दिवस आधीतरी हा लेख लिहावयाचा … नाही आम्ही माझे शब्द विकले नसते हो ! कारण ज्यावेळी आम्ही मायबोली विकत घेऊ शकतो ६५८ कोटी (तरी नशीब तुम्ही कोटी हा शब्द अक्षरामध्ये लिहला नाहीतर आम्हाला अंक लिहताना शुन्य लिहताना खुपच मोठी अडचण झाली असती :)) ) त्या वेळी माझे शब्दची किमत १२५८ कोटी तर नक्कीच असती ना :))
सर्किट तुमची आकडेवारी काय बोलते येथे ?
लवकर लिहा आम्ही आमचा व्यवहार पुन्हा तपासून पाहू 😉
सर्किट राव ! मदत करा ह्या महत्वाच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी….
पण सन्जोप राव लेखन भन्नाटच !
एकदम झकास !
राज जैन
the best post I ever read.
🙂
apratim! bhannaat lekh aahe.
मस्त!
खास करुन ‘तो विकीपीडीयाचा सदस्य’ आणि ‘मी गमभन’, ‘विषयांतर ‘,’जमीन’ आणि ‘कोडी’ जबरा! भाग २ येणार आहे का?
jabaraa!
या तीघांचा रियल इस्टेट कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे ना पार्टनरशिपमध्ये?”
“तुला कुणी सांगितलं?”
“सांगितलं नाही बुवा कुणी, पण हे सारखे एकमेकाला म्हणत असतात ना की जमीन चांगली आहे, ही जमीन तुला दिली, म्हणून मला वाटलं बुवा तसं
dhammaaaal!!!!!!
“कमळे, कमळे, किती गोड खाशील!” काय किंवा “रिअल इस्टेट कन्सलटन्सी” मस्त! भन्नाट लेख!!!!
वा ! बर्याच दिवसांनी नेट सुरु केल्यावर वाचायला काहीतरी खमंग मिळालं.
माझ्या नावाचा इतका वात्रट उपयोग? त्रिवार निषेध! :):)
आता उपक्रमराव, वेलणकर आणि गल्लेवाले यांच्या खाजगी भेटीचा वृत्तांत वाचायला आवडेल.
किंवा तीनही ठिकाणच्या लॉयल सदस्यांच्यात झडलेला कलगीतुरा बघायला आवडेल.
मात्र असं झाल्यास “साती” मनोगताच्याच बाजूने हो!
माहितीच्या देवाणघेवाणापेक्षा आम्हाला आस्वाद , संवाद आणि हो, विवादसुद्धा अधिक आवडतो.
साती
माहितीच्या देवाणघेवाणापेक्षा आम्हाला आस्वाद , संवाद आणि हो, विवादसुद्धा अधिक आवडतो.
I agree completly with Sati.. I also like Manogat much better than Upakram.
-Kedar
धमाल लेख!
निरीक्षणशक्ती, आणि उत्कृष्ट लेखनशैली! — सहमत!
धमाल लेख. मस्त मजा आली वाचून. तेवढं ते खोडसाळपंत आणि केशवसुमाररावांचं तिथे काय काम होतं समजलं नाही 🙂
शेवटी ते दार गच्च ओढून घेणारी कोणीतरी म्हणजे मीच असावी!! 🙂
हा हा हा, 🙂 झकास!!