पाय मातीचे! -२

विश्वासरावांचा कामाचा झपाटा तर त्यांच्या कट्टर विरोधकांनाही थक्क करुन टाकणारा होता. आणि कामं तशी बरीच करायची होती. एका जर्मन कंपनीचा पॉवर प्रोजेक्ट लाल फितीत अडकला होता. पाटबंधारे खात्याचेही बरेच फंडस मार्गी लावायचे होते. महामार्गाचं सहा पदरीकरण सुरु होऊन रखडलं होतं, तेही बघायचं होतं. वर्ल्ड बँकेच्या मदतीसाठीचं एक प्रपोजलही नजरेखालून घालायचं होतं.
अशाच घाईघाईत अचानक पंतप्रधान भानुप्रताप राव यांचे पी.ए. सिन्हा यांचा तातडीनं दिल्लीला येण्यासाठीचा निरोप आला तेंव्हा विश्वासरावांना जरा आश्चर्यच वाटलं. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटलं ते ही भेट शक्यतोवर गुप्त ठेवण्याच्या सूचनेचं.  आधीच्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भानुप्रताप राव त्यांना सविस्तर भेटले होते. निवडणुकीतल्या यशाबद्दल हायकमांड तर खूष होतेच, पण स्वतः भानुप्रताप रावांनी विश्वासरावांच्या संघटनाकौशल्याचं विशेष जाहीर कौतुक केलं होतं. राजकीय वर्तुळात वरकरणी तरी शांतता होती. विरोधक तर अजून निवडणुकीतल्या जबरदस्त पराभवातून सावरलेच नव्हते. अशात पंतप्रधानांचं इतक्या तातडीचं काय काम असावं याचा विश्वासरावांना अंदाजच येईना. त्यांनी इंटरकॉम उचलला. जाधवांनी संध्याकाळी पाचच्या फ्लाइटमध्ये दोन सीटस सांगूनच ठेवल्या होत्या. न सांगता कामं करण्याच्या या गुणामुळं तर जाधव मुख्यमंत्रांचे लाडके असिस्टंट होते. रात्री नऊची भेट ठरली होती.
दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांच्या खास ताफ्यातली एक अँबेसिडर विलासरावांना न्यायला आली होती. संपूर्ण काळ्या काचा. साध्या पोशाखातला एक ड्रायव्हर. बस्स. इतर कोणी एस्कॉर्ट नाही, काही नाही.  इतक्या कमी लवाजम्यात प्रवास करण्याची विश्वासरावांची ही पहिलीच वेळ होती. मागच्या सीटवर विश्वासराव रेलून बसले. जाधवांनी दार ओढून घेतलं. भरभर मागं पडत जाणारी अंधुक दिल्ली पहात विश्वासराव शांतपणे बसून राहिले. गप्प. विचारमग्न.
रात्रीचे नऊ वाजले तरी सिन्हा नुकतेच आंघोळ करुन आल्यासारखे ताजेतवाने होते. कदाचित त्यांनी नुकतीच आंघोळ केलीही असेल, विश्वासरावांना वाटलं. “आईये, आईये, सर, गुड इव्हिनिंग.” त्यांनी मिठ्ठास स्वागत केलं. “पी. एम. साहब आपकाही इंतजार कर रहे हैं. गो स्ट्रेट इन, सर. तबतक जाधवसाब, कॉफी हो जाये?”
आणखी एक नवल. कितीही नाजूक मामला असला तरी आजवर जाधवांना कधी बाहेर बसण्याची वेळ आली नव्हती. जाधवांच्या कपाळावर नाराजीची एक आठी उमटली. त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटल्यासारखं करून विश्वासराव आत गेले.
आपल्या विशाल डेस्कमागं पंतप्रधान भानुप्रताप राव बसले होते. आजूबाजूला फायलींचा ढिगारा तर होताच, पण या वेळी विश्वासरावांना नव्यानं दिसला तो भानुप्रतापरावांच्या टेबलवरचा अत्याधुनिक लॅपटॉप.  
“या, या विश्वासराव, बसा.” भानुप्रताप रावांनी हात पुढे केला. खम्मम तालुक्यातल्या एका खेडेगावात जन्मलेल्या या पंतप्रधानांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं होतं. मराठी ते चांगलेच बोलत असत. विश्वासरावांशी तर ते आवर्जून मराठीतच बोलायचे. “बोला, काय म्हणतोय तुमचा महाराष्ट्र?” भानुप्रताप राव मोकळेपणाने म्हणाले. विश्वासराव आणखीच तणावाखाली आले. एखादा मोठा बॉंब टाकायचा असला की भानुप्रताप रावांची सुरुवात अशीच खेळीमेळीची असायची. ‘ब्रेक दी बॅड न्यूज जेंटली’ व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात शिकलेलं विश्वासरावांना आठवलं.
“ठीक आहे…. सर…”
“आणि तुमचे उपमुख्यमंत्री? आनंदराव?”
“तेही बरे आहेत सर…”
“बरे म्हणजे… नक्की कसे?”
“मी… समजलो नाही सर”
“हे बघा विश्वासराव…” भानुप्रताप रावांनी चष्मा काढून हातात घेतला. “काही गोष्टी स्पष्टच बोलतो. जाधव आलेत ना तुमच्याबरोबर? ठीक. त्यांना मी बाहेर थांबायला सांगितलं याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कदाचित वाईटही. पण विश्वासराव, बाबच तशी आहे. चारचौघात गेली तर नुकसान आहे. पक्षाचं… आणि… तुमचंही” भानुप्रताप रावांचा स्वर नेहमीसारखाच होता. शांत, संयमी तरीही खंबीर.
आता काहीही न बोलता ऐकण्यातच शहाणपण आहे हे विश्वासरावांना कळालं. भानुप्रताप रावांनी लॅपटॉप विश्वासरावांकडं वळवला. एक क्लिकसरशी पडद्यावर काही चौकोन उमटले. ” मेसेज आहे. यशवंत शर्मा. स्वित्झर्लंडमधले आपले राजदूत. एनक्रिप्टेड आहे, पण हे सॉफ्टवेअर टाकलं की…” भानुप्रताप रावांनी दोन की दाबल्या. आता चौकोनांच्या जागी अक्षरं दिसायला लागली. कसली तरी लिस्ट.
“गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरु आहे त्यांचं या प्रोजेक्ट्वर. आता नावांसकट लिहिताहेत ते.”
“कसली नावं आहेत ही, सर?”
“स्वित्झर्लंड, विश्वासराव, स्वित्झर्लंड. जिनिव्हातल्या काही मेजर स्विस बँकांमध्ये ज्यांचा बेहिशेबी पैसा आहे त्या संशयितांची नावं. यादीतलं दुसरं नाव बघा, विश्वासराव. आनंदराव टोळपे – पाटील. सहावं बघा, गुलाबराव शिंदे. तेरावे सोपानाआबा फडतरे… सगळे तुमचे विश्वासातले मंत्री, सगळे तुमचे सहकारी, विश्वासराव…” 

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s