पाय मातीचे! -३

विश्वासराव हादरुन गेले होते. आनंदराव – ठीक आहे, आपण त्यांचं काहीसं रेप्युटेशन ऐकून आहोत, पण गुलाबराव? आणि सोपानआबासुद्धा?…. नगर जिल्ह्यातल्या खेडेगावातलं सोपानआबांचं साधं घर विश्वासरावांना आठवलं. अद्यापि शेतावर काम करणारी त्यांची बायको, ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी त्यांची मुलं… सगळं ढोंग, सगळं नाटक! शेवटी प्रत्येकाचे पाय मातीचेच! मातीचेच पाय!
राजकारणी लोकांना न शोभणारी एक विलक्षण विषण्णता विश्वासरावांच्या मनावर दाटून आली. कसं बदलणार हे सगळं आपण? कशाकशाविरुद्ध आणि कुणाकुणाविरुद्ध लढणार?  कुठपर्यंत आणि कुणाच्या भरवशावर?  त्यांच्या सभांसाठी शंभरशंभर मैल उन्हातानातून आलेले गरीब, केविलवाणे लोक त्यांना आठवले. त्यांचे वाळके चेहरे, चोपलेली शरीरं, फाटके, मळके कपडे….या राज्यातली शेकडो एकर कोरडी, भेगाळलेली जमीन…वाळवीच्या वारुळासारखी बजबजलेली महानगरं..‍.जहर ओकणाऱ्या इंडस्ट्रीज… आणि हे चित्र बदलण्याचं आपण स्वतःलाच दिलेलं वचन…आणि हे आपले अगदी सख्खे सहकारी…पाण्यातलं प्रतिबिंब बघून आपण माणसांची पारख करतो असा लौकिक आहे आपला, आणि आपल्या हातून अशी चूक व्हावी? इतकी?
“रिलॅक्स, विश्वासराव.” भानुप्रताप राव त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. “ही फक्त संशयितांची लिस्ट आहे. बातमी अजून कन्फर्म्ड नाही. स्विस बँकांची गुप्तता तर तुम्हाला माहितीच आहे. खातेदारांची माहिती तर इतर कुणालाच मिळत नाही. या बँकांवर फेडरल बँकिंग कमिशनचं नियंत्रण आहे, तिथंही आपण प्रेशर टाकतो आहोत.  डिप्लोमॅटिक लेव्हलवर आपले प्रयत्न सुरुच आहेत, पण मला नाही वाटत या सगळ्याचा काही उपयोग होईल.आपल्याला एखाद्या प्रॉसिक्यूटरची  किंवा जजची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी या खातेदारांची काहीतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं सिद्ध करावं लागेल … एकंदरीत कठीण मामला आहे.”
“मग, सर…. आपण काय करणार आहोत?”
“आय वाँट यू टू पर्सनली हँडल धिस विश्वासराव. तुम्ही स्वतः लक्ष घाला यात. एकतर ही बातमी खरी आहे का हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. या लोकांनी कुठलीकुठली डील्स हँडल केली आहेत ते बघीतलं पाहिजे. जर ही नावं खरी असतील तर हा उघडउघड काळा पैसा आहे, भ्रष्टाचारातून जमवलेला. ही कीड आपल्याला संपवलीच पाहिजे. त्यासाठी कितीही, कुठलीही किंमत द्यायला लागली तरीही.”
“यस सर.”
“तुम्ही स्वतः जिनिव्हाची एक व्हिजिट प्लॅन करा. झुरिकपेक्षा तिथंच या लोकांचा पैसा जास्त आहे, अशी खबर आहे. तुमची व्हिजिट ऑफिशिअल नको. खाजगी कारणासाठी म्हणून जा. मेडीकल रीझन वुड बी अ गुड कव्हर अप. फॅमिलीतले एकदोन लोक बरोबर न्या. दॅट विल लुक मोर कन्विन्सिंग.  आणि डायरेक्ट स्वित्झर्लंडलाही नका जाऊ. यू.एस. मार्गे जा हवं तर, पण कुणाला संशय यायला नको. तिथल्या चार बँकांची यादी तुम्हाला जाण्यापूर्वी मिळेल. चारही खाजगी आहेत. त्यांच्या चेअरमनना भेटा.  आय ट्रस्ट युवर निगोशिएशन स्किल्स. पण आपल्याला पक्की माहिती पाहिजे. तुम्हाला मदत म्हणून आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करण्यासाठी आपण एक स्पेशल सेल तयार करतो आहोत. ‘नॅशनल ऍंटी करप्शन सेल.’ एकच सदस्य असेल या सेलचा. अगदी माझ्या विश्वासातला खास माणूस – वीरेन तलवार. ही विल रिपोर्ट डायरेक्टली टू यू. आपल्या तीघांशिवाय यात कुणीही इन्व्हॉल्व्ह्ड असणार नाही.”
“मला वाटतं सर, आपण आमच्या गृहमंत्र्यांना तरी याची कल्पना द्यावी. अशोक चलाख माणूस आहे सर. तो नजर ठेवेल इथं…”
भानुप्रताप राव हसले. देशाच्या पंतप्रधानांचं, आणि राजकारणातले पन्नास पावसाळे पाहिलेल्या माणसाचं हास्य. या माणसाला कुठलीही गोष्ट धक्का देऊ शकणार नाही, असं एखाद्याला वाटेल असं हास्य.
“तुम्ही लिस्ट पूर्ण वाचली नाही, विश्वासराव. दुसऱ्या पानावर तुमच्या अशोक गावडेंचंही नाव आहे….”
हे ऐकण्याची विश्वासरावांच्या मनाची तयारी झाल्यासारखीच होती. जवळजवळ अपेक्षितच होतं हे.  व्हेन स्मॉल पीपल बिगिन टू कास्ट लाँग शॅडोज, इट इस टाईम फॉर द सन टू सेट. मातीचे पाय! मातीचे पाय असलेली माणसं!
कसला तरी निर्णय झाल्यासारखे विश्वासराव उठले.  
“ट्रस्ट मी सर. मी हे सगळं खणून काढीन. या बेईमानांना आपण नंगे करू. जनतेचा पैसा गिळणाऱ्या या सापांना आपण ठेचून काढू.”
“मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, विश्वासराव. परवा वीरेन तुम्हाला भेटेल. घरी, ऑफिसमध्ये नाही. दोन आठवड्यांनंतर तुमची व्हिजिट प्लॅन करा.आणि तुम्ही फक्त मला रिपोर्ट कराल. कीप धिस इन माईंड”.
“यस सर.”
“गुड लक, विश्वासराव….”
“थँक यू, सर” विश्वासराव उठले
“आणि विश्वासराव…”
“यस सर?”
“मी जरा जास्तच करतोय असं वाटेल तुम्हाला कदाचित, पण सांभाळून. इथं धोका आहे. हे भ्रष्ट लोक कुठल्या पातळीवर जातील सांगता येत नाही. तेंव्हा काळजीपूर्वक रहा. कुणावरही पूर्ण भरवसा ठेवू नका. अगदी तुमच्या बॉडीगार्डसवर पण. स्वतःजवळ…. स्वतःजवळ..” हे शब्द बोलतांना भानुप्रताप रावांना जड जात होतं हे विश्वासरावांना जाणवलं.
“स्वतःजवळ काय, सर?”
“स्वतःजवळ एखादं वेपन ठेवा. जस्ट इन केस.”
विश्वासरावांनी हातातलं पाऊच उघडलं. आत एक छोटसं चकचकीत रिव्हॉल्वर होतं.
“लोडेड आहे सर. स्मिथ ऍंड वेसन”
“गुड.”
(क्रमश:)

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

2 Responses to पाय मातीचे! -३

  1. Shailesh S. Khandekar कहते हैं:

    मस्तच. कथा उत्कंठावर्धक होत चालली आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत!

  2. yogesh कहते हैं:

    खूपच छान. आपल्याच मातीतलं लेखन वाटतंय.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s