पाय मातीचे! -४

पुढच्या आठवड्यात विश्वासरावांना अचानक थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. सगळ्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. “काही विशेष नाही…” डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितलं “थोडंसं ब्लडप्रेशर वाढलंय, पण काही खास नाही. मुख्य म्हणजे थकवा आणि ताण. विश्रांती हेच खरं औषध. मुख्यमंत्र्यांना सुट्टीची गरज आहे”. मंत्रीमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत विश्वासरावांनी खरं तर डॉक्टरांचं म्हणणं हसण्यावारीच नेलं असतं, पण आनंदराव काही ऐकायला तयार नव्हते. “दादा, हत्ती ओढून आणलाय तुम्ही, आता काही नाही, वहिनीसाहेबांना घ्या बरोबर आणि मस्त महिनाभर अमेरिकेला मुलाकडं जाऊन या बघा!” (केवढा बटबटीतपणा! तेवढ्यातही विश्वासरावांच्या मनात येऊन गेलं!) मग होय नाही करता करता एक पंधरा दिवस तरी राहुलकडं फ्लॉरिडाला जाऊन यायचं विश्वासरावांनी मान्य केलं. दोन दिवसांत सगळी तयारीही झाली. ‘स्वखर्चानं सुट्टीवर जाणारा पहिला मुख्यमंत्री!’ जाधवांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये  झकास कॉपी दिली. विश्वासराव अमेरिकेला निघाले.

या सगळ्या गडबडीत दिल्लीहून आठवड्यात दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गुपचूप त्यांच्या घरी रात्री उशीरा येऊन गेलेल्या एका उंच, गोऱ्या तरुणाकडं कुणाचं लक्षही गेलं नाही.

फ्लॉरिडात पोचल्यावर विश्वासरावांनी राहुलच्या घरी दोन दिवस अगदी मनसोक्त विश्रांती घेतली. वहिनीसाहेबही श्रुतीचे लाड करण्यात रमून गेल्या होत्या. वीकएंडला राहुलने डिस्नी वर्ल्डचा कार्यक्रम आखला होता. अचानकच विश्वासरावांनी आपल्याला काही कामानिमित्त न्यूयॉर्कला जायला लागणार असल्याचं जाहीर केलं. राहुलला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण वहिनीसाहेबांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. त्यांनी काही न बोलता विश्वासरावांची बॅग भरायला घेतली.
न्यूयॉर्कहून स्विसएअरच्या विमानानं विश्वासराव रविवारी संध्याकाळी जिनिव्हात दाखल झाले. एका सामान्य हॉटेलात त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली. त्या दिवशी रात्री विश्वासरावांना अस्वस्थ, वेड्यावाकड्या स्वप्नांनी भरलेली झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर  त्यांनी भानुप्रताप रावांनी दिलेल्या यादीतल्या पहिल्या बँकेला फोन केला. चेअरमननी भेटीसाठी दुपारी बाराची वेळ दिली.
बाराला दहा मिनिटं कमी असताना विश्वासराव बँकेच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरले. “गुड मॉर्निंग. वेलकम टु अवर बँक, मिस्टर चीफ मिनिस्टर…” करड्या रंगाचा सूट घातलेल्या एका उमद्या तरुणानं त्यांचं स्वागत केलं. “चेअरमन तुम्हाला पाचच मिनिटात भेटतील. जरा बसून घ्या, प्लीज. तुमची ब्रीफकेस आणि पाऊच मी घेऊ का हातात?”
“अं.. मला वाटतं ते माझ्याकडंच राहू द्यावं” विश्वासराव म्हणाले. किंचित अनिश्चिततेनं.
“जशी तुमची मर्जी. कॉफी?”
विश्वासरावांची कॉफी संपेपर्यंत चेअरमनच्या केबीनचा दरवाजा उघडला. पांढऱ्या विरळ केसांचे, संपूर्ण पाश्चिमात्य वेशभूषा केलेले सत्तरीतले चेअरमन बाहेर आले. म्हातारा अजून लिंबाच्या खोडासारखा टणक होता. “विश्वासराव जगदाळे, राईट?” त्यांनी हात पुढे केला. अगदी अचूक उच्चार. सकाळच्या फोननंतर आतापर्यंत जेमेतेम काही तास उलटले होते. तेवढ्यात आपल्या नावाचा उच्चारदेखील शोधून काढला या लोकांनी! विश्वासरावांना प्रथमच आपल्या कामाच्या यशाविषयी शंका आली. “आपण, आत बसू या का?” चेअरमन म्हणाले.  
आतल्या खोलीत दोन तरुण होते.
चेअरमननी त्यांची ओळख करुन दिली. “ही माझी मुलं.”
“विश्वासराव जगदाळे”
“चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, इंडिया.” चेअरमन म्हणाले. “आपण बसू या का?”
विश्वासरावांनी घड्याळात बघीतलं. “मी आपला फारसा वेळ घेणार नाही चेअरमनसाहेब.  मला आपल्याकडून काही माहिती हवी आहे.”
चेअरमनच्या कपाळावर एक आठी आली. “माहिती?”
विश्वासरावांनी सरळ मुद्द्याला हात घातला. महाराष्ट्रातला सत्तापालट, नवीन मंत्र्यांवरचा संशय, यशवंतचा रिपोर्ट… सगळंच. चेअरमन शांतपणे ऐकत होते.
“चेअरमनसाहेब, यातली काही खाती आपल्या बँकेत असावीत असा आमचा अंदाज आहे. मामला कदाचित लक्षावधी डॉलर्सचा असेल…”
“मग?” चेअरमन साहेबांचा स्वर अगदी कोरडा होता.
“मला ही माहिती हवी आहे, चेअरमनसाहेब.” विश्वासरावांनी यशवंतने पाठवलेली लिस्ट बाहेर काढली. “आपल्या बँकेत यापैकी कुणाकुणाची खाती आहेत, त्यातल्या रकमा आणि त्यांची लेटेस्ट ट्रान्झक्शन्स.”
“मिस्टर चीफ मिनिस्टर..” (आता ‘विश्वासराव’ नाही, विश्वासरावांच्या ध्यानात आलं),” “तुमच्याकडून असल्या बाळबोध गोष्टींची अपेक्षा नव्हती मला” चेअरमन कठोरपणे म्हणाले. “स्विस बँकांविषयी तुमचा काय समज आहे, मला माहिती नाही, पण गुप्तता हे आमचं पहिलं तत्त्व आहे. आमच्या ग्राहकांविषयी कसलीही माहिती आम्ही तो ग्राहक किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस याशिवाय कुणालाही देत नाही.”
विश्वासरावांची हीच अपेक्षा होती. त्यांनी खिशातून एक पत्र बाहेर काढलं. ” हे जरा बघता का…” ते म्हणाले. “आमच्या पंतप्रधानांचं तुमच्यासाठी खाजगी पत्र आहे…”
“काय उपयोग आहे त्याचा मिस्टर चीफ मिनिस्टर?” चेअरमनसाहेबांचा दहा मिनिटांपूर्वीचा मृदूपणा आता अगदी मावळला होता. “माझ्या लेखी तो फक्त एक छापील कागद आहे” ते म्हणाले. “तुमच्या देशात तयार झालेला एक कागद फक्त. अशा गोष्टी इथं होत नसतात, मिस्टर चीफ मिनिस्टर. आता तुमचं जर दुसरं काही काम नसेल, तर आपण उठू या का?”
“एक मिनिट चेअरमनसाहेब” विश्वासरावांच्या नजरेत आता कणखरपणा आला. “तुम्हाला माहिती असेलच. आमच्या देशात इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची मोठी कामं सुरु आहेत. एका मोठ्या, फारच मोठ्या धरणाचा एन्व्हायरमेंटल इंपॅक्ट सर्व्हे आहे, साडेचार हजार किलोमिटर लांबीचा फ्रीवे बांधायचा आहे, इतरही काही कामं आहेत… त्यातली बरीच कामं स्टीवन्सन असोसिएटसकडं आहेत. तुम्ही त्यांचे बँकर आहात, मिस्टर चेअरमन. तुम्ही जर असं आखडूपणाचं धोरण स्वीकारणार असाल, तर आम्हाला ही कामं स्टीवन्सन असोसिएटला द्यायची की नाही याचा परत विचार करावा लागेल…”
चेअरमन आता कंटाळल्यासारखे झाले होते. “तो तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही. असलं काहीतरी सांगून तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही.” 
“आणि अर्थातच तुम्ही सहकार्य करणार नसाल, तर तुमच्या देशाशी असलेले सगळे राजकीय संबंध तोडायलाही आम्ही मागेपुढे बघणार नाही” विश्वासराव म्हणाले.
“हे जरा जास्तच होत नाही का मिस्टर चीफ मिनिस्टर? पण असो, आता मला तुम्हाला सांगणं भाग आहे, की तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. तुमच्या असल्या कुठल्याही घाणेरड्या मार्गानं तुम्ही आमच्या क्लायंटची माहिती मिळवू शकणार नाही.”
“हम्म…” विश्वासरावांनी पाऊच उचलला. “आता सगळे मार्गच खुंटले म्हणायचं”  चेअरमनसाहेबांनी हात पुढे केला आणि ते जागेवरच थिजले. विश्वासरावांच्या हातात आता रिव्हॉल्व्हर होतं.
“दोन मिनिटांच्या आत मला पाहिजे ती माहिती मला मिळाली पाहिजे, चेअरमन. नाहीतर तुझ्या चिंधड्या उडतील…”
चेअरमन आणि त्यांचे दोन्ही सहकारी अविश्वासानं बघत होते.  चेअरमनच्या चेहऱ्यावर आता घामाचे लहानबिंदू दिसू लागले. टेबलवरचा त्यांचा हात आता सूक्ष्मपणे थरथरु लागला होता. पण त्यांनी तरीही नकारार्थी मान हलवली.
“प्लीज, चेअरमनसाहेब, ही माहिती माझ्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे. माझं राजकीय भवितव्य, माझ्या लोकांचं भविष्य, माझं आयुष्यच अवलंबून आहे यावर…” विश्वासराव अगतिकतेनं म्हणाले.
“माझंही… पण, नाही.” घामानं डबडबलेले चेअरमन म्हणाले.
“ठीक आहे मग… आता भोगा याची फळं” विश्वासरावांनी चाप ओढला. चेअरमननी डोळे मिटले….

‘क्लिक’ रिव्हॉल्वरच्या रिकाम्या चेंबरमध्ये पिस्टनचा आवाज आला.”एक्सलंट!” विश्वासराव म्हणाले.  त्यांनी रिकामं रिव्हॉल्वर टेबलवर ठेवलं. आतापर्यंत कुणाच्या लक्षात न आलेली एक मळकट ब्रीफकेस त्यांनी टेबलवर ठेवून उघडली. आत अमेरिकन डॉलर्स खच्चून भरले होते.

“तुमच्या बँकेत एक जॉइंट अकाउंट उघडायचं आहे मिस्टर चेअरमन. टु बी ऑपरेटेड बाय आयदर ऑर सर्व्हायव्हर. आमच्या दोघांच्या नावे. मी आणि वीरेन तलवार.” विश्वासराव म्हणाले.
(समाप्त – मूळ कथाकल्पना जेफ्री आर्चर – कथा ‘क्लीन स्वीप इग्नॅटिय

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

1 Response to पाय मातीचे! -४

  1. वरूण कहते हैं:

    संजोप राव,

    कथा आवाडली. रुपांतर पण मस्त झाले आहे. “व्हेन स्मॉल पीपल बिगिन टू कास्ट लाँग शॅडोज, इट इस टाईम फॉर द सन टू सेट.” हे विशेष आवडले!

    – वरूण

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s