घरात ‘मी मराठी ‘ वाहिनी दिसायला लागल्यापासून आमच्या रक्तात मराठी भाषेचे चैतन्य पुन्हा एकदा सळसळू लागले होते. ‘अमृताशी पैजा जिंकणारी’ मराठी आज वाघिणीच्या दुधाची मोलकरीण म्हणून धुणीभांडी करत फिरते आहे या जाणिवेने आमच्या रक्तातले सगळे ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत आणि राजेश मुजुमदार अस्वस्थ झाले होते. भरजरी पठणी ल्यालेल्या माझ्या मायबोलीने वर मात्र खणाची चोळी न घालता आंग्लभाषेचे बिनबाह्याचे पोलके घालून फिरावे याचे शल्य आम्हाला डाचू लागले होते. (अशी पश्चातापदग्ध आच रविवारी सकाळी अधिक बोचू लागते असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आमच्या एका वैद्यकशास्त्रपंडित मित्राच्या मते त्यात रक्तातील मद्यार्कअंशाचा मोठा वाटा असतो, पण आम्ही ते मत फारसे गंभीरपणे घेत नाही) त्यातच बाबासाहेब पुरंदऱ्यांची पुस्तके वाचनात आल्याने आमच्या इतिहासाप्रमाणे आमची मराठीही घराघरांत, खोल्याखोल्यांत, फोडणीच्या – ज्याला विदर्भात मिसळणीच्या म्हणतात – डब्यांडब्यांत, एवढेच काय पण आमच्या ज्या भगिनी गरोदर असतील त्यांच्या गर्भांपर्यंत पोचली पाहिजे या जाणिवेने आम्ही बेचैन झालो होतो. गर्भांपर्यंत मराठी पोचवण्याच्या दृष्टीने प्रथम आमच्या सहनिवासातील कोणकोण महिला गर्भवती आहेत याची एक खानेसुमारी करावी म्हणून आम्ही गच्चीत उभे राहून टेहळणी सुरु केली. गच्चीतूनच चहाच्या तिसऱ्या कपाची मागणी केल्यावर सौभाग्यवतीला संशय आला. ‘शोभतं का हे या वयात…’ इथपासून सुरु झालेल्या ध्वनिमुद्रिकेचे ‘मुलं बरोबरीला आली तरी.. जनाची नाही तरी मनाची तरी..’ हे कडवे सुरु झाल्यावर आम्ही आत आलो.
“अगं, तुझ्या भलत्या शंका! अजून माझ्यावर विश्वास म्हणून नाही.. मी फक्त गर्भांपर्यंत मराठी पोचावी म्हणून साधारण अंदाज घेत होतो, म्हणजे त्या दृष्टीने…”
“इश्श..मला हो काय ठाऊक? आणि आता ही कुठली नवीन एजन्सी घेतली?” भार्येचा काहीतरी समजुतीचा घोटाळा झाल्याचे आमच्या ध्यानात आले पण स्त्रीमुखातून वहाणाऱ्या अखंडित वाक्प्रपातात भेद करणे कसे अशक्यप्राय असते हे समदु:खी विवाहीत जाणतातच..
“आणि मला बोलला नाहीत ते! सदा मेलं आपलं आपल्यापाशी. कुण्णाला काही सांगायचं म्हणून नाही, काही नाही. आणि काही विचारलं की डोक्यात राख घालायची! तुमचं हे नेहमीचंच आहे हं! परवा शकूवन्सं आल्या तेंव्हाही अस्संच…”
“अगं, माझं ऐकून तर घे! शकूचा काय संबंध इथे? आणि ही काय भाषा की काय तुझी? एजन्सी म्हणे! अगं मराठी लोक आपण, मराठी बोलावं. मराठी शब्द वापरावेत…”
“मग मी काय इंग्रजीत बोलले? मराठीच तर बोलत होते…”
“एजन्सी हा काय मराठी शब्द आहे? किती बोजड वाटतो बघ ऐकतानाही! गुमास्तेपणा म्हणावं, नाही तर अडत म्हणावं, अगदी गेलाबाजार प्रतिनिधीकार्यालय म्हणावं… ”
‘शनिवार एक दिवस म्हणून मी काही बोलत नाही, पण हल्ली झेपत नाही हो तुम्हाला’ हे एवढं सगळं पत्नी एका कटाक्षात बोलून गेली.
“अंघोळ करुन घ्या.” थंड पाण्याची अंघोळ हे अशा परिस्थितीवरचं उत्तर आहे हा तिचा समज आहे.
“न्हाणीघर रिक्त आहे का पण?”
“क्काय? राहुल, बघ रे बाबा असं काय करतात ते…”
कुलदीपक चलतहास्यचित्रमालिका बघण्यात मग्न होते. पडद्यावरील नजर न हटवताच ते बोलते झाले. “काय बाबा?”
“अरे, सकाळीच तू दूरवस्तूदर्शकयंत्र काय सुरु करुन बसलायस?
“पण बाबा, मी तर टीव्ही बघतोय…”
“तेच ते. काय रे भाषा तुमची. अरे, मराठी लोक आपण. मराठी बोलताना परभाषीय शब्द वापरु नयेत आपण. आणि गृहपाठ झाला का तुझा?”
“म्हणजे?”
“गृहपाठ म्हणजे काय कळत नाही तुला? अरे शाळेत घरी करण्यासाठी म्हणून दिलेला अभ्यास…”
“होमवर्क?”
“हां. तेच”
“बाबा, पकवू नका ना हो प्लीज. ए आई बघ ना गं..आई, बाबांनी गोळ्या घेतल्या होत्या का गं काल?”
“अरे राहुल, मला काही धाड भरलेली नाही. मला काळजी आहे ती तुझ्या भाषेची. गृहपाठ म्हणजे काय कळत नाही तुला. ते जाऊ दे. तुमच्या चमूला त्या ह्याच्यासाठी जो विषय दिला होता त्यावर काही विचार केलास का?”
“कशाचा विषय, बाबा?”
कसा कोण जाणे ‘प्रोजेक्ट’ ला प्रकल्प हा शब्द काही आम्हाला ऐनवेळी आठवला नाही. डोक्याला ताण दिल्यावर आमच्या मनात हस्तव्यवसाय हा शब्द चमकून गेला. पण घोळात घोळ नको म्हणून आम्ही तो शब्द वापरायचे टाळले.
चिरंजीव अद्याप मालिकाग्रस्तच होते. अंघोळ टाळायची असेल तर सत्त्वर काहीतरी कृती करणे आवश्यक होते.
“अगं ए, ऐकलंस का? मी उष्णोदकयंत्र सुरु करतोय. काही पळे जाऊ देत, मग जाईन अंघोळीला. तोवर जरा संगणक उघडतो..”
आतमध्ये फोडणीचा ‘चर्र.. ‘ असा आवाज आला. लसणीचा खमंग वास आला. लबेदे पाकसिद्धीत गुंतले असावे. मी संगणकाची कळ दाबली. माझ्या मराठीची महती आता किमान माहितीजालावर तरी नोंदवावी म्हणून माहितीजालाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु केले. पण वारंवार यत्न करुनही संपर्क प्रस्थापित होईना. ‘दूरचा संगणक प्रतिसाद देत नाही’ असा संदेश येऊ लागला. ‘पुन्हा तबकडी फिरवा’ हे बऱ्याच वेळा करुन झाल्यावर सेवाप्रदात्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे असे लक्षात आले. मी दूरध्वनी उचलला.
“हालू..”
“नमस्कार. मी काशीनाथ पटवर्धन बोलतोय. दिगंबर सहनिवास, माहिम पश्चिम येथून. माझी माहितीजाल सेवा विस्कळीत झाली आहे..”
“सायेब, ह्ये केबलवाल्याचं हापिस हाये…”
” अहो तेच पाहिजे आहे मला. तुमच्याकडूनच मी महापट्टी माहितीजालजोड घेतला आहे. पण तो चालत नाही आहे. बहुदा तुमचा संदेशतंतुपुंज सदोष असावा…”
“सायब, तुम्ही काय म्हनताय कायबी कळना बगा. विंटरनेट म्हनत असाल तर सगलीकडंच डाऊन हाय. केबल फाल्ट हाय. दुरुस्त व्हायला टायम लागन..”
आमचे वैफल्यग्रस्त मन क्लैब्याने दाटून आले. विमनस्क मन:स्थितीत आम्ही गवाक्षातून बाहेर बघत राहिलो. दरम्यान आतली पाकसिद्धी संपन्न झाली असावी. “जळ्ळं मेलं एका रविवारी लवकर आवरुन घ्या म्हटलं तर ते काही ऐकायचं नाही, आता मीच जाते अंघोळीला” हे उद्गार आपल्याला उद्देशून म्हटलेच नाहीत अशी आम्ही स्वतःची समजूत करुन घेतली.
अतिथीआगमनसूचकघंटिकेच्या ध्वनीने आम्ही भानावर आलो. शेजारच्या नेने वहिनी होत्या.
“जान्हवीताई… अगंबाई, कुठं बाहेर गेल्यात का?” त्यांनी विचारलं.
“आं?”
“अहो, थालिपीठ करत्येय, चार कांदे पाहिजे होते…”
सकाळच्या न्हाणीघराच्या उल्लेखाने झालेला घाव अद्याप ताजा होता. आम्ही दुसरा प्रयत्न करावयाचे ठरवले.
“मला वाटते, ती शौचकुपात आहे..” आमच्याकडे ‘ते’ व ‘ते’ ठिकाण एकत्र आहे.
नेने वहिनी गोऱ्यामोऱ्या झाल्या. “मी… येते..” त्या निघाल्याच.
एकंदरीत आजचा दिवस काही आपला नव्हे हे माझ्या लक्षात आले. माझ्या मराठीप्रेमाला घरातूनच सुरुंग लागत असतील तर बाहेर या प्रयोगांचे काय होणार या चिंतेत आम्ही बुडून गेलो.
पिंगबैक: DesiPundit » Archives » संस्कृताळलेल्या मराठीचे प्रयोग
🙂 🙂 wa wa, farach chhan lihilaye.
marathiche prayog vachun tufan hasu ala. 🙂
😀
मला अतिशय आवडलेला हा लेख. विशेषतः बायका एका कटाक्षात आपल्या नवर्याला केवढा उतारा म्हणून दाखवतात आणि ते कळण्याची संवेदनाशीलता असणारे नवरे या जगात आहेत हे वाचून फार मजा वाटली. कथानायकाचा मूड अगदी एकाच पातळीवर ठेवण्यात आपणांस यश आले आहे. संस्कृत शब्द तर निर्विवाद सरस आहेतच – आपण खूप मेहेनत घेतली आहेत.
मात्र एक वाटलं कथानायक हा जमदग्नीचा अवतार आहे बायकोच्या मते तरी तेव्हा ती छटा थोडी जरी फुलवली असती तरी मजा आली असती.