एक हवाहवासा ‘बावर्ची’

शिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आणि विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच म्हणा ना, कन्या मीता. सीतादेवींचे सारखे सांधे धरलेले असतात, त्यामुळे त्यांना फारसे काम होत नाही.मीता नृत्य शिकते आहे. त्या नृत्याची तालीम आणि नटणेमुरडणे यातच ती मश्गुल आहे. त्यातून रामनाथबाबूंना जरा..अं.. घ्यायची सवय आहे. संध्याकाळ झाली की त्यांची बाटली उघडते. काशिनाथसर तत्त्ववादी प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी शोभाताई जरा सुखवस्तू आहेत. त्यांचा मुलगा पिंटू शाळकरी आहे. विश्वनाथरावांचे अजून लग्न झालेले नाही. त्यांची संगीतातली कुवत बेताचीच, पण एकंदरीत थाट कलंदर आहे.
आता इतकी सगळी आत्ममग्न माणसे एका घरात असताना घरातले काम कुणी करायचे हा जटील प्रश्न आहे. शिवनाथजी आपल्या सुनांवर वैतागतात, पण बिचाऱ्यांचे वय झाले आहे, त्यांचे कोण ऐकणार? त्यातून दोन्ही मुले आपापल्या बायकांच्या ताटाखालची मांजरे आहेत. येऊनजाऊन घरातल्या कामाला जुंपली जाते ती कृष्णा. ही पण शिवनाथजींची नातच. बिचारीचे आईवडील नाहीत, मग काय? काहीही पाहिजे असले की ‘कृष्णा, कृष्णा…’ अशा झाल्या हाका सुरु. पण पोरगी सालस, अगदी गुणी आहे हो. सगळ्यांच्या सेवेला सारखी हजर असते. मीता तिच्याच बरोबरीची, पण कृष्णाने मीतासाठी ओव्हलटीन करुन आणले तरी मीताबाईंचे डोळेसुद्धा उघडलेले नाहीत. एवढं सगळं करुन कृष्णा कॉलेजला जाते आहे. तिथल्या एका प्राध्यापकाबरोबर तिचे काही हळुवार बंध गुंफले जाताहेत…

पण एवढ्या मोठ्या खटाल्यात ती तरी एकटी काय पुरी पडणार?  घरातल्या कामाची, विशेषत: स्वयंपाकाची अगदी दैना उडाली आहे. भात आहे, तर भाजी नाही, भाजी आहे तर पोळी नाही…. काही विचारु नका. रामनाथबाबूंना रोज कामावर जायला उशीर होतो आणि साहेबाच्या शिव्या खाव्या लागतात. काशिनाथसर कसेबसे धावतपळत मस्टर गाठतात. विश्वनाथराव कित्येक दिवस उकडलेल्या अंड्यांवर नाश्त्याचं भागवून नेताहेत आणि शिवनाथजींना तर सकाळचे आठ वाजले तरी चहासुद्धा मिळालेला नाही.

मग शेवटी सगळे मिळून ठरवतात की काही नाही, आता एक चांगला स्वयंपाकी ठेवायचा. पण  या इतक्या तऱ्हेवाईक लोकांच्या हाताखाली कुणी टिकला तर पाहिजे! जो येतो, तो महिना पंधरवड्यात गाशा गुंडाळून परत जातो. मग कृष्णा आहेच भांडी घासायला.

अशात एक दिवस रघू येतो. दिसायला देखणा, हसतमुख आणि बोलणं तर  जिभेवर बर्फी ठेवलेली असावी असं. बरं, पगाराची फार अपेक्षा म्हणाल तरे हा पठ्ठ्या चक्क अर्ध्या पगारावर काम करायला तयार झालाय. आणि कुणी सांगितली काय माहीत, पण याला घरातल्या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे. घरात तर एक भाजी करावी म्हटलं तर चार वांगीही नाहीत. पण रघू डगमगत नाही. काही कच्ची केळी आणि सुरण यातूनच तो असे फर्मास कबाब तयार करतो की रामनाथबाबूंना वाटतं की मटणाचेच कबाब आहेत!
पण ही आखुडशिंगी, बहुगुणी गाय या पागलखान्यात टिकणार का, ही खरी शंका आहे. सुना तर हा कुणीतरी जादूटोणा करणारा तांत्रिक आहे, या शंकेने भेदरल्या आहेत, अहो, दोन रुपयात हा पिशवीभर भाजी घेऊन आला मंडईतून! रामनाथबाबूंनी संध्याकाळी बाटली उघडली आणि रघूने त्यांना कोकाकोला आणि लिंबू पिळून फर्मास कॉकटेल बनवून सर्व्ह केले. शिवाय तोंडात टाकायला मसाला डाळही आहे. काशिनाथसर दमून आले आणि एक कपभर चहा मिळेल का हा त्यांचा प्रश्न संपायच्या आत रघू चहा घेऊन हजर. शिवाय बरोबर खायला कचोरीपण.

अगदी स्वप्नातला देवदूत वाटावा असा हा ‘बावर्ची’ शर्मांच्या घरी चक्क टिकून राहिला. नुसताच टिकला नव्हे तर घरातलाच एक होऊन गेला. फक्त स्वतःसाठीच जगणाऱ्या या लोकांना त्यानं दुसऱ्याला आनंद देण्यातला आनंद समजावून सांगितला. त्यांच्यातले ताणलेले, तुटत चाललेले संबंध पुन्हा घट्ट केले आणि शेवटी कृष्णाच्या आयुष्याचे भले व्हावे म्हणून स्वतःवर वाईटपणा घेऊन निघून गेला. दुसऱ्या गावी, दुसऱ्या घरी, दुसऱ्या नात्यांवर फुंकर घालण्यासाठी…

१९७२ साली प्रदर्शित झालेला हृषिकेश मुखर्जींचा ‘बावर्ची’ हा असा साधा, पण अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. ‘इट इज सो सिंपल टु बी हॅपी, बट सो डिफिकल्ट टु बी सिंपल’ हे साधे सूत्र सांगताना कुठेही प्रचारकी थाट न आणणारा. आनंद, नमकहराम आणि (त्या मानाने फारसा गाजावाजा न झालेला) बावर्ची या त्रिसूत्रीतला तितकाच प्रभावी  आणि नि:संशय आणि संपूर्णपणे राजेश खन्नाचा चित्रपट. यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्नाला हृषीदांनी अर्धी खाकी तुमान, गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या वेशभूषेत सादर करण्याचे धाडस केले. (याआधी राजकपूरने ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्येही असेच धाडस यशस्वी करुन दाखवले होते) राजेश खन्नाच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक यात शंका नाही. जया भादुरीची कृष्णाही अशीच बावनकशी. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणजे काय ते ही भूमिका पाहून शिकावे. दुर्गा खोटे आणि उषा किरण यांनी साकारलेल्या सुनाही अगदी आपल्या घरातल्या वाटाव्या अशा. दुर्गाबाईंचा फणकारा तर बघत रहावा असा. आपण निष्पाप आहोत हे कळवळून सांगताना माझ्या हातून काही भलतंसलतं घडलं असेल तर मी मरुन जाईन असं कृष्णा सांगते त्यावर’ सुनो, शाम के वक्त लडकी की बातें सुनो’ हा संवाद दुर्गाबाईंनी असा म्हटलाय की ज्याचं नाव ते! पोरक्या पोरीविषयी माया, काळजी आणि एकंदरीत झाल्या प्रकाराबद्दल गलबलून आलेलं मन हे सगळं एका वाक्यात कसं सांगता येतं हेच जणू त्या दाखवून देतात. ए. के. हंगल यांचे रामनाथजी आणि असरानीचे विश्वनाथराव असेच मझा आणून जातात. काशिनाथसर झालेल्या (आणि कुठेही नामोल्लेख नसलेल्या) गुणी आणि नैसर्गिक पुढे अभिनेत्याचे काय झाले हे काही केल्या कळत नाही. काली बॅनर्जीची मीताही अगदी मोकळी आणि दिलखुलास. तिच्या किंचित बायली नृत्यशिक्षकाच्या भूमिकेतला पेंटलही लक्षात रहातो. त्याचे आणि राजेश खन्नाचे उर्दू आणि हिंदी भाषा या विषयावरचे संवाद असेच अर्थपूर्ण.अर्थात हे इतके भरताड लिहिण्यापेक्षा संवाद गुलजार यांचे आहेत, इतके लिहिले तरी पुरे. 

पण मला विचाराल तर ‘बावर्ची’ चा खरा हीरो आहे तो हरिंद्रनाथ चटोपाध्याय. शिवनाथ शर्माच्या खट भूमिकेत हरिंद्रनाथांनी धमाल केली आहे. त्यांचा कवडीचुंबकपणा, कृष्णाविषयी त्यांच्या पोटात असलेली अपार माया, आळशी सुना आणि त्यांना घाबरुन असणारी नालायक मुले यांच्यांवरचा त्याचा राग हे सगळे हरिंद्रनाथजींनी सुरेख दाखवले आहे.  मुलांना आणि सुनांना धारेवर धरताना हा म्हातारा आपल्या ओळखीच्या एखाद्या खडूस आजोबांची आठवण करुन देतो. ‘भोर आयी गया अंधियारा’ या गाण्यात चटोपाध्यायबाबू अगदी रंगून गायलेपण आहेत. एकंदरीतच निखळ आनंद मिळवून देणारी ही भूमिका.

 

आणि ‘बावर्ची’ चा उल्लेख मदनमोहन यांच्या संगीताविषयी आणि कैफी आजमींच्या गाण्यांविषयी न लिहिता केला तर त्या गुन्ह्याला क्षमा नाही. मन्नाडे यांचा आवाज या चित्रपटात राजेश खन्नाला एकदम ‘सूट’ होतो. ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ हे मन्नादांचे सोलो आणि बिलावल रागावर आधारित ‘भोर आयी..’ ही दोन्ही गाणी नितांतसुंदर. ‘मोहे नैना बहाये नीर’ आणि ‘काहे कान्हा करत बरजोरी’ हीही गाणी सुंदर.

तर असा हा हवाहवासा वाटणारा ‘बावर्ची’ पहावा आणि मन आनंदाने भरुन जावे. या चित्रपटातला शेवटचा ‘पंच’ आणि अमिताभ बच्चनचे निवेदन अशा गोष्टी नसत्या तरी काही बिघडले नसते असे वाटते, यातच सगळे आले.

यह प्रविष्टि Bollywood में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

1 Response to एक हवाहवासा ‘बावर्ची’

  1. Meghana Bhuskute कहते हैं:

    अफलातून. फार सुरेख रसग्रहण करता तुम्ही. लवकर लवकर लिहीत चला. दुर्गाबाईंच्या त्या अफलातून उद्गाराला तुम्ही इतकी मस्त दाद दिलीय की ज्याचं नाव ते. तसंच संगीत. अर्थपूर्ण आणि मिष्कील संवाद. आणि त्या प्राध्यापकाच्या भूमिकेतला हरवून गेलेला गुणी अभिनेता… या सगळ्याची दखल घेतल्यावाचून हे रसग्रहण अपुरं ठरलं असतं…

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s