परतफेड

डॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक तरुण तिच्याकडे उपचारासाठी येतो. त्याच्या पायावरची जखम खोल आहे. ती साफ करताना त्याला वेदना होतील म्हणून डॉक्टर सुधा त्याला भुलेचे इंजेक्शन देऊ लागते. तो तरुण ते घ्यायला नकार देतो. “जखम फार खोल आहे, तुला फार वेदना होतील…” डॉक्टर सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तो तरीही ऐकत नाही. “व्हाय डोंट यू अंडरस्टँड?” ती चिडून विचारते. आपण कुठे, कोणा अडाण्यांच्या वस्तीत आहोत हे क्षणभर विसरुन…
“व्हाय डोंट यू अंडरस्टँड डॉक्टर?” भेदक नजरेचा तो तरुण खोल खर्जातल्या आवाजात विचारतो. “पेन इज माय डेस्टिनी अँड आय कॅनॉट एस्केप इट…”

आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला तो. त्याच्या बदल्याला निव्वळ रोख व्यवहारी स्वरुप आलेलं आहे. पैसा हेच सर्वस्व आहे ना, मग पैसा मिळवूनच दाखवतो अशा जळत्या संतापानं त्यानं जन्मदात्या बापाला संपवण्यासाठी तोच पैसा वापरायला सुरुवात केली आहे. त्याची सेक्रेटरी- आणि कदाचित मैत्रिण- असलेल्या गीताला यातलं काहीच माहीती नाही. “कशाला एवढा पैसा पैसा करतोस?” ती त्राग्यानं विचारते. मी? मी पैसा पैसा करतोय? तो गीताला आपल्या आईच्या फोटोसमोर घेऊन येतो. “माझी आई फार गरीब होती गीता. लेकिन उसके इस गुनाह के लिये उसे किसीने माफ नही किया…” त्याचा खर्जातला धीरगंभीर आवाज भरुन येतो. त्याचा करारी चेहरा क्षणात व्याकुळ, घायाळ होतो. त्याच्या डोळ्यांच्या कडांना पाणी साठून येतं….

आगापीछा नसलेला भणंग फिरस्ता तो. सज्जनांच्या गल्लीत त्याला एका वेगळ्याच मुखवट्याखाली सादर केलं आहे. बघताबघता तो एका मोठ्या खेळातलं प्यादं बनून गेलाय. पण आता त्याला सगळं समजून चुकलंय. हे राजकारणी, हे कारखानदार, त्यांचे लालसी राक्षसी चेहरे आणि यात चिरडले जाणारे अगणित सामान्यजन. मग तो बंडाला उभा राहिलाय. पण त्याच्याबरोबर कुणी आहे की नाही ते उद्या पहाटे कळणार आहे. रात्रभर तो जागाच आहे. त्याला या खेळात आणणारी, पण आता त्याच्या बाजूने असणारी सुभाषिणी त्याच्यासोबत आहे. रात्र संपता संपत नाही. तो अस्वस्थपणे फेऱ्या मारतो आहे. थोडा वेळ पडत का नाहीस? सुभाषिणी विचारते. “मेमसाब..” तो परत तशाच आवाजात म्हणतो. “रात्रीच्या सरत्या प्रहरात, काळोखात. एखाद्या भुकेजलेल्या बालकाचं रडणं ऐकू येतं तेंव्हा…” त्याचा गळा दाटून येतो. “तब रात बहोत लंबी लगती है मेमसाब..”

कारखानदार बापाचा एकुलता एक मुलगा ‘तो’. युनियन लीडरकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं आपल्या मित्राला – सोमूला – कामागारांचा नेता बनवलं. पण सोमूला अचानक त्या कामगारांचा काय पुळका आला कुणास ठाऊक! तो आता खरोखरच त्यांच्यातला एक होऊन गेलाय. ‘त्या’ची  तगमग, तडफड होते. भेटायला आलेल्या सोमूला तो आत बोलावतो, पण ‘त्या’चं मन कडवटून गेलंय . सगळा जहरी विखार  चेहऱ्यावर घेऊन तो एक पायरी खाली उतरतो आणि अत्यंत कुत्सितपणे एकच शब्द म्हणतो “नमकहराम……”

निवृत्ती अगदी जवळ आलेला एक तत्त्वनिष्ठ पोलीस अधिकारी. आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक रहाण्याच्या त्याच्या वृत्तीने त्याला कायम मागे पडावे लागले आहे. आता एक शेवटची महत्त्वाची जबाबदारी त्याच्या शिरावर आहे. एका तथाकथित दहशतवाद्याला न्यायालयापर्यंत सुरक्षित पोचवण्याची. त्यातही असंख्य अडथळे येतात.भ्रष्ट राजकारणी आणि त्यांना संपूर्ण विकल्या गेलेल्या पोलीस यंत्रणेसमोर तो एकटा आहे. त्या दहशतवाद्याला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला आमची ड्यूटी करु द्या… तसाच एक किडलेला अधिकारी त्याला हुकूम सोडतो. ड्यूटी? काय ड्यूटी आहे तुमची? ‘त्या’च्या म्हाताऱ्या डोळ्यांत पुन्हा एकदा अंगार उसळतो. ‘सदरक्षणाय, खलनिर्दलणाय’ हीच ना? ‘वो.. उधर लिखा हे … पीछे’ तो गरजतो.

‘तो’ एक बुद्धीमान शिक्षक अधिर. त्याची एक विद्यार्थिनी आपल्या मादक जाळ्यात ओढू पहाते. तो बधत नाही. ती सगळं त्याच्यावरच उलटवते. तिचा बाप त्याला चाबकानं बेदम मारतो. त्याच्या डोक्यात स्फोट होतो. आता तो मानसिक संतुलन हरवून बसलाय. वेड्यांच्या इस्पितळात. त्याचा भाऊ त्याला भेटायला येतो. ‘सुधीर…’ ‘त्या’च्या डोळ्यात फक्त एक वेडसर चमक आहे. ‘तुझं नाव सुधीर असायला नको होतं. तुझं नाव असायला होतं अधिर. आणि माझं? गर्दभ!… तू बदला का घेत नाहीस सुधीर? एक चाबूक घेऊन जा हं तिच्याकडे… बदला… चाबूक…’ 

तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अट्टल गुन्हेगार. त्याचा बदला घेण्यासाठी आणि त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार झालेली एक तरुणी. तिचा उपभोग घेऊन झाल्यावर तो तिला अगदी निरागसपणे विचारतो, ‘तीन तासांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो, आणि आता तू इथे .अशी… का?’ ‘तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार…’ ती काहीतरी बहाणा करते. ‘त्या’च्या चेहऱ्यावर एक छद्मी, कुजकट हसू उमटतं ‘ रोमँटिक बातें मुझे बहोत बोर करती है सोनिया…’

मूकबधिरांना प्रशिक्षण देणारा तो एक अत्यंत प्रतिभावान, पण विक्षिप्त शिक्षक. त्याच्या एका अंध आणि मूकबधिर विद्यार्थिनीच्या बहिणीचा साखरपुडा आहे. त्या विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला लिहिलेले एक पत्र तो वाचून दाखवतो आहे. ‘माझ्या नशिबात नाही हे सगळं. पण तुझ्या तर आहे…’ त्याचा आवाज दाटून येतो. ‘नवरी नाही होऊ शकणार मी कधीच, पण नवरीची बहीण तर होईन….’ ‘त्या’चे कमालीचे बोलके डोळे पाणावतात. ‘आय प्रॉमिस, दॅट आय विल नॉट क्राय, ऍज यू वॉक विथ मार्क टोर्डस अ न्यू लाईफ..’ तो चष्मा काढून डोळे पुसतो. एक विलक्षण वेदनापूर्ण हास्य त्याच्या चेहऱ्यावर येतं. ‘सो, ऑन धिस हॅपी नोट…. अ टोस्ट… फॉर सारा… अँड मार्क..’ तो ग्लास उंचावतो.

असे आठवणीतले अनेक तुकडे. आमच्या निरर्थक आयुष्यांना अर्थ देणारे. त्याच्या पासष्टीनिमित्त त्याची परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न. अत्यंत दुबळा, अपुरा, पण प्रामाणिक. 

यह प्रविष्टि Bollywood में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

4 Responses to परतफेड

 1. Meghana Bhuskute कहते हैं:

  आपण कलाकाराला फक्त कलाकार राहू देत नाही. विवेकाचं, परोपकाराचं, आदर्शांचं… सगळी सगळी ओझी त्याच्या मानेवर लादतो आणि त्याला ती झेपली नाहीत की मग त्याला निर्दयपणे पायाखाली घेतो… ही नक्की कुणाची शोकांतिका? त्या कलाकारांची की समाज म्हणून आपली?
  या माणसाची कारकीर्द पाहताना असे अनेक प्रश्न उभे राहतात.
  तुम्ही फार सुरेख कुर्निसात केलाय. केवळ त्याच्यातल्या कलावंताला. बाकी कसलीच ओझी न बाळगता. हे फार फार अवघड.. तुम्हाला साधलं… आभार.

 2. Vikas Shukla कहते हैं:

  संजोप रावजी,
  मनोगतावर आपली भेट झाली होती. आज अचानक तुमचा हा ब्लॉग सापडला. छान वाटले वाचून. लिखाण नेहमीप्रमाणेच मस्त !
  मोगॅम्बो

 3. अजित वडनेरकर कहते हैं:

  अच्छा लगा पढ़कर । सुंदर हैं आपके विचार। भाषा संयत और प्रवाहमयी।
  आभार

 4. sahaja कहते हैं:

  अरे वा! आमच्या बच्चन साहेबांना ओळखता आपण. पण सध्या किती जास्तच काम करतात आता ना. जरा दमान घेतल पाहीजे त्यांनी

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s