भाषा कोणतीही असो, तिच्यातील प्रकटन प्रभावी व्हायचे असेल तर आपला शब्दसंग्रह मोठा असला पाहिजे. असे म्हणतात, की वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुमचा शब्दसंग्रह नव्वद टक्के संपृक्त / समृद्ध झालेला असतो. म्हणजे मग ‘कॅच देम यंग’ या न्यायाने शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने अगदी लहान वयापासून प्रशिक्षण देणे / घेणे आवश्यक आहे. नियमित वाचनाची सवय / आवड हे अर्थातच शब्दसंग्रह वाढवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. घरातील लहान मुले ही घरातल्या प्रौढांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे घरात वाचनसंस्कृती असेल तर मुलांना आपोआप वाचनाची गोडी लागते. आपले आई-वडील रोज काहीतरी नवे वाचतात हे निरीक्षण मुलांना वाचनाची प्रेरणा देण्यास पुरेसे ठरते. मग वाचन हा त्या संपूर्ण कुटुंबाचा एक दैनंदिन व्यवहारातील घटक बनून जातो.
अगदी अपवादात्मक व्यक्ती सोडल्या तर जे लोक हा लेख वाचू शकतील त्यांना आपल्या मिळकतीमधील एक छोटा हिस्सा पुस्तके विकत घेण्यावर खर्च करणे कठीण असणार नाही. पुस्तकांच्या वाढत्या किमती वगैरेबाबत तक्रार करत न बसता जेवढी जमतील तेवढी पुस्तके विकत घेण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. एकदा का खिशाला भोक पाडून पुस्तक विकत घेतले की मग ते आपोआपच काळजीपूर्वक वाचले / सांभाळले जाते. वैयक्तिक जीवनात अतिशय साधेपणाने राहिलेल्या पु. ल. आणि सुनीताबाईंनी ‘आम्ही अजिबात हात आखडता न घेता खरेदी करतो ती फक्त पुस्तकांची’ असे या जोडप्याविषयी आधीच असलेला डोंगराइतका आदर वाढवणारे वाक्य लिहिले आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या साडेचार -पाच हजार (इंग्रजी) पुस्तकांची लायब्ररी होती, आणि नाईलाजांने धारवाड सोडून त्यांना पुण्यात यावे लागले त्या वेळी त्यांना ती पुस्तके (विनामूल्य!)स्वीकारणारे लोक मिळेनात, अशी एक दुर्दैवी कहाणी आहे. तर ते असो, पण पुस्तके वाचणे, शक्यतोवर विकत घेऊन वाचणे, हे सुजाण मराठी माणसाने आपल्या भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावे असे कर्तव्यच आहे, असे मला वाटते.
ज्या घरांत वाचनसंस्कृती नाही, आणि ज्यांना नवीन वाचायला सुरुवात करायची आहे, असे उत्साही लोक ‘आम्ही आता काय वाचू?’ असा काहीसा भाबडा प्रश्न घेऊन येतात. खरे सांगायचे तर अशा लोकांना ‘तुम्ही ज्यात भेळ बांधून आणता त्या कागदापासून सुरुवात करा’ असे सांगण्याचा मोह मला होतो. हे अगदी शब्दशः नसले तरी खरेच आहे. मराठी वाचनात इसाप -पंचतंत्रातून एकदा का माणूस सुटला, की मग तो आपापल्या वाचनवाटेने जायला मोकळा होतो. मग कुणी व. पु., पु. ल., दळवी या धोपटमार्गाने जातो, कुणी बाबुराव अर्नाळकर, एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक (आणि क्वचित नजर चुकवून चंद्रकांत काकोडकरही), असा गुप्तहेरी पवित्रा घेतो, कुणी योगिनी जोगळेकर, गिरिजा कीर, सुमती क्षेत्रमाडे असा ‘वामकुक्षीवाचक’ होतो , कुणी सुहास शिरवळकर, बाबा कदम असा तद्दन जनता क्लास धरतो तर कुणी खानोलकर, माडखोलकर, माडगूळकर अशी अनवट वाट पकडतो. यात बरोबर-चूक असे काही नसते. काहीही वाचा, पण त्यातून तुम्ही थोडेसे तरी वाढत गेला पाहिजे, अशी चांगल्या वाचनाची एक ढोबळ व्याख्या करता येईल.
जी कथा मराठी वाचनाची, तीच इंग्रजीचीही. ‘रीडर्स डायजेस्ट आणि होम्सकथा या तर चिरतरुण आहेतच, पण अमेरिकन बेस्टसेलर्सही त्यांना टीकाकारांनी कितीही दर्जाहीन म्हटले तरी अत्यंत चुरचुरीत आणि कमालीची मनोरंजक आहेत. जेफ्री आर्चरही तसाच. तिथून पुढे कुणी दोस्तोव्हस्कीच्या मार्गे जाईल, तर कुणी वुडहाऊसच्या. त्यातही गंमत बघा, ‘वुडहाऊसची पुस्तके म्हातारी व्हायलाच तयार नाहीत’ असे पु. ल. म्हणतात, तर ‘वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की मला किमान सहा महिने त्याचे दुसरे पुस्तक हातातही धरवत नाही’ असे जी. ए. म्हणून यात ‘व्यासंग वाढवणे’ वगैरे गटणेध्येय डोळ्यासमोर न ठेवता गवतात तोंड घालून चरत जाणार्या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत जावे. प्रत्येकाला शेवटी आपापली वाट सापडतेच.
‘इंग्रजी वाचताना शब्द समजत नाहीत, त्यामुळे वाचलेले कळत नाही’ अशी एक सामान्य तक्रार असते. शेजारी शब्दकोष घेऊन अडलेले शब्द त्यात बघून, अर्थ टिपून वगैरे ठेवणारे नवशिके वाचक बघितले की मंत्रांचे अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे लग्नाचे विधी करणार्या ज्ञानप्रबोधिनी पद्धतीची आठवण येते. दोन्हीही तितकेच विनोदी प्रकार. जगात जशी दारुबंदी कुठेही, कधीही शंभर टक्के यशस्वी झालेली नाही, तशी ही शब्दसंग्रह वावण्याची पद्धतही. मला पटलेली पद्धत म्हणजे समजो वा न समजो, मुसंडी मारुन वाचत रहाणे. कधी ना कधी प्रकाश हा पडतोच.
एकदा शब्दांची बर्यापैकी ओळख झाली, की मग त्यांतली गंमत कळायला लागते. विविध भाषांमधले शब्द, त्यांतले साधर्म्य, विविध भाषांमधल्या लेखक – कवींनी एकमेकांपासून स्फूर्ती घेऊन एकाच किंवा एकसारख्या विचारांची वेगवेगळ्या भाषांमध्ये केलेली मांडणी अशा गमतीजमती दिसायला लागतात. आता हेच बघा: ‘क्रोकोडॉइल टिअर्स’ हा इंग्रजी, ‘मगरमछके आंसू’ हा हिंदी, ‘नक्राश्रू’ हा संस्कृत आणि ‘मोसळेकण्णिरु’ हा कानडी हे सगळे वाक्प्रचार / शब्द एकाच अर्थाचे आहेत. ‘कॅट ऍंड माऊस प्ले’, ‘मांजराचा होतो खेळ आणि उंदराचा जातो जीव’ आणि ‘बेक्केग आटा इलिग प्राणसंकटा’ हेही तसेच एक उदाहरण. एवढेच काय, पण अर्थाअर्थी संबंध नसलेल्या अरेबिक आणि गुजराथी भाषेतले नमस्कार-चमत्कार (‘सलाम-वालेखुम – वालेखुम सलाम’ आणि ‘केम छे -शांति छे’) साधारण एकाच अर्थाचे आहेत. एका कवीने दुसर्या भाषेतील कवीपासून एखादी कल्पना उसनी – चोरुन नव्हे- घेऊन त्यावर स्वतंत्र बांधकाम केल्याची उदाहरणेही वाचतांना गंमत वाटते. “टू अ स्कायलार्क’ या कवितेतले उदाहरण मी यापूर्वी दिले होते. शेलीच्या या कल्पनेचा शांताबाईनी मराठीत आणि शैलेंद्रने हिंदीत काय सुरेख विस्तार केला आहे! ( ‘शेली -शांताबाई – शैलेंद्र’ हा अनुप्रासही गमतीदार!) रॉबर्ट फ्रॉस्टच्या ‘दी रोड नॉट टेकन’ मधली ‘टू रोडस डायव्हर्जड इन अ वुड ऍंड आय, आय टुक दी वन लेस ट्रॅव्हल्ड बाय, ऍंड दॅट हॅज मेड ऑल दी डिफरन्स’ ही कल्पना आणि हरिवंशराय बच्चन यांची ‘ जीवन की आपाधापी में , कब वक्त मिला, कुछ देर, कहीं पर बैठ, कभी यह सोच सकूं, जो किया, कहा, माना, उसमें क्या बुरा भला’ यातले साधर्म्य असेच गमतीदार, आणि दोघांविषयीचा आदर वाढवणारे. ‘दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन’ यातला गालिबचा अस्सल जोरदार मुखडा आणि त्यावर गुलजार यांनी विणलेले तितकेच काव्यमय अंतरे अशी गंमत कळायला लागते. शब्दसंग्रह वाढवायचा म्हणून वाचन अशी ती सर्कस न रहाता, वाचायला आवडते म्हणून वाचन, त्यातून शब्दसंग्रह वाढतो, हा त्यावर मिळालेला बोनस असे सगळे आनंदीआनंद होऊन जाते!
kya bat hai…
Satat vachanamule shabdasamarthyache shabdabhandarat kayam theva sangrahi hoto.khup chan.
सूशीना तद्दन जनता क्लासात बसवाल्याबद्दल
….. निषेध.
पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना, सतिश. तरीही मुद्दाम दखल घेतल्याबद्दल आभार.
सु-रे-ख लेख!!!
>>गवतात तोंड घालून चरत जाणार्या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत जाव>>> हा हा सह्ही!!
अ-प्र-ति-म लेख!!!