आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष निर्मितीक्षम कलाकारांना नेहमीच खुणावत आला आहे. ‘आचार्य‘ आणि ‘काकाजी‘ हे तर सर्वप्रसिद्धच उदाहरण. शांतारामबापूंचा ‘पिंजरा‘ याच कल्पनेवर आधारित आहे. वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? मग अशा विरक्तीचे जेंव्हा क्षणिक मोहात अडकून पतन होते, तेंव्हा त्याच्या ठिकर्या ठिकर्या उडतात. माणूस जितक्या अधिक उंचीवर पोचला असेल, तितका तो कोसळला, की अधिक जखमी होतो, तसेच.
असा प्रश्न टाकून संपणारा‘पिंजरा‘. मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक आणि शांतारामबापूंचा नि:संशय सर्वोत्कृष्ट. खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर – भक्तीच म्हणाना– ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.
कलेचे क्षेत्र कोणतेही असो, कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. ‘पिंजरा‘ ही गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांना मिळालेली अशीच एक संधी. खेबुडकरांच्या सगळ्याच गीतांचे शब्द विलक्षण आशयपूर्ण आहेत, आणि रामभाऊंच्या चाली तर अस्सल मराठमोळ्या ठसक्याच्या आहेत. ‘सोंगाढोंगाचा कारभार इथला साळसूद घालतोय आळिमिळी, सार वरपती रस्सा भुरकती घरात पोळी आन भाईर नळी‘ हे अगदी गदिमांची आठवण करुन देणारं आहे. ‘डाळिंबाचं दानं तुझ्या, पिळलं गं व्हट्टावरी, गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी‘ यातला शृंगारही तसाच. ‘दे रे कान्हा चोळी लुगडी‘ मधली ‘आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी‘ ही कल्पना ‘पिंजरा‘ प्रदर्शित झाला तेंव्हा फार नावाजली गेली होती. आणि ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल‘ हा तर ‘पिंजरा‘ चा उत्कर्षबिंदूच. ‘लाडेलाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई, पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्यापायी‘ काय किंवा ‘अशीच रहावी रात साजणा, कधी नं व्हावी सकाळ‘ काय,प्रतिभेचा जिवंत स्पर्श लाभलेले हे शब्द आणि त्या शब्दांचा आब राखून ताटाभेवती रांगोळी काढावी तशी गुंफलेली साधी पण मोहक सुरावट.
‘तुणतुण्याची निंदा करी, तिला वीणा म्हणू नये
नाही ऐकली लावणी, त्याला कान म्हणू नये’
हे ‘बिना कपाशीनं उले, त्याला बोंड म्हनू नये, हरीनामाविन बोले त्याला तोंड म्हनू नये’ या धर्तीवरचं भाष्य फारच ‘ग्वाड’ वाटतं!
एक दिग्दर्शक म्हणून तंत्राच्या मोहात पडून काही काही वेळा आशय गमावून बसणे ही शांतारामबापूंची मर्यादाच मानावी लागेल. चंद्रकलेचा गोरा उघडा पाय आणि मास्तरांचे विस्फारलेले डोळे यावर आलटून पालटून फिरणारा कॅमेरा, पिंजर्यातल्या पोपटाचे प्रतिक ही अशी काही उदाहरणे.पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी “ब्रम्हचर्य हेच जीवन” ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. पण याच चंद्रकलेसाठी उकळत ठेवलेले आमसुलाचे सार घाईघाईने खाली उतरवत असताना हातातला शिकवणीचा खडू त्या सारात पडणे हा प्रसंग बाकी दाद देण्यासारखा.
श्रीराम लागूंच्या पिंजरामधील अभिनयाविषयी बरेच बोलले जाते. माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. (‘सामना’ मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी ‘लावलेला‘ आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) ‘पिंजरा’ मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे. तिकीटविक्रीच्या खुर्चीवर बसलेले असताना स्वतःच खुर्चीखाली ठेवलेली दारुची बाटली काढून तोंडाला लावणे आणि चंद्रकलेविषयी अचकट विचकट बोलणाऱ्या प्रेक्षकाला “दारु पिऊन आलाय काय?” असे विचारणे हा मला स्वतःला आवडलेला प्रसंग.
‘पिंजरा‘ तल्या पात्ररचनेत सर्वाधिक चुकीची निवड संध्याबाईंची. चंद्रकलेच्या व्यक्तीमत्वात जी कामुकता, जो उत्तानपणा, जी वासनेची ज्योत अपेक्षित आहे (थोडीशी ‘तीसरी कसम‘ मधल्या हीराबाईसारखी) ती संध्याबाईंमध्ये आहे असे समजण्यासाठी प्रेक्षकांना बरीच कसरत करावी लागते. ‘मदनाची लालडी‘ अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा – गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे. जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे. असो.आदर्शाच्या या पुतळ्याला मोहात टाकणारी स्त्री कशी नखरेल, मादक हवी. शांतारामबापू इथं थोडे घसरले आहेत. त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.
‘पिंजरा‘ त खरे भाव खाऊन जातात ते निळू फुले. कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायचा प्रसंग असो किंवा मास्तरांना ‘आता नुसता हसतो मास्तर….’ म्हणणे असो, निळूभाऊंनी आपले पान झकास जमवले आहे. ओठाची कुंची करुन, भुवई उंचावत नाटकीपणे बोलण्याच्या बर्याच भूमिका करणारे निळूभाऊ इथे एक अस्सल खानदानी पात्र उभे करुन जातात.
तर असा हा ‘पिंजरा’. आज पाहिला तर कदाचित थोडा कालविसंगत, क्वचित विनोदीही वाटेल असा. पण मनात आणि शरीरात काही अनाकलनीय पाकळ्या उमलू लागण्याच्या वयात पाहिलेला आणि आज हे सगळे लिहिताना त्या शिरशिरी दिवसांची आठवण करुन देऊन थोडीशी हुरहूर लावणारा.
बर्याच दिवसांनी… बरं वाटलं.
I want to see this movie where i get this fild CD
You may easily get the cd of the movie in any cd shop. Thanks.