धुक्यातून उलगडणारे जी ए -२

लेखनाची सुरुवात – सोनपावले

जी.एं. च्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कथा, अनुवाद आणि इतर साहित्यप्रकारांचे एक बाड जी.एं च्या भगिनी प्रभावती सोलापूरकर यांना मिळाले. त्यातल्या काही साहित्याचे परचुरे प्रकाशन मंदिराने ‘सोनपावले’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.  हे तसे जुनेच पुस्तक ( ११ डिसेंबर १९९१). सु.रा. चुनेकर यांनी संपादन केलेल्या या पुस्तकात जी.एं. च्या लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातल्या प्रयोगांचे चित्र दिसते. अगदी सुरुवातीला शालेय जीवनातले जी.एं. चे लेखन ‘ओळखा पाहू’, कोडी या स्वरुपाचे आहे. त्यानंतरच्या जी.एं. च्या स्वतंत्र कथालेखनाच्या पहिल्यापहिल्या प्रयत्नांवर   त्या काळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांची, विशेषतः खांडेकरांची मोठी छाप आहे. जी.ए. आणि खांडेकर हे गणित आज ऐकायलाही विचित्र वाटत असले तरी खांडेकरांमुळे जी.ए. त्यांच्या तरुणपणी प्रभावित झाले होते हे निश्चित. ‘बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे’, ‘पंतांना वाटले, या दुसऱ्या बाळपणात सुगंध, पाकळ्या, रंग वगैरे सर्व जातात, फक्त काटे मात्र वाटणीला उरतात!, अश्रू जरी डोळ्यांवाटे बाहेर पडत असले तरी त्यांचे उगमस्थान हृदयच आहे’ असली आज हास्यास्पद वाटणारी वाक्ये जी.एं. या त्या वेळच्या कथांमध्ये सर्रास दिसून येतात, हे आज काहीसे गमतीशीर वाटते. नंतरच्या काळात बाकी जी.एं. ना खांडेकरांच्या आदर्शवादी विचारांतला पोकळपणा कळालेला दिसतो. (स्वतः खांडेकरांना तो कळाला की नाही कुणास ठाऊक!) पण एकाच विचाराची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केलेला लेखक म्हणून जी.एं. ना खांडेकरांविषयी आदर वाटत आला होता. जी.एं. ची खांडेकरांशी प्रत्यक्ष भेट कधी झाली होती असे दिसत नाही, पण खांडेकरांबरोबर त्यांचा पत्रव्यवहार होता. खांडेकर दत्तक जाण्यापूर्वी त्यांचे नाव गणेश आत्माराम खांडेकर की असे काहीसे होते आणि म्हणून त्यांच्या व जी.एं. च्या नावाची आद्याक्षरे एकच -GAK- हे कळाल्यावर आपल्याला एक शाळकरी आनंद झाला होता, असे पुढे कधीतरी जी.एं. नी एका पत्रात लिहिले आहे.

१९४० – ४२ च्या सुमारास सुरू झालेले जी.ए. चे लेखन त्यांच्या त्या वेळच्या वयानुरुप शालेय व अगदी बाळबोध आहे. मात्र वयाच्या पंचविशीपर्यंत (१९४८) जी.एं. चे वाचन – विशेषतः इंग्रजी साहित्याचे वाचन- प्रगल्भ होऊ लागले होते, हे त्यांनी केलेल्या मॉमच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेच्या भाषांतरातून जाणवते. याच काळात जी.एं. नी अनेक इंग्रजी कथांचे उत्तमोत्तम अनुवाद केले आहेत. यातल्या बऱ्याच कथा ओ. हेन्रीच्या किंवा चेकॉव्हच्या कथांप्रमाणे पिरगाळून टाकणाऱ्या शेवटाच्या – ‘ट्विस्ट इन द टेल’ या स्वरुपाच्या आहेत. घोडागाडीवाला आणि त्याचा मरण पावलेला मुलगा – म्हणजे एकंदरीत माणसाचे एकटेपण या चेकॉव्हच्या कथेच्या जवळपास जाणारी ‘भागीदार’ नावाची एक कथा जी.एं. नी या काळात लिहिली आहे. गंमत म्हणजे -गंमत कसली म्हणा,- याच काळात जी.एं नी त्या प्रसिद्ध कथेचा ‘भुर्र’ या नावाने एक उत्तम अनुवादही केला आहे. त्याचाच काळजाला हात घालणारा शेवट इथे देण्याचा मोह आवरत नाहीः
“ए बेट्या, झोपलास की काय?” आयोना घोड्याला म्हणतो, “बराय, बराय, झोप. आज पोटापुरतंदेखील मिळवलं नाही. आपण दोघेही गवत खाऊन राहू. गाडी हाकायचं कामच होत नाही रे आता माझ्या हातून! माझा मुलगा कसा, एक नंबर घोडा हाकीत असे. आज असायला हवा होता रे तो-”
घोड्याच्या काचेसारख्या दिसणाऱ्या डोळ्यांकडे पाहात तो क्षणभर थांबतो.
“हं, काय समजलं? माझा पोरगा मेला. या जगात जगायला आम्हाला टाकलं आणि आपण उडाला भुर्र. आता समज, तुलाच एक शिंगरू असतं, आणि जर ते तुला एक दिवस असंच सोडून गेलं असतं, तर तुलाही फार वाईट वाटलं असतं, नाही?”
घोड्याचे तोंड हलविणे चालूच राहतो. तो मध्येच वाकडी मान करतो व आयोनाचा हात हुंगतो.
इतका वेळ त्या मुठीएवढ्या जागी दडपून ठेवलेल्या भावना एकदम उचंबळतात. सारे बांध त्यांच्यापुढे पार वाहून जातात व त्या अमर्याद पसरतात.
घोड्याच्या तोंडावरुन हात फिरवीत हलक्या आवाजात आयोना त्याला अगदी पहिल्यापासून सारी हकीकत सांगू लागतो.
 

या काळात जी.एं. नी लिहिलेल्या बऱ्याच कथा त्यांच्या इतर कथांप्रमाणेच शोकपर्यावसायी आहेत. या वेळेपर्यंत जी.एं. च्या खाजगी आयुष्यात ‘पुरेसे’ दुःख पसरलेले होतेच. यातील काही कथा तर गूढ- रहस्य या सदरात मोडतील अशा आहेत. मानवी नात्यांचा अनाकलनीय ताण, पीळ आणि परिस्थिती, नियती, नशीब, काहीही म्हणा – त्याच्या हातातले बाहुले होऊन आयुष्य कंठण्याची वेळ आलेली माणसे ही जी.एं ची लाडकी पात्रे या कथांमधून पुन्हा पुन्हा डोकावतात. पण एकंदरीतच ही शैली काहीशी विस्कटलेली, गोंधळलेली वाटते. अनुवाद म्हणून या कथा उत्तम आहेत, पण यांबाबत जी.ए. स्वतः समाधानी असतील असे वाटत नाही. किंबहुना इंग्रजी वाङ्मयातील उत्तम कथा आणि स्वतःच्या कल्पना यातले जी.एं. चे चाचपडणे या काळात चालले असावे. यातल्या कथांच्या शेवटी ‘आधारित’ किंवा ‘इंग्रजीवरुन’ असे लिहिलेले आहे, पण त्या कथा मूळ कोणत्या आणि कोणाच्या  कथांवर आधारित आहेत हे कळाले असते, तर बरे झाले असते. लेखक म्हणून स्वतःचाच सुरू झालेला हा शोध जी.एं. च्या अखेरपर्यंत सुरुच होता. आपल्या लिखाणाबाबतचे हे असमाधान जी.एं. च्या आयुष्यात उत्तरोत्तर वाढतच गेले. पण त्याविषयी पुढे कधी तरी.

 

१९५५ मध्ये ‘मौज’ च्या अंकात त्यांनी ‘अनाकलनीयाचे आकर्षण’ हे ‘आणखी एक वासुकी’ या टोपणनावाने लिहिलेले पत्र जी.एं. च्या विकसित होणाऱ्या शैलीवर प्रकाश टाकते. जी.एं. च्या सार्वजनिक लिखाणात फारशी दिसत नसली तरी खाजगी लेखनात त्यांनी काही काही वेळा इतर लेखक, टीकाकार वगैरेंवर अगदी जहाल, विषारी शब्दांत टीका केली आहे. अगदी – आणि विशेषतः, संतवाङ्मयही यातून सुटलेले नाही. जी.एं. ची शब्दकळा इतकी प्रभावी की एखाद्याची साल काढायची म्हटली की त्याला अगदी रक्तबंबाळ केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. त्याचीच बीजे या पत्रात आढळतात. मर्ढेकरांच्या कवितांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या या पत्रात त्यांनी काव्य हे कायम अर्थपूर्णच असले पाहिजे असे म्हणणाऱ्यांवर तिरकस शेरे मारले आहेत. ते म्हणतात, ‘अर्थासाठी तळमळणाऱ्या लोकांसाठी मामलेदाराच्या स्वागतासाठी शाळामास्तरांनी लिहिलेल्या स्वागतगीतांची एक सस्ती आणि घरेलू आवृत्ती कोणी अर्थवाला प्रकाशक प्रसिद्ध करील काय?’

बालकवी आणि गडकरी यांचे काव्य यांचा जी.एं. वर काहीसा अनाकलनीय प्रभाव होता. त्या मानाने त्यांच्या मनोवृत्तीच्या जवळ जाणारे मर्ढेकर बाकी त्यांना फारसे जवळचे वाटले नाहीत. (वर उल्लेख केलेले पत्र सोडले तर जी.एं. नी मर्ढेकरांच्या समर्थनार्थ फारसे काही लिहिलेले नाही. पु. शि. रेगे हा तर आपल्या आयुष्यातला एक ‘ब्लाइंड स्पॉट’ राहिलेला आहे, असे ते लिहितात) पुढील आयुष्यात त्यांनी ग्रेसच्या कवितांचा गौरवाने उल्लेख केला आहे. आणखीही काही कवी जी.एं. ना आवडत. इतर म्युनसिपालटी कवी  त्यांनी घाऊकपणे झिडकारून टाकले आहेत. याच पत्रात जी.एं. नी ‘अन्वयार्थच सांगायचा तर त्यासाठी एखादा कवीच कशाला खर्ची घालायला पाहिजे? गिरीश आणि काव्यविहारी देखील ते काम करू शकतील’ असा एक झणझणीत फटका मारला आहे. काव्य म्हटल्यावर त्यात ‘ग्रेट युनिव्हर्सल थीम्स’ आल्या पाहिजेत असे म्हणणाऱ्या लोकांसाठी ते लिहितात, आणि ते ग्रेट युनिव्हर्सल थीम्स म्हणजे तरी काय? या शब्दांचा शब्दशः अर्थ घेतला तर जन्म आणि मृत्यू हे दोनच विषय युनिव्हर्सल ठरतात. या निकषाने मग बेळगावच्या म्युनसिपालटीतील जननमरणाचे दप्तर जगातील महाप्रचंड महाकाव्य ठरायचे! या ठिकाणी परसात वाती वळत बसलेल्या आजीबाईपासून उजदारी गटारात खेळणाऱ्या बाब्या आणि बेबीपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन जे वाचावे ते साहित्य अशी कोणी तरी केलेली सोज्वळ, बोटचेपी व भोंगळ व्याख्या मला आठवते. काव्य किंवा कला म्हणजे साऱ्यांच्या जीवनात हजर असलेल्या भावनांचा लघुतम साधारण विभाज्य नव्हे.’

जी.एं.चे हे विचार पुढे आयुष्यभर त्यांनी बाळगलेल्या लेखक आणि लेखनाविषयीच्या सगळ्या श्रद्धांवर प्रकाश टाकून जातात, असे मला वाटते. पण अशा प्रकारचे जाहीर वाद- प्रतिवाद यात जी.ए. अजिबातच  अडकलेले दिसत नाहीत. (पु. लं किंवा दळवी यांची या संदर्भात आठवण येते) याच काळात जी.एं. नी समाजातल्या ढोंगीपणावर आणि दुटप्पीपणावर वक्रोक्तिपूर्ण आणि विनोदी असेही काही लिहिले आहे. ‘मारून मुटकून पुरोगामी’ ही जी.एं. ची नाटिका अशीच. तिच्याविषयी आणि इतर काही वेगळ्या लेखनाविषयी पुढील लेखात…

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

4 Responses to धुक्यातून उलगडणारे जी ए -२

 1. Pawan कहते हैं:

  जी. एं बद्दल छान लिहिले आहे. मी काही वर्षांपूर्वी त्यांचा “पिंगळावेळ” हा संग्रह वाचला होता. एकापेक्षा एक थरारक शोकांतिकांनी मन हादरून गेले होते. त्यांच्या गोष्टींचा शेवट असा निराश का व्हावा याचे मला नेहेमी कोडे पडायचे. परंतु त्यांच्या लिखाणाला इतरही वेगवेगळी अंगे होती हे तुमच्या लेखातून कळले – आणि बरे वाटले.

 2. meghana bhuskute कहते हैं:

  जी. एं.च्या लेखनाबद्दल अजून लिहा ना. वाट पाहते आहे.

 3. abd कहते हैं:

  This is one of the best blogs, I have ever read. Not only that you have documented some extraordinary but not-so-popular things (like Devarai, G. A., etc.), but you have also documented the feelings. (‘Ka kallol kallol’ is one of my favourites. I have read it many times till now.)
  On 5 October 09, In Pune Vruttant, Loksatta’s supplement, an article has got published titled ‘Blogs and Literary Expression’. Your blog is mentioned in the list of Marathi blogs published with the article. With best wishes, sending you the link of that article:
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=13566:2009-10-05-18-08-30&catid=213:2009-08-18-16-57-08&Itemid=211

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s