उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही
अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
गंजकुर्हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी
शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने
भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे
अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या
जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
जीवन म्हणजे ऐसे तैसे, असे जगावे, तसे जगावे
पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले