फार दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात ह. मो. मराठे यांच्या बहुचर्चित लेखाचे ‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’ या नावाचे पुस्तिकारुप आणि त्याला जणू उत्तर म्हणूनच संजय सोनवणींनी लिहिलेली ‘ब्राह्मण का झोडपले जातात?’ ही पुस्तिका पाठीला पाठ लावून ठेवलेली दिसली. ही दोन्ही पुस्तके विकत घेऊन वाचली. वाचताना खूप मनोरंजन झाले, काही वेळा हसूही आले. पण दोन्ही पुस्तके वाचून संपवल्यावर बाकी मन विषण्ण झाले. ‘जात नाही ती जात’ हे आधीपासून माहिती होते, पण आता ‘जाता जाणार नाही ती जात’ असे वाटावे इतका विखार या दोन्ही पुस्तकांत भरलेला आहे. या दोन्ही पुस्तकांत उल्लेखलेले विविध वर्तमानपत्रांतील आणि पुस्तकांतील संदर्भ आणि विविध लोकांची वक्तव्ये यांमुळे ही पुस्तके अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक वाटावी अशी झाली आहेत खरी, पण एका जातीचा दुसर्या जाती इतका तिरस्कार करु शकतात हे कळाल्यावर एकसंध समाज वगैरे निव्वळ कागदी गफ्फा वाटू लागल्या. या दोन्ही पुस्तकांमधले सगळे मुद्दे या लेखात मांडणे शक्य नाही – तशी गरजही नाही.पण या पुस्तकांमधील काही मुद्द्यांनी बाकी डोके चकरावून गेले. विस्तारभयास्तव या पुस्तिकेमधल्या हमोंच्या पुस्तिकेचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.सोनवणींच्या पुस्तकांतील मुद्द्यांविषयी पुन्हा कधीतरी.
‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’
ह. मो. मराठे
‘विद्वेषाच्या विरोधात जागृती मंच’ द्वारा प्रकाशित
पाने ९६, किंमत २५ रुपये
मराठेंच्या पुस्तकात आपल्याला हे पुस्तक का लिहावे वाटले (मूळ स्वरुप ‘किस्त्रीम दिवाळी २००४) हे त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या मुद्द्यापासून सुरु झालेले मराठेंचे विवेचन नंतर सरळसरळ ब्राह्मण विरुद्ध् मराठा समाज या मुद्द्यावर येते. ब्राह्मण्याची खूण म्हणून मानले जाणारे जानवे (आणि शेंडी) या गोष्टीचा कालबाह्य झालेली गोष्ट म्हणून आपल्याला त्याग करावा असे कसे वाटले आणि ब्राह्मण नव्हे तर कोणत्याच जातीचा असे लेबल लावून घेण्याला आपली कशी ना आहे यावर विस्ताराने लिहून मराठेंनी आपल्या पुरोगामीपणाची बैठक तयार केली आहे. (पाच वर्षांपूर्वीची हा लेख प्रसिद्ध झाला. सहा महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या ब्राह्मण महासंमेलनात एका विदुषींनी शेंडी आणि जानवे यावचा ब्राह्मणांनी त्याग करावा असे म्हणताच गदारोळ झाला होता!) हाच पुरोगामीपणा ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या काळापासून कसा अवलंबला आहे, याविषयीही मराठे लिहितात. (जातीव्यवस्था आणि वैचारिक मागासलेपणा आजही टिकवून ठेवण्यातला ब्राह्मणांचा सहभाग याविषयी मराठे इथे काही बोलत नाहीत) ब्राह्मण समाजाविरुद्ध ब्राह्मणेतरांच्या मनात असलेला आकस याबाबत मराठेंनी दिलेली उदाहरणे आपण कोणत्या जगात, कोणत्या समाजात रहातो आहोत याविषयी मनात शंका निर्माण करणारी आहेत. यातली काही विधाने विविध वक्यांनी आपल्या भाषणांत केलेली आहेत, काही लेखकांनी आपल्या लिखाणात लिहिलेली आहेत, तर काही मराठेंनी आपल्या लेखात ‘ब्राह्मणांवरील आरोप’ या मथळ्याखालील एकत्र केलेली आहेत. यातील काही मुद्द्यांचे मराठेंनी स्पष्टीकरणही दिले आहे. (ते वेगळ्या रंगात दाखवले आहे)यातले काही मुद्दे असे:
१.मुंबई, गुजराथ येथील दंगलीतून आपल्या पोलिसांतील ब्राह्मणवादी विकृती सगळ्या जगानं पाहिल्या!
२.ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी समाजाला अंधश्रद्धेच्या व रुढींच्या गर्तेत अडकवणार्या कर्मकांडांतून मुक्त करण्याचा फुलेंचा प्रयत्न होता
३.आज मराठी साहित्यात अशी स्थिती आहे की बहुजन समाजातील लेखकांना ब्राह्मणाचा आशीर्वाद मिळावा लागतो. आजही ब्राह्मण लेखकांच्या मान्यतेखेरीज बहुजन समाजातील लेखक मान्यता पावत नाही.
४.तत्कालिन समाजव्यवस्थेने संत ज्ञानेश्वरांना ब्राह्मण म्हणून मान्यता दिली नसल्याने संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हते
५.आज ब्राह्मण लोकांनी जे शिक्षण बहुजन समाजापर्यंत पोचवले आहे, त्याचा अभ्यास त्यांनी दहा वर्षांपूर्वीच केला असून त्याद्वारे नोकर्याही मिळवल्या आहेत. आता नको असलेल्या त्या शिक्षणाला त्यांनी बहुजन समाजाला दिले आहे.
६.हिंदुत्ववाद्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर चरित्र लिहिले, नाटके लिहिली, चित्रपट निर्माण केले,एकपात्री प्रयोग केले आणि त्यातून भरपूर पैसा कमावला
७.देशातील राजकीय नेते सत्ता मिळवण्यासाठी बहुजन समाजाचा वापर करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोध्रा हत्याकांड. या हत्याकांडात किती ब्राह्मण मेले याची सरकारने आकडेवारी द्यावी असे आवाहन मी सतत करत आहे.
८.आपण एतद्देशिय असल्याचे ब्राह्मण भासवत आहेत. संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे, म्हणून बहुजनांनी तिचा स्वीकार न करता इंग्रजीचा स्वीकार करावा.
९. इथल्या आदिवासींच्या जमिनींवर आक्रमण झाले, म्हणून आदिवासी राजा दशरथाकडे गेले, पण त्याच्या मुलाने मात्र आदिवासींना राक्षस म्हणून चिरडले
१०. शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विषप्रयोग करुन ठार मारले. संत तुकारामांच खून ब्राह्मणांनी केला.
११.रामदासांची व (शिवाजी) महाराजांची प्रत्यक्षात कधीही भेट झाली नाही, तसेच भवानीने तलवार दिल्याची कुठेही नोंद नाही. यापाठीमागे महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून घेण्याचे षडयंत्र ब्राह्मणांचे होते
१२.परकियांनी देशावर् इतकी वर्षे राज्य केले, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक म्हणजे आत्ताच्या ब्राह्मणवाद्यांचे पूर्वजच होते. त्यामुळे तेच खरे देशद्रोही आहेत.
१३. भांडारकर संस्थेवर जो हल्ला झाला तो ब्राह्मण समाजाला समोर ठेवून झाला होता.
१४.शिवाजींचा लढा मुस्लिमांविरुद्ध् नव्हे तर ब्राह्मण आणि त्यांनी तयार केलेल्या विषमतेविरुद्ध होता. (महाराजांच्या मंत्रीमंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे, पुरंदर किल्ल्यावर महाराजांना सर्वाधिक सहाय्य करणारे नीळकंठ सरनाईक, महाराजांच्या हेरखात्याचे पहिले प्रमुख नानाजी देशपांडे हे सर्व लोक ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत, त्यातील सुमारे १०० पत्रांत त्यांनी ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याचा किंवा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. ‘महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती’ हा उल्लेख स्वतः महाराजांनी एक पत्रात केला आहे. खुद्द महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घ्यायला संकोच वाटत नव्हता. अफजलखानचा वकील ब्राह्मण होता हे ब्राह्मणद्वेषाचे कारण असल्यास अफजलखानचे अनेक देहरक्षक मराठा होते व त्यातले दोघेजण शिवाजी महाराजांचे जवळचे नातेवाईक होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.)
१५.मुस्लिमांनी शिवाजीची बदनामी कधीच केली नाही, मात्र परदेशातील लेनच्या डोक्यात इथल्या ब्राह्मणांनी विकृती घतली.
१६.बहुजनांनी इतिहास घडवला, पण तो ब्राह्मणांनी लिहिला, म्हणून ब्राह्मण इतिहासाचे पद्धतशीर रीत्या विकृतीकरण करत आहेत.
१७.दादोजी कोंडदेव आणि रामदास महाराज यांना जबरदस्तीने शिवाजी महाराजांचे गुरु बनवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दादोजी कोंडदेव हे स्वराज्याच्या विरोधात होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता, म्हणून राज्याभिषेकासाठी गागाभट्टांना काशीहून बोलावण्यात आले. रामदास हा माणूस जर शिवाजींचा गुरु होता तर तो (मूळ वाक्यातील एकवचनी उल्लेख) महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित का नव्हता? ( छत्रपतींच्या राज्यभिषेक काळात गागाभट्ट हे नाशिक मुक्कामी होते, राज्याभिषेकाचा प्रस्ताव गागाभट्टांकडूनच आला, त्यावर महाराजांनी आपले कुलगुरु अनंत भट आणि बाळकृष्ण आर्वीकर यांना बोलावून त्यांचे मत घेतले. त्यांनी आणि नाशिक, त्र्ञंबकेश्वर येथील ब्राह्मणांनी संमती दिल्यावरच राज्याभिषेक करण्याचे ठरले. रामदास हे संन्यासी होते. अशा प्रसंगी बैरागी, संन्यासी यांनी उपस्थित राहू नये हा परिपाठ आहे)
१८. रामदास हे चारित्र्यहीन होते (मूळ शब्द ‘रंडीबाज)
१९.थुंकण्याची मडकी आपल्या गळ्यात बांधण्याची सक्ती दलितांवर ब्राह्मण पेशव्यांनी केली.
२०.कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कार्तिक स्ननाच्या वेळी पुराणोक्त संकल्प सांगणारा नारायणभट या वेश्यावृत्तीचा होता. त्याला आणण्यासाठी सरकारी गाडी वेश्यावस्तीत पाठवावी लागत असे.
२१. ‘भांडारकर झांकी है, शनिवारवाडा बाकी है’
२२.विद्यापीठीय आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम ब्राह्मणांनी लिहिल्यामुळे दलितांना या परीक्षांत म्हणावे तसे यश मिळत नाही, व हे कारस्थान वर्षानुवर्षे चालत आले आहे.
२३. हिंदुधर्म हा आमचा नसून तो विदेशी आर्य ब्राह्मणांचा आहे असे शिवधर्माच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्यांचे म्हणणे आहे. “शिवधर्म हिंदुविरोधी नाही, पण ब्राह्मणविरोधी आहे, त्यामुळे या धर्मात ब्राह्मणांना प्रवेश नाही” असे शिवधर्म स्थापनेच्या मेळाव्यात झालेल्या भाषणांत म्हटले गेले,” शिवधर्म स्थापनेच्या आजच्या प्रसंगी आम्ही बहुजनांनी ब्राह्मणांबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत. यापुढचे सर्व विधी बिनशेंडीच्या माणसाने करायचे आहेत. यापुढे शिवधर्मियांसाठी मनुस्मृती, मत्स्यपुराण हे विकृत ग्रंथ त्याज्य आहेत. भटा ब्राह्मणांची सर्व बौद्धिक, सांस्कृतिक, मानसिक गुलामगिरी झुगारायची आहे. या पुढील असे विकृत धार्मिक ग्रंथ केवळ जाळायचेच नाहीत, तर असे धर्मग्रंथ लिहिणार्यांनाही आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही” असेही म्हणण्यात आले.
२४.जिजाऊंच्या उच्च, उदात्त, मानवी रुपावर दैवतीकरणाचे एकही पुट चढणार नाही याविषयी आपण सदैव जागरुक राहू या असे मानणार्या शिवधर्माच्या प्राथमिक संहितेत बाकी जिजाऊंचे पूजन करुन बालकाचे नामकरण करावे असे म्हटले आहे. या संहितेत जिजाऊंची आरतीही दिली आहे.
ब्राह्मण समाजाला टिपण्यासाठी सगळा ब्राह्मणेतर समाज असा पचंग बांधून तयार झालेला आहे असा वाचकाचा समज करुन देण्यात जवळजवळ यशस्वी झाल्यानंतर ‘शस्त्राघाता शस्त्रच उत्तर’ या न्यायाने मराठे आपले आणि आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांमधले काही विचार मांडतात. ते वाचून तर औषधापेक्षा आजार परवडला असे वाटू लागते. त्यातले काही विचार असे:
१. शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न आला तर ब्राह्मणही काही विचार करतील. कोंडलेले मांजर जसे हिंसक बनते तसे ब्राह्मणांसही व्हावे लागेल (!). ते शस्त्र हातात घेऊन नाही तर डोके लढवून.
२.धम्मप्रवर्तन दिनानिमित्त लाखो दलित मुंबई व नागपूर येथे जमा होताततसे वर्षातील कोणतेतरी दोन दिवस ठरवून त्या दिवशी लाखो ब्राह्मणांनी शहराशहरातून व गावोगावातून मिरवणुका काढल्या पाहिजेत.
३.ब्राह्मणांची व्होट बँक संघटित करणे आवश्यक आहे
४. यापुढे ब्राह्मणांनी भिक्षुकीची किंवा पौरोहित्याची कामे बंदच करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्यांची मुलेबाळे व्यवस्थित नोकरी धंदा करीत आहेत, त्या भिक्षूकांनी भिक्षुकीची कामे ताबडतोब थांबवावीत.
५.वास्तविक पहाता आजचा तरुण ब्राह्मणवर्ग रानावनात राहून अदिवासी लोकांच्या आश्रमशाळा चालवण्याचे, त्यांन औषधोपचार करुन सेवा करण्याचे विधायक काम करण्यात गुंतला आहे.
६. ब्राह्मण महासंमेलनात व्यक्त करण्यात आलेले विचारः ब्राह्मण मुलींनी ब्राह्मणेतरांशी अजिबात लग्ने करु नयेत. ती कधीच सुखाची होत नाहीत ( या उद्गारांना तरुण ब्राह्मण स्त्रियांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला) ब्राह्मणांनी संततीनियमन अजिबात करु नये. ब्राह्मणांनी प्रजा वाढवावी. सरकार काही ब्राह्मणांना पोसत नाही. ( या उद्गारांना टाळ्यांच्या गजरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला!)
६. १९६० नंतर सर्व क्षेत्रातील खालपासून वरपर्यंतची सर्व सत्ताकेंद्रे ब्राह्मणेतरांच्य हाती गेली आहेत,आणि ब्राह्मणांना कटाक्षाने दूर ठेवले जात आहे. हे आता अटळ आहे
तथापि जगात संपूर्ण चुकीचे असे काही नसते या न्यायाने या स्फोटक पुस्तिकेत विवेक शाबूत ठेऊन केलेले काही विचारही वाचायला मिळाले. त्यातले काही असे:
१. ब्राह्मणांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सिंधी, गुजराथी समाज हा ब्राह्मणांपेक्षाही अल्पसंख्याक असतानादेखील त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणांविरुद्ध आहे तितकी अप्रीती नाही. याचे कारण कुठेतरी आपला आहंभाव असावा.सर्वात जास्त ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रातच का याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वार्थी, अप्पलपोटे, जातीचा दुराभिमान बाळगणारे, इतरांना तुच्छ लेखणारे, सामाजिक समस्यांचे भान नसलेले, धर्माच्या आधारे बहुजन समाजाचे शोषण करणारे अशी ब्राह्मणांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. ही प्रतिमा बदलवली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.
२. आजवर ब्राह्मण गरिबीत जगले. यापुढे ब्राह्मणांनी गरीबीचा नव्हे तर श्रीमंतीचा ध्यास घेतला पाहिजे.
३. ब्राह्मणवाद हा फक्त ब्राह्मणांतच असतो असे नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे असे म्हणणार्या बॅ. अंतुलेंच्या मंत्रीमंडळातील एक महिला मंत्री यासुद्धा ब्राह्मणवादीच ठरतात. कै. वसंतराव नाईक यांना ‘वंजारडा’ आणि कै. यशवंतराव चव्हाण यांना ‘कुणबट’ या विशेषणांनी संबोधणारे नेते होऊन गेलेच ना? शूद्र व अतिशूद्रातील एका जातीने दुसर्या जातीला नीच समजणे हेसुद्धा ‘ब्राह्मण्य’ च आहे.
एखाद्या कलाकृतीने आपल्याला अस्वस्थ केले तरे ते त्या कलाकृतीचे यश मानावे असा संकेत आहे. या पुस्तिकेने मी अस्वस्थ झालो, पण ते या पुस्तिकेचे यश असे म्हणायला मन तयार होत नाही. सोनवणींची पुस्तिका वाचून तर ही अस्वस्थता वाढली.
हे सगळे काय चालले आहे?
हे सगळे काय चालले आहे?
मला जात या विषयाची घृणा आहे. लहानाची मोठी होताना आईनी इतकं ब्रेन्-वॉशिंग केलेलं लग्न कोणत्या जातीत करायचं याबद्दल की मला ओ यायची बाकी होती. असो.
मी १२ जाती मानते – मेष, वृषभ, मिथुन ,कर्क ….इ. इ.
लेख आवडला. फार गहन विषय होत. छान हाताळलाय.
“मराठे आपले आणि आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांमधले काही विचार मांडतात. ते वाचून तर औषधापेक्षा आजार परवडला असे वाटू लागते.” हे वाक्य वाचून हसू आवरेना …… पण हसून हसून रडू सुद्धा येऊ शकतं माणसाला.
वेल …. विषय फार गंभीर आहेच आणि लेख सुरेख….