निशापती महाराजांची चिकीर्षा

प्रावृष ऋतूच्या आगमनाची द्वाही फिरवणारे केकास्वर निशापती महाराजांच्या महालाभोवती रुंजी घालून गेले तरीही प्रत्यक्ष पर्जन्याचे आगमन होण्यास विलंब होणार असेच संकेत दिसत होते. दिनक्षयसमयी प्रवातागमन नित्याचे झाले होते, तथापि उदकधारांचे उर्वीमीलन काही केल्या होत नव्हते. वातावरणातील उत्ताप काही कमी होत नव्हता.

आपल्या महालात व्याकुलावस्थेत पहुडलेल्या निशापती महाराजांना उष्माप्रकोपाची पीडा असह्य झाली होती. प्रस्वेदबिंदूंनी निशापती महाराजांचे पीनमुख प्रच्छन्न झाले होते. आपल्या पीवर करकमलांत धरलेल्या कार्पासपटाने  ते पुनःपुन्हा घर्ममोचनाचा यत्न करत होते तथापि वसंतसमयातील पुष्पांवर वारंवार आकर्षित होणाऱ्या भृंग्याप्रमाणे स्वेद त्यांच्या गात्रागात्रांकडे आकृष्ट होत होता. परिश्रांत होऊन निशापती महाराजांनी आपली तुंदिल तनू शय्येवरून उन्नत केली.  वासगृहाच्या वातायनाला सन्मुख होऊन ते काही क्षण अर्धनिःसंज्ञावस्थेत तिष्ठत राहिले. तेवढ्यातही दिवाकराच्या रश्मिदंडांने त्यांच्या लोचनांस काही कष्ट झाले.  संधारावरील एक परिपक्व आम्रफल उचलून त्यांनी त्याचे अवघ्राण केले, तथापि आपल्या अशनाहीनतेचे स्मरण होताच त्यांनी ते फल पुनःश्च संधारावरील तबकात ठेवले.
विभ्रमावस्थेतच त्यांनी किंचित तीव्र असे करताडन केले. एकदा, दोनदा. त्यांच्या अधिर कृतींमधून त्यांचे क्षीण मनस्वास्थ्य प्रतीत होत होते. द्वारावरील यवनिकांचे सूक्ष्म आंदोलन झाले आणि महाराजांचा प्रियतम परिचारिक भ्रातृभजन महालात प्रविष्ट झाला. महाराजांना प्रणाम करून तो नम्रपणे महालाच्या भित्तीनिकट उभा राहिला. उभयतांच्या मौनावस्थेत कालाने काही पळांचे भक्षण केले.

“भ्रातृभजना.. ” महाराजांनी त्या अभाषणाचे खंडन करत वक्तव्य केले. “आमच्या प्रिया, सखी, मार्गदर्शक सुभाषिणीदेवी सांप्रत कोणत्या स्थळी आहेत याचे तुला प्रज्ञान आहे काय? ”
एखाद्या मंजूषेत भयंकर विषारी सर्प आहेत याचे ज्ञान असतानाही  ती  मंजूषा मस्तकावरून वाहण्याचे बळ व्हावे तसे  भ्रातृभजनाच्या ओष्ठांचे अल्पस्फुरण झाले. संकोच आणि निष्ठा यांच्यातील त्याच्या अंतःकरणात चाललेल्या  द्वंद्वाचे त्याच्या मुखावर किंचित्काल प्रकटन झाले. तथापि महाराजांच्या लवणभक्षणाला स्मरून   महाराजांच्या प्रती असलेल्या त्याच्या निष्ठेने त्याच्या मनातील स्वाभाविक संकोचावर जय मिळवला. कंठातील श्लेष्माचे निर्मूलन करण्याचा त्याने काहीसा असफल यत्न केला आणि सेवकाच्या मर्यादाशील स्वरात तो म्हणाला, “महाराज, सुभाषिणीदेवींचे स्वास्थ्य ढळल्याचे श्रवणात आले आहे. गुरुदेव राजवैद्यांच्या महाली त्यांच्यावर वैद्योपचार सुरू आहेत. ”
“काय? हे वर्तमान आमच्या कर्णांपर्यंत येण्यास इतका विलंब का झाला भ्रातृभजना? देवींना काय कष्ट होत आहेत भ्रातृभजना? ”
“क्षमा असावी महाराज. परंतु सेवकाच्या अधिकाराबाहेरच्या या गोष्टी आहेत. सुभाषिणीदेवी.. ”
“विराम घेऊ नकोस, भ्रातृभजना, तुला आमचे अभय आहे. देवींना…? ”
“महाराज, देवींना काही मनस्ताप असल्याचे ऐकतो आहे. काही कालापूर्वी आपल्या साम्राज्याच्या शत्रुपक्षातील काही व्यक्तिविशेषांबद्दल देवींकडे काही पृच्छा झाली होती, असे ऐकिवात आले आहे. त्यामुळे आधीच अतिसंवेदनशील असलेल्या सुभाषीणीदेवींचे मन भयशंकाग्रस्त झाले आहे. त्याकारणे त्या क्रोधातिरेकाच्या आहारी जाऊन मतिभ्रमित झाल्या आहेत. देवींना तीव्र निद्रानाश जडला असल्याचे वृत्त आहे. समस्त नरजातीविषयी त्यांच्या मनी काही छद्म उपजले आहे. गुरुदेव वैद्यराज उपचार करत आहेत, महाराज. आपण स्वस्थ राहावे….. ”
“आम्ही कसे स्वस्थ राहाणार भ्रातृभजना? कसे स्वस्थ राहाणार? सुभाषिणीदेवींच्या सामर्थ्यावर तर आमच्या राज्याचे क्षेम अबाधित आहे. जा, भ्रातृभजना, सत्त्वर गमन कर. या क्षणी  गुरुदेव वैद्यराजांच्या महाली जा आणि आम्ही त्यांचे स्मरण केले आहे हा आमचा संदेश त्यांच्यापर्यंत संवाहित कर. ते जर अन्नग्रहण करत असतील, तर त्यांना हस्तप्रक्षालनासाठी राजमहालात आमंत्रित कर. जा भ्रातृभजना, त्वरा कर… ”
महाराजांना प्रणाम करून भ्रातृभजन द्रुतगतीने महालाबाहेर गेला. निशापती महाराजांनी घर्मनिर्मूलनाचा पुनःप्रयास केला. आपल्या व्रणांचे अवलेहन करणाऱ्या अनुविद्ध भेरुण्डाप्रमाणे ते आपल्या महालात एकाकी बसून राहिले.

सायंकाल झाला होता. महालाच्या निकट असलेल्या न्यग्रोधपादपांच्या छायांनी आता लंबाकार धारण केले होते. शीतलक अनिलाने  वेग धारण केला होता. महाराजांचे स्वेदोत्सर्जन आता नियंत्रणात आल्यासारखे वाटत होते. कक्षाच्या बाहेरून प्रतिहारीचा पदरव आला आणि त्याबरोबरच गुरुदेव वैद्यराजांनी धारण केलेल्या तीव्र सुगंधद्रव्याच्या परिमलच्या उर्मिकांनी महालात नर्तन सुरू केले. महाराजांचा भालप्रदेश किंचित्काल संकोचल्यासारखा झाला. एखाद्या मदोन्मत्त कुंजराने अरण्यातल्या वृक्षलतांचे बलात्काराने पादपतन करावे तद्वत महालातल्या चित्रकटांवर आघात करीत गुरुदेव वैद्यराज महालात प्रविष्ट झाले. महाराजांना त्यांनी अतिनम्रपणे प्रणिपात केला.
“काय हा विलंब दल्यप्रवाद? आमचा आवेग आपल्याला ज्ञात नाही काय? ”
“क्षमा असावी, महाराज. काही व्यक्तिगत कार्यात व्यग्र होतो. आपला संदेश मिळताच त्या कार्याची पूर्तता केली आणि सत्वर निघालो. ”
“कसले कार्य दल्यप्रवाद? ”
गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवादांच्या मुद्रेवर लज्जेच्या विरल अवगुंठनाने आच्छादन केले. “प्रातःकाली दर्पणावलोकन करीत असताना आमच्या केशभारात काही पाण्डुछटा उमटल्याचे आमच्या अवलोकनात आले, महाराज. रुपयौवनाचे आपल्या साम्राज्यातील महत्त्व आपण जाणताच, महाराज. आपल्या महालात मद्रदेशीय ललनांची अनेक छायाचित्रे लावून आपणही हे वारंवार सिद्ध करण्याचा यत्न करत असता. काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा  करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… ”
“विषय आमचा नाही, तुमचा आहे दल्यप्रवाद. विषयांतर करून स्वजनांचा हर्षध्वनी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्ही राजदरबारात स्थान दिले आहे. आपले भाष्य मर्यादेत ठेवा, दल्यप्रवाद. आपल्या श्वेतकेशांसंदर्भात आपण भाष्य करत होतात.. ”
” यथार्थ, महाराज.  त्या शुभ्रचूडांवर आम्ही रक्तगर्भाचे अवच्छेदन करण्यात व्यस्त होतो. ते कार्य संपन्न होण्यास विलंब लागला महाराज. केशमार्जन, केशशुष्कीकरण होताच सत्त्वर आम्ही प्रस्थान केले, महाराज.” 
महाराजांना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास अतीव प्रयास पडल्याचे दिसले. तथापि आपल्या स्वरांतील संयम ढळू न देता ते म्हणाले, ” देवी सुभाषिणींचे स्वास्थ्य कसे आहे, दल्यप्रवाद? ”
“आता क्षेम आहे, महाराज. देवींना असाधारण असे कष्ट नाहीत, परंतु आदिम सर्वदा कलहप्रिय प्रकृती आणि त्यावर संदेहाचे उपवासन यामुळे देवींच्या मस्तिष्काला काही व्यावर्तने पडली आहेत. आम्ही दिलेला कल्प आणि दैनंदिन कार्यांतून संपूर्ण निवृत्ती यांनी देवी अल्पावधीतच कार्यचपल होतील. ”
“निवृत्ती? कसले भाष्य करता आपण दल्यप्रवाद? देवी आमच्या कूटप्रमुख आहेत. देवी आमच्या साम्राज्यातल्या मंत्री तर आहेतच, पण महत्प्रयासाने आम्ही देवींना इतर साम्राज्यांच्याही अमात्यपदी नियुक्तीची योजना केली आहे. त्यासाठी शीतांशुमहाराजांचे आम्हांस किती प्रशंसन करावे लागले, ते आम्हीच जाणतो. उत्तरनगरात देवींचे अमात्यपद आहे, म्हणून आमची कीर्ती अबाधित आहे. अन्यथा उत्तरनगरात आम्हाला  रिपुन्यूनत्व नाही, हे गुह्य आपल्यालाही ज्ञात आहे. आमचे उत्तरनगरात आगमन झाले ही वार्ता क्षणभरात षटकर्णी होते. गजवदनाचे बाहुबळ सांप्रत त्याच्या करांमधील कृपाणिकाइतकेच पीडादायक ठरते आहे. आणि हा रासभ… आमचा सुहृद रासभ.. आमच्या मंत्रीमंडळातील कौस्तुभ असा हा रासभ… तो अल्पभाषी आहे, तथापि त्याच्या वाणीने आमचे अंतःकरण क्षतिग्रस्त होते दल्यप्रवाद.. आणि या सर्वांहून असह्य असे ते मुक्तादेवींचे हलाहल. नको, दल्यप्रवाद, नको.  त्या स्मरणानेही आमच्या मनाचा दाह होतो. या सर्वांतून आम्हाला तारण करतात त्या आमच्या देवी सुभाषिणी. आणि आपण म्हणता देवींनी निवृत्ती स्वीकारावी? प्रबोधित व्हा, दल्यप्रवाद, चेतनावस्थेत या…. ” 
“महाराजांचे भाष्य अप्रस्तुत आहे असे म्हणण्याचे धार्ष्ट्य कुणी करेल, महाराज? तथापि एक तुच्छ प्रश्न मनात उत्पन्न होतो आहे, महाराज. आज्ञा असेल तर…. ”
“वदते व्हा, दल्यप्रवाद. ”
“महाराज, मूषकवंश साम्राज्याची कीर्ती सांप्रत  जीवलोकात दुदुंभते आहे. आपण तर या साम्राज्याचे सम्राट! अवघ्या मूषकांचे नृपाधिराज! आज आपण अंगुलीनिर्देश कराल ती पूर्वा! असे असून आपणांस उत्तरनगराचा मोह का होतो याचा बोध होत नाही, महाराज. इथे आपण सुखासनात राहावे महाराज. आपल्या क्रीडांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या मरुभूमीचा मोह का? क्षमा असावी महाराज.. ”
निशापती महाराज निःशब्द झाले. ‘आता आम्ही तुम्हाला काय सांगावे, दल्यप्रवाद? इथला जनसंकुल.. आपल्यासारखाच. मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते. आमच्या कुहूर लीला येथे जनप्रिय होतात, पण तेथे… तेथे समालोचकांच्या अग्निवर्षावात आमचे स्वत्व दग्ध होऊन जाते. देवींच्या अमात्याधिकारात आम्ही अनुजीवित तरी राहातो, पण देवी नसतील तर…? ‘
  “आपण येता आमच्यासह दल्यप्रवाद? उत्तरनगरात आम्ही आपल्यासाठीही एक अमात्यपद निर्माण करु. नवपरिणीत शीतांशू महाराजांचा आमच्यावर अनुग्रह आहेच, आम्ही आमच्या लांगुलचालनकौशल्याने तो वर्धित करु” निशापती महाराजांच्या प्रकट बोलण्यात ओज होते. “आपण सहित असाल तर आपण उत्तरनगराचेही मूषकवंश करु.. ”
गुरुदेव वैद्यराजांचे मुख शिखापतित झाले होते. त्यांच्या चक्षुंच्या परीघांवर जलसंचय झाल्यासारखा वाटत होता. एखाद्या प्राचीन मानभंगाची स्मृती होऊन त्यांचे अंतःकरण विषादमय झाले होते. क्षीण स्वरात ते उद्गारले, “महाराज, उत्तरनगरीचा मोह मला नाही, असे असत्यवदन मी तरी का करावे? पण महाराज, त्या नगरीतले ‘धरित्रीसौष्ठव’ मला सहन   होत नाही. माझे स्वास्थ्य ढळते, महाराज, मला वमनाची आणि अतिसाराची भावना होते. महाराज, क्षमा असावी.  क्षमा असावी, महाराज…. ”
जानुबल नष्ट झाल्याप्रमाणे गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद कंप पावत होते. निशापती महाराज जालकाला सन्मुख होऊन उभे राहिले.
चन्डवातामुळे धूलीकणांचा एक विशाल स्तंभ गगनाकडे आकृष्ट होत होता. त्या स्तंभापलीकडे उत्तरनगरीतले दीप प्रज्वलित झालेले दृष्टोत्पत्तीस येत होते. प्रवातासोबत सूक्ष्म वालुकणांचा एक उत्कट धारासंपात गवाक्षातून महाराजांच्या महालात प्रविष्ट झाला. महालातील प्रकाश धूम्र झाला. दल्यप्रवादांनी आणि अन्य सेवकांनी आपले नेत्र रुद्ध केले होते. निशापती महाराज मात्र उत्तान नेत्रांनी धूलीकणांच्या तिरस्करिणींतून अद्याप उत्तरनगरातील दीपांकडे पाहाण्याचा यत्न करीत होते.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

4 Responses to निशापती महाराजांची चिकीर्षा

  1. Abhijeet कहते हैं:

    Hi Do you have akashphule book of G A.
    I searched a lot for this book but it is out of print.
    Where can i get this book?

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s