खरं काय आणि खोटं काय

“दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू” गौतम म्हणाला. ” ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू कथा लिहितोस. कधीकधी चांगल्याही लिहितोस” गौतमचा स्वर किंचित मिश्किल झाला. ” म्हणून तुला वाटेल की लेखकाच्या कल्पनाशक्तीसमोर सत्य हे काहीच नव्हे. तुझ्या लिखाणातली पात्रं, त्यांचे विचार जगावेगळे, अगदी झगझगीत असतात असं वाटेल तुला. पण वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. या.. आसपास वावरणाऱ्या सामान्य, अतिसामान्य अशा लोकांच्या डोक्याची टोपणं काढून बघितली तर आत भावना, वासना, विकृती, विकार यांचं असं जाळं दिसेल तुला, की ज्याचं वर्णन करायला जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या लेखकाची प्रतिभा पुरी पडणार नाही. माणसाच्या मनाचा काही अंदाजच येत नाही बघ…”

” अरे पण गौतम, कुठे लिखाणातले झगझगीत रंग आणि कुठे हे तुझं वास्तवातलं जग – निव्वळ काळं, पांढरं, किंवा करडं फार फार तर… ” मी जरा जास्तच पुस्तकी बोलून गेलो असं मला वाटलं. गौतमही जरासा हसला. ” नाही, हस तू माझ्या बोलण्यावर, पण तुझं बोलणं काही पटलं नाही बुवा आपल्याला. माझ्या पद्धतीचं लिखाण घे, रहस्यकथा. तुला असं म्हणायचंय का की अगाथा ख्रिस्तीच्या एखाद्या कादंबरीतल्या रहस्यापेक्षा एखाद्या पोलीस स्टेशनच्या क्राईम डायरीत अधिक रोमांच असेल? किंवा दुसरं उदाहरण घेऊ. अं.. समजा भयकथा. धारपांची ‘लुचाई’ किंवा ‘चंद्राची सावली’ वाचताना अजूनही मध्ये थांबून आजूबाजूला बघून घेतो मी. हो, आणि तूसुद्धा. अगदी दिवसाही. असला थरार प्रत्यक्ष ‘तशा’ जागी गेलो तरी जाणवेल आपल्याला? लेखकाच्या कौशल्याला काहीच महत्त्व नाही असं म्हणायचंय काय तुला?”

“हां. तू म्हणतोस ते अगदीच काही चूक नाही” गौतमने सिगरेट पेटवली. सिगरेटच्या धुराच्या निळसर रेषांमागून तो त्याच्या किंचित खर्जातल्या आवाजात बोलू लागला. एखाद्या प्राध्यापकासारखा. एखाद्या तत्त्वज्ञासारखा. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखा म्हणा वाटलं तर.

“वास्तवाचे काळे, पांढरे, करडे रंग म्हणालास तू बापू. आपल्या सगळ्यांची आयुष्यं अशाच रंगाची असतात. पण याच्या किती छटा, किती शेड्स! वास्तव हे कंटाळवाणं, एका साच्यातून काढल्यासारखं असलं तरी ते एकमेकाच्या फोटोकॉपीसारखं नाही” गौतम झेरॉक्स कधीच म्हणत नसे. ” प्रत्येक आयुष्याचा निराळा पीळ असतो. प्रत्येक आयुष्याचे पदर वेगळे. रस्त्याच्या कडेला खड्डा खणता खणता थोडा वेळ थांबून बिडी ओढणारा एखादा मजूर घे. त्याच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे तुम्हा लेखकांना? त्याच्या आयुष्यात काहीच नाट्य नसेल? तो कधी संतापानं इंगळासारखा लाल झाला नसेल? कधी द्वेषानं, मत्सरानं धुमसला नसेल? कधी हतबलतेनं, अगदी निराश होऊन ढासळला नसेल? का कधी एखाद्या नाजूक स्पर्शानं मोहरला नसेल? पण यातलं किती आणि काय तुम्हा लेखकांना कागदावर आणता आलं आहे? लिखाण म्हणजे … निव्वळ कागदी बुडबुडे. त्याला वास्तवाची धग नाही. एखाद्या अनुभवातला जाळ जसाच्या तसा कागदावर उतरवता येणं अगदी अशक्य आहे. मुळात लिखाण ही प्रक्रियाच इतकी कृत्रिम आहे, की तिचा स्पर्श झाला की मूळ अनुभव मेलाच म्हणून समज तू बापू. माझी तक्रार ही तुझ्या लिखाणाविषयी नाही रे. तुम्ही लेखक मंडळी अगदी निष्ठेनं काम कराल, पण तुमची अवजारंच अशी बोथट, गंजलेली आहेत, त्याला तुम्ही काय करणार बापू?”

“हं. म्हणजे आमचं लिखाण ते तेवढं कृत्रिम, आणि तुझं, काय म्हणालास ते.. वास्तव ते तेवढं जिवंत असंच म्हणायचंय ना तुला?”

“अं, अगदी तसं नाही, पण जवळजवळ तसंच.”

“मग गौतमजी, या तुमच्या वास्तवात काय जिवंत आहे बघूया हं” मीही जरा चिडलो आणि खुर्चीवर अस्ताव्यस्त पडलेला ‘सकाळ’ उचलला. “छा! पेपर तर हल्ली चाळायच्याही लायकीचे राहिले नाहीत! पण यातली कुठलीही एक बातमी घेऊ आपण गौतम. मला सांग हं यात काय नाट्य, काय जिवंतपणा आहे ते! हे बघ, ‘वडगाव मावळच्या तलाठ्याला लाच घेताना अटक’. काय नाट्य आहे यात? सरकारी अधिकारी, सामान्य जनतेला नाडणे, लाचलुचपत, अगदी असह्य झाल्यावर कुणीतरी केलेली तक्रार. आता दोनचार दिवस आत जाईल तो आणि मग कुणाच्या लक्षातपण राहणार नाही ही बातमी. काय, काय नाट्य आहे यात? ”

“बापूसाहेब, तुम्ही नेमकी तुमचा स्वतःचा मुद्दा खोडून काढणारी बातमी निवडली. अरेरे! मर्फीज लॉ! ” गौतम हसत म्हणाला.
“का? काय झालं? ”

“बापू, हा चौधरी मला चांगला माहीत आहे. सरकारी नोकरांत अशी माणसं अपवादानंच बघायला मिळतात. धुतल्या तांदळासारखं चारित्र्य आहे त्याचं. त्याला अडकवलाय तिथल्या आमदारानं. माहुलीच्या अभयारण्यात गेल्या महिन्यात हरिणांची शिकार झाली होती बघ. त्यात महत्त्वाची साक्ष आहे चौधरींची. संपतराव जोंधळेची चाल आहे ही सगळी. आता हा आदर्शवादी तलाठी, त्याच्यावर दबाव टाकणारी ही राजकारणी धेंडं, चौधरीला रोजच्या रोज बसणारे चटके, तरीही ताठ मानेनं जगण्याची त्याची जिद्द… यातलं काय आणि कसं तुला तुझ्या एखाद्या कथेत लिहिता येईल? आणि समजा लिहिलीसच तू एखादी कथा, तर ती किती उबवलेली, किती कृत्रिम वाटेल? तेव्हा बापूसाहेब, आपला पराभव मोठ्या मनानं मान्य करा आणि शांतपणानं एक सिगरेट ओढा.” गौतम म्हणाला.

“आणि ते.. ते चौधरी? ” मी गौतमनं पुढं केलेल्या पाकिटातली सिगरेट उचलत विचारलं.

“ते सुटतील बापू. सकाळी शिंदे वकिलांशी बोललोय मी. आपल्याला अशा माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अशा माणसांची आपल्याला गरज आहे, बापू. आपल्यालाही आणि.. ”

आणि कुणाला गरज आहे हे मला आता कधीच कळणार नाही. गौतमचं वाक्य तोडून अचानक दरवाज्यावरची घंटी वाजली. काहीशा अनिश्चितपणे वाजवल्यासारखी. एकदा. दोनदा.

गौतम त्याच्या खुर्चीतून ताडकन उठला. हातातल्या सिगरेटचं थोटूक त्यानं भरून वाहत असलेल्या रक्षापात्रात चुरडून विझवलं. पश्चिमेकडची खिडकी उघडली आणि दारही उघडलं.

दारात एक तरुणी उभी होती. साधारण तीस- बस्तीस वय, किंचित स्थूलपणाकडं झुकणारा बांधा, सावळा वर्ण, महागडा पण एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला काहीसा विसंगत पोषाख आणि जरासा भडकच मेकअप. उंची डीओरंडचा वास. थोडक्यात जिला पाहिल्यावर कपाळावर एखादी आठी चढावी तशी व्यक्ती. अपेक्षेप्रमाणेच गौतमच्या कपाळावर गुरुदत्तसारखं आठ्यांचं जाळं उमटलं.

“गौतम.. गौतम सरदेसाई? ”

“मीच. या, आत या. ” गौतम त्याच्या नेहमीच्या मार्दवानं म्हणाला. स्त्रीदाक्षिण्य हा आता कालबाह्य होत चाललेला गुण गौतमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होता. ‘शिव्हलरी इज डाइंग फास्ट बट इट इज नॉट क्वाईट डेड, बापू’ तो नेहमी म्हणत असे.

ती तरुणी आत आली. थोडीशी बावरलेली, गोंधळलेली. गौतमनं दाखवलेल्या खुर्चीवर जराशी अवघडूनच बसली. फिरत्या नजरेनं तिनं एकदा आसपास बघून घेतलं.

“मी शर्वरी. शर्वरी कारखानीस. मला सुनेत्राकडून तुमच्याविषयी कळलं. सुनेत्रा साखरपे…? ”

“हां.. हां.. त्यांचं एक छोटंसं काम केलं होतं मी मध्ये” गौतम म्हणाला.

“तुमच्या दृष्टीनं ते छोटं असेल गौतमसाहेब, पण सुनेत्राताई म्हणते की तुमचे उपकार या जन्मात फिटायचे नाहीत. ”

गौतम संकोचला. स्तुती त्याला पचवता येत नसे. विशेषतः एखाद्या स्त्रीने तोंडावर स्तुती केली की तो अगदी लाजून जात असे.
त्याचा संकोच शर्वरीच्याही लक्षात आला असावा.

“मला एक सांगा मिस कारखानीस, चष्मा तुम्ही नेहमी वापरता, की फक्त नेटसर्फिंग करताना? ” गौतमने विचारलं.
शर्वरी दचकलीच. “तुम्हाला… तुम्हाला कसं कळलं हे? ” तिनं चाचरत विचारलं.

गौतम फक्त हसला. “ते जाऊ दे. काय, प्रॉब्लेम काय आहे? ” तिच्या समोरच्या खुर्चीत बसत त्यानं विचारलं.
शर्वरीनं जरा साशंकपणानं माझ्याकडे नजर टाकली.

“ओह, हा माझा अगदी जवळचा मित्र बापू, अगदी आपला माणूस आहे. तुम्ही अगदी मोकळेपणानं बोला मिस कारखानीस. ”

“गौतमजी, मी… आम्ही कोतवाल कॉलनीत राहतो. ‘इच्छापूर्ती’ बंगला. बाबांनी मोठ्या हौसेनं हा बंगला बांधला पाच वर्षांपूर्वी. पण त्यात राहायला ते काही फार दिवस जगले नाहीत. आम्ही राहायला आलो आणि सहा महिन्यांतच.. ” तिचा आवाज कापरा झाला. “हार्टचा त्रास होता त्यांना.. माझ्यावर फार जीव बाबांचा. मला भाऊ-बहीण कुणी नाही. ‘तुझं लग्न होईपर्यंत मला देवानं जगवावं बेटा’ ते नेहमी म्हणत असत. पण… ”

गौतमनं पाण्याचा ग्लास तिच्यापुढं सरकवला. शर्वरीनं पाण्याचा एक घोट घेतला आणि ती बोलू लागली.

“बाबा गेले आणि वर्षभरातच आईनं दामलेकाकांशी लग्न केलं. दामलेकाका बाबांचे बिझनेसमधले पार्टनर. नाही… तसं आधीपासून काही नसावं.. ” गौतमच्या उंचावलेल्या भुवया पाहून शर्वरी म्हणाली. “दामलेकाकांचं घरी येणंजाणं होतं. बाबांचा फार विश्वास काकांवर. काकांचं लग्न राहूनच गेलं असावं बहुतेक. बाबा गेले, मी होस्टेलवर. आई फार एकटी झाली होती. काकांनीच मग आईला विचारलं वाटतं, त्या दोघांनी ठरवलं आणि मला सांगितलं. मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. शेवटी आईला तिचं आयुष्य आहेच की. ”

“हम्म. ” गौतम म्हणाला.

“दामलेकाका म्हणते मी त्यांना, पण माझ्यापेक्षा फार मोठे नाहीयेत ते वयानं. इन फॅक्ट, आईपेक्षा लहानच आहेत ते जरासे. बाबांचा बिझनेस उत्तम होता. त्यांच्या गुंतवणुकीही चांगल्या आहेत. सगळ्या गुंतवणुकींची वारस म्हणून बाबांनी माझं नाव घातलंय. बंगलाही माझ्याच नावावर आहे. व्याज चांगल्यापैकी येतं मला. मी मला हवे तितके पैसे काढून घेते आणि बाकीचे आईकडं देते. तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना, गौतमजी? ”

“छे, छे, उलट भलतीच इंटरेस्टिंग आहे हो तुमची ही केस. मग पुढे? ”

“मी काही फार करियरिस्ट वगैरे नाही गौतमजी. ग्रॅज्युएट झाल्यावर आईनं लगेच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. एकदोन ठिकाणी जमतही आलं होतं, पण…. नाही झालं. मी तशी फार बाहेर जाणाऱ्यांतलीही नाही. वाचन, टीव्ही आणि हल्ली इंटरनेट – बस्स. एवढंच माझं आयुष्य. पण चारचौघींसारखा संसार असावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यातून माझ्या डोळ्यांमध्ये मोठा दोष आहे. तुम्हाला कसं कळलं माहिती नाही मला, पण जाड चष्मा घालूनही नीटसं दिसत नाही मला. इंटरनेटवर कविता लिहिते मी, पण स्क्रीनवर त्या वाचण्यासाठी भिंग घ्यावं लागतं मला. त्यातून तिशी झाली माझी. त्यामुळं फार अपेक्षा बिपेक्षा नाहीत माझ्या. दिलीप भेटले आणि आता सगळं ठरवल्यासारखं होईल असं वाटायला लागलं. पण नशीबच खोटं आहे हो माझं. आधी बाबा गेले आणि आता दिलीपही.. ” शर्वरी दोन्ही हातांच्या तळव्यांत चेहरा लपवून हुंदके द्यायला लागली.

मी आणि गौतमनं एकमेकांकडं बघितलं. गौतमनं मला हातानंच ‘असू दे’ अशी खूण केली आणि शर्वरीच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. पाचेक मिनिटानं शर्वरी शांत झाली.

“माफ करा, गौतमजी. कधी कधी मनावर ताबाच राहत नाही हो. ” ती जराशा अपराधीपणानं म्हणाली.
“असू दे. चालायचंच. तर काय म्हणत होता तुम्ही. हे दिलीप… ”

“दिलीप दातार. वासुदेव मधलं नाव. आमचं लग्न ठरलंय, पण.. ”

“थांबा, थांबा. मला जरा सविस्तर सांगा मिस कारखानीस. कोण हे दिलीप? कुठं भेटले तुम्हाला? ”

“सॉरी. तर.. महिन्याभरापूर्वीची गोष्ट. गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते मी. संध्याकाळच्या रागांच्या मैफिली होत्या बघा त्या आठवडाभर. माझी आणि आईची सीझन तिकिटं होती, पण आईचा पाय मुरगाळला आणि तिला बेडरेस्ट सांगितली डॉक्टरांनी. काका येतो म्हणाले माझ्याबरोबर, पण त्यांना ऐनवेळी टूरवर जावं लागलं. मग एक तिकीट त्यांनी परत केलं आणि मी एकटीच गेले. ते तिकीट ज्यांनी आयत्या वेळी काकांकडून विकत घेतलं तेच दिलीप. दिलीप दातार. बी. ई. आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दिलीप मला भेटले त्या कार्यक्रमात आणि नंतरही आम्ही भेटलो. दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी मला मागणी घातली आणि मी हो म्हणून टाकलं. ”

“आणि तुमचे आई बाबा? ”

“आई तर खूशच झाली. काकांनाही आनंद झाला. साखरपुडा जोरात करायचा म्हणाले ते. त्यांचं टूरवर जाणं वाढलंय ना खूप हल्ली, पण आता टूरबिर सगळं बंद म्हणाले. साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं याची यादी पण काढली आम्ही बसून. दिलीप खूप बिझी असतात ना, त्यामुळं आम्ही संध्याकाळी सातनंतरच भेटायचो. काकांच्या ऑफिसमध्येही फॉरेन डेलिगेशन आलं होतं कुठलंसं. त्यामुळं काकांची आणि त्यांची गाठच पडेना. फोटो बघितला काकांनी दातारांचा आणि म्हणाले, नशीब काढलंस तू शर्वरी… ”

“हे दातार.. कुठले हे? घरी कोण कोण असतं? कुठल्या कंपनीत आहेत नोकरीला? ”

“अं… मला फारसं नाही सांगता येणार, पण सुपरसॉफ्ट की कुठली कंपनी आहे. संग्रामनगरला कुठंशी ऑफिस आहे. नवीन कंपनी आहे, आणि ऑफिसही शिफ्ट होतंय म्हणे. त्यामुळं नक्की सांगता नाही येणार मला. दातार मूळचे अमरावतीचे. आईबाबा नाहीयेत त्यांना. एक मोठी बहीण. ती भुवनेश्वरला असते. ती.. त्या यायच्या होत्या साखरपुड्याला… ” शर्वरीचा आवाज परत चोंदल्यासारखा झाला.

“आणि मग…? ”

“दहा तारखेचा मुहूर्त होता साखरपुड्याचा. सगळी तयारी झाली होती. नऊ तारखेला रात्री आम्ही फिरायला गेलो होतो. मी आणि दिलीप. चांदणं पडलं होतं सुरेख. त्यांनी अंगठी घातली बोटात माझ्या. म्हणाले, ‘शर्वरी, मला वचन दे, जन्मोजन्मी माझीच होऊन राहशील… ‘. मी म्हणाले, ‘ हे असलं कसलं बोलणं? आणि अंगठी उद्याच्या मुहूर्तावर नाही का घालायची? ‘ तर म्हणाले, ‘खरं प्रेम करणाऱ्यांना मुहूर्ताचा संकेत लागत नाही शर्वरी’ मी वचन दिलं त्यांना तेव्हा गहिवरले ते. म्हणाले, ‘आयुष्यभर प्रेमाला पारखा झालेला माणूस आहे मी. तू माझ्या जीवनात हिरवळ फुलवलीस, शर्वरी. ‘ नऊ वाजता त्यांनी मला घरी सोडलं तेव्हा माझा हात हातात घेऊन म्हणाले, ‘उद्या भेटू, आयुष्यभर एकमेकांचे होऊन राहण्यासाठी.. ‘ किती, किती आनंदात होते मी गौतमजी त्या दिवशी.. ”

मी गौतमकडे पाहिलं. रोमँटिक बोलण्याला तो फार कंटाळत असे. गौतमला कंटाळा आला असला तरी त्यानं तो चेहऱ्यावर दाखवला नव्हता.

“ही गोष्ट नऊ तारखेची, मिस कारखानीस. म्हणजे चार दिवसांपूर्वीची. पुढे काय झालं? ”

“तेच काही कळत नाही गौतमजी. दहा तारखेला सकाळी आठ वाजता त्यांची बहीण, भावजी आणि मुलांना घेऊन हॉलवर यायचे होते दिलीप. आठ वाजले, नऊ वाजले.. त्यांचा पत्ता नाही. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. बाकी कुठला पत्ता, काही ठावठिकाणा नाही. आम्ही सगळे गोंधळून गेलो. आई तर रडायलाच लागली. इतकी सगळी माणसं आलेली आमच्याकडची. इतकं चोरट्यासारखं झालं आम्हाला. आणि मी तर घाबरूनच गेले. कुठे असतील हो दिलीप? काय झालं असेल त्यांना? हल्ली कायकाय वाचतो ना आपण पेपरमध्ये. आणि त्यांची बहीण, भावजी, मुलं.. ते लोक तरी कुठे आहेत?.. ” शर्वरी रडवेल्या चेहऱ्यानं विचारत होती.

नशीब तरी काय एकेक प्रश्न मांडून ठेवतं माणसांपुढं! मला त्या मुलीची दया आली. गौतम बाकी नेहमीप्रमाणं स्थितप्रज्ञ होता. आपल्या डायरीत काहीतरी नोंद करून ठेवत त्यानं विचारलं. “मग तुम्ही काय केलं? ”

“आम्ही पोलिसांत गेलो, गौतमजी. इतके हलकटासारखे वागले पोलीस! म्हणे पत्ता काय, कंपनी काय, काही माहिती नाही, आम्ही तपास तरी कशाच्या जोरावर करायचा? एक कसला तरी रिपोर्ट लिहिला आणि म्हणाले आठ दिवसांनी फोन करून बघा. आई तर अंथरुणावरच आहे गेले चार दिवस. काका इतके चिडलेत, म्हणाले, सापडू तर दे, खूनच करतो त्याचा. पण माझं मन मला सांगतंय गौतमजी. दिलीप धोका देणाऱ्यातले नाहीत. त्यांच्यावर नक्कीच काहीतरी संकट कोसळलंय गौतमजी. प्लीज, प्लीज मला मदत करा.. ”

“हम्म. मिस कारखानीस, या दिलीप दातारांचा फोटो आहे तुमच्याकडं म्हणालात तुम्ही.. ”

शर्वरीनं तिच्या पर्समधून एक पासपोर्ट साइज फोटो काढला. “फारसा स्पष्ट नाही आलेला फोटो हा, आणि अलीकडचाही नाहीये. पण तुम्हाला कल्पना येईल. ” ती म्हणाली.

गौतमच्या खांद्यावरून मी त्या फोटोकडं नजर टाकली. चाळिशीचा माणूस. विरळ होत चाललेले केस, सर्वसाधारण नाकडोळे, डोळ्यांवर गॉगल. “डोळ्यांना तीव्र उजेड सहन होत नाही त्यांना. म्हणून डॉक्टरांनी गॉगल वापरायला सांगितलाय त्यांना. ” शर्वरीनं खुलासा केला

“आणखी काही? ”

“स्वभावानं खूप भोळे आहेत हो दिलीप. आणि अगदी सज्जन. स्वभाव अगदी लोण्यासारखा बघा. आवाजही अगदी मृदू आहे त्यांचा. लहानपणी टॉन्सिल्सचा खूप त्रास झाला म्हणे त्यांना. म्हणून अगदी हळुवारपणे बोलतात ते. पण इतके प्रेमळ म्हणून सांगू… ”

“मिस कारखानीस, त्यांचे काही इतर डिटेल्स आहेत तुमच्याकडं? त्यांचं कार्ड म्हणा, त्यांच्या कंपनीचा नंबर म्हणा.. ”

“अं.. त्यांचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे, पण तो… हं, ते मी सांगितलंच तुम्हाला. आणि हो, त्यांनी काही इ-मेल्स पाठवल्या होत्या मला. त्यांचेही प्रिंट आऊटस आणलेत मी. ”

गौतमच्या चेहऱ्यावर अचानक उत्सुकता आली. “कुठलं.. कंपनीचं अकाउंट आहे त्यांचं? ” त्यानं विचारलं.

“नाही. कंपनीच्या अकाउंटमधून आपली बोलणी नको म्हणाले ते. जीमेल अकाउंट आहे त्यांचं. हे ते चार प्रिंट आऊटस.. अं.. जरा खाजगी मेल्स आहेत गौतमजी, तेव्हा.. ”

“आय अंडरस्टॅंड मिस कारखानीस. या खोलीतल्या गोष्टी कधीच बाहेर जात नाहीत. मी बघतो काय करायचं ते. तुमचा नंबर देऊन ठेवा. मी कळवतो तुम्हाला काय ते. दरम्यान स्वतःला जरा सावरा. आईकडेही लक्ष द्या. आणि हो, मन जरा घट्ट करा”

“म्हणजे? मला दिलीप भेटतील ना परत? ” शर्वरीनं धीर एकवटून विचारल्यासारखं विचारलं.

“स्पष्ट सांगायचं तर मला फारशी आशा वाटत नाही, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला. “तेव्हा तुम्ही या दातारांना विसरण्याचा प्रयत्न करावा, हे उत्तम. ”

“ते या जन्मी तरी शक्य नाही गौतमजी. मी वचन दिलंय दिलीपना. माझ्या नशिबात सुख असेल तर ते मला भेटतीलच. इथं, किंवा जिथं ते असतील तिथं. हा माझा नंबर गौतमजी. आणि हो, तुमचा काही ऍडव्हान्स..? ” शर्वरीनं पर्स उघडली.

गौतम हसला. “तशी वेळ आली तर मी तुम्हाला सांगीन, मिस कारखानीस. सध्या काही नको. ”

“मग येऊ मी? ” शर्वरी खुर्चीतून उठली

“या, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला.
मी दरवाजा बंद करून वळलो तो गौतम एक नवी सिगरेट पेटवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होतं.
“काय मग बापूसाहेब, काय म्हणतायत तुमच्या शर्वरीताई? ” त्यानं विचारलं.

“हं. म्हणजे नेहमीप्रमाणं तू माझ्याकडून काढून घेऊन मग मला ते चुकीचं कसं आहे, हे सांगणार म्हण की. ”

“तसं समज. पण काय, तुला वाटतं तरी काय या मुलीबद्दल? ” गौतमनं विचारलं.

“हे बघ गौतम, मी काही तुझ्यासारखा व्यावसायिक नाही. पण तुझं बघून बघून जे शिकलोय ते सांगतो. बघ तुला पटतंय का.. ” मी म्हणालो.

“बापू तू बोल तर खरा. मग बघू आपण तर्क काय, निष्कर्ष काय ते. ” गौतम म्हणाला.

“हम्म. शर्वरी कारखानीस… ” मी मगाशी राहिलेली सिगरेट उचलली. “वय काय, तीस- बत्तीस. आर्थिक सुस्थिती तर दिसतेच आहे. भारी ड्रेस, कानातल्या हिऱ्याच्या कुड्या, बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तर असणारच. आणखी काय सांगू? आणि हो, ते चष्मा आणि नेटसर्फिंगचं काही ध्यानात नाही आलं बुवा माझ्या.. ”

“माझ्या तर्कसंगतीची पद्धत वापर ना बापू. कितीही उत्तम दर्जाची चष्म्याची फ्रेम असली तरी ती सतत वापरणाऱ्याच्या नाकावर एक लहानशी आडवी रेघ दिसते. मिस कारखानिसांनी ती मेकअपनं लपवण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण अस्पष्ट का होईना, ती रेघ दिसतेच. तर मग चष्मा. बाहेर जाताना तिनं तो लावला नाही, याचं कारण म्हणजे तिला त्याची लाज वाटते. म्हणजे त्याचा नंबर बराच जास्त असला पाहिजे. तिनं कॉंटॅक्ट लेन्सेस लावल्या होत्या, हे तर तुझ्या लक्षात आलं असेलच. आणि तिच्या ड्रेसच्या बाह्या बघितल्यास तू? सतत कंप्युटरचा माऊस हाताळणाऱ्या व्यक्तींच्या बाहीवर ती बाही टेबलच्या कडेवर जिथं घासली जाते, तिथे एक आडवी खाच येते. या शर्वरीची आर्थिक स्थिती सामान्य असती, तर ती कुठंतरी नोकरी करते, असा निष्कर्ष मी काढला असता. पण तसं नाही. आणि बाहेर गाडी तर होतीच तिची. मगाशी खिडकी उघडायला मी उठलो तेव्हाच रस्त्यावर पार्क केलेली तिची होंडा सिटी मला दिसली. मग अशा सुस्थितीतल्या मुलीला तासनतास टेबलाशी बसायला कोणती गोष्ट प्रवृत्त करत असेल? उत्तर अगदी उघड आहे. इंटरनेट! ”

“वा, काय लॉजिक आहे गौतम! मानलं तुला… ” मी कौतुकानं म्हणालो. ” आणखी काही? ”

“आणखी बरंच काही. ” गौतम म्हणाला. “त्या मुलीच्या कपड्यांबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल तू म्हणालास, पण तिचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तू काही बोलला नाहीस. तिचे कपडे, दागिने आठव. जरासे भडकच नव्हते वाटत? अशा अडचणीच्या वेळीही ती पूर्ण मेकअप करून आली होती. आणि तिची भाषा.. दिलीपविषयी, तिच्या बाबांविषयी बोलताना किती स्वप्नाळूपणे बोलत होती ती.. ‘अहो दिलीप’ असा उल्लेख… टीव्हीवरल्या मराठी मालिका बघत असणार ही मुलगी. आणि इंटरनेटवर काय लिहिते ही? कविता! ”

” अच्छा. म्हणजे ही लग्नाचं वय उलटून चाललेली, आपल्या शारीरिक दुबळेपणाविषयी काहीशी खंतावलेली, श्रीमंत घरातली, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी आणि काहीशी उथळच मुलगी, नाही का गौतम? ”

“बरोबर. आणि मग तिला हा भेटतो, कोण, काय म्हणता तुम्ही लेखक मंडळी त्याला.. हां, तिच्या स्वप्नांतला राजकुमार. हाही वय होत चाललेला, शरीरानं आणि मनानं दुबळा आणि खऱ्या प्रेमाला आंचवलेला. अशा स्वप्नाळू, कवीमनाच्या मुलींना फार आकर्षण असतं अशा मुलांचं. रांगड्या, मॅचो मुलांपेक्षा अशी काहीशी बायलीच मुलं आवडतात त्यांना. वात्सल्य आणि ममत्व ही तर मॅमेलियन्सची वैशिष्ट्येच आहेत. ‘बायका एरवी कितीही कंठाळ्या असल्या तरी ज्या दिवशी तुम्हाला हँगओव्हर असतो, त्या दिवशी त्या अगदी देवदूतच होतात’ असं वुडहाऊस म्हणतो, आठवतं? आणि मग त्यांचं प्रेम, शपथा, आणाभाका – ते चांदणं, ती हिरवळ, ते एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून कॉफी पिणं वगैरे… सगळे सगळे ते तुमचे शब्दांचे बुडबुडे! ”

“पण त्या दिलीपचं पुढं झालं काय? तो आणि त्याची बहीण, मेव्हणे वगैरे गेले तरी कुठं? ”

” ते बघू आपण. पण सध्या तरी आपण त्या दिलीपनं पाठवलेल्या मेल्स वाचू. अं काय लिहितो हा… अरेरे, वाचू नये रे कुणाचं खाजगी काही.. त्यातल्या त्यात प्रेमात पडलेल्या माणसांचं.. ” गौतमनं त्या प्रिंट आऊटसचे कागद उलगडले. “अरे वा, अगदी रसिक आहेत हो ‘हे’ दिलीप. बघ की, पहिल्याच मेलमध्ये गालिब कोट केलाय त्यानं.. इष्क पर जोर नहीं, है ये वो आतिश गालिब, जो लगाये ना लगे और बुझाये ना बने’ ”

“क्या बात है, गौतम. लोक अजूनही प्रेमपत्रांत गालिब वगैरे लिहितात? ”

“अरे पुढं ऐक. ‘युवर स्टॅच्युएस्क फिगर रिव्हॉल्वज इन माय ड्रीम्स… ‘ ही शर्वरी आणि स्टॅच्युएस्क? तिला अवरग्लास फिगर म्हटलं नाही, हे नशीबच आपलं बापू. ”

“आईज ऑफ दी बिहोल्डर, गौतम, आईज ऑफ दी बिहोल्डर. ”

“हम्म. खरं आहे तू म्हणतोयस ते. आणि आपले दिलीप चांगले वाचकही दिसताहेत. डिलेक्टेबल डिनर, इनक्रेडिबल इंबेसिलिटी ऑफ माय काँफ्रेअर्स, माय अनएंडिंग पेरिग्रेशन्स… वा वा वा.. लेखक व्हायचा हा माणूस इंजिनिअर कसा काय झाला? आणि हे बघ, ऑफिसमधल्या राजकारणाला ‘बेत न्वा’ हा शब्द वापरलाय यानं.. आणि हे काय? ‘फॉरएव्हर युवर्स टिल दी ग्रिम रिपर सेपरेटस अस… ‘ म्हणजे तत्त्वज्ञानीही दिसताहेत हे दिलीप. आणि ‘काऊंटलेस ऑस्क्युलेशन्स? ‘ बापू, नको रे पुढचं वाचायला आपण. ती शर्वरी हे कागद द्यायला का संकोचत होती ते कळतंय मला आत. ”

” पण यातनं काही कळतंय का आपल्याला? ”

“हम्म. बरंच काही कळतंय बापू. आता फक्त एक करायचं आपण. शर्वरीच्या आईबाबांशी एकदा बोलून घेऊ. तिचा नंबर लिहिलेला कागद होता ना इथं कुठंतरी? एक काम कर. तिला फोन लाव, आणि तिच्या घरचा आणि दामलेंचा फोन नंबर घे तिच्याकडून. आणि दामलेंचा मेल आयडीपण घे. ”

“तू काय करतोयस? ”

“आता फारसं करता येण्यासारखं काही नाही बापू. तू तेवढे डिटेल्स घे, मी बघतो सकाळी अर्धवट राहिलेलं शब्दकोडं सुटतंय का ते! ” गौतम म्हणाला.

संध्याकाळी मी गौतमच्या फ्लॅटवर आलो तेंव्हा गौतम खुर्चीच्या दांड्यांवर पाय ठेवून पेंगत होता. माझ्याजवळच्या किल्लीनं मी दार उघडलं आणि तो आवाज ऐकून त्यानं आपले झोपाळलेले डोळे उघडले.
“भले शाब्बास! ” मी म्हणालो. “आम्ही इकडे कोडं सुटतंय का ते बघतोय, आणि महाराज झोपा काढतायत! ”
“कोडं सुटलं की. ” गौतम म्हणाला.
“सुटलं? ”
“हो. बत्तीस आडवा शब्द ‘पचंग’ आहे, ‘पंचांग’ नाही. आपण ‘पंचांग’ धरून चाललो होतो, त्यामुळं सगळा घोळ झाला. ‘पचंग बांधुनी तयार व्हा रे'”
“गौतम…मित्रा, शब्दकोड्याविषयी बोलत नाही मी. शर्वरी… मिस कारखानीसांचं कोडं सुटलं की नाही? ”
“हां ते होय! ते काही फारसं अवघड कोडं नाही. सुटेल. वाजले किती? पाच? चल, आपण एक चहा मारून येऊ आणि बघू मग त्या मिस कारखानीसचं कोडं सुटतंय का ते.”
चहा पिऊन आम्ही परत येत होतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून गौतम म्हणाला, “बापू, माझी एक जुनी धारणा आहे बघ. एखादं कोडं सोडवताना, जे जे निव्वळ अशक्य आहे, ते काढून टाकत जायचं. मग जे शेवटी शिल्लक राहील, तेच सत्य असलं पाहिजे; मग ते कितीही असंभव का असेना… ”
“खरं आहे. ” मी म्हणालो.
“आता ही शर्वरीचीच केस बघ. या दिलीपच्या गायब होण्यामागं काय कारणं असतील? त्यानं त्याच्याविषयी, त्याच्या नोकरीविषयी दिलेली माहिती अशी अर्धवट, गूढ का आहे? या दिलीपच्या नाहीसं होण्यानं कुणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे? मी अशी केस सोडवताना नेहमी स्वतःला त्या गुन्हेगाराच्या जागावर ठेवतो. या केसची गंमत अशी आहे, की यात गुन्हेगार कोण आहे, तेच कळत नाही. दिलीप? त्याचं तर शर्वरीवर खरंखुरं प्रेम दिसतंय. बरं, त्यानं शर्वरीकडून काही पैसे वगैरे उकळले असते, तर तेही समजण्यासारखें होतं. पण शर्वरीच्या बोलण्यात तसंही काही आलेलं नाही. मग काय? तुला काय वाटतं? ”
“काही कळत नाही गौतम. ”
“हम्म. आपल्यासमोर या साखळीच्या कड्या विखरून पडल्या आहेत बापू. फक्त त्यांना जोडणारा एक धागा अजून अदृष्य आहे. एकदा तो धागा दिसला की सगळं सगळं स्पष्ट होईल. चल, मी संध्याकाळी शर्वरीच्या आईवडीलांना भेटायला
बोलावलं आहे. बघूया त्यांच्या भेटीतून काही नवीन कळतं का ते. ”
आम्ही वर गेलो. गौतमनं कंप्यूटर सुरू केला. ई मेल्स तपासता तपासता त्याच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आलं. त्यानं त्याची डायरी उघडली आणि त्यातली नोंद वाचत तो म्हणाला, ” त्या दिलीपचं पूर्ण नाव काय म्हणाली शर्वरी? दिलीप वासुदेव दातार, नाही का? जीनीयस! बापू कोडं सुटलं आपलं! ”
“सुटलं? काय झालं मग या दिलीपचं? कुठं आहे तो? ”
गौतमनं एक प्रिंट कमांड दिली आणि तो प्रिंट आऊट माझ्यासमोर धरुन काही बोलायला तो तोंड उघडणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी पुढं होऊन दार उघडलं. दारात एक मध्यम उंचीचे, चाळीशीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते. माझ्याकडं बघून काहीसे हसत ते म्हणाले, “मी नंदकुमार दामले. शर्वरी… मुलगी माझी. मला गौतम सरदेसाईंना भेटायचं आहे. आपण…? ”
“मी बापू. गौतम आत आहेत. या ना, आत या. ”
दामलेंनी मोकळेपणानं माझा हात आपल्या हातात घेतला. “तुमच्याविषयीही बोलली शर्वरी माझ्याशी. तुम्हा दोघांशी बोलल्यावर खूप धीर आलाय, म्हणाली. काय बघा ना वेळ आली तिच्यावर. सोन्यासारखी मुलगी.. ”
“काळजी करू नका, दामले. सगळं ठीक होईल. ” मी त्यांना आतल्या खोलीत नेत म्हणालो.
गौतमनं दामलेंना बसायला सांगितलं. तिसऱ्या खुर्चीत मी बसलो. मी दामलेंकडं निरखून पाहिलं. कोकणस्थी रंग, चाळीशीनंतरही टिकलेले घनदाट केस. ते काळजीपूर्वक वळवलेले. डायही केला असावा. उत्तम कपडे. आणि भेदक बुद्धीमान डोळे. खोलवर घुसणारे तीक्ष्ण घारे डोळे.
“काय घेणार? चहा? कॉफी? ” गौतमनं विचारलं.
“काही नको, थँक्स. गेले चार दिवस अन्नपाण्यावरची वासनाच उडालीय आमची. ही तर खचलीच आहे. म्हणून तुमच्या मेलमध्ये तुम्ही तिला घेऊन या म्हणून लिहिलं होतं, पण काही शक्य झालं नाही ते. ” दामले म्हणाले.
गौतम आपल्या खुर्चीत जरासा रेलला. “हं. तुमचं उत्तर वाचलं मी दामले. आणि ते वाचून मला वाटलं तुम्ही मिस कारखानिसांच्या आईंना बरोबर आणलं नाही तेच बरं केलं. ” तो म्हणाला.
मला गौतमच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. शब्दांचं आणि शब्दांच्या निवडीचंही.
“हो, आता निराशा पचवण्याची ताकद नाही आहे हो तिच्यात. ” दामले म्हणाले. “मी त्या दोघींनाही सांगतोय गेले चार दिवस, की आपण दिलीपला विसरून जायला हवं; पण त्यांना ते शक्य होत नाहीये. शर्वरी तर.. मला भीती वाटते गौतमसाहेब, ती काही बरंवाईट तर… ”
“अरे, नवल आहे. ” गौतम हसत म्हणाला. “मी तर तुम्हाला आज इथं चांगली बातमी द्यायला बोलावलं होतं.”
दामलेंच्या डोळ्यांत आता रागाची किंचित लाली आली. “काय.. अर्थ काय तुमच्या बोलण्याचा? ” त्यांनी जरा चढ्या स्वरात विचारलं.
“अर्थ असा दामलेसाहेब, की तुमचे दिलीप वासुदेव दातार मला सापडले आहेत. ”
दामले ताडकन उठून उभे राहिले. “क्क.. कुठे आहेत ते? ” त्यांनी विचारलं.
गौतमनं हातातली पेन्सिल वरखाली हालवली. “खाली बसा दामले. स्वतःला फार हुषार समजता नाही का तुम्ही. आता इतक्या सहजासहजी सुटका नाही व्हायची तुमची. खाली बसा आणि मी सांगतो ती गोष्ट ऐका.”
“या पाताळयंत्री माणसाचा नीचपणा बघ, बापू, ” माझ्याकडं वळून गौतम म्हणाला. ” वयानं आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाईशी यानं लग्न केलं ते निव्वळ पैशाकडं बघून. कारखानिसांना हार्ट ट्रबल सुरू झाल्यावरच याच्या डोक्यात ती चक्रं फिरायला लागलेली असणार. पण लग्न झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की इस्टेट सगळी शर्वरीच्या नावावर आहे. जोवर शर्वरीचं लग्न होत नाही, तोवर ती बिचारी नेमानं तिच्या आईकडं पैसे देत राहील, आणि तिच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर हा हरामखोर चैन करत राहील..पण पुढं काय? एकदा का शर्वरीचं लग्न झालं की सगळा पैसा, सगळी इस्टेट गेली याच्या हातातून. ”
दामलेंनी खिशातला रुमाल काढून घाम पुसला.
“मग हा करतो काय? तर शर्वरीचं लग्नंच होऊ नये यासाठी प्रयत्न करायला लागतो. एकदोनदा जुळत आलेलं लग्न नाही जमलं असं म्हणाली ती. मला खात्री आहे, यानंच त्याच्यात मोडता घातलेला असणार. पण हे फार दिवस चालणार नाही, हे कळाल्यावर हा एक वेगळीच शक्कल लढवतो. ”
मी अवाक होऊन ऐकत होतो. दामले खाली मान घालून बसले होते. “शर्वरी किती हळवी, किती भावनाप्रधान आहे हे आपण बघीतलं बापू. याच्याही हे ध्यानात आलेलं असणार. शिवाय शर्वरीची कमकुवत नजर. त्याचाच फायदा घ्यायचा ठरवला यानं. हा करतो काय, तर स्वतःच वेषांतर करून दातार होतो. दिलीप वासुदेव दातार. शर्वरीला हा भेटतो तेही संध्याकाळनंतर. त्याचा गॉगल, त्याचा कमकुवत आवाज, त्याचे जाड कपडे… हा फोटो बघ बापू… आणि कुणीतरी अप्रतिम मेकअप आर्टिस्ट.शर्वरीला काही शंका येत नाही. ती त्याच्यात गुंतत जाते. मग त्या आणाभाका, त्या शपथा.. कशासाठी? तर तिनं पुन्हा लग्नाचा विचारही करू नये याच्यासाठी! आणि साखरपुड्याला तो उगवतच नाही. उगवणार कसा? होणारा जावई म्हणजे खुद्द सासराच आहे ना! ”
गौतमनं दामलेंकडं तिरस्कारानं बघीतलं. “अमरावतीचं घर, भुवनेश्वरची बहीण, मेव्हणे, भाचे.. सगळ्या थापा!” शर्वरीनं आणलेले इ मेलचे प्रिंट आऊटस दामलेंसमोर टेबलवर फेकले. ” इंग्रजी उत्तम लिहिता तुम्ही दामले. फ्रेंचही शिकलायत वाटतं! छान, छान! शर्वरीला आलेली ‘बिले दू’ काय? यू हॅव माय ‘कॅस्ट ब्लाँश’ मिस्टर सरदेसाई काय? आणि शायरीची काय आधीपासूनच आवड आहे की या कामासाठी वाचली खास? आं?”
आपल्या खुर्चीतून उठून गौतम आता खोलीत येरझाऱ्या घालत होता. ” काय माणूस आहे बघ हा बापू. किती विलक्षण बुद्धीमत्ता! पण चुकीच्या ठिकाणी लावली कामाला. आपल्या बुद्धीचा माज चढला ना एखाद्याला, की तो माज उतरायलाही वेळ लागत नाही. दामले, फार मस्त गेम खेळलात तुम्ही. पण टाईप करताना ती स्पेलचेक लावण्याची सवय तेवढी लावून घ्या बुवा. टाईप करताना ‘एस’च्या जागेवर घाईघाईत कधीकधी ‘ए’ टाईप होतो तुमचा. या मेल्स बघा दिलीप दातारच्या आणि ही तुमची मेल मघाची. आणखीही एकदोन गोष्टी आहेत सारख्या. की सायबरक्राईमला फोन करून दोन्हींचे आय पी ऍड्रेसेस चेक करायला सांगू? पण तुम्ही तयार लोक नाही का! दोन वेगवेगळ्या ठिकाणांहूनही पाठवल्या असतील मेल्स.. ”
“गंमत.. गंमत होती ती सरदेसाई” दामले तुटक आवाजात म्हणाले.
“गंमत? एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळणं ही गंमत? अरे नीच माणसा… ”
“हे बघा सरदेसाई, उगीच शिव्या द्यायचं काम नाही. ” दामलेंच्या आवाजात आता मग्रुरी आली होती. ते उठून उभे राहिले होते. “तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. बाकी तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही पोलिसात जा, कोर्टात जा… ”
“पोलीस! हूं! ” गौतम तुच्छतेनं म्हणाला. दामलेंच्या समोर उभं राहून त्यानं दामलेंच्या डोळ्यांत रोखून बघीतलं. “दामले, एक लक्षात ठेव. पुन्हा त्या मुलीला काही त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही धक्का लावशील तर पस्तावशील. तिच्यामागं कुणी नाही असं समजू नकोस. तिच्यामागं हा गौतम सरदेसाई आपल्या सगळ्या शक्तीनिशी उभा आहे… ”
“आणखी काही? ” दामले कुऱ्यात म्हणाला.
“गेट आऊट! ”
दामलेंनी नाटकीपणानं मान झुकवली आणि बुटांचा टपटप आवाज करत ते निघून गेले.
गौतमनं सिगरेट पेटवली. “तुला माहिती आहे, बापू, आफ्रिकेतल्या जंगलांत काही वेली आहेत. पहिली काही वर्षं त्या अगदी निरुपद्रवी, अगदी सामान्य असतात. एका ठराविक वयानंतर बाकी त्यांच्यातल्या रसाचं जणू जहर व्हायला लागतं. त्यांच्या लाईफसायकलच्या एका विशिष्ट स्टेजला त्या अगदी विषारी, प्राणघातक होतात. असं का होतं हे अद्याप कुणालाही कळालं नाही. पण तसं ते होतं खरं. हा माणूस, दामले, तसलाच वाटतो मला. मूळचा हुषार, अगदी प्रतिभावान, पण अक्कल कुठे वापरली बघ त्यानं.. ”
मी काहीच बोललो नाही.
“आणखी एक, एखादा कलाकार जसा आपल्या कलाकृतीवर कुठेतरी आपली स्वाक्षरी नोंदवून ठेवतो, तसे हे गुन्हेगारही आपल्या गुन्ह्यांवर कुठेतरी आपले फिंगरप्रिंटस ठेवून जातात. भिंतीत कलात्मक भोक पाडून चोरी करणारा आणि ‘कल जब लोग देखेंगे तब प्रशंसा होनी चाहिये’ म्हणणारा ‘उत्सव’ मधला चोर आठवतो ना तुला. या गुन्ह्यावरही दामलेनं स्वतःची एक स्वाक्षरी ठेवली आहे. त्यामुळंच तर मला पक्की खात्री पटली.
“काय? कुठली स्वाक्षरी? ”
“दिलीप. दिलीप वासुदेव दातार. त्याची आद्याक्षरं घे, दि. वा. दातार. काही आठवतं? ”
“दिवाकर दातार! ”
“बरोबर! बाकी गोष्टींनी माझा संशय बळावतच चालला होता, या एका गोष्टीनं बाकी खात्री झाली. ” गौतम म्हणाला.

“पण गौतम.. हा माणूस… काका म्हणते ती मुलगी त्याला. कित्येक वर्षांचे संबंध त्यांचे. तो माणूस इतका नीचपणा करू शकेल? कशासाठी? फक्त – फक्त पैशासाठी? माणूस इतका घसरू शकतो? ”
“हेच बापू, हेच. मी म्हणत होतो ते जळतं, धगधगीत वास्तव हेच. सगळी नाती, मानवी मूल्यं आणि कायकाय तुमच्या शब्दांच्या कागदी होड्या बुडवून टाकणारा माणसाचा स्वार्थ, माणसाची विकृती, हेच ते वास्तव. आता मला सांग बापू, आहे का कुणा लेखकाच्या लेखणीत ताकद.. असलं काही कागदावर आणण्याची? ”
“पण हा हलकट तर… आणि त्याला शिक्षा काहीच नाही? ”
“दुर्दैवानं – काहीच नाही. या खोलीत जे झालं ते आपण न्यायालयात सिद्ध करू शकणार नाही, आणि सिद्ध झालं तरी एखाद्या मुलीचा प्रेमभंग करणं याला आपल्या घटनेत शिक्षा नाही अजून. ”
“आणि शर्वरी.. तिचं काय? ”
“आपण काय करू शकतो बापू? तिला सावध करणारं एक पत्र टाकतो मी आज. स्पष्ट काही लिहित नाही, पण त्या दामलेपासून जरा सावध राहा, असं लिहितो. तिला ‘ता’ वरनं ताकभात कळत असेल, तर तिच्या लक्षात येईल. नाहीतर ती आणि तिचं नशीब. त्या दिलीपच्या स्वप्नांतून बाकी ती काही बाहेर येईल असं वाटत नाही. पण दिलीपच्या गायब होण्यामागं दामलेचा हात आहे, एवढं जरी तिला कळालं, तरी दामले संपलाच म्हणून समज. अरे, एखाद्या स्त्रीच्या स्वप्नांशी खेळणं म्हणजे वाघिणीच्या गुहेत शिरून तिच्या बछड्यांना हात घालण्यासारखं आहे. होय की नाही? घे, सिगरेट घे बापू. ”

(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या ‘ अ केस ऑफ आयडेंटिटी’ वर आधारित )

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

3 Responses to खरं काय आणि खोटं काय

 1. शुचि कहते हैं:

  मला वाटतच होतं कथा शेरलॉक होम्सच्या वळणाची आहे. शेवटी वाचलं – आधारीत. मस्त! आआवडली. तुम्ही न्याय दिला आहे. कथा छानपैकी “मराठीळली” आहे.

  >>आपल्यालाही आणि.. “ आणि कुणाला गरज आहे हे मला आता कधीच कळणार नाही. गौतमचं वाक्य तोडून अचानक दरवाज्यावरची घंटी वाजली. >> ह. ह. पु. वा.

  काही वाक्य खरच अशी निसटतात आणि कुणाकडे फरियाद करावी कळतच नाही. …… कित्ती मस्त मांडलय तुम्ही ते : )

 2. dipak कहते हैं:

  खूपच छान लिहिले आहे.
  ………“बापू, माझी एक जुनी धारणा आहे बघ. एखादं कोडं सोडवताना, जे जे निव्वळ अशक्य आहे, ते काढून टाकत जायचं. मग जे शेवटी शिल्लक राहील, तेच सत्य असलं पाहिजे; मग ते कितीही असंभव का असेना… “…….शेरलॉक होम्सचे वाक्य आहे. आणि सत्य सुद्धा.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s