ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्याविषयी आम्ही अपार आदर बाळगून आहोत. एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे बाजारीकरण झाले पाहिजे या ‘सकाळ’ समूहाच्या मोहिमेत आयुर्वेदाचे कार्पोरेटायझेशन करून डॉ. तांबे यांनी आपला जो खारीचा वाटा उचलला आहे तो केवळ ‘काबिले तारीफ’ आहे असे आमचे मत आहे. हे करत असतानाच तंतोतंत ‘गरीबांचे रामदेव महाराज’ ही आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात डॉ. तांबे यांना आलेले यश पाहून तर आमचा उर भरून येतो, आणि ‘कोण म्हणतो मराठी माणूस उद्योजकतेत कमी पडतो? ‘ असे आम्हाला (दारेखिडक्या बंद करुन एकांतात) ओरडावेसे वाटते. डॉ. तांबे यांची शुक्रवारी ‘सकाळ’सोबत प्रसिद्ध होणारी ‘फॅमिली डॉक्टर’ ही पुरवणी तर आम्हाला साक्षात अमृतानुभव देऊन जाते. लहानपणी ‘चांदोबा’ किंवा ‘नवनीत’ आणि त्यानंतर काही विवक्षित रंगाच्या पातळ पॉलिथीन पेपरमध्ये गुंडाळलेली समाजवर्ज्य पुस्तके आम्ही ज्या आवडीने वाचली त्या आवडीने आम्ही हल्ली ‘फॅमिली डॉक्टर’ वाचत असतो. सांधेदुखीपासून ते मानसिक रोगांपर्यंत सगळे रोग दूर करणारे मॉडर्न धन्वंतरी आम्हाला डॉक्टरांच्या रुपात दिसू लागतात. साळीच्या लाह्या, नाचणीचे सत्त्व, उकडलेली पडवळे, दुधीचा रस यांमध्ये आम्हाला तांबड्या पांढऱ्या रश्शाचा, तळलेल्या सुरमईचा आणि सुक्क्या मटणाचा भास होऊ लागतो. शिवाय ही पुरवणी वाचल्याने आमच्या सामान्यज्ञानात अपरंपार भर पडली आहे, ते वेगळेच. एरवी ‘पिचू’ ही काय भानगड आहे, आणि त्याचे काय करायचे असते, याबाबत आमच्या मनात फार म्हणजे फारच गोंधळ होता. तो दूर केल्याबद्दल डॉ. तांब्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.
इतके सगळे व्याप मागे असताना (हो, ‘फॅमिली डॉक्टर’चे संपादन, त्यात लेख लिहिणे, वाचकांच्या शंकांना उत्तरे; एका माणसाने कायकाय म्हणून करावे? ) डॉक्टरसाहेब विविध समारंभांत उपस्थिती लावतात तेंव्हा बाकी आम्हाला जवळजवळ गहिवरुनच येते. चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव घेऊन रंगमंचावरून बाबामहाराज सातारकरांप्रमाणे सतत मंद स्मित करणाऱ्या डॉक्टरांची छबी जवळजवळ रोज प्रत्येक प्रमुख मराठी वर्तमानपत्रात (म्हणजे ‘सकाळ’ मध्ये) येत असते. आजच्या ‘सकाळ’ मध्ये आलेल्या छायाचित्रात बाकी डॉक्टरांच्या जोडीला रंगमंचावर प्रतापराव पवार, अनील अवचट, मोहन धारिया अशा नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या ऐवजी मराठीतली काही गायक मंडळी दिसली तेंव्हा अचंबा वाटला. बातमी वाचली तेंव्हा ‘जीवनसंगीत’ अर्थात गाण्यांतून आयुर्वेद किंवा आयुर्वेदातून गाणे अशी काहीशी ही भानगड आहे, असे कळाले. ‘आशयघन गाणी आणि भारतीय संगीत मंत्रांसारखेच काम करतात’ असे डॉक्टरांचे मत वाचले. जरासा गोंधळ झाल्यासारखा वाटला, (गाणी आणि मंत्र? मंत्रपुष्पांजलीऐवजी ‘कळा ज्या लागल्या जीवा’ चालेल का? गायत्री मंत्राऐवजी ‘एक लाजरा न साजरा मुखडा?’- हे आमच्या चावट मनाचे प्रश्न! ) पण नेटाने पुढे वाचत राहिलो. डॉक्टर पुढे म्हणाले काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव एकत्र येते ( ‘वर्तमानपत्रात ‘येते’ असे आहे, ते ‘येतो’ असे हवे होते’ हा आमच्या चावट मनाचा विचार आम्ही त्रिफळा चूर्णासारखा गिळून टाकला.), तेंव्हा जीवनसंगीत आकाराला येते’हे बाकी काही म्हणजे काही कळाले नाही.
मग पूर्ण लेख वाचल्यावर कळाले ते असे, की गाणी ही विशिष्ट रोग किंवा अस्वास्थ्यावरील रामबाण चिकित्सा आहे असे बालाजीपंतांना म्हणायचे आहे. त्या गाण्यांची प्रात्यक्षिके आणि त्यावर डॉक्टरांचे त्या गाण्यांचा औषधी उपयोग यावरील निरुपण असा तो कार्यक्रम होता. ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे आणि ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणे यामुळे पित्ताचे संतुलन होते, ‘मेरा रंग दे बसंती ‘ या गाण्याने हृदयातली शक्ती जागृत होते, ‘हवा मे उडता जाये’ या गाण्याने शरीराच्या नाड्या व सांधे मोकळे करण्याचा अनुभव येतो असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही चकीतच झालो! म्हणजे आता निर्मात्याला गीतकार, संगीतकाराबरोबरच एखाद्या आयुर्वेदाचार्यालाही करारबद्ध करावे लागणार तर!
तांबेजी पुढे म्हणतात, ‘शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी ‘दशरथा, घे हे पायसदान’ हे गाणे उपयुक्त आहे (बरोबर! खीरच ती! -पुन्हा आमचे चावट मन! ), तर रक्तदाब, मधुमेही रुग्णांना ‘नैनों में बदरा छाये’ हे गाणे( थ्यांक्यू डॉक्टर मदनमोहन कोहली! – पु. आ. चा. म.!). स्मृतीवर्धन आणि मेंदूचे विकार यासाठी ‘जो तुम तोडो पिया’ हे ‘सिलसिला’ चित्रपटातील मीराबाईचे भजन लागू पडेल तर हृदयविकारावर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ वर बेतलेले ‘किसीके मुस्कराहटोंपे हो निसार’ हे गाणे. ( ‘किसीके मुस्कराहटोंपे ‘ हे ‘वैष्णव जन तो वर बेतलेले? ऋषीचे कूळ? गाण्याचे मूळ?- पु. आ. चा. म.! )
चला! मग बंधू आणि भगिनींनो, मेडिक्लेमच्या पॉलिसीचा प्रीमीयम भरला नसेल, तर भरू नका! तेवढ्या पैशात काही क्यासेटी आणि सिड्या विकत घ्या. रोग खल्लास!
इन्शुरन्स एजंटाला आम्ही आजच घरी बोलावले होते. त्याला येऊ नको म्हणून फोन करावा म्हणून आम्ही फोन उचलणार तोच बालाजींचा आणखी एक अक्सीर इलाज नजरेस पडला.
बालाजी म्हणतात, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. (जिच्या केवळ दर्शनाने फास्टींग आणि पीपी दोन्ही शुगर्स वाढाव्या ती साधना, आणि तिला परमेश्वराच्या मीलनाची इच्छा? तीही अतिउत्कट? – पु. आ. चा. म.!) मलविसर्जन आणि आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे!
आमच्या हातातील रिसीव्हर गळून पडला. ‘हे गाणे सादर झाल्यानंतर ‘प्रेक्षागृहाकडून स्वच्छतागृहाकडे’ किती लांब रांग लागली’ असे विचारण्याचेही आमच्या चावट मनाला सुचले नाही!
तूर्त आम्ही आमच्या तमाम वयोवृद्ध नातेवाईकांना आणि इष्टमित्रांना त्यांच्या साठ्या आणि पंचाहत्तऱ्यांसाठी भेट देण्यासाठी म्हणून ‘बेस्ट ऑफ सलील चौधरी’ ही कॅसेट घाऊक दरात मिळेल का या चौकशीत आहोत. ग्लासभर गरम पाणी, दूधतूप, सकाळचा दुसरा चहा, ‘इसपगुल’ आणि लिक्विड प्याराफीन यांपेक्षा ही दूरगामी गुंतवणूक स्वस्तात पडेल असा आमच्या चावट मनाचा होरा आहे!
खूपच छान!
या ’सकाळ’ ने आणि बालाजी तांबेंच्या आयुर्वेदाने वात आणलाय हल्ली…काही च्या काहीच…म्हणजे जर खरेच फ़ॅमिली डोक्टर मन लावून वाचली ना तर फारसे काहीच पदरात पडत नाही…नुसत्या वरवरच्या शक्यता समजतात..पण सर्व सामान्य लोकांचे मात्र खूप कंफ़्युजन होते…सारखे आपले “संतुलन आयुर्वेद” चे हे तेल लावा न ते क्रीम वापरा…
आणि घरात म्हातार्या लोकआंशी वाद वाढतात ते वेगळेच…”तुम्ही हल्ली पेपर वाचत नाही…पेपर मध्ये पहा काय लिहीलय..बटाटे खाऊ नका, दुधीचं सूप प्या,साजूक तूप (तेही डॉ बालाजी तांबे यांच्या कडचं ’संस्कारीत घृत’ असल्यास फारच छान – तुमचं कोलेस्टेरॉल-फ़ॅटस गेले तूप—आपलं तेल लावीत….!)घ्या…इ इ
हा हा हा … हसुन हसुन पुरेवाट.
परवाच “पिचु म्हणजे काय रे भय्या मामा ?” अश्या अवघड प्रश्नाला तोंड दिले !!
Thanks, Prasad.
अप्रतिम! खरच बर्याच दिवसांनी पु. लं. ची आठवण आली 🙂 सकाळ आणि तांबे ह्या विषयी जास्त न बोललेलंच बरं. कारण तसाही सकाळी सकाळ आल्याशिवाय आम्हाला शौचालयात काहीतरी चुकल्यासारखे वाटते!! असो.
धन्यवाद
“ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य” हे विशेषण तर संतुलन बाबाला सकाळ मध्ये(च) सर्रास लावले जाते पण मागील गुरुपौर्णिमेच्या सुमारास एका कार्यक्रमात बाबांनी हजेरी लावली व अध्यात्मिक विषयाला हात घातला त्याची बातमी मराठी सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये (म्हणजेच फक्त सकाळमध्ये) छापतांना संतुलन बाबाला “ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु” असे विशेषण लावण्यात आले होते. पण काही कारणास्तव ते नाणे फारसे न चालल्यामुळे नंतर आत्तापर्यंत तरी संतुलन बाबाला केवळ “ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य” याचं विशेषणावर समाधान मानावे लागले आहे.
साम वाहिनीवर सध्या ते श्रोत्यांच्या प्रश्नांना गीतेमधून उत्तरे शोधून देत आहेत (!!!?) हि कदाचित “ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु” होण्याची पूर्व तयारी आहे.
गेल्या ७ दिवसात दोन वेळा “सकाळ” मध्ये तांब्याचा (संतुलन बाबा) “ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु” असा उल्लेख असलेल्या “बातम्या” येऊन गेल्या. आजच्या सकाळ मधेच त्यांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात भाविकांना केलेल्या “प्रवचनाचा” सारांश आला आहे. २-३ दिवसांपूर्वी तांबे गरुडेश्वर मध्ये प. प. सद्गुरू श्री टेंबेस्वामी महाराजांच्या मंदिरासमोर बसून काढलेला फोटो “चिंतन-मनन” करताना अश्या स्वरूपाच्या टिपे सहित छापून आला होता. कालच्या त्यांच्या “प्रवचनात” त्यांनी प. प. सद्गुरू श्री टेंबेस्वामी महाराज कसे थोर होते व त्यांचे कार्य याबद्दल भाविकांना असणारीच माहिती परत सांगितली.
थोडक्यात संतुलन बाबांनी प. प. सद्गुरू श्री टेंबे स्वामी महाराजांच्या नावाचा आधार घेऊन आपले “आध्यात्मिक गुरु” चे दुकान जोरात चालविण्याची तयारी सुरु केलेली दिसते! त्यातही “ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु” असे पद मिरवणे त्यांना महत्वाचे वाटत असावे. कारण “आध्यात्मिक गुरु” पोत्याने आहेत पण आपण त्यांच्या पेक्षा वरचढ आहोत हे बिम्बाविल्याशिवाय दुकान फायद्यात येणार नाही हे त्यांना चांगले माहित आहे असे दिसते. संतुलन बाबांच्या “ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु” पदापर्यंतच्या प्रवासाला आमच्या शुभेच्छा!! प. प. सद्गुरू श्री टेंबे स्वामी महाराजांनीच त्यांना सद्बुद्धी देओ हिच त्यांच्या चरणी प्रार्थना.
हम्म. माझ्यासारखेच नास्तिक दिसता आपण. या कारपोरेट बाबांचा वैताग आलाय हो! ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु हे तर फारच भारी आहे!
Fantastic. Krupa karun lihit raha. Pu La chi thet athavan aali. Fakt hech karan nahi he lihayche. SAKAL sarkhya paper ne ha CORPORATE pana karava hyache khup vaeet vattey. SAKAL chya batmyanvar aapli mate aapan banvat asto. Ha murkhpana aata thambvuya.
Thank you.