हॉटेलात आलेली माणसं-१

प्रास्तविकः मुक्तसुनितांच्या ‘बने, बने’ च्या पुढील भागांची अनंत काळापर्यंत वाट पाहून त्यांच्या या उत्तम लेखमालेचा अकाली आणि अपघाती मृत्यू झाला असावा या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले. (मुक्तसुनितांचे नुसते नाव जरी घेतले तरी भाषेचे काय भजे होते ते पहा!) त्यामुळे त्यांच्या ‘बनी’ प्रमाणे आम्हाला नाईलाजाने आमच्या मानसपुत्राला – हणम्याला- कण्हतकुथत जन्म द्यावा लागला. हणम्याने एका हातात आमचे बोट धरुन (आणि दुसर्‍या हाताने आपली ढुंगणावरची घसरणारी चड्डी सावरत – लिखाणाच्या पहिल्या परिच्छेदात असला एखादा शब्द असला की लिखाणाला – ‘सत्यकथे’च्या भाषेत सांगायचे तर – ‘टोक’ येते म्हणे!) आमचा हणम्या आमच्याबरोबर मिसळीच्या हॉटेलात आला त्याची ही कथा आहे. या लिखाणातला आमचा हणम्या तर काल्पनिक आहेच, पण खुद्द आम्हीदेखील फारसे अस्सल नाही. इतर पात्रे आणि संकेतस्थळावरील काही खर्‍याखुर्‍या व्यक्ती यांच्यांत काही साधर्म्य आढळल्यास तो – वेल, योगायोगच समजावा!)

“हणम्या, सांभाळून, नाहीतर पडशील गाढवा वेंधळ्यासारखा! हंगाश्शी! आलास का आत? तर हेच आपले ते जगप्रसिद्ध हॉटेल बरे! बघ कसा झगमगाट आहे, कशी गर्दी आहे ते! असा दणका उडवून द्यावा लागतो, काय समजलास! आणि ते गल्ल्यावर बसलेले मालक बघितलेस का? काय? काय म्हणालास? गबदुल?च च च … तुला अगदीच रे कसे व्यवहारज्ञान नाही? गुटगुटीत म्हणावे हणम्या! शब्द हे शस्त्र असते. ते सांभाळून वापरावे. कर, नमस्कार कर मालकांना. कशाला? अरे इथली पद्धत आहे तशी. हा मालक बाकी राजा माणूस आहे बरं का. श्शू… नको तेथे डोके चालते तुझे! ज्या हॉटेलात जाईन तिथे मी हेच म्हणत असतो हे आत्ताच कशाला आठवायला पाहिजे तुला? गप्प बस बघू. तर मी काय सांगत होतो, माणूस अगदी लाखात एक. बुधवार – शनिवार तर दहा लाखात एक. शास्त्रीय संगीतातला अगदी तज्ज्ञ आहे बरे! काय? असे कोण म्हणते? अरे, कोण म्हणजे काय गाढवा? खुद्द मालकच म्हणतात तसे! तुला नाही का पटत? सांगू का एखादी यमनातली चीज म्हणायला? काय म्हणालास? त्यापेक्षा मी म्हणतो त्यावर विश्वास ठेवलेला बरे? हम्म. आलास म्हणायचा लायनीवर. चल , पुढे चल बघू.
हे बघ, इथे ओळीने बसले आहेत ना ते मालकांचे भालदार-चोपदार. अरे, इतक्या महत्वाच्या हॉटेलाची राखण करायची म्हणजे रखवाली नको का करायला? बरेच आहेत तसे, पण तूर्त दोघांचीच ओळख करुन देतो तुला. हे पहिले. अरे, घाबरु नको हणम्या! चष्म्याच्या वरुन बघत बोलायची सवय आहे त्यांना, त्यात भ्यायचं काय? हे इथले जुने-जाणते बरं का? नाव? नावात काय आहे? आणि मी नाव सांगितलं की तू म्हणायचास की मालकांनी आपल्या गोतावळ्यातल्या आडनावबंधूंचीच वर्णी लावली आहे म्हणून! तर नाव जाऊ दे! हा पाहिलास का त्यांच्या हातातला हातोडा. कशाला? अरे, कवितांची तोडफोड करायला उपयोगी पडतो तो! पाहिलास कसा वजनदार आहे तो. हां, आता गंज चढलाय त्यावर थोडा, पण एखादी परदेशवारी घडली की कल्हई करुन आणतील ते त्याला. काय? त्यांच्या हाताशी असलेले कागद? कविता असतील म्हणतोस त्या? वेडा रे वेडा! अरे, ते कागद आहेत राजिनाम्यचे! ‘सोडतो, सोडून चाललो, संबंध संपले’ असे अधूनमधून म्हणावे लागते हणम्या! त्याशिवाय आपले वजन कसे वाढणार? बघीतलंस का किती वजन वाढलं आहे ते! जग हे असे आहे बघ हणम्या! अजून बच्चा आहेस बघ तू हणम्या!
चला पुढे. हे दुसरे. काय? काय म्हणालास? यांच्या चेहर्‍यावरची रया अशी गेलेली का? आता काय सांगू तुला हणम्या! ही फार मोठी कथा आहे. सांगतोच तुला. एकदा काय झाले , रखुमाईला पंढरीत कोणी विचारेना बरं का. मग तिला आला राग. गेली मग ती फणफणत विठोबाकडे आणि म्हणली, ‘पंढरीनाथा, झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठठला’. विठोबा आपला भोळा. तो म्हणाला, ‘तु पूडे हो रकुमाई, मि एतोच..’ अरे, अरे उच्चार म्हणजे काय? हा सगळा सुद्द्लेखनाचा मामला आहे. पण ते जाऊ दे. मग विठोबा आपले सगळे चंबूगबाळे आवरून एकनाथांना, नामदेवबुवांना ‘अमुचा रामराम घ्यावा’ वगैरे म्हणून आले. आणि आता बघतात तर काय! रुकमाबाई आपली पुन्हा ‘शंकरा’च्या दरबारात रमलेली. तीही आपल्या खर्‍याखुर्‍या रुपासकट बरं का! मग काय करणार बिचारा विठोबा? कुठे जाणार तो? मग त्याच्या तोंडावरची रया जाणारच की! काय, आले का ध्यानात?
बघ, कसा भराभर हात चालतो आहे या दुसर्‍यांचा. काहीतरी माहितीप्रद लिहीत असतील म्हणतोस? छे रे! ‘माहितीची देवाणघेवाण’ म्हटली की थरकाप उडतो बिचार्‍यांचा. ते ना, बसल्याबसल्या नवनव्या स्वाक्षर्‍यांची प्रॅक्टीस करत आहेत. काय करणार बिचारे! स्वतःची अशी फक्त स्वाक्षरीच जमते त्यांना. जाऊ दे, जाऊ दे, त्या स्वाक्षरीतल्या शुद्धलेखनाच्या चुका काढत बसलास तर रात्र होईल इथेच. चल पुढे जाऊ.
हा ताटभर मिसळ समोर घेऊन बसलेला नरपुंगव पाहिलास का? हा आपल्या भीमाचा फिरंगी अवतार बरं का! काय! जेन? तीही मिळेल की त्याला एखादी. हा आपल्या हॉटेलाचा जाणकार बरं का! अगदी ‘पॅसिफिक’ महासागराइतके ज्ञान आहे त्याला. बघ त्याचे बाहू कसे फुरफुरताहेत, बघ त्यांच्या मांडीचे पट कसे वळताहेत, आणि गर्दन तर एखाद्या खोंडासारखी आहे, नाही का? गाणं? कुठल? गाणं आठवलं बुवा तुला? ‘मासूम’ मधलं कुठलं गाणं? आणि त्यात काय स्वतःचे शब्द घातलेस तू? काय? ‘बहुत खूबसूरत है ये बॉडी लेकिन अगर ब्रेन भी होता तो क्या बात होती’.. श्शू… चूप अगदी. एका फटक्यासरशी होत्याचा नव्हता करुन टाकेल तो तुला. गप्प बस अगदी. चल पुढे.
हे पहा आपल्या कपाळावर चार वैचारिक आठ्या चढवून बसलेले मिसळीचे ‘भक्त’. वैचारिकतेचे हे सम्राट बरं का. इतके की जगात कोण वैचारिक आहे आणि कोण सामान्य हे त्यांना म्हणे नुसत्या नजरेने समजते. त्यांच्याभोवतीची ती ‘वर्तुळा’कार आभा पाहिलीस का? जपून हो हणम्या. हळूच त्यांच्या मागून त्यांना वळसा घालून आपण पुढे जाऊ. काय म्हणालास? लाथ मारतील? अरे, ते चालेल एकवेळ. त्यांच्या मागून गेलो तर लाथ मारतील, पुढून गेलो तर मात्र… जाऊ दे. असल्या गुदगुल्या तुला न कळालेल्याच बर्‍या.
काय म्हणालास? पाय दुखायला लागले. बरं बसूया थोडा वेळ. जरा वेळाने इतरांशीही परिचय करुन देईन हो तुझा. भूक ना? मलाही लागली आहेच. काय मागवू? मिसळ?”

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

3 Responses to हॉटेलात आलेली माणसं-१

  1. Smita Chavare कहते हैं:

    apratim lekh,Raavsaheb! mipa aani manogatvar tumche barech lekh vachale aani me tumchi fan zale aahe.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s