‘महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी या संदर्भाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातर्फे श्री. वसंतराव गणपुले यांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. आपल्याला आरोग्याची आणि आनंदाची अनेक वर्षे लाभोत ही महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री श्री. युवराजदादा बोराटे यांच्यातर्फे कामना. ‘
वसंतरावांनी थरथरत्या हातांनी ते पत्र टेबलावर ठेवले. “काय भाषा वारतात हे लोक शोभा! साधं, सोपं मराठी कसं लिहावं हे या सरकारी बाबूंना कधी कळणार कुणास ठाऊक! ” त्यांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला. “आं? काय म्हणालास?” त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसलेल्या शोभाताईंनी विचारलं.”क्काय? ” न्याहारीसाठी त्या उकडलेले एक अंडे कसेबसे संपवण्याच्या प्रयत्नात होत्या. “शोभा, हिअरिंग एड काढून कशाला ठेवतेस ते? लावत जा गं कायम… ” वसंतराव म्हणाले. “तुला ऐकू येईल इतक्या मोठ्यांदा बोलणं जमत नाही मला आता. ” वसंतराव जरासे चिडल्यासारखे झाले होते. “का, काय झालं आता? ” शोभाताईंनी हिअरिंग एड लावून विचारले. वसंतरावांनी चष्मा काढून हातात घेतला. “शोभा, वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्रांच्या ऑफिसमधून अभिनंदनाचं पत्र पाठवणं ठीक आहे. चांगलंच आहे. पण जरा भाषा चांगली वापरा की. चांगली मरू दे, बिनचूक तरी लिहा की. ही काय यशवंतराव चव्हाणांच्या भाषणासारखी काँग्रेसी भाषा… ” ” शांत, वसंतराव, शांत… ” वसंतरावांच्या अंगावरची शाल सारखी करत शोभाताई म्हणाल्या. “शंभरी आली आता तुमची. आली काय, झालीच म्हणा. लहानसहान गोष्टींनी ब्लडप्रेशर वाढवून घ्यायचे दिवस राहिले नाहीत आता. अरे, सरकारी कारभार आहे हा. सरकारी कर्मचाऱ्यांनी भाषेच्या, व्याकरणाच्या चुका करू नयेत ही कसली भलती अपेक्षा तुझी? ” वसंतराव काहीच बोलले नाहीत. शोभाताईंनी ते पत्र उचलले आणि बघितल्या न बघितल्यासारखे करून परत टेबलवर ठेवले. “शंभरी पूर्ण झाल्याबद्दल सरकारी अभिनंदनाचं पत्र. आता तीन वर्षं गेली की तुलाही असं पत्र येईल शोभा. ” घसा साफ करून वसंतराव म्हणाले. “तेवढं आयुष्य द्यावं देवानं मला. काय? ” शोभाताईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य उमटलं. “काय झालं हसायला? ” त्यांनी विचारलं, पण शोभाताई काहीच बोलल्या नाहीत. ‘इतकी वर्षं संसार करून ही बाई कितपत कळाली आपल्याला? हिचं हे असलं हसणं तर आपल्याला आयुष्यभर उमगलंच नाही… ‘ वसंतरावांच्या मनात येऊन गेलं. ‘बट आय स्टिल डोंट अंडरस्टॅंड वुमन…’ फार फार वर्षांपूर्वी बघितलेलं आईनस्टाईनचं कार्टून त्यांना आठवलं.
वसंतरावांच्या शंभरीचा त्यांच्या मुलांनी, नातवंडांनी दणकेबाज बेत आखला होता. गेला आठवडाभर नुसती धामधूम सुरू होती. सगळा बंगला रोषणाईच्या दिव्यांनी लखलखत होता. सगळे नातेवाईक, सगेसोयरे, इष्टमित्र आवर्जून वसंतरावांना आणि शोभाताईंना भेटायला आले होते. अमेरिकेत, युरोपमध्ये शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या वसंतरावांच्या नातवंडांनी आपापल्या रजा, सुट्ट्या तीन तीन वर्षांपासून प्लॅन केल्या होत्या. प्रसिद्धीमाध्यमांना लहानलहान का होईना, मुलाखती देतांना आणि शोभाताईंबरोबर फोटोंसाठी ‘पोझ’ देताना वसंतराव अगदी थकून गेले होते. या मुलाखती, हा समारंभ कशासाठी असा प्रश्न त्यांना अधूनमधून पडत असे. काय केलं आपण आयुष्यात विशेष असं? वयाची शंभर वर्षं पूर्ण केली म्हणून इतका मोठा समारंभ? त्यांना कधी कधी काही कळेनासंच होई. पण आता कुणाला विरोध करून कटुता निर्माण करावी असं काही त्यांना वाटत नसे. आजची मेजवानी हा तर सगळ्या समारंभाचा कळसच होता. बरोबर अकरा वाजता एकमेकाच्या आधाराने वसंतराव आणि शोभाताईंनी मेजवानीच्या हॉलमध्ये प्रवेश केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. करड्या रंगाच्या नव्या सूटमध्ये वसंतराव एखाद्या जुन्या पण चकचकीत पॉलिश केलेल्या प्रचंड लाकडी घड्याळासारखे दिसत होते. थोडेसे थकलेले, पण अजूनही पाठीचा कणा ताठ असलेले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या, हातांवरच्या सुरकुत्या पिकलेल्या आंब्याच्या सालीसारख्या दिसत होत्या.
वसंतरावांचा जन्म सकाळी अकरा वीसचा. मिनिटकाटा चारवर आला आणि हॉलमधल्या मंडळींनी टाळ्यांच्या तालावर ‘हॅपी बर्थडे टू यू.. ‘ म्हणायला सुरवात केली. चांदीच्या सुरीने वसंतरावांनी टेबलवरचा प्रचंड चॉकलेट केक कापला आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. शोभाताईंनी केकचा एक छोटा तुकडा वसंतरावांना भरवला. ‘शुगरबिगरचा विचारही डोक्यात आणू नकोस, शोभा’ वसंतराव मिष्किलपणे म्हणाले. कुणीतरी एक माईक वसंतरावांच्या तोंडासमोर आणून धरला. ‘बोला, काहीतरी सर.. ‘ तो म्हणाला. कुणीतरी जुना विद्यार्थी असावा.
वसंतरावांनी आधारासाठी शोभाताईंकडे बघीतलं. ‘बोल, चार शब्द. ‘ त्या म्हणाल्या.
“आवर्जून सगळे आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. ” वसंतराव म्हणाले. त्यांना आता खरंच फार थकल्यासारखं वाटत होतं.
त्यानंतरची त्यांचा सन्मानाची, गौरवाची भाषणं, जंगी खाना हे सगळं वसंतरावांच्या मनात एखाद्या धूसर स्वप्नासारखं सरकून गेलं. पाहुण्यांचे आभार मानताना त्यांच्या नातवानं ‘आता तीन वर्षानं पुन्हा सगळे अशाच एका कार्यकर्मासाठी भेटू. आजीच्या शंभरीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्हाला आत्ताच देऊन ठेवतो… ‘ असं म्हटलेलं बाकी त्यांना स्पष्टपणे आठवत होतं.
रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या वसंतरावांनी शोभाताईंचा हात हातात घेतला. “आयुष्य तसं बरं गेलं, नाही का शोभा? लहानपण गरीबीत गेलं, तरुण वयात जबाबदाऱ्या होत्या, पण आता म्हातारपणी वाटतंय की काही फार वाईट जगलो नाही आपण… ”
“तू असशील म्हातारा, वसंता. ” शोभाताईंनी फणकाऱ्याने त्यांचा हात वसंतरावांचा हातातून काढून घेतला. “मला नाही हो म्हातारीबितारी म्हटलेलं चालणार. मला अजून परतवंडं बघायचीयत, त्यांना मांडीवर खेळवायचंय, जोजवून झोपवायचंय, त्यांची दृष्ट काढायचीय.. ”
वसंतरावांनी सुस्कारा सोडला. “वानप्रस्थाश्रम वगैरे काही तुला पटत नाही असं दिसतंय, शोभा. संसारात अजून तू अडकलेली आहेसच. मला बाकी तुझ्या शंभरीला तुला आलेलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनाचं पत्र बघायचंय फक्त. तुझी शंभरी बघीतली की मी मरायला मोकळा झालो बघ.. ” वसंतरावांचा आवाज बारीक झाला होता.
“पण माझ्या शंभरीला असले सोहळे नकोत रे बाबा. तुला हौस आहे मिरवून घ्यायची, पण मला नकोत असल्या काही पंगतीबिंगती. साधी, घरगुती करावी शंभरी. तीही नाही केली तरी चालेल अगदी. ” शोभाताई म्हणाल्या. पण वसंतरावांना झोप लागली होती. हात लांबवून शोभाताईंनी दिवा बंद केला. ते वृद्ध जोडपं झोपी गेलं.
———————————————————————————————-
मधल्या तीन वर्षांत फारसं काही झालं नाही. वसंतराव आणि शोभाताई जितके व्हायचे तितके म्हातारे झाले. शोभाताईंच्या मांडीवर त्यांचं पहिलं परतवंड खेळलं. शोभाताईंचा वाढदिवस येतायेता वसंतराव अगदीच थकले. शोभाताईंची शंभरी अगदी त्यांच्या इच्छेनुसार अगदी घरगुती स्वरुपात पार पडली. गणपुल्यांचे अगदी घरचे लोक सोडले तर कुणाला निमंत्रणंच पाठवली नव्हती. तरीही शोभाताईंना शंभराच्या वर शुभेच्छापत्रं आली. वसंतरावांनी त्यातलं प्रत्येक पत्र थरथरत्या हातात मोठं भिंग घेऊन वाचलं. ‘मुख्यमंत्र्यांचं पत्र काही नाही आलं शोभा’ ते पुन्हा पुन्हा हेच म्हणत होते. “वसंता, म्हातारचळ लागलाय रे तुला, म्हातारचळ. अरे, असलं काहीतरी चालू करतात लोक निवडणुका तोंडावर आल्या की. मध्यंतरी सरकार बदललं नाही का? आताच्या सरकारच्या लक्षातसुद्धा नसेल असलं काही ” शोभाताई समजूतदारपणामं एकदोनदा म्हणाल्या.
आज सगळे पाहुणे परत गेले होते. वसंतरावांना सकाळपासूनच एकटंएकटं वाटत होत. तरीही ते कसली तरी वाट बघत होते. थोडेसे अधीर होऊन. गुरुवार होता. प्रत्येक गुरुवारी वसंतरावांची गावातच राहाणारी नात आजीला देवळात घेऊन जायला येत असे. संध्याकाळी बाहेर जायची हल्ली शोभाताईंनाही भीती वाटत असे, म्हणून सकाळीच त्या दोघी देवळात जात असत. त्याप्रमाणे वसंतरावांची नात आली. शोभाताई आताशा घरात फिरताना काठी वापरत असत, पण बाहेर जाताना बाकी त्या ती घेत नसत. त्याप्रमाणं त्या निघाल्या. “आमच्याकडं लॅचची किल्ली आहेच, आजोबा. येतोच आम्ही तासाभरात. तुम्ही काय करताय? ” वसंतरावांच्या नातीनं विचारलं. “काही नाही गं. टीव्ही बघतो जरा वेळ. या तुम्ही सावकाश.. ” वसंतराव म्हणाले. त्या दोघी गेल्या. फाटक लावून घेतल्याच ‘दण्ण’ असा आवाज आला आणि वसंतरावांनी शेजारचा टेलीफोन उचलला. थरथरत्या हाताने त्यांनी बरेच प्रयत्न करून मिळवलेला आणि त्याहूनही अधिक प्रयत्न करून लक्षात ठेवलेला नंबर फिरवला.
“नमस्कार. जनसंपर्क कार्यालय.. ” पलीकडच्या माणसाच्या आवाजातलं मार्दव वसंतरावांना सुखावून गेलं.
“नमस्कार. मी वसंत गणपुले बोलतोय.. ” वसंतराव म्हणाले. “माझं वय आता एकशे तीन आहे.. ” त्यांना थोडासा दम लागला होता.
“बोला, सर, बोला.. ” पलीकडच्या माणसाच्या आवाजात आता आदरही होता. ‘हे ‘सर’ म्हणणं बाकी फक्त आपल्या वयामुळं असावं’ वसंतरावांच्या मनात येऊन गेलं. त्यांनी घसा साफ केला.
“हे बघा, मला शंभर वर्षं पूर्ण झाली तेंव्हा मला मुख्यमंत्र्यांचा सहीचं अभिनंदनाचं पत्र आलं होतं.. ” ते म्हणाले.
“बरोबर, सर. आमच्याच कार्यालयाकडून आलं असणार ते. ”
“हं.. तर मला आता असं विचारायचंय की ही पद्धत तुम्ही बंद का केली? ”
“बंद? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर… अजूनही शंभरी पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आमच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र जातंच. ही पद्धत सुरू आहे, सर. ”
“बर. मग मला असं सांगा, की गेल्या आठवड्यात माझ्या पत्नीचा शंभरावा वाढदिवस झाला. तिला का नाही आलं हे मुख्यमंत्र्यांचं पत्र? ” वसंतरावांनी विचारलं
“असं होणार नाही, सर.. ” पलीकडचा माणूस गोंधळला असावा. “शंभरी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे प्त्र जातं. इन फॅक्ट, ही पत्रं एक महिना आगोदर पाठवली जातात; वेळेवर मिळावी म्हणून .. ”
“मग हे पत्र कसं काय नाही आलं? ” वसंतरावांचा आवाज थोडासा चढला होता. शंभरी पूर्ण केलेल्या माणसाचा जितपत चढू शकेल तितपतच.
” एक मिनिट सर, मी चेक करतो. जरा आपल्या पत्नीचं नाव सांगता का प्लीज? ”
“शोभा वसंत गणपुले.. ” वसंतराव म्हणाले.
“एकच मिनिट हं सर, प्लीज होल्ड ऑन.. ” पलीकडच्या माणसानं फोन होल्ड मोडवर टाकला असावा. बासरीची सुरेल धून सुरू झाली. ‘भटियाळी.. पन्नालाल घोष’ वसंतरावांच्या मनात आलं. ‘सरकारी अभिरुची सुधारली म्हणावी का काय… ‘ ते भटियाळीत गुंगून गेले….
“हॅलो.. ” वसंतराव भानावर आले.
“हं, बोला.. ” ते म्हणाले.
“माफ करा हं सर, तुम्हाला थांबावं लागलं, पण आमची सिस्टीम जरा स्लो आहे आज… ” पलीकडचा माणूस म्हणाला.
“असू दे, बोला” वसंतराव म्हणाले.
“मिस्टर गणपुले, तुम्हाला माहिती असेल, की आमच्या खात्याकडं प्रत्येक व्यक्तीची खरीखुरी जन्मतारीख असते, अगदी पुराव्यासकट. आणि त्यानुसार वयाची शंभर वर्षं पूर्ण झाली, की आम्ही त्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या सहीचं अभिनंदनाचं पत्र पाठवतो.. ”
“बरोबर. मग? ”
“शोभा.. आपलं शोभाताई वसंतराव गणपुले, ‘श्रीकृपा’ बंगला, सहयोग सोसायटी, विद्यानगर .. या आपल्या पत्नी. बरोबर ना सर? ”
“होय. ” वसंतराव आता थोडेसे कंटाळल्यासारखे झाले होते.
” तर यांना त्यांच्या शंभरीनिमित्त अभिनंदनाचं पत्र गेलं आहे, सर. माझ्याकडे इथे नोंड आहे बघा, सर.. ”
“पत्र पाठवलं आहे म्हणता, तर मग ते आम्हाला मिळालं कसं नाही? ” वसंतराव आता फोन ठेवण्याच्या विचारात होते.
“असं असणार नाही, सर, असं होणार नाही. आमच्या इथे तशी नोंद आहे सर. पण.. तुम्ही म्हणताय की.. सर, आमच्याकडच्या नोंदीनुसार हे पत्र गेलं आहे सर एकोणीस नोव्हेंबरला. एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पाच. म्हणजे पाच वर्षांपूर्वी, सर.. ”
वसंतराव मिष्किलपणाने हसले. ‘थँक यू. थँक यू, व्हेरी मच…. ” त्यांनी फोन ठेवला. फाटकाचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून बाहेर बघितलं शोभाताई देवदर्शन आटोपून परत आल्या होत्या.
(जेफ्री आर्चर यांच्या ‘दी क्वीन्स बर्थडे टेलिग्राम’ या कथेचा स्वैर अनुवाद)
MAST RE MAST
मस्तच एकदम. मुळ गोष्ट आधी वाचलेली त्यामुळे अजुन गंमत आली
धन्यवाद