जुना काळ

गावात अठरापगड जातींचे लोक होते. जैन, मराठा, धनगर, लिंगायत माळी या त्यातल्या जाती प्रमुख. महार, मांग, ढोर, पिचाटी हे त्यांच्या खालोखाल. ब्राह्मणांची आणि मुसलमानांची मोजकी घरे. ख्रिस्ती, पारशी वगैरे कुणी नाहीच. एखाद्याचे नाव दुसर्‍याच्या नावापेक्षा पेक्षा वेगळे असावे, तितकेच गावात जातीचे महत्त्व होते. आर्थिकदष्ट्या मागासलेल्या गटाचा दाखला भरताना शाळेतल्या मुलांना त्यात जातीचा उल्लेख करावा लागे. त्यापलीकडे रोजच्या जगण्यात जातीचा काही संबंध येत नसे. शाळेतल्या वर्गात ब्राह्मणाची मुले त्यातल्या त्यात हुषार होती. पण त्यावरुन स्फोट व्हावे असे त्याचे कुणाला काही वाटत नसे. ब्राह्मणांची काही मुले त्यातल्या त्यात शुद्ध बोलत आणि ब्राह्मणांच्या मुली स्वत:विषयी बोलताने ’मी येते, मी गेले, मी बघीतले’ असे म्हणत. बाकी तमाम लोक, अगदी मुलीसुद्धा  ’येतो, जातो, खातो’ अशी क्रियापदे वापरत.. ब्राह्मणांची काही मुले बाकी कुणब्याच्या मुलांपेक्षा अधिक कळकट आणि घाणेरडी राहात आणि तशीच शिवराळ, अशुद्ध भाषा बोलत. रोजच्या जगण्याचा आणि जिवंत राहाण्याचा संघर्ष इतका प्रखर होता की तुझी जात- माझी जात, तुझी भाषा-माझी भाषा असा वगैरे  विचार करत बसणे कुणाला फारसे परवडण्यासारखे नव्हते. पण तरी कुणी कसे राहावे, कसे वागावे याबाबत गावाच्या कल्पना स्पष्ट, आखीव होत्या. गावातली पाटीलकी, कुळकर्णीपण संपले होते, पण या कुटुंबांना गावात मान होता. गावातले जुने म्हातारे पाटील आणि कुळकर्णी यांच्या शब्दापुढे जाण्याची अगदी त्या वेळच्या नवीन पिढीचीही शामत नव्हती. गावातले म्हातारे कुळकर्णी संध्याकाळी त्यांच्या नातवाचा हात धरुन हळूहळू चालत मळ्याकडे निघाले की रस्त्यावरुन येणाराजाणारा त्यांना आदराने रामराम करत असे. ’दिवाणजी, मळ्याकडं निगालायसा? बर, बर..बरं हायसा न्हवं?’ अशी चौकशी करत असे. गावातले लहानसहान तंटे गावचे पाटील सोडवत असत आणि त्यांच्या शब्दांचा अनमान करण्याची कुणाची हिंमत नसे. या सगळ्याच्या बदल्यात या सगळ्या कुटुंबाना सूक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखे आयुष्य जगावे लागे. रस्त्यावरच्या चिंचेच्या झाडावर दगड फेकणार्‍या कुळवाड्याच्या पोरांकडे कुणाचे लक्षही जात नसे, पण पाटील-कुळकर्ण्यांच्या मुलांना असले काही करण्याची मुभाच नव्हती.
गावातले मुसलमान मोहरमचे पीर बसवत पण त्या पिरांची नावे शिवगोंड पाटील पीर, चावडी पीर अशी हिंदू होती. पिराच्या दर्शनाला सगळा गाव लोटत असे आणि पीर अंगात येणारे  बहुतेक लोक तर बिगर मुसलमानच होते. असंख्य वस्त्रांनी जड झालेला तो पिराचा ताबूत ’तडतड तडतड’ वाजणार्‍या ताशामागे धुपाचा दरवळ घेऊन आमच्या दारात येत असे आणि पिराच्या पायावर पाणी घालायला आणि अंगात आलेल्या माणसाच्या पायावर डोके ठेवायला एकच गर्दी उडत असे. शिवगोंड पाटील पिराच्या आणि चावडी पिराच्या विसर्जनाच्या दिवशी प्रसादाचे सरबत आमच्या घरुन जात असे. दुपारची झोप झाली की माझे वडील दोन घागरी भरुन सरबत तयार करत असत. सरबत म्हणजे काय, तर भरपूर गूळ, सुंठ आणि बडीशेपेची पूड घालून केलेले पातळसर पाणी. मग मशीदीतून कुणी मौलवी एकदोन माणसांबरोबर हातात धुमसत्या नाडापुड्या आणि समोर तो धुंदी आणणारा ताशा घेऊन ते सरबत न्यायला येत असे. पीर हे कुण्या जातीचे नव्हे, तर सगळ्या गावाचेच दैवत होते. सगळ्या जातीचे लोक पिराला नवस बोलत. मला आठवते, आमच्या नव्या विहिरीचे खोदकाम सुरु होते आणि विहिरीला पाणी लागू दे, मग तुला चांदीचा नाल चढवीन असा  वडीलांनी नवस बोलला होता. सुदैवाने विहिरीला भरपूर पाणी लागले आणि तो नवस फेडायला आम्ही घरातले सगळे वाजतगाजत शिवगोंड पिराच्या मशीदीत गेलो. वडीलांनी तो चांदीचा नाल पिरावर चढावला आणि समोर उभ्या असलेल्या माळ्याच्या फणफणून अंगात आले. मशीदीतल्या त्या कुंद, भारलेल्या वातावरणात तो घुमायला लागला. अंगात आलेल्या माणसाचे शब्द काही कळत नव्हते, पण ’तुझे बरे होईल, भले होईल, पोरेबाळे खुशाल राहातील, तुझी शेते पिकतील, तुझ्या वडीलांच्या प्रकृतीला आराम पडेल’ असे काहीसे तो  मुसलमानी हिंदीत म्हणत  होता. तो उदबत्त्यांचा वास, ती गर्दी, पिरावर चढवलेला तो चांदीचा लखलखीत नाल आणि त्या ताशाच्या तडतडीच्या पार्श्वभूमीवर त्या पीर अंगात आलेल्या लालबुंद डोळ्यांच्या आणि असंख्य घागरी पाणी सतत पायावर घेतल्यामुळे आणि गावभर अनवाणी हिंडल्यामुळे फुटक्या टाचांच्या  माणसाचे कळणारे-न कळणारे शब्द मला आजही आठवतात आणि अंगावर सरसरुन काटा येतो. पिरांच्या विसर्जनाच्या दिवशी तर सगळा गाव बेभान होऊन नाचत असे. स्वत:भोवती गिरक्या घेणारे पीर एकमेकांना स्पर्श करत आणि ’पिरांच्या ’भेटी’ झाल्या” असे लोक म्हणत’. रात्री पिराच्या मैदानात ’खाई’ होई. संध्याकाळपासूनच त्या मैदानात एका उथळ, आयताकार खड्ड्यात मोठमोठी लाकडे पेटवली जात. रात्रीपर्यंत तो खड्डा रसरसत्या निखार्‍यांनी भरुन जात असे. ते इंगळी अंगार फुलले की मग त्यावरुन पिराचे उपासक इकडून तिकडे पळत जात. कुणी हातात ओंजळभर निखारे घेऊन ते वर उधळत असे. ’खाई’ खेळणार्‍या कुणाला कधी भाजले असे माझ्या तरी स्मरणात नाही. रात्री उशीरपर्यंत लोक खाई खेळत आणि अंगाभोवती गोधड्या, कांबळी गुंडाळून विस्मयभरल्या नजरेने प्रेक्षक ती खाई बघत असत. पिराच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री दहा-अकराच्या सुमाराला वाजतगाजत नदीच्या दिशेने जाई आणि गाव विलक्षण शांत, मोकळा मोकळा वाटू लागे. रात्री उशीरा कधीतरी मिरवणुकीत नाचणारे मुसलमान पिराचे विसर्जन करुन परत येत आणि येताना गंभीर, खर्जातल्या आवाजात काहीतरी प्रार्थनेसारखे, मंत्रासारखे म्हणत. गावातल्या शांत, थंड हवेत शे-दोनशे लोकांनी खालच्या सप्तकात म्हटलेले ते स्वर ऐकताना हुरहुरल्यासारखे होत असे. थोडी भीतीही वाटत असे.
गावात सर्वात जास्त घरे जैनांची. जैन समाज हा भगवान महावीरांचा उपासक. गावात दोन जैनबस्त्या होत्या. जैनांची पूजा-अर्चा त्या बस्त्यांमध्ये चालत असे. जैन लोक कष्टाळू आणि पैशाला चिकट. धोतराला ठिगळे जोडून, गाठी बांधून ते वापरतील. स्वत:च्या पैशाने कुणाला कधी अर्धा कप चहा पाजणार नाहीत. पण घरात पाच पाच लाखाचे सोने बाळगतील.  गावातल्या कुणाची (बहुदा गाव सोडून शहरात जाणार्‍या एखाद्या ब्राह्मणाचीच) जमीन विकायची झाली तर जैनाचा आकडा सगळ्यात मोठा असे. जैनांच्यात खास जैनी आडनावाचे लोक होते. टारे, भबुजे, भगाटे, आवटे, कुगे, कर्‍याप्पा, चकोते, टेंगिनकिरे, हातगिणे असली खडबडीत, ओबडधोबड आडनावे. पाटील समाजातल्या बहुतेक मुलांची नावे ’गोंडा’ हा प्रत्यय जोडलेली असत. भीमगोंडा, पायगोंडा, नरसगोंडा, बाबगोंडा अशा नावाची माझ्या वर्गात मुले होती. बाकी मुले चंद्या, शंकर्‍या, विज्या, रावशा, भरत्या अशा नावाची. मुली छ्बू, मंगल, राजी, रुकमी अशा नावाच्या. एकूण गावावर आणि गावातल्या लोकांवर एक उग्र, खडबडीत कळा होती. नदीच्या काठावर वसलेले निसर्गाच्या कुशीतले, प्रेमळ, साध्या, देवभोळ्या लोकांचे पुस्तकातल्या कवितेतले गाव आणि आमचे गाव याचा एकमेकांशी काही संबंधच नव्हता. आमच्या गावातले लोकही तसेच उग्र, मळकट दिसणारे होते. वाढलेल्या दाढ्या, पानतंबाखू खाऊन लालपिवळे झालेले दात, अंगाला एक गावठी दर्प , फाटके, मळके कपडे आणि तोंडात शिवराळ कानडीमिश्रित भाषा असे गावातल्या माणसांचे एकूण रुप असे. बायका एकजात चोपलेल्या, पोराबाळांचे लेंढार सांभाळणार्‍या आणि सासू, नवरा आणि नणंदा यांच्याकडून होणार्‍या छळाने सुकून गेलेल्या असत. गावात जातपात फारशी नव्हती, पण किरकोळ कुरबुरी चालूच असत. त्यांचे कारणही जगण्याचा मूलभूत झगडा असेच असे. कुणाचे पोटरीला आलेले जोंधळ्याचे पीक रातोरात कुणी कापून नेई, कुणाच्या शेतातला बांध कुणी दोन सर्‍या सरकवून घेई आणि बांधावर असलेल्या लिंबाच्या, आंब्याच्या झाडावरुन तर सतत भांडणे होत. हे शेतकरी भांडणे गावात सुटली नाहीत की तालुक्याला जाऊन एकमेकांविरुद्ध कज्जे घालत आणि वकिलांच्या संसाराची सोय करत. वर्षानुवर्षे हे कज्जे चालत आणि तारखेला तालुक्याला गेलेले  वादी-प्रतिवादी संध्याकाळी एकाच येष्टीने तालुक्याहून परत येत. बहुदा पुढची तारीख पडलेली असे. येष्टी ष्ट्यांडावर उतरुन हे वादी प्रतिवादी एकमेकांकडे तांबारल्या नजरेने बघत, खाकरुन धुळीत थुंकत आणि मिशीवर मूठ फिरवत अंधारात आपापल्या घरांकडे चालू लागत. हे वर्षानुवर्षे होत राही…
गावाचे ग्रामदैवत भैरोबा होते. भैरोबा हा धनगरांचा देव. गावाबाहेरच्या देवळात भैरोबाचा उग्र मुखवटा होता. तो नेमका कसा होता हे बाकी कधी दिसले नाही. कारण गाभार्‍यात प्रचंड अंधार असे. श्रावणातल्या तिसर्‍या रविवारी भैरोबाची जत्रा असे. देवाची गावभर पालखी निघे आणि खारीक-खोबरे उधळायला आणि देवाचे दर्शन घ्यायला मोठी गर्दी होत असे. पालखीसमोर भलीमोठी सासनकाठी तोलत धनगर नाचत असत आणि देवावर उधळलेल्या भंडार्‍याने सगळे वातावरण भगवे-पिवळे होऊन जात असे. भैरोबा हे जागृत दैवत आहे, असा गावाचा विश्वास होता. मुले न होणारी जोडपी भैरोबाला ’मूल होऊ दे, तुझ्या कळसावरुन त्याला खाली टाकीन’ असला क्रूर, न समजण्यासारखा नवस बोलत. एकदोन वर्षात तो नवस फेडायला ते जोडपे येत असे. बरोबर असलेल्या लवाजम्यात एक कुंची घातलेले आणि काजळाने डोळे बरबटलेले तान्हे बाळ असे. मग एकदोन माणसे देवाच्या कळसावर चढत. दोनपाच माणसे एक दणकट चादर चारी बाजूनी हातात पकडून हात वर करत आणि मग ती कळसावर चढलेली माणसे त्या तान्ह्या बाळाला अलगद त्या चादरीत सोडून देत. ते अंतर चारपाच फुटाचेच असे, पण ते दृष्य बघताना काळजात धस्स होत असे. ते लहानगे बाळ त्या धक्क्याने कळवळून रडायला लागे आणि सगळे बघे ’भैरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या आरोळ्या देत. रासवट, अडाणी पण चोख श्रद्धेच्या ललकार्‍या उठत. श्रावणात हवा पावसाळी कुंद असे आणि त्या तसल्या आजारी हवेतच देवळाकडे जाणार्‍या वेड्यावाकड्या उंचसखल वाटेवर जत्रेतील दुकाने, हॉटेले थाटलेली असत. भजी, जिलबी, बत्तासे, भेंडबाजे असले गावठी चवीचे पदार्थ त्या हॉटेलांत मिळत असत. एक घोट घेतला की थुंकून टाकावा असे वाटावे इतका गोड चहा गावातले गावडे पुन्हापुन्हा पीत असत. त्यावर चरचरीत तंबाखूचे पान खात नाहीतर कडक वासाच्या गावठी बिड्या ओढत. पानाच्या पिचकार्‍यांनी आणि बिडीच्या कडवट वासाने सगळे वातावरण अफिमी होत असे. भैरोबाच्या जत्रेच्या निमित्ताने गावात बैलगाड्यांच्या शर्यती होत, सुदृढ जनावरांच्या स्पर्धा होत आणि जत्रेच्या दिवशी रात्री माळावर तमाशाचा फड रंगत असे. या तमाशाची पटकथा कुणी सेन्सॉर केलेली नसे आणि असली तरी त्या तमाशात काम करणारे नट त्यात ऐन वेळी हशा पिकवण्यासाठी पदरची इतकी वाक्ये घालत, की त्या मूळ कथेला  काही अर्थच राहिलेला नसे. भडक मेकप केलेल्या रावणासमोर उभा असलेला, किंचित पोट सुटलेला कोदंडधारी राम ’रावण्ण्ये, तुजायला लावला घोडा…’ असे म्हणून जबरदस्त हशा घेत असे आणि त्यात कुणाच्या भावना वगैरे दुखावत नसत. पुढे नाचणार्‍या बायका आल्या की मग तर काय प्रेक्षकांत लैंगिकतेचा सामुदायिक उद्रेकच होत असे. प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्यांबरोबर जे शेरे मारले जात, ज्या फर्मायशी केल्या जात त्याने आजही नागर मंडळींच्या कानातले केस जळतील. पण त्या नाचणार्‍या बायकांना आणि इतर तमासगीर मंडळींना त्याचे काही नसे. तसेच अश्लील विनोद होत, सुमार रुपाच्या आणि सुमार बांध्याच्या बटबटीत मेकप केलेल्या बायका तशाच नाटकीपणे नाचत राहात आणि जनता चेकाळून चेकाळून तमाशा बघत राही.
गावातले बरेचसे लोक शेतकरी होते. दोनपाच किराणा मालाचे  दुकानदार, एखादे सायकल दुकान चालवणारा, एकदोन चहाचिवडा देणारी हॉटेले चालवणारे आणि मग इतर बारा बलुतेदार. नोकरी करणारे बहुतेक लोक प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. गावात असलेले एक डॉक्टर आर.एम.पी. पदवीधारक होते आणि दुसर्‍या एका कम्पाऊन्डरने एका मोठ्या डॉक्टरकडे उमेदवारी करुन कसलीही पदवी नसताना स्वत:चा दवाखाना सुरु केला होता. तो लोकांना भसाभस इंजेक्शने टोचत असे आणि त्याच्या हाताला गुण आहे असा समज असल्याने त्याच्या दवाखान्यात तोबा गर्दी होत असे. गावात सतत रोगराईच्या साथी असत. पिण्याच्या पाण्याचे हाल असल्याने पोटाच्या विकारांने, जंतांने आणि नारुने लहान मुले पिडलेली असत. देवीचे जवळजवळ उच्चाटन झालेले होते, पण गोवर, कांजिण्या, डोळे येणे आणि पाचवीला पुजलेला ताप यांनी मुले हैराण झालेली असत. दवाखान्यात येणारे बरेचसे लोकही या ’थंड, ताप, डोसकं’ अशा आजाराने ग्रस्त असत. म्हातारी माणसे दमा, क्षय आणि पक्षाघाताने – गावाकडे त्याला ’लकवा मारणे’ असा शब्दप्रयोग होता- मरायला टेकलेली असत. बायकांची अवस्था तर फारच केविलवाणी असे. जेमतेम पदर येतो न येतो तोच होणारे लग्न, लागोपाठ होणारी मुले, अपुरा आणि नि:सत्व आहार आणि सतत दडपून, कुचमत जगावे लागणारे आयुष्य यामुळे त्या विझून गेल्यासारख्या दिसत. तिशीच्या आत बयाच बायका जख्ख म्हातार्‍या दिसायला लागत, आजाराने ग्रासत आणि झिजून झिजून मरुन जात. जननमार्गाचे आजार, मूळव्याध, अवघड जागी होणारी करटे अशा आजारांबाबत तर संकोच आणि अडाणीपणा यामुळे वर्षानुवर्षे यातना सहन करत त्या जगत असत. हसतमुख, प्रफुल्ल चेहयाचे लोक अगदी अभावानेच बघायला मिळत. तरुण लोकांमध्ये ’दारु पिऊन मरणे’ वाढत चालले होते. चांगल्या, सुसंस्कृत कुटुंबातली मुलेही बघताबघता दारुच्या आहारी जात आणि लवकरच सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवरुन झिंगायला लागत. त्याच्या घरचे लोक त्याला मारहाण करणे, कोंडून घालणे, दारु सुटावी म्हणून त्याच्या जेवणातून काही देशी औषधे घालणे  आणि अगदी हमखास म्हणजे वेगवेगळ्या देवांना वेगवेगळे नवस बोलणे असले उपाय करत. ती तरुण मुले अंधारलेल्या डोळ्यांनी आणि भकास चेहयाने सकाळीसकाळी दारुच्या शोधात निघालेली दिसली की त्यांच्या मनातला त्यांनी मदतीसाठी चालवलेला आक्रोश ऐकू येत असे. मन कालवल्यासारखे होई. पुढे काही दिवसांनी त्यांच्यातला कुणीतरी गेला असे कळत असे आणि त्याची पांढया कपाळाची तरुण विधवा कुणासमोर तरी बसून रडताना दिसे.
गावातले मरण हे गावातल्या जगण्याइतकेच भीषण होते. घरातले माणूस मेल्यानंतर जितका आक्रोश जास्त तितकी आपली त्या माणसावरची माया जास्त असे लोकांना वाटते, असा सर्वमान्य समज होता. जिवंतपणी एखादी म्हातारी अर्ध्या भाकरीला आणि कोपभर चहाला महाग झालेली असे, पण ती मेल्यावर तिच्या घरात तिच्या लेकीसुनांनी उंच आवाजात चालवलेली रडारड ऐकून वैफल्य येत असे. ’कुटं गेलीस गं माजे बाई… आता मी आई कुनाला म्हनू गं… माज्या हातच्या पोळ्या आता कुनाला खायाला घालू गं…’ असा तो नाटकी उद्रेक आठ-दहा दिवस चालू राही. परगावाहून त्या बाईच्या बहिणी – मावळणी सांत्वनासाठी येत. येष्टी बसमध्ये कडेवरच्या लेकराला भिस्कुट भरवणारी आणि आपल्या पदराने त्याचा शेंबूड पुसणारी बाई येष्टीतून उतरताच जादू व्हावी तशी झिंज्या सोडून कालवा करायला लागे. ’तुला बगायला आलो की गं.. आता कुटं तुला बगू गं….’ अशी कडवी म्हणत अंगावरच्या लुगड्याचा पदर मातीत लोळवत ती बाई रडत-लोळत तिच्या घराकडे जायला लागे आणि तिच्या कडेवरचे लेकरु आतापर्यंत बर्‍या असलेल्या आपल्या आईला अचानक काय झाले हे न कळाल्याने भेदरुन आंग काढी. मुसलमान आणि लिंगायत समाजात मृत व्यक्तींचे दफन केले जाते. लिंगायत समाजात मृतदेहाला खुर्चीवर बसवून दफनभूमीपर्यंत नेले जाई आणि गुलाल उधळलेला, मान लटलट हलणारा तो मृतदेह डोळ्यांसमोरुन बरेच दिवस हलत नसे. काही शेतकर्‍यांचे दफन त्यांच्या शेतातच होत असे आणि मग त्यावर वर्षा-सहा महिन्यांत त्यांच्या मुलांपैकी कुणीतरी दगडी समाधी बांधत असे. हिंदूंची स्मशानभूमी गावापासून दोनतीन किलोमीटर दूर, नदीच्या काठावर होती आणि पावसाचे दिवस असले की कुणाला जास्त झाले म्हटले की लोकांच्या पोटात गोळा येत असे. वरंधार पावसात, चिखल तुडवत ती तिरडी नदीकाठी न्यायची आणि कसलाही आडोसा नसलेल्या ठिकाणी अर्ध्या ओल्या सरणावर  ते दहन करायचे म्हणजे इतरांच्या दृष्टीनेही मरणच होते. एरवी अंथरुणावर खितपत पडलेल्या एखाद्या दुर्लक्षित म्हातार्‍याचा रक्षाविसर्जनाचा –राख सावडण्याचा- कार्यक्रम बाकी जोरात होत असे. शे-पाचशे लोक जमत, त्या म्हातार्‍याच्या आवडीचे पदार्थ आणले जात – त्यात कधीकधी मटण आणि दारुही असे – पिंड मांडला जाई आणि कावळा शिवला की हुकमी हुंदके देऊन त्या म्हातार्‍याचे नातेवाईक एकमेकांच्या मानेवर डोकी टाकत. हे सगळे नाटक अगदी व्यावसायिक वाटावे अशा सफाईने केले जाई. दोनपाच महिने जात आणि त्या म्हातार्‍याच्या नावावर असलेल्या जमीनीच्या मालकीवरुन त्याच्या वारसांमध्ये भांडणे सुरु होत.
गावात लैंगिकतेची ओळख अगदी कमी वयात होत असे. भाद्रपदात गल्लीगल्लीत हेंडकुळे लागत आणि जुगलेली कुत्री उलटी होऊन सुटी होण्यासाठी धडपडत. अशा कुत्र्यांना दगड मारण्यार्‍यांची लैंगिक विकृती आज समजल्यासारखी वाटते. लैंगिक संबंधाची ओळखही न झालेली मुलेही असे करण्यात पुढे असत. (फ्रॉईडची मते त्या वेळी वाचलेली नव्हती!) उकीरड्यावर किडे टिपणार्‍या गावठी कोंबड्यांतील एखादा तुर्रेबाज नर अचानक तिरकी तिरकी धाव घेई आणि ’क्वॅक क्वॅक..’ असे ओरडत, पायातल्या पायात धडपडत पळणार्‍या कोंबडीची मान चोचीत धरुन तिच्यावर चढे. दोनचार सेकंद पिसांचा धुरळा उठे आणि मग तो नर त्या कोंबडीला सोडून परत दाणे, किडे टिपायला लागे. दावणीच्या गाई, म्हशी माजावर – गावाकडच्या भाषेत ’वाफेवर’- आल्या की चारा खाणे सोडून अस्वस्थ होऊन हंबरत आणि पायांनी जमीन उकरत निरणातून सोट गाळत. त्यांच्या डोळ्यांत वासनेचे ते आदिम मूक थैमान दिसत असे. मळ्यातली गडीमाणसे अशा जनावरांना पहाटेपहाटे ’गाभ घालवायला’ गावाबाहेर घेऊन जात असत. लक्कडकोटात त्या गाई, म्हशींना बंद केले की वळूला किंवा रेड्याला मोकळे केले जाई. आपला वरचा ओठ वर वळवून, नाक फेंदारुन तो नर त्या मादीचा कामसुगंध हवेतून शोषून घेई, मग धडपडत आपले वरचे पाय उचलून त्या मादीवर चढत असे. त्याच्या हातभर लांबीच्या लालपिवळ्या सोटाखाली त्या माद्या वाकत,  तोंडाचा आ वासून सुस्कारे टाकत. तो नर नवखा असला तर त्याला हा संभोग नीट जमत नसे. मग आसपास उभी असलेली जाणकार माणसे त्याला मदत करीत. ती कोवळी मादी, तो हपापलेला, कामधुंद नर आणि त्या परमैथुनातून सुख मिळवणारी ती रांगडी, गावठी माणसे असे जणू वासनेचे एक लालभडक, जळते, एकसंध, सलग फिरणारे वर्तुळ तयार होत असे. असा तो नर दोनचार वेळा त्या मादीला जुगला – त्याला दोनचार ’काठ्या’ लागणे असा ग्राम्य पण चपखल शब्दप्रयोग होता – की मग तो कामतृप्त झालेला नर त्या मादीवरुन उतरत असे आणि ती थकलेली पण अत्यंत समाधानी मादी हळूहळू चालू लागे. जणू स्वत:चेच स्खलन झालेले असावे अशा आविर्भावात आसपासचे लोकही पांगत. हे सगळे अगदी उघडपणे, राजरोसपणे होत असे. शनिवारी सकाळच्या शाळेला जाताना तर हमखास दिसणारे हे दृष्य. याचा नेमका अर्थ अगदी लहानपणीच कळू लागे. चौथी-पाचवीपासूनच असले काही दिसले की शाळेला जाणारी लहान मुलेसुद्धा तेथे रेंगाळायला लागत आणि मुली लाजून गडबडीने घाईघाईत चालायला लागत. घराघरांतून पाळलेली मांजरे, छपरांवर, झाडांवर उड्या मारणारी माकडे, उकीरड्यांवर आणि चिखलात लोळणारी डुकरे – हे सगळे प्राणी आपापल्या जोडीदारांबरोबर रत होत आणि पिलावळ प्रसवीत. त्यामुळे पुनरुत्पादन कसे होते हे अगदी पोरवयापासून नीट कळायला लागे.  व्यायला झालेल्या गाईच्या निरणातून स्त्राव गळायला लागला की घरातले लोक गरम पाणी, शिजवलेले राळे अशा तयारीला लागत. तास-दोन तास उठबस करुन मग ती गाय- म्हैस कुंथायला लागे. तिच्या पाठीमागून काळ्यानिळ्या रंगाचा बुळबुळीत फुगा बाहेर येई आणि ती अस्वस्थपणे घशातल्या घशात हंबरायला लागे. तो फुगा  फुटला की मग त्यातून वासराचे खूर आणि डोक्याचा पुढचा भाग बाहेर येई. मग गावातला जाणकार डोक्याचे मुंडासे खोचत पुढे होई आणि हातावर एक थुंक टाकून वासराचे ते पाय धरुन हळूच वासराला बाहेर ओढून काढी. ती गाय-म्हैस तोंडाचा आ वासून एक शेवटची कळ देई आणि मोकळी होई. हे सगळे अगदी नेहमी होत असल्यासारखे होते, त्यामुळे जसे जनावरांचे असते तसेच माणसांचे असणार हे व्यवहारी शहाणपण शिकवण्याची कुणाला काही गरज नव्हती. ’स्टॉर्क’ वगैरे फसवणूकही चालण्यासारखी नव्हती.
गावातल्या वडाराच्या बायका चोळी घालत नसत आणि त्या बायका घाईघाईने चालायला लागल्या की  त्यांची पदराआडची ओघळलेली, थुलथुलीत छाती लुटूलुटू हलत असे. कधीकधी एखादी वडारीण चालताचालता रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबून आपला पदर बाजूला करी आणि आपला सावळा पण पुष्ट, दुधाळ स्तन सुटा करुन नि:संकोचपणे कडेवरच्या मुलाच्या तोंडात त्याचे बोंडूक देई. ते मूल मग हातपाय झाडत चुरुचुरु चोखायला लागे. हे सगळे अगदी चारचौघांत निगरगट्टपणे होत असे आणि यात कुणाला काही विशेष वाटतही नसे. हे सगळे  बघून नजर मेलेली असे. जैनांचे ’निर्वाण’ स्वामी पूर्ण दिगंबर अवस्थेत असत. त्यांचे पूर्ण वाढ झालेले केसाळ पुरुषी लिंग बघतानाही काही वाटत नसे. स्वामींच्या पायावर पाणी घालणार्‍या, मोरपिसांच्या झाडूने त्यांचे आसन झाडणार्‍या जैनाच्या बायकांचा त्या स्वामींच्या लिंगाला कधी नकळत स्पर्शही होत असे. अशा स्त्रियांमध्ये काही बालविधवा, काही लहानपणीच देवाला वाहिलेल्या भाविणीही असत. ’निर्वाण भाळ छलु’ (’पूर्ण नग्न फारच चांगले) हे अशा स्त्रियांच्या तोंडी ऐकलेले काही गावठी शब्द आज अतृप्त मानवी लैंगिक भावनांची काही गुंतागुंत सुचवून जातात. त्या वेळी बाकी असले काही डोक्यात येत नसे.
मानवी लैंगिक संबंधाबाबतचे उरलेसुरले कुतुहल लोकांच्या बोलण्यातून शमत असे. गावाकडच्या बोलण्यात शब्दागणिक शिवी असे. या शिव्याही अत्यंत स्पष्ट, चोख आणि नेमक्या असत. त्यातले लैंगिक उल्लेख हे थेट आणि सर्जनशील असत. मानवी कोणत्या लैंगिक अवयवांना नेमके काय म्हणतात हे अगदी लहान वयात कोणत्याही प्रकारचे लैंगिक शिक्षण न घेता कळाले याचे कारण आसपास असलेले उघडे, बिनईस्त्रीचे वातावरण. चौथीपाचवीतला एखादा थोराड मुलगा हातची मूठ बांधून करंगळीशेजारी तळव्याच्या त्वचेला पडणाया घडीकडे बोट दाखवत काही सूचक, चावट बोले आणि आसपासची तशीच थोराड मुले फिदीफिदी हसत. गावाकडच्या कसदार खाण्याने, भरघोस कष्टाने आणि मोकळ्या वागण्याने मुले-मुली लवकर वयात येत. सातवी-आठवीत बहुतेक प्रत्येक मुलगी महिन्यातून चार दिवस शाळेला येत नसे आणि पाचव्या दिवशी ती न्हाऊन शाळेत आली की एखाद्या पुष्ट मक्याच्या कणसासारख्या दिसणार्‍या त्या सुस्नात मुलीकडे बघून वर्गातली काही दांडगी मुले अत्यंत वाह्यात असे काही बोलत. असले सगळे आसपास असताना काही शिकायचे राहिले असे होत नसे. आठव्या-नवव्या इयत्तेत असलेल्या पण वयाने बयाच थोर असणाया मुलांच्या शरीरात ज्वानीच्या अनावर लाटा उसळत. त्यातली काही पैसेवाली मुले चक्क वेश्यांकडे जात. बाकीची मुले गावातच निचर्‍याचे साधन शोधत. गावात चोरटे लैंगिक संबंध तर वाट्टेल तितके असत. एखादी जून, अनुभवी, पाशमुक्त ठसठशीत वडारीण किंवा चांभारीण आणि तिच्याकडून आपली कामतृषा भागवणारी कोवळी पण जोरकस मुले असले काही त्या काळात ऐकू येत असे, दिसतही असे.
गावातली बोलीभाषा अगदी रांगडी, खेडवळ होती. सीमाभाग असल्याने गावातले बरेचसे लोक कानडी बोलत. पण त्या नम्र, गोड भाषेचा आमच्या गावात बोलल्या जात असलेल्या भाषेशी अंघोळीइतकाही संबंध नव्हता. गावातली बोलीभाषा खडबडीत उतारावरुन टमरेल खडखडत जावे तशी होती. गावात सदैव वचावचा भांडणे चालत आणि भांडणात एकमेकांच्या आईमाईचा स्वच्छ, बिनकासोट्याचा उल्लेख होत असे. एखादा दारुडा नवरा संध्याकाळी बायकोच्या झिंज्यांना हात घालत “रांडे, उंडगे, कुनाकुनाखाली झोपलीस आं?” म्हणत तिला बडव बडव बडवत असे आणि ती चवताळलेली बाई त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत “आयघाल्या, बाराबोड्याच्या, तुज्या शेमन्यात जोर आस्ता तर मी कुनाकडं कशाला गेलो आस्तो रं हांडग्या..” असं जोरजोरात ओरडत असे. काम न करता दुपारी झोपणार्‍या आपल्या पोटच्या मुलाला एखादा गांजलेला बाप बांधावर उभा राहून ’नाड खज्जाळीच्या, तुज्यायला लावला डॉंबारी..” म्हणून शिव्या देत असे आणि विहिरीवर पाण्यासाठी भांडताना बायका एकमेकीला “व्हयमाले, तुला वड्याच्या काटानं मांगानं हेपल्लला गं रांडं..” असं मोकळेपणाने म्हणत असत. या शिव्यांमधला जहरीपणा जाऊन त्यांची निव्वळ फोलपटे शिल्लक राहिली होती. शाळेतली मुलेही एकमेकाशी बोलताना सहजपणे ’रांडेच्या’ वगैरे शब्द वापरत. हे सगळे अगदी मोठ्मोठ्यांदा बोलले जाई. गरीबी, अडाणीपणा, रोगराई, व्यसनाधीनता या सगळ्यांमुळे टेकीला आलेले हे पुरुष आणि पोराबाळांचे लेंढार, नवर्‍याचा उन्मत्तपणा, सासुरवास आणि कष्ट- न संपणारे अपरिमित कष्ट यांनी मरायला टेकलेल्या पण लवकर न मरणार्‍या बायका – हे सगळे लोक असे तोंड फुटल्यासारख्या शिव्या द्यायल्या लागले की ते सगळेच आपल्या ठसठसणार्‍या गळवासारख्या आयुष्याला आणि असले बिनबापाचे, कणाहीन निरर्थक  आयुष्य देणाऱ्या त्या कृपासिंधू करुणाकरालाच शिव्या देत आहेत, असे वाटत असे.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

3 Responses to जुना काळ

  1. Sushama Datar कहते हैं:

    गावाचा साहित्यिक बुरखा फाडून केलेले यथार्थ वर्णन.आवडलं म्हणंही कठीण जाईल इतकं खरं. गाव-समाज उभा राहिला डोळ्या समोर.फक्त कमतरता वाटली ती नैसर्गिक परिसर-संदर्भाची.

  2. mugdha कहते हैं:

    मी असाच काहीसा नागडा-उघडा परेशान अनुभव मुंबईच्या झोपडपट्टीत प्रौढ साक्षरतेसाठी फिरतानाही घेतलाय. ‘लोक’ नावाच्या एका बिनचेहऱ्याच्या झुंडीबद्दल फार गहिरी सहानुभूती नाही वाटू शकत तेव्हापासून… कीव वाटते. त्यांना जरा बरं जगायला मिळावं असंही वाटतं. पण प्रेम नाही वाटत.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s