अनुभव

’तुम्ही काही म्हणा सर, दोन हजार वीस साली भारत ही महासत्ता होणार. होणार म्हणजे होणारच.  हां, आता अगदी दोन हजार वीस म्हणजे शब्दश: धरु नका तुम्ही, पाचदहा वर्षं इकडंतिकडं. पण होणार. ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजा…’ मी चहाचा घोट घेताघेता उत्साहाने म्हणालो. ’युरोप युएसए सोडाच. त्या इकॉनॉमीज सॅच्युरेट होताहेत. पण  ब्रिक्स कंट्रीजमध्येही आपल्याशी सामना करु शकणारं कुणी नाही. आपली इकॉनॉमी तर वाढणार आहेच. अ‍ॅग्रीकल्चरमध्येही आपण पाच टक्क्यांच्या वर ग्रोथ रेट गाठणार. गाठणार काय, गाठलाच म्हणून समजा या वर्षी.  बाकी सर्व्हिसेस तर आहेतच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण ठीकठाक आहोत. पण ते सुधारेल हळूहळू. आणि दुसरं मह्त्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेलं कुशल मनुष्यबळ बघा.  स्किल्ड ह्यूमन रिसोर्सेस. जगात प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट्स आणि पोस्टग्रॅज्युएट्स भारतातल्या विद्यापीठांतून बाहेर पडतात. हे सगळे कॅन्डिडेट्स आपण सगळ्या जगाला पुरवू शकू. आता या मोठ्या तरुण लोकसंख्येचा टॅलन्ट हा तर मोठा अ‍ॅसेट आहेच, पण दुसरा म्हणजे भाषा. इंग्लिश ही सगळ्या जगाची बिझनेस लँग्वेज आहे. भारतात जगातले सगळ्यात जास्त इंग्लिश बोलणारे-लिहिणारे लोक आहेत. ते झालंच तर……’ आपण फार बोलतोय असं वाटून मी थोडा थांबलो.  माझ्या समोरचे पिकलेले प्राध्यापक मिशीत हसले. ’तुमच्या तोंडात साखर पडो, राजाधिराज…’ ते म्हणाले. ’साखर पडो, साखर. पण तुमच्या आवडत्या लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर हे सगळं असं केळीच्या खुंटासारखं सरळसोट असतंय होय? काय ते तुम्ही म्हणालात ते.. कुशल मनुष्यबळ वगैरे…’
मी पुन्हा थांबलो. या वर्षी पुण्यातल्या एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु होती आणि विद्यार्थ्यांचे समूहसंवाद आणि वैयक्तिक मुलाखती – जीडीपीआय- यासाठी आम्ही काही लोक जमलो होतो.  काही प्राध्यापक, काही इंडस्ट्रीतले लोक….ही संस्था म्हणजे पुण्याच्या- पर्यायाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक जीवनात मोलाची भर घालणारी वगैरे म्हणून प्रसिद्ध आहे. गेली काही वर्षं अशा प्रवेशप्रक्रियांमध्ये उमेदवार मुलांशी संवाद साधणं हा अगदी आनंददायक अनुभव होता. या मुलांच्या सामाजिक जाणिवा, आसपासच्या परिस्थितीबाबत असलेलं त्यांचं भान, स्वतंत्र विचार करण्याची त्यांच्यात असलेली क्षमता आणि तसा विचार करण्याचं त्यांच्यांत असलेलं धाडस,    (विद्यार्थी असूनही) या मुलांमध्ये आढळणारी नम्रता आणि संभाषणचातुर्य यांनी मी प्रभावित झालो होतो. या वर्षी असेच काहीसे स्वत:ला समृद्ध बनवणारे आणि आपल्या व्यवसायाविषयी समाधानाची भावना मनात आणून देणारे फार दुर्मिळ क्षण येतील या आशेने आम्ही लोक या संस्थेच्या आवारात आलो होतो. चहापान सुरु होतं. एकूण व्यवस्था उत्तमच होती. दोन दोन परीक्षकांचे गट केलेले, प्रत्येकाच्या नावाचं छोटं फोल्डर, प्रत्येक परीक्षकाचं ओळखपत्र, नवीकोरी उत्तम दर्जाची पेन्स, पेन्सिल्स, इरेझर्स, नाश्त्यासाठी मोजके पण चविष्ट पदार्थ. संस्थेच्या संचालकांनी बरोबर नवाच्या ठोक्याला स्वागताचं छोटसं भाषण सुरु केलं. त्यात ही प्रवेशप्रक्रिया किती महत्त्वाची आहे, आम्हा परीक्षकांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी किती मोठी आहे आणि आम्ही अत्यंत वस्तुनिष्ठपणे, कोणत्याही पूर्वगृहशिवाय ही जबाबदारी पूर्ण करणं संस्थेसाठी किती गरजेचं आहे असं वगैरे आवर्जून सांगितलं. उत्तम इंग्रजी, विनम्र आणि नेमके शब्द आणि प्रामाणिक भावना. चहा-कॉफीचे कप खाली ठेवून निघताना येते दोनतीन दिवस फार चांगले जाणार अशी एक भावना मनात येऊन गेली. त्या प्राध्यापकांचे शब्द बाकी मनातून जात नव्हते.
प्रत्यक्ष ग्रूप डिस्कशन्सना सुरवात झाली आणि कुठंतरी काही खटकायला लागलं. मुलं-मुली आक्रमकपणे बोलत होती, सफाईदारपणानंही बोलत होती.  ’लिसनिंग स्किल्स’चं महत्त्व आठवून इतरांचं ऐकूनही घेत होती, पण सगळंच वरवरचं, उथळ बोलणं. कुणी मध्येच काही डेटा देत होतं: या वेबसाईटवर हे म्हटलं आहे, ’टाईम्स’ मधली ही अशी आकडेवारी आहे वगैरे, पण कुठे स्वत:चा विचार काही नाही. वैयक्तिक मुलाखतीत तर हे अधिकच जाणवायला लागलं. राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते का? या प्रश्नाला ’नव्हते बहुदा.. की होते?’ असे उत्तर या विद्यार्थ्यांपैकी एकाकडून मिळाले. या उत्तरापेक्षाही हे उत्तर देताना त्याच्या चेहर्‍यावरचे मिश्किल हसू अधिक धक्कादायक होते. नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्री आहेत, गीर हे भारतातले वाघांसाठीचे सर्वात मोठे अभयारण्य आहे, जयराम रमेश हे केंद्रीय शेतीमंत्री आहेत, २६ जानेवारी १९४८ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे, भारतातली चित्त्यांची संख्या ५०० च्या आसपास आहे आणि सगळ्यावर कळस म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ हे आग्रा समीटसाठी इस्लामाबाद येथे भेटले…. अशी उत्तरं ऐकू यायला लागली.  मला काही कळेनासं झालं होतं. मी माझ्या सोबतच्या परीक्षकाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघीतलं. त्यानंही हताशपणे खांदे उडवले.
’इंदिरा गांधींच्या मारेकर्‍यांची नावं सांगता येतील?’ मी तरीही आशा सोडली नव्हती.
’सम सिंग, राईट? ही वॉज अ सर्ड, वॉजन्ट ही?’ ‘सर्ड’ या शब्दाकडं मी दुर्लक्ष केलं.
’सम सिंग?’
’सॉरी, आय वॉजन्ट बॉर्न देन..’ समोरची कन्यका म्हणाली.
मी मनात म्हणालो, नथुराम गोडसे हे नाव मला ठाऊक आहे. गांधीहत्त्येच्या वेळी मीही जन्मलो नव्हतो, बये!
’वाचता काय आपण?’
’वेल, आयम नॉट रिअली इनटू रीडिंग. बट आय रीड सम बुक्स – इंग्लिश-मोस्टली…’
’इंग्रजी काय वाचता तुम्ही?’
’चेतन भगत – थ्री मिस्टेक्स ऒफ माय लाईफ, वन नाईट…’
’पुरे, पुरे… हिंदी?’
’हिंदी, यू मीन बुक्स?’
’हो, बुक्सच.’
’नॉट रिअली. स्कूलमध्ये वाचले होते लेसन्स . परसाई ऒर समथिंग… सॉरी’
’हिंदी कविता?’
’बच्चन’
’व्हॉट ऒफ हिम?’
’फादर ऑफ अमिताभ बच्चन. ग्रान्डपा ऑफ अभिषेक.’
आता ही बया अभिषेक किती हॉट किंवा किती कूल आहे हे सांगेल या भयाने मी पुढचा प्रश्न विचारला नाही. पण त्या बयेनंतर आलेली मुलं-मुली यांच्यात मला सरस-निरस करणं मोठं मुश्किल होऊन बसलं. बहुदा सगळे इंग्रजी माध्यमातले, म्हणून एकाला गंमतीनं ’ अ सेंट सेंट अ सेंट ऒफ अ सेंट टु अनादर सेंट’ या वाक्याचं ’ सेंट’ हा शब्द न वापरता इंग्रजीत भाषांतर कर म्हणून सांगितलं तर तो जवळजवळ तुच्छतेनंच हसला. ’कसले जुनेपुराणे प्रश्न विचारता..’ असा त्याच्या चेहयावर भाव होता. मग पुढचा ’जॉन व्हेअर जेम्स हॅड हॅड……’ हा प्रश्न काही मी विचारला नाही.
पंडीतजी जाऊन जेमतेम आठवडा झाला होता. भारताच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या आठवड्याभरात महत्त्वाचं असं काय झालं या प्रश्नाला दहातल्या आठांनी फक्त कपाळावर एक आठी टाकली. एकजण ’ओह दॅट, सम सिंगर डाईड, राईट? ऑर वॉज ही अ म्यूझिशियन?’ असं म्हणाला. एका मुलीला बाकी नावानिशी माहिती होतं. नशीब आमचं! भारतातल्या प्रसिद्ध संगीतकारांचं एखादं उदाहरण सांग म्हटल्यावर एकूणेकांनी रहमानचं नाव घेतलं. ’सतार, संतूर, सरोद’ असलं यातल्या बर्‍याचजणांनी काही ऐकलेलंही नव्हतं. एक दोन मराठी मुलांना आवडते मराठी लेखक विचारले तर पु.ल. देशपांडे या एकाच नावावर गाडी अडून बसली. एखाद्या कवीचं नाव विचारल्यावर एकानं फाडकन संदीप खरेचं नाव घेतलं. पुढे? पुढे काही नाही…..
दुपारच्या जेवणाला संस्थेचे संचालक भेटले. त्यांच्याजवळ मी जराशी नाराजी प्रकट केली त्यावर ते म्हणाले,’छे, छे, असले अवघड प्रश्न विचारुन कसं चालेल, सर? तुम्ही तर डिग्रीच्या मुलांना डॉक्टरेटचे प्रश्नच विचारले. थिंक ऑफ देअर एज, सर..’ मी काहीच बोललो नाही.
त्याबरोबरच सुमारे दोन वर्षांपूर्वी वाचलेलं काही आठवलं आणि मनात जरा चरकल्यासारखंही झालं. ’ते लिबरल आहेत’ नावाच्या वृंदा भार्गवे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखाचं कात्रण कालपरवा कागदपत्रांची आवराआवरी करताना सापडलं होतं. तीन-साडेतीनशे मुला-मुलींच्या लेखिकेने घेतलेल्या मुलाखतीवर आधारित हा लेख आहे. लेखिकेनं घेतलेल्या मुलाखतीतली मुलं-मुली म्हणजे आजच्या ’जनरेशन वाय’ चे प्रातिनिधित्व करणारी – आधुनिक वेशभूषा, प्रत्येकाजवळ महागडा मोबाईल फोन, दुचाकी आणि जवळजवळ प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक बेफिकीर भाव – अशी. ही मुलं कुठल्या माध्यमातून शिकणारी होती, याबाबत लेखिकेने काही लिहिलेलं नाही, पण सगळी मुलं मराठी होती इतकं नक्की. लेखिकेने घेतलेल्या मुलाखतींमधून या मुलांचं सामान्यज्ञान, एकूण समाजाविषयी त्यांना असलेलं भान, सजगता यावर काही प्रकाश पडतो, असे वाटते. या तरुण पिढीचे लेखिकेने केलेले परीक्षण – ते प्रातिनिधिक आहे असा लेखिकेचाही दावा नाही – विचार करायला लावणारे वाटते. उदाहरणार्थ ’तुषार’ नावाच्या मुलाला ’तुषार’ या शब्दाचा अर्थ काही पटकन सांगता आला नाही. खूप विचार करुन त्यानं सांगितल,’बुद्धिमान’! हे उत्तर नाही म्हटल्यावर त्यानं पुढं सूर्य, फूल, पानं असं काय वाट्टेल ते सांगायला सुरवात केली. ’मराठीचं पुस्तक वाचलंस का’ या प्रश्नावर त्यानं झटकल्यासारखं ’नाही, गाईड आणलेलं, पण वेळच मिळाला नाही’ असं तुटक उत्तर दिलं. या मुलाच्या मुलाखतीच्या सुरवातीनंच भारावून जाऊन मी त्या लेखाचा पुढचा भाग वाचला होता.
’का रे, नोकरी करतो कुठं?’
’छे… छे…’
’मराठी काय वाचलंस? पुस्तकं,लेखक, कवी?
’काहीच नाही’
’वर्तमानपत्र?’
’येतं घरी एक.’
’त्यातलं काय?’
’स्पोर्टस’
’कोणती बातमी?’
’आठवड्यापासून नाही वाचलं’
’मराठी म्हण सांग बरं एखादी? किंवा वाक्प्रचार?’
’कडी लावा आतली, मी नाही त्यातली.’
या पुढची मुलं म्हणजे तुषारच्याच काळ्या-गोर्‍या प्रती असल्यासारख्या होत्या. ’आत्मचरित्र’ म्हणजे काय या प्रश्नाला शंभरातले नव्वद ’आ..शिट.. ओह, जस्ट तोंडात आहे, ओ गॉड, वन सेकंद, वन सेकंद….’ अशी उत्तरं या मुलांनी दिली. आवडता लेखक कोणता हे विचारल्यावर या मुलांचे पहिले उत्तर ’सुनील गावसकर’ असे होते (कारण त्यांच्या पुस्तकात ’सनी डेज’ मधला उतारा धडा म्हणून होता), मराठी साहित्यातील साहित्यिक कोण यावर ’शिरवाडकर’ असे उत्तर या मुलांपैकी काहीजणांकडून आले, पण त्यांचं काय वाचलं, ऐकलं, पाहिलं यावर दुमडलेल्या ओठांची चित्रविचित्र घडी बघायला मिळाली असे या लेखिकेचे अनुभव आहेत. आवडता कवी यावर एक मुलानं ’सुनील जाधव’ हे नाव घेतलं ’हे कोण?’ असं विचारल्यावर तो म्हणाला की ’आमच्या शेजारीच राहतात, कविता बेस करतात’ त्यांच्या काही ओळी सांग म्हतल्यावर तो म्हणाला की ’कविता लक्षात नाही राहत, अर्थ सांगू का?’
कविता- असं समजून चालू की – प्रत्येकाचा प्रांत नाही. कथा- कादंबर्‍यांमध्येही या मुलांपैकी कित्येकांना शून्य रस असलेलाच दिसला. मोजक्या काहींनी मृत्युंजयचं नाव घेतलं (या कादंबरीचे लेखक त्यांच्या मते कर्नल शिवाजी भोसले!). या मुलांपैकी प्रत्येक जणच टीव्ही पहाणारा होता, पण टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम विचारल्यावर मुलं क्रिकेट आणि एखाद-दुसरा रिअ‍ॅलिटी शो आणि मुली कौटुंबिक हिंदी मेलोड्रामापलीकडं जायला तयार नव्हत्या. बातम्या, राजकारण, समाजकारण याच्याशी तर या मुलांचा काही संबंधच नव्हता. वर्तमानपत्रातलं राशीभविष्य वाचणारे बरेचजण होते, पण अग्रलेख वाचणारा एकही नव्हता. सांस्कृतिक जीवन आणि इतिहासाची या मुलांना ओळख तरी आहे का हे पहावं म्हणून लेखिकेने त्यांना काही प्रश्न विचारले आणि विनायक दामोदर सावरकर हे पूर्ण नाव त्यातल्या एकाला माहिती आहे हे कळाल्यानं आपल्याला भरुन आलं असं लेखिका लिहिते. त्यांचं कार्य काय यावर त्याच गुणी विद्यार्थ्यानं ’सावरकरांनी दामोदर टॉकीज बांधलं’ असं उत्तर दिलं. टिळक आगरकरांपेक्षा या मुलांना गांधी जवळचे होते, पण ते त्यांच्या विचारांमुळे नव्हे, तर ’लगे रहो मुन्नाभाई’मुळे
राजकारणात या मुलांना काही गती किंवा रस असावा अशी अपेक्षा करणंच फोलपणाचं होत. तरीही आमदार आणि खासदार यांतला फरक यापैकी बहुतेक मुलांना ठाऊक नव्हता, हे वाचून मला दचकायला झालं. ही सगळी मुलं मराठी, म्हणून लेखिकेने या मुलांना काही मराठी शब्दांचे अर्थ विचारले. त्याला मिळालेली उत्तरं तर मती गुंग करुन टाकतात. सहिष्णू म्हणजे श्रीविष्णूचा भाऊ, सलिल म्हणजे लिलीचे फूल, अजिंक्य म्हणजे पराभूत, अटकळ हा नवीन शब्द दिसतो, चट्टामट्टा हा शब्द ऐकलेलाच नाही, नट्टापट्टासारखा आहे का?, धादांत म्हणजे ज्याचा लवकर अंत होतो तो, लाखोली म्हणजे लाख रुपयांची खोली…साहित्य अकादमीविषयी विचारलं तर ’पोलिस अकादमीसारखी असणार बा’ हे उत्तर..
या सगळ्या मुलाखत प्रकरणात आपल्याला काही अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरंही देता आली नाहीत, याची या तरुण वर्गाला कुठे खंत वगैरे वाटल्याचं लेखिकेला दिसलं नाही. लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात लेखिका लिहिते, ‘आता आपापल्या वाहानांजवळ येऊन त्या सगळ्यांनी एकच गिलका-गला केला….ह्या… करत परीक्षांची टर उडवली.टपून बसलेल्या चॅनलवाल्यानं उत्साह, उन्माद, जोश, आनंद सुटीचा या न्यूजसकटरसभरीत वर्णनाला प्रारंभही केला. काहींनी त्यांना कॅमेर्‍यात बंद करुन’बोला’ अशीखूणही केली. चेकाळून अनेकांनी इंग्रजी शब्दांचा आधार घेत परस्परांना हॅपी हॉलिडेजची आलिंगनं दिली. तरुण नावाचं भांडवल घेऊन. या सगळ्यात मी पास झाले की नाही हे मला कळालंच नाही.
भार्गवांचे हे अनुभव तसेच जगल्यासारखं मला वाटू लागलं.
दिवस पुढे सरकला. चित्रपटाचं एकच रीळ परत परत बघीतल्यासारखा अनुभव. चेहरे वेगळे, पण एकाच छापाचे. स्मार्ट, तरतरीत, आत्मविश्वासानं फुलून आलेले. कपड्यांचा उत्तम सेन्स. मुली तर एखाद्या फॆशन शो ला आल्यसारख्या नटलेल्या. सगळं कसं करेक्ट. पोलिटिकली करेक्ट.
दुपारच्या चहाला सकाळचेच मिश्कील प्राध्यापक भेटले. ’हं… काय म्हणतात तुमचे इंटरव्ह्यूज? तुमचं स्किल्ड ह्यूमन रिसोर्स? कधी होणार म्हणताय भारत महासत्ता?’  त्यांनी विचारलं. ’दोन हजार वीस साली’…’ मी चहाचा घोट घेताघेता म्हणालो. पण यावेळी माझा आवाज खाली आलेला होता. खूपच खाली.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

5 Responses to अनुभव

  1. Nikhil Sheth कहते हैं:

    He sagale prasang khare khure ghadlele ahet?????

  2. Shraddha कहते हैं:

    खरय तुम्ही म्हणता ते – कधी कधी भीती वाटायला लागते – नुसता भविष्याचा विचार करूनही. कसं होणार कोण जाणे?

  3. Prasad V Date कहते हैं:

    All views expressed in the article are very true. It is really shocking a surprising to interact with “New Talents” like those

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s