माझे खाद्य-पेय जीवन-१

‘गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट’ हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात आले होते. त्यातून आई, बहीण, आजी हा घरातला समग्र स्त्रीवर्ग खाना बनवण्यात आणि खिलवण्याचा शौकीन असल्याने जिभेचे मुद्दाम लाड करावे लागले नाहीतच; ते आपोआपच झाले. सणवार, व्रतवैकल्ये आणि त्यांची उद्यापने, गावच्या जत्रा आणी शेतावर होणारा विहिरीच्या पूजेचा तो कार्यक्रम ‘पारडी’ या विविध निमित्तांनी घरात आणि घराबाहेर खाल्लेल्या विविध पदार्थांच्या आस्वादाला चटावलेली आणि सोकावलेली जीभ पुढे मुर्गीमटणातही रमली. आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली. वर काजू बदामाची पेरणी केलेली बरेलीतली मलईदार ‘दीनानाथ की मशहूर लस्सी पिऊन जसा संतोष झाला, तसाच कोल्हापुरातल्या ‘ओपल’ मधला कडकडीत पांढरा रस्सा पिऊनही.
आता खाण्यात इर्षा करण्याचे दिवस मागे पडले. जीभ अजूनही चावट आहे, पण आता ‘क्वांटिटी’ पेक्षा ‘क्वालिटी’ ला अधिक महत्व देण्याचे दिवस आले. आजही मुर्ग-मसालाबरोबर पचडी तशीच लागते, पण आता कोंबडीच्या त्या घासांबरोबर ‘फायबर’ हा विचारही चावला जातो. आजही सुका मेवा तितकाच चविष्ट लागतो, पण तो खाताना ‘अक्रोड हार्टला बरे म्हणे!’ हे मनात आल्याशिवाय राहात नाही. पण ते असो. कधीतरी या लाडावलेल्या जिभेलाच आता ‘काय तुझा तेगार’ म्हणून विचारावे असे वाटले आणि आजवरच्या आयुष्यातल्या खाण्यापिण्याच्या या रंगरंगिल्या प्रवासवाटेवर मन मागेमागे रेंगाळत गेले.
कुणाकुणाला म्हणे आपले स्वतःचे उष्टावणही आठवते. कुणाला स्वतःच्या बारशात वाटलेल्या घुगर्‍यांची चवही आठवत असेल, काय सांगावे! मला असले काही आठवत नाही. पण खान पान यात्रेची (हा शब्द ‘भारतीय रेल’ कडून साभार!) सुरवात होते ती चहापासून. मुखमार्जनानंतर (हा शब्द ‘सारे प्रवासी घडीचे’ मधून साभार!) काही क्षणांतच वाफाळता चहाचा मोठा मग समोर आला नाही तर सगळे जग व्यर्थ वाटू लागते. दुधा-दह्याच्या प्रदेशात बालपण गेले असल्याने लहानपणी या चहात चहा नावापुरताच आणि भरघोस दूध असायचे. कपातल्या गोडमिट्ट चहावर खापरीसारखी दाट साय ही कल्पना आज ओशट वाटते, पण अंगाभोवती पांघरुण घट्ट गुंडाळून घेऊन असा चहा चाखतमाखत पिणे आणि रिकामा कप कुठेतरी भिरकावून परत पांघरुणात गुडुप होणे यापरते सुख नसे. शहरी चहात चहाचा स्वाद वगैरे महत्वाचा, पण गावाकडच्या आतिथ्याच्या कक्षा चहातल्या साखरेच्या प्रमाणानुसार रुंदावतात. ‘खडे चम्मचवाली चाय’ ही काही उत्तर भारतीयांची मक्तेदारी नव्हे. गावाकडच्या चहात एकवेळ चहा लहान चमच्याने पडेल, पण साखर पडते ती मुठीने. पुढे मग तारांकित हाटेलातला उंची पण मचूळ चहा, गुजरातमधली गोड आणि सुगंधी ‘मसालानु चाय’, तीन आकडी किंमत असलेला ‘ब्लॅक’ किंवा ‘आईस टी’ असले अनेक प्रकार चाखले, पण चहा तो चहाच. सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे. रविवारी बाकी चहाच्या तीन-चार फेर्‍या व्हाव्यात. शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत ‘कशी गं माझी बाय गुणाची!’ म्हणावेसे वाटते! कॉफी – तीही आसक्या दुधातली आणि वेलदोडे जायफळ घातलेली- कधीकधी मजा आणून जात असे. विशेषतः गावाकडच्या तंबूतला शिणेमा बघून रात्री परत आल्यावर असली कॉफी केवळ अफलातून लागे. कॉफी हे उच्चभ्रू लोकांचे पेय आहे आणि चहा हे जनतेचे, हा सूक्ष्म फरक कळायला बराच वेळ लागला. न कळणार्‍या चित्रांचे वातानुकूलित प्रदर्शन बघताना त्या वेळी लोक कॉफी पीत असत. (आता वाईन पितात!) नुकत्याच प्रेमात पडलेल्या (किंवा नुकतेच लग्न ठरलेल्या) युगुलांना हाटेलात जाऊन चहा पिणे जरा कमीपणाचे वाटे; म्हणून असे लोक महागड्या हाटेलांत जाऊन न परवडणारी कॉफी पीत असत. डोळ्यांत डोळे घालून बघणे, चोरटे स्पर्श, ‘एक मुलगी हवीच हं मला.. आणि नावही ठरवून ठेवलंय मी – नेहा!’ वगैरे सगळ्या साईड डिशेस. एकंदरीत काय, तर कॉफी जराशी शिष्टच. चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही. पुढे ‘ब्रिष्टॉल – विल्स – गोल्ड फ्लेक’ या प्रवासाला साथ दिली ती तर केवळ चहानेच. ‘चहा-बिडी’ हा शब्दप्रयोग काळाच्या ओघात टिकून आहे ही तर अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावावी अशी दैदिप्यमान घटना आहे!
चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही. बोर्नव्हिटा चॉकलेटच्या स्वादाचा म्हणून जरा बरा वाटे पण हॉर्लिक्स, प्रोटिनेक्स वगैरे मंडळी आजारीपणाची कडवट आठवण घेऊन येतात. कोको ही तर शुद्ध फसवाफसवीच होती. शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा कोको.
तात्पर्य काय, की कोणताही ऋतू असावा, विचारहीन शांत झोप व्हावी, ‘आज आपण जग जिंकणार’ या आत्मविश्वासाने जागे व्हावे आणि तोंड खंगाळेपर्यंत हातात ते ताम्रवर्णी अमृत हजर व्हावे. घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो! ‘उत्तेजक पेयांपासून दूर’ असणारे लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. शेवटी ‘कंबख्त तूने पीही नही’ हे काय फक्त वारुणीलाच लागू आहे? ‘कंबख्त तूने चाय पीही नही’ हेही तितकेच समर्पक आहे की! आणि व्याकरणदृष्ट्या बरोबरही!

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

समजत नाही… समजत नाही…

“म्हणत राहा, मित्रांनो, श्रीराम, जयराम जयजयराम..श्रीराम, जयराम जयजयराम.. ” अद्वैतच्या वडिलांनी शववाहिकेच्या खिडकीतून बाहेर बघत हात जोडले. हळू हळू वेग घेत ती गाडी  इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर पडली. आजूबाजूला हुंदके देत उभ्या  मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी ठेवली. चौदा पंधरा वर्षांची ती मुलं मुसमुसत  रडू लागली.
पुन्हा डोळे पुसून मी वर पाहिलं. निरभ्र आभाळ. चांदण्यांचे क्षीण डोळे. हवेत किंचित गारवा. डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून दिसणारी इस्पितळाची भव्य इमारत. वेगवेगळ्या विभागांच्या पाट्या. त्यातल्या पहिल्या मजल्यावरचा अतिदक्षता विभाग. त्यातली एकशे तीन क्रमांकाची खोली. आणि आता त्या खोलीत नसलेला अद्वैत. कुठेच नसलेला अद्वैत. सर्व जाणिवांच्या पलीकडे गेलेला अद्वैत. 
हे असं होणार याची मानसिक तयारी करायला दोन आठवडे मिळाले होते. पंधरा दिवसांपूर्वी अद्वैत रानडेला बसची धडक बसली आणि तेंव्हापासून तो अत्यंत गंभीर अवस्थेतच होता. रोज त्याच्याविषयी वेगवेगळ्या, पण निराशाजनकच बातम्या येत होत्या. त्याच्या शाळेतले मित्र आणि त्या मित्रांचे आमच्यासारखे पालक – आम्ही सगळेच प्रचंड तणावाखाली होतो. काही चमत्कार झाला, तरच तो यातून वाचेल, हे उघड झालं होतं. पण  असला काही चमत्कार सहसा होत नाही, हे वैज्ञानिक मत खोटं ठरावं, असं अंतर्मन सतत म्हणत होतं.
आणि आता हे सत्य पचवताना मन बधीर झालं होतं. मानवी प्रयत्न, योजना, अभिलाषा, महत्त्वाकांक्षा यांच्यातला फोलपणा ध्यानात यावा असा हा क्षण. सगळं समजून काहीच न समजण्याचा हा क्षण.
अद्वैत हा माझ्या मुलाचा वर्गमित्र. दहावीतला. या वयातली मुलं जशी उत्साहानं आणि जीवनरसानं रसरसलेली असतात तसा. बोलक्या डोळ्यांचा हा चुणचुणीत मुलगा लहानपणापासून घरी यायचा. त्याची बुद्धीमत्ता, त्याने मिळवलेली बक्षिसं, त्याचं गाणं, लहानपणापासून त्यानं नाटकात केलेली कामं याचं कौतुक वाटायचं. वाढदिवसाला एखाद्याच्या घरी जमायचं, काहीतरी भरपूर हादडायचं,एका खोलीत जमिनीवर गाद्या घालायच्या आणि रात्रभर गप्पा, मोठमोठ्यांदा हसणं, रात्री मध्येच उठून रस्त्यावर भटकायला जाणं असं करून रात्र जागवायची असले या मुलांचे  प्रकार बरेच दिवस होत असत.  पुढं ही मुलं मोठी झाली तशी हळूहळू पालकांपासून सुटी होत गेली. मग त्यांचे आपापसात चाललेले खालच्या आवाजातले संवाद, एकमेकांना टाळ्या देऊन मोठ्यांदा हसणं, वरती घरात न येता तासनतास फाटकाशी आपापल्या सायकलींना रेलून गप्पा मारत राहाणं , एकमेकांना एसेमेस फॉरवर्ड करणं व  नेटवर चॅटिंग करत राहाणं सुरू झालं. त्यांचे कोवळे चेहरे आता काहीसे निबर होऊ लागले. बऱ्याच दिवसांनी त्यांच्यापैकी कोणी दिसला तर तो अचानकच ताडमाड उंच झाल्यासारखा वाटत असे. लहानपणी गोबरे गाल असलेल्या कुणाचा चेहरा एकदम बदलल्यासारखा वाटे. कुणाच्या ओठावर मिशीची रेघ उमटल्यासारखी वाटे. धड बालपण नाही, धड तारुण्य नाही अशा या आडनिड्या वयातली ही मुलं, त्यांचे कधी बालीश तर कधी प्रौढ असे विचार, त्यांचे ग्रूप्स आणि त्यातली घट्ट मैत्री हे बघताना मजा येत असे.  स्वतःच्या भूतकाळात चालत जाण्यासारखेच असे ते. दहावीचं वर्ष, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या शिकवण्या, पुढचे बेत यात गढून गेलेला असे. त्यातूनच एकत्र येऊन कधीतरी त्यांची धमाल चाले. आता त्यांचे वाढदिवस मॅक्डोलाल्डसमध्ये व्हायला लागले होते. मध्येच कधीतरी ही मुलं गंभीरपणानं ‘ आता आम्ही सगळे एकत्र असं हे शेवटचंच वर्ष. पुढया वर्षी कोण कुठल्या कॉलेजात असेल, मग आम्ही सगळे एकत्र असे कसे भेटणार? ‘ असा विचार करत.

आणि अचानक एखादा आघात व्हावा तशी अद्वैतच्या अपघाताची बातमी आली. तो अतिदक्षता विभागात आहे आणि अत्यंत गंभीर अवस्थेत आहे हे सांगताना माझ्या मुलाचा आवाज कापरा झाला होता. आणि ते कापरेपण लपवणे काही त्याला जमत नव्हते. शर्थीचे वैद्यकीय उपचार सुरुच होते. शाळेत त्याच्यासाठी प्रार्थना सुरू झाल्या. एरवी उत्साहानं फुललेल्या या मुलांचे चेहरे एकदम काळवंडून गेले. त्याला इस्पितळात भेटण्याची तर कुणालाच परवानगी नव्हती. पण त्याच्या पालकांना भेटून आलेली ही मुलंही दबकल्यासारखी झाली होती.  ‘आपण त्याला हाका मारू आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ते त्याच्या उशाशी वाजवत राहू म्हणजे तो लवकर जागा होईल’ असं या मुलांचं त्याच्या मित्रांशी बोलणं ऐकलं  आणि मी त्या खोलीतून बाहेर पडलो. ‘बाबा, ही इज सिंकिंग’ असं माझ्या मुलानं मला नजर टाळत सांगितलं आणि त्याचाकडं बघून काही बोलणं मलाही जमलं नाही.  

आणि आज हे. 

इस्पितळात अद्वैतच्या वडिलांना सामोरं जायचा धीर होत नव्हता. सर्वस्वाची होळी होत असताना गुढग्यांना मिठी घालून एकटक नजरेने समोर पाहात ओढ्याकाठी बसलेले ‘बिटाकाका’ आठवले. ‘त्याला भेटा, तो एकशे तीनमध्ये आहे.. ‘ ते कसेबसे म्हणाले. त्यांच्या ‘भेटा’ या शब्दाने आतवर खोल काहीतरी भळभळू लागलं.

भेटलो. मृत्यूची चिरशांती पांघरलेला अद्वैत. पंधरा वर्षांत संपून गेलेलं एक आयुष्य. मन पूर्ण कोरं करणारा क्षण.

परत निघालो. गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. माझ्या मुलाशेजारी त्याचा एक मित्र बसला होता. एरवी दिवसेदिवस तरुण होत जाणारी ही मुलं आता अगदी लहान, अगदी असहाय वाटत होती. हवा अगदी स्वच्छ होती. माझ्या चष्म्यामागे मात्र मळभ दाटून येत होते. 

घरी आलो. अंथरुणावर पडलो. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. विविध प्रसंगांचे, आठवणींचे तुकडे मनात उलटेसुलटे फिरत होते. मृत्यूच्या विक्राळ दर्शनाने बावरलेल्या, हादरून गेलेल्या त्या कोवळ्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोरून हालत नव्हते. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.
शेवटी उठलो. एक आवडते पुस्तक काढले. शेवटचे पान उघडले आणि वाचू लागलो…

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मिकी नाहीसे झाले. त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठेतरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.
अशव्त्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित ‘समजत नाही, समजत नाही’ असे म्हणत एक उच्छ्वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात’ समजत नाही, समजत नाही, समजत नाही’
की ‘समजत नाही, समजत नाही ‘ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील?  ते देखील समजत नाही .

Uncategorized में प्रकाशित किया गया | 8 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए – समारोप

दुःख, हळवेपणा आणि जी ए

‘धुक्यातून उलगडणारे जी ए’ ही लेखमालिका लिहिताना एक लेखक आणि त्याहीपलीकडचा एक माणूस म्हणून जी. ए. कुलकर्णींचा शोध घ्यावा असे मनात होते. आता या लेखाद्वारे ही मालिका संपवताना त्यातले फारसे काही हाती लागले नाही, अशी असमाधानाचीच भावना मनात जास्त करून आहे. याचे एक कारण असे, की जी. एंचे व्यक्तिमत्व इतके गुंतागुंतीचे आणि बहुरंगी आहे, की आता केवळ त्यांचे लिखाण आणि त्यांच्या आठवणी यांवरून त्याचा धांडोळा घेणे अशक्यप्राय वाटते. ही मालिका लिहावीशी वाटली याचे प्रमुख कारण म्हणजे जी. एं. च्या निवडक पत्रांचे प्रकाशित झालेले चार खंड. या मालिकेच्या निमित्ताने हे खंड अक्षरशः अनेकदा वाचावे लागले / वाचता आले… माझ्या दृष्टीने हेच या मालिकेचे फलित आहे. पण तसे करत असताना हा अनेक मितींचा लेखक आपल्या हाती शतांशानेही लागला नाही ही अतृप्तता प्रकर्षाने जाणवते. ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ मधील मास्तर कुणाला तरी म्हणतात. ‘याच्या डोक्याचे टोपण काढून आत काय चालले आहे, हे बघण्याची सोय असती तर.. ‘ जी. एं. च्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी त्यांची पुस्तके आणि त्यांची पत्रे यांतून हा माणूस आपल्याला कितपत कळाला याचा शोध घेताना, बहुदा काहीच कळाला नाही, असा अस्वस्थ करणारा विचार मनात येतो.
पण ते असो. जी. एं. च्या कथांमधील दुःख आणि जी. एं. चा वैयक्तिक जीवनातील हळवेपणा – संवेदनशीलता म्हणूया फार तर – यावर चार शब्द लिहून ही मालिका संपवावीशी वाटते. जी. एं. च्या बहुतके कथा या शोकांतिका आहेत, त्यात कुठे आशावादाचा किरण दिसत नाही, माणसाची हतबलता आणि नियतीशरणता या एकाच सूत्रावर त्यांच्या सगळ्या कथा बेतलेल्या आहेत- जी. एं. च्या लेखनावरील हा दुसरा मोठा आरोप. पहिला अर्थातच त्यांच्या लिखाणातल्या भाषेवरचा आणि त्या भाषेतील प्रतिमाप्रेमावरचा.
असे काय जगावेगळे दुःख या माणसाच्या वाट्याला आले असावे ज्यामुळे याचे सगळे आयुष्यच यातनेने गच्च गच्च होऊन गेले? याचा शोध घेऊ जाता जी. एं. ना लहान वयातच आलेले पोरकेपण आठवते. त्यांच्या (पत्र) लेखनात त्यांच्या एक सावत्र भावाचा उल्लेख येतो, पण तेही काही घट्ट माहेरनाते नसावे. इंदू, सुशी आणि जाई या तीन सख्ख्या बहिणी अगदी अकाली मरण पावल्याने त्यांच्या आयुष्यातल्या ‘बहिणीचे प्रेम’ या विषयावर प्रकाश पडल्यासारखा वाटतो.
जी. एंना त्यांच्या प्रकृतीने कधी चांगली साथ दिली नाही. विशेषतः पन्नाशीनंतर त्यांना कित्येक वर्षांपासून छळणारी पोटदुखी अधिकच त्रासदायक होत गेली. शेवटच्या दहा-बारा वर्षांत जी. एंनी म्हणावे असे काहीच लिहिले नाही ( सन्माननीय अपवाद म्हणजे ‘माणसे अरभाट आणि चिल्लर) याचे हेही एक कारण असावेसे वाटते . कैक वर्षे असह्य पोटदुखी आणि तिच्यावर वर्षानुवर्षे केलेले विफल उपचार आणि त्यांत खर्च झालेला वेळ, पैसा आणि शेवटी हाती उरलेला फक्त मनस्ताप – यामुळे एखादा माणूस पूर्ण खचून लोळागोळा झाला असता. धारवाडला असताना जी. एंना वारंवार फ्लू आणि खोकला यांनी त्रस्त केले होते. यातून बाहेर पडले की त्यांना विलक्षण अशक्तपणा येत असे. (आपल्याला खोकल्यावर अडुळसा हे औषध सुचवणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी मिष्किलपणाने लिहिले आहे, ‘ तुमच्या पत्नीचा खोकला अडुळशाने गेला, करण तो साधा खोकला होता, माझा खोकला हा एक इरसाल ‘हार्डंड’ स्मोकरचा आहे! ). हे इतके कमी की काय, म्हणून त्यांना नंतर मोठा दृष्टीदोष झाला. त्यांच्या डोळ्यांना रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या दुर्बळ झाल्या, आणि जी. एंची दृष्टी अगदी मंद झाली. मला वाटते, या ठिकाणी जी. एंनी आपले बस्तान आवरायला सुरवात केली असावी. ‘माझे वाचन संपले, की मी संपलोच’ असे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे. तरीही ते आपल्या अधू डोळ्यांनी पुण्यात – त्यांच्या नावडत्या पुण्यात चांगल्या वाचनीय (इंग्रजी) पुस्तकांच्या शोधात भटकत राहिले. फक्त शेवटचा ल्यूकेमिया हा त्यांनाही अनपेक्षित असावा. पण या अखेरच्या पाहुण्याचे त्यांनी अगदी मनापासून स्वागत केले असले पाहिजे, यात मला तरी तिळभर शंका वाटत नाही.
आपल्या लिखाणाच्या बाबतीतही जी. ए. कायम असमाधानीच राहिले; किमान तसेच त्यांनी इतरांना लिहिले आहे. ‘आपल्या कथा म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या आयुष्यात पाहिलेल्या व्यक्तींना वाहिलेली तिलांजली (जी. एं च्या भाषेत ‘तर्पण’) आहे’ असे ते म्हणतात, पण आपल्याला जे लिहायचे होते त्यातले काहीच कागदावर आले नाही अशी एक खंत त्यांना वाटत राहिली. कदाचित उत्तमोत्तम जागतिक साहित्य वाचल्यानंतर अशी खंत प्रत्येक विचारी लेखकालाच वाटत असावी. त्यातून आपल्याला आपल्या कथांमध्ये म्हणायचे काय होते, आणि वाचकांनी, समीक्षकांनी त्यांचा अर्थ काय लावला यातली तफावत त्यांना अस्वस्थ करून जात असावी. शेवटी ‘Is it worth it?’ हा त्यांना पडलेला प्रश्न हेच सांगून जातो. ‘प्रदक्षिणा’ या त्यांच्या कथेबाबत मी पूर्वी लिहिले होतेच. तेच त्यांच्या ‘पुनरपि’ या कथेबाबत झाले. या कथेच्या शीर्षकातच असा ठळक संकेत (‘पुनरपी जननं पुनरपी मरणं’) ठेवूनही या कथेचे आकलन फारच मोजक्या लोकांना झाले, हे त्यांना या कथेचे, पर्यायाने आपल्या लिखाणाचे अपयश वाटत होते. तेच ‘तळपट’ बाबत, तेच ‘माणसाचे काय, माकडाचे काय’ बाबत… आणि शेवटी त्यांच्या रुपककथा (जी. एं चा शब्द ‘दृष्टांतकथा’) सामान्य वाचकाने ‘पार अगम्य बुवा! ‘ म्हणून मोडीत काढल्यावर तर त्यांना ‘Is it worth it? ‘ असा प्रश्न पडणे स्वाभाविकच होते. ‘आपल्या कथा लिहून झाल्यावर आपण त्यांतून मुक्त होतो, आपल्या त्यांच्याशी अंघोळीपुरताही संबंध राहात नाही, आणि मग आपले वाचक, समीक्षक त्यांच्याविषयी काय म्हणतात याच्याशी आपल्याला काहीही घेणे असत नाही’ हा त्यांचा पवित्रा बाकी त्यांनी घातलेल्या अनेक मुखवट्यांपैकी एक असला पाहिजे. एरवी जी. एंसारख्या कमालीच्या हळव्या, संवेदनशील माणसाला वाचन, लिखाण या त्यांच्या आयुष्याचाच एक भाग होऊन गेलेल्या बाबतीत इतके जाड कातडीचे होणे शक्य नाही
जी. एंची ही संवेदनशीलता जशी त्यांच्या अनेक कथांमधून व्यक्त झाली आहे, तशीच त्यांच्या वैयक्तिक पत्रव्यवहारातूनही. या बाबतीत जी. एंनी लिहिलेली दोन पत्रे जशीच्या तशी उधृत करावीशी वाटतात. पैकी एक पत्र त्यांनी आपला लाडका लव्हबर्ड (बडरिजर) -नाद -गेल्यानंतर आपल्या बहिणीला लिहिले आहे. ते म्हणतातः
प्रिय नंदा,
एक वाईट बातमी.
नादचे छोटे निळे आयुष्य शुक्रवारी संपले. चार दिवसांपूर्वी अचानक त्याच्या पायातील शक्तीच गेली. दांडीखेरीज तो इतर कुठे बसत नसे. त्यामुळे खालून वर जायच्या धडपडीत तो वरचेवर खाली पडायला लागला. मला स्वतःला असल्याबाबतीत काय करायचे माहीत नाही आणि येथे पक्षांच्याबाबतीत (पुण्या-मुंबईप्रमाणे) डॉक्टर मिळत नाहीत. आम्ही शक्य होते ते केले. प्रभावतीने त्याच्यासाठी खालीच कापडाची गादी केली व ती त्याला हातात धरून दाणेपाणी देत होती. गुरवार रात्री तर तिने त्याला रात्रभर हातावरच ठेवले, पण या साऱ्याचा काही उपयोग झाला नाही. मी त्याला हातात घेतले तेंव्हाच मी तिला सांगितले की हा दोन दिवसांपेक्षा टिकायचा नाही. तो आमच्याजवळ दहाअकरा वर्षे होता. त्या पक्षांचे वय बारा ते पंधरा वर्षे असते, असे मी वाचले होते. कदाचित वार्धक्यामुळे हे आज ना उद्या होणार होतेच, पण झाले तेंव्हा आम्हाला एकदम फार व्याकूळ वाटले हे खरे. दोन दिवसांत त्याला झालेला त्रास पाहून मला मात्र वाटले, जर तो सुधारणार नसेल, तर शक्यतो लवकर तो संपलेलाच बरा.
तो घराचा एक भागच झाला होता. दोनचार चिमूट दाणे, थोडे पाणी, आणि कोथिंबीर एवढीच त्याची अपेक्षा, व तेवढ्यासाठी तो उत्साहाने गरगर फिरत असे. मुंबईला मी अनेक पक्षी पाहिले, त्यांत उत्साहाने तो एकदम पुढे आला, म्हणून मी त्याची निवड केली होती. तो वाढला, त्याला पिलेही झाली आणि आता सगळेच संपले.
सकाळी देवपूजेच्या वेळी घंटा वाजली की तो हटकून वरून ओरडत असे. आता मला सकाळी फार चुकल्यासारखे वाटते.
सगळ्याच गोष्टींची सवय होते त्याप्रमाणे या गोष्टीचीही सवय होईल.या आधीदेखील दोनचार पक्षी गेलेच. पण नादची गोष्ट निराळी. त्याच्या आठवणीने एकदम उदास वाटते. पण मुक्कामाचे दिवस ठरलेले असतात. आता अनेकदा वाटते, पक्षी वगैरे जिवंत गोष्टींच्या भानगडीत आपण पडायला नको होते, म्हणजे आपण होऊन आणलेली ही व्यथा सहन करावी लागली नसती.
पण मग त्याचे मऊ निळे अंग, त्याचे हातावर येऊन दाणे टिपणे आठवते, व व्यथेला मऊपणा आहे हेही जाणवते.
त्याचे राहणे तेवढेच होते. ती आठवण मी आमच्या बागेत लिंबाच्या झाडाखाली झाकून टाकली.
बराय.
तुझा,
जी. ए. कुलकर्णी
असेच एक व्याकूळ पत्र जी. एंनी श्री. पु. भागवतांना लिहिले आहे – माधव आचवल गेल्यानंतर. त्यात ते म्हणतातः

माधवविषयी श्री. भटकळांचे पत्र आले. मी थोडा वेळ खिळल्यासारखा झालो. तो आजारी होता हेदेखील मला माहीत नव्हते. त्याच्या मागच्या attack विषयी माहिती होती, पण ती फार जुनी गोष्ट.
माझ्या केवळ सुदैवाने मिळालेला हा एक रसिक मित्र. त्याने पुष्कळ पत्रे लिहिली. मोठ्या त्वेषाने वादविवाद केला. हळुवारपणे पुस्तकांविषयी लिहिले. मला वाटते, रस्त्यात पोरे गोट्या खेळतात त्यावर जरी त्यीने लिहिले असते तरी ते ताजेतवाने वाटले असते. झाडांच्या बाबतीत man with a green thumb म्हणतात त्याप्रमाणे तो होता. त्याने थोडे लिहिले; पण ते सोन्याच्या नाण्याप्रमाणे झगझगीत, बिनगंज आहे. (‘किमया’ सारखे दुसरे पुस्तक तुमच्या व भटकळांच्या यादीत नाही)
त्याने कधी कविता लिहिल्या की नाही, हे मला माहीत नाही. पण तो कवीसारखा जगला. मला त्याने कवीप्रमाणे पत्रे लिहिली. त्यामुळे मला आज एखादे गीत संपल्यासारखे वाटते. गीत आणि गीताबरोबर तो आवाजही कायमचा!
काही लिहिले तर आता शब्द टरफलाप्रमाणेच वाटतील.
Farewell, my friend. I am sure wherever you are, you will create a small, sun-filled garden around you.
And a small bird will come, and sing, not specially for you, but only for you.
हे वाचल्यानंतर हा तथाकथित माणूसघाणा, तुसडा, एकटा राहाणारा माणूस आतून किती नाजूक, हळव्या मनाचा होता, याची कल्पना येते.
या अक्षम्य दुर्गुणाच्या – दुर्गुणाच्याच म्हणतो-जोडीला जी. एंमध्ये संकोच आणि स्वाभिमान – पराकोटीचा तीव्र स्वाभिमान- हेही दोन भीषण दुर्गुण होते. ‘काजळमाया’ या त्यांच्या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले, पण काही तांत्रिक बाबींवरून त्यावर वादंग निर्माण होताच जी. एंनी ते सडेतोडपणाने परत करून टाकले. या बाबतीत त्यांच्या असंख्य चाहत्यांनी, मित्रांनी, समकालीन लेखकांनी आणि शेवटी साहित्य अकादमीनेही केलेली रदबदलीचे प्रयत्न त्यांनी कठोरपणे धुडकावून लावले. कुणाच्या घरी जेवायला जाणे असो (मग ते त्यांच्या अगदी जवळच्या सुनीताबाई देशपांड्यांच्या घरी का असेना! ) की कुणाकडून कसल्या साध्या भेटी (त्यांच्या आवडीचे दुर्मिळ पुस्तक ते सिगारेटचे एखादे पाकीट! ) स्वीकारणे असो, जी. ए. अत्यंत संकोची आणि अवघडलेले राहिले. आपल्या पुस्तकांचे सगळे अधिकार प्रकाशकाला देऊन टाकणे आणि आणि पुस्तकांची दुसरी आवृत्ती काढायलाही नकार देणे या अत्यंत अव्यवहारी गोष्टींमागेही त्यांचे हेच अवघडलेपण असावे, असे वाटते. अमोल पालेकरांनी त्यांच्या कथेवर चित्रपट काढण्यासाठी (‘कैरी’) त्या कथेचे अधिकार जी. एंकडून विकत घेतले आणि त्याबाबत जी. एंना काही रक्कम दिली; तर हा चित्रपट काढण्यास विलंब होत आहे असे दिसल्यावर जी. ए. कमालीचे अस्वस्थ झाले व त्यांनी ती रक्कम पालेकरांना (हातकणंगलेकरांतर्फे) परत करण्याची तयारी दाखवली, हे असेच एक दुसरे उदाहरण.
अशा या कापूसमनाच्या माणसाला व्यावहारिक जगात ‘तयार’ असलेल्यांनी धक्केही बरेच दिले. पैशांच्या बाबतीत त्यांची फसवणूक झाल्याचे किमान दोन पुसट उल्लेख त्यांनी लिहिलेल्या पत्रांत (अगदी नाईलाज म्हणून) येतात. आपल्या पुस्तकांचे मुद्रण, त्याचे मुखपृष्ठ याबाबत अतिशय आग्रही काटेकोर असलेल्या जी. एंना त्यांच्या काही चित्रकार मित्रांनी ऐन वेळी दगा दिल्याचे संदर्भ वाचूनही वाईट वाटते. त्यांचे अखेरच्या काळातले प्रकाशक आणि त्यांच्या पुस्तकांवरील मुखपृष्ठाचे चित्रकार यांच्यात जी. एंच्या मृत्यूनंतर ‘आपणच जी. एंच्या अधिक जवळचे कसे होतो’ हे दाखवण्याची चढाओढही आपल्याला व्यथित करून जाते. दळवींसारखा जी. एंचा घट्ट मित्र शेवटच्या काही वर्षांत जी. एंची चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवत नाही (कारणे काहीही असोत! ) आणि सुनीताबाई देशपांड्यांबरोबरचेही अत्यंत दीर्घ आणि खोल मैत्रीसंबंध हळूहळू विरून जातात… जी. एंविषयी मनात करुणा भरून येते.
आणि मग मृत्यूआधी जेमतेम दोन-तीन महिने जी. एंनी हातकणंगलेकरांना लिहिलेले ते (इंग्रजी)पत्र. बहुदा जी. एंनी लिहिलेले शेवटचेच पत्र. त्यातही जी. ए. काही नवीन वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहितात, आणि शेवटी म्हणतात, (मूळ परिच्छेदाचे मराठी भाषांतर करण्याचे धाडस माझे! )
‘तुम्ही म्हणता, हातकणंगलेकर, की मी आता पुण्यात हळूहळू रुळत चाललो आहे. तुमचे म्हणणे अगदी चूक आहे. पुण्यात मी कधी रुळू शकेन, असे मला वाटत नाही. फक्त आता या बाबतीत मी कुणाशीही काही बोलायचे नाही, असे ठरवले आहे. विशेषतः प्रभावती आणि नंदाशी. त्यांना मग फार वाईट वाटते…’
या मालिकेच्या निमित्ताने या अरभाट लेखकाची लेखकापलीकडील एक अरभाट माणूस म्हणून मला ओळख झाली हेच मला पुरेसे आहे. हे लेख लिहायला सुरवात करताना माझी जशी चाचपडल्यासारखी अवस्था होती, तशीच आजही आहे; पण मी हे लिहावे म्हणून मला वरचेवर उत्तेजन देणाऱ्यांचा आणि बरेवाईट प्रतिसाद देणाऱ्यांचा मी आभारी आहे.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां

नफरत करनेवालोंके..

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही अविस्मरणीय विनोदी नटांमध्ये माननीय श्री. देवानंदजी यांचे नाव घ्यावे लागेल. कारकिर्दीच्या पूर्वार्धातील त्यांचा तो केसांचा कोंबडा, त्यांची ती पक्षाघात झालेल्या तरसासारखी चाल, संधीवातावर उपचार म्हणून व्यायाम घ्यावेत तशी ती त्यांच्या सांध्यांची हालचाल वगैरे. ‘पाकिटमार’ मधल्या ‘ये नयी नयी प्रीत है’ या सुरेल गाण्यावर देवानंदजी स्प्रिंगच्या बाहुलीसारख्या हालचाली करतात. ‘मुनीमजी’ मधली गाणी बघताना तर हसू आवरत नाहीच, पण त्या गाण्यांच्या चित्रीकरणाच्या वेळी कॅमेरामन आणि सहकलाकारही हसून हसून खाली पडले असतील, असे वाटते.वर्षानुवर्षे फक्त सॅलडस खात राहिल्याने त्याने आपली कटी अगदी होती तशी राखली (त्याचे बुद्धीही अगदी होती तशी राहिली, हा त्यातला खेदाचा भाग! ) आणि पन्नाशीतही आपले देखणे रुप टिकवून ठेवले. (देवानंदचे वजन वाढले नाही, कारण त्याला क्रॉनिक आमांश आहे अशी एक फाजील वदंता आहे, पण ते सोडून देऊ! )
पण हा देवानंद हाच हिंदी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट हीरो. खराखुरा आणि एकमेव चॉकलेट हीरो. ‘ज्युएल थीफ’ मध्ये ‘एक ऐसा हार पेश करुंगा जो आपके गले से लगकर हार नही बल्की जीत लगेगा’ हे तो असं काही म्हणाला की तनुजा राप्पकन त्याच्या प्रेमातच पडली. ‘तू कहां ये बता’ असं म्हणत त्यानं आवाहन केलं आणि सिमल्यातल्या थंड रात्री दरवाजा उघडून नूतन त्याला सामोरी आली. ‘तीन देवियां’ एकाच वेळी त्याच्या प्रेमात असणं शक्य आहे असं वाटावा तो देवानंद. सोनपापडीसारख्या साधनानं ज्याच्यासाठी ‘तेरा मेरा प्यार अमर’ अशी आळवणी करावी असा एकमेव देवानंद. अशा या देवानंदला काही मोजक्या चित्रपटांत त्याचाच भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याच्या दिग्दर्शनाचा परीसस्पर्श झाला आणि देवानंद चक्क चांगले काम करून गेला. विजयानंद हा खरं तर एका वेगळ्या लेखाचाच विषय आहे. गोल्डीने देवानंदमधले गुण ओळखले आणि त्याच्यासाठी अनुरुप अशा भूमिका लिहिल्या. गोल्डीच्या दिग्दर्शनाखालीच देवानंद ताब्यात राहिला, आणि म्हणूनच गोल्डी -देव या जोडीने काही फार मनोरंजक, फार वेगळे चित्रपट दिले. आर. के. आर. नारायणच्या कथेवर गोल्डीने ‘गाईड’ केला, ए. जे. क्रॉनिनच्या ‘सिटाडेल’ वर ‘तेरे मेरे सपने’ केला, बरीच उधार उसनवारी करून ‘ज्युएल थीफ’ हा भन्नाट प्रकार केला. अशातलाच एक तद्दन गुन्हेगारी मसालापट म्हणजे ‘जॉनी मेरा नाम’. १९७० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे विजय आनंदच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाची, संवादलेखनाची, सर्व कलाकारांच्या अभिनयाची आणि गीत संगीताची जमून आलेली भट्टी. कोणताही सामाजिक संदेश नाही, कुठल्या प्रश्नाला हात घालणं नाही, काही नाही. फक्त करमणूक. शंभर टक्के अस्सल, निर्भेळ आणि दर्जेदार करमणूक. पण अगदी बांधेसूद आणि घट्ट पीळ असलेली करमणूक.
१९७० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही ताजातवाना वाटतो.हेमा मालिनी ही या सिनेमात केवळ – या शब्दाबद्दल माफ करा – ‘चिकणी’ दिसते. जुन्या जमान्यातला ‘मारू’ हा शब्द इथे वापरावासा वाटतो. पन्नाशीतला देवानंद आणि ऐन तारुण्यातली हेमा मालिनी यांचा जोडा अगदी रती मदनाचा वाटतो. देवानंदची या चित्रपटातली भूमिका बॉंडसारखी मिष्कील आहे. या रुपवान रेखाच्या आपण प्रेमात कसे पडलो याचा खुलासा प्राणजवळ करताना ‘जब दरवाजा खुला… ‘ हा लांबलचक संवाद देवानंदची मिमिक्री करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता. हेमा मालिनीही देवानंदच्या तोडीस तोड वाटते. कुठेही तिचे नवखेपण या चित्रपटात दिसत नाही. प्रेमनाथ या नटाने रणजीत आणि राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग या भूमिका झोकात केल्या आहेत. त्याची ऐयाश वासनांध वृत्ती, स्वार्थी, कुणावरही विश्वास न टाकणारा स्वभाव आणि ‘हुस्न के लाखों रंग’ या गाण्याच्या वेळी शरीरात पेटत चाललेली वासनेची आग दाखवणारी त्याची देहबोली. प्रेमनाथला चांगले दिग्दर्शक मिळाले की तोही बऱ्यापैकी काम करत असे. (दुसरे पटकन आठवणारे उदाहरण म्हणजे ‘बॉबी’ मधला जॅक ब्रिगांझा, तिसरे गोल्डीच्या दिग्दर्शनाखालचेच ‘तीसरी मंझिल’ चे). तसेच प्राणचेही. प्राणचा मेलोड्रामा भरात असताना (शम्मी कपूर, मनोज कुमार हे हीरो आणि प्राण व्हिलन असलेल्या अनेक चित्रपटातला, उदाहरणार्थ) त्याच्याकडून नैसर्गिक अभिनय करवून घेणम हे निर्विवादपणे दिग्दर्शकाचं कसब मानावं लागेल. (दुसरे उदाहरण ‘परिचय’ चे) प्राणने ‘जॉनी मेरा नाम’ मध्ये मोतीच्या भूमिकेत बहार आणली आहे. मोतीची स्वामीनिष्ठा, तरीही मालकाच्या ऐयाश वृत्तीबद्दलची त्याची नाराजी ही प्राणने सुरेख दाखवली आहे. प्राणच्या करड्या आवाजाचा विजय आनंदने छान वापर करून घेतला आहे. मुलीचे अपहरण केलेल्या पंडिताला बोलावताना त्याने ‘पंडितजी इधर’ असे काही म्हटले आहे की ज्याचे नाव ते. ‘हेमा मालिनी गुन्हेगारी काम करायला नकार देते तेंव्हा ‘रायबहाद्दून भूपिंदरसिंगकी बेटी ये कह रही है?’ या प्रश्नातला खवचटपणाही तसाच. आता ‘जॉनी…’ इतक्यांदा बघितल्यानंतर मोतीच्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पनाही करवत नाही.
सामान्य नट-नट्यांकडून असामान्य काम करून घेणे हे चांगल्या दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. आय. एस. जोहर या आचरटसम्राटाकडून विजय आनंदने धमाल काम करून घेतले आहे. जीवनही टेचात वावरला आहे. इफिखारचा चीफ इन्स्पेक्टर मेहराही झकास. हा इन्स्पेक्टरही खेळकर आहे, आणि सोहन-मोहनचा मानलेला काका आहे. भूमिकेतल्या अशा शेडस चितारणे हे दिग्दर्शकाचे विशेष. अगदी नगण्य भूमिकेतले सज्जन आणि दुलारीही लक्षात राहातात.
‘जॉनी मेरा नाम’ मधले संवाद हे त्या चित्रपटाचे एक वेगळे बलस्थान आहे. त्याची उदाहरणे द्यायची म्हटले तर या चित्रपटाची पूर्ण पटकथाच उतरवून काढावी लागेल. ‘पलभरके लिये’ या गाण्याच्या आधीचा पूर्ण सीक्वेन्स आठवा. रायबहादुरांची चौकशी करणारी रेखा आणि तिचे प्रश्न टाळत प्रेमाच्या गोष्टी करणारा जॉनी. रायबहादुरांनी भेटायला नकार दिला हे ऐकून रेखाचे ‘जॉनी, तुम जरुर मुझसे कुछ छुपा रहे हो’ असे म्हणणे. ‘छुपाने की कोशिश कर राहा हूं’ जॉनी. ‘क्या? ‘ रेखा. ‘प्यार.. ‘ तिच्या गळ्यात हात टाकत जॉनी.त्याला हाकलून लावताना दाराच्या फटीतून घुसून खास देव अंदाजातला त्याचा प्रश्न ‘केवल इतना बता दिजीये, आप हमसे प्यार तो करतीं हैं ना? ‘
‘नहीं’
‘झूठा भी नही? ‘
‘नहीं… ‘
आणि मग ते केवळ पिक्चरायझेशन असलेले गाणे ‘पल भर के लिये.. ‘ किशोरदांचा ऐन फार्मातला आवाज आणि कल्याणजी आनंदजींची बढिया धून. गाण्याची पिक्चरायझेशनस ही तर विजय आनंदची खासियतच होती. (‘दिल का भंवर करे पुकार’,’तेरे घर के सामने’,’तुमने मुझे देखा’,’देखिये साहेबों’,’होटों पे ऐसी बात’,’ ये दिल ना होता बेचारा’ अशी सहज आठवणारी नावे.)
गुन्हेगारी पार्श्वभूमीवरच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात विजय आनंद विशेष खुलून येत असे. त्यातले बारकावे टिपण्यात विजय आनंदचा हात धरणारा कुणी नाही. हीराकडे ऐंशी लाखाचे हिरे आहेत, म्हणून त्याच्या मागावर असलेले पोलीस आणि त्यांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नातला हीरा. बंदरावर आपले सामान एका मोटारीत ठेवत असताना दुसऱ्या एका मोटारीकडे तो संशयाने बघतो. त्याचवेळी त्याला ओलांडून जाणारा एक अनोळखी माणूस पुटपुटतो, “वो गाडी पुलीस की है”
‘जॉनी मेरा नाम’ चे संवाद अगदी सहज बोलल्यासारखे आहेत. कमिशनर मेहरा काठमांडूत असताना त्यांना हीरा फोन करतो, “सुना है, बंबई के पुलीस कमीशनर यहां पर आये हुये हैं, क्या मै उनसे बात कर सकता हूं? ” दुसऱ्या बाजूला इफ्तिखारच्या चेहऱ्यावर संशय येतो. तो सावधपणाने म्हणतो, “जी.. आपने गलत सुना है. आप कौन बोल रहे हैं? ” यातला जीवनचा ‘बंबई’ हा शब्द खास त्याच्या ‘नारायण, नारायण’ स्टाईलने म्हटलेला… मजा आहे! आणि आय. एस. जोहरच्या वाट्याला तर त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम संवाद ‘जॉनी’ मध्ये आले असावेत. हीराला अटक करण्याचा प्रसंग ( व त्यातले ते ‘चू चू का मुरब्बा’ वरून झालेले भांडण!), तुरुंगात हीरा व जॉनीवर पाळत ठेवतानाचा प्रसंग, जॉनीचा नकली बाप झाल्यानंतरचा प्रसंग आणि सगळ्यावर कडी म्हणजे मोतीच्या अड्ड्यावर वेटरची आणि पर्सरची गल्लत झाल्यावरचा मिशा उपटण्याचा प्रसंग….
“पहले अपने मूछों के बारे में तो बताओ”
“मूछों के बारे में क्या बतांऊ? ”
“यही की इन मूछों का क्या मतलब है? ”
“क्या नामर्दों का जमाना आ गया! मूछों का मतलब बताना पडता है! अरे भाई, मूछ मर्द की निशानी होती है.. ”
” सो तो है. पर तुमने क्यों लगायी है? ”
“लगायी? कौन सी जुबान बोलते हो भाई”
“मैं तो हिंदुस्तानी बोलता हो. तुम कौनसी समझते हो? ”
“तो भाई, हिंदुस्तानी में मूछें लगाना नही बढाना कहते हैं”
“तो ये मूछें तुमने बढाई हैं? ”
आणि मग नंतर ‘खींचो इसकी मूंछे” चा गोंधळ. त्यातही व्ही. गोपालचे ते ‘पकडी गयी, पकडी गयी… ‘ हसून हसून पुरेवाट!
‘जॉनी..’ मधली गाणी सदाबहार आहेत. बाबुल प्यारे, हुस्न के लाखों रंग, मोसे मोरा शाम रुठा, नफरत करनेवालोंके, पलभर के लिये.. ही नुसती नावे आठवली तरी मनात ती धून वाजायला लागते. ‘ओ मेरे राजा’ हे त्यातल्या त्यात फिके. पण त्या गाण्याचेही पिक्चरायझेशन वाहवाच आहे. ‘बाबुल प्यारे… ‘ चा सुरवातीचा आलाप आणि मग सगळे गाणेच ऐकण्यासारखे. ”मोसे मोरा शाम रुठा मधला ‘जय जय शाम राधे शाम’ हा गजर तर नास्तिकालाही ठेका धरायला लावणारा. आणि ‘हुस्न के लाखों रंग’ तर…… असो.
तर असा हा ‘जॉनी मेरा नाम’. देवानंदच्या चाहत्यांसाठी मेजवानीच. ज्यांना देवानंद आवडत नाही अशानांही ‘नफरत करनेवालोंके सीनें में प्यार भर दूं’ या त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला लावणारा.

देव आनंद – जॉनी / सोहन
हेमा मालिनी – रेखा
प्राण – मोती / मोहन
जीवन – हीरा
प्रेमनाथ – रणजीत / राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग
आय. एस. जोहर – पहले राम / दूजे राम / तीजे राम
पद्मा खन्ना – तारा
रंधवा – बाबू
सुलोचना – सोहन आणि मोहनची आई
इफ्तेखार – चीफ इन्स्पेक्टर मेहरा
सज्जन – राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग
दुलारी – पुजाऱ्याची बायको

संगीतकार – कल्याणजी आनंदजी
निर्माता- गुलशन राय
दिग्दर्शन , संवाद, पटकथा- विजय आनंद

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

आयुर्वेद उवाच

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्याविषयी आम्ही अपार आदर बाळगून आहोत. एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे बाजारीकरण झाले पाहिजे या ‘सकाळ’ समूहाच्या मोहिमेत आयुर्वेदाचे कार्पोरेटायझेशन करून डॉ. तांबे यांनी आपला जो खारीचा वाटा उचलला आहे तो केवळ ‘काबिले तारीफ’ आहे असे आमचे मत आहे. हे करत असतानाच तंतोतंत ‘गरीबांचे रामदेव महाराज’ ही आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात डॉ. तांबे यांना आलेले यश पाहून तर आमचा उर भरून येतो, आणि ‘कोण म्हणतो मराठी माणूस उद्योजकतेत कमी पडतो? ‘ असे आम्हाला (दारेखिडक्या बंद करुन एकांतात) ओरडावेसे वाटते. डॉ. तांबे यांची शुक्रवारी ‘सकाळ’सोबत प्रसिद्ध होणारी ‘फॅमिली डॉक्टर’ ही पुरवणी तर आम्हाला साक्षात अमृतानुभव देऊन जाते. लहानपणी ‘चांदोबा’ किंवा ‘नवनीत’ आणि त्यानंतर काही विवक्षित रंगाच्या पातळ पॉलिथीन पेपरमध्ये गुंडाळलेली समाजवर्ज्य पुस्तके आम्ही ज्या आवडीने वाचली त्या आवडीने आम्ही हल्ली ‘फॅमिली डॉक्टर’ वाचत असतो. सांधेदुखीपासून ते मानसिक रोगांपर्यंत सगळे रोग दूर करणारे मॉडर्न धन्वंतरी आम्हाला डॉक्टरांच्या रुपात दिसू लागतात. साळीच्या लाह्या, नाचणीचे सत्त्व, उकडलेली पडवळे, दुधीचा रस यांमध्ये आम्हाला तांबड्या पांढऱ्या रश्शाचा, तळलेल्या सुरमईचा आणि सुक्क्या मटणाचा भास होऊ लागतो. शिवाय ही पुरवणी वाचल्याने आमच्या सामान्यज्ञानात अपरंपार भर पडली आहे, ते वेगळेच. एरवी ‘पिचू’ ही काय भानगड आहे, आणि त्याचे काय करायचे असते, याबाबत आमच्या मनात फार म्हणजे फारच गोंधळ होता. तो दूर केल्याबद्दल डॉ. तांब्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.
इतके सगळे व्याप मागे असताना (हो, ‘फॅमिली डॉक्टर’चे संपादन, त्यात लेख लिहिणे, वाचकांच्या शंकांना उत्तरे; एका माणसाने कायकाय म्हणून करावे? ) डॉक्टरसाहेब विविध समारंभांत उपस्थिती लावतात तेंव्हा बाकी आम्हाला जवळजवळ गहिवरुनच येते. चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव घेऊन रंगमंचावरून बाबामहाराज सातारकरांप्रमाणे सतत मंद स्मित करणाऱ्या डॉक्टरांची छबी जवळजवळ रोज प्रत्येक प्रमुख मराठी वर्तमानपत्रात (म्हणजे ‘सकाळ’ मध्ये) येत असते. आजच्या ‘सकाळ’ मध्ये आलेल्या छायाचित्रात बाकी डॉक्टरांच्या जोडीला रंगमंचावर प्रतापराव पवार, अनील अवचट, मोहन धारिया अशा नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या ऐवजी मराठीतली काही गायक मंडळी दिसली तेंव्हा अचंबा वाटला. बातमी वाचली तेंव्हा ‘जीवनसंगीत’ अर्थात गाण्यांतून आयुर्वेद किंवा आयुर्वेदातून गाणे अशी काहीशी ही भानगड आहे, असे कळाले. ‘आशयघन गाणी आणि भारतीय संगीत मंत्रांसारखेच काम करतात’ असे डॉक्टरांचे मत वाचले. जरासा गोंधळ झाल्यासारखा वाटला, (गाणी आणि मंत्र? मंत्रपुष्पांजलीऐवजी ‘कळा ज्या लागल्या जीवा’ चालेल का? गायत्री मंत्राऐवजी ‘एक लाजरा न साजरा मुखडा?’- हे आमच्या चावट मनाचे प्रश्न! ) पण नेटाने पुढे वाचत राहिलो. डॉक्टर पुढे म्हणाले काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव एकत्र येते ( ‘वर्तमानपत्रात ‘येते’ असे आहे, ते ‘येतो’ असे हवे होते’ हा आमच्या चावट मनाचा विचार आम्ही त्रिफळा चूर्णासारखा गिळून टाकला.), तेंव्हा जीवनसंगीत आकाराला येते’हे बाकी काही म्हणजे काही कळाले नाही.
मग पूर्ण लेख वाचल्यावर कळाले ते असे, की गाणी ही विशिष्ट रोग किंवा अस्वास्थ्यावरील रामबाण चिकित्सा आहे असे बालाजीपंतांना म्हणायचे आहे. त्या गाण्यांची प्रात्यक्षिके आणि त्यावर डॉक्टरांचे त्या गाण्यांचा औषधी उपयोग यावरील निरुपण असा तो कार्यक्रम होता. ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे आणि ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणे यामुळे पित्ताचे संतुलन होते, ‘मेरा रंग दे बसंती ‘ या गाण्याने हृदयातली शक्ती जागृत होते, ‘हवा मे उडता जाये’ या गाण्याने शरीराच्या नाड्या व सांधे मोकळे करण्याचा अनुभव येतो असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही चकीतच झालो! म्हणजे आता निर्मात्याला गीतकार, संगीतकाराबरोबरच एखाद्या आयुर्वेदाचार्यालाही करारबद्ध करावे लागणार तर!
तांबेजी पुढे म्हणतात, ‘शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी ‘दशरथा, घे हे पायसदान’ हे गाणे उपयुक्त आहे (बरोबर! खीरच ती! -पुन्हा आमचे चावट मन! ), तर रक्तदाब, मधुमेही रुग्णांना ‘नैनों में बदरा छाये’ हे गाणे( थ्यांक्यू डॉक्टर मदनमोहन कोहली! – पु. आ. चा. म.!). स्मृतीवर्धन आणि मेंदूचे विकार यासाठी ‘जो तुम तोडो पिया’ हे ‘सिलसिला’ चित्रपटातील मीराबाईचे भजन लागू पडेल तर हृदयविकारावर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ वर बेतलेले ‘किसीके मुस्कराहटोंपे हो निसार’ हे गाणे. ( ‘किसीके मुस्कराहटोंपे ‘ हे ‘वैष्णव जन तो वर बेतलेले? ऋषीचे कूळ? गाण्याचे मूळ?- पु. आ. चा. म.! )
चला! मग बंधू आणि भगिनींनो, मेडिक्लेमच्या पॉलिसीचा प्रीमीयम भरला नसेल, तर भरू नका! तेवढ्या पैशात काही क्यासेटी आणि सिड्या विकत घ्या. रोग खल्लास!
इन्शुरन्स एजंटाला आम्ही आजच घरी बोलावले होते. त्याला येऊ नको म्हणून फोन करावा म्हणून आम्ही फोन उचलणार तोच बालाजींचा आणखी एक अक्सीर इलाज नजरेस पडला.
बालाजी म्हणतात, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. (जिच्या केवळ दर्शनाने फास्टींग आणि पीपी दोन्ही शुगर्स वाढाव्या ती साधना, आणि तिला परमेश्वराच्या मीलनाची इच्छा? तीही अतिउत्कट? – पु. आ. चा. म.!) मलविसर्जन आणि आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे!

आमच्या हातातील रिसीव्हर गळून पडला. ‘हे गाणे सादर झाल्यानंतर ‘प्रेक्षागृहाकडून स्वच्छतागृहाकडे’ किती लांब रांग लागली’ असे विचारण्याचेही आमच्या चावट मनाला सुचले नाही!
तूर्त आम्ही आमच्या तमाम वयोवृद्ध नातेवाईकांना आणि इष्टमित्रांना त्यांच्या साठ्या आणि पंचाहत्तऱ्यांसाठी भेट देण्यासाठी म्हणून ‘बेस्ट ऑफ सलील चौधरी’ ही कॅसेट घाऊक दरात मिळेल का या चौकशीत आहोत. ग्लासभर गरम पाणी, दूधतूप, सकाळचा दुसरा चहा, ‘इसपगुल’ आणि लिक्विड प्याराफीन यांपेक्षा ही दूरगामी गुंतवणूक स्वस्तात पडेल असा आमच्या चावट मनाचा होरा आहे!

Uncategorized में प्रकाशित किया गया | 10 टिप्पणियां

मैफल

आण्णांनी तळव्यावरची तंबाखू नीट मळून घेतली. दोन-तीनदा ती या हातातून त्या हातात अशी केली. आणि मग तिचा एक तबीयतदार बार भरला. हात झटकून टाकत ते म्हणाले, “ऐका बांडुंगअली… ”
गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या बुवांनी हातातल्या सिग्रेटवरची राख झटकली. ते थोडेसे पुढे सरकले.
“माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं
सांगा राघू मी न्हाई कधी म्हटलं
आता नका रुसू
जरा जवळ बसू
खुदुखुदू हसू
दोन जिवाचं भांडण मिटलं”
“व्वा, आण्णा व्वा! ” बुवांनी दाद दिली. आण्णाही आता रंगात आले.
“नका वळवू हो मान
करा शब्दाचा मान
बघा देऊन ध्यान
माझ्या अंगावर काटं उठलं

आम्हा बायकांची सवय
नाही म्हणजेच होय
आता कशाचा संशय
राजाराणीचं नातं पटलं”
“आण्णा,आण्णा… गावरान लिहावं तर तुम्हीच! ” आण्णांचे हात हातात धरून बुवा म्हणाले. “आमची पेनं आम्ही भंगारात विकावी बघा! ”
“अहो तसं नाही बुवा! ” आण्णा गमतीनं म्हणाले “गद्यनगरीचे तुम्ही सरदार, तर पद्याच्या राऊळातले आम्ही पुजारी! काय खरं की नाही रामभाऊ?”
रामदादांनी मान हलवली. दादांच्या शेजारी बसलेले साध्या शर्ट-पँटमधले लहानसर चणीचे गृहस्थ हळूच म्हणाले, “बुवा, आण्णांची लेखणी पाहिली की भाईंचे शब्द आठवतात. सगळे शब्द ‘हमारे लिये कुछ सेवा’ म्हणून उभे असतील येथे! आमच्या ‘मुंबईचा जावई’च्या वेळेची गोष्ट सांगतो तुम्हाला, बुवा. शृंगारिक गाणं पाहिजे होतं आम्हाला. शृंगारिक, पण सभ्य. जरासं सूचकही. आण्णांनी जरा विचार केला आणि एका बैठकीत ‘का रे अबोला’ लिहून काढलं. त्यातली सूचकता मी तुम्हाला सांगायला नको…
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
आणि यातलं मीटर इतकं नेमकं आहे रामदादा, की मला फारसं काही करावंच लागलं नाही. नारळात जन्मतःच पाणी असावं तशी आण्णांच्या शब्दातच चाल दडलेली असते. बाकी पुढचं काम आशाबाईंनी अगदी सोपं केलं… ”
आण्णा खुशीत येऊन हसले.

पलीकडे संगीताची बैठक रंगात आली होती. “‘न तुम बेवफा हो’ ची काय चाल दिल्यायस भय्या! मान गये तुमको! ” केस आणि मिशा पिकलेल्या दादांनी त्या पंजाबी तरुणाचे हात हातात घेतले होते. “और तेरे ‘कदर जाने ना’ के तो क्या कहने! ”
“आपका आशीर्वाद है दादा! ” तो पंजाबी लाजल्यासारखा झाला होता. “आपके सामने तो बच्चा हूं दादा! आप तो पारखी हो! कुठूनकुठून असली रत्नं शोधून आणता खुदा जाने! आता या तपनकुमारचंच बघा ना… ” गर्दीत मागे लपलेल्या तपनकुमारला त्या पंजाब्यानं पुढं ओढून आणलं. “कहांसे लाये इस मुलायमसी आवाज को, दादा? ”
“अल्लाची देन आहे भय्या! मैं तो इक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं! या तपनलाही मी पहिला चान्स दिला खरा, पण त्याचं खरं चीज तूच केलंस भय्या! ‘बेरहम आसमां’ मध्ये काय धून आहे तुझी! आणि काय गायलाय बरखुरदार!
“शुक्रिया, दादा! मेहेरबानी.. ” तो लाजरा संकोची तरुण म्हणाला.
कोपऱ्यातून मेंडोलिनचे विलक्षण करुण सूर ऐकू आले. एक देखणी पण उग्र चेहऱ्याची व्यक्ती सगळ्यांकडे पाठ फिरवून एकटीच मेंडोलीन छेडीत बसली होती.
“आप अकेले क्यूं बैठे हो मियां? महफिलमें आ जाईये.. ” दादा म्हणाले.
“मला या वाजंत्रीवाल्यांच्यात बोलावू नका दादा. मी एकटा आहे तेच बरं आहे. ”
“असं कसं म्हणता मियां…? ”
“मग काय म्हणू दादा? ” त्याने मेंडोलीन खाली ठेवलं. “इस पंजाबी छोरे की तारीफ कर रहे थे आप. इतरांच्या धुना चोरून त्यावर जगणारे लोक हे.माझ्या ‘ये हवा ये रात ये चांदनी’ वरुन उचलून यानं ‘तुझे क्या सुनांऊ मैं दिलरुबा’ बांधलं. आणि हा म्हणे संगीतकार! ”
“अरे हो, हो, मियां! संगीत अल्लाघरची देन आहे. आप क्यूं खफा हो रहे हो? सात सुरांवर सगळ्यांचा तितकाच अधिकार आहे.. ” दादा म्हणाले.
“हां, फार तारीफ करू नका दादा. आपकोभी नही बक्षा इसने. आपल्या ‘सीनेमें सुलगते हैं अरमां’ वरनं यानं हुबेहूब ‘तुम चांद के साथ चले आओ’ घेतलंय. खोटं वाटत असेल तर विचारा त्याला.. ”
भय्या जरासा शरमला. “कुबूल मियां, कुबूल. वो तर्ज है ही इतनी प्यारी..”
“हम्म. ” तो उग्र चेहऱ्याचा माणूस म्हणाला. “पण लताकडून तू जे काही करून घेतलंस त्यासाठी एक जाम भरतो भय्या मी, खुदा मुआफ करे. माझ्याखालोखाल लताला न्याय देणारा तूच. ‘एक लता गाती है, बाकी सब रोती हैं’ असं मी म्हणालो
तर सगळी इंडस्ट्री तुटून पडली माझ्यावर. तू बाकी तेच सच आहे, हे दाखवून दिलंस सगळ्यांना. शाब्बास, शाब्बास बे फौजी. ”
” पण मियां, याच लताला तुम्ही म्हणे ऐकवलं होतं, ‘ लताजी ठीक से गाईये, ये हमारी तर्ज है, उस मियां की नही’? ”
“हां जरुर. आणि अगदी नौशादचं नाव घेऊन ऐकवलं होतं. अरे, लता असली म्हणून काय झालं? संगीतसे बडा कौन होता है? और हम? हम उसके पुजारी है भाई, कोई नौकर नही हैं. अल्लाचा हात डोक्यावर घेऊन पैदा झालेला असतो संगीतकार. मजाल है की कोई ऐरा गैरा हमसे ऐसी वैसी बात करें? भय्या, दुनियेला जूत्याखाली ठेवलं आपण. भूखे मर गये, पर कभी किसीके पास काम मांगने नही गये… ”
त्या पंजाबी तरुणाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. “सच्ची बात मियां, सच्ची बात. ही अकड फार जालिम चीज असते. हमसे अच्छा भला कौन जाने… ”
त्या उग्र चेहऱ्याच्या माणसानं मेंडोलीन उचललं. हलके हलके हिमवृष्टी सुरू व्हावी तसे हृदय पिळवटून टाकणारे करुण सूर पुन्हा हळुवारपणे बरसू लागले.

स्वत:शीच कुणीतरी म्हटलेल्या काही ओळी ऐकू आल्या आणि सगळ्यांचीच नजर तिकडे गेली.
“सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांनो, मी हीन-दीन, दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे असले तरी रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे… ”
हा कोण बुवा आणि तो हे काय म्हणत आहे या अर्थाने काही लोकांनी एकमेकांकडे भुवया उंचावून पाहिले.
पण त्या काळा चष्मा घातलेल्या पाठमोऱ्या माणसाने काही मागे वळून पाहिले नाही.

दुसऱ्या एका बाजूला चारच लोक काहीतरी बोलत होते. त्यातले एक चष्मेवाले, पातळ मागे फिरवलेले केस असणारे साध्या बुशशर्ट-पँटमधले गृहस्थ म्हणाले, “मलाही माझी वाट सापडायला फार वेळ लागला. सुरवातीला सामाजिक कादंबऱ्या, कथा… कायकाय लिहिलं. अहो, तुम्हाला खरं वाटणार नाही, एक नाटकही लिहून पाहिलं. मग ठरवलं की भय्या, आपली वाट वेगळी. फारशी मळलेली नाही, फार लोकप्रियही नाही. पण हेच आपण करायचं. ”
“पण कधी खंत नाही वाटली तुम्हाला? तुम्ही लोकप्रिय झालात, तुमचा स्वतःचा असा वाचक वर्ग निर्माण झाला, तुमच्या कथा कादंबऱ्या गाजल्यापण. समर्थ आणि अप्पा म्हणजे मराठीतले होम्स -वॉटसन असं लोक म्हणतात. पण… माफ करा हं, कधी पहिल्या फळीतले लेखक म्हणून तुमचं नाव आलं नाही. कुठले पुरस्कार, संमेलनाचं अध्यक्षपद असलं काही नाही. कधी… कधी आपल्यावर अन्याय होतोय असं वाटलं नाही? ”
ते चष्मेवाले गृहस्थ फक्त मंदपणे हसले.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंद्यांनी सिगारचा एक दीर्घ झुरका घेतला. आपल्या चष्म्यावरून एकदा प्रतिस्पर्ध्याकडं बघून घेतलं आणि पटावरील घोडा अडीच घरं पुढं नेला. “चेक, डिकास्टा” ते म्हणाले.
डिकास्टा किंचित हसला. “वाटलंच होतं! ब्रिलियंट मूव्ह, जिवाजीराव! पण हा डिकास्टाही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. हा आला आमचा राजा पांढऱ्या घरात! ”
खेळ कुतुहलानं बघणाऱ्या माणिकरावांनी अडकित्त्यात बराच वेळ धरून ठेवलेली सुपारी अखेरीस फोडली. “पन मी काय म्हनतो सीयेमसायेब, तुमी आपापसात समेट का नाय करून राह्यले. ”
“अहो तसं नाही, माणिकराव…. ” जिवाजीराव म्हणाले. एवढ्यात पटावर कुणाची तरी सावली पडली म्हणून त्यांनी मान वर करून बघीतलं. साधा कॉटनचा झब्बा पायजमा, चष्मा, उधळलेले कुरळे केस, खांद्याला शबनम अशी एक किरकोळ आकृती शेजारी उभी होती.
“अरे, ये ये ये.. ” जिवाजीराव उत्साहानं म्हणाले. “तुझी वाटच बघत होतो. किती उशीर केलास? काय डिकास्टा, आता आमची बाजू झाली की नाही भक्कम? ”
“तुमची? की आमची? ” डिकास्टानं मिष्किलपणे विचारलं.
“हम्म. बघूया कोणाची ते. बस, तू बस रे गड्या. ”
दिगू टिपणीस शेजारच्या खुर्चीत बसला.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके – प्रकाशवाटा

प्रकाश आमटेंच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच लिहिले पाहिजे, अशी काहीशी मनाची धारणा झाली. (आणि मग तेवढी गदगद आपल्याला लिखाणात आणता येईल की नाही, याविषयी मनात शंका निर्माण झाली!) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे!) तटस्थपणे हे वाक्य बरे आहे, ही उपमा चुकली आहे, हा शेवटचा पीळ ओ. हेन्रीसारखा, अशी चिकित्सा करता येते. आमटेंचे हे पुस्तक कोणत्याही चिकित्सेपलीकडचे आहे. काही काही लिखाणांत ‘आयुष्य नावाच्या जनावराचा वास’ इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही. ‘वो खलिश कहां से होती, जो जिगर के पार होता’ सारखे ते लेखन आपल्याला भेदून जाते.
प्रकाशवाटा’ हे मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकशाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक. वस्तुतः विलक्षण कर्तबगार माणसांच्या मुलांना फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. गांधींपासून गावसकरपर्यंत अशी उदाहरणे आहेत. ब्रॅडमनच्या मुलाने आपले आडनाव यासाठी बदलले म्हणतात. बाबा आमटे हे असेच एक आभाळउंच नाव. आमटेंची मुले सामान्य आयुष्य जगती, तर त्यांना त्याचे ओझेच झाले असते. प्रकाश आणि विकास या आमटेंच्या मुलांनी बाकी बाबांनी सुरु केलेले काम पुढे नेले आहे, वाढवले आहे. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’.
१९७३ साली सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची त्या काळातली वर्णने वाचताना अंगावर शहारा येतो. आसपास घनदाट, रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, वीज, पाणी, रस्ते… यातलं काहीही नाही, राहायला घर सोडाच, झोपडीही नाही, सपाट जागाही नाही, आणि ज्या माडिया गोंड आदिवासींच्या विकासासाठी हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही वेडे तरुण लोक घरदार सोडून या जंगलात राहायला आले, ते, भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले, शहरीकरणाचे वारेही न लागलेले , अतीमागासलेले आदिवासी लोक. अशा अवस्थेत नुसते पोकळ आदर्श आणि ”काहीतरी’ करुन दाखवायचं आहे’ अशी बालीश जिद्द कामाला येत नाही. जंगल हे पर्यटकांना कितीही मोहक वाटत असलं तरी शेवटी ही मोहकता जोवर मनात रात्रीचे डाकबंगल्यातले गरम पांघरुण शाबूत आहे, तोवरच कायम असते. निसर्गाच्या भीषण स्वरुपाशी सामना करताना सगळी शारीरिक आणि मानसिक ताकद पणाला लागते. अशा समग्र ताकदीनिशी हे झपाटलेले लोक कामाला लागले आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करुन हेमलकशाचे आजचे जे रुप आहे, ते त्यांनी साकार केले. आणि या अडीअडचणींचे स्वरुप जरी पाहिले, तरी या लोकांना प्रेरित करणारी ती कोणती लोकविलक्षण शक्ती आहे, असा प्रश्न पडतो.
भामरागड हा विभाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरचा भाग. आनंदवनापासून साधारण २५० कि.मि. अंतर. रस्ते जवळजवळ नाहीतच, म्हणून हे अंतर पार करायला चक्क दोन दिवस लागायचे. सगळा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला. हे जंगल रम्य असले तरी भयानक होते. प्रचंड पाऊस, प्रचंड थंडी आणि प्रचंड उन्हाळा. काही ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीवर पोचणार नाही इतकी घनदाट झाडी. जंगली पशुपक्षी, विषारी सापविंचू, पुरात वाटेल येईल ते गिळंकृत करणार्‍या नद्या. इथले स्थानिक म्हणजे माडिया गोंड लोक. समाजाच्या मूळ प्रवाहापासून कैक योजने दूर असलेली ही अतिमागास आदिवासी जमात. शिक्षण नाही, उपजीविकेचा निश्चित असा मार्ग नाही, लोकसंपर्क नाही आणि कागदोपत्री महाराष्ट्रात असूनही मराठी भाषेचा गंध नाही. स्थानिक माडिया बोलीभाषा ही मराठीपेक्षा संपूर्ण वेगळी अशी भाषा आहे. मागासलेपण इतके, की अंगभर कपडे घातलेला शहरी माणूस पाहिला की आधी हे लोक घाबरुन चक्क पळूनच जात.
अशा रानटी जागेवर जाऊन आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी करणे हे बाबा आमटेंसारखा माणूसच करु जाणे. बाबांचे वाढते वय बघून भामरागड प्रकल्पाचे जबाबदारी प्रकाश आमटेंनी स्वीकारली. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि या दुर्गम भागात त्यांच्याबरोबर यायला त्यांच्या उच्च्शिक्षित पत्नी मंदाताई बिनतक्रार नव्हे तर आनंदाने तयार झाल्या! कुठल्या मुशीतून असले लोक तयार होतात, कोण जाणे! हेमलकसा भागातली जमीन सरकारने या प्रकल्पासाठी देऊ केली आणि काही मोजक्या सहकार्‍यांबरोबर प्रकाश आमटे इथे आले. इथल्या अडचणींना तर अंतच नव्हता. प्रकल्पासाठी सपाट जमीन आणि राहायला तंबू ठोकायचे म्हणून साफसफाई करायला सुरवात केली, तर वनखात्याच्या लोकांनी मनाई केली. त्या काळातल्या आमटेंच्या कामाची कल्पना केली तरी हादरुन जायला होते. वीज नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, माणसंही नाहीत. होतं ते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. आनंदवनात रोगमुक्त झालेले, पण तरीही समाजानं अव्हेरलेले काही कार्यकर्ते हेमलकशाला आले होते. त्यांच्या मदतीनं प्रकाश आमटेंनी काम सुरु केलं. पण ज्यांच्या विकासासाठी हे काम सुरु केलं होतं ते आदिवासी या शहरी लोकांकडे फिरकतच नव्हते. मग माडिया भाषा शिकणं आलं, आदिवासींचा विश्वास संपादन करणं आलं, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं आलं…
आणि या वैद्यकीय उपचारांचे स्वरुप तर भीती वाटावी असे आहे. माडियांची जीवनशैली – हा शब्दतरी त्यांच्या बाबतीत लागू पडतो की नाही, कुणास ठाऊक- इतकी आदिम की प्रत्येक जण प्रचंड कुपोषणाचा बळी पडलेला असे.आंबील, भात आणि मिळेल ते प्राणी एवढंच अन्न. खायच्या प्राण्यांत अगदी मुंग्याही. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका मध्यमवयीन माणसाचं वजन केवळ २३ किलो होतं हे वाचल्यानंतर आपल्या हातातला घास तसाच राहातो.मलेरिया, सेरेब्रल मलेरिया, झाडांवरुन पडून हातपाय मोडणं, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणं असल्या या माडियांच्या समस्या. अस्वलाच्या हल्ल्याची आमट्यांनी वर्णन केलेली एक कथा मनावर एक कधीही न पुसणारा डाग पाडून जाते. डाग म्हणजे केवळ एक ठिपका नव्हे, तर एखादे लोखंडी अवजार लालभडक होईपर्यंत तापवून दिलेला चरचरीत डाग.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.आमटेंनी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला.
पण ही कथा इथे संपत नाही. त्याचे दोन्ही डोळे फुटले होते, त्यामुळे त्याला शिकार, जुजबी शेती असलं काही करणं शक्य नव्हतं. अशा बिन उपयोगाच्या माणसाला कोण आणि कसे पोसणार? त्याच्या नातेवाईकांनी त्याला खायला देणं कमी केलं, आणि उपासमारीनं तो माणूस दोन वर्षांत मरण पावला.
दुसरी अशीच एक कथा आहे ती कॉलर्‍याच्या साथीची. बांबूतोडीच्या कंत्राटदाराने जंगलात हजारो मजूर बांबू तोडण्याच्या कामावर आणले, पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे वगैरेंची व्यवस्था करण्याची त्याला काही गरजच भासली नाही. त्या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीचा वापर करायला सुरवात केली, आणि नदीचं पाणी भयानक प्रदूषित झालं. माडियांच्या वस्त्यांमध्ये कॉलर्‍याची साथ पसरली. एका रात्रीत तीनशे लोक आमट्यांकडे उपचारासाठी आले.एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. उपचारांनंतर मुलाला थोडं बरं वाटायला लागल्यावर ती मुलाला तिथंच ठेवून परत जायला निघाली. तिथल्या कार्यकर्त्यांनी तिला मुलाला पूर्ण बरं वाटेपर्यंत थांबायला सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली, “माझा नवरा काल या लागणीनं मेला. दोन मुलांना लागण झाली. त्या दोन्ही मुलांना घेऊन मी इकडं यायला निघाले, तर एक मुलगा वाटेतच गेला. त्याला झाडाखाली ठेवून मी इकडे आले. आता परत जाऊन त्याला पुरुन येते.”
‘प्रकाशवाटा’ मध्ये असे मनाचे तुकडे करणारे अनेक प्रसंग आहेत.अत्यंत बिकट परिस्थितीतून, जिवावर बेतणार्‍या प्रसंगांतून, सर्पदंश, मधमाशांचा, बिबट्याचा हल्ला, या सगळ्यांतून झगडत झगडत शेवटी जिवंत राहून हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणार्‍या काही झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंनी सुरु केलेली ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळते आहे, अधिक समर्थपणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांभाळते आहे – आमटेंच्या कथनात या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नव्हे, याचा आमटे विनयपूर्वक उल्लेख करतात. हा – त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर – ‘जगन्नाथाचा रथ’ ओढण्यात अनेक लोकांचा, संस्थांचा हातभार लागला आहे. त्यातली बरीचशी नावे आपल्याला अपरिचित आहेत – म्हणजे आपल्या परिचितांपैकी फारशा कुणाचे इकडे लक्ष गेलेले दिसत नाही. ‘पु.ल. देशपांडे फाऊंडेशन’ सारखे सन्माननीय अपवाद सोडले तर. आणखी एक सुखद धक्का देऊन जाणारे नाव म्हणजे नाना पाटेकरचे. नानाने फारसा गाजावाजा न करत या कामाला गेल्या काही वर्षांत तीसेक लाख रुपये दिले आहेत, हे वाचून त्याच्याविषयीचे मतच बदलून जाते. (तसे ते ‘प्रहार’ बघूनही बदलले होते म्हणा!)
पुस्तक वाचून होताहोता डोक्यात विचारांचा ‘गल्बला’ सुरु होतो. उत्तम पुस्तकाचे हे एक गमक मानले जाते म्हणे. पण त्यातला सगळ्यात अस्वस्थ करुन जाणारा विचार हा, की कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नाही, मनुष्यबळ नाही – अशा अवस्थेत चार लोक हे इतके आभाळाइतके मोठे काम करु शकतात. शासकीय उदासीनता ही तर आता आपण गृहीतच धरली आहे (‘ग्रेट भेट्’ मध्ये निखिल वागळेंशी बोलताना आमटेंनी याचे एक उदाहरण दिले होते. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आमटेंचे नक्की काम काय आहे, आणि ते कुठे आहे, याचा मंत्रालयात पत्ता नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शासकीय अभिनंदन आले ते आनंदवनाच्या पत्त्यावर – आणि तेही कुष्ठरोगी पुनर्वसनाचे काम केल्याबद्दल!) समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे. एक जुनी उपमा वापरायची तर ‘समुद्रातून एखादी जलपरी सुळकांडी मारुन वर यावी आणि समुद्राकडे पाठ करुन बकाबका भेळ खात बसलेल्या हजारो लोकांचे तिकडे लक्षही जाऊ नये’ असे काहीसे होते आहे. यातले चित्र थोडेसे – अगदी थोडेसे जरी वेगळे असते, तर हे चार लोक कायकाय करु शकले असते? मग लक्षात येते की सरकार आणि समाज यांच्यात थोडीशी जरी संवेदनशीलता शाबूत असती, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. प्रकाश आमट्यांनी लिहिले आहे की हेमलकशाच्या जंगलातले बहुतेक पक्षी तिथल्या आदिवासींनी खाऊन संपवले आहेत; अगदी चिमण्या कावळेही. जर आपण थोडेसे अधिक जागृत असतो, तर हजारो आदिवासींबरोबरच हे लाखो पशु-पक्षीही वाचले असते!
एका बाजूला आमट्यांच्या कामाचा अभिमान वाटावा, आणि दुसर्‍या बाजूला स्वतःची लाज वाटावी अशा दोन्ही भावना एकाच वेळी मनात जागवणारे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
प्रकाशवाटा
डॉ. प्रकाश आमटे
शब्दांकन: सीमा भानू
समकालीन प्रकाशन
१५६ पृष्ठे
किंमत २०० रुपये

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

खरं काय आणि खोटं काय

“दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू” गौतम म्हणाला. ” ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू कथा लिहितोस. कधीकधी चांगल्याही लिहितोस” गौतमचा स्वर किंचित मिश्किल झाला. ” म्हणून तुला वाटेल की लेखकाच्या कल्पनाशक्तीसमोर सत्य हे काहीच नव्हे. तुझ्या लिखाणातली पात्रं, त्यांचे विचार जगावेगळे, अगदी झगझगीत असतात असं वाटेल तुला. पण वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. या.. आसपास वावरणाऱ्या सामान्य, अतिसामान्य अशा लोकांच्या डोक्याची टोपणं काढून बघितली तर आत भावना, वासना, विकृती, विकार यांचं असं जाळं दिसेल तुला, की ज्याचं वर्णन करायला जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या लेखकाची प्रतिभा पुरी पडणार नाही. माणसाच्या मनाचा काही अंदाजच येत नाही बघ…”

” अरे पण गौतम, कुठे लिखाणातले झगझगीत रंग आणि कुठे हे तुझं वास्तवातलं जग – निव्वळ काळं, पांढरं, किंवा करडं फार फार तर… ” मी जरा जास्तच पुस्तकी बोलून गेलो असं मला वाटलं. गौतमही जरासा हसला. ” नाही, हस तू माझ्या बोलण्यावर, पण तुझं बोलणं काही पटलं नाही बुवा आपल्याला. माझ्या पद्धतीचं लिखाण घे, रहस्यकथा. तुला असं म्हणायचंय का की अगाथा ख्रिस्तीच्या एखाद्या कादंबरीतल्या रहस्यापेक्षा एखाद्या पोलीस स्टेशनच्या क्राईम डायरीत अधिक रोमांच असेल? किंवा दुसरं उदाहरण घेऊ. अं.. समजा भयकथा. धारपांची ‘लुचाई’ किंवा ‘चंद्राची सावली’ वाचताना अजूनही मध्ये थांबून आजूबाजूला बघून घेतो मी. हो, आणि तूसुद्धा. अगदी दिवसाही. असला थरार प्रत्यक्ष ‘तशा’ जागी गेलो तरी जाणवेल आपल्याला? लेखकाच्या कौशल्याला काहीच महत्त्व नाही असं म्हणायचंय काय तुला?”

“हां. तू म्हणतोस ते अगदीच काही चूक नाही” गौतमने सिगरेट पेटवली. सिगरेटच्या धुराच्या निळसर रेषांमागून तो त्याच्या किंचित खर्जातल्या आवाजात बोलू लागला. एखाद्या प्राध्यापकासारखा. एखाद्या तत्त्वज्ञासारखा. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखा म्हणा वाटलं तर.

“वास्तवाचे काळे, पांढरे, करडे रंग म्हणालास तू बापू. आपल्या सगळ्यांची आयुष्यं अशाच रंगाची असतात. पण याच्या किती छटा, किती शेड्स! वास्तव हे कंटाळवाणं, एका साच्यातून काढल्यासारखं असलं तरी ते एकमेकाच्या फोटोकॉपीसारखं नाही” गौतम झेरॉक्स कधीच म्हणत नसे. ” प्रत्येक आयुष्याचा निराळा पीळ असतो. प्रत्येक आयुष्याचे पदर वेगळे. रस्त्याच्या कडेला खड्डा खणता खणता थोडा वेळ थांबून बिडी ओढणारा एखादा मजूर घे. त्याच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे तुम्हा लेखकांना? त्याच्या आयुष्यात काहीच नाट्य नसेल? तो कधी संतापानं इंगळासारखा लाल झाला नसेल? कधी द्वेषानं, मत्सरानं धुमसला नसेल? कधी हतबलतेनं, अगदी निराश होऊन ढासळला नसेल? का कधी एखाद्या नाजूक स्पर्शानं मोहरला नसेल? पण यातलं किती आणि काय तुम्हा लेखकांना कागदावर आणता आलं आहे? लिखाण म्हणजे … निव्वळ कागदी बुडबुडे. त्याला वास्तवाची धग नाही. एखाद्या अनुभवातला जाळ जसाच्या तसा कागदावर उतरवता येणं अगदी अशक्य आहे. मुळात लिखाण ही प्रक्रियाच इतकी कृत्रिम आहे, की तिचा स्पर्श झाला की मूळ अनुभव मेलाच म्हणून समज तू बापू. माझी तक्रार ही तुझ्या लिखाणाविषयी नाही रे. तुम्ही लेखक मंडळी अगदी निष्ठेनं काम कराल, पण तुमची अवजारंच अशी बोथट, गंजलेली आहेत, त्याला तुम्ही काय करणार बापू?”

“हं. म्हणजे आमचं लिखाण ते तेवढं कृत्रिम, आणि तुझं, काय म्हणालास ते.. वास्तव ते तेवढं जिवंत असंच म्हणायचंय ना तुला?”

“अं, अगदी तसं नाही, पण जवळजवळ तसंच.”

“मग गौतमजी, या तुमच्या वास्तवात काय जिवंत आहे बघूया हं” मीही जरा चिडलो आणि खुर्चीवर अस्ताव्यस्त पडलेला ‘सकाळ’ उचलला. “छा! पेपर तर हल्ली चाळायच्याही लायकीचे राहिले नाहीत! पण यातली कुठलीही एक बातमी घेऊ आपण गौतम. मला सांग हं यात काय नाट्य, काय जिवंतपणा आहे ते! हे बघ, ‘वडगाव मावळच्या तलाठ्याला लाच घेताना अटक’. काय नाट्य आहे यात? सरकारी अधिकारी, सामान्य जनतेला नाडणे, लाचलुचपत, अगदी असह्य झाल्यावर कुणीतरी केलेली तक्रार. आता दोनचार दिवस आत जाईल तो आणि मग कुणाच्या लक्षातपण राहणार नाही ही बातमी. काय, काय नाट्य आहे यात? ”

“बापूसाहेब, तुम्ही नेमकी तुमचा स्वतःचा मुद्दा खोडून काढणारी बातमी निवडली. अरेरे! मर्फीज लॉ! ” गौतम हसत म्हणाला.
“का? काय झालं? ”

“बापू, हा चौधरी मला चांगला माहीत आहे. सरकारी नोकरांत अशी माणसं अपवादानंच बघायला मिळतात. धुतल्या तांदळासारखं चारित्र्य आहे त्याचं. त्याला अडकवलाय तिथल्या आमदारानं. माहुलीच्या अभयारण्यात गेल्या महिन्यात हरिणांची शिकार झाली होती बघ. त्यात महत्त्वाची साक्ष आहे चौधरींची. संपतराव जोंधळेची चाल आहे ही सगळी. आता हा आदर्शवादी तलाठी, त्याच्यावर दबाव टाकणारी ही राजकारणी धेंडं, चौधरीला रोजच्या रोज बसणारे चटके, तरीही ताठ मानेनं जगण्याची त्याची जिद्द… यातलं काय आणि कसं तुला तुझ्या एखाद्या कथेत लिहिता येईल? आणि समजा लिहिलीसच तू एखादी कथा, तर ती किती उबवलेली, किती कृत्रिम वाटेल? तेव्हा बापूसाहेब, आपला पराभव मोठ्या मनानं मान्य करा आणि शांतपणानं एक सिगरेट ओढा.” गौतम म्हणाला.

“आणि ते.. ते चौधरी? ” मी गौतमनं पुढं केलेल्या पाकिटातली सिगरेट उचलत विचारलं.

“ते सुटतील बापू. सकाळी शिंदे वकिलांशी बोललोय मी. आपल्याला अशा माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अशा माणसांची आपल्याला गरज आहे, बापू. आपल्यालाही आणि.. ”

आणि कुणाला गरज आहे हे मला आता कधीच कळणार नाही. गौतमचं वाक्य तोडून अचानक दरवाज्यावरची घंटी वाजली. काहीशा अनिश्चितपणे वाजवल्यासारखी. एकदा. दोनदा.

गौतम त्याच्या खुर्चीतून ताडकन उठला. हातातल्या सिगरेटचं थोटूक त्यानं भरून वाहत असलेल्या रक्षापात्रात चुरडून विझवलं. पश्चिमेकडची खिडकी उघडली आणि दारही उघडलं.

दारात एक तरुणी उभी होती. साधारण तीस- बस्तीस वय, किंचित स्थूलपणाकडं झुकणारा बांधा, सावळा वर्ण, महागडा पण एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला काहीसा विसंगत पोषाख आणि जरासा भडकच मेकअप. उंची डीओरंडचा वास. थोडक्यात जिला पाहिल्यावर कपाळावर एखादी आठी चढावी तशी व्यक्ती. अपेक्षेप्रमाणेच गौतमच्या कपाळावर गुरुदत्तसारखं आठ्यांचं जाळं उमटलं.

“गौतम.. गौतम सरदेसाई? ”

“मीच. या, आत या. ” गौतम त्याच्या नेहमीच्या मार्दवानं म्हणाला. स्त्रीदाक्षिण्य हा आता कालबाह्य होत चाललेला गुण गौतमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होता. ‘शिव्हलरी इज डाइंग फास्ट बट इट इज नॉट क्वाईट डेड, बापू’ तो नेहमी म्हणत असे.

ती तरुणी आत आली. थोडीशी बावरलेली, गोंधळलेली. गौतमनं दाखवलेल्या खुर्चीवर जराशी अवघडूनच बसली. फिरत्या नजरेनं तिनं एकदा आसपास बघून घेतलं.

“मी शर्वरी. शर्वरी कारखानीस. मला सुनेत्राकडून तुमच्याविषयी कळलं. सुनेत्रा साखरपे…? ”

“हां.. हां.. त्यांचं एक छोटंसं काम केलं होतं मी मध्ये” गौतम म्हणाला.

“तुमच्या दृष्टीनं ते छोटं असेल गौतमसाहेब, पण सुनेत्राताई म्हणते की तुमचे उपकार या जन्मात फिटायचे नाहीत. ”

गौतम संकोचला. स्तुती त्याला पचवता येत नसे. विशेषतः एखाद्या स्त्रीने तोंडावर स्तुती केली की तो अगदी लाजून जात असे.
त्याचा संकोच शर्वरीच्याही लक्षात आला असावा.

“मला एक सांगा मिस कारखानीस, चष्मा तुम्ही नेहमी वापरता, की फक्त नेटसर्फिंग करताना? ” गौतमने विचारलं.
शर्वरी दचकलीच. “तुम्हाला… तुम्हाला कसं कळलं हे? ” तिनं चाचरत विचारलं.

गौतम फक्त हसला. “ते जाऊ दे. काय, प्रॉब्लेम काय आहे? ” तिच्या समोरच्या खुर्चीत बसत त्यानं विचारलं.
शर्वरीनं जरा साशंकपणानं माझ्याकडे नजर टाकली.

“ओह, हा माझा अगदी जवळचा मित्र बापू, अगदी आपला माणूस आहे. तुम्ही अगदी मोकळेपणानं बोला मिस कारखानीस. ”

“गौतमजी, मी… आम्ही कोतवाल कॉलनीत राहतो. ‘इच्छापूर्ती’ बंगला. बाबांनी मोठ्या हौसेनं हा बंगला बांधला पाच वर्षांपूर्वी. पण त्यात राहायला ते काही फार दिवस जगले नाहीत. आम्ही राहायला आलो आणि सहा महिन्यांतच.. ” तिचा आवाज कापरा झाला. “हार्टचा त्रास होता त्यांना.. माझ्यावर फार जीव बाबांचा. मला भाऊ-बहीण कुणी नाही. ‘तुझं लग्न होईपर्यंत मला देवानं जगवावं बेटा’ ते नेहमी म्हणत असत. पण… ”

गौतमनं पाण्याचा ग्लास तिच्यापुढं सरकवला. शर्वरीनं पाण्याचा एक घोट घेतला आणि ती बोलू लागली.

“बाबा गेले आणि वर्षभरातच आईनं दामलेकाकांशी लग्न केलं. दामलेकाका बाबांचे बिझनेसमधले पार्टनर. नाही… तसं आधीपासून काही नसावं.. ” गौतमच्या उंचावलेल्या भुवया पाहून शर्वरी म्हणाली. “दामलेकाकांचं घरी येणंजाणं होतं. बाबांचा फार विश्वास काकांवर. काकांचं लग्न राहूनच गेलं असावं बहुतेक. बाबा गेले, मी होस्टेलवर. आई फार एकटी झाली होती. काकांनीच मग आईला विचारलं वाटतं, त्या दोघांनी ठरवलं आणि मला सांगितलं. मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. शेवटी आईला तिचं आयुष्य आहेच की. ”

“हम्म. ” गौतम म्हणाला.

“दामलेकाका म्हणते मी त्यांना, पण माझ्यापेक्षा फार मोठे नाहीयेत ते वयानं. इन फॅक्ट, आईपेक्षा लहानच आहेत ते जरासे. बाबांचा बिझनेस उत्तम होता. त्यांच्या गुंतवणुकीही चांगल्या आहेत. सगळ्या गुंतवणुकींची वारस म्हणून बाबांनी माझं नाव घातलंय. बंगलाही माझ्याच नावावर आहे. व्याज चांगल्यापैकी येतं मला. मी मला हवे तितके पैसे काढून घेते आणि बाकीचे आईकडं देते. तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना, गौतमजी? ”

“छे, छे, उलट भलतीच इंटरेस्टिंग आहे हो तुमची ही केस. मग पुढे? ”

“मी काही फार करियरिस्ट वगैरे नाही गौतमजी. ग्रॅज्युएट झाल्यावर आईनं लगेच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. एकदोन ठिकाणी जमतही आलं होतं, पण…. नाही झालं. मी तशी फार बाहेर जाणाऱ्यांतलीही नाही. वाचन, टीव्ही आणि हल्ली इंटरनेट – बस्स. एवढंच माझं आयुष्य. पण चारचौघींसारखा संसार असावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यातून माझ्या डोळ्यांमध्ये मोठा दोष आहे. तुम्हाला कसं कळलं माहिती नाही मला, पण जाड चष्मा घालूनही नीटसं दिसत नाही मला. इंटरनेटवर कविता लिहिते मी, पण स्क्रीनवर त्या वाचण्यासाठी भिंग घ्यावं लागतं मला. त्यातून तिशी झाली माझी. त्यामुळं फार अपेक्षा बिपेक्षा नाहीत माझ्या. दिलीप भेटले आणि आता सगळं ठरवल्यासारखं होईल असं वाटायला लागलं. पण नशीबच खोटं आहे हो माझं. आधी बाबा गेले आणि आता दिलीपही.. ” शर्वरी दोन्ही हातांच्या तळव्यांत चेहरा लपवून हुंदके द्यायला लागली.

मी आणि गौतमनं एकमेकांकडं बघितलं. गौतमनं मला हातानंच ‘असू दे’ अशी खूण केली आणि शर्वरीच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. पाचेक मिनिटानं शर्वरी शांत झाली.

“माफ करा, गौतमजी. कधी कधी मनावर ताबाच राहत नाही हो. ” ती जराशा अपराधीपणानं म्हणाली.
“असू दे. चालायचंच. तर काय म्हणत होता तुम्ही. हे दिलीप… ”

“दिलीप दातार. वासुदेव मधलं नाव. आमचं लग्न ठरलंय, पण.. ”

“थांबा, थांबा. मला जरा सविस्तर सांगा मिस कारखानीस. कोण हे दिलीप? कुठं भेटले तुम्हाला? ”

“सॉरी. तर.. महिन्याभरापूर्वीची गोष्ट. गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते मी. संध्याकाळच्या रागांच्या मैफिली होत्या बघा त्या आठवडाभर. माझी आणि आईची सीझन तिकिटं होती, पण आईचा पाय मुरगाळला आणि तिला बेडरेस्ट सांगितली डॉक्टरांनी. काका येतो म्हणाले माझ्याबरोबर, पण त्यांना ऐनवेळी टूरवर जावं लागलं. मग एक तिकीट त्यांनी परत केलं आणि मी एकटीच गेले. ते तिकीट ज्यांनी आयत्या वेळी काकांकडून विकत घेतलं तेच दिलीप. दिलीप दातार. बी. ई. आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दिलीप मला भेटले त्या कार्यक्रमात आणि नंतरही आम्ही भेटलो. दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी मला मागणी घातली आणि मी हो म्हणून टाकलं. ”

“आणि तुमचे आई बाबा? ”

“आई तर खूशच झाली. काकांनाही आनंद झाला. साखरपुडा जोरात करायचा म्हणाले ते. त्यांचं टूरवर जाणं वाढलंय ना खूप हल्ली, पण आता टूरबिर सगळं बंद म्हणाले. साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं याची यादी पण काढली आम्ही बसून. दिलीप खूप बिझी असतात ना, त्यामुळं आम्ही संध्याकाळी सातनंतरच भेटायचो. काकांच्या ऑफिसमध्येही फॉरेन डेलिगेशन आलं होतं कुठलंसं. त्यामुळं काकांची आणि त्यांची गाठच पडेना. फोटो बघितला काकांनी दातारांचा आणि म्हणाले, नशीब काढलंस तू शर्वरी… ”

“हे दातार.. कुठले हे? घरी कोण कोण असतं? कुठल्या कंपनीत आहेत नोकरीला? ”

“अं… मला फारसं नाही सांगता येणार, पण सुपरसॉफ्ट की कुठली कंपनी आहे. संग्रामनगरला कुठंशी ऑफिस आहे. नवीन कंपनी आहे, आणि ऑफिसही शिफ्ट होतंय म्हणे. त्यामुळं नक्की सांगता नाही येणार मला. दातार मूळचे अमरावतीचे. आईबाबा नाहीयेत त्यांना. एक मोठी बहीण. ती भुवनेश्वरला असते. ती.. त्या यायच्या होत्या साखरपुड्याला… ” शर्वरीचा आवाज परत चोंदल्यासारखा झाला.

“आणि मग…? ”

“दहा तारखेचा मुहूर्त होता साखरपुड्याचा. सगळी तयारी झाली होती. नऊ तारखेला रात्री आम्ही फिरायला गेलो होतो. मी आणि दिलीप. चांदणं पडलं होतं सुरेख. त्यांनी अंगठी घातली बोटात माझ्या. म्हणाले, ‘शर्वरी, मला वचन दे, जन्मोजन्मी माझीच होऊन राहशील… ‘. मी म्हणाले, ‘ हे असलं कसलं बोलणं? आणि अंगठी उद्याच्या मुहूर्तावर नाही का घालायची? ‘ तर म्हणाले, ‘खरं प्रेम करणाऱ्यांना मुहूर्ताचा संकेत लागत नाही शर्वरी’ मी वचन दिलं त्यांना तेव्हा गहिवरले ते. म्हणाले, ‘आयुष्यभर प्रेमाला पारखा झालेला माणूस आहे मी. तू माझ्या जीवनात हिरवळ फुलवलीस, शर्वरी. ‘ नऊ वाजता त्यांनी मला घरी सोडलं तेव्हा माझा हात हातात घेऊन म्हणाले, ‘उद्या भेटू, आयुष्यभर एकमेकांचे होऊन राहण्यासाठी.. ‘ किती, किती आनंदात होते मी गौतमजी त्या दिवशी.. ”

मी गौतमकडे पाहिलं. रोमँटिक बोलण्याला तो फार कंटाळत असे. गौतमला कंटाळा आला असला तरी त्यानं तो चेहऱ्यावर दाखवला नव्हता.

“ही गोष्ट नऊ तारखेची, मिस कारखानीस. म्हणजे चार दिवसांपूर्वीची. पुढे काय झालं? ”

“तेच काही कळत नाही गौतमजी. दहा तारखेला सकाळी आठ वाजता त्यांची बहीण, भावजी आणि मुलांना घेऊन हॉलवर यायचे होते दिलीप. आठ वाजले, नऊ वाजले.. त्यांचा पत्ता नाही. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. बाकी कुठला पत्ता, काही ठावठिकाणा नाही. आम्ही सगळे गोंधळून गेलो. आई तर रडायलाच लागली. इतकी सगळी माणसं आलेली आमच्याकडची. इतकं चोरट्यासारखं झालं आम्हाला. आणि मी तर घाबरूनच गेले. कुठे असतील हो दिलीप? काय झालं असेल त्यांना? हल्ली कायकाय वाचतो ना आपण पेपरमध्ये. आणि त्यांची बहीण, भावजी, मुलं.. ते लोक तरी कुठे आहेत?.. ” शर्वरी रडवेल्या चेहऱ्यानं विचारत होती.

नशीब तरी काय एकेक प्रश्न मांडून ठेवतं माणसांपुढं! मला त्या मुलीची दया आली. गौतम बाकी नेहमीप्रमाणं स्थितप्रज्ञ होता. आपल्या डायरीत काहीतरी नोंद करून ठेवत त्यानं विचारलं. “मग तुम्ही काय केलं? ”

“आम्ही पोलिसांत गेलो, गौतमजी. इतके हलकटासारखे वागले पोलीस! म्हणे पत्ता काय, कंपनी काय, काही माहिती नाही, आम्ही तपास तरी कशाच्या जोरावर करायचा? एक कसला तरी रिपोर्ट लिहिला आणि म्हणाले आठ दिवसांनी फोन करून बघा. आई तर अंथरुणावरच आहे गेले चार दिवस. काका इतके चिडलेत, म्हणाले, सापडू तर दे, खूनच करतो त्याचा. पण माझं मन मला सांगतंय गौतमजी. दिलीप धोका देणाऱ्यातले नाहीत. त्यांच्यावर नक्कीच काहीतरी संकट कोसळलंय गौतमजी. प्लीज, प्लीज मला मदत करा.. ”

“हम्म. मिस कारखानीस, या दिलीप दातारांचा फोटो आहे तुमच्याकडं म्हणालात तुम्ही.. ”

शर्वरीनं तिच्या पर्समधून एक पासपोर्ट साइज फोटो काढला. “फारसा स्पष्ट नाही आलेला फोटो हा, आणि अलीकडचाही नाहीये. पण तुम्हाला कल्पना येईल. ” ती म्हणाली.

गौतमच्या खांद्यावरून मी त्या फोटोकडं नजर टाकली. चाळिशीचा माणूस. विरळ होत चाललेले केस, सर्वसाधारण नाकडोळे, डोळ्यांवर गॉगल. “डोळ्यांना तीव्र उजेड सहन होत नाही त्यांना. म्हणून डॉक्टरांनी गॉगल वापरायला सांगितलाय त्यांना. ” शर्वरीनं खुलासा केला

“आणखी काही? ”

“स्वभावानं खूप भोळे आहेत हो दिलीप. आणि अगदी सज्जन. स्वभाव अगदी लोण्यासारखा बघा. आवाजही अगदी मृदू आहे त्यांचा. लहानपणी टॉन्सिल्सचा खूप त्रास झाला म्हणे त्यांना. म्हणून अगदी हळुवारपणे बोलतात ते. पण इतके प्रेमळ म्हणून सांगू… ”

“मिस कारखानीस, त्यांचे काही इतर डिटेल्स आहेत तुमच्याकडं? त्यांचं कार्ड म्हणा, त्यांच्या कंपनीचा नंबर म्हणा.. ”

“अं.. त्यांचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे, पण तो… हं, ते मी सांगितलंच तुम्हाला. आणि हो, त्यांनी काही इ-मेल्स पाठवल्या होत्या मला. त्यांचेही प्रिंट आऊटस आणलेत मी. ”

गौतमच्या चेहऱ्यावर अचानक उत्सुकता आली. “कुठलं.. कंपनीचं अकाउंट आहे त्यांचं? ” त्यानं विचारलं.

“नाही. कंपनीच्या अकाउंटमधून आपली बोलणी नको म्हणाले ते. जीमेल अकाउंट आहे त्यांचं. हे ते चार प्रिंट आऊटस.. अं.. जरा खाजगी मेल्स आहेत गौतमजी, तेव्हा.. ”

“आय अंडरस्टॅंड मिस कारखानीस. या खोलीतल्या गोष्टी कधीच बाहेर जात नाहीत. मी बघतो काय करायचं ते. तुमचा नंबर देऊन ठेवा. मी कळवतो तुम्हाला काय ते. दरम्यान स्वतःला जरा सावरा. आईकडेही लक्ष द्या. आणि हो, मन जरा घट्ट करा”

“म्हणजे? मला दिलीप भेटतील ना परत? ” शर्वरीनं धीर एकवटून विचारल्यासारखं विचारलं.

“स्पष्ट सांगायचं तर मला फारशी आशा वाटत नाही, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला. “तेव्हा तुम्ही या दातारांना विसरण्याचा प्रयत्न करावा, हे उत्तम. ”

“ते या जन्मी तरी शक्य नाही गौतमजी. मी वचन दिलंय दिलीपना. माझ्या नशिबात सुख असेल तर ते मला भेटतीलच. इथं, किंवा जिथं ते असतील तिथं. हा माझा नंबर गौतमजी. आणि हो, तुमचा काही ऍडव्हान्स..? ” शर्वरीनं पर्स उघडली.

गौतम हसला. “तशी वेळ आली तर मी तुम्हाला सांगीन, मिस कारखानीस. सध्या काही नको. ”

“मग येऊ मी? ” शर्वरी खुर्चीतून उठली

“या, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला.
मी दरवाजा बंद करून वळलो तो गौतम एक नवी सिगरेट पेटवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होतं.
“काय मग बापूसाहेब, काय म्हणतायत तुमच्या शर्वरीताई? ” त्यानं विचारलं.

“हं. म्हणजे नेहमीप्रमाणं तू माझ्याकडून काढून घेऊन मग मला ते चुकीचं कसं आहे, हे सांगणार म्हण की. ”

“तसं समज. पण काय, तुला वाटतं तरी काय या मुलीबद्दल? ” गौतमनं विचारलं.

“हे बघ गौतम, मी काही तुझ्यासारखा व्यावसायिक नाही. पण तुझं बघून बघून जे शिकलोय ते सांगतो. बघ तुला पटतंय का.. ” मी म्हणालो.

“बापू तू बोल तर खरा. मग बघू आपण तर्क काय, निष्कर्ष काय ते. ” गौतम म्हणाला.

“हम्म. शर्वरी कारखानीस… ” मी मगाशी राहिलेली सिगरेट उचलली. “वय काय, तीस- बत्तीस. आर्थिक सुस्थिती तर दिसतेच आहे. भारी ड्रेस, कानातल्या हिऱ्याच्या कुड्या, बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तर असणारच. आणखी काय सांगू? आणि हो, ते चष्मा आणि नेटसर्फिंगचं काही ध्यानात नाही आलं बुवा माझ्या.. ”

“माझ्या तर्कसंगतीची पद्धत वापर ना बापू. कितीही उत्तम दर्जाची चष्म्याची फ्रेम असली तरी ती सतत वापरणाऱ्याच्या नाकावर एक लहानशी आडवी रेघ दिसते. मिस कारखानिसांनी ती मेकअपनं लपवण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण अस्पष्ट का होईना, ती रेघ दिसतेच. तर मग चष्मा. बाहेर जाताना तिनं तो लावला नाही, याचं कारण म्हणजे तिला त्याची लाज वाटते. म्हणजे त्याचा नंबर बराच जास्त असला पाहिजे. तिनं कॉंटॅक्ट लेन्सेस लावल्या होत्या, हे तर तुझ्या लक्षात आलं असेलच. आणि तिच्या ड्रेसच्या बाह्या बघितल्यास तू? सतत कंप्युटरचा माऊस हाताळणाऱ्या व्यक्तींच्या बाहीवर ती बाही टेबलच्या कडेवर जिथं घासली जाते, तिथे एक आडवी खाच येते. या शर्वरीची आर्थिक स्थिती सामान्य असती, तर ती कुठंतरी नोकरी करते, असा निष्कर्ष मी काढला असता. पण तसं नाही. आणि बाहेर गाडी तर होतीच तिची. मगाशी खिडकी उघडायला मी उठलो तेव्हाच रस्त्यावर पार्क केलेली तिची होंडा सिटी मला दिसली. मग अशा सुस्थितीतल्या मुलीला तासनतास टेबलाशी बसायला कोणती गोष्ट प्रवृत्त करत असेल? उत्तर अगदी उघड आहे. इंटरनेट! ”

“वा, काय लॉजिक आहे गौतम! मानलं तुला… ” मी कौतुकानं म्हणालो. ” आणखी काही? ”

“आणखी बरंच काही. ” गौतम म्हणाला. “त्या मुलीच्या कपड्यांबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल तू म्हणालास, पण तिचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तू काही बोलला नाहीस. तिचे कपडे, दागिने आठव. जरासे भडकच नव्हते वाटत? अशा अडचणीच्या वेळीही ती पूर्ण मेकअप करून आली होती. आणि तिची भाषा.. दिलीपविषयी, तिच्या बाबांविषयी बोलताना किती स्वप्नाळूपणे बोलत होती ती.. ‘अहो दिलीप’ असा उल्लेख… टीव्हीवरल्या मराठी मालिका बघत असणार ही मुलगी. आणि इंटरनेटवर काय लिहिते ही? कविता! ”

” अच्छा. म्हणजे ही लग्नाचं वय उलटून चाललेली, आपल्या शारीरिक दुबळेपणाविषयी काहीशी खंतावलेली, श्रीमंत घरातली, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी आणि काहीशी उथळच मुलगी, नाही का गौतम? ”

“बरोबर. आणि मग तिला हा भेटतो, कोण, काय म्हणता तुम्ही लेखक मंडळी त्याला.. हां, तिच्या स्वप्नांतला राजकुमार. हाही वय होत चाललेला, शरीरानं आणि मनानं दुबळा आणि खऱ्या प्रेमाला आंचवलेला. अशा स्वप्नाळू, कवीमनाच्या मुलींना फार आकर्षण असतं अशा मुलांचं. रांगड्या, मॅचो मुलांपेक्षा अशी काहीशी बायलीच मुलं आवडतात त्यांना. वात्सल्य आणि ममत्व ही तर मॅमेलियन्सची वैशिष्ट्येच आहेत. ‘बायका एरवी कितीही कंठाळ्या असल्या तरी ज्या दिवशी तुम्हाला हँगओव्हर असतो, त्या दिवशी त्या अगदी देवदूतच होतात’ असं वुडहाऊस म्हणतो, आठवतं? आणि मग त्यांचं प्रेम, शपथा, आणाभाका – ते चांदणं, ती हिरवळ, ते एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून कॉफी पिणं वगैरे… सगळे सगळे ते तुमचे शब्दांचे बुडबुडे! ”

“पण त्या दिलीपचं पुढं झालं काय? तो आणि त्याची बहीण, मेव्हणे वगैरे गेले तरी कुठं? ”

” ते बघू आपण. पण सध्या तरी आपण त्या दिलीपनं पाठवलेल्या मेल्स वाचू. अं काय लिहितो हा… अरेरे, वाचू नये रे कुणाचं खाजगी काही.. त्यातल्या त्यात प्रेमात पडलेल्या माणसांचं.. ” गौतमनं त्या प्रिंट आऊटसचे कागद उलगडले. “अरे वा, अगदी रसिक आहेत हो ‘हे’ दिलीप. बघ की, पहिल्याच मेलमध्ये गालिब कोट केलाय त्यानं.. इष्क पर जोर नहीं, है ये वो आतिश गालिब, जो लगाये ना लगे और बुझाये ना बने’ ”

“क्या बात है, गौतम. लोक अजूनही प्रेमपत्रांत गालिब वगैरे लिहितात? ”

“अरे पुढं ऐक. ‘युवर स्टॅच्युएस्क फिगर रिव्हॉल्वज इन माय ड्रीम्स… ‘ ही शर्वरी आणि स्टॅच्युएस्क? तिला अवरग्लास फिगर म्हटलं नाही, हे नशीबच आपलं बापू. ”

“आईज ऑफ दी बिहोल्डर, गौतम, आईज ऑफ दी बिहोल्डर. ”

“हम्म. खरं आहे तू म्हणतोयस ते. आणि आपले दिलीप चांगले वाचकही दिसताहेत. डिलेक्टेबल डिनर, इनक्रेडिबल इंबेसिलिटी ऑफ माय काँफ्रेअर्स, माय अनएंडिंग पेरिग्रेशन्स… वा वा वा.. लेखक व्हायचा हा माणूस इंजिनिअर कसा काय झाला? आणि हे बघ, ऑफिसमधल्या राजकारणाला ‘बेत न्वा’ हा शब्द वापरलाय यानं.. आणि हे काय? ‘फॉरएव्हर युवर्स टिल दी ग्रिम रिपर सेपरेटस अस… ‘ म्हणजे तत्त्वज्ञानीही दिसताहेत हे दिलीप. आणि ‘काऊंटलेस ऑस्क्युलेशन्स? ‘ बापू, नको रे पुढचं वाचायला आपण. ती शर्वरी हे कागद द्यायला का संकोचत होती ते कळतंय मला आत. ”

” पण यातनं काही कळतंय का आपल्याला? ”

“हम्म. बरंच काही कळतंय बापू. आता फक्त एक करायचं आपण. शर्वरीच्या आईबाबांशी एकदा बोलून घेऊ. तिचा नंबर लिहिलेला कागद होता ना इथं कुठंतरी? एक काम कर. तिला फोन लाव, आणि तिच्या घरचा आणि दामलेंचा फोन नंबर घे तिच्याकडून. आणि दामलेंचा मेल आयडीपण घे. ”

“तू काय करतोयस? ”

“आता फारसं करता येण्यासारखं काही नाही बापू. तू तेवढे डिटेल्स घे, मी बघतो सकाळी अर्धवट राहिलेलं शब्दकोडं सुटतंय का ते! ” गौतम म्हणाला.

संध्याकाळी मी गौतमच्या फ्लॅटवर आलो तेंव्हा गौतम खुर्चीच्या दांड्यांवर पाय ठेवून पेंगत होता. माझ्याजवळच्या किल्लीनं मी दार उघडलं आणि तो आवाज ऐकून त्यानं आपले झोपाळलेले डोळे उघडले.
“भले शाब्बास! ” मी म्हणालो. “आम्ही इकडे कोडं सुटतंय का ते बघतोय, आणि महाराज झोपा काढतायत! ”
“कोडं सुटलं की. ” गौतम म्हणाला.
“सुटलं? ”
“हो. बत्तीस आडवा शब्द ‘पचंग’ आहे, ‘पंचांग’ नाही. आपण ‘पंचांग’ धरून चाललो होतो, त्यामुळं सगळा घोळ झाला. ‘पचंग बांधुनी तयार व्हा रे'”
“गौतम…मित्रा, शब्दकोड्याविषयी बोलत नाही मी. शर्वरी… मिस कारखानीसांचं कोडं सुटलं की नाही? ”
“हां ते होय! ते काही फारसं अवघड कोडं नाही. सुटेल. वाजले किती? पाच? चल, आपण एक चहा मारून येऊ आणि बघू मग त्या मिस कारखानीसचं कोडं सुटतंय का ते.”
चहा पिऊन आम्ही परत येत होतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून गौतम म्हणाला, “बापू, माझी एक जुनी धारणा आहे बघ. एखादं कोडं सोडवताना, जे जे निव्वळ अशक्य आहे, ते काढून टाकत जायचं. मग जे शेवटी शिल्लक राहील, तेच सत्य असलं पाहिजे; मग ते कितीही असंभव का असेना… ”
“खरं आहे. ” मी म्हणालो.
“आता ही शर्वरीचीच केस बघ. या दिलीपच्या गायब होण्यामागं काय कारणं असतील? त्यानं त्याच्याविषयी, त्याच्या नोकरीविषयी दिलेली माहिती अशी अर्धवट, गूढ का आहे? या दिलीपच्या नाहीसं होण्यानं कुणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे? मी अशी केस सोडवताना नेहमी स्वतःला त्या गुन्हेगाराच्या जागावर ठेवतो. या केसची गंमत अशी आहे, की यात गुन्हेगार कोण आहे, तेच कळत नाही. दिलीप? त्याचं तर शर्वरीवर खरंखुरं प्रेम दिसतंय. बरं, त्यानं शर्वरीकडून काही पैसे वगैरे उकळले असते, तर तेही समजण्यासारखें होतं. पण शर्वरीच्या बोलण्यात तसंही काही आलेलं नाही. मग काय? तुला काय वाटतं? ”
“काही कळत नाही गौतम. ”
“हम्म. आपल्यासमोर या साखळीच्या कड्या विखरून पडल्या आहेत बापू. फक्त त्यांना जोडणारा एक धागा अजून अदृष्य आहे. एकदा तो धागा दिसला की सगळं सगळं स्पष्ट होईल. चल, मी संध्याकाळी शर्वरीच्या आईवडीलांना भेटायला
बोलावलं आहे. बघूया त्यांच्या भेटीतून काही नवीन कळतं का ते. ”
आम्ही वर गेलो. गौतमनं कंप्यूटर सुरू केला. ई मेल्स तपासता तपासता त्याच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आलं. त्यानं त्याची डायरी उघडली आणि त्यातली नोंद वाचत तो म्हणाला, ” त्या दिलीपचं पूर्ण नाव काय म्हणाली शर्वरी? दिलीप वासुदेव दातार, नाही का? जीनीयस! बापू कोडं सुटलं आपलं! ”
“सुटलं? काय झालं मग या दिलीपचं? कुठं आहे तो? ”
गौतमनं एक प्रिंट कमांड दिली आणि तो प्रिंट आऊट माझ्यासमोर धरुन काही बोलायला तो तोंड उघडणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी पुढं होऊन दार उघडलं. दारात एक मध्यम उंचीचे, चाळीशीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते. माझ्याकडं बघून काहीसे हसत ते म्हणाले, “मी नंदकुमार दामले. शर्वरी… मुलगी माझी. मला गौतम सरदेसाईंना भेटायचं आहे. आपण…? ”
“मी बापू. गौतम आत आहेत. या ना, आत या. ”
दामलेंनी मोकळेपणानं माझा हात आपल्या हातात घेतला. “तुमच्याविषयीही बोलली शर्वरी माझ्याशी. तुम्हा दोघांशी बोलल्यावर खूप धीर आलाय, म्हणाली. काय बघा ना वेळ आली तिच्यावर. सोन्यासारखी मुलगी.. ”
“काळजी करू नका, दामले. सगळं ठीक होईल. ” मी त्यांना आतल्या खोलीत नेत म्हणालो.
गौतमनं दामलेंना बसायला सांगितलं. तिसऱ्या खुर्चीत मी बसलो. मी दामलेंकडं निरखून पाहिलं. कोकणस्थी रंग, चाळीशीनंतरही टिकलेले घनदाट केस. ते काळजीपूर्वक वळवलेले. डायही केला असावा. उत्तम कपडे. आणि भेदक बुद्धीमान डोळे. खोलवर घुसणारे तीक्ष्ण घारे डोळे.
“काय घेणार? चहा? कॉफी? ” गौतमनं विचारलं.
“काही नको, थँक्स. गेले चार दिवस अन्नपाण्यावरची वासनाच उडालीय आमची. ही तर खचलीच आहे. म्हणून तुमच्या मेलमध्ये तुम्ही तिला घेऊन या म्हणून लिहिलं होतं, पण काही शक्य झालं नाही ते. ” दामले म्हणाले.
गौतम आपल्या खुर्चीत जरासा रेलला. “हं. तुमचं उत्तर वाचलं मी दामले. आणि ते वाचून मला वाटलं तुम्ही मिस कारखानिसांच्या आईंना बरोबर आणलं नाही तेच बरं केलं. ” तो म्हणाला.
मला गौतमच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. शब्दांचं आणि शब्दांच्या निवडीचंही.
“हो, आता निराशा पचवण्याची ताकद नाही आहे हो तिच्यात. ” दामले म्हणाले. “मी त्या दोघींनाही सांगतोय गेले चार दिवस, की आपण दिलीपला विसरून जायला हवं; पण त्यांना ते शक्य होत नाहीये. शर्वरी तर.. मला भीती वाटते गौतमसाहेब, ती काही बरंवाईट तर… ”
“अरे, नवल आहे. ” गौतम हसत म्हणाला. “मी तर तुम्हाला आज इथं चांगली बातमी द्यायला बोलावलं होतं.”
दामलेंच्या डोळ्यांत आता रागाची किंचित लाली आली. “काय.. अर्थ काय तुमच्या बोलण्याचा? ” त्यांनी जरा चढ्या स्वरात विचारलं.
“अर्थ असा दामलेसाहेब, की तुमचे दिलीप वासुदेव दातार मला सापडले आहेत. ”
दामले ताडकन उठून उभे राहिले. “क्क.. कुठे आहेत ते? ” त्यांनी विचारलं.
गौतमनं हातातली पेन्सिल वरखाली हालवली. “खाली बसा दामले. स्वतःला फार हुषार समजता नाही का तुम्ही. आता इतक्या सहजासहजी सुटका नाही व्हायची तुमची. खाली बसा आणि मी सांगतो ती गोष्ट ऐका.”
“या पाताळयंत्री माणसाचा नीचपणा बघ, बापू, ” माझ्याकडं वळून गौतम म्हणाला. ” वयानं आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाईशी यानं लग्न केलं ते निव्वळ पैशाकडं बघून. कारखानिसांना हार्ट ट्रबल सुरू झाल्यावरच याच्या डोक्यात ती चक्रं फिरायला लागलेली असणार. पण लग्न झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की इस्टेट सगळी शर्वरीच्या नावावर आहे. जोवर शर्वरीचं लग्न होत नाही, तोवर ती बिचारी नेमानं तिच्या आईकडं पैसे देत राहील, आणि तिच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर हा हरामखोर चैन करत राहील..पण पुढं काय? एकदा का शर्वरीचं लग्न झालं की सगळा पैसा, सगळी इस्टेट गेली याच्या हातातून. ”
दामलेंनी खिशातला रुमाल काढून घाम पुसला.
“मग हा करतो काय? तर शर्वरीचं लग्नंच होऊ नये यासाठी प्रयत्न करायला लागतो. एकदोनदा जुळत आलेलं लग्न नाही जमलं असं म्हणाली ती. मला खात्री आहे, यानंच त्याच्यात मोडता घातलेला असणार. पण हे फार दिवस चालणार नाही, हे कळाल्यावर हा एक वेगळीच शक्कल लढवतो. ”
मी अवाक होऊन ऐकत होतो. दामले खाली मान घालून बसले होते. “शर्वरी किती हळवी, किती भावनाप्रधान आहे हे आपण बघीतलं बापू. याच्याही हे ध्यानात आलेलं असणार. शिवाय शर्वरीची कमकुवत नजर. त्याचाच फायदा घ्यायचा ठरवला यानं. हा करतो काय, तर स्वतःच वेषांतर करून दातार होतो. दिलीप वासुदेव दातार. शर्वरीला हा भेटतो तेही संध्याकाळनंतर. त्याचा गॉगल, त्याचा कमकुवत आवाज, त्याचे जाड कपडे… हा फोटो बघ बापू… आणि कुणीतरी अप्रतिम मेकअप आर्टिस्ट.शर्वरीला काही शंका येत नाही. ती त्याच्यात गुंतत जाते. मग त्या आणाभाका, त्या शपथा.. कशासाठी? तर तिनं पुन्हा लग्नाचा विचारही करू नये याच्यासाठी! आणि साखरपुड्याला तो उगवतच नाही. उगवणार कसा? होणारा जावई म्हणजे खुद्द सासराच आहे ना! ”
गौतमनं दामलेंकडं तिरस्कारानं बघीतलं. “अमरावतीचं घर, भुवनेश्वरची बहीण, मेव्हणे, भाचे.. सगळ्या थापा!” शर्वरीनं आणलेले इ मेलचे प्रिंट आऊटस दामलेंसमोर टेबलवर फेकले. ” इंग्रजी उत्तम लिहिता तुम्ही दामले. फ्रेंचही शिकलायत वाटतं! छान, छान! शर्वरीला आलेली ‘बिले दू’ काय? यू हॅव माय ‘कॅस्ट ब्लाँश’ मिस्टर सरदेसाई काय? आणि शायरीची काय आधीपासूनच आवड आहे की या कामासाठी वाचली खास? आं?”
आपल्या खुर्चीतून उठून गौतम आता खोलीत येरझाऱ्या घालत होता. ” काय माणूस आहे बघ हा बापू. किती विलक्षण बुद्धीमत्ता! पण चुकीच्या ठिकाणी लावली कामाला. आपल्या बुद्धीचा माज चढला ना एखाद्याला, की तो माज उतरायलाही वेळ लागत नाही. दामले, फार मस्त गेम खेळलात तुम्ही. पण टाईप करताना ती स्पेलचेक लावण्याची सवय तेवढी लावून घ्या बुवा. टाईप करताना ‘एस’च्या जागेवर घाईघाईत कधीकधी ‘ए’ टाईप होतो तुमचा. या मेल्स बघा दिलीप दातारच्या आणि ही तुमची मेल मघाची. आणखीही एकदोन गोष्टी आहेत सारख्या. की सायबरक्राईमला फोन करून दोन्हींचे आय पी ऍड्रेसेस चेक करायला सांगू? पण तुम्ही तयार लोक नाही का! दोन वेगवेगळ्या ठिकाणांहूनही पाठवल्या असतील मेल्स.. ”
“गंमत.. गंमत होती ती सरदेसाई” दामले तुटक आवाजात म्हणाले.
“गंमत? एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळणं ही गंमत? अरे नीच माणसा… ”
“हे बघा सरदेसाई, उगीच शिव्या द्यायचं काम नाही. ” दामलेंच्या आवाजात आता मग्रुरी आली होती. ते उठून उभे राहिले होते. “तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. बाकी तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही पोलिसात जा, कोर्टात जा… ”
“पोलीस! हूं! ” गौतम तुच्छतेनं म्हणाला. दामलेंच्या समोर उभं राहून त्यानं दामलेंच्या डोळ्यांत रोखून बघीतलं. “दामले, एक लक्षात ठेव. पुन्हा त्या मुलीला काही त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही धक्का लावशील तर पस्तावशील. तिच्यामागं कुणी नाही असं समजू नकोस. तिच्यामागं हा गौतम सरदेसाई आपल्या सगळ्या शक्तीनिशी उभा आहे… ”
“आणखी काही? ” दामले कुऱ्यात म्हणाला.
“गेट आऊट! ”
दामलेंनी नाटकीपणानं मान झुकवली आणि बुटांचा टपटप आवाज करत ते निघून गेले.
गौतमनं सिगरेट पेटवली. “तुला माहिती आहे, बापू, आफ्रिकेतल्या जंगलांत काही वेली आहेत. पहिली काही वर्षं त्या अगदी निरुपद्रवी, अगदी सामान्य असतात. एका ठराविक वयानंतर बाकी त्यांच्यातल्या रसाचं जणू जहर व्हायला लागतं. त्यांच्या लाईफसायकलच्या एका विशिष्ट स्टेजला त्या अगदी विषारी, प्राणघातक होतात. असं का होतं हे अद्याप कुणालाही कळालं नाही. पण तसं ते होतं खरं. हा माणूस, दामले, तसलाच वाटतो मला. मूळचा हुषार, अगदी प्रतिभावान, पण अक्कल कुठे वापरली बघ त्यानं.. ”
मी काहीच बोललो नाही.
“आणखी एक, एखादा कलाकार जसा आपल्या कलाकृतीवर कुठेतरी आपली स्वाक्षरी नोंदवून ठेवतो, तसे हे गुन्हेगारही आपल्या गुन्ह्यांवर कुठेतरी आपले फिंगरप्रिंटस ठेवून जातात. भिंतीत कलात्मक भोक पाडून चोरी करणारा आणि ‘कल जब लोग देखेंगे तब प्रशंसा होनी चाहिये’ म्हणणारा ‘उत्सव’ मधला चोर आठवतो ना तुला. या गुन्ह्यावरही दामलेनं स्वतःची एक स्वाक्षरी ठेवली आहे. त्यामुळंच तर मला पक्की खात्री पटली.
“काय? कुठली स्वाक्षरी? ”
“दिलीप. दिलीप वासुदेव दातार. त्याची आद्याक्षरं घे, दि. वा. दातार. काही आठवतं? ”
“दिवाकर दातार! ”
“बरोबर! बाकी गोष्टींनी माझा संशय बळावतच चालला होता, या एका गोष्टीनं बाकी खात्री झाली. ” गौतम म्हणाला.

“पण गौतम.. हा माणूस… काका म्हणते ती मुलगी त्याला. कित्येक वर्षांचे संबंध त्यांचे. तो माणूस इतका नीचपणा करू शकेल? कशासाठी? फक्त – फक्त पैशासाठी? माणूस इतका घसरू शकतो? ”
“हेच बापू, हेच. मी म्हणत होतो ते जळतं, धगधगीत वास्तव हेच. सगळी नाती, मानवी मूल्यं आणि कायकाय तुमच्या शब्दांच्या कागदी होड्या बुडवून टाकणारा माणसाचा स्वार्थ, माणसाची विकृती, हेच ते वास्तव. आता मला सांग बापू, आहे का कुणा लेखकाच्या लेखणीत ताकद.. असलं काही कागदावर आणण्याची? ”
“पण हा हलकट तर… आणि त्याला शिक्षा काहीच नाही? ”
“दुर्दैवानं – काहीच नाही. या खोलीत जे झालं ते आपण न्यायालयात सिद्ध करू शकणार नाही, आणि सिद्ध झालं तरी एखाद्या मुलीचा प्रेमभंग करणं याला आपल्या घटनेत शिक्षा नाही अजून. ”
“आणि शर्वरी.. तिचं काय? ”
“आपण काय करू शकतो बापू? तिला सावध करणारं एक पत्र टाकतो मी आज. स्पष्ट काही लिहित नाही, पण त्या दामलेपासून जरा सावध राहा, असं लिहितो. तिला ‘ता’ वरनं ताकभात कळत असेल, तर तिच्या लक्षात येईल. नाहीतर ती आणि तिचं नशीब. त्या दिलीपच्या स्वप्नांतून बाकी ती काही बाहेर येईल असं वाटत नाही. पण दिलीपच्या गायब होण्यामागं दामलेचा हात आहे, एवढं जरी तिला कळालं, तरी दामले संपलाच म्हणून समज. अरे, एखाद्या स्त्रीच्या स्वप्नांशी खेळणं म्हणजे वाघिणीच्या गुहेत शिरून तिच्या बछड्यांना हात घालण्यासारखं आहे. होय की नाही? घे, सिगरेट घे बापू. ”

(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या ‘ अ केस ऑफ आयडेंटिटी’ वर आधारित )

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके – मिरासदारी

द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही. मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो, पण तो ‘टंग इन चीक’ च्या मर्यादा क्वचितच ओलांडतो. बर्‍याच वेळा मिरासदारांचे लिखाण हे शाळकरी मुलांनी शाळकरी मुलांसाठी केलेले, बाळबोध वाटते. शारिरीक व्यंगे, हाणामारी, आळशीपणा, झोप अशा विषयांवरील मिरासदारांचा विनोद प्राथमिक अवस्थेत अडकून राहिल्यासारखा वाटतो. मिरासदारांच्या कथांमधील व्यक्ती गंमतीदार, तर्‍हेवाईक आणि विविधरंगी असल्या तरी त्या कचकड्याच्या वाटतात. भोकरवाडी आणि तिथले ग्रामस्थ यांच्याविषयीच्या मिरासदारांच्या कथा वाचताना क्वचित हसू येते, पण दीर्घकाळ स्मरणात राहाणारा आणि केवळ स्मरणानेही आनंद देणारा विनोद मिरासदारांच्या हातून क्वचितच लिहिला गेला आहे.
अर्थात वरील नकारात्मक विधाने ही मिरासदारांच्या सर्वच लिखाणाला लागू नाहीत. मिरासदारांचे बरेचसे विनोदी लेखन (मला) कमअस्सल वाटत असले तरी मिरासदारांनी काही अगदी जिवंत, खरोखर गंमत आणणार्‍या आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गंभीर आणि हृदयस्पर्शी अशा कथा लिहिल्या आहेत. एक लेखक म्हणून आवश्यक असणारे सगळे गुण – उत्तम निरिक्षणशक्ती, शब्दांवरील पकड आणि लेखनाची रचना करण्यासाठी गरजेची ती कुसर – क्राफ्ट – हे मिरासदारांकडे आहेत याचा पुरावा देणार्‍याच या कथा. दुर्दैवाने मिरासदारांनी विनोदनिर्मिती करण्यासाठी अतिशयोक्ति, अतिरंजन हे साधन प्रामुख्याने निवडले; आणि म्हणून त्यांच्या कथा या तिखटामिठाच्या लाह्यांसारख्या तडतडीत झाल्या आहेत. खमंग, तोंडात असताना बर्‍या लागणार्‍या, पण भूक फक्त चाळवणार्‍या. मराठी वाचकाची भूक भागवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात अभावानेच आढळते.
‘मिरासदारी’ या मिरासदारांच्या निवडक कथांच्या संग्रहात मिरासदरांच्या अशा गर्दीखेचक कथांबरोबरच त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून देणार्‍या काही सुंदर कथाही आहेत. खेड्यातली शाळा या विषयावर मिरासदारांनी पुष्कळ कथा लिहिल्या आहेत. ‘शिवाजीचे हस्ताक्षर’, ‘शाळेतील समारंभ’, ‘माझ्या बापाची पेंड’, ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या त्यातल्या काही कथा. यातल्या काही कथांमधला नायक हा शाळेत जाणारा लहान मुलगा आहे; त्यामुळे त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी सरळ, साफ आहे. आणि त्याच्या आसपासची मंडळी बाकी तयार, बेरकी आहेत. या विसंगतीमुळे काही विनोदी प्रकार घडतात. गावाकडची तर्‍हेवाईक मंडळी आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती यावर मिरासदरांनी लिहिलेल्या ‘भुताचा जन्म’, ‘धडपडणारी मुले’, ‘व्यंकूची शिकवणी’, ‘नदीकाठचा प्रकार’, ‘निरोप’, ‘झोप’ वगैरे कथाही माफक विनोदनिर्मिती करतात, पण त्या वाचताना नकळत (आणि तसे करणे योग्य नाही हे माहिती असूनही) अशा प्रसंगांवर व्यंकटेश माडगूळकरांनी केलेले अस्सल देशी आणि कसदार लिखाण आठवते. असे बरेवाईट करणे योग्य नव्हे, हे खरे, पण तशी तुलना होते खरी ; आणि मग तिथे मिरासदार काहीसे फिके पडल्यासारखे वाटतात. पण मिरासदारांचे लिखाण इतके विपुल आहे, की त्यांच्या खरोखर दर्जेदार कथा तुलनेने कमी असूनही बर्‍याच आहेत.’नव्व्याण्णवबादची एक सफर’, ‘कोणे एके काळी’ ‘विरंगुळा’, ‘गवत’, ‘पाऊस’, ‘साक्षीदार’ ‘स्पर्श’ या प्रस्तुत संग्रहातील अशा काही कथा. (मिरासदारांच्या या संग्रहात नसलेल्या ‘हुबेहूब’ वगैरे इतर काही कथाही या निमित्ताने आठवतात.)
‘नव्व्याण्णवबादची एक सफर’ ही गावातल्या थापाड्या नाना घोडक्याची कथा. खेड्यातल्या रुक्ष, आशाहीन जीवनात गावकर्‍यांना नानाच्या थापांचाच विरंगुळा आहे. त्या लोणकढ्या आहेत हे जसे नानाला ठाऊक आहे, तसे गावकर्‍यांनाही. तरीही नाना तर्‍हेतर्‍हेच्या गोष्टी सांगतो आहे आणि गावकरीही त्या ऐकून घेताहेत. आपले लग्न व्हावे ही सुप्त आशा ठेऊन असलेल्या नानाला एक देवऋषी खोटे बोलू नको, मग मार्गशीर्षापर्यंत तुझे लग्न होईल असे सांगतो. त्याप्रमाणे नाना त्याच्या अद्भुत कथा सांगणे बंद करतो. मग हळूहळू त्याची लोकप्रियताही ओसरते. रोजच्या, तुमच्या आमच्यासारख्या अळणी आयुष्यात कुणाला रस असणार? मार्गशीर्ष येतो आणि जातो, पण बिचार्‍या नानाचे लग्न काही होत नाही. जिवाला कंटाळलेला नाना जीव द्यायला पाण्यात उडी घेतो, पण गावकर्‍यांपैकी कुणीतरी त्याला वाचवते. भानावर आलेल्या नानाला ओळखीचे चेहरे दिसतात, त्याला सगळे आठवते, आणि आपल्या आयुष्यात आता हिरवळ येणार नाही हे पचवलेला नाना परत एक फर्मास गोष्ट सांगायला लागतो. मिरासदार लिहितात,’.. आणि मग संध्याकाळच्या त्या शांत, उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला. तो गोष्ट सांगत राहिला, माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष, भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरुन गेले.’
‘कोणे एके काळी ‘ ही मिरासदारांच्या पोतडीतून निघालेली एक वेगळी चीज आहे. एका राजाच्या पदरी असलेल्या एका सामान्य रुपाच्या पण बुद्धीमान विदूषकाची ही कथा मिरासदारांनी जुन्या, संस्कृतप्रचुर भाषेत लिहिली आहे. भाषेचा बाज राखण्यात थोडेसे कमी पडलेले मिरासदार कसदार कथानकाने ही कसर भरुन काढतात. प्रथमपुरुषी निवेदनात्मक शैलीने लिहिलेल्या या कथेत काही वाक्ये विलक्षण चटका लावणारी आहेत. ‘अभिसाराला आलेली ती सुंदर चतुर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली – माझ्या दृष्टीसमोर गेली – आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करुन मी तेथेच उभा राहिलो. वज्रासारखे अंगावर पडणारे चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीते एकटाच उभा राहिलो..’
‘विरंगुळा’ ही निर्विवादपणे मिरासदारांच्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी एक ठरावी असे मला वाटते. कोर्टातल्या गरीब कारकुनाची ही कथा वाचकाला हळवी करणारी आहे. आयुष्यात कसलीच उमेद नसलेल्या तात्यांचा विरंगुळाही भेसूर, जगावेगळा आहे. कुणी मेले की त्याच्या मर्तिकाची व्यवस्था करण्यापासून त्याची महायात्रा संपवून येणे हाच तात्यांचा छंद आहे. त्यात एकदा गुंतले की एरवी गरीबीने, परिस्थितीने पिचलेले, गांजलेले तात्या उत्तेजित होतात, त्यांच्या अंगात काहीतरी वेगळे संचारते. मग तिथे त्यांच्या शब्दांना किंमत असते, त्यांना मान असतो, त्या जगात ते सांगतात आणि इतर सगळे ऐकतात… पण एकदा का ते सगळे आटोपले आणि तात्या घरी आले की परत डोळ्यांसमोर ते भीषण दारिद्र्य उभे राहाते. ते बकाल घर, घरातल्या कधी न संपणार्‍या मागण्या आणि चार पैशाचा हट्ट पुरवला न गेलेली, आईच्या हातचा मार खाऊन, गालावर अश्रूंचे ओघळ घेऊन मुसमुसत झोपी गेलेली लहान मुले…
मिरासदारांच्या प्रतिभेविषयी जर कुणाला शंका येत असेल तर ती नि:संशयपणे नाहीशी करणारी त्यांची कथा म्हणजे ‘स्पर्श’. ही कथा म्हणजे कधीकधी साहित्यीक आपल्या नैसर्गिक पिंडाला संपूर्ण छेद देणारे काही लिहून जातो, तसे आहे. अगदी सर्वमान्य उदाहरण द्यायचे तर ‘नंदा प्रधान’ सारखे. कुटुंबातल्या वृद्ध स्त्रीच्या निधनानंतर तिच्या दहाव्याला आलेले नातेवाईक. त्या स्त्रीच्या आठवणी. पुन्हापुन्हा भरुन येणारे डोळे. पिंडाला न शिवता घिरट्या घालणारा कावळा. अस्वस्थ झालेले भटजी आणि या सगळ्यांतून काही भेदक अर्थ काढणारी मने. मध्यमवर्गीय, संस्कारजड, भाबडी मने. या सगळ्या वैराग्यवातावरणाबाबत मिरासदार काही जबरदस्त वाक्ये लिहून जातात. ‘पिंड उन्हात चमकत होता. झाडावर कावळे उगीच बसून राहिले होते. एखादा मध्येच कावकाव करत होता. काही तरी गूढ, न कळणारे समोर उभे होते. एकदा ते चित्र निरर्थक वाटत होते आणि मग त्यात फारच गहन तत्व भरलेले दिसत होते. मृत्यूची महानदी, काळेभोर अथांग पाणी, ऐलतीरावरची जिवंत माणसे आणि पैलतीरावरील धूसर वातावरण – सरळ साधा व्यवहार आणि अगम्य गोष्टी यांचे नाते जोडण्याची धडपड. यत्न आणि कर्मफळ यांचे लागेबांधे. उजेडातून अंधाराकडे पाहण्याची कोशीस… सुन्न मनात विचाराची मोहोळे उठत होती. असले काहीतरी जाणवत होते आणि तरी ते फार अस्पष्ट होते’
असले लिहू शकणार्‍या मिरासदारांनी विनोदी (म्हणून जे काही लिहिले आहे ते) साहित्य लिहिले नसते तरी चालले असते, असे वाटते.
असल्या काही अरभाट आणि काही चिल्लर कथांचे ‘मिरासदारी’ हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
मिरासदारी
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
३६५ पृष्ठे
किंमत १०० रुपये

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

माझ्या संग्रहातील पुस्तके – ७ कुसुमगुंजा

जी.ए.कुलकर्णींच्या काहीशा अपरिचित पुस्तकांपैकी एक म्हणजे १९८९ साली प्रकाशित झालेले ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तक. या पुस्तकाची रचना व त्याचे नाव जी.एंनी आपल्या हयातीत ठरवले होते, मात्र या पुस्तकावर शेवटचा हात फिरवण्याइतका वेळ बाकी त्यांना मिळाला नाही. जी.एं च्या ‘माणसे – अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकाबाबतीतही असेच झाले आहे. पण ‘माणसे’ प्रमाणेच ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तकही अपूर्ण किंवा कच्चे वाटत नाही.
‘कुसुमगुंजा’ हा जी.एंनी त्यांच्या हयातीतल्या वेगवेगळ्या टप्प्यांत लिहिलेल्या छोट्या कथांचा संग्रह आहे. यातल्या सर्व कथा जी.एंच्या नेहमीच्या कथांच्या तुलनेत अगदी लहान आहेत. ‘एक मित्र – एक कथा’ ही लेखसदृश कथा ही या संग्रहातील सर्वात मोठी. पण अस्सल प्रतिभावंताला वातावरणनिर्मितीसाठी भारंभार लिहावे लागत नाही, हा दृष्टांत देणार्‍याच जणू या कथा आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरुषोत्तम धाक्रस म्हणतात,’ज्याच्या लिखाणातील शब्द काढता येत नाही किंवा काढताना दहा वेळा विचार करावा लागतो तो लेखक महान – या पट्टीने मोजून घ्यावा असा हा लेखक असल्याचे इथे सतत जाणवते.’ ‘कुसुमगुंजा’ तील कथाकथांवर जी.एंची अशी एक न पुसली जाणारी स्वाक्षरी आहे. अर्थात अट्टल जी.ए.प्रेमींना ‘काजळमाया’ किंवा ‘पिंगळावेळ’ च्या तुलनेत ‘कुसुमगुंजा’ मधील काही कथा किंचित खांडेकरी छापाच्या आणि बाळबोध (बालीश हा शब्द लिहायला हात कचरतो!) वाटण्याची शक्यता आहे (अगदी ‘सोनपावले’ मधल्या कथांइतक्या नसल्या तरी!) जी.एंना गूढकथा व काहीशा रहस्यमय छापाच्या कथांचेही आकर्षण होते हे एक, आणि आरंभीच्या काळात जी.एंच्या कथांवरील चेकॉव्हचा प्रभाव हे दुसरे लक्षात घेतले तर ‘क्षुद्र’, ‘देवपूजा’, ‘लिरा’, काळी आजी’ या कथांमधून हळूहळू स्वतःच्या वाटेला जाणारे जी.ए. दिसू लागतात. जी.एंच्या पश्चात त्यांच्या काही हस्तलिखितांवरुन आणि ध्वनीफितींवरुन घेतलेल्या ‘तपकिरी बी’, ‘कधी तरी’,’पिवळा पक्षी’ वगैरे कथाही या संग्रहाची पाने वाढवण्यासाठी परचुरेंनी घातलेले पाणी आहे की काय असे वाटू लागते. पण या पुस्तकाच्या मध्यात असलेल्या ‘चैत्र’, ‘लग्न’, बारसे’, ‘ फेड’, ‘ सिनेमा’, ‘ग्रहण’, ‘गार्‍हाणे’,’होळी’, ‘एक मित्र-एक कथा’ या कथा बाकी चोख बावनकशी आहेत. यातली ‘अंधार’ ही कथा खरे तर ‘सांजशकुन’ मध्ये कशी काय आली नाही याचे नवल वाटते. जी.एंच्या काही अप्रतिम दृष्टांतकथांपैकी ही एक. रखरखत्या उन्हातून प्रवास करणारे दोन प्रवासी. पैकी एक अंध. त्यांच्या वाटेत आलेला एक भव्य रुद्र तेजस्वी पुरुष.अंधाला प्रकाश म्हणजे काय ते माहीत नाही, तर त्या भव्य पुरुषाला अंधार म्हणजे काय हे माहीत नाही. त्याला प्रकाशाचा चिरंतन शाप आहे. हे एकदोनदा ऐकून त्या अंधाचा सहप्रवासी विचारतो,
“मनुष्याच्या वाट्याला दु:ख आलं, पण रात्रीच्या शांत विश्रांतीची देणगीही आली. ती सम्राटापासून दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांना मिळते. हा अंध आहे. त्याला चांदण्याचं वैभव माहीत नाही, पाण्यावरील जरतारी नक्षी ठाऊक नाही. पण तोदेखील स्वतःच्या दु:खापासून स्वतःला अंधारात हरवतो. मग आपणंच असं का म्हणता?”
तो भव्य पुरुष किंचित हसला. ते हसणे आर्त होते. त्याचा आवाज भोवती पसरलेल्या उन्हाप्रमाणे धगधगीत होता.
“पण माझ्या वाट्याला मात्र चिरंतन प्रकाशाचा शाप आला. तू मानव असून भाग्यवान आहेस. हे मानवा, मी सूर्य आहे.”
‘चैत्र’, ‘लग्न’, ‘बारसे’, ‘फेड’, ‘सिनेमा’ या कथा लहान मुलांभोवती फिरतात. यातल्या
विषयी मी पूर्वी लिहिले होते. ‘फेड’ हीसुद्धा अशीच एक सुरेख कथा. (गेल्या वर्षी एका कार्यक्रमात ‘फेड’ आणि ‘पराभव’ या जी.एंच्या कथांचे दूरदर्शनसाठी केलेले रुपांतर पाहिले होते आणि असले काही जी.एंच्या हयातीत झाले नाही याचेच समाधान वाटले होते!) ‘ग्रहण’ हीसुद्धा अशीच एक खास जीएस्पर्श असलेली कथा. पावसात भिजत ग्रहणाचे दान मागायला आलेल्या म्हातारीच्या कटकटीला कंटाळून दादूभट एक फाटका सदरा देतो खरा, पण काही उनाड टाळकी हिसकाहिसकी करुन त्या सदर्‍याचा एक हातच फाडून पळवून नेतात. त्या पोरांवर चिडलेल्या दादूभटाकडे बघून म्हातारी हसत म्हणते,”हेच तर बेस झालं दादा. म्हातारीची कटकट र्‍हायली नव्हं! नाही तर बघा, डोळे फोडून घेत म्हातारीलाच उसवत बसावं लागलं असतं सगळं किचकट्ट! पोरांनी उपकारच केला की डोंगराएवढा. अवो, आता काय सांगायचं नशीब? माझ्या पोरग्याला पुरा उजवा हातच नाही वो दादा!”
‘गार्‍हाणे’ ही तसे विशेष काही कथासूत्र नसलेली पण उत्तम कथा. संततीसौख्याला पारख्या झालेल्या रमाकाकूंचे ते एक व्यक्तिचित्रच. पण जी.एंचा स्पर्श या व्यक्तिचित्राला विलक्षण उंची देऊन जातो. तसलेच एक व्यक्तिचित्र ‘एक मित्र-एक कथा’ मध्ये आहे आणि इथे बाकी हा माणूस हयात असता तर आपण त्याला भेटायला गेलो असतो असे मला वाटून गेले. जी.एंसारखेच पराकोटीचे पूर्वग्रह आणि इसाळ बाळगून असलेला हा तर्कटी डोक्याचा खरखरीत माणूस पण साबणाच्या वड्यांसारख्या एकसारख्या एक दिसणार्‍या मऊ बुळबुळीत माणसांमध्ये हा आणूस एक उग्र ओरखडा काढून गेला असावा असे वाटले. याच कथेत एका जहाजावरील गर्भार मांजरी व बुशमास्टर साप यांच्याविषयी ‘अर्गसी’ मासिकात प्रकाशित झालेल्या एका कथेचा उल्लेख आहे. या कथेचे भाषांतर करण्याचे मनात असूनही ते जी.एंकडून झाले नाही याची जी.एंना चुटपूट लागलेली दिसते. तशी ती आपल्यालाही लागते.
आणि या संग्रहाचाचा शेवट करणारे ते दीड पानाचे व्याकूळ टिपण – ‘निरोप’. आपल्या शर्तींवर ताठ मानेने जगून, लेखन, वाचन, चित्रे, चहा, पुस्तके, सिगारेटी यांच्यात शांत गावात रमून आणि जनांच्या गलबल्यातून सतत दूर राहून कुणाच्या नकळत पलीकडे निघून गेलेल्या एक तपस्व्याचा निरोप. ‘माझे हात रिकामे दिसले तरी ते रिते नाहीत’ असे दिंडी उघडणार्‍या द्वारपालांना सांगणारा निरोप. धुळीने भरलेल्या अनवाणी पण रोख पावलांनी घेतलेला निरोप.आणि या निरोपाचीही जी ए याचना करत नाहीत, तर पुस्तक वाचताना पान उलटावे तितक्या सहजपणाने हातातले हात सोडवून घेऊन अंधारात निघून जातात. ‘काही झाले तरी माझ्या आयुष्यभर तू सांगाती सहप्रवास केलास. आता आपले मार्ग निराळे होत आहेत. अशा या अंतिम क्षणी तू मला मुक्त मनाने निरोप दे. कारण आता मी निघालो आहे. मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे’ हे वाचताना काळा चष्मा लावलेला, मधोमध भांग पाडलेला, तपकिरी रंगाचा कोट घातलेला हा माणूस हळूहळू दिसेनासा होतो. त्याच्या हातातील जळत्या सिगारेटचे टोक काही काळ अंधारात चमकत राहाते. नंतर तेही दिसेनासे होते. आपले पुस्तक वाचून संपलेले असते.
जेमतेम सव्वाशे पानांचे पण विलक्षण अनमोल असे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
कुसुमगुंजा
परचुरे प्रकाशन मंदिर
आवृत्ती पहिली १० जुलै १९८९
मूल्य १२५ रुपये

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे