निशापती महाराजांची चिकीर्षा

प्रावृष ऋतूच्या आगमनाची द्वाही फिरवणारे केकास्वर निशापती महाराजांच्या महालाभोवती रुंजी घालून गेले तरीही प्रत्यक्ष पर्जन्याचे आगमन होण्यास विलंब होणार असेच संकेत दिसत होते. दिनक्षयसमयी प्रवातागमन नित्याचे झाले होते, तथापि उदकधारांचे उर्वीमीलन काही केल्या होत नव्हते. वातावरणातील उत्ताप काही कमी होत नव्हता.

आपल्या महालात व्याकुलावस्थेत पहुडलेल्या निशापती महाराजांना उष्माप्रकोपाची पीडा असह्य झाली होती. प्रस्वेदबिंदूंनी निशापती महाराजांचे पीनमुख प्रच्छन्न झाले होते. आपल्या पीवर करकमलांत धरलेल्या कार्पासपटाने  ते पुनःपुन्हा घर्ममोचनाचा यत्न करत होते तथापि वसंतसमयातील पुष्पांवर वारंवार आकर्षित होणाऱ्या भृंग्याप्रमाणे स्वेद त्यांच्या गात्रागात्रांकडे आकृष्ट होत होता. परिश्रांत होऊन निशापती महाराजांनी आपली तुंदिल तनू शय्येवरून उन्नत केली.  वासगृहाच्या वातायनाला सन्मुख होऊन ते काही क्षण अर्धनिःसंज्ञावस्थेत तिष्ठत राहिले. तेवढ्यातही दिवाकराच्या रश्मिदंडांने त्यांच्या लोचनांस काही कष्ट झाले.  संधारावरील एक परिपक्व आम्रफल उचलून त्यांनी त्याचे अवघ्राण केले, तथापि आपल्या अशनाहीनतेचे स्मरण होताच त्यांनी ते फल पुनःश्च संधारावरील तबकात ठेवले.
विभ्रमावस्थेतच त्यांनी किंचित तीव्र असे करताडन केले. एकदा, दोनदा. त्यांच्या अधिर कृतींमधून त्यांचे क्षीण मनस्वास्थ्य प्रतीत होत होते. द्वारावरील यवनिकांचे सूक्ष्म आंदोलन झाले आणि महाराजांचा प्रियतम परिचारिक भ्रातृभजन महालात प्रविष्ट झाला. महाराजांना प्रणाम करून तो नम्रपणे महालाच्या भित्तीनिकट उभा राहिला. उभयतांच्या मौनावस्थेत कालाने काही पळांचे भक्षण केले.

“भ्रातृभजना.. ” महाराजांनी त्या अभाषणाचे खंडन करत वक्तव्य केले. “आमच्या प्रिया, सखी, मार्गदर्शक सुभाषिणीदेवी सांप्रत कोणत्या स्थळी आहेत याचे तुला प्रज्ञान आहे काय? ”
एखाद्या मंजूषेत भयंकर विषारी सर्प आहेत याचे ज्ञान असतानाही  ती  मंजूषा मस्तकावरून वाहण्याचे बळ व्हावे तसे  भ्रातृभजनाच्या ओष्ठांचे अल्पस्फुरण झाले. संकोच आणि निष्ठा यांच्यातील त्याच्या अंतःकरणात चाललेल्या  द्वंद्वाचे त्याच्या मुखावर किंचित्काल प्रकटन झाले. तथापि महाराजांच्या लवणभक्षणाला स्मरून   महाराजांच्या प्रती असलेल्या त्याच्या निष्ठेने त्याच्या मनातील स्वाभाविक संकोचावर जय मिळवला. कंठातील श्लेष्माचे निर्मूलन करण्याचा त्याने काहीसा असफल यत्न केला आणि सेवकाच्या मर्यादाशील स्वरात तो म्हणाला, “महाराज, सुभाषिणीदेवींचे स्वास्थ्य ढळल्याचे श्रवणात आले आहे. गुरुदेव राजवैद्यांच्या महाली त्यांच्यावर वैद्योपचार सुरू आहेत. ”
“काय? हे वर्तमान आमच्या कर्णांपर्यंत येण्यास इतका विलंब का झाला भ्रातृभजना? देवींना काय कष्ट होत आहेत भ्रातृभजना? ”
“क्षमा असावी महाराज. परंतु सेवकाच्या अधिकाराबाहेरच्या या गोष्टी आहेत. सुभाषिणीदेवी.. ”
“विराम घेऊ नकोस, भ्रातृभजना, तुला आमचे अभय आहे. देवींना…? ”
“महाराज, देवींना काही मनस्ताप असल्याचे ऐकतो आहे. काही कालापूर्वी आपल्या साम्राज्याच्या शत्रुपक्षातील काही व्यक्तिविशेषांबद्दल देवींकडे काही पृच्छा झाली होती, असे ऐकिवात आले आहे. त्यामुळे आधीच अतिसंवेदनशील असलेल्या सुभाषीणीदेवींचे मन भयशंकाग्रस्त झाले आहे. त्याकारणे त्या क्रोधातिरेकाच्या आहारी जाऊन मतिभ्रमित झाल्या आहेत. देवींना तीव्र निद्रानाश जडला असल्याचे वृत्त आहे. समस्त नरजातीविषयी त्यांच्या मनी काही छद्म उपजले आहे. गुरुदेव वैद्यराज उपचार करत आहेत, महाराज. आपण स्वस्थ राहावे….. ”
“आम्ही कसे स्वस्थ राहाणार भ्रातृभजना? कसे स्वस्थ राहाणार? सुभाषिणीदेवींच्या सामर्थ्यावर तर आमच्या राज्याचे क्षेम अबाधित आहे. जा, भ्रातृभजना, सत्त्वर गमन कर. या क्षणी  गुरुदेव वैद्यराजांच्या महाली जा आणि आम्ही त्यांचे स्मरण केले आहे हा आमचा संदेश त्यांच्यापर्यंत संवाहित कर. ते जर अन्नग्रहण करत असतील, तर त्यांना हस्तप्रक्षालनासाठी राजमहालात आमंत्रित कर. जा भ्रातृभजना, त्वरा कर… ”
महाराजांना प्रणाम करून भ्रातृभजन द्रुतगतीने महालाबाहेर गेला. निशापती महाराजांनी घर्मनिर्मूलनाचा पुनःप्रयास केला. आपल्या व्रणांचे अवलेहन करणाऱ्या अनुविद्ध भेरुण्डाप्रमाणे ते आपल्या महालात एकाकी बसून राहिले.

सायंकाल झाला होता. महालाच्या निकट असलेल्या न्यग्रोधपादपांच्या छायांनी आता लंबाकार धारण केले होते. शीतलक अनिलाने  वेग धारण केला होता. महाराजांचे स्वेदोत्सर्जन आता नियंत्रणात आल्यासारखे वाटत होते. कक्षाच्या बाहेरून प्रतिहारीचा पदरव आला आणि त्याबरोबरच गुरुदेव वैद्यराजांनी धारण केलेल्या तीव्र सुगंधद्रव्याच्या परिमलच्या उर्मिकांनी महालात नर्तन सुरू केले. महाराजांचा भालप्रदेश किंचित्काल संकोचल्यासारखा झाला. एखाद्या मदोन्मत्त कुंजराने अरण्यातल्या वृक्षलतांचे बलात्काराने पादपतन करावे तद्वत महालातल्या चित्रकटांवर आघात करीत गुरुदेव वैद्यराज महालात प्रविष्ट झाले. महाराजांना त्यांनी अतिनम्रपणे प्रणिपात केला.
“काय हा विलंब दल्यप्रवाद? आमचा आवेग आपल्याला ज्ञात नाही काय? ”
“क्षमा असावी, महाराज. काही व्यक्तिगत कार्यात व्यग्र होतो. आपला संदेश मिळताच त्या कार्याची पूर्तता केली आणि सत्वर निघालो. ”
“कसले कार्य दल्यप्रवाद? ”
गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवादांच्या मुद्रेवर लज्जेच्या विरल अवगुंठनाने आच्छादन केले. “प्रातःकाली दर्पणावलोकन करीत असताना आमच्या केशभारात काही पाण्डुछटा उमटल्याचे आमच्या अवलोकनात आले, महाराज. रुपयौवनाचे आपल्या साम्राज्यातील महत्त्व आपण जाणताच, महाराज. आपल्या महालात मद्रदेशीय ललनांची अनेक छायाचित्रे लावून आपणही हे वारंवार सिद्ध करण्याचा यत्न करत असता. काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा  करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… ”
“विषय आमचा नाही, तुमचा आहे दल्यप्रवाद. विषयांतर करून स्वजनांचा हर्षध्वनी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्ही राजदरबारात स्थान दिले आहे. आपले भाष्य मर्यादेत ठेवा, दल्यप्रवाद. आपल्या श्वेतकेशांसंदर्भात आपण भाष्य करत होतात.. ”
” यथार्थ, महाराज.  त्या शुभ्रचूडांवर आम्ही रक्तगर्भाचे अवच्छेदन करण्यात व्यस्त होतो. ते कार्य संपन्न होण्यास विलंब लागला महाराज. केशमार्जन, केशशुष्कीकरण होताच सत्त्वर आम्ही प्रस्थान केले, महाराज.” 
महाराजांना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास अतीव प्रयास पडल्याचे दिसले. तथापि आपल्या स्वरांतील संयम ढळू न देता ते म्हणाले, ” देवी सुभाषिणींचे स्वास्थ्य कसे आहे, दल्यप्रवाद? ”
“आता क्षेम आहे, महाराज. देवींना असाधारण असे कष्ट नाहीत, परंतु आदिम सर्वदा कलहप्रिय प्रकृती आणि त्यावर संदेहाचे उपवासन यामुळे देवींच्या मस्तिष्काला काही व्यावर्तने पडली आहेत. आम्ही दिलेला कल्प आणि दैनंदिन कार्यांतून संपूर्ण निवृत्ती यांनी देवी अल्पावधीतच कार्यचपल होतील. ”
“निवृत्ती? कसले भाष्य करता आपण दल्यप्रवाद? देवी आमच्या कूटप्रमुख आहेत. देवी आमच्या साम्राज्यातल्या मंत्री तर आहेतच, पण महत्प्रयासाने आम्ही देवींना इतर साम्राज्यांच्याही अमात्यपदी नियुक्तीची योजना केली आहे. त्यासाठी शीतांशुमहाराजांचे आम्हांस किती प्रशंसन करावे लागले, ते आम्हीच जाणतो. उत्तरनगरात देवींचे अमात्यपद आहे, म्हणून आमची कीर्ती अबाधित आहे. अन्यथा उत्तरनगरात आम्हाला  रिपुन्यूनत्व नाही, हे गुह्य आपल्यालाही ज्ञात आहे. आमचे उत्तरनगरात आगमन झाले ही वार्ता क्षणभरात षटकर्णी होते. गजवदनाचे बाहुबळ सांप्रत त्याच्या करांमधील कृपाणिकाइतकेच पीडादायक ठरते आहे. आणि हा रासभ… आमचा सुहृद रासभ.. आमच्या मंत्रीमंडळातील कौस्तुभ असा हा रासभ… तो अल्पभाषी आहे, तथापि त्याच्या वाणीने आमचे अंतःकरण क्षतिग्रस्त होते दल्यप्रवाद.. आणि या सर्वांहून असह्य असे ते मुक्तादेवींचे हलाहल. नको, दल्यप्रवाद, नको.  त्या स्मरणानेही आमच्या मनाचा दाह होतो. या सर्वांतून आम्हाला तारण करतात त्या आमच्या देवी सुभाषिणी. आणि आपण म्हणता देवींनी निवृत्ती स्वीकारावी? प्रबोधित व्हा, दल्यप्रवाद, चेतनावस्थेत या…. ” 
“महाराजांचे भाष्य अप्रस्तुत आहे असे म्हणण्याचे धार्ष्ट्य कुणी करेल, महाराज? तथापि एक तुच्छ प्रश्न मनात उत्पन्न होतो आहे, महाराज. आज्ञा असेल तर…. ”
“वदते व्हा, दल्यप्रवाद. ”
“महाराज, मूषकवंश साम्राज्याची कीर्ती सांप्रत  जीवलोकात दुदुंभते आहे. आपण तर या साम्राज्याचे सम्राट! अवघ्या मूषकांचे नृपाधिराज! आज आपण अंगुलीनिर्देश कराल ती पूर्वा! असे असून आपणांस उत्तरनगराचा मोह का होतो याचा बोध होत नाही, महाराज. इथे आपण सुखासनात राहावे महाराज. आपल्या क्रीडांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या मरुभूमीचा मोह का? क्षमा असावी महाराज.. ”
निशापती महाराज निःशब्द झाले. ‘आता आम्ही तुम्हाला काय सांगावे, दल्यप्रवाद? इथला जनसंकुल.. आपल्यासारखाच. मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते. आमच्या कुहूर लीला येथे जनप्रिय होतात, पण तेथे… तेथे समालोचकांच्या अग्निवर्षावात आमचे स्वत्व दग्ध होऊन जाते. देवींच्या अमात्याधिकारात आम्ही अनुजीवित तरी राहातो, पण देवी नसतील तर…? ‘
  “आपण येता आमच्यासह दल्यप्रवाद? उत्तरनगरात आम्ही आपल्यासाठीही एक अमात्यपद निर्माण करु. नवपरिणीत शीतांशू महाराजांचा आमच्यावर अनुग्रह आहेच, आम्ही आमच्या लांगुलचालनकौशल्याने तो वर्धित करु” निशापती महाराजांच्या प्रकट बोलण्यात ओज होते. “आपण सहित असाल तर आपण उत्तरनगराचेही मूषकवंश करु.. ”
गुरुदेव वैद्यराजांचे मुख शिखापतित झाले होते. त्यांच्या चक्षुंच्या परीघांवर जलसंचय झाल्यासारखा वाटत होता. एखाद्या प्राचीन मानभंगाची स्मृती होऊन त्यांचे अंतःकरण विषादमय झाले होते. क्षीण स्वरात ते उद्गारले, “महाराज, उत्तरनगरीचा मोह मला नाही, असे असत्यवदन मी तरी का करावे? पण महाराज, त्या नगरीतले ‘धरित्रीसौष्ठव’ मला सहन   होत नाही. माझे स्वास्थ्य ढळते, महाराज, मला वमनाची आणि अतिसाराची भावना होते. महाराज, क्षमा असावी.  क्षमा असावी, महाराज…. ”
जानुबल नष्ट झाल्याप्रमाणे गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद कंप पावत होते. निशापती महाराज जालकाला सन्मुख होऊन उभे राहिले.
चन्डवातामुळे धूलीकणांचा एक विशाल स्तंभ गगनाकडे आकृष्ट होत होता. त्या स्तंभापलीकडे उत्तरनगरीतले दीप प्रज्वलित झालेले दृष्टोत्पत्तीस येत होते. प्रवातासोबत सूक्ष्म वालुकणांचा एक उत्कट धारासंपात गवाक्षातून महाराजांच्या महालात प्रविष्ट झाला. महालातील प्रकाश धूम्र झाला. दल्यप्रवादांनी आणि अन्य सेवकांनी आपले नेत्र रुद्ध केले होते. निशापती महाराज मात्र उत्तान नेत्रांनी धूलीकणांच्या तिरस्करिणींतून अद्याप उत्तरनगरातील दीपांकडे पाहाण्याचा यत्न करीत होते.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए – ७ – तुती

‘ आपल्या कथा या आपण आपल्या स्मरणातील व्यक्तींना, प्रसंगांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे’ या अर्थाचे (अर्थाचेच – जी. ए. ‘श्रद्धांजली’ वगैरे शब्द वापरणाऱ्यांतले नव्हते!) जी. एं नि बऱ्याच वेळा, बऱ्याच लोकांना लिहिले आहे. आपल्या कथांमधील बहुतेक व्यक्ती आणि  प्रसंग आपल्या पंचविशीपर्यंतच्या आयुष्यावर आधारलेले आहेत असेही ते लिहितात. बहिणीचे प्रेम  ( आणि गाय) या गोष्टीचा जी. एंच्या कथांमध्ये अगदी तो टवाळीचा विषय होईपर्यंत उल्लेख होतो. सुशी आणि जाई या जी. एंच्या अकाली निधन पावलेल्या बहिणी हा त्यांच्या आयुष्यातील एक फार खाजगी, हळवा कोपरा होता. जी. एंसारख्या उग्र राखुंडी प्रतिमा असलेल्या व्यक्तीचा हळवेपणा हा विरोधाभास वाटेल, पण जी. ए. वैयक्तिक आयुष्यात अतिशय संवेदनशील, हळवे असले पाहिजेत असे मला वाटते. हा हळवेपणा आपला कमकुवतपणा म्हणून लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांनी माणूसघाणेपणाचे, तुसडेपणाचे वस्त्र पांघरले असावे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

जी. एंच्या ‘तुती’ या कथेतला निवेदक हा एक लहान मुलगा आहे. अगदी भोंगळ विधान करायचे तर हे लहानपणीचे जी. एच.  हा ‘मी’ आणि त्याचे बालपण यावर आधारीत जी. एंच्या काही फार सुंदर कथा आहेत. ‘तुती’,’कैरी’, ‘राधी’ (आणि जी. एं ना लिहायची असलेली पण (दुर्दैवाने) त्यांनी न लिहिलेली ‘केळी’ ) अशी काही चटकन आठवणारी उदाहरणे. गावाकडचे सर्वसामान्य घर. दुबळे, अशक्त पण मिस्कील वडील नाना (‘राधी’ मधले आबा) , करारी, फटकळ आई, तापट, चटकन डोक्यात राख घालणारा दादा आणि निरागस, मायाळू मोठी बहीण सुम्मी. या बहिणीविषयी ‘कैरी’ मध्ये फार सुरेख वर्णन आहे. तानीमावशी या सुम्मीविषयी बोलताना म्हणते,’ आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हणात रांगोळी काढावी लागे. त्या वेळी कमळी (कथानायकाची आई) ताम्हण घासून लालभडक करून त्यात पातळ गंधाची रांगोळी दुर्वांच्या टोकाने काढत असे. आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची. नंतर तिला सुम्मी झाली तीदेखील असल्याच श्रीसारखी – कोवळी शांत वासाची!’  पण असल्या घरगुती, उबदार गोधडीसारख्या कुटुंबावर सतत पडत असलेली अठराविश्वे दारिद्र्याची छाया – तिचे काय? त्या गरीबीच्या तडाख्यांने ते कुटुंब बघताबघता विस्कटल्यासारखे होते. देवघरातल्या शांत समईसारख्या बहिणीचे म्हाताऱ्या बिजवराशी लग्न लावून देण्याशिवाय नानांना काही पर्याय राहत नाही. त्या उर्मट, रानवट घरात सुम्मी विझून, करपून जाते. आणि शेवटी माजघरात, हातपाय बांधून, तोंडात बोळा घालून सासरच्यांकडून मारहाण सहन करुन, अंगावरचे चटके सहन करून शेवटी आड जवळ करणाऱ्या असंख्य सुम्मींसारखी ती संपून जाते.
आणि या सगळ्याचा साक्षीदार असणारा तो कथानायक – त्याला काही धड समजतच नाही. आठवड्यात चारदा वांग्याची भाजी झाली असली तरी नाना परत धोतरात बांधून जांभळी, गुळगुळीत वांगी का आणतात आणि’ वा! आज काय सुरेख वांगी मिळाली! आता भरल्या वांग्याची भाजी कर, फार दिवस झाले खाऊन!’ असे का म्हणतात , ज्या मल्लाप्पा कासाराच्या घरी आपण भाड्याने राहतो, तो मल्लापा हल्ली नानांना तडतडा का बोलतो आणि त्यावर नाना काही बोलत का नाहीत, आईच्या हातातल्या बांगड्या ओरबाडून करकरीत तिन्हीसांजेला नाना का बाहेर पडले आणि त्या रात्री कुणी कुणाशी बोलले का नाही, सुम्मीच्या लग्नात इतके सगळे जिवापाड करुनही तिच्या सासरच्या मंडळींचे वाट्टेल ते बोलणे नानांना का ऐकून घ्यावे लागले, ‘तिच्या सासरी जाते आणि त्यांच्या मोलकरणीपर्यंत सगळ्यांच्या पाया पडते’ असे म्हणून आई रडू का लागली, सुम्मीच्या हातावर डागल्याचा जांभळा डाग का पडला आणि ती सुम्मी… सुम्मी विहिरीत पडून गेल्याचे कार्ड येताच खूप भूक लागलेली असतानाही आपल्याला जेवण नको, काही नको, कोपऱ्यात जाऊन एकीकडे बसावे आणि रडावे असे का वाटले…. यातले काही त्या लहान पोराला समजत नाही.
असली ही खास जी. ए. शैलीची कथा तुती. जुन्या घरातल्या परसात तुतीचे झाड होते. तुतीचे गुपीत फक्त सुम्मी, दादाला माहीत होते. तुती थोडी कच्चीच असावी. म्हणजे अगदी कच्ची नव्हे तर थोडी पिकलेली, अगदी पिकलेली नव्हे तर थोडी कच्ची – म्हणजे गोडही लागते आणि आंबटही लागते. जीभ रवरवते, आणि गोडही लागते. मग तुती बराच वेळ ध्यानात राहते. हे सुम्मी- दादाला माहीत होते, पण ते तर आता इथे नाहीत….
आणि सुम्मी? ती तर आता कुठेच नाही. हसली की देव्हाऱ्यावरच्या पितळी तोरणाचे घुंगरू वाजल्यासारखे वाटत ती आईच्या चेहऱ्याची सुम्मी, ‘अहा बघा भागुबाई! विहिरीला घाबरतोय. ती काय गिळतेय की काय तुला? ‘ म्हणून हसणारी सुम्मी, सुट्टीत दादाशी सारखी भांडणारी, पण सुट्टीनंतर दादा कॉलेजला जायला निघाला की लहान मुलीसारखी रडणारी सुम्मी,  वयाने आपल्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या  बिजवराशी आपल्याला कुणी न विचारता लग्न ठवल्यावर गुढग्यावर हनुवटी ठेवून गप्प बसणारी सुम्मी आणि लग्नात धाकट्या भावाने निरागसपणे ‘ सुम्मी, तू आता आमच्याकडे कधी येणार? ‘ असे विचारताच समजूतदारपणाने ‘तुम्ही बोलवाल ना भाऊसाहेब, त्या वेळी! ‘ असे म्हणणारी आणि त्याला जवळ घेऊन ‘मला विसरायचं नाही हं, आणि दादा भेटला तर सांग त्यालाही.. ‘ असे हळूच म्हणणारी सुम्मी…  
सुम्मी तर आता कुठेच नाही. तिच्या आवडीचे रायआवळे, तुती आता जुन्या घरात राहिले. कृष्णी गाय नव्या घरात आली खरी, पण सुम्मी गेल्यावर नानांनी जे अंथरुण धरले, ते तिला समजले की काय कुणास ठाऊक! तिच्या डोळ्यांतून अखंड पाणी वाहू लागले. ती का रडते? तिला कसल्या आठवणी येतात? हे सगळे समजायच्या आतच तीही संपून गेली. दोघातिघांनी तिला उचलून बाहेर आणले, दर चौकटीला तिची शिंगे खटखट बडवली आणि तीही निघून गेली….
आणि या नव्या, खुराड्यासारख्या घरात आता अंथरुणाला खिळलेले नाना, आता अगदी चेपल्यासारखी झालेली, हाडे वर आलेली आई आणि या सगळ्याचा साक्षीदार असलेला श्रीपूमामा….
आणि मग पहिलीत पास झालेल्या या कथानायकाला ती विझून गेलेली आई म्हणते, ‘कारट्या, तू बी. ए. हो अगर होऊ नको, पण आतून बाहेरून अगदी दगड हो, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ!’ 
 हे असले घट्टे पडलेले, धोंड्यासारखे होणे बाकी जी. एंना जमले नसावे.
पण ‘तुती’ म्हणजे केवळ अशी दारिद्र्यात पिचलेल्या कुटुंबाची आणि आपल्या पित्याच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालून हसत हसत चितेवर चढणाऱ्या समंजस वगैरे भारतीय मुलीची हाय हाय कथा नाही. ‘तुती’ मध्ये जी. एंनी त्यांच्या इतर अनेक कथांप्रमाणे आयुष्याचे वरचे विरविरीत पापुद्रे सोलून आतला लसलशीत गाभा उघडा केला आहे. शब्दांचे कोणतेही खेळ, विभ्रम न करता साध्या अक्षरांतून आता कालौघात नष्ट झालेल्या, पण कोणे एके काळी अस्तित्वात होता या कल्पनेने अस्वस्थ करणाऱ्या समाजाचे चित्रण केले आहे. चित्रण हा शब्दही आता गुंडगोळा झाला आहे खरा, पण तो वापरावा वाटतो याचे कारण असे की ही आणि अशा कथा वाचताना जणू आपण एखाद्या चित्रपटाची पटकथा वाचतो आहोत असे वाटते. ही सगळी माणसे, प्रसंग फक्त कागदावरील अक्षरे राहत नाहीत, ती आपल्या आसपास वावरू लागतात. काहीसा असाच अनुभव माडगूळकरांचे लेखन वाचताना येतो. खानोलकरांचेही. पानवलकरांचेही.
जी. एंच्या लिखाणात हे सातत्याने दिसते, हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘तुती’ मधील अशी चित्रदर्शी भाषेची आणि प्रसंगांची असंख्य उदाहरणे इथे देण्याचा मोह टाळतो. कारण एकचः ज्यांनी आजवर ‘तुती’ वाचली नाही, त्यांना ती मुळातून वाचावी, असे वाटावे.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके

फार दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात ह. मो. मराठे यांच्या बहुचर्चित लेखाचे ‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’ या नावाचे पुस्तिकारुप आणि त्याला जणू उत्तर म्हणूनच संजय सोनवणींनी लिहिलेली ‘ब्राह्मण का झोडपले जातात?’ ही पुस्तिका पाठीला पाठ लावून ठेवलेली दिसली. ही दोन्ही पुस्तके विकत घेऊन वाचली. वाचताना खूप मनोरंजन झाले, काही वेळा हसूही आले. पण दोन्ही पुस्तके वाचून संपवल्यावर बाकी मन विषण्ण झाले. ‘जात नाही ती जात’ हे आधीपासून माहिती होते, पण आता ‘जाता जाणार नाही ती जात’ असे वाटावे इतका विखार या दोन्ही पुस्तकांत भरलेला आहे. या दोन्ही पुस्तकांत उल्लेखलेले विविध वर्तमानपत्रांतील आणि पुस्तकांतील संदर्भ आणि विविध लोकांची वक्तव्ये यांमुळे ही पुस्तके अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक वाटावी अशी झाली आहेत खरी, पण एका जातीचा दुसर्‍या जाती इतका तिरस्कार करु शकतात हे कळाल्यावर एकसंध समाज वगैरे निव्वळ कागदी गफ्फा वाटू लागल्या. या दोन्ही पुस्तकांमधले सगळे मुद्दे या लेखात मांडणे शक्य नाही – तशी गरजही नाही.पण या पुस्तकांमधील काही मुद्द्यांनी बाकी डोके चकरावून गेले. विस्तारभयास्तव या पुस्तिकेमधल्या हमोंच्या पुस्तिकेचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.सोनवणींच्या पुस्तकांतील मुद्द्यांविषयी पुन्हा कधीतरी.

‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’
ह. मो. मराठे
‘विद्वेषाच्या विरोधात जागृती मंच’ द्वारा प्रकाशित
पाने ९६, किंमत २५ रुपये
मराठेंच्या पुस्तकात आपल्याला हे पुस्तक का लिहावे वाटले (मूळ स्वरुप ‘किस्त्रीम दिवाळी २००४) हे त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या मुद्द्यापासून सुरु झालेले मराठेंचे विवेचन नंतर सरळसरळ ब्राह्मण विरुद्ध् मराठा समाज या मुद्द्यावर येते. ब्राह्मण्याची खूण म्हणून मानले जाणारे जानवे (आणि शेंडी) या गोष्टीचा कालबाह्य झालेली गोष्ट म्हणून आपल्याला त्याग करावा असे कसे वाटले आणि ब्राह्मण नव्हे तर कोणत्याच जातीचा असे लेबल लावून घेण्याला आपली कशी ना आहे यावर विस्ताराने लिहून मराठेंनी आपल्या पुरोगामीपणाची बैठक तयार केली आहे. (पाच वर्षांपूर्वीची हा लेख प्रसिद्ध झाला. सहा महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या ब्राह्मण महासंमेलनात एका विदुषींनी शेंडी आणि जानवे यावचा ब्राह्मणांनी त्याग करावा असे म्हणताच गदारोळ झाला होता!) हाच पुरोगामीपणा ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या काळापासून कसा अवलंबला आहे, याविषयीही मराठे लिहितात. (जातीव्यवस्था आणि वैचारिक मागासलेपणा आजही टिकवून ठेवण्यातला ब्राह्मणांचा सहभाग याविषयी मराठे इथे काही बोलत नाहीत) ब्राह्मण समाजाविरुद्ध ब्राह्मणेतरांच्या मनात असलेला आकस याबाबत मराठेंनी दिलेली उदाहरणे आपण कोणत्या जगात, कोणत्या समाजात रहातो आहोत याविषयी मनात शंका निर्माण करणारी आहेत. यातली काही विधाने विविध वक्यांनी आपल्या भाषणांत केलेली आहेत, काही लेखकांनी आपल्या लिखाणात लिहिलेली आहेत, तर काही मराठेंनी आपल्या लेखात ‘ब्राह्मणांवरील आरोप’ या मथळ्याखालील एकत्र केलेली आहेत. यातील काही मुद्द्यांचे मराठेंनी स्पष्टीकरणही दिले आहे. (ते वेगळ्या रंगात दाखवले आहे)यातले काही मुद्दे असे:
१.मुंबई, गुजराथ येथील दंगलीतून आपल्या पोलिसांतील ब्राह्मणवादी विकृती सगळ्या जगानं पाहिल्या!
२.ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी समाजाला अंधश्रद्धेच्या व रुढींच्या गर्तेत अडकवणार्‍या कर्मकांडांतून मुक्त करण्याचा फुलेंचा प्रयत्न होता
३.आज मराठी साहित्यात अशी स्थिती आहे की बहुजन समाजातील लेखकांना ब्राह्मणाचा आशीर्वाद मिळावा लागतो. आजही ब्राह्मण लेखकांच्या मान्यतेखेरीज बहुजन समाजातील लेखक मान्यता पावत नाही.
४.तत्कालिन समाजव्यवस्थेने संत ज्ञानेश्वरांना ब्राह्मण म्हणून मान्यता दिली नसल्याने संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हते
५.आज ब्राह्मण लोकांनी जे शिक्षण बहुजन समाजापर्यंत पोचवले आहे, त्याचा अभ्यास त्यांनी दहा वर्षांपूर्वीच केला असून त्याद्वारे नोकर्‍याही मिळवल्या आहेत. आता नको असलेल्या त्या शिक्षणाला त्यांनी बहुजन समाजाला दिले आहे.
६.हिंदुत्ववाद्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर चरित्र लिहिले, नाटके लिहिली, चित्रपट निर्माण केले,एकपात्री प्रयोग केले आणि त्यातून भरपूर पैसा कमावला
७.देशातील राजकीय नेते सत्ता मिळवण्यासाठी बहुजन समाजाचा वापर करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोध्रा हत्याकांड. या हत्याकांडात किती ब्राह्मण मेले याची सरकारने आकडेवारी द्यावी असे आवाहन मी सतत करत आहे.
८.आपण एतद्देशिय असल्याचे ब्राह्मण भासवत आहेत. संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे, म्हणून बहुजनांनी तिचा स्वीकार न करता इंग्रजीचा स्वीकार करावा.
९. इथल्या आदिवासींच्या जमिनींवर आक्रमण झाले, म्हणून आदिवासी राजा दशरथाकडे गेले, पण त्याच्या मुलाने मात्र आदिवासींना राक्षस म्हणून चिरडले
१०. शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विषप्रयोग करुन ठार मारले. संत तुकारामांच खून ब्राह्मणांनी केला.
११.रामदासांची व (शिवाजी) महाराजांची प्रत्यक्षात कधीही भेट झाली नाही, तसेच भवानीने तलवार दिल्याची कुठेही नोंद नाही. यापाठीमागे महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून घेण्याचे षडयंत्र ब्राह्मणांचे होते
१२.परकियांनी देशावर् इतकी वर्षे राज्य केले, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक म्हणजे आत्ताच्या ब्राह्मणवाद्यांचे पूर्वजच होते. त्यामुळे तेच खरे देशद्रोही आहेत.
१३. भांडारकर संस्थेवर जो हल्ला झाला तो ब्राह्मण समाजाला समोर ठेवून झाला होता.
१४.शिवाजींचा लढा मुस्लिमांविरुद्ध् नव्हे तर ब्राह्मण आणि त्यांनी तयार केलेल्या विषमतेविरुद्ध होता. (महाराजांच्या मंत्रीमंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे, पुरंदर किल्ल्यावर महाराजांना सर्वाधिक सहाय्य करणारे नीळकंठ सरनाईक, महाराजांच्या हेरखात्याचे पहिले प्रमुख नानाजी देशपांडे हे सर्व लोक ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत, त्यातील सुमारे १०० पत्रांत त्यांनी ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याचा किंवा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. ‘महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती’ हा उल्लेख स्वतः महाराजांनी एक पत्रात केला आहे. खुद्द महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घ्यायला संकोच वाटत नव्हता. अफजलखानचा वकील ब्राह्मण होता हे ब्राह्मणद्वेषाचे कारण असल्यास अफजलखानचे अनेक देहरक्षक मराठा होते व त्यातले दोघेजण शिवाजी महाराजांचे जवळचे नातेवाईक होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.)
१५.मुस्लिमांनी शिवाजीची बदनामी कधीच केली नाही, मात्र परदेशातील लेनच्या डोक्यात इथल्या ब्राह्मणांनी विकृती घतली.
१६.बहुजनांनी इतिहास घडवला, पण तो ब्राह्मणांनी लिहिला, म्हणून ब्राह्मण इतिहासाचे पद्धतशीर रीत्या विकृतीकरण करत आहेत.
१७.दादोजी कोंडदेव आणि रामदास महाराज यांना जबरदस्तीने शिवाजी महाराजांचे गुरु बनवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दादोजी कोंडदेव हे स्वराज्याच्या विरोधात होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता, म्हणून राज्याभिषेकासाठी गागाभट्टांना काशीहून बोलावण्यात आले. रामदास हा माणूस जर शिवाजींचा गुरु होता तर तो (मूळ वाक्यातील एकवचनी उल्लेख) महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित का नव्हता? ( छत्रपतींच्या राज्यभिषेक काळात गागाभट्ट हे नाशिक मुक्कामी होते, राज्याभिषेकाचा प्रस्ताव गागाभट्टांकडूनच आला, त्यावर महाराजांनी आपले कुलगुरु अनंत भट आणि बाळकृष्ण आर्वीकर यांना बोलावून त्यांचे मत घेतले. त्यांनी आणि नाशिक, त्र्ञंबकेश्वर येथील ब्राह्मणांनी संमती दिल्यावरच राज्याभिषेक करण्याचे ठरले. रामदास हे संन्यासी होते. अशा प्रसंगी बैरागी, संन्यासी यांनी उपस्थित राहू नये हा परिपाठ आहे)
१८. रामदास हे चारित्र्यहीन होते (मूळ शब्द ‘रंडीबाज)
१९.थुंकण्याची मडकी आपल्या गळ्यात बांधण्याची सक्ती दलितांवर ब्राह्मण पेशव्यांनी केली.
२०.कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कार्तिक स्ननाच्या वेळी पुराणोक्त संकल्प सांगणारा नारायणभट या वेश्यावृत्तीचा होता. त्याला आणण्यासाठी सरकारी गाडी वेश्यावस्तीत पाठवावी लागत असे.
२१. ‘भांडारकर झांकी है, शनिवारवाडा बाकी है’
२२.विद्यापीठीय आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम ब्राह्मणांनी लिहिल्यामुळे दलितांना या परीक्षांत म्हणावे तसे यश मिळत नाही, व हे कारस्थान वर्षानुवर्षे चालत आले आहे.
२३. हिंदुधर्म हा आमचा नसून तो विदेशी आर्य ब्राह्मणांचा आहे असे शिवधर्माच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्यांचे म्हणणे आहे. “शिवधर्म हिंदुविरोधी नाही, पण ब्राह्मणविरोधी आहे, त्यामुळे या धर्मात ब्राह्मणांना प्रवेश नाही” असे शिवधर्म स्थापनेच्या मेळाव्यात झालेल्या भाषणांत म्हटले गेले,” शिवधर्म स्थापनेच्या आजच्या प्रसंगी आम्ही बहुजनांनी ब्राह्मणांबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत. यापुढचे सर्व विधी बिनशेंडीच्या माणसाने करायचे आहेत. यापुढे शिवधर्मियांसाठी मनुस्मृती, मत्स्यपुराण हे विकृत ग्रंथ त्याज्य आहेत. भटा ब्राह्मणांची सर्व बौद्धिक, सांस्कृतिक, मानसिक गुलामगिरी झुगारायची आहे. या पुढील असे विकृत धार्मिक ग्रंथ केवळ जाळायचेच नाहीत, तर असे धर्मग्रंथ लिहिणार्‍यांनाही आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही” असेही म्हणण्यात आले.
२४.जिजाऊंच्या उच्च, उदात्त, मानवी रुपावर दैवतीकरणाचे एकही पुट चढणार नाही याविषयी आपण सदैव जागरुक राहू या असे मानणार्‍या शिवधर्माच्या प्राथमिक संहितेत बाकी जिजाऊंचे पूजन करुन बालकाचे नामकरण करावे असे म्हटले आहे. या संहितेत जिजाऊंची आरतीही दिली आहे.

ब्राह्मण समाजाला टिपण्यासाठी सगळा ब्राह्मणेतर समाज असा पचंग बांधून तयार झालेला आहे असा वाचकाचा समज करुन देण्यात जवळजवळ यशस्वी झाल्यानंतर ‘शस्त्राघाता शस्त्रच उत्तर’ या न्यायाने मराठे आपले आणि आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांमधले काही विचार मांडतात. ते वाचून तर औषधापेक्षा आजार परवडला असे वाटू लागते. त्यातले काही विचार असे:
१. शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न आला तर ब्राह्मणही काही विचार करतील. कोंडलेले मांजर जसे हिंसक बनते तसे ब्राह्मणांसही व्हावे लागेल (!). ते शस्त्र हातात घेऊन नाही तर डोके लढवून.
२.धम्मप्रवर्तन दिनानिमित्त लाखो दलित मुंबई व नागपूर येथे जमा होताततसे वर्षातील कोणतेतरी दोन दिवस ठरवून त्या दिवशी लाखो ब्राह्मणांनी शहराशहरातून व गावोगावातून मिरवणुका काढल्या पाहिजेत.
३.ब्राह्मणांची व्होट बँक संघटित करणे आवश्यक आहे
४. यापुढे ब्राह्मणांनी भिक्षुकीची किंवा पौरोहित्याची कामे बंदच करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्यांची मुलेबाळे व्यवस्थित नोकरी धंदा करीत आहेत, त्या भिक्षूकांनी भिक्षुकीची कामे ताबडतोब थांबवावीत.
५.वास्तविक पहाता आजचा तरुण ब्राह्मणवर्ग रानावनात राहून अदिवासी लोकांच्या आश्रमशाळा चालवण्याचे, त्यांन औषधोपचार करुन सेवा करण्याचे विधायक काम करण्यात गुंतला आहे.
६. ब्राह्मण महासंमेलनात व्यक्त करण्यात आलेले विचारः ब्राह्मण मुलींनी ब्राह्मणेतरांशी अजिबात लग्ने करु नयेत. ती कधीच सुखाची होत नाहीत ( या उद्गारांना तरुण ब्राह्मण स्त्रियांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला) ब्राह्मणांनी संततीनियमन अजिबात करु नये. ब्राह्मणांनी प्रजा वाढवावी. सरकार काही ब्राह्मणांना पोसत नाही. ( या उद्गारांना टाळ्यांच्या गजरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला!)
६. १९६० नंतर सर्व क्षेत्रातील खालपासून वरपर्यंतची सर्व सत्ताकेंद्रे ब्राह्मणेतरांच्य हाती गेली आहेत,आणि ब्राह्मणांना कटाक्षाने दूर ठेवले जात आहे. हे आता अटळ आहे
तथापि जगात संपूर्ण चुकीचे असे काही नसते या न्यायाने या स्फोटक पुस्तिकेत विवेक शाबूत ठेऊन केलेले काही विचारही वाचायला मिळाले. त्यातले काही असे:

१. ब्राह्मणांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सिंधी, गुजराथी समाज हा ब्राह्मणांपेक्षाही अल्पसंख्याक असतानादेखील त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणांविरुद्ध आहे तितकी अप्रीती नाही. याचे कारण कुठेतरी आपला आहंभाव असावा.सर्वात जास्त ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रातच का याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वार्थी, अप्पलपोटे, जातीचा दुराभिमान बाळगणारे, इतरांना तुच्छ लेखणारे, सामाजिक समस्यांचे भान नसलेले, धर्माच्या आधारे बहुजन समाजाचे शोषण करणारे अशी ब्राह्मणांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. ही प्रतिमा बदलवली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.
२. आजवर ब्राह्मण गरिबीत जगले. यापुढे ब्राह्मणांनी गरीबीचा नव्हे तर श्रीमंतीचा ध्यास घेतला पाहिजे.
३. ब्राह्मणवाद हा फक्त ब्राह्मणांतच असतो असे नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे असे म्हणणार्‍या बॅ. अंतुलेंच्या मंत्रीमंडळातील एक महिला मंत्री यासुद्धा ब्राह्मणवादीच ठरतात. कै. वसंतराव नाईक यांना ‘वंजारडा’ आणि कै. यशवंतराव चव्हाण यांना ‘कुणबट’ या विशेषणांनी संबोधणारे नेते होऊन गेलेच ना? शूद्र व अतिशूद्रातील एका जातीने दुसर्‍या जातीला नीच समजणे हेसुद्धा ‘ब्राह्मण्य’ च आहे.

एखाद्या कलाकृतीने आपल्याला अस्वस्थ केले तरे ते त्या कलाकृतीचे यश मानावे असा संकेत आहे. या पुस्तिकेने मी अस्वस्थ झालो, पण ते या पुस्तिकेचे यश असे म्हणायला मन तयार होत नाही. सोनवणींची पुस्तिका वाचून तर ही अस्वस्थता वाढली.
हे सगळे काय चालले आहे?

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी ए – ६ – जी. एं. च्या कथांचा अर्थ – (अ)

जी. एं. च्या कथांची एकंदरीत वाटचाल पाहिली तर सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कथांवर असलेला पाश्चिमात्य लेखकांचा ( चेकॉव्ह वगैरे) प्रभाव स्पष्ट दिसतो. गूढकथा, भयकथा अशा कथाप्रकारांबद्दलही जी. एं. ना आकर्षण होते. या सगळ्याशी अगदी विसंगत अशा खांडेकरी आदर्शवादी बोधकथांचाही त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कथांवर प्रभाव दिसतो. अर्थात यात विस्मय वाटण्यासारखे काही नाही. प्रत्येक लेखकाला आपली वाट सापडण्याआधी अशी आंधळी धडपड करावी लागतेच. नंतर बाकी जी. एं. ना आपल्या या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथा अजिबात आवडत नसत. ‘सोनपावले’ या जी. एं. च्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या गोळाबेरीज कथासंग्रहात अशा बऱ्याच बाळबोध कथा आहेत, हे मी आधी लिहिले आहेच. यातील काही कथा सुखांतिक स्वरुपाच्याही आहेत, आणि काही तर विनोदीही. आपले वळण गाठल्यानंतर बाकी जी. एं. नि असले काही लिहिल्याचे दिसत नाही. अपवाद म्हणजे जी. एं. ची (बहुदा एकमेव अशी सुखांतिका) ‘कवठे’ ही कथा आणि अर्थातच ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ हे पुस्तक. यातील ‘माणसे.. ‘ मध्ये खास जी. एं. चा विखारी विनोद असला तरी या पुस्तकाचा शेवट विलक्षण गंभीर आणि चटका लावणारा आहे. जणू जी. एं. नि स्वतःसाठी लिहिलेला ‘एपिटाफ’च. आणि ‘कवठे’ ही कथा म्हणजे तर जी. एं. च्या हातून लिहिला गेलेला ‘नंदा प्रधान’ सारखा अजब प्रकार आहे. पण हे सगळे अगदी अपवादाने.

एरवी बाकी जी. एं. च्या कथा सरधोपट असत नाहीत. त्यांची ‘माणसाचे काय, माकडाचे काय’ अशा नावाची एक कथा आहे. सकृतदर्शनी ती कथेतल्या सुब्राव या व्यक्तीच्या एकाकीपणाची कथा वाटते. मंदाकिनी जोशी यांना लिहिलेल्या पत्रात जी. एं. नि या कथेमागचा त्यांचा विचार स्पष्ट केला आहे. (जी. एं. नि हे असे अगदी क्वचितच केले आहे) हा विचारही कळायला अवघडच आहे. ते म्हणतात, ‘ किड्याच्या डोळ्यापासून आभाळातील अतिभव्य तारकापुंजापर्यंतच्या पटात माणसाचे स्थान किती याविषयी ती कथा आहे. एकाकीपणा ही भावना शेवटी खरे तर राहू नये, कारण सगळीच लहान – मोठी शून्ये समजल्यावर उलट इतरांशी असलेल्या नात्याचीच जाणीव होईल. पण लहान मोठ्या शून्याशी आपणही शून्य असल्याने होणाऱ्या जवळिकीमुळे शून्याला काहीच अर्थ नाही, ही अर्थहीनतेची भावना त्या कथेत दिसावी. ‘

हे असेच काहीसे त्यांच्या ‘प्रदक्षिणा’ या गाजलेल्या कथेबाबतही झाले आहे. या कथेचे रसिकांनी स्वागत केले ते सामाजिक जीवनातील एका व्यक्तीचे – दादासाहेबांचे -खरे श्वापदासारखे जिवंत चित्रण म्हणून. त्यातही नियतीचे वेडेवाकडे पिळे आणि त्यामुळे शांताक्कांच्या वाट्याला शेवटी आलेलेले रिकामे, भंगलेले नशीब – हे सगळेही रसिकांच्या पसंतीला उतरले. पण जी. एं. ना खरोखर हे असे आणि एवढेच म्हणायचे होते काय? त्यांनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या पत्रात लोकांना या कथेमागचे सूत्र कळालेच नाही, याविषयी असमाधान व्यक्त केले आहे. या कथेत शांताकांप्रमाणेच ससेहोलपट झालेल्या आबाजींचे एक पात्र आहे. “पण माझं ऐकणार कोण? ” हे पालुपद आबाजींच्या तोंडी असते. आबाजी घरातून कायमचे निघून गेल्यावर त्यांची नक्कल करणाऱ्या नोकराच्या तोंडचे ते शब्द दादासाहेबांच्या अर्धपुतळ्यावरून येतात, अशी एक अस्पष्ट सूचना जी. एं नि ठेवली आहे. दादासाहेबांच्या या सगळ्या स्वार्थी, आपमतलबी, ढोंगी चित्रात त्यांची स्वतःची काहीतरी बाजू असेल, पण ती ऐकणार कोण असे आपल्याला सुचवायचे आहे, पण ते काही वाचकांच्या ध्यानात आले नाही, आणि ही कथा म्हणजे केवळ एक ‘सटायर’ होऊन बसली आहे, म्हणूनच ती आपली एक अयशस्वी कथा आहे, असे जी. एं. ना वाटत असे.

त्यांच्या या कथेवर कुणीतरी एक एकांकिका लिहिली आणि तिच्यात तर शेवटी शांताक्का दादासाहेबांचा पुतळा फोडतात असला बटबटीत शेवट दाखवला तेंव्हा जी. ए. कमालीचे अस्वस्थ झाले होते. असेच काहीसे त्यांच्या ‘कैरी’ या कथेबाबत अमोल पालेकरांनी काढलेल्या चित्रपटाबाबत झाले आहे, झाले आहे असे विजय पाडळकर जी. एं. च्या पत्रसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे. ‘मन लावून एखादी नाजूक सुंदर रांगोळी काढावी आणि उठून जाता जाता आपणच तिच्यावर पाय द्यावा असे काहीसे पालेकरांनी या चित्रपटात केले आहे. ‘ असे ते म्हणतात. मी ‘कैरी’ पाहिलेला नाही, पण अगदी पालेकरांसारखा तालेवार दिग्दर्शक असला तरी त्याला कैरीसारखी जातीवंत, डोक्यावर पदर घेतलेली कथा चित्रपट या माध्यमातून पुढे आणणे अवघड आहे, असे मला वाटते. पूर्वी जी. एं. च्या ‘पराभव’ आणि ‘चैत्र’ या कथांचे दूरदर्शनने केलेले नाट्य/ चित्र रुपांतर मी पाहिले होते, आणि ते त्यावेळी अगदी बघवले नव्हते.

आता इथे एक दुष्ट, वाकडी शंका मनात येते. ‘जे जे लोकप्रिय, ते ते हिणकस’ हे जी. एं. चे मत प्रसिद्धच आहे. त्याच न्यायाने अगदी आपली कथा का असेना, ती लोकप्रिय झाली, लोकांना तिचा एक अर्थ लागला, की ते तसे आपल्याला म्हणायचेच नव्हते असे म्हणावे असे जी. एं. ना वाटले असेल का? (जी. एं. चाच ‘वडारकांगावा’ हा शब्द येथे आठवतो) त्यांच्या ‘पुनरपी’ या कथेत मांजरीने पिलांना जन्म देणे आणि त्याचवेळी दादासाहेबांचा झालेला मृत्यू एवढी सांकेतिकता वाचकांना समजली, पण यापुढे दारात उभी असलेली एक नवी मांजरी, तिच्या पोटाचा भरदार, गोलसर आकार आणि त्यातून माईंना स्वतःच्या मृत्यूची लागलेली चाहूल, हे बाकी जी. एं. नि स्वतः (कदाचित हतबल, हताश होऊन) सांगेपर्यंत वाचकांना कळाले नाही. या अर्थाने आपल्या कथा अयशस्वी आहेत, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. तरीही जे जनतेला कळाले, आवडले नाही ते श्रेष्ठ, या त्यांच्या मतानुसार या अपयशी कथा यशस्वीच आहेत, असे जी. एं. ना जाताजाता सुचवायचे होते काय? जी. ए. हे कमालीचे बुद्धीवान होते. त्यामुळे एकाच कथेचे दोन-तीन अर्थ तयार ठेवून लोकांना जो अर्थ लागेल, ते आपल्याला म्हणायचेच नव्हते असेही त्यांनी जाणीवपूर्वक केले असावे काय? जी. एं. च्या कथा आवडणाऱ्यांनाही (‘भक्त’ वगैरे शाळकरी शब्द बाजूला ठेवून) अस्वस्थ करायला लावणारा हा विचार आहे.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

जाताजाता

नको देवराया
विरक्तीचा ठेवा
आसक्तीत न्हावा
जीव माझा

ज्याला त्याला आले
सत्छीलाचे न्हाण
पायीची वहाण
मीच बरा

जहाले उदंड
पुण्यवान जगी
पुण्याचीच लागी
चढाओढ

फासल्या विभूती
जप कोटीकोटी
नेसली लंगोटी
वैराग्याची

सौजन्याचे डोह
भक्तीचेच तळे
पिकवले मळे
चारित्र्याचे

मन मात्र माझे
पापात बुडाले
लाभले भोगले
पुरेपूर

पुण्याचे संचय
तिकडे जळो दे
नको पापामध्ये
भागीदार

वारुणीची रात्र
स्तनाकार पेला
ऐसा आला गेला
जन्म माझा

त्यागाचाच त्याग
मुक्तीतून मुक्ती
आयुष्या या युक्ती
फसवले

ऐशा आयुष्याचे
बांधोनी संचित
तथापि सस्मित
निघालो गा

 

 

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

मिरवणूक

असं समाजाशी इतकं तुटक राहून कसं चालेल
म्हणून गाडीची काच खाली घेतली
आणि बोटांनी ठेकाही धरला सूक्ष्म
एका ओळखीच्या मोरयागीताच्या रिमिक्सवर

तरुण आहेत, थोडी मस्ती चालायचीच
म्हणून कौतुकाचाही प्रयत्न केला
काही लचकणाऱ्या कमरा बघून
जरा मनाचे कोपरे दुमडूनच
पण तरीही

आणि उलट्या दिशेने येणाऱ्या
एका सहकुटुंब मोटारसायकलवाल्यालाही
हसून हात केला ओळखीचा
बिचारा असेल मुलाबाळांना
आरास दाखवायला आला
अशी समजूत काढत
स्वतःचीच

एरवी असतोच की आपण शिस्तबद्ध
जबाबदार आणि शांतताप्रेमी
काही दिवस असेही
संस्कृती, श्रद्धा, भावना यांचे
असं म्हणत गाडून टाकली
उसळणारी मुक्ताफळं
शेवटी समाज म्हणजे तरी काय
वगैरे वगैरे

आणि एका धूमधडाक्यानं
हादरलो अचानक अंतर्बाह्य
गुलालाचा एक ढग
अंगाखांद्यावर कोसळेपर्यंत
एक पिचकारीही आली काचेशी, अंगाशी
गुटख्याची, किंचित हातभट्टीचीही

काच वर करता करता
पहिला सलाम केला तो
आपल्या अल्पसंख्याक बुद्धीवादी वगैरे नपुंसकतेला
आणि दुसरा
खुद्द बाप्पालाच

म्हणालो मनापासून
विघ्नहर्त्या
ही उरलीसुरलीही नाळ
असलेली समाजाशी
कापून टाक बाबा
पुढच्या वर्षीपर्यंत

मग ये लवकर
किंवा तुला हवा तेंव्हा
माझं काहीही
म्हणणं नाही

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

धुक्यातून उलगडणारे जी. ए.-५

जी. ए –  पूर्वग्रह – विसंगतींचे गाठोडे

‘आपले पूर्वग्रह पूर्ण गाठी मारल्याप्रमाणे असंस्कृत आणि गावठी आहेत’ या मताची जी. एं. नि आपल्या खाजगी लिखाणात मुक्तहस्ताने उधळण केली आहे. इतकी, की ते या मताचे आणि या मतातून निर्माण होणाऱ्या आपल्या प्रतिमेचे उदात्तीकरण करताहेत की काय अशी शंका यावी. मूकपणे, फार दुरून,  स्वतः झिजत भयंकर उच्च प्रेम करणाऱ्या शरदचंद्रांच्या नायिका त्यांना हास्यास्पद वाटत असत. पु. लं. च्या लिखाणाविषयी लिहिताना जी. एं. नि सुनीताबाई देशपांड्यांना एक आणि इतरांना भलतेच असे लिहिले आहे. यामागे ‘सुनीताबाईंची निखळ, तीव्र वैचारिक मैत्री गमावू नये’ असा एक रोख विचार असल्याचे काही लोकांचे मत आहे. पु. लं. च्या लिखाणाबाबत ‘ ते इतका गुलाल फेकतात की तो डोळ्यांत जातो’ या मताशी आपण सहमत नाही असे ते लिहितात. इतरत्र बाकी त्यांनी पु. लं. चे लोकप्रिय होण्यासाठीचे लिहिणे, इन्स्टंट भारावून जाणे याविषयी असेच लिहिले आहे.

आपली मते, पूर्वग्रह जुनाट, प्राचीन आहेत याही गोष्टीचा जी. एं. नि वारंवार उल्लेख केला आहे. पूर्णपणे नास्तिक वृत्तीच्या जी. एं. ना संध्याकाळी घरात मुलांनी ‘शुभं करोती’ म्हणणे फार आवडत असे. तसेच घरासमोर घातलेली रांगोळी. याउलट (स्त्रियांबाबत त्यांच्या मनात एकंदरच तिटकारा असला  तरी त्यातल्या त्यात) ‘तीन चतुर्थांश अंग पूर्णपणे उघडे व उरलेले अर्धवट उघडे टाकून हिंडणाऱ्या हल्लीच्या पुष्कळ नायलॉन निर्लज्ज बायका पाहिल्या की मला मस्तकतिडीक उठते’ असे ते लिहितात. स्वतःला धूम्रपानाचे जबरदस्त व्यसन असलेल्या  जी. एं. ना स्त्रियांनी सिगारेट ओढलेली अजिबात आवडत नसे, या विरोधाभासाला काय म्हणावे? पिवळा टाय बांधणारी, चहा न पिणारी, ओठाची कुंची करून तंबाखू चघळत बोलणारी, अमिताभला नट समजणारी व हेमामालिनीला सौंदर्यवती समजणारी माणसे आपल्याला आवडत नाहीत असे जी. ए. म्हणत. अमिताभचा एकही चित्रपट न बघता त्याच्या अभिनयाचा घाऊक तिटकारा करावा असे जी. एं. ना का वाटले असावे?

पुणे हे जी. एं. चे नावडते गाव. दुर्दैवाने त्यांना आयुष्यातली शेवटची काही वर्षे पुण्यातच काढावी लागली. ‘मुंबईला किमान समुद्र तरी आहे. पुणे हे शहर जास्त ऍक्टिव्ह माणसांसाठी आहे. व्यापार आहे, चळवळी, व्याख्याने, चर्चा, गच्चीवरच्या गप्पा, तळघरातील मसलती सतत काहीतरी घडत आहे. जर येथे एखादा माणूस कुठे, शांतपणे काही न करता बसलेला दिसला तर त्याला उचलून सरळ मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील की काय अशी मला भीती वाटते’ असे ते लिहितात. एकंदरीत बिनचेहऱ्याच्या, बिनओळखीच्या शांत गावात राहणे जी. एं. ना आवडत होते. धारवाडात ते इतकी वर्षे राहिले, पण थोर मराठी साहित्यिक या अर्थाने त्यांना ओळखणारे धारवाडातही फारसे लोक नव्हतेच. हिंदी चित्रपटांविषयीचे त्यांचे मत तर जगजाहीरच आहे. हिंदी चित्रपटात उद्या या गोष्टी दिसल्या तर त्यांवर बाकी विश्वास ठेवणे मला जमणार नाही म्हणून जी. ए. जी यादी देतात ती वाचून हसू येते : वेळेवर कपडे देणारा शिंपी, रात्री ताणून झोप न काढणारा नाईट वॉचमन, शोकेसमध्ये साड्या मांडलेल्या असता तिकडे पाठ करून फूटपाथवर उभी असलेली स्त्री, वेणीफणी करताना तोंडात हेअरपिना न धरणारी बाई, साहेबावर आपले किती वजन आहे हे न सांगणारा पुरुष, आपणाला किती आजार आहेत हे न सांगणारा म्हातारा, एखाद्या जुन्या, मेलेल्या उंदराकडे पाहावे त्याप्रमाणे आपल्याकडे न पाहणारा बँकेतील बाजीराव कारकून, इंग्रजी चित्रपट पाहताना “काय म्हणाला हो ती? काय म्हणाली हो ती? ” असे सतत न विचारणारी शेजारी बसलेल्या जोडप्यांपैकी नवपरिणिता, पेपर उघडतो न उघडतो तोच “झाला का पेपर? ” म्हणत समोर ठिय्या न मांडणारा निगरगट्ट फुकटा वाचक शेजारी…   किती बारीक, खोल निरीक्षण आहे हे!

 व्यवस्थितपणाविषयी त्यांनी चहा -साखरेचे डबे जेथल्या तेथे ठेवण्याचा गावठी गुण असे म्हटले आहे. व्यवस्थितपणा हा जणूकाही अक्षम्य दोषच असावा असाच त्यांचा रोख दिसतो.  व्यवस्थितपणाला नावे ठेवणाऱ्या जी. एं. नि सुनीताबाई देशपांडे, माधव आचवल अशांची पत्रे व्यवस्थित जपून ठेवली होती; एवढेच काय, पण आपले शालेय जीवनापासून लिहिलेले प्रकाशित / अप्रकाशित साहित्यही सांभाळून ठेवले होते. म्हणजे स्वतःला सोयिस्कर इतका व्यवस्थितपणा चालेल, इतरांबाबत मात्र उपहास असे जी. एं. चे धोरण असावेसे वाटते.

प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर राहण्याचा जी. एंचा हव्यास एका व्यक्तीचा खाजगी निर्णय म्हणून पटण्यासारखा आहे. पण एकंदरीतच आपण किती जुनाट, शेवाळलेले आहोत, हे त्यांना वारंवार अधोरेखित करण्याची गरज का वाटली असावी याचे नवल वाटते. पण तसे असतानाच मधूनमधून खाजगी आयुष्यात होणाऱ्या उलथापालथींनी ते काहीसे डचमळलेले दिसतात. बऱ्याच गोष्टींमध्ये जी. एंना ‘गर्भवती स्त्रीचा खुळचट हळवेपणा ‘ दिसतो. पण अशी कडूजहर टीका करताना आपल्या आयुष्यातही अशा  ‘हळवेपणाच्या खुळचट’ जागा आहेत या कल्पनेने ते अस्वस्थ होतात. त्यांच्या कथांमधील गाय व बहिणीचे प्रेम ही अशीच एक जागा. त्यांवरची टीका मात्र जी. एंच्या जिव्हारी लागते आणि ते विषय ‘टॅबू’ असल्याने त्यांवर बिलकूल भाष्य करणार नाही असा ते पवित्रा घेतात.  त्यांचे वरवरचे माणूसघाणेपण, लोकांना टाळण्याची वृत्ती हे त्यांनी या हळव्या जागा लपवण्यासाठी घेतलेले कवच आहे असे बऱ्याच लोकांनी व्यक्त केलेले मत पटू लागते. आपल्या लहानपणी घरी गाय असे, त्यामुळे आपल्या लिखाणात गायीचे उल्लेख हे अपरिहार्य आहेत हे त्यांचे म्हणणेही पटत नाही. मधू मंगेश कर्णिकांचे ‘लागेबांधे’ हे पुस्तक हळवे आहे, फारच हळवे आहे असे म्हणून एकंदरीतच साहित्यातील भाबडेपणावर आणि हळवेपणावर टीका करणारे जी. ए. त्याच पत्रात, त्याच परिच्छेदात ‘ वडिलांविषयी, आईबहिणींविषयी, घराविषयी (गाईविषयी? ) हळवे व्हायचे नाही, तर कोणाविषयी? ‘ असे विचारतात, तेव्हा त्यांची भूमिका समजेनाशी होते.

गांधीवादाविषयी (स्वतःचा फारसा अभ्यास नसतानाही) जी. एंची तीव्र मते वाचून नवल वाटते. ऐंद्रिय सुखांना नाकारण्याचा गांधीवादातला हट्ट त्यांना पोरकट वाटतो. ‘आत्मा चिरंतन आहे, आणि काळ अनंत आहे. ते आपले एकमेकांना सांभाळून घेतील! इंद्रिये माझे साथी आहेत, शत्रू नव्हे. काळाने माझ्यासमोर कापडाचा जो एक तुकडा टाकला आहे, त्यावर मी कीही गिजबिज करीन. भाग्य असेल तर त्याचे एक चित्रदेखील होईल, पण त्याची भगवी लंगोटी मात्र करण्याचा खुळचटपणा मी करणार नाही, ‘ हे त्यांचे शब्द! मार्क्सवादाविषयीही जी. ए. लिहितात, ‘ इतके अनाकर्षक, कोडगे, वैराण, हमाली तत्त्वज्ञान मला कोठे आढळले नाही. मार्क्सवादी तत्त्वज्ञान घर बांधायला मदत करते, पण त्या घरात राहावे कसे हे शिकायला अन्यत्र गेले पाहिजे’. संतसाहित्याविषयीही त्यांचे असेच जबरदस्त पूर्वग्रह आहेत. संतांचा मानवी स्वभावाशी अत्यंत कमी परिचय होता, म्हणून सगळे संतसाहित्य अत्यंत मर्यादित, कोते आणि ज्या त्या संताच्या व्यवसायाशी निगडित झाले आहे असे जवळजवळ ‘स्वीपिंग स्टेटमेंट’ ते करतात. ‘माळी विठ्ठलाला कांदामुळेवांगी समजतो; चांभार स्वतःला वहाण समजतो – ‘हे विठ्ठला, माझ्या आयुष्यावर तुझ्या पावलांचा रंधा मार’ असे एखाद्या सुताराने लिहिले आहे की काय हे शोधून पाहिले पाहिजे’  – असे लिहिणाऱ्या माणसाचा संतसाहित्याचा अभ्यास असेल तर त्याला काही महत्त्व देता येईल. पण तसा तो आपला नाही हे अनेकदा सांगणाऱ्या जी. एंना संतसाहित्यावर अशी चिखलफेक करावीशी का वाटली असावी?   

दळवी हे जी. एं. चे अनेक वर्षांचे (पत्र) मित्र. जी. एं. चा आणि त्यांचा पत्रव्यवहार जी. एं. चा अखेरच्या एकदोन वर्षांतच थांबला होता. हा पत्रव्यवहार, विशेषतः त्यातली जी. एं. ची पत्रे वाचली की हे किती घट्ट मित्र होते, असेच एखाद्याला वाटेल. पण जी. एं. च्या मृत्यूनंतर दळवींनी लिहिलेल्या लेखातून (‘परममित्र’) जी. एं. चे एक वेगळेच, धक्कादायक चित्र समोर येते. जी. एं. ना दळवी स्वतःची प्रतिमा तयार करण्यात गढून गेलेला खोटारडा माणूस म्हणतात. जी. एं. च्या ‘बुवाबाजी’ चे काही किस्सेही दळवींनी सांगितले आहेत. जी. ए. धारवाडला असताना दळवींना एकदा त्यांना भेटायला जायचे होते, तर त्यांनी येऊ नये म्हणून जी. एं. नि कशी खोटीनाटी कारणे सांगितली आणि त्यातून दळवी धारवाडला गेलेच, तेव्हा आता यांना टाळणे अशक्य आहे हे ध्यानात आल्यावर बाकी जी. एं. नि त्यांचे हसूनखेळून कसे स्वागत केले हे दळवी त्यांच्या नेहमीच्या औपरोधिक शैलीत लिहितात. साहित्य संमेलने, साहित्यिकांचा मेळावा अशा गोष्टींच्या वाटेलाही न फिरकलेल्या जी. एं. ना पुण्या-मुंबईतील सर्व लेखकांची हालहवाल (आणि त्यांना मिळणारे पैसे, त्यांच्या भानगडी वगैरे) याबाबत खडानखडा माहिती होती असे दळवी लिहितात (आणि तसे ते आपल्याला जी. एं. ची पत्रे वाचून जाणवतेही), तेव्हा मात्र जी. एं. ची आपल्या मनातील प्रतिमा वितळू लागते. लोकांना स्वतः लिहायचे नाही, किंबहुना आपण लिहिले असे दाखवायचे नाही असे ठरवून जी. एं. नि ‘देवदत्त जोशी’ नावाचा एक काल्पनिक ‘सेक्रेटरी’ नेमला होता आणि काही पत्रांवर ते स्वतःच ‘देवदत्त जोशी’ अशी सही करत असत (‘वर्षाकाठी दोन कथा लिहिणार आणि त्यासाठी सेक्रेटरी? ‘ इति दळवी) असेही दळवी सांगतात.

जी. एं. ची आणि दळवींची भांडणेही खूप झाली. त्यांची एकमेकांना लिहिलेली बरीच पत्रेही चावट, क्वचित अश्लील – अनप्रिंटेबल भाषेत आहेत. खते तर या दोन्ही थोर लोकांच्या मृत्यूनंतर असे काही चव्हाट्यावर आणणे योग्य नव्हे, पण दळवींनी स्वतःच लिहिलेला एक किस्सा येथे सांगावासा वाटतो. जी. एं. च्या एका कथेच्या भाषांतराच्या संदर्भात काहीसा गैरसमज झाला आणि जी. एं. नि दळवींना चक्क नोटीस पाठवली. मागोमाग नोटीस मिळाली की नाही ही विचारणा करणारे पत्र. दळवीही खमकेच. त्यांनी त्या नोटिशीचे तुकडे केले आणि जी. एं. ना परत पाठवले. सोबत पत्र की ‘तुमच्या नोटिशीचे तुकडे पाठवत आहे, त्याच्या सुरळ्या करा आणि *** घाला. तुमच्या, आणि उरल्या तर माझ्या. ‘ यावर जी. एं. नि संपूर्ण शरणागती पत्करली आणि दळवींना उत्तर लिहिले, ‘ दळवीसाहेब, एक जरा स्पष्ट सांगा – आपल्या असल्या पत्रात त्या लाडिक लाजऱ्या फुल्यांचा संकोच आहे, तो कशासाठी? एखाद्या पूर्ण नग्न बाईने मोठ्या विनयाने खांद्यावर पदर म्हणून फडक्याचा तुकडा टाकावा त्याप्रमाणे त्या तीन फुल्या वाटल्या. तुम्हाला संकोच वाटला, म्हणजे गोमटेश्वर आपल्या नागडेपणाने संकोचल्यासारखाच आहे! यापुढे, गडे, असा बुरसट संकोच नको बरं! ‘ 

जी. एं. च्या पत्रातील भाषेविषयीही दळवी असेच लिहितात. जी. एं. च्या कथांमधील भाषा अत्यंत बोजड आणि उपमा – उत्प्रेक्षांनी (वाजवीपेक्षा जरा जास्तच) सजलेली असते हा त्यांच्यावरचा सार्वजनिक आरोप आहे. जी. एं. च्या खाजगी पत्रांमधील भाषाही अशीच अघळपघळ आणि खऱ्याखोट्या अलंकारांनी भरलेली असते असे दळवींना वाटते. त्यांच्या कथांमधील आणि पत्रांमधील उष्ण, लाल रक्त, उसवलेली जखम, मांसाचे लचके, ताज्या, लसलशीत जखमेतून दिसणारे हाड, रक्तामासांचा वास या आणि अशा शब्दांचे प्रयोजन काय हा प्रश्न दळवींना पडलेला दिसतो. हा प्रश्न जी. एं. च्या वाचकाला, अगदी जी. एं. ना ज्यांचा तिटकारा होता त्या भक्तांनाही पडणे शक्य आहे. खुद्द दळवींच्या ‘चक्र’ या कादंबरीविषयी लिहिताना त्या कादंबरीचा विषय म्हणजे आयुष्याचा एक भीषण भाग, ठसठसणारी वेदना किंवा वाहती जखम असे नाटकी शब्द जी. ए. वापरतात. का?

सामान्यतः आपण वाचकाला केंद्रस्थानी ठेवून लिहीत नाही, वाचकाला आपली कथा आवडते आहे की नाही याच्याशी आपला सुतराम संबंध नाही, किंबहुना एखादी कथा लिहून झाल्यानंतर ती आपण वाचतही नाही, आपल्याजवळ आपल्या कथासंग्रहाच्या प्रतीही नसतात असे जी. एं. नि पत्रांत लिहिले आहे. सामान्यतः आपण लिहिलेल्या लेखनाविषयी इतके कोरडे, अलिप्त राहणे कुणालाही शक्य नाही; मग अगदी ते जी. ए. का असेनात! आपल्याला आपल्या कथांच्या समीक्षेत काहीही रस नाही असे म्हणणाऱ्या जी. एं. ना त्यांच्या रूपक / दृष्टांत कथा लोकांना आवडल्या नाहीत ही गोष्ट जिव्हारी लागलेली दिसते. तरीही कुणी दुपारची झोप यावी म्हणून डोळ्यासमोर चार ओळी धराव्यात तशी आपली कथा वाचावी हे त्यांना मंजूर नव्हते. बरोबरच आहे. लेखक  इतके कष्ट घेऊन लिहितो, ते निदान नीट वाचण्याचे कष्ट वाचकाने घ्यावेत, नाहीतर वाचूच नये, किमान इतका आत्मसन्मान प्रत्येक लेखकाने बाळगावा. जी. एं. सारख्या श्रेष्ठ लेखकाने तर जरुर बाळगावा. पण असे व्हावे म्हणून आपली पुस्तके सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत हे बघणे, त्यांच्या दुसऱ्या आवृत्त्याही न काढू देणे हे चमत्कारिक आहे. ते जी. ए. च करू जाणोत.

आपण जे लिहितो, ते वाचकाला समजते / आवडते की नाही याबाबत आपण बेफिकीर आहोत म्हणणाऱ्या जी. एं ना आपल्या कथांमधील सूचकता वाचकाच्या डोक्यावरून जाते याचे काहीसे असमाधानही असावे असे वाटते. त्यामुळे कुणीही गणा गणपाने आपली कथा वाचावी आणि त्यावर आपापल्या मताची एक पिंक टाकून पुढे जावे यापेक्षा चारच पण जाणकार लोकांनी ती वाचावी असा त्यांचा प्रयत्न दिसतो. पण जी. एंना आपल्या लेखनात नेमके काय म्हणायचे होते हे तरी किती लोकांना कळाले आहे?  

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

ऍडमिशन

मीटिंगची वेळ सकाळी साडेनऊची होती. बरोबर साडेनऊ वाजले होते. शिरस्त्याप्रमाणे कॉलेजचे काही विश्वस्त, सगळे स्टाफ मेंबर, सपोर्ट स्टाफ आणि मुख्य म्हणजे ऍडमिशनच्या कामाशी संबंधित सगळा स्टाफ प्रिन्सिपॉल मॅडमच्या केबिनमध्ये आला होत. दयारामने मोठे मीटिंग टेबल सुरेख चकचकीत पुसून घेतले होते. प्रत्येक खुर्चीपुढे टेबलवर त्या त्या फॅकल्टीचे छोटेसे फोल्डर ठेवलेले होते. मॅडमच्या खुर्चीसमोर जराशी जाडसर फाईल, थोडेसे पुढे उजव्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे लख्ख घासलेले तांब्याभांडे, उजवीकडे एका छोट्याशा फ्लॉवरपॉटमध्ये कॉलेजच्याच बागेतली गुलाबाची चार टपोरी फुले आणि एका काचेच्या बाऊलमध्ये मॅडमच्या खास आवडीची मोगऱ्याची फुले ठेवली होती. कॉलेजच्या पंचवीस वर्षांच्या शिस्तीत वाढलेल्या दयारामला काही सांगावे लागत नसे. शिस्त, पण अभिमान बाळगावा अशी शिस्त – दयारामला वाटत असे. कर्तव्यपूर्तीचे आणि निष्ठेचे अपूर्व समाधान – फारसे शिक्षण न झालेल्या दयारामला कदाचित या शब्दांत नसते सांगता आले, पण रोज सकाळी कॉलेजचा युनिफॉर्म अंगावर चढवताना त्याची मान अभिमानाने ताठ होत असे. कॉलेजच्या प्रवेशद्वाराशीच लावलेल्या गोरे सरांच्या भव्य तैलचित्राकडे बघताना त्याचे मन काठोकाठ भरून येत असे. आधी सर, आणि आता सरांच्याच मुशीत घडवलेल्या मॅडम… आदराने मान लवावी अशी ही माणसे – आपल्यासारख्या साध्या शिपायाला यांची सेवा करायला मिळाली ही आपली पूर्वजन्मीची पुण्याईच – त्याच्या भाबड्या मनाला वाटत असे.
“बसा ना. ” मॅडम त्यांच्या नेहमीच्या मृदू स्वरात म्हणाल्या. मोगऱ्याचा अस्पष्ट वास केबिनमध्ये पसरत होता. ‘जुलै सुरू झाला तरी मोगऱ्याचा बहार टिकून आहे.. ‘ मॅडमना वाटून गेलं. डाव्या हाताने त्यांनी चष्मा सारखा केला. ” हं, काय शिल्पा, झाली का तयार मेरिट लिस्ट? ”
“हो मॅडम. तुमची सही झाली की आज जाईल नोटीस बोर्डवर” शिल्पा म्हणाली.
“आणि आशिष, त्या आऊट ऑफ स्टेट विद्यार्थ्यांची… ”
दारावर टकटक झाली. मॅडमच्या कपाळावर एक बारीक आठी आली. स्टाफ मीटिंग सुरू असताना कुणी डिस्टर्ब केलेलं त्यांना आवडत नसे. आणि हे बाहेर असलेल्या दयारामलाही चांगलं माहीत होतं. आणि हे तर ऍडमिशनचे दिवस. एकेक तास महत्त्वाचा होता.
दार किलकिलं झालं. दयारामचा चेहरा किंचित अपराधी झाला होता. “मॅडम… ” खालच्या आवाजात तो म्हणाला.
“काय, दयाराम? ”
“काही मंडळी भेटायला आली आहेत, मॅडम.. ”
“दयाराम, मीटिंग सुरू आहे.मी कामात आहे. बसायला सांग त्यांना” मॅडमचा आवाज किंचितही वर गेला नव्हता. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणंच हसरा पण निश्चयी होता.
“मी सांगितलं मॅडम. पण ते ऐकायला तयार नाहीत. बाहेर गोंधळ होतोय मॅडम. साहेबांनी पाठवलंय म्हणतात.. ” अचानक कुणीतरी धक्का दिल्यासारखा दयाराम धडपडून दोन पावले पुढे आला. मागचं दार उघडून बाहेरची मंडळी आत घुसत होती. “जय भीम म्याडम, म्हनलं आर्जंट हाये, तवा भेटूनच जावं… ” वय साधारण पस्तीस, लालसर गोरा सुजकट चेहरा, स्थूल, ओघळलेलं शरीर, झगमगीत लाल रंगाची साडी, कानात तीनचार ईयररिंग्ज, गळ्यात तर दागिन्यांची एक लहानशी शोकेसच, डोळ्यात काजळ आणि या सगळ्या साजशृंगारावर पसरलेला चेहऱ्यावरचा एक विलक्षण माजकट, मग्रूर भाव – अशी ती ठेंगणी बसकट बाई होती. “या, या, म्याडम आपल्याच हायेत… ” तिनं तिच्यामागच्यांना म्हटलं तसे मागचे तीघेही आत शिरले. त्यांच्या अंगावरच्या पांढऱ्याशुभ्र खादीच्या आणि स्टार्च केलेल्या कपड्यांसोबत आणि हातातल्या जाड अंगठ्या आणि गळ्यातल्या लॉकेटांबरोबर काहीतरी जबरस्त अशुभ आणि हिडीस केबीनमध्ये आलं होतं. आणि त्याबरोबरच कसल्यातरी उग्र अत्तराचा आणि गुटख्याचा मिश्र वास.
“खासदारसायबांचा फोन आलावता. ते म्हनले म्याडमना मी सांगितलंय म्हनून सांगा. तुमी वळखत आसालंच मला… ” बाई म्हणाल्या.
“ह्ये काय बोलनं झालं का ताई? तुमानी वळखत न्हाई असं व्हयील का कवा? काय म्याडम? ” पहिला इसम म्हणाला.
“हे बघा, आमची मीटिंग सुरू आहे. ” मॅडम शांतपणे म्हणाल्या. “तुम्ही बाहेर थांबा पंधराएक मिनिटं. मग बोलावते मी तुम्हाला. ”
“थांबलो आस्तो हो म्याडम.” दुसरा इसम म्हणाला “पन ताईंना जायचंय उद्गाटनाला. तवा म्हनलं, की म्हनलं, जाताजाता पाच मिंटात ह्ये कामबी करून टाकावं. आपल्याला काय जास्ती टाइम न्हाई हो लाग्नार. हां ताई, त्ये कागद.. ”
ताईंनी तेवढ्यात आपली सोनेरी रंगाची पर्स उघडून त्यातून आपलं कार्ड काढलं होतं. कार्डावर ताईंचं नाव आणि फोटो – कुठल्याश्या समितीचं नाव -आणि सगळ्यात मोठा जाणवणारा असा दलितकैवारी खासदाराचा दाढीदारी फोटो. सोबत कुणाची तरी मार्कलिस्ट आणि एक ऍप्लीकेशन फॉर्म.
“खासदारसायेब म्हनले, म्यानेजमेंट कोट्यातनं तेवडी ऍडमिशन करून टाकायची बरं का म्याडम. ” ताई म्हणाल्या.
“ए, गनपत, खुर्ची घे रं ताइन्ला” दुसरा इसम म्हणाला. मॅडमनी दयारामला नजरेनंच खुणावलं तशी दयारामनं खुर्ची आणली. ताईंनी खुर्ची ओढून घेतली आणि त्या जवळजवळ मॅडमना खेटूनच बसल्या. “खासदारसायेब म्हनले.. ” बाईंनी मॅडमच्या दंडाला धरून बोलायला सुरुवात केली.
” हे बघा, ” आपला दंड सोडवून घेत मॅडम म्हणाल्या, “ऍडमिशनसाठी असे बरेच फोन येत असतात आम्हाला दर वर्षी. आमच्या ऍडमिशन या मेरिटवर होतात.मेरिट लिस्ट तयार झाली आहे, आज लागेल नोटीस बोर्डवर. ”
“म्याडम, तुमाला कळंना आमी काय म्हंतो त्ये. ह्यो काय जनरल कँडिडेट न्हाई आपला. एस. शी. कोट्यातला हाये.”
“हो, मान्य आहे मला, पण रिझर्व कॅटेगरीच्या ऍडमिशन्सही मेरिटवरच होतात. संस्थेचे तसे स्पष्ट नियम आहेत. त्यात मला काहीच करता येणार नाही. ”
“तुमी थांबा जरा अंकुशराव, ” ताई म्हणाल्या, “म्याडम, यवडं ह्ये काम करून टाकायचं आपलं. एकच ऍडमिशन हाये आपली. ती पन रिझर्वेशनमदली. अंकुशराव, तुमी बसून घ्या. बसा ना तितल्या सोफ्यावर. म्याडम करनार आपलं काम, मी सांगते ना तुमाला. ”
अंकुशराव आणि त्यांच्याबरोबरचे दोघे शेजारच्या सोफ्यावर बसले. अंकुशरावांनी आपला एक पाय दुसऱ्या पायावर टाकला आणि ते पायातला पांढराशुभ्र बूट हलवायला लागले. आपल्या हाताची त्यांनी आपल्या डोक्यामागे चौकट केली.
“तर म्याडम, खासदारसायेब काय म्हनले, की म्यानेजमेंट कोट्यातनं आप्ला एक दलित क्यांडिडेट घेतील म्हनले म्याडम. ”
“हो का? ” मॅडम म्हणाल्या. “त्यांना माहिती नसेल कदाचित, पण आमच्या संस्थेत असा मॅनेजमेंट कोटा वगैरे नसतो. आणि हे बघा, मीही संस्थेची नोकर आहे. मलाही संस्थेच्या नियमाबाहेर जाऊन काही करता येणार नाही. ”
“म्हंजे आपलं काम नाय व्हनार म्हना की म्याडम.. ” अंकुशरावांबरोबर आलेला इसम आता परत उभा राहिला होता.
“नाही. मेरिट लिस्टमध्ये तुमच्या कँडिडेटचा समावेश नसेल तर नाही. ”
“आन म्याडम, तुमच्या ह्या लिष्टमदली नावं झाली काई क्यान्सल तर? तर भरनारच की न्हाई तुमी भायेरची पोरं?”
“हो, पण त्यालाही एक प्रोसिजर असते. अशा ऍडमिशन्स कॅन्सल होणार हे आम्ही गृहीत धरतोच. त्यामुळे आमच्या चार-पाच मेरिट लिस्ट लागतात. ” मॅडम त्या इसमाकडे पाहत म्हणाल्या.
“म्याडम, म्हनजे इतं वकिली शिकाया तुमी भटा-बामनाचीच पोरं भरनार म्हना की. येका राष्ट्रीय पार्टीच्या आध्यक्षाचापन मान न्हाई ठेवायचा तुमाला. एका दलीत पोराला तुम्ही बाजूला काडताय म्याडम… ”
“जातीचा इथं काही संबंध नाही ताई. आणि जातीचा आमच्या कॉलेजमध्ये कधीच काही संबंध नसतो. म्हणून तर आमच्या कॉलेजचं सगळ्या देशात नाव आहे… ”
“ठीक आहे, म्याडम, आता आमाला काय करायचं ते आमी बगून घिऊ. ”
“तुमची मर्जी. तुम्ही जाऊ शकता ताई. ”

ताई आणि त्यांच्याबरोबर आलेले तीघे तिरिमिरीने बाहेर पडले. आशिष आणि शिल्पा आतूनबाहेरून हादरून गेले होते. कॉलेजचे  एक जुने विश्वस्त आणि कॉलेजचे माजी प्राचार्य मंदपणे हसले. किंचित कौतुकानं. फर्स्ट ईयरच्या डिबेट कंपिटिशनपासून फायनल इयरच्या मूट कोर्टापर्यंत प्रत्येक कसोटीत, वादात कणखरपणाने उभी राहिलेली ही त्यांची विद्यार्थिनी… आसपासचे सगळे आदर्श कोसळत असताना ताठ कण्यानं उभी राहिलेली ही ..  ही मॅडम.
“बसा, बसा… ” अभावितपणे उठून उभ्या राहिलेल्या आशिष आणि शिल्पाला मॅडम मोकळेपणाने म्हणाल्या. समोरच्या तांब्यातलं पेलाभर पाणी त्यांनी ओतून घेतलं. मोगऱ्याचं एक फूल उचलून त्याचा एक दीर्घ, खोल श्वास घेतला आणि एखादी घट्ट गाठ मारल्यासारख्या आवाजात त्यांनी विचारलं, “हां, तर ते त्या आऊट ऑफ स्टेट विद्यार्थ्यांचं काय म्हणत होतास तू आशिष? ”

(सत्य घटनेवर आधारित)

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

सुरस आणि चमत्कारिक

ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणाऱ्या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की काय असेच वाटत होते.
निशापती महाराजांनी आपल्या हातातील द्राक्षफलांच्या गुच्छातील अखेरचे पुष्ट रसाळ फळ आपल्या ओष्ठांनीच अलग केले. त्यांच्या दंतपंक्तींची आणि कंठमण्याची सूक्ष्म हालचाल झाली. हातातले शुष्क फलदेष्ठ त्यांनी शेजारच्या रिक्त फलपात्रात टाकले आणि आपल्या मृदू करकमलांनी एक तालिकाध्वनी केला.
महालाच्या द्वाराबाहेर अष्टप्रहराच्या कर्तव्यपूर्तीनंतर क्लांत होऊन किंचित्काल आसनस्थ झालेला भ्रातृभजन तडिताघात व्हावा तसा जागृत झाला. महालातला ध्वनी ऐकताच त्याचे मंडूकाप्रमाणे दिसणारे नेत्र तात्काळ प्रज्वलित झाले. स्वतःलाही जाणवणार नाही असा पदरव करीत तो महालात प्रविष्ठ झाला आणि आपले किंचित ताठरलेले पृष्ठ लीन करीत त्याने महाराजांना प्रणाम केला.
“भ्रातृभजना.. ”
“आज्ञा महाराज”
“सेनापती पीतप्रतापांचे नगरात आगमन झाले आहे काय? ”
“होय महाराज. पश्चिमेकडील स्वारी संपन्न करून सेनापती आज प्रातःकालीच नगरात परतले आहेत. ”
“मग ते अद्याप आमच्या दर्शनार्थ कसे उपस्थित झाले नाहीत? ”
“महाराज, क्षुद्र मुखी विराट ग्रास घेतो आहे, क्षमा असावी. पण सेनापती पीतप्रतापांचे स्वास्थ्य गतकालातील अखंड कार्यबाहुल्यामुळे किंचित ढळले आहे. गुरुदेव राजवैद्य दल्यप्रवाद यांनी त्यांना काही घटका विश्राम करण्याचे बळ केले आहे. ”
” गुरुदेव वैद्यराज? हे काय गूढ आहे भ्रातृभजना? ”
“महाराज, वैद्यराज आपल्या गुरुकुलाचेही प्रमुख नाहीत का? तेंव्हा आपल्याला गुरुदेव आणि वैद्यराज या दोन्ही उपाध्यांनी संबोधावे असा त्यांचा आग्रह असतो, महाराज. ”
“या कसल्या बाललीला आहेत भ्रातृभजना? पण असो. ते आमचे निष्ठावंत सहकारी आहेत, त्यामुळे असले प्रमाद आम्ही दुर्लक्षित करावे हेच रास्त.  भ्रातृभजना, आमच्या अष्टप्रधान मंडळातील अन्य सदस्यांचे स्वास्थ्य कसे आहे? ”
“ईश्वराची कृपा आहे, महाराज. काही दिनांपूर्वी नगरात निर्माण झालेल्या वातचक्रामुळे आपल्या उच्च्तम नगरश्रेष्ठांचे स्वास्थ्य म्लान होते की काय असा किंतु मनी उद्भवला होता. पण आता हे कृष्णनभ दूर झाले आहेत महाराज. ”
“भ्रातृभजना, हे सगळे आमच्याच कुशल नेतृत्वामुळे साध्य झाले, हे तुझ्या स्मरणात आहे ना? ”
“याचे मला कसे विस्मरण होईल महाराज? आपण स्वतःच मला ते निदान अष्टशत वेळा कथन केले आहे महाराज. ”
“आमच्यासारखे सम्राट असल्यामुळेच या नगराची प्रतिष्ठा नित्यदिनी गगन चुंबू पाहत आहे, हे तू जाणतोस ना भ्रातृभजना? ”
“होय महाराज. ”
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ”
“नाही महाराज. ”
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणाऱ्या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज. ”
“संतोष. परम संतोष. ”
निशापती महाराजांचे नयन आकुंचित होऊ लागले. अधोउर्द्व अवस्थेतले त्यांचे शरीर हळूहळू धरणीसमांतर होऊ लागले. तृणधान्यांचे पिष्टीकरण करणाऱ्या संयंत्राच्या ध्वनीप्रमाणे भासणारा एक ध्वनी महालात अखंड गुंजारव करू लागला. गुलाबपुष्पांच्या शय्येवरून मार्गक्रमणा करावी तसा भ्रातृभजन महालाच्या बाहेर पडला. राजदालनाचे भव्य द्वार त्यांने कोमलपणाने ओढून घेतले.

उत्तररात्र झाली होती. महाद्वारावर अखंडितपणाने चेतणाऱ्या प्रकाशचुडी वगळता इतरत्र मृगनयनींच्या सौंदर्यसाधनेतील नेत्रशोभकाप्रमाणे दिसणाऱ्या तमाचे साम्राज्य होते. राजनर्तकीच्या पदन्यासाबरोबर तिच्या उत्तरीयातील हिरण्यशलाका चमकाव्यात त्याप्रमाणे काळोखातील वृक्षलतांवरील प्रकाशकीटक झगमगत होते. राजमहालाच्या आसपास नीरव शांतता होती. लांबवरून येणारे नगरापलीकडील अरण्यातील निशाचरांचे अस्पष्ट साद ध्वनीहीनतेच्या सरोवरात शाळीग्राम पडावा तसे तरंग निर्मित होते. वृक्षांवरील दिवाभीतांचा रव शांततेला सुरकुत्या पाडत होता.
निशापती महाराजांच्या दालनाचे द्वार हळूच किलकिले झाले. महालातील ताम्रवर्णी प्रकाशाचे द्वाराबाहेर डोकावणारे वस्त्र गोमयाने शिंपलेल्या जमीनीवर तांबूलभक्षकाचा मुखरस सांडावा तसे दिसू लागले. ते प्रकाशवस्त्र चुरगाळत महालातून सहा आकृती बाहेर पडल्या. हे दृष्य पहायला राजमहालात कुणी जागृत नव्हते, हे भाग्यच. अन्यथा पाहणाऱ्याच्या दंतपंक्ती भयातिरेकाने अविलग झाल्या असत्या.
महालातून बाहेर पडलेल्या त्या सहा आकृती हुबेहूब निशापती महाराजांच्या प्रतिमा होत्या. देहयष्टी, मुखचंद्रमा, पदलालित्य… तसूभरही भिन्नत्व नव्हते. सूक्ष्मपणे पाहणाऱ्याला फक्त एक अंतर जाणवले असते, ते म्हणजे त्यांच्या तनुवरील पेहराव्याचा रंग.
प्रत्येक आकृतीच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे होती.
एकाद्या अदृष्य तंतूने बांधल्याप्रमाणे समांतर हालचाली करत त्या प्रतिमा अश्वशाळेच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागल्या. अमावस्येच्या रात्री कौशल्याने धनचौर्य करणाऱ्या शर्विलकाच्या कसबाने त्यांनी अश्वशाळेतले सहा अश्व रज्जूमुक्त केले. क्षणार्धात सहा अश्वस्वार वातवेगाने राजमहालाच्या प्रवेशद्वाराबाहेर पडले.
महत्प्रयासाने जागृतावस्था प्राप्त झालेल्या भ्रातृभजनाचे नेत्र कोशिकांतून बाहेर पडणार की काय असे वाटण्याइतपत विस्फारले. शेजारीच पडलेल्या मद्यार्काच्या रिकाम्या कुपीकडे त्याने किंचित तिरस्काराने कटाक्ष टाकला. पाहिले ते सत्य की स्वप्न या द्वंद्वात अडकून राहण्याचे त्याला आता प्रयोजन राहिले नव्हते. राजप्रासादाच्या बाहेरून विद्युतवेगाने नाहीशा होणाऱ्या एका अश्वाचा उन्मादध्वनी त्याच्या कानी आला. भ्रातृभजनाचे किंचित स्थूल शरीर अनावर कंपू लागले. वृक्षलतांवरील प्रकाशकीटक त्याच्या मिटत्या नयनांसमोर नर्तन करू लागले. आपणास मूर्छा येते आहे याची जाणीव होण्यापूर्वीच त्याच्या कुडीने धरणीसख्य पत्करले होते.      

नीलभृंगराज, मंडुपकर्णी, चंदनादी उटींच्या औषधी गंधाने भ्रातृभजनाला भान आले. राजप्रासादाच्या उत्तरेस असलेल्या सेवकांसाठीच्या एका विशेष कक्षात गुरुदेव वैद्यराज त्याची नाडीपरीक्षा करत होते. भ्रातृभजनाची भार्या व त्याचे दोन पुत्र त्याच्या शय्येनजिकच उभे होते. त्याच्या पत्नीचे मुख अखंडित अश्रूपतनाने म्लान झाले होते. राजमहालात सेवा करणारे इतर काही दासही सचिंत मुद्रेने उभे होते. नेत्रांचा कोन फिरताच त्याला निशापती महाराजांचे सस्मित मुखकमल दिसले.महाराजांच्या वामांगास सुभाषिणीदेवी उभ्या होत्या. महाराजांना प्रणाम करण्यासाठी त्याने क्षीणसर यत्न केला.
“शय्यास्थितीत रहा  भ्रातृभजना,” महाराज म्हणाले. “अद्याप तुझ्या शरीरास बलप्राप्ती झालेली नाही. गुरुदेव वैद्यराज, कसे आहे रुग्णाचे स्वास्थ्य? ”
“भय नसावे, महाराज. अतीव शारीरीक कष्ट आणि विश्रामाचा अभाव यामुळे आलेली ही ग्लानी आहे. शिवाय काही मानसिक क्लेश झाल्याचेही लक्षण आहे. आम्ही मात्रेचे चाटण दिले आहेच. पूर्ण विश्राम आणि सात्त्विक आहार यांनी संध्यासमयीपर्यंत तू कार्यतत्पर होशील, भ्रातृभजना.. ”
“संतोष, परम संतोष” महाराज म्हणाले. 
“महाराज, काल… काल रात्री.. ” भ्रातृभजन अतीव कष्टाने उद्गारला.
“शांत रहा, भ्रातृभजना” महाराज संयत स्वरात म्हणाले. त्यांच्या हाताची तर्जनी त्यांच्या ओष्टांवर विलासिली होती. अन्यजनांना सन्मुख होत त्यांनी एकच उच्चार केला, “एकांत.”
कक्षात आता फक्त महाराज, सुभाषिणीदेवी आणि भ्रातृभजन उपस्थित होते. सुभाषिणीदेवींच्या उपस्थितीचे भ्रातृभजनाला यत्किंचितही नवल वाटले नाही. सुभाषिणीदेवी महाराजांच्या कूटनीतीतज्ञ तर होत्याच, पण काही सप्ताहांपासून त्यांनी महाराजांना फलज्योतिषाचे प्रशिक्षण देणेही आरंभले होते. एखाद्या घटनाविशेषानंतर भविष्यात काय होणार हे त्या महाराजांना लिखित स्वरुपात सांगत असत.
“महाराज, काल… काल रात्री मी.. ” 
“आम्हास सर्व ज्ञात आहे, भ्रातृभजना” निशापती महाराज म्हणाले. “काल रात्री आमच्या महालातून तू आमच्या प्रतिकृती बाहेर पडताना पाहिल्यास…”
“यथार्थ, महाराज, पण त्या कोण….? ”
“भ्रातृभजना,” महाराजांना कंठोद्रकाचे किंचित कष्ट झाले. “त्या आम्ही निर्मिलेल्या प्रतिमा आहेत. ते आमचेच मायाजाल आहे. ”
“पण महाराज, हे तोतये.. ”
“ऐयार म्हण भ्रातृभजना, ऐयार.”
“पण, क्षमा असावी महाराज,  याचे प्रयोजन? याचे कारण?”
“कारण? ” महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. “कारण राजकारण! आमच्या या प्रतिमा विविध नावांनी जनसामान्यांत एकरुप होतील. कुणी शशीकुमार, कुणी रजनीनाथ, कुणी चंद्रभान… पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसऱ्याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना  संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसऱ्या नावाने वावरणारे आम्हीच! ”
“पण महाराज…. ” भ्रातृभजनाची जिव्हा शुष्क झाली होती. “हे.. हे कपट? कशासाठी?”
“एका सेवकाच्या आकलनापलीकडच्या कथा आहेत या भ्रातृभजना. हीच ती एका सम्राटाची  महत्वाकांक्षा. आज आम्ही सहस्त्र ग्रामांचे सम्राट आहोत. उद्या दशसहस्त्रांचे होऊ. आज सहत्रांचे स्वामी आहोत, उद्या लक्षांचे, खर्वांचे, निखर्वांचे होऊ. कधीतरी… कधीतरी सर्वश्रेष्ठ होऊ. कधीतरी आमचे मनोरथ सफल होतील. कधीतरी आमचा प्रतिशोध संपन्न होईल. ”
“मी.. महाराज… मला”
“तुला चिंतित होण्याचे कारण नाही  भ्रातृभजना. आमच्या मायाजालाने आम्ही तुझे स्मरण नष्ट करून टाकणार आहोत. उद्या प्रातःकाली तुला आमच्या वक्तव्यातले काहीही स्मरणार नाही. तू आमच्या सेवेत रहाशील भ्रातृभजना.  संतोष, परम संतोष. देवी.. ”
धीरगंभीर पावले टाकीत निशापती  महाराज कक्षाच्या बाहेर पडले. सुभाषिणीदेवी त्यांच्या हातातला एक शुभ्र काचलोलक भ्रातृभजनासमोर लंबवर्तुळाकार दिशेने फिरवू लागल्या.
“देवी.. ” भ्रातृभजनाच्या मुखातून क्षीण उद्गार उमटले.
“शांत राहा भ्रातृभजना. सेवकाच्या लोचनांनी मर्यादेत राहावे असे शास्त्रवचन आहे. त्या मर्यादा तू ओलांडल्यास. आज महाराजांच्या दयादृष्टीचा विशेष आहे. अन्यथा तुला अभय लाभले नसते. ” सुभाषिणीदेवी म्हणाल्या
“पण देवी, हा. हा प्रतिमाभंग.. ”
“सत्तेपुढे विद्वत्ता काय कामाची भ्रातृभजना?” सुभाषिणीदेवींच्या स्वरात किंचित अपराधी कंप होता. “महाराजांच्या सहा प्रतिमा – सहा नावे, पण व्यक्ती एकच. एकमेकांवर पुष्पवृष्टी करतील, एकमेकांचे सन्मान करतील, आणि यातले गूज जाणणारे आपले स्मरण हरपून बसतील. तू भाग्यवान आहेस भ्रातृभजना. उद्या तुझा तरी विवेक निष्कलंक असेल. पण माझे काय भ्रातृभजना? माझे स्मरण पुसणारा लोलक मी कुठून आणू? ”
भ्रातृभजनाची शुद्ध हरपत होती.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

परतफेड -२

तू एक प्रतिष्ठित, यशस्वी व्यावसायिक. छोटासा सुखी संसार. एका बेसावध क्षणी तुझे पाऊल घसरते. त्या मोहाच्या क्षणातून जन्माला आलेला तुझा मुलगा. परिस्थितीच्या पिरगाळ्यातून तुला त्याला घरी आणावे लागते. तुझा संसार या वादळाने उध्वस्त व्हायला आलेला आहे. एका रात्री हा छोटा मुलगा घरातून गायब होतो. त्याला शोधायला रस्त्यावर तुझी तगमग होते आहे. मुलगा कुठेच दिसत नाही. तुझा मित्र तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. संवेदनाहीन मद्दड पोलीस इन्स्पेक्टर. तुझी -एका बापाची- अस्वस्थ घालमेल, मुलाचे वर्णन तू सांगतोस…
“बापका नाम? ” इन्स्पेक्टर.
“बापका नाम लेकर क्या करेंगे आप? बच्चा मिलनेपर उसे बापका नाम पूछेंगे? ” तुझा संताप अनावर
“बापका नाम? ”  पोलीस इन्स्पेक्टर थंड.
“डी. के. मल्होत्रा” तू खालच्या आवाजात म्हणतोस.
“जरा जोरसे बोलिये.. ”
“डी. के. मल्होत्रा… सुनाई नही देता क्या आपको? डी. के. मल्होत्रा! ”  तू संतापाने फुटून टेबलवर मूठ आपटतोस. एका अगतिक, हताश बापाची कैफियत…

काळाच्या पुढे असलेला तू एक मनस्वी प्रतिभावंत शायर.  शब्दांनी रोज तुझी पूजा करावी अशी तुझी प्रतिभा. पण तू तितकाच अहंमन्य, गर्विष्ठ आणि फटकळ. कुणाशी जमवून घेणे तुला कधी जमलेच नाही. पण तुला याची फिकीरही नाही. ‘शायर तो वो अच्छा है, पर बदनाम बहोत है’ असं तू स्वतःविषयीच म्हणतोस. धर्म, कर्मकांडे, देव यांनाही तू लाथाडून दिले आहेस. व्यवहारही तुला कधी जमला नाही. आता कर्जात गळ्यापर्यंत बुडूनही तुझी ऐयाशी सुरुच आहे. आज रात्री दारुला पैसे आहेत. उद्याचं काय? तुझ्या शायरीचा कदरदान सावकार मित्र दरबारीमल. त्याच्याकडे तू परत पैसे उसने मागायला जातोस.
“हम्म. ” दरबारीमल तुझ्यापुढे पान ठेवतो. “पान तो आप खाते नहीं. सुना है जहर लगता है आपको… ” दरबारीमल हसतो.
“जहर होता तो खा लेता… ” तुझ्याही चेहऱ्यावर मिस्किल हसू. “पान है, इसलिये नही खाता.. ”  दरबारीमलकडून घेतलेले पैसे घेऊन ताबडतोब तू जुगाराच्या अड्ड्यावर येतोस. बाहेर एक फकीर तुझीच गजल गात हिंडतोय ‘कोई दिन गर जिंदगानी और है.. ‘ तू हाताला येतील तेवढे पैसे त्याच्या कटोऱ्यात टाकतोस. अरे, इथे कुणाला फिकीर आहे? जिंदगी असली काय आणि नसली काय! ‘हो चुकी गालिब बलायें सब तमाम, एक मर्गे नागहानी और है’ जणू तुझी डेथ विशच… 

तू एक अपयशी, विस्मरणात गेलेला गोलंदाज. तुझी गुणवत्ता घाणेरड्या राजकारणाने कुजवून टाकलेली. आता तू चोवीस तास स्वतःला दारुत बुडवून घेतले आहेस. गावातला एक मुका-बहिरा पण जबरदस्त क्षमता असलेला मुलगा तुला सक्तीने स्वतःचा गुरू करून घेतो. तू थोडासा भानावर येतो आहेस.  तुझ्या डोळ्यांत आता थोडा प्रकाश आहे. तुला जे जमले नाही, ते याला जमेल कदाचित… तुझ्या शिष्याला… पण इथेही तेच घाणेरडे राजकारण येते. तुला ज्यांनी संपवले तेच गुरुजी इथेही सौदा करायला येतात.
“कोई डील नही गुरुजी” तू कणखरपणाने सांगतोस.
“अस्सं. म्हणजे अजून तुझा पीळ गेला नाही तर. ” गुरुजींच्या चेहऱ्यावर तेच मुत्सद्दी हास्य. “ठीक है. तो फिर मैं उसका भला चाहूंगा” जीभ चाटणाऱ्या एका शिकाऱ्याचे वाक्य.
तुझ्या आतून काहीतरी उफाळून येतं. हेच, हेच ते सगळे हरामखोर. सगळे कोंभ चिरडून टाकणारी हीच ती या साल्यांची सिस्टीम…
“बहुत दिनोंसे एक बात कहना चाहता था मैं आपसे, गुरुजी. ” तू संथपणे बोलू लागतोस. “आपसे, अपने बापसे, और उन सबसे, जिन्होंने मेरा भला चाहा है… ” तुझा उद्रेक होतो. “गो टू हेल! ”

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेला तू एक विख्यात गजल गायक. गजलांच्या कार्यक्रमाच्या बहाण्याने भारतात हेरगिरी करण्यासाठी तुला पाकिस्तान सरकारने पाठवले आहे. एकीकडे तुला भारतातल्या आपल्या ऐश्वर्यसंपन्न भूतकाळाविषयी  हुरहूर आहे. दुसरीकडे भारतातून हाकलून दिल्याबद्दल चीड. आज पाकिस्तान तुझा देश आहे. पण बोलताबोलता कुणीतरी तुझा उल्लेख मुहाजिर म्हणून करतो. आपण अजूनही मुहाजिर? परके? निर्वासित? तुझ्या डोळ्यांत, स्वरांत एक विलक्षण वेदना दाटून येते. मुहाजिर?

तू एक अंध पण स्वाभिमानी तरुण. तुझे अर्थपूर्ण पण कोरडे आयुष्य. तुझ्या संस्थेत काम करणाऱ्या अशाच एका अभागी, पोळलेल्या तरुणीबरोबर तुझे सूर जमतात. तुमचे लग्नाचे ठरते आहे. कधीतरी तिच्या बोलण्यात ‘ड्यूटी’ हा शब्द येतो आणि तू अचानक चमकतोस. ड्यूटी? म्हणजे हिला आपल्याविषयी वाटणारी भावना ही फक्त… कणव? सहानुभूती? आपण आंधळे, अपंग म्हणून.. फक्त करुणा? ड्यूटी?
‘ड्यूटी’ हा शब्द तू स्वतःशी फिरवून फिरवून पाहतोस. तुझा दुखावलेला अभिमान तुझ्या भावनाहीन डोळ्यांतून ओघळत असतो…आपण ज्याला प्रेम वगैरे समजत होतो ती अशी फक्त दया?… फक्त ड्यूटी?  

तू भास्कर कुलकर्णी. सरकारी वकील. तुझा अशील एक आदिवासी. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून तुझा झगडा सुरू आहे. साऱ्या यंत्रणेशी, सगळ्या सिस्टिमशी. पण तुझा अशील काहीच बोलत नाही. तू त्याला बोलता करण्याचे सतत प्रयत्न करतोस. पण तो तोंडातून चकार शब्द काढत नाही. फक्त आपल्या गोठलेल्या थंड नजरेने बघत राहतो. तुला काही कळत नाही. तू अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत म्हणतोस, “कुछ तो बोलो, कुछ तो… ”

तू इन्स्पेक्टर लोबो. एक प्रामाणिक पोलिस अधिकारी. भ्रष्टाचाराला नकार दिल्यानं तुला इतरांनी सापळ्यात अडकवलं आहे. आता तू पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेला. एका गुत्त्यातच तुला अनंत वेलणकर भेटतो. तुझ्या दारुचे पैसे तो भागवतो. नशेने धुंद झालेल्या नजरेने तू स्वतःशी ओळख करून देतोस, “इन्स्पेक्टर लोबो. अंडर सस्पेन्शन ऍट प्रेझेंट, फॉर बिईंग अंडर दी इंफ्लुअन्स ऑफ अल्कोहोल, व्हाईल ऑन ड्यूटी… ”

तू विनोद चोप्रा. एक व्यावसायिक फोटोग्राफर. बिल्डर तर्नेजा आणि आहुजा यांच्या कारवाया आणि कमीशनर डिमेलो याचा खून या लफड्यात अपघाताने सापडलेला. घोळ वाढत जातो आणि शेवटी कमिशनरचे प्रेत द्रौपदी आणि अनारकली म्हणून स्टेजवर येण्यापर्यंत असंख्य भानगडी होतात. या सगळ्यात दैनिक ‘खबरदार’ ची एडीटर शोभा आपल्याबरोबर आहे असा तुझा समज आहे. पण तीही शेवटी त्यांच्यातलीच निघते. सगळेच किडके, पोखरलेले लोक… यात शेवटी तू आणि तुझा पार्टनर बळीचे बकरे होतात…

सुधा. तुझी कोणे एके काळची पत्नी. एक तडजोड म्हणून केलेले हे लग्न केंव्हाच अर्थहीन झाले आहे. सुधा तुला सोडून जाते. मायावर तुझे खरे प्रेम. पण तीही दूरवर निघून गेलेली. अचानक एका पावसाळी रात्री तुला एका स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये सुधा भेटते. इतक्या दिवसांनी, अशी… तुम्हाला दोघांना जुने दिवस आठवतात. काही क्षण तसेच, वास्तवाकडे पाठ फिरवून जातात. पण अपरिहार्य अशी पहाट येते. सुधाचा नवरा तिला न्यायला येतो. तिने दरम्यान दुसरे लग्न केले आहे. हे सत्य तुझ्यावर कुणीतरी थोबाडीत मारावी तसे येऊन आदळते. तू पूर्ण उध्वस्त. सुधा तुझा दुसऱ्यांदा निरोप घेते. उजाडणाऱ्या पावसाळी पहाटे फलाटावर तू खांदे पाडून उभा आहेस. दिशाहीन…

असे हे आठवणींचे आणखी काही तुकडे. आमच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण पेरल्याबद्दल तुझी परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न.

Bollywood में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां