Archive for February, 2007

भात आणि बिर्याणी

February 26, 2007

भात या खाद्यप्रकाराचे का कुणास ठाऊक, ऐदीपणाशी एक नाते जोडले आहे. ‘गरमगरम तूपभात खाऊन…’ च्या समोर ‘झोपणे’ हेच क्रियापद आपसूकपणे येते! ‘चांगला रबरबीत कालवलेला दहीभात खाऊन तो रणरणत्या उन्हात सायकल हाणीत कामावर गेला’ हे वाक्य काही केल्या मनाला पटत नाही.भातासारख्या अद्वितीय खाद्यप्रकारावर हा जरासा अन्यायच आहे असे म्हणवे लागेल. भाताचा आजारपणाशीही असाच एक अनाकलनीय  संबंध जोडला गेला आहे. ‘जराशी कणकण वाटत होती, म्हणून वरणभात खाऊन गुरगुटून झोपलो…’ असे सांगणाऱ्याला ‘मित्रा, अरे कणकण यायची वाट कशाला बघतोस?  बरं वाटत असतानाही कधीकधी वरणभात खाऊन गुरगुटून झोपत जा…’ असं सांगावसं वाटतं! ‘मला भात आवडत नाही’ असे सांगणाऱ्यांकडे मी केवळ दयार्द्र करुणाकटाक्ष टाकतो!

  भात! नुसता उकडलेला तांदूळ, पण स्थळकाळ पाहून कसे फुलावे , ते माणसाने त्याच्याकडून शिकावे! सभ्य, समारंभी जेवणात तो पांढराशुभ्र कुडता घालून, वरणाचा पिवळाधमक फेटा नेसून कपाळाला उभे गंध लावून येतो. नारळीपौर्णिमेला तो ताज्या नारळाच्या किसाच्या जोडीने बहिणीच्या आग्रहाच्या ताटातून येतो.नारळीभात खाणे गावंढळपणाचे वाटते म्हणून लोक हल्ली साखरभात खातात. साखरभाताचे पेशवाई महत्त्व सोडले तर तो त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि त्यातल्या लवंग- काजूंमुळेच अधिक ध्यानात रहातो. पण नारळीभाताला कसे ‘कॅरॅक्टर’ आहे! बाकी एक खरे, एखाद्या कसलेल्या गवयाचे गायन जसे साथीला तितकेच तयार तबलजी असताना अधिक खुलते तशी या नारळीभाताची  खरी लज्जत त्यावर सढळ हाताने सोडलेल्या साजूक तुपाच्या चमचमच्यांबरोबर खुलत जाते! ‘कोलेस्टेरॉल’ हा शब्ददेखील विसरायची तयारी असेल तरच या वाटेने जावे. दाक्षिणात्य सांबारभाताचे गोळे रिचवणाऱ्या मद्रदेशीयाचे चित्र काही फारसे लक्षात ठेवावे असे नसते, पण काजूची फोडणी घेऊन  सकाळीसकाळीच  भेटायला येणाऱ्या पोंगलने जिभेचे जीवन धन्य होते.सुब्बालक्ष्मीचे वेंकटेशस्तोत्र लागले की हाच भात बिचारा डाळींच्या आणि कढीलिंबाच्या गराड्यात ’बिशीबेळी भाता’ होऊन सतरंज्या उचलायला लागतो. त्यापेक्षा काळा मसाला घालून केलेला कोल्हापूर सांगलीकडचा ‘काळा भात’ कधीही सरस. त्यातच तोंडली, छोटी छोटी वांगी किंवा दोडक्याचे छोटे काप घालून केलेले प्रकारही अप्रतिम.

‘दही भात’ हा लहानपणी जसा खाल्ला तसा परत कधीच खायला मिळाला नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असायचे, आते-मामे भावंडं रहायला आलेली असायची. ‘कारट्यानो, उन्हात वर वर हिंडू नका. कुठं नाही बाहेर जायचं आता…’ असा दम देऊन पोरांना दडपून झोपवलं जायचं . चार वाजता वडीलांनी माडीच्या पत्र्यावर टाकलेल्या चुळीचा  आवाज यायचा. सताड जागीच असलेली मुलं उठून बसायची. दुपारचा चहा ही फक्त मोठ्या माणसांची चैन असायची. मुलांसाठी सकाळचा उरलेला भात कालवला जायचा. खापरीसारखी साय धरलेलं म्हशीचं दूध, कवडीदार दही आणि अगदी होय की नाही इतके मीठ असं सगळं घालून आई किंवा आत्या भात कालवायच्या. ताटल्या भरल्या जायच्या. भरड भरड कुटलेल्या शेंगदाण्याच्या चटणीची – आम्ही त्याला ‘शेंगदाण्याचं तिखट’ म्हणत असू- त्या पांढऱ्याशुभ्र भातावर पेरणी व्हायची. बघता बघता ताटल्या रिकाम्या व्हायच्या. ताटलीत शेवटचे बोट फिरवून ते जिभेने चाटले, की हात धुवून चला क्रिकेट खेळायला! दही भात हा असा कुळाचार पाळून करावयाचा प्रकार आहे. स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने काचेच्या ‘बाऊल’ मध्ये दहीभात कालवणारे काय, आमटीतल्या शेवग्याच्या शेंगा सुरी आणि काटेचमच्याने देखील  खातील! लहानपणी खाल्लेला हा दही भात आजही माझ्या स्वप्नात येतो.

भाताची ‘पुणेरी मसालेभात’ नावाची एक झक्क फसवाफसवी आहे. ‘कोबी भात’. ‘पनीर भात. ‘मोती पुलाव’ हे एखाद्या संमेलनाच्या मेनूत शोभून दिसणारे प्रकार, पण त्यांना काही खानदान नाही. भातात अस्सल राजघराणे बिर्याणीचे. चारमिनारची किंवा हजरतगंजची वाट असावी, हवेत बेगम अख्तरच्या गजलेचे स्वर असावेत, कुठेतरी हुक्क्याचा सुगंध दरवळत असावा, शायरीच्या किताबाची काही पाने फडफडावीत, एखादा जाम किणकिणावा आणि मेंदीने रंगलेल्या दाढीवाल्या उस्तादांनी आपल्या बुजुर्ग हातानी बिरयानी पेश करावी! शाकाहार, आरोग्य, हिंदू संस्कृती आणि मुगल साम्राज्य अशा शेंड्या धारण करणारे उग्र आठ्याळ पंचेधारी आचार्य पंचक्रोशीतही नसावेत. ‘गोश्त’ म्हणायला जुबान चाचरावी अशा त्या चावलबरोबर हमसफर झालेल्या अन्नब्रम्हाने घासाघासाला जन्नतची याद द्यावी. तुपात तळलेल्या कांद्याने केलेली कुरकूरही कानाला तंबोऱ्याच्या सुराइतकी गोड लागावी. एखाद्या राजपुत्रासारख्या भेटीस आलेल्या खानदानी आख्ख्या काजूने अदब वाढवावी. मधूनच झणझणणाऱ्या मसाल्याने तोंड, नाक, कान व डोळे यांचे अद्वैत सिद्ध करावे. ‘कबाब गर्म हैं जनाब, शौक फरमायेंगे?’ अशी विचारणा व्हावी . कुठे शौकीनांनी दिलेल्या ‘वक्कटे तीस्कोंडी’ च्या फरमायशीने वातावरणातली जान वाढवावी. ‘आता पुरे’ असा शरीराने आणि मनाने खुषीचा इषारा द्यावा. नरम जिभेच्या लोकांनी मीठी लस्सी मागवावी आणि मर्दांनी जर्द्याचे खुशबोदार पान! 
‘मानवी जीवन धन्य झाले….’ म्हणून जगाला दुवा देत बाहेर पडावे!

‘कुठेतरी चार सुखाचे घास खायला मिळावेत..’ अशी कामना करणाऱ्यांना घास म्हणजे भाताचेच घास – मग तो दही भात असो की बिर्याणी – अभिप्रेत असावेत अशी माझी धारणा आहे!

पहिला दिवस -२

February 23, 2007

रीतू नाडगौडाच्या स्वर्गिय सौंदर्यानं पुरुषवर्गाची अशी पाडापाड चाललेली असताना सर्किट व टग्या अद्यापि गोळेकाकांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या भाषांतरातच अडकले होते.
“हे बघ,
डोळ्यातल्या डोळ्यात संकेत झाला गं
बसल्या बसल्या जगण्याचा आधार झाला गं…” सर्किट.

“हां, असं त्या केशवसुमाराच्या हातात कोलित दे ,म्हणजे तो आहेच लगोलग विडंबन पाडायला..

‘डोक्यातल्या डोक्यात उवा झाल्या गं
नाव सटवे तुझे ‘केशवा’ ला कळ्ळंय गं’..”
“वृत्तात बसत नाही हां”
“केशवाची विडंबनं तरी कुठं बसतात वृत्तात?”
“अरे, पण बाटली, लोळणे, माडी यातलं काही नाही? मग ते केशवाचं विडंबन कसलं म्हणायचं?”
“हां, ते बाकी खरंय म्हणा”

आता एक नवीनच चेहरा समोर आला होता. तरुण वयाचा पण अत्यंत गंभीर चेहऱ्याचा हा कोण असावा याचा श्रोत्यांना काही अंदाजच येईना.आपल्या चेहऱ्याइतक्याच गंभीर आवाजात त्या तरुणाने बोलायला सुरुवात केली
“एखाद्या जख्ख पुरातन काळसर्पाने आपली एखाद्या पाकळीइतकीइतकी पातळ कात टाकून द्यावी तसे माझे कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखे आयुष्य त्यागून मी इथे आलो आहे. गतायुष्याचे चिकट हिरवे विषारी गोळे मी एकेक करून कालपुरुषाच्या कराल जबड्यात फेकून दिले आहेत. एखाद्या लूतभरल्या उंटाने वाळूच्या वादळात आपल्या फुरफुरणाऱ्या नाकपुड्या बंद करून घ्याव्यात तसे भूतकाळाचे लसलशीत लाल झापड मी कायमचे ओढून घेतले आहे. पण हे करत असताना माझ्या मनात एक अस्वस्थ, सुगंधी, पोपटी उत्सुकता आहे. आता पुढे दिसते आहे ते चुळूकभर मृगजळ की आईच्या पदराएवढा महासागर, माझ्या हातात येणार ती नम्र, शांत पूजानिरांजने की आंधळ्या डोळ्यांनी सरपटणाऱ्या बिलबिलीत गोगलगायी, माझ्या पावलांवर पडेल ते स्निग्ध, सुगंधी चंदनशिंपण की लालभडक, जळजळीत तप्त तेलाची धार— कुणास ठाऊक…”
त्याच्या एकेक वाक्यासरशी सवत पोटुशी आहे हे कळाल्यावर एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर उमटावा तसा मत्सर प्रदीप. सन्जोप आणि कोलबेरच्या चेहऱ्यावर उमटत होता. आपल्या खास राखीव कुरणात शिरलेला हा अनाहूत खोंड कोण हेच त्यांना कळत नव्हते. आणि दुसरेकडे त्या गंभीर तरुणाचे भाष्य सुरुच होते.
” एखाद्या प्राण्याच्या सडत चाललेल्या शरीरावरचा मांसाचा शेवटचा तुकडा एखाद्या हावरट तरसाने हिसकावून घ्यावा तशी माझ्या आयुष्यावरची कृतज्ञता माझ्या भूतकाळाच्या करवती कवटीने गिळून टाकली आहे. पण मूळ त्वचेपेक्षा सांगाडाच अधिक तेजाने तळपावा तसे माझे विनापाश, वस्त्रहीन मन आता चिंचेने घासलेल्या तांब्याच्या तबकासारखे स्वच्छ. निर्मळ झाले आहे.एखाद्या एकाकी पडावावरील लुकलुकत्या दिव्यावर असंख्य कीटकांनी झेप घ्यावी तशी माझ्या मनाची पाकोळी आता सतत एकाच दिशेने अविचल उडू पहात आहे. या दिशेला  मराठी भाषेची कुसर केलेली अतितलम पण रेखीव पावले उमटली आहेत. सुतरफेणीच्या पदरासारखे हे मराठी भाषेचे झुळझुळीत वस्त्र या महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर पायघड्यांसारखे अंथरताना मी स्वतःच अगदी मऊ, बिनसुरकुतीचा झालो आहे. आता अपेक्षा इतकीच, या वस्त्रावर सरस्वतीच्या मोरपंखी सुरांनी कशिदा विणला जावा. रोख, व्यवहारी अभंड हुच्च पावलांनी हे वस्त्र अगदी मलिन होऊ नये…”
श्रोते अवाक होऊन ऐकत होते. तो गंभीर चेहऱ्याचा तरुण एक पायरी खाली उतरला आणि तेराव्याचे मंत्र म्हणणाऱ्या गुरुजींच्या गंभीरपणे म्हणाला, ” माझे अस्तित्व अति पिकलेल्या जर्दाळूसारखे नगण्य पण अस्सल आहे, माझ्या डोक्यावरचा सूर्य तीव्र दाहक पण स्वयंप्रकाशित आहे…” आणि एखादा खिळा ठेकून बसवावा तसे तो शेवटचे वाक्य म्हणाला, “आणि माझे नाव छू आहे!”
प्रत्येकजण शेजाऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजू लागला. पहिल्या रांगेत बसलेल्या कारकून आणि मीरा फाटक यांचे बोलणे बाकी ध्वनिवर्धकामुळे सगळ्यांच्या कानावर पडले.
” काय म्हणत होता गं हा?”
“काही नाहे गं, इथं मराठी शिकवणार आहे म्हणे हा!”

दरम्यान महाविद्यालयाचे प्रणेते कुठेतरी गायब झालेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. ‘मराठीतल्या कुठल्या शिव्या सभ्य आणि कुठल्या असभ्य ‘ याविषयीची अद्यावत माहिती मिळवण्यासाठी ते आणि रीतू कुठेतरी गेल्याची चर्चा सुरु होती. विशेषतः ‘माय…’ या अक्षरांपासून सुरु होणाऱ्या शिव्यांविषयी त्यांना विशेष प्रेम असल्याचे कुणीसे म्हणाले. ” बरोबरच आहे. ‘माय..’ विषयी त्यांना आता विशेष आपुलकी असणारच” सर्किट म्हणला. “माय म्हणजे माझे, माय म्हणजे आई…”
“आणि माय म्हणजे मायबोली! खि… खि…खि…” मारणाऱ्याचा हात धरता येतो हो पण…

“जे इतिहास विसरतात, त्यांना लवकरच भूगोल विसरावा लागतो” खणखणीत आवाजात सर्वसाक्षीने सुरुवात केली. चिनी भाषेत याला एक फार समर्पक म्हण आहे. ‘ जे हिंग टुंग, ते पिंग दोन टुंग…’
“गालिब म्हणतो, ‘वदाअते गुल्दुस अता खुल्दुस ता मुंगुस…’” दिगंभाच्या कानात चित्त 
“सह्याद्रीच्या दगडादगडावर इथल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडले आहे,इथल्या मातीच्या कणाकणावर इथल्या क्रांतिकारकांचा घाम सांडला आहे, इथल्या फत्तराफत्तरावर इथल्या शहिदांचे…” इथे काहीतरी सांडवून सर्वसाक्षीला तो तिय्या जमवायचा होता. पण ते न जमल्याने तो उगीचच खाकरला  “शहिदांचे अं…..नाव कोरलेले आहे. पण आज या शहिदांची याद कोणाला आहे?  जो तो आपल्या ह्याच्यात आहे. अरे, हे शहीद नसते तर आजवर गुलामगिरीत खितपत पडलो असतो आपण! आणि स्वराज्य म्हणे अहिंसेने मिळालं! स्वराज्य काय असं उपास करून मिळतं? अबे छोड!” इथे सर्वसाक्षीचे आवेशयुक्त हातवारे खेडुताच्या गालाला निसटता स्पर्श करून गेले. खेडुत “बायलीला..” का असं काहीसं पुटपुटला. सर्वसाक्षीच्या हाताला झिणझिण्या आल्या. ” आज या शहिदांच्या आठवणीने डोक्याला झिणझिण्या – आपलं- मुंग्या येतात. हीच राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात पेटली पाहिजे. या अपृष्ठवंशीय तरुणांच्या पाठीचे कणे ग्रॅनाईटचे झाले पाहिजेत. या राष्ट्राच्या अभिमानाचा – जाज्वल्य अभिमानाचा…”
“जाज्वल्य? ह्या म्हमईकराला ह्यो पुनेरी शबुद कसा गावला म्हनायचा? वातकुक्कुट ह्योच तर न्हवं?” खेडुताचा माधव कुळकर्णीला प्रश्न.

“ओ, मुद्द्याचं बोला…” 
“ओळख करून द्या आणि बसा हो खाली”
“तुमची राजकारणी मतं ऐकायला नाही आलो हो इथे…”
“वाटलं तर तुम्ही नका गांधिगिरी करु..”
“हो.. पोष्टाची तिकिटं उलटी लावा”
” नोटा वापरू नका”
“घेऊही नका… खि…खि…खि…”
“ड्राय डे पाळू नका…”
अशा गदारोळात इतिहासाचे प्राध्यापक सर्वसाक्षी खाली बसले.

पहिला दिवस-1

February 17, 2007

भांडाभांड विद्यापीठाशी संलग्न ‘मनोगत वादविवाद आणि भांडणकला महाविद्यालय’ चा आजचा पहिला दिवस.

आपल्याला पहिल्याच दिवशी उशीर झाला की काय या काळजीने घाबराघुबरा झालेला सर्किट कोपऱ्यावरुन घाईघाईने वळाला तसे शामियान्यातून येणारे भीमसेनअण्णांच्या मारव्याचे सूर त्याच्या कानावर पडले. सर्किटच्या भव्य कपाळावरच्या आठ्यांत एकीची भर पडली.”आता या नोकरीत काय आपल्याला अण्णा आणि बाबुजीच ऐकत रहायला लागणार वाटतं!’ तो स्वतःशीच म्हणाला ‘या’चंद्रा’चा कलेकलेने वाढणारा लहरीपणा आपल्याला सहन करायला लागणार तर!’ . व्वा! अचानकच जमून गेलेल्या कोटीनं त्याच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते एक दुर्मिळ हास्य उमटलं. तरीही अमेरिकेतली उत्तम नोकरी सोडून भारतात मास्तरकी करण्याचा निर्णय घेऊन आपण चूक तर केली नाही ना, ही शंका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
शामियान्यात मारवा गुंजत होता खरा, पण एकंदरीत आसपास शुकशुकाटच होता. मंडपाबाहेर चित्त, सन्जोप राव आणि माधव कुळकर्णी सिगरेट ओढत उभे होते. शेजारी दोन खुर्च्या टाकून दिगम्भा आणि अत्त्यानंद गप्पा मारत होते.
“काय रे, नऊची वेळ होती ना? मला वाटलं की मलाच उशीर झालाय…’ सर्किट म्हणाला.
“अरे, तात्याच्या महाविद्यालयाचा कार्यक्रम!” माधव म्हणाला “ सकाळी नऊचा रात्री नऊला सुरु झाला तरी नशीब. तशी सत्यनारायणाची पूजा सुरु झालीय आत, पण हा सन्जोप म्हणाला की साधुवाण्याचं नाव ऐकलं की म्हणे त्याचं ब्लडप्रेशर वाढतं. मग म्हटलं चला बुवा, एकेक सिग्रेट मारून येऊ…”
“नमस्कार, मी अत्त्यानंद” बुवा नम्रपणे उठून उभे राहिले.
“नमस्कार, मी सर्किट”
“हो, ओळखलं मी तुम्हाला” बुवा अधिकच नम्र झाले. “विद्वत्तेचं तेज कुठे लपून रहातं का? मी तुमचा निस्सीम चाहता आहे. तुम्ही लिहायचं थांबवलंत, वाईट वाटलं मला. अहो, कुणी कसं वागो, आपण आपलं सत्कृत्य करत रहावं, नाही का? आता माझ्यासारखा य:कश्चित माणूस लिहीत रहातो..”
“हो, तुमचे ‘रम्य दिवस’ वाचतो मी, आवडतात मला…”
“कसचं कसचं… आपण लेखनसम्राट, मी आपला पांढऱ्यावर काळं करणारा…”
बुवा याच थाटात बोलत राहिले असते पण दरम्यान चित्तची सिग्रेट संपली होती. “चला आत जाऊ या” तो एकदम म्हणाला. मंडळी आत जायला निघाली
“काय रे सन्जोप..” माधव आणि सन्जोप मागे रेंगाळले होते
“काय?”
“नाही, तो अत्यानंद मगाशी सर्किटला जे म्हणत होता..”
“त्याचं काय?”
“मला वाटतं, आतल्या सगळ्या मंडळींना एकेकटं गाठून तो तेच म्हणत होता.. असं मला वाटतंय हं..”
“माधवा, तुझ्या शंका फार हं. जाऊ दे ना, एखाद्याला वाटतं, सगळ्यांना चांगलं म्हणावं…”
“अरे, पण त्याने हा रोल घेतला तर वेदश्री काय करणार?”
सन्जोप ठोठो हसला.एवढ्यात काळा टी शर्ट घातलेला कुणीतरी घाईघाईने आत जाताना दिसला. “ओळखलंस का याला?” दिगम्भाने चित्तला विचारले. “चेहरा तरी ओळखीचा वाटतोय बुवा..” चित्त म्हणाला “अरे हो, मगाशीच हा घाईघाईने मंडपाच्या बाहेर जाताना दिसला होता, पण त्या वेळी तर त्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता मला वाटतं…” 
“बरोबर” दिगंभाने खुलासा केला. “तर पांढरा शर्ट घातला असेल तेंव्हा त्याला अनिरुद्ध १९६९म्हणायचं, आणि काळा शर्ट असेल तेंव्हा…?”
“केशवसुमार!” सन्जोप, माधव आणि सर्किट एका सुरात म्हणाले 
“करेक्ट” दिगंभा म्हणाला. “पण हा अशी धावपळ का करतोय बुवा?”
“काही नाही रे…” माधवने खुलासा केला. “त्याला आत एखादी नवीन कविता सापडली असणार, आणि इतर कुणाला कळायच्या आत तिचं विडंबन करायचं असेल त्याला. म्हणून ही सगळी धावपळ.”
मंडपाच्या आत सत्यनारायणाची पूजा रंगात आली होती. महाविद्यालयाचे प्रणेते तातोबा जातीने पूजेला बसले होते. त्यांच्या गुटगुटीत तनूवर सोन्याचा गोफ शोभून दिसत होता. हाताच्या बोटातल्या जाडजूड अंगठ्या चमकत होत्या. एखाद्या सापाने बेडकाला गिळण्याऐवजी बेडकानेच सापाला गिळले तर त्याच्या मुद्रेवर जसा तृप्त,शांत भाव येईल तसा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ! पूजा सांगणारे गुरुजी मात्र समारंभाला अगदीच विशोभित होते. किडकिडीत शरीरयष्टी, वाढलेली दाढी, किडके दात आणि चिरकटलेला आवाज. “या तात्याला महाविद्यालयाच्या उद्घाटनाला एक चांगला गुरुजी पण मिळू नये का?” मिलिंद फणसेने सर्वसाक्षीला विचारले. “अरे मिलिंद, तू यांना ओळखलं नाहीस का? हे शिंत्रे गुरुजी! म्हणजे तात्याचं वशिल्याचं तट्टू!” टग्याने परस्पर उत्तर दिले.”कंपूबाजी नाही तर समारंभ कसला? खि..खि…खि….” टग्याचे हसणे बाकी अगदी तस्से राहिले आहे!
“जेवणाची काही व्यवस्था आहे की नुसताच तीर्थ प्रसाद?” माधवने जयंताला विचारले. सिगारेटच्या वासाने अस्वस्थ झालेला जयंता पूजेला बसलेल्या तात्याजवळ गेला. “तात्या, असल्या शुभ कार्यात तरी तुझ्या प्राध्यापकांना व्यसनांपासून दूर रहायला सांग. अरे, शरीरसंपदा महत्त्वाची. विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार हे लोक…? जयंता भावनाविवश झाला होता.
“पंग ट्यांचं ट्यांना कयाया णको का?” तात्याने मुखरस सांभाळत पहिल्यांदा तोंड उघडले. त्या किमामी जर्द्याच्या खुश्बोयुक्त प्रश्नाने जयंता खचल्यासारखा झाला. “आता काय बोलणार? इथे साक्षात महाविद्यालयाचे प्रणेतेच एकसोबीस तीनसो लावून पूजेला बसलेत! आता तक्रार तरी कुणाजवळ करायची?” जयंता स्वतःशीच म्हणाला. 
अखेरीस पूजा आटोपली. सध्या तरी महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या अधिक वाटत होती. तीन विद्यार्थी बाकी कपाळाला गंधबिंध लावून मनोभावे हात जोडून उभे होते. तीघांच्याही हातातल्या वहीवर शारीरिक बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करून वस्त्रप्रावरणांचाही बहुतेक संपूर्ण त्याग केलेल्या एकेका स्वामींचे उन्मनिय असस्थेतले फोटो लावलेले होते. त्यावरून ते सचिन म्हेत्रे, नितीन व नाम्या असावेत अशी शंका बऱ्याच प्राध्यापकांना आली.
“राम राम मंडळी. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो” प्रणेते बोलायला उठले. “सगळं काही जमलं आहे, पण च्यायला महाविद्यालयाला समर्पक असं बोधवाक्य काही सापडलं नाही. आता आपल्याकडे इतकी विद्वान मंडळी आहेत, तेंव्हा तुमच्याकडूनच काही सूचना आल्या तर बघू. काय जयंता, काही सुचतंय का?”
“मला वाटतं ‘सत्यं शिवं सुंदरम’ हे समर्पक ठरेल” जयन्ता.
“पण या महाविद्यालयाचा आणि सत्याचा काय संबंध? एकलव्याने शंका काढली.
“‘हान तिच्या आयला’ पटतंय का बगा समद्यास्नी” खेडूत.
“यात न पटण्यासारखे काही नाही, पण सगळ्यांची संमती असल्यास माझा विरोध आहे” जीवन जिज्ञासा.
“जीजि, तुझ्या या विधानाला माझा विरोध आहे” सर्किट
“मला वाटते…” मुक्तसुनिताने प्रथमच संभाषणात भाग घेतला. आतापर्यंत तो एका पुस्तकात डोके खुपसून बसला होता. “मला वाटते, ‘भविष्यसरणावरचे अर्धवर्तमानबाष्प पेटवूया’ हे रास्त ठरेल”
“आणि हा काय शिकवणार म्हणे? मराठी? खि…खि…खि…” सन्जोपच्या कानात टग्या.
“थांबा, थांबा…” चित्त पुढे सरसावला. “मनोगतच्या वैचारिक पार्श्वभूमीला अनुषंगून मी असं सुचवतो की
‘अलहक कि तिरी वसअते तखईल के आगे
सहरा कफे खाकस्तर व गुलशन कफसे रंग’
हे बोधवाक्य ठेवूया….”
आता यातले एक अक्षरही कुणाला न कळाल्यामुळे चित्तचा ठराव सर्वसहमतीने मंजूर होणार अशी चिन्हे दिसत असतानाच कुणाचा तरी भ्रमणध्वनी खणखणला. मुळात प्राचार्य म्हणून निवड झालेले पण  नंतर फक्त ज्ञानेश्वरी या विषयासाठीचा अर्धवेळ प्राध्यापक विनायक बोलत होता. प्रणेतांचे आणि त्याचे काय बोलणे झाले कुणास ठाऊक, पण प्रणेत्यांनी अचानक ‘मौनं सर्वार्थ साधनं’ हे बोधवाक्य ठरले असल्याचे जाहीरच करून टाकले.
पहिला दिवस, त्यामुळे प्राध्यापकांच्या ‘आपापसात’ ओळखी करून देण्याचा कार्यक्रम सुरु झाला.
“मी दिगम्भा. मी शास्त्रीय संगीत आणि हिंदी चित्रपटसमीक्षा हे विषय शिकवतो”
“आणि त्याचा अर्धवेळ सहायक म्हणून इतर कुठल्याच विषयात गती नसलेला सन्जोप काम करेल” प्रणेते रोखठोक शब्दात.
“म्हणजे दिगम्भाने लिहायचे, आणि सन्जोपने त्याचा त्याचा अर्थ मराठीत सांगायचा….” माधव कुळकर्णीला हे चांगले जमते!
“मी नरेंद्र गोळे. मी हिंदी चित्रपटगीतांचा मराठीत अनुवाद करतो…”
“का?”
“का म्हणजे? लोकांना चांगल्या हिंदी गाण्यांचा अर्थ नको कळायला? आता नुकताच मी एक अनुवाद केला आहे” गोळे जरा चालीत गायलाच लागले
“धोका धोका…
धोका धोका वई वई वई
धोका धोका वई वई वई
झाली रे झाली
मला झाली रे झाली…”
“वा, वा, काय गाणं आहे की त्रिफळा चूर्णाची जाहिरात? खि..खि…खि…” टग्याच तो! त्याचं तोंड कोण धरणार?
तेवढ्यात छुन छुन छुन असा पैंजणाचा आवाज आला. कुठला तरी जीवघेणा परफ्यूम आसमंतात दरवळला. शेलाट्या बांध्याची, केतकी वर्णाची, काळ्याभोर डोळ्यांची, अठ्ठावीस -तीस वर्षांची एक तरुणी – तरुणीच ती! – गर्दीतून वाट काढत पुढे आली. आकाशी रंगाची साडी, बिनबाह्याचा ब्लाऊज, चेहऱ्यावर माफक मेकअप, केसांची कुठली तरी आधुनिक रचना आणि तीत माळलेला ताजा मोगरीचा गजरा – प्राध्यापकांपैकी निम्मे जागीच गारद झाले. असंख्य दिलांचा खातमा करत ती तरुणी थेट प्रणेत्यांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसली.
“मंडळी,” प्रणेते घसा साफ करून म्हणाले ” माझ्या खाजगी सचिवांची ओळख करून देतो…”
“माझं नाव रीतू” ती सुंदरी म्हणाली.”रीतू नाडगौडा”.
 
 

चष्म-ए-बद्दूर – दर्जेदार मनोरंजन!

February 14, 2007

दूरदर्शनवर कोणत्याही वाहिनीवर चष्म-ए-बद्दूर हा सिनेमा लागलेला असला की अचानक माझ्या हातातला रिमोट काम करेनासा होतो. फारूख शेख, दीप्ती नवल. राकेश बेदी, रवी वासवानी आणि मुख्य म्हणजे सईद जाफरी यांना हाताशी धरून सई परांजपेंनी एक अफलातून धमाल तयार केली ती म्हणजे चष्म-ए-बद्दूर. कोणतेही माकडचाळे नाहीत, कुठेही कमरेखालचे विनोद नाहीत, नायक नायिकेचे पावसातले गाणे नाही, आहे ती फक्त खुदुखुदूपासून खोखोपर्यंत ह्सवणारी एक प्रसन्न धमाल.
ही कथा आहे दिल्लीत एका फ्लॅटमध्ये रहाणाऱ्या तीन कॉलेज युवकांची. सिद्धार्थ पराशर हा गंभीर, इंटलेक्चुअल तरुण. इकॉनॉमिक्समध्ये एम.ए. झाला आहे आणि पी.एच. डी करतो आहे. त्याचे साथीदार ओमी आणि जोमो हे बाकी खुशालचेंडू. एखादी छोकरी पटवणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय. दोघेही परीक्षेत वारंवार नापास होताहेत, त्यांच्या आईवडीलांनी त्यांना पैसे पाठवणे बंद केले आहे, पण यांना त्याची काही फिकीर नाही. हे आपले बुटाला पॉलिश करताहेत, चकाचक कपडे घालताहेत आणि उधारीवर घेतलेल्या सिग्रेटी फुंकत नवनवीन शिकारीच्या शोधात हिंडताहेत! यांना उधार सिग्रेटी देणारा पानवाला आहे लल्लनमियाँ. हा अस्सल हैदराबादी, वरकरणी कठोर, पण मनातून या तीघांवरही माया करणारा.

अशात यांच्या गल्लीत नेहा रहायला येते. जाईच्या कळीसारखी ही शालीन मुलगी शास्त्रीय संगीत शिकते आहे. त्या शिकवणीसाठी लागणारे पैसे ही स्वाभीमानी मुलगी एका धुण्याची पावडर तयार करणाऱ्या कंपनीसाठी काम करून कमावते आहे. जोमो आणि ओमीच्या दृष्टीने बाकी ही नवीन ‘शिकार’च आहे. मग ते दोघेही आपापले नशीब आजमावयाला जातात, आणि थप्पड खाऊन परत येतात. पण आपला अपमान लपवायला नेहाबरोबरच्या काल्पनिक रोमान्सच्या कहाण्या सांगतात. सिद्धार्थला या कशातच काही रस नाही. तो आपला अभ्यासात गुंतला आहे. पण धुण्याची पावडर विकण्याच्या निमित्ताने अचानक त्याच्या आयुष्यात नेहा येते. मुलींबाबत संपूर्ण अनुनभवी सिद्धार्थ गांगरतो. त्याचा हा भाबडेपणा, ही निरागसता नेहाचे मन जिंकून जाते. योगायोगाने नेहाच्या वडीलांच्याच ऑफिसमध्ये सिद्धार्थला नोकरीही मिळते. नेहा सिद्धार्थची मुग्ध प्रीत फुलू लागते.

इकडे आपण जिच्यावर ‘लाईन’ मारली ती छोकरी सिद्धार्थसारख्या ‘नौसिखिया’ ला पटली हे पाहून ओमी आणि जोमोचा तिळपापड होतो. मग ते तिच्याविषयीच्या भलभलत्या कहाण्या सांगून सिद्धार्थचे कान भरतात. प्रेमिकांच्यातले गैरसमज, ते निवळावेत म्हणून ओमी आणि जोमोने लढवलेल्या शकला, त्यातून झालेले घोटाळे आणि अपेक्षेप्रमाणे गोड शेवट…

पण ‘चष्म-ए-बद्दूर’ची मझा अशी चार ओळीत सांगता येणार नाही. सई परांजपेने हा हलकाफुलका चित्रपट अशा गमतीत फुलवला आहे की ज्याचे नाव ते! शायराना मिजाज असणारा राकेश बेदी, आपल्या रूपाविषयी, कफल्लकपणाविषयी कसलाही न्यूनगंड नसणारा आणि साडी असो की स्कर्ट, सतत जाळे टाकण्याच्या तयारीत असलेला रवी वासवानी आणि स्कॉलर फारूख शेख यांनी आपापल्या कॅरॅक्टरमध्ये जान भरली आहे. दीप्ती नवल या चित्रपटात अगदी सहजपणाने तर वावरतेच, पण दिसतेही अगदी गोड. ‘The girl you would like to take to your mother’ म्हणतात तशी.पण चष्म-ए-बद्दूर चा खरा हीरो आहे तो लल्लनमियाँ. पांढराशुभ्र कुरता, चट्टपट्टेरी लुंगी,डोक्यावर खानदानी मुस्लिम टोपी, तोंडात रंगलेले पान असा हा लल्लनमियाँ सईद जाफरीने अजरामर करून ठेवला आहे. त्याचे उधारी वसुली करतानाचे ‘मुझ जैसा मगरमच्छ कोई नही’ हे रूप आणि रवी एखाद्या शिकारीचा पाठलाग करत असताना ‘अरे सुनो, साइकिल ले जाना मेरी’ हे रूप – दोन्हीही तितकीच लोभस. लल्लनमियाँचे संवाद – तसे एकूणच चष्म-ए-बद्दूरचे संवाद- खास दाद देण्यासारखे. प्रेमात पडून मूर्खासारखी खरेदी करून बसलो आणि आता उधारी चुकती करायला पैसे नाहीत असे सिद्धार्थने सांगितल्यावर ’सुना है इश्क में लोग हो जाते है बरबाद, यहाँ इश्क तो कोई और कर रिया है, बरबाद हम हो रहे है’ ही चपराक, ‘दूध नही है, वरना मै चाय बना देता आपके लिये’ ही सिद्धार्थने नेहाकडे व्यक्त केलेली खास ब्रम्हचाऱ्याच्या मठीतली खंत, (आणि त्याचे तसेच कपातून लाडू आणून देणे!). नेहाने साबणचुरा विकतानाची प्रश्नावली भरताना सिद्धार्थला ‘करते क्या हो’ या प्रश्नावरचे त्याचे फुगून ’एम.ए. किया है- डिस्टींक्शनमें, पी.एच.डी. कर रहा हूं’ असे दिलेले उत्तर आणि तो फुगा फोडणारा तिचा ‘धुलाई के लिये कौनसा साबुन इस्तेमाल करते हो’ हा पुढचा प्रश्न, ‘ये झागवाला झंझट आपका शौक है?’ हा सिद्धार्थचा मासूम प्रश्न ‘टॅलंट सर्च’ साठी दिल्लीत का आलो याचं कारण सांगताना ‘दरअसल जयाजी के बाद बंबई में एक वॅक्यूम सा हो गया है’ असं जोमोनं गंभीरपणे सांगणं… सगळेच खदखदा हसवणारे!

‘चष्म-ए-बद्दूर’ मध्ये ‘कहाँ से आये बदरा’, ‘प्यार लगावट प्रणय मुहब्बत’ आणि ‘काली घोडी द्वार खडी’ ही तीन सुरेख गाणी आहेत हे विसरायलाच होतं. ‘काली घोडी पे गोरा सैंया दमके’ या ओळीवर काळ्या मोटरसायकलवर कुर्ता-पायजमा (आणि हेल्मेट) घातलेला सैंया हे दृष्य – या खास सईच्या कल्पना. आपल्या नेहाबरोबरच्या रोमान्सची काल्पनिक वर्णनं करताना रवी वासवानीने केलेली ‘पॅरडी’ तर अफलातूनच. 

तर असा हा गेल्या जमानातल्या स्वच्छ. निर्भेळ कॉमेडीचा साक्षीदार असा चष्म-ए-बद्दूर. आता काळ पालटला. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.’दे दान सुटे गिराण’ म्हणत भिकारणीने फिरावे तसे ‘कैसा जादू डाला रे’ असे आर्त सूर लावणाऱ्यांचा जमाना आहे. ‘मस्ती’ सारख्या चित्रपटाला विनोदी चित्रपट म्हणण्याचा जमाना आहे. पण अशातच कधीकधी दिल्लीच्या शांत रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि टूटीफ्ऱूटी खाणारे, एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेले एखादे जोडपे आठवते. ‘सिद्धार्थ का बडा जबरदस्त हार्टफेल हो गया है’ अशी भाबडी चिंता करणारे त्याचे दोस्त आठवतात, ‘पैसे नहीं हैं तो मियाँ, ये नवाबी शौक फरमानेको किसने कहा था?’ असा दम भरणारे लल्लनमियाँ आठवतात. वर्षानुवर्षं ताजा राहिलेला एक नितांतसुंदर चित्रपट आठवतो – त्याचं नाव चष्म-ए-बद्दूर!

महाकवि गालिब

February 8, 2007

गालिबची ओळख आयुष्यात तशी उशीराच झाली. पण नंतर त्याच्या शायरीत अडकलो तो कायमचाच. भगवदगीतेमध्ये, बायबलमध्ये, कुराणात सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात असे म्हणतात. मला बाकी आयुष्याबद्दल पडणारे बरेच प्रश्न गालिबच्या कवितेने सोडवून दिले.

गंमत बघा, गालिबने आपली शायरी लिहीली ती प्रामुख्याने उर्दू आणि फारसी भाषेतून. पण त्यातले काही शब्द मराठीला जवळचे वाटतात. गालिबचा एक शेर आहेः

देखिए पाते है उश्शाक, बुतों से क्या फैज
इक बिरहमन ने कहा है कि यह साल अच्छा है

यातला बिरहमन हा शब्द मला ब्राह्मण या शब्दाचे रूप वाटते. एका ब्राह्मणाने सांगितलं आहे की येणारं वर्ष चांगलं आहे. आसपास तर सगळे पुतळेच आहेत, बघू आता त्यांच्याकडून काय फायदा होतो ते!

तसेच

चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन
हमारी जेब को अब हाजते रफू क्या है

यातला पैराहन हा शब्द मराठी पैरण या शब्दाच्या जवळचा आहे. रक्तानं माझं सगळं शरीर चिंब झालं आहे, पैरण अंगाला चिकटून बसलीय, आणि यात माझ्या फाटक्या खिशाला रफू करायला कुठे सांगता?

आणि गालिबचा माझा अत्यंत आवडता आणि खूप प्रसिद्ध असलेला शेरः

बाजीचः-ए-अत्फाल है दुनिया मिरे आगे
होता है शबो रोज तमाशा, मिरे आगे

हे जग म्हणजे लहान मुलांनी खेळण्याचं एक मैदान आहे. दिवसरात्र माझ्यासमोर हा तमाशा होत असतो.

गालिबची शायरी समजायला अवघड आणि गूढ असली तरी त्यामुळे तिचे साहित्यिक मूल्य अजिबात कमी होत नाही. अब्दुल रहमान बिजनौरी म्हणतात की भारतात अपौरुषेय ( दैवी ) ग्रंथ दोनच – वेद आणि गालिबच्या गजलांचा संग्रह ( दीवान ). यातला अतिशयोक्तिचा भाग सोडून दिला तरी यावरून गालिबचे उर्दू साहित्यातले महत्व ध्यानात येते. वस्तुतः गालिबची शायरी प्रामुख्याने फारसीमध्येच आहे. त्याने फारसीत उर्दूच्या चौपट गजला लिहिल्या. त्याच्या उर्दूतल्या गजलांची संख्या आहे केवळ २७६. गालिबच्या उर्दू रचना मोजक्या असल्या तरी उर्दू भाषेत आजवर सर्वाधिक लिखाण गालिबच्या साहित्यावर झाले आहे. यावरून आपटेंच्या कादंबऱ्यांची आठवण होते. आपटेंना कुणीतरी तुम्ही एम.ए. आहात का असे विचारले तेंव्हा ते हसून म्हणाले की मी एम.ए. नाही पण माझ्या कादंबऱ्या एम.ए. ला आहेत!

आपले भाव व्यक्त करण्याची ताकद उर्दूमध्ये नाही असे गालिबचे मत होते. तथापि त्याने उर्दूला फारसीपेक्षा कनिष्ठ समजले असे वाटत नाही. हिंदुस्थानात जन्म आणि वाढ झालेल्या उर्दूविषयी त्याला आदरच होता. त्या काळात उर्दू ही मुस्लिमांची भाषा समजली जात नसे. कितीतरी प्रसिद्ध हिंदू लेखकांनी / कवींनी उर्दूत विपुल लिखाण केले आहे. इतकेच काय पण भारतात उपऱ्या आलेल्या इंग्रज राज्यकर्त्यांपैकी काहींनी उर्दू उत्तम आत्मसात करून उर्दूत ‘तखल्लुस’ (उपनाम) धारण करून उत्तम काव्यरचना केली आहे. जोसेफ बेन्सले ‘फना’, जॉर्ज प्युश ‘शोर’, अलेक्झांडर इदरली ‘आजाद’ ही अशीच काही उदाहरणे. फाळणीनंतर उर्दू पाकिस्तानची राष्ट्रभाषा झाली आणि भारतात उर्दूची पीछेहाट सुरु झाली. राजकारणाच्या गलिच्छ खेळात एक देश एका सुंदर भाषेला मुकला. असो.

आपल्या काळाच्या पुढे असलेल्या गालिबने कधीही साहित्यिक संतत्वाचा दावा केला नाही. गालिबमध्ये सर्वसामान्य माणसांइतकेच, कदाचित सर्वसामान्यांपेक्षा जास्तच दुर्गुण होते. पण ते लपविण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. पु. लं. च्या रावसाहेबांप्रमाणे गालिब स्वतःच्या ऐशआरामी, व्यसनी वृतीवर हसत राहिला. माणसाला खुजे करणारी आत्मप्रौढीची वृती, परिस्थितीने गांजल्यावर ब्रिटीश राज्यकर्त्यांचे लांगूलचालन करण्याचा क्षुद्रपणा हे सगळे गालिबने उघडपणाने केले. त्याचा आत्मसन्मान तर गर्व नव्हे तर ताठा वाटावा इतका प्रखर होता. इतरांना कस्पटासम लेखण्याचा प्रमादही त्याला बराच तापदायी ठरला. पण गालिबचे सगळे दुर्गुण.. त्याचा अस्थायी दिलेरपणा, अव्यवहारी वृत्ती, आमदनी मर्यादित असताना कर्ज घेऊन ऐयाशी करण्याचा त्याचा स्वभाव, स्वतःच्या धर्मातीत वृत्तीमुळे कर्मकांडांविरुद्ध त्याची प्रखर मते… हे सगळे सगळे त्याच्या अस्मानी प्रतिभेसमोर झाकले जाते.

गालिबने आयुष्यात स्वतःपेक्षा कधी कुणाला श्रेष्ठ मानले नाही. नाही म्हणायला महान शायर मीर तकी ‘मीर’ यांविषयी गालिबने एक प्रशंसायुक्त शेर लिहीला आहे खरा, पण त्यातही त्याने स्वतःचा डंका पिटला आहेच!

रेख्ते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब
कहते है अगले जमाने में कोई ‘मीर’ भी था

 गालिब, उर्दू शायरीचा तू एकटाच श्रेष्ठ शायर नाहीस, तुझ्या आधी कुणी मीर नावाचा होऊन गेला म्हणे! ( केवढा अहंकार! )

गालिब चा अर्थच ‘वरचढ’ असा आहे. गालिबची मानसिकताच त्याच्या तखल्लुसच्या निवडीतून दिसून येते.

गालिब आयुष्यभर आर्थिक चणचणीत राहिला. अत्यंत अव्यवहारी वृत्तीमुळे त्याच्या हातात पैसा कधी टिकलाच नाही. त्यावरही वक्रोक्तीने तो म्हणतो

दीरमो दाम अपने पास कहाँ
चील के घोसले मे मास कहाँ

घारीला मास मिळले तर ती ती कधी साठवून ठेवेल का? पैशाच्या बाबतीत मी तसाच आहे!

गालिबचा समकालीन शायर शेख इब्राहिम जौक हा गालिबपेक्षा कमी प्रतिभावान असूनही राजकवी झाला. गालिबला हा माणून कधीच आवडला नव्हता.त्यामुळे जौकला टोचून बोलण्याची एकही संधी गालिब दवडत नसे. एकदा जौक रस्त्यावरून जात असता गालिबने त्याला ऐकू जाईल अशा आवाजात शेराची एक ओळ पेश केलीः

हुआ है शाह का मुसाहिब, फिरे है इतराता

या बादशहाच्या आश्रीताचा डौल तर बघा…

यावर जौकने बादशहाचे कान भरले. बादशहा जफरने गालिबला बोलवणे पाठवून या ओळीचा खुलासा मागितला. गालिबची प्रतिभा पहा, राजदरबारात पोचेपर्यंत गालिबने शेर पूर्ण केलाः

हुआ है शाह का मुसाहिब, फिरे है इतराता
वरनः शहर में ‘गालिब’ की आबरू क्या है

गालिब, बादशहाची कृपा म्हणून तू घमेंडीत हिंडत असतोस, नाहीतर तुझी शहरात काय किंमत आहे!

कर्ज काढून ऐयाशी करण्याच्या वृतीमुळे गालिबवर खटलेही भरले गेले. पण अशाही परिस्थितीत त्याची स्वतःवर हसण्याची तयारी होती. न्यायालयात त्याने पेश केलेला हा शेर पहाः

कर्ज की पीते थे मै, लेकिन समझते थे कि हाँ
रंग लायेगी हमारी फाकःमस्ती एक दिन

कर्ज काढकाढून पीत होतो, तेंव्हाच माहिती होतं, की एक दिवस ही उपासमारीची वेळ येणार आहे.

गालिबचा कर्जबाजारीपणा दिल्लीत त्याच्याइतकाच मशहूर झाला होता. खुद्द बादशहा जफरचं लांगूलचालन करतानाही गालिब आपल्याला दरमहा पैसे मिळवेत हे कसं खुबीनं सांगतो पहाः

बस की लेता हूं हर महिने कर्ज
और रहती है सूद की तकरार
मेरी तनख्वाह में तिहाई का
हो गया शरीक साहूकार
आपका बंदा और फिरू नंगा
आपका नौकर और खांऊ उधार
मेरी तनख्वाह की जे माह-ब-माह
ता ना हो मुझे जिंदगी दुशवार

असा हा असामान्य प्रतिभावंत गालिब!

अपरिचित तलत

February 7, 2007

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात पुरुष पार्श्वगायकांमध्ये महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश हे नेहमीच सम्राटपदी राहिले. त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार, मन्नाडे, तलत महमूद, महेंद्र कपूर यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा अर्थ त्यांची प्रतिभा कमी होती असा नाही. पण यश हे नेहमी फक्त प्रतिभा आणि गुणवत्ता यावरच अवलंबून असत नाही. चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवशाच्या व्यवसायात तर नाहीच नाही. हेमंतदांचा धीरगंभीर ‘बेस’ हीच त्यांची मर्यादा ठरली. चॉकलेटी चेहऱ्याच्या देव आनंदसाठी आपण हेमंतदांचा खर्ज चालवून घेतला खरा, पण तो केवळ त्या दोघांवरच्या आणि एकंदरीतच संगीतावरच्या आपल्या प्रेमाखातर. मन्नाडे तर फारच कमनशिबी. शास्त्रीय संगीताचा जबरा अभ्यास, सुस्पष्ट, दाणेदार आवाज, रागदारीची उत्तम जाण.. यशस्वी गायक होण्यासाठी लागणारे सगळे गुण असूनही या गायकाला शेवटी मेहमूदसारख्या विनोदी नटासाठी आवाज द्यावा लागला. तलत महमूदसारख्या लखनवी अदबीत वाढलेल्या शापित गंधर्वाच्या पदरी तर दुसरे काही पडणे शक्यच नव्हते. एकतर यश ओरबाडून घेण्यासाठी जो कावेबाजपणा लागतो, प्रसंगी दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढण्याचा जो संधीसाधूपणा लागतो, तो या मवाळ आणि मृदू स्वभावाच्या गायकाच्या वृत्तीतच नव्हता. कुठल्या कंपूत सामिल होणं त्याला कधी जमलं नाही, लोकांनी पसरवलेल्या अफवांवर, टीकेवर त्वेषानं वार करणं त्याला कधी योग्य वाटलं नाही. त्याला स्वतःला बंगाली पार्श्वभूमी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बंगाली गटानंही त्याच्या प्रतिभेला कधी झुकतं माप दिलं नाही. अगदीच रहावलं नाही तेंव्हा तो त्याच्या नेहमीच्या मृदू स्वरात म्हणाला – सलीलदांना ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ च्या वेळी माझी आठवण कशी झाली नाही, कुणास ठाऊक! बस्स, एवढंच! तलतचा आवाज निर्दोष नव्हता. त्याच्या आवाजालाही असंख्य मर्यादा होत्या. पण या सर्वांसकट तलतचा आवाज खानदानी होता. त्याच्या आवाजात एक सुसंस्कृतपणा होता.आवाजातला दैवदत्त गोडवा, शास्त्रीय संगीताचे त्यावर झालेले संस्कार आणि संगीताचे इमान पाळण्याचा त्याचा (हळूहळू कालबाह्य होत गेलेला) विश्वास यामुळं तलतचा रसिकांनी त्याच्या सर्व दोषांसकट स्वीकार केला. रफी, मुकेश, किशोरच्या तुलनेत तलतची फिल्मी गाणी फारच कमी आहेत – जेमेतेम चारएकशे. पण एकोणीसशे सत्तरच्या आसपास पार्श्वगायन सोडून दिल्यानंतरही आजही तलतचे जगभर चहाते आहेत. त्याच्या ध्वनीमुद्रिकांचा खप अजूनही कमी झालेला नाही. मला वाटते, तलतच्या गायकीचे सर्वात मोठे यश हेच आहे. लखनौमध्ये शास्त्रीय संगीताचे बाकायदा शिक्षण घेतलेल्या तलतने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती कलकत्त्यात. १९४९ साली तो मुंबईला आला. अनिल विश्वास यांनी त्याला ‘ आरजू’ मधील ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल..’ या गाण्यासाठी पहिली संधी दिली. तलत आयुष्यभर अनिलदांचे हे ऋण मानत राहिला. ( त्याच्याच शब्दात सांगायचं तर ‘ मेरी तो सारी दुनिया घूम फिर कर अनिलदां के पास आती है’ अनिल विश्वास हाही तितकाच विनयशील माणूस – बाबूजींच्या संगीतरचनांना ‘ मच ऑफ व्हॉट ही कंपोजेस इज प्युअर गोल्ड’ म्हणणारा – तलतच्या या कृतज्ञतेवर अनिलदा म्हणतात ‘ यह तो तलतका बडप्पन है – मैं तो एक बहाना हूं जिसके जरीये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं!) त्यानंतर तलत हिंदीत बऱ्याच संगीतकारांकडं गायला. इतरही भाषात गायला. पण बाबूजींच्या गाण्यासारखंच – मच ऑफ व्हॉट ही सँग इज प्युअर गोल्ड. तलतच्या गाण्याबाबतीतली एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट अशी की तलतची वाईट गाणी फारच कमी आहेत. मला स्वतःला तर तलतची ‘मैं पीके नही आया( कवी )’ आणि ‘सुनो भाई हमने ( रूप की रानी, चोरों का राजा)’ एवढी दोनच गाणी वाईट म्हणावी इतकी टाकाऊ वाटतात. तलतच्या फिल्मी आणि गैरफिल्मी गाण्यांची संख्या लक्षात घेता अगदीच नगण्य. बाकी तलतची गाणी कमालीची सुमधूर आणि त्यामुळंच लोकप्रियही. पण या लेखात मी चर्चा करणार आहे ती तलतच्या फारशा लोकप्रिय नसलेल्या पण तरीही अत्यंत श्रवणीय अशा काही गाण्यांची. प्रथम तलतची काही द्वंद्वगीतं. तलत – लता जोडीचं ‘ सीनेमें सुलगते हैं अरमाँ…’ ( तराना- अनिल विश्वास )हे बहुदा या जोडीचं सर्वात लोकप्रिय गीत असेल. पण याच सिनेमात याच जोडीचं ’ ‘नैन मिले नैन हुए बावरे…’ हेही गाणं अतिशय गोड आहे. तलत -लता जोडीचं ‘ये नयी नयी प्रीत है…’ ( पाकिटमार – मदनमोहन ) हे उडत्या लयीचं असंच एक श्रवणीय आणि मुद्दाम ऐकण्यासारखं गाणं . संगीतकार नौशाद यांनी तलतला फार कमी वेळा संधी दिली. त्यामागे त्यांचे अत्याधिक रफीप्रेम असेल किंवा ‘बाबुल’ च्या ध्वनीमुद्रणाच्यावेळी तलतला सिगरेट ओढताना पाहून त्यांच्या मनात बसलेली अढी असेल. पण त्यांनी ‘बाबुल’ साठीच स्वररचना केलेले तलत-शमशाद बेगमचे ‘मिलते ही आँखे…’ कोण विसरेल? एका बाजूला तलतचा मुलायम आवाज तर दुसरीकडे शमशादचा खडा पहाडी स्वर.. पण यातून जन्मली ती एक अजरामर स्वररचना. तलत – सुरैयाची ‘ मन धीरे धीरे गाये रे…’ (मालिक – गुलाम महंमद ) आणि ‘दिल-ए-नादाँ तुझे हुवा क्या है…’ ( मिर्जा गालिब – गुलाम महंमद)  हीपण नितांतश्रवणीय गाणी. तलतची एकट्यानं गायलेली, फारशी प्रसिद्ध नसलेली पण जीव वेडावून टाकणारी बरीच गाणी आहेत. ‘सुनांऊ किसको अफसाना.’ ( शिरी-फरहाद – एस. मोहिंदर ), ‘जीवन है मधुबन..’ ( जासूस – अनिल विश्वास ), ‘बेरहम आसमाँ ..’ ( बहाना – मदनमोहन – उत्तम काव्यरचना – काही ओळी पहा – ” अब कोई भी तमन्ना नही, अब यहाँ हमको जीना नहीं, जिंदगी तेरे जाम से,  एक कतरा भी पीना नहीं ), ‘सपनों की सुहानी दुनिया को ( शिकस्त – शंकर जयकिशन ), ‘उन्हे तू भूल जा ऐ दिल..’ ( नया घर -  शंकर जयकिशन  ), ‘भरम तेरी वफाओं का’ (अरमान – एस. डी. बर्मन – साहिरची उत्तम कव्यरचना उदाः ‘तेरी उम्मीद पर जीने से हासिल कुछ नही लेकिन, अगर यूं भी न दिल को आसरा देते तो क्या होता’) ,’गर तेरी नवाजिश हो जाये’ ( गुलबहार – धनीराम व खैयाम), ‘तेरे दर पे आय हूं फरियाद लेकर’ ( चोर बाजार – सरदार मलिक - त्याच त्या उचल्या अनु मलिकचे वडील), कोणत्याही तालवाद्याची साथ न घेता एस. डी. बर्मनने रचलेले ‘देवदास’ मधील कमालीचे आर्त ‘मितवा..’, साहिरच्या अप्रतिम ओळी असणारे’ मुहब्बत तर्क की मैंने, गरेबा सी लिया मैंने, जमाने अब तो खुश हो, जहर ये भी पी लिया मैंने’ ( दो राहा – अनिल विश्वास) …. अशी ही न संपणारी यादी! संध्याकाळ असावी. दिवसाभराच्या कामानं थकून घरी यावं. सुस्नात होऊन शांत बैठक घालावी. तलतच्या निळसर सुगंधी स्वरांचं धुकं आसपास दरवळू लागावं, सोबतीला ( आपल्या व तलतच्या मध्ये न येणारा / री ) ‘तो’ किंवा ‘ती’ असावी, जमल्यास समोर एखादा फेसाळता सोनेरी चषक असावा. दिवसाभरातल्या चिंता, कटकटी तलतच्या गोडगहिऱ्या आवाजात वितळून जाव्यात!

मिलिंद बोकील -आश्वासक लेखन

February 7, 2007

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कारणाने मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. दूरदर्शनवरचे रटाळ कार्यक्रम आणि आपण सातत्याने हरणारे क्रिकेटचे सामने बघून मी बऱ्यापैकी कंटाळलो होतो. त्याच त्याच लेखकांच्या पुस्तकांच्या वाचनातही मन लागत नव्हते. अशातच मिलिंद बोकील या नव्या लेखकाचे ‘उदकाचिया आर्ती’ या नावाचे पुस्तक हाती लागले. पुस्तकाच्या नावाने कुतुहल चाळवले गेले. सहज म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि पहातापहाता त्यात गुंतत गेलो. दोनएकशे पानांचा कथासंग्रह मी एकटाकी वाचून काढला आणि भारावून गेलो. हे काहीतरी वेगळेच रसायन होते. थोडीशी नेमाडेंची वैचारिक स्पष्टता, थोडीशी अनिल अवचटांची तळमळ आणि तरीही एक संपूर्ण स्वतःची वेगळी अशी शैली. त्या कथांमधले अचूक वैज्ञानिक संदर्भ, कथांचे विषय, त्यातली व्यक्तीचित्रे.. सगळेच अगदी नैसर्गिक आणि आपल्या आसपासचे आणि तरीही काहीसे वेगळेच.  चळवळीच्या धुंदीत घरदार विसरून कलंदर,वैराण  झालेल्या पण आपल्या मुलाच्या जन्माने आयुष्याला जणू एक हिरवागार कोंभ फुटावा तसे ओलावलेल्या शशिकांतची ‘भावी इतिहास’ ही कथा, जबरदस्तीने हा देश सोडाव्या लागणाऱ्या धर्मोपदेशक फादरची ‘भूमी’ ही कथा,  अमेरिकन संस्कृतीचा बळी पडून शेवटी नाइलाजाने घटस्फोट घ्यावा लागणारे ‘विदेश’ या कथेतले सीमा आणि चंद्रशेखर, मेधा पाटकरांवर लिहिलेली ’उदकाचिया आर्ती.. या सगळ्याच कथा मला अतिशय आवडल्या. हा कोण नवीन लेखक हे जाणून घ्यावेसे वाटले. पुढे बोकिलांचा ‘झेन गार्डन’ हा कथासंग्रह वाचून तर ‘उदकाचिया आर्ती’ चे अस्सलपण हा ‘फ्लूक’ नव्हता याची खात्री पटली. हाही कथासंग्रह तेव्हढाच आवडला.
मिलिंद बोकील हे पिंडाने खरे तर कथाकार नव्हेत. विविध सामाजिक प्रश्नांशी संबंधीत ते सखोल अभ्यासकर्ते आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत. पण बहुतेक वेळा अशा कामांतून मिळणारे अनुभव खऱ्या प्रतिभावंताच्या सुप्त प्रतिभेला लिहायला उद्युक्त करतातच. बरोबरीने जर भाषाप्रभुत्व आणि कल्पनाशक्तीची देणगी असेल तर कसदार लेखन सहजी लिहिले जाते. बोकिलांच्या बाबतीत हेच झाले आहे.
त्यानंतर आलेल्या बोकिलांच्या ‘शाळा’ या कदंबरीने खरे तर थोडी निराशाच केली. प्र. नां संतांच्या धर्तीवर लिहिलेली ही कादंबरी वाईट नाही. पण बोकिलांच्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मला ती फिकी वाटली. दरम्यान बोकिलांनी इतरत्र, विशेषतः दिवाळी अंकांमधून जोरकसपणे लिखाण केले आहेच. आणि ताज्या ‘साप्ताहिक सकाळ’ (२४ जूनपर्यंचा आठवडा) मधील ज्या लेखामुळे मला हे लिहावेसे वाटले तो बोकिलांचा ‘जागतिकीकरणामुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण रोखायला आपापल्या भाषा सांभाळा‘ तो लेख तर आवर्जून वाचावा असा आहे.
एकतर जागतिकीकरणाला बोकिलांनी वापरलेला ‘सपाटीकरण’ हा शब्द मला फार आवडला.  जागतिकीकरणात प्रामुख्याने सगळे जग ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ असा विचार केला जातो. मग या बाजारपेठेत जर आपला माल विकायचा असेल तर तो शक्यतोवर एकसारखा, सपाट असावा. जगात लोकांच्या पोषाखापासून खाण्यापिण्याच्या पद्धतींपर्यंत सगळे कसे सारखे होत आहे याची बोकील काही मनोरंजक, पण विचार करायला लावणारी उदाहरणे देतात.  जगभर लोकांचे विचारही कसे एकसारखे होत आहेत यावरही ते प्रकाश टाकतात.

सपाटीकरणामध्ये विविधता हाच कसा मोठा अडथळा ठरतो आहे, याचे बोकिलांनी बरेच दाखले दिले आहेत. उदाहरणार्थ जागतिक बाजारपेठेत प्रामुख्याने गहू, मका, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो यांनाच मागणी आहे. त्यात कुळीथ, हुलगे, वरी, नाचणी, एवढेच नाही, तर ज्वारी-बाजरीलाही स्थान नाही‌. सपाटीकरणात सगळ्यांनी फक्त पॅन्ट, शर्ट, बूट घालावेत; धोतर, बंडी, लुंगी. फेटा यांना जागा नाही. सगळ्यांनी जल्लोष करायचा जगभर एकच दिवस – ३१ डिसेंबर. नागपंचमी, वसूबारस, बैलपोळा, ऋषीपंचमी, तुळशीचे लग्न हे सगळे सण बाद. ते मागासलेले, अंधश्रद्धाळू लोकांचे सण. आधुनिक जगात त्यांना स्थान नाही. भारत, ब्राझील अशा जैवसमृद्ध राष्ट्रांसाठी हा धोक्याचा इशारा मानला पाहिजे. पण सपाटीकरण हे अपरिहार्य असल्याने त्याला विरोध कण्यात उर्जा वाया न घालवता सपाटीकरणातही आपल्याला आपली स‌ंस्कृती शाबूत कशी ठेवता येईल यावर या लेखात विचार केला आहे. 
महत्वाचे म्हणजे सपाटीकरणाला विरोध म्हणून लोकांनी धोतर नेसणे सुरु करावे किंवा मुलांना सकाळसंध्याकाळ संध्या करायला लावावी यासारखे कोणतेही आततायी मार्ग बोकील सुचवत नाहीत. याउलट विविधतेने समृद्ध असलेल्या भारतासारख्या देशात, किंबहुना सगळ्या भारतियांनी – मग ते जगात कुठेही असोत – आपापल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करावे असा अतिशय सुजाण मार्ग त्यांनी सुचवला आहे.
‘मनोगत’ ची स्थापना आणि ‘मनोगत’ वर वेळोवेळी व्यक्त झालेले विचार यांच्या संदर्भात मला हा मर्ग फार महत्वाचा वाटतो. भाषचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी बोकिलांनी सुचवलेले उपाय काही फार नवीन नाहीत, पण या निमित्ताने ते अधोरेखित करावेसे वाटतात. सर्व ठिकाणी आपली भाषा हिरिरीने बोलणे, भाषेच्या सर्व बोली – मराठीचाच विचार केला तर वऱ्हाडी, अहिराणी दख्खनी, भिली, डांगी, मालवणी इ.- सांभाळणे, आपली भाषा नवनवीन बदलांना उघडी ठेवणे आणि आपल्या भाषेत दर्जेदार साहित्य निर्माण करणे असे हे काही उपाय आहेत. आपली भाषा जगली तर आपणही जगू, आपली संस्कृतीही जगेल हा विचार मला स्वप्नाळू नव्हे तर आशावादी वाटतो.
शेवटी बोकिलांच्या लेखातला मला आवडलेला एक उतारा. बोकिलांच्या या लेखाचे सारच या उताऱ्यात आले आहे असे म्हणता येईलः
‘आपण जे काही आहोत – राकट, कणखर, दगडांच्या देशांचे, ज्वारी बाजरीचे, बांगड्या सुरमईचे, ओव्या अभंगांचे, लावणी गौळणींचे, गाथा गीताईचे, श्यामच्या आईचे, मोटेवरच्या गाण्यांचे, शेतकऱ्याच्या आसूडाचे, बटाट्याच्या चाळीचे आणि बनगरवाडीचे – ते सगळे आपल्या भाषेमुळे आहोत’


ज्याच्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा ठेवता येतील असा हा लेखक आहे, असे मला वाटते.

शिर्डीचा समूहउन्माद

February 7, 2007

नगरहून कोपरगावला जाताना रहाता गाव ओलांडलं तशी शिर्डीची चाहूल लागू लागली.आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्मोठी हॉटेल्स , रिसॉर्टस, त्यातही त्यांची नावं अपेक्षेप्रमाणं साईलीला, साईरंग अशी. बाकीच्या देवस्थानांच्या मानानं ही भलतीच झकपक आणि पंचतारांकित.रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या परप्रांतातल्या नवीन गाड्या आणि त्यावरचे भलेमोठे फुलांचे हार.

शिर्डीचं बसस्थानक ओलांडून पुढं आले तसा शेजारी बसलेल्या राजेंनी हात जोडून , डोळे घट्ट मिटून नमस्कार केला. शिर्डी सोडून बरेच पुढे आलो तरी राजेंचे हात जोडलेले आणि डोळे मिटलेलेच होते.

संध्याकाळी परत येताना शिर्डीत थांबलो. सहा वाजताच्या आरतीचे व्हीआयपी पास मिळवण्याची राजेंनी व्यवस्था केली होती. असा पास (फुकट) मिळवण्यासाठी स्पेशल कॉन्टॅक्ट्स असावे लागतात असे राजे अभिमानानं म्हणाले. संस्थानाच्या काही लोकांनी असे पासेस बाहेर दोन्दोन हजार रुपयांना विकले आणि त्यांचं एक भलंमोठं रॅकेट पकडलं गेलं असे ते म्हणाले.

हॉटेलमधल्या बऱ्याचशा खोल्या आंध्र प्रदेशातून आलेल्या भक्तांनी भरलेल्या होत्या.त्यात दोन पाच वर्षांची काही लहान मुलंही होती. काही लहान मुलांच्या डोक्याचं पूर्ण मुंडन केलेलं होतं. डोक्याची आगाआग होत असल्यानं ती मुलं अखंड रडत होती. त्यांच्याबरोबरचे बाप्ये आणि बाया त्यांच्यावर हेंगाड्या भाषेत खेकसत होत्या. आंध्रातल्या लोकांनी हा काहीतरी नवीन चावटपणा सुरु केला आहे, असं राजे म्हणाले.

साडेपाच वाजता हॉटेलातून मंदिराकडे जायला निघालो. व्हीआयपी पासमुळं फक्त मंदिराच्या गाड्यांनाच प्रवेश असलेल्या राखीव प्रवेशद्वारातून आत गेलो. आतल्या बांधकामाच्या पाटीवर व्यवस्थापक मंडळीत अजित पवार असं एक नाव वाचून हे राजकारणी आता इथं पण का असं मी राजेंना विचारलं. तेंव्हा हे वेगळे आणि ते वेगळे असे राजे म्हणाले. या अजित पवारांनी देवस्थानाच्या विकासासाठी फार प्रयत्न केले, पण ते नंतर शिर्डीच्या राजकारणात पडले, आणि मग इथल्या लोकल मंडळींनी त्यांना सरळ केलं असंही त्यांनी सांगितलं. 

सहा वाजत आले तशी गर्दी वाढू लागली. ‘स्पेशल कॉन्टॅक्ट्स ‘ वापरून आलेल्या भक्तांचे कपडे आणि रुबाब बाकीच्यांपेक्षा वेगळाच दिसत होता. त्यातल्या मध्यमवयीन बायका टीव्ही सीरीयलसारखा संपूर्ण मेकअप करून आल्या होत्या. दोनतीन तरूण मुली तंग टी शर्टस आणि जीन्स घालून आल्या होत्या.रांगेतले लोक वळूनवळून त्यांचाकडं बघत होते. एका मुलीच्या टी शर्टवर ‘खरंतर तुम्हाला माझं तीव्र आकर्षण वाटत आहे, तर मग ते लपवता कशाला ‘ अशा आशयाचं इंग्रजीत लिहीलेलं होतं. पण तेही बाबांच्या संदर्भात असावं असं समजून मी गप्प राहिलो.तेवढ्यात राजे येऊन माझ्या कानात ‘लुक ऍट दोज बिचेस. दे हॅव कम फॉर द दर्शन ऑफ बाबा ऑर गिव्ह देअर दर्शन टू अदर बाबाज ‘ असं कुजबुजले.

मंदिराचं दार उघडलं तसे संगमरवरी पायरीवरून व्हीआयपी आत घुसले‌. स्टेनलेसस्टीलच्या जाड नळ्यांच्या रेलिंगचं छोटं गेट अजून बंदच होतं.तिथून पुढं संपूर्ण चांदीच्या पार्श्वभूमीवर बाबांची संगमरवरी मूर्ती दिसत होती. तेवढ्यात मागून जनता गेट उघडलं आणि प्रचंड पळापळ सुरु झाली. काही मिनिटातच पूर्ण मंडप भरून गेला.मंदिरातला धुपाचा वास, धूर, बाबांची चकचकीत मूर्ती, त्यांच्या डोक्यावरील सोन्याचा मुगुट, त्यावरचं सोन्याचं छत्र, क्लोज सर्किट टीव्हीमधून मागे दूरवर दिसणाऱ्या  बाबांच्या असंख्य प्रतिमा आणि प्लेअरवर वाजणारा एकसंध खर्जातला ओम साईनाथाय नमः असा जप यानं वातावरण एकदम संमोहित झाल्यासारखं झालं. तेवढ्यात भालदार चोपदारांसारखा गणवेश घातलेले आणि हातात चांदीचा मानदंड घेतलेले दोन पगडबंद बाबांच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिले. पेटी-तबला असा सरंजाम होताच. माइकसमोर येऊन एका तरतरीत चष्मावल्या पुजाऱ्यांनी सराईतपणे आता आरती सुरु होत आहे, सर्वांनी एकसाथ आरती म्हणावी, आरती चालू असताना फोटो काढू नयेत असं आळीपाळीनं मराठी व हिंदीतून सांगितलं. तेवढ्यात आमच्याही पुढं असलेलं एक अतिअतिविशिष्ट लोकांसाठीचं दार उघडलं आणि त्यातून चारपाच लोक आत घुसले. त्यात एक सिनेमानटासारखा दिसणारा लाल रंगाची जर्सी घातलेला तरुण होता. आपल्याला आरतीला उशीर झाला की काय या कल्पनेने तो घाबराघुबरा झाल्यासारखा वाटत होता.

तेवढ्यात आरती सुरु झालीच. माझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या झांजवाल्यानं इतक्या जोरात झांज वाजवायला सुरुवात केली की मी दचकलोच.बऱ्याच लोकांकडे आरतीचं छोटं पुस्तक होतं. पण लोकांना चालीचा अंदाज नसल्यानं ते थोडेथोडे चुकत होते. माझ्या समोरच्या लाल जर्सीवाल्यानं सिनेमातले भक्त देवापुढं गाणं म्हणताना जसे हात फैलावून धरतात तसे धरले होते. मधूनच तो कॅच पकडल्यासारखंही करत होता. माझ्या शेजारचा तुळतुळीत डोक्याचा तरुण आपल्या गालावर तौबा तौबा करताना मारून घेतात तसं सरळ आणि उलटं मारत होता.आरती संपून अचानकच ‘घालीन लोटांगण..’ सुरु झालं आणि लोक स्वतःभोवती फिरायला लागले. हात व डोळे जोडलेली असंख्य मानवी सिलींडर्स एखाद्या राक्षसी यंत्राच्या सुट्या भागांसारखी दिसत होती. नेमक्या किती गिरक्या घ्यायच्या याचा अदमास नसल्यानं काही लोक मध्येच थांबले होते. त्यांना शेजारच्याचं डोकं, कोपर लागल्यावर ते वैतागत होते.

आरती संपली आणि दहा कडव्यांचं एक साईस्तोत्र सुरु झालं. प्रत्येक कडव्याची सुरुवात पुसो न आम्हा अमुकतमुक अलाणाफलाणा न पुसो तरीपण साईनाथ आमच्यावर न रुसो अशी होती. त्यातल्या पुसो आणि रुसो या शब्दांची गंमत वाटून ते स्तोत्र मी पूर्ण बघीतलं. पुढेपुढे पुसो मधल्या गोष्टी संपल्यानं डसो – नसो – ठसो अशी जुळवाजुळव केली होती.

आता बराच वेळ झाला होता. मागं एक्दोन मुलं रडण्याचा आवाज येत होता. पगडबंद परत एकदा ललकारी दिली आणि बाबांचा मुगुट आणि चांदीचे दंड बंदोबस्तात आत पाठवले.मुगुट काढल्यावर आतल्या केशरी वस्त्रात बाबा अगदी घरगुती दिसू लागले. आता दर्शनाची लैन सुरु झाली. हिरवं वस्त्र पांघरलेल्या समाधीवर दोन्ही बाजूला हात टेकवून लोक डोकं, गाल समाधीवर घासत होते. लाल जर्सीवाल्यानं समाधीच्या दोन्ही बाजूला हात रोवून धरले आणि उभ्याउभ्या तो सूर्यनमस्कार घातल्यासारखं करू लागला. राजे त्या समाधीला आलिंगन दिल्यासारखे जे आडवे झाले ते उठेतनाच. मागचे लोक कुरकुर करू लागले तसे राजे नाइलाज झाल्यासारखे उठले , एखादं पाऊल पुढं आले आणि परत झटका आल्यासारखे समाधीवर जाऊन आडवे झाले. पुजाऱ्यानं त्यांना डोक्याला धरून उठवलं तसे ते नाइलाज झाल्यासारखे उठले.

आम्ही मंदिराच्या बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसलो. राजेंच्या चेहऱ्यावरून समाधान निथळत होतं. काही जाणवलं की नाही तुला, का नुसताच पुतळ्यासारखा उभा होतास? त्यांनी मला जाब विचारल्यासारखं विचारलं. काही नाही बुवा, मी म्हणालो. राजे एकदम चिडल्यासारखे झाले. चूक केली तुला इथं आणून, ते म्हणाले. हे बघा, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आहे हं काहीतरी असं मी म्हणू शकलो असतो, मी म्हणालो. पण तुम्ही मानता त्या पवित्र ठिकाणी खरं बोलणं जास्त योग्य आहे. राजे जास्तच वैतागल्यासारखे झाले. थोड्या वेळाच्या शांततेनंतर म्हणाले, कसे रे अश्रद्ध तुम्ही, घरात संध्याकाळी दिवा तरी लावता का देवासमोर? माझ्या घरात देवघर नाही हो, मी अपराधीपणानं म्हणालो. कर, एक देवघर, किमान एक फोटो लाव महाराजांचा, आणि दिवा लावत जा रोज संध्याकाळी त्याच्यासमोर. मग बघ तुला कसं शांत आणि समाधानी वाटेल ते. ते म्हणाले.

अहो, पण असलं काही न करताच मला शांत आणि समाधानी वाटतंय, मी म्हणालो.

बघ, मी म्हणालो नव्हतो का की तुला कसला तरी दृष्टांत होईलच म्हणून, राजे विजयी हसले.

मी गाडी सुरु केली. झांजेच्या आवाजानं एक कान बधीर झाला होता. मनाशी म्हणालो, दोन्ही कान बधीर झाले तरी चालेल, कानांच्या मधला भाग बधीर न होता शाबूत राहो, की वाचलो!