Archive for March, 2008

बॆंक ऑफ महाराष्ट्र, गुलबकावलीचे फूल आणि नानजकर

March 22, 2008

  प्रास्ताविक: ‘माणूस, बेडूक आणि उप्पीट्टम’ या थाटाची ही न-नवकथा वगैरे नाही.
एका सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाचे हे (प्रत्ययकारी वगैरे) चित्रण आहे.
 अगदी गुलबकावलीच्या फुलासकट यातली सर्व पात्रे व प्रसंग खरे आहेत. ते तसे न वाटल्यास ती लेखकाची आणि त्याच्या लेखनसामर्थ्याची मर्यादा समजावी.

झाले काय, की काही वर्षांपूर्वी मी एका खाजगी कंपनीत कामाला लागलो होतो. त्या काळाच्या मानाने पगार बेताचाच होता, पण भविष्यकाळ उज्वल आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. तो तसा फारसा उज्वल वगैरे निघाला नाही, पण तो मुद्दा नाही.

त्या कंपनीत वाईकर नावाचे एक गृहस्थ होते. फावल्या वेळात ते इन्शुरन्स एजन्सी, पब्लीक प्रॉव्हिडन्ड फंडाची एजन्सी असले बरेच व्यवसाय करत. पण माणसांना मरणाची आणि वहानधारकाला अपघाताची भीती घालून त्यांचा विमा उतरवणे हा त्यांचा आवडता जोडधंदा. माणूस वृत्तीने फेव्हिकॉल तयार करणाऱ्या कंपनीने जाहिरातीत मॉडेल म्हणून वापरावा, इतका चिकट. त्यांची ही ख्याती जगजाहीर असल्याने मे बरेच दिवस त्यांच्यापासून जपून होतो. पण कसले काय, एक दिवस त्यांनी मला त्यांच्या स्कूटरवरुन लिफ्ट दिली आणि त्या चारपाच किलोमिटरच्या प्रवासात एवढे काही ऐकवले की ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या न्यायाने मी त्यांच्याकडून पीपीएफ चे एक खाते उघडायला राजी झालो. ‘मला कुणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, पण ज्यांनी बेल्जियम सैनिकांनी वापरलेले संडास पाहिलेले नाहीत, त्यांना मी म्हणेन, की जगात तुम्ही काहीच पाहिलेलं नाही’ असं वुडहाऊसनं लिहिलेलं आहे. त्याच धर्तीवर ‘ज्यांना छळ म्हणजे काय हे माहिती नाही, त्यांना आजवर कधीही एखाद्या संध्याकाळी एखादा इन्श्युरन्स एजंट भेटायला आलेला नाही’ असंही कुणीतरी म्हटलेलं आहे. तर ते असो. वाईकरांनी उत्साहाने सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि मी ते खाते उघडले. नाही नाही म्हणता त्यात इतक्या वर्षांत काही रक्कम जमा झाली. दरम्यान मी ती नोकरीही सोडली आणि आता लहानसहान व्यवहारांसाठी मला बॆंक ऑफ महाराष्ट्रच्या त्या वाईकरांच्या घराशेजारच्या शाखेत, इतक्या दूर काही जायला जमेना. बरे, आता वाईकरांना भेटणेही अवघड झाले होते.  मग महत्प्रयासाने मी मीझे ते खाते माझ्या घराशेजारच्या शाखेत गेल्या वर्षी बदली करुन घेतले.

या महिन्यातली गोष्ट. सहज विचार आला, की या खात्यावर इतकी वर्षे आपले पैसे पडून आहेत, त्यातले काही काढता येतात का बघू.  ’आजच्या तारखेपासून पाच वर्षे आधी पीपीएफच्या खात्यावर जितकी रक्कम असेल, त्यातली निम्मी काढता येते’ वाईकरांची सूचना आठवली.

बँकेत गेलो. प्रचंड गर्दी होती. ‘पीपीएफ’ असे काही कुठल्या खिडकीवर लिहिलेले नव्हते. अंदाजाने ‘डिपॉझिटस’ असे लिहिलेल्या खिडकीसमोरील एका रांगेत उभा राहिलो. पाचदहा मिनिटांनी खिडकीतून माझे पासबुक आत सरकवले. आतल्या सज्जनांना माझी इच्छा सांगितली. त्यांनी समोरच्या संगणकावर काहीसे केले आणि स्वत:शीच नकारार्थी मान हलवली. अशा प्राथमिक प्रतिक्रियांना मी आता भीत नाही. कुठलीही बॆंक, सरकारी कार्यालये इथे पहिली प्रतिक्रिया अशी नकारार्थीच असते. आपल्याला जे करायचे आहे, ते कसे करता येणार नाही, हे अशा कार्यालयात गेल्यागेल्या आधी समजून घ्यायचे असते.
“नाही…”
“काय?”
“नाही…”
“काय नाही?”
“पैसे नाही काढता येणार तुम्हाला”
“का?”
“अहो, अकाऊंट उघडून पाच वर्षं व्हायला लागतात…”
“मग झाली की पाच वर्षं. एकोणनव्वद सालचं आहे अकाउंट..”
“इथं तर गेल्या वर्षीची एन्ट्री आहे..”
“अहो, ती ट्रान्स्फर आहे, हे बघा, आधीचं पासबुक..”  
“बघू”
सज्जनांनी ते पासबुक बघीतले. त्यांची मुद्रा चिंताग्रस्त झाली. त्यांनी परत त्या संगणकाची थोडी मनधरणी केली.
 दरम्यान रांगेत माझ्या मागे थोडी चुळबूळ सुरु झाली होती.
“गेल्या वर्षी अकाउंट उघडलंय, असं म्हणतोय तो…”
“कोण तो?”
“कॉम्प्युटर..”
“अहो कमाल करताय तुम्ही! मी अकाऊंट उघडलंय, तुम्हाला पासबुक दाखवतोय, कॉम्प्युटरचा काय संबंध इथे?”
“अहो, तो तसा प्रोग्रॅम फीड केलेला असतो… एक मिनिट हं..”
मग सज्जन उठून मॅनेजर बाईंच्या टेबलाशी गेले. बाई कामात होत्या. आता मागच्या रांगेचे प्रेशर जाणवून मी जरा अस्वस्थ झालो होतो.
 तेवढयात मागच्या गृहस्थांनी खांद्यावर टकटक केले.
“पीपीएफ मधून पैसे काढताय का?”
“हो..” आता पीपीएफ मधून स्वत:चे पैसे काढणे ही काहीतरी अनैतिक गोष्ट असल्यासारखे मला वाटू लागले होते.
“माझं ऐका, नका काढू..”
“आं?”
“ओन्ली ऍन ऍडव्हाईस. पण पीपीएफ एवढी सेफ इन्व्हेस्टमेंट नाही दुसरीकडे कुठे. शेअर मार्केट तुम्ही बघताच आहात…”
मी खरंतर मॅनेजर बाईंच्या टेबलाशी उभे असलेल्या त्या सज्जनांकडे बघत होतो. खांद्यावर पुन्हा टकटक झाली.
“माझं एक ऐका..”
आता हा माणूस “चार घास खाऊन घ्या…” असं म्हणतो की काय असं मला वाटलं
“काय?”
“तुमचं एक अकाउंट आता मॅच्युअर झालंच आहे, आता दुसरं एक उघडा. वाटल्यास मुलाच्या नावे उघडा. हे माझं कार्ड. कुठे राहता आपण?”
‘इट इज नन ऑफ युवर बिझनेस’ हे वाक्य मराठीत कसे म्हणावे या विचारात माझे अर्धे मिनिट गेले. तेवढ्यात मॅनेजर बाईंच्या टेबलाशी उभ्या असलेल्या सज्जनांनी अंगविक्षेप करून मला तिकडे बोलावून घेतले.
“गुड मॉर्निंग मॅडम” कधीकधी माझ्या अंगात स्त्रीदाक्षिण्य संचारते. बाईही दिसायला जरा… असो.
गुड मॉर्निंग. बसा. राणे, काय प्रॉब्लेम आहे यांचा?”
मग राणेंनी परत एकदा साधुवाण्याची कथा सांगितली. दरम्यान माझी अवस्था ‘रुपया नही तो डॉलर दे दे, कमीज नही तो कमीजका कॉलर दे दे’ अशी झालेली. बाईंनी आता त्यांच्या संगणकावर काहीतरी केले. दरम्यान राणे ‘तळ्यात-मळ्यात’ अशा अवस्थेत घुटमळत होते. पाचसात मिनिटे गेली.
“गेल्या वर्षीपर्यंत पद्मावती शाखेत खातं होतं ना तुमचं?”
“होय.”
“मग इकडे का ट्रान्स्फर केलं तुम्ही?”
“चूक झाली हो. खरं तर मी ते नाशिकला ट्रान्स्फर करायला पाहिजे होतं, म्हणजे मला अधिक गैरसोयीचं झालं असतं..”
“हे बघा, कुजकटपणा करण्याचं कारण नाही. ट्रान्स्फर म्हणाजे नवं खातं उघडल्यासारखंच असं म्हणतोय तो…”
“हे बघा बाई…” मी म्हणालो. अधिकारी महिलावर्गासमोर अगतिकतायुक्त संताप व्यक्त करायचा असेल तर हे संबोधन वापरावे. तसे करत असताना नाना पाटेकरसारखे चष्म्याच्या काचेवरून सदर महिलेकडे बघता आले तर फारच उत्तम. “हा कोण जो तुमचा तो आहे, मला माहिती नाही. तो माझ्या खात्यावरचे व्यवहार का कंट्रोल करतो आहे, मला कल्पना नाही. मला एकच सांगा, माझ्यासारख्या गरीबाला माझे स्वतःचे पैसे माझ्याच खात्यातून काढता येतील अशी काही तरतूद तुमच्या बँकेत आहे का?”
“खातं बंद करणार का तुम्ही?
“तसं करता येईल का?”
 यावर बाई ‘त्याला विचारावं लागेल’ असं म्हणतायत काय अशी मला शंका आली. पण सुदैवाने त्या “हो, त्यात काय, सात नंबर खिडकीतून फॉर्म घ्या” म्हणाल्या. आपल्याला आपले खाते बंद करता येते या आनंदात मी सात नंबरच्या खिडकीसमोर बारी लावली. माणूस कसा अल्पसंतुष्ट होत जातो पहा. माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला हिमालयातल्या एखाद्या भव्य सुळक्यावर न्यावे. ते अवघड असेल तर एखाद्या सरकारी कार्यालयात न्यावे. सगळा नक्षा उतरतो. दहा मिनिटांनंतर तो खास सरकारी रंगाचा फॉर्म हाती मिळाला. त्याच्या तळाला एक अतिसूक्ष्म आकाराचा चौकोन होता आणि त्यात ‘अफिक्स रेव्हेन्यू स्टँप हिअर’ असे लिहिलेले होते. रेव्हेन्यू स्टँप आणि पासपोर्ट साईज फोटो लावायचे चौकोन त्या त्या आकाराचे  का असत नाहीत कुणास ठाऊक. मी चपळाईने खिडकीतून एक रुपयाचे नाणे सरकावले.
“नाही, फॉर्मचे काही पैसे नाहीत”
“हो, ते माहिती आहे मला..”
“मग?” मी त्यांना एक रुपयाची लाच देतो आहे की काय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
“अहो, रेव्हेन्यू स्टँप..”
“तो इथं नाही मिळत.”
“मग कुठे मिळतो?”
“मला काय माहीत हो? मॅनेजरांना विचारा.”
चला, परत बाईंकडे. आता फॉर्म न भरता का चौकशीला आला म्हणून बाई परत खवळायला नकोत म्हणून आधी फॉर्म भरला, त्यावर ‘फायनल विद्ड्रॉल’ असं लिहिलं आणि परत मॅनेजर बाईंकडे आलो.
“हं. झालं? त्यावर फायनल विद्ड्रॉल असं.. हं, लिहिलंय नाही का तुम्ही.. आता त्यावर रेव्हेन्यू स्टँप लावून सही करा आणि पासबुक आणि तो फॉर्म राणेंकडं द्या. दोनतीन दिवसांत तुम्हाला पे ऑर्डर मिळेल..” 
“बाई..” माझी परत चष्म्यावरुन नजर. “आता तो रेव्हेन्यू स्टँप तेवढा कुठं मिळेल ते सांगा की..”
“इथं नाही बाई मिळत..”
बाई आता ‘इश्श’ म्हणून एखादा मुरका मारतात की काय  या शंकेने मी कसासाच झालो.
“अहो, मग कुठं मिळेल ते सांगा”
“असं करा, पोस्टात विचारा, नाहीतर स्टँप व्हेंडरकडे नक्की मिळेल”
माझ्या माहितीतला स्टँप व्हेंडर तिथून दोन किलोमिटरवर आहे. त्यापेक्षा पोस्ट जवळ म्हणून मी पोस्टात चालत निघालो. आता ऊन मी म्हणायला लागलं होतं. धापा टाकत मी पोस्टातल्या तिकिटांच्या खिडकीशी आलो आणि ठळक अक्षरात लिहिलेली ‘रेव्हेन्यू स्टँप शिल्लक नाहीत’ ही पाटी दिसली.
आमच्या पोस्टातल्या बाई अतिशय शांत स्वभावाच्या आहेत. माणसं कितीही गाढवासारखी वागली तरी त्या बिचाऱ्या आपला पारा चढू देत नाहीत. हे माहिती असल्यानं मी रांगेत उभा राहिलो आणि माझा नंबर आल्यावर स्पष्ट आवाजात एकेक शब्द तोडून म्हणालो,

“रेव्हेन्यू   स्टँप   कधी   येणार   आहेत?”

“काही सांगता येणार नाही हो…”
“????????”
“बहुदा नाही येणार…”
“आं?”
“अहो, त्याचं काय आहे, पूर्वी त्यावर पोस्टाला जे कमीशन मिळायचं ना, ते हल्ली देत नाहीत. म्हणून आम्ही नाही ठेवत रेव्हेन्यू स्टँप.”
‘पब्लीकला साला असाच ठेचून काढला पाहिजे’ हा विचार गिळत मी म्हणालो,
“मग…?”
“ट्रेझरीत मिळतील बघा. नाहीतर एखाद्या स्टंप व्हेंडरकडे असतील.”

‘काय सांगताय? खरंच असतील का हो? आणि कदाचित मला मिळेलसुद्धा एखादा, नाही का? तुम्हाला काय वाटतं?’ हा आपला आत्मसंवाद.

हताशपणानं घराकडे चालत येत असताना मला अचानक मुक्याची आठवण झाली. मुक्या म्हणजे मुकुंद रानडे. आमचा मित्र. तो ट्रेझरीजवळच्याच एका बँकेत नोकरीला आहे. वाटलं, कुणी सांगावं, त्याच्या बँकेत असेलही एखादा गुप्त रेव्हेन्यू स्टँप. नसलाच तर ट्रेझरी जवळच आहे त्याच्या बँकेच्या. येताना घेऊन ये म्हणून सांगू पाचदहा. त्याचा फोन फिरवला. ‘हात्तीच्या, लगेचच आणतो आणि संध्याकाळी टाकतो तुझ्याकडं’ मुक्या आत्मविश्वासानं म्हणाला. अर्धाएक तास गेला आणि फोन वाजला. मुक्याच होता.

“अण्णा….”  मुक्या म्हणाला. “मी ट्रेझरीतूनच बोलतोय..”
“बोल”
“रेव्हेन्यू स्टँप आहेत इथं.”
“काय सांगतोस! है शाब्बास..”
“पण ते सुट्टे मिळत नाहीत म्हणे”
“??????”
“किमान एक हजार घ्यायला लागतील म्हणतायत.”
“हा….हा… हजार?”
“होय, एक हजार. काय करु?”
“…….”
“अरे बोल की”
“अरे काय करू काय….मुक्या, मोबाईल डाव्या हातात धरला असशील ना?”
“हो, का?”
“एक काम कर, उजव्या हातानं तुझ्यासमोर जो कोणी असेल त्याच्यासमोर स्वतःला एक खाडकन थोबाडीत मारून घे. कारणबिरण काही विचारू नकोस. संध्याकाळी मी भेटलो की मलापण एक हाण, म्हणजे फिटाफिट”

संध्याकाळी मुक्या काही भेटला नाही पण नानजकर भेटला. नानजकर हाही इन्शुरन्स एजंटच, पण दोस्तांमधला असल्यामुळे अगदी प्राणघातक वगैरे नाही. मनाच्या चिरफाळलेल्या अवस्थेत मी नानजकरला ही सगळी कथा सांगितली आणि म्हणालो, “जग कसं आहे बघ नान्या, एक रुपयाच्या टिनपाट स्टँपसाठी माझा अर्धा दिवस वाया गेला. शिवाय काम झालं नाही ते नाहीच आणि वरतून मनस्ताप…”
“मूर्ख आहेस.” नान्याने धृपद म्हटले.
“आता या वेळी का, ते तेवढं सांग..”
“अरे, मला फोन करायचा.”
“का? पोस्टमास्टर जनरल तुझा सासरा आहे वाटतं? आणि तुला फोन करून काय करायचं?”
“म्हणायचं की मला असा असा रेव्हेन्यू स्टंप पाहिजे आहे…”
“मग तू काय केलं असतंस?”
“मी असा खिशात हात घातला असता, असं पाकीट बाहेर काढलं असतं, असा त्यातनं तो स्टँप काढला असता, आणि असा तुझ्यासमोर टाकला असता..”

असं म्हणून नानजकरनं तो लाखमोलाचा रेव्हेन्यू स्टँप माझ्यासमोर टाकला!

धुक्यातून उलगडणारे जी ए -२

March 8, 2008

लेखनाची सुरुवात – सोनपावले

जी.एं. च्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कथा, अनुवाद आणि इतर साहित्यप्रकारांचे एक बाड जी.एं च्या भगिनी प्रभावती सोलापूरकर यांना मिळाले. त्यातल्या काही साहित्याचे परचुरे प्रकाशन मंदिराने ‘सोनपावले’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.  हे तसे जुनेच पुस्तक ( ११ डिसेंबर १९९१). सु.रा. चुनेकर यांनी संपादन केलेल्या या पुस्तकात जी.एं. च्या लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातल्या प्रयोगांचे चित्र दिसते. अगदी सुरुवातीला शालेय जीवनातले जी.एं. चे लेखन ‘ओळखा पाहू’, कोडी या स्वरुपाचे आहे. त्यानंतरच्या जी.एं. च्या स्वतंत्र कथालेखनाच्या पहिल्यापहिल्या प्रयत्नांवर   त्या काळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांची, विशेषतः खांडेकरांची मोठी छाप आहे. जी.ए. आणि खांडेकर हे गणित आज ऐकायलाही विचित्र वाटत असले तरी खांडेकरांमुळे जी.ए. त्यांच्या तरुणपणी प्रभावित झाले होते हे निश्चित. ‘बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे’, ‘पंतांना वाटले, या दुसऱ्या बाळपणात सुगंध, पाकळ्या, रंग वगैरे सर्व जातात, फक्त काटे मात्र वाटणीला उरतात!, अश्रू जरी डोळ्यांवाटे बाहेर पडत असले तरी त्यांचे उगमस्थान हृदयच आहे’ असली आज हास्यास्पद वाटणारी वाक्ये जी.एं. या त्या वेळच्या कथांमध्ये सर्रास दिसून येतात, हे आज काहीसे गमतीशीर वाटते. नंतरच्या काळात बाकी जी.एं. ना खांडेकरांच्या आदर्शवादी विचारांतला पोकळपणा कळालेला दिसतो. (स्वतः खांडेकरांना तो कळाला की नाही कुणास ठाऊक!) पण एकाच विचाराची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केलेला लेखक म्हणून जी.एं. ना खांडेकरांविषयी आदर वाटत आला होता. जी.एं. ची खांडेकरांशी प्रत्यक्ष भेट कधी झाली होती असे दिसत नाही, पण खांडेकरांबरोबर त्यांचा पत्रव्यवहार होता. खांडेकर दत्तक जाण्यापूर्वी त्यांचे नाव गणेश आत्माराम खांडेकर की असे काहीसे होते आणि म्हणून त्यांच्या व जी.एं. च्या नावाची आद्याक्षरे एकच -GAK- हे कळाल्यावर आपल्याला एक शाळकरी आनंद झाला होता, असे पुढे कधीतरी जी.एं. नी एका पत्रात लिहिले आहे.

१९४० - ४२ च्या सुमारास सुरू झालेले जी.ए. चे लेखन त्यांच्या त्या वेळच्या वयानुरुप शालेय व अगदी बाळबोध आहे. मात्र वयाच्या पंचविशीपर्यंत (१९४८) जी.एं. चे वाचन – विशेषतः इंग्रजी साहित्याचे वाचन- प्रगल्भ होऊ लागले होते, हे त्यांनी केलेल्या मॉमच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेच्या भाषांतरातून जाणवते. याच काळात जी.एं. नी अनेक इंग्रजी कथांचे उत्तमोत्तम अनुवाद केले आहेत. यातल्या बऱ्याच कथा ओ. हेन्रीच्या किंवा चेकॉव्हच्या कथांप्रमाणे पिरगाळून टाकणाऱ्या शेवटाच्या – ‘ट्विस्ट इन द टेल’ या स्वरुपाच्या आहेत. घोडागाडीवाला आणि त्याचा मरण पावलेला मुलगा – म्हणजे एकंदरीत माणसाचे एकटेपण या चेकॉव्हच्या कथेच्या जवळपास जाणारी ‘भागीदार’ नावाची एक कथा जी.एं. नी या काळात लिहिली आहे. गंमत म्हणजे -गंमत कसली म्हणा,- याच काळात जी.एं नी त्या प्रसिद्ध कथेचा ‘भुर्र’ या नावाने एक उत्तम अनुवादही केला आहे. त्याचाच काळजाला हात घालणारा शेवट इथे देण्याचा मोह आवरत नाहीः
“ए बेट्या, झोपलास की काय?” आयोना घोड्याला म्हणतो, “बराय, बराय, झोप. आज पोटापुरतंदेखील मिळवलं नाही. आपण दोघेही गवत खाऊन राहू. गाडी हाकायचं कामच होत नाही रे आता माझ्या हातून! माझा मुलगा कसा, एक नंबर घोडा हाकीत असे. आज असायला हवा होता रे तो-”
घोड्याच्या काचेसारख्या दिसणाऱ्या डोळ्यांकडे पाहात तो क्षणभर थांबतो.
“हं, काय समजलं? माझा पोरगा मेला. या जगात जगायला आम्हाला टाकलं आणि आपण उडाला भुर्र. आता समज, तुलाच एक शिंगरू असतं, आणि जर ते तुला एक दिवस असंच सोडून गेलं असतं, तर तुलाही फार वाईट वाटलं असतं, नाही?”
घोड्याचे तोंड हलविणे चालूच राहतो. तो मध्येच वाकडी मान करतो व आयोनाचा हात हुंगतो.
इतका वेळ त्या मुठीएवढ्या जागी दडपून ठेवलेल्या भावना एकदम उचंबळतात. सारे बांध त्यांच्यापुढे पार वाहून जातात व त्या अमर्याद पसरतात.
घोड्याच्या तोंडावरुन हात फिरवीत हलक्या आवाजात आयोना त्याला अगदी पहिल्यापासून सारी हकीकत सांगू लागतो.
 

या काळात जी.एं. नी लिहिलेल्या बऱ्याच कथा त्यांच्या इतर कथांप्रमाणेच शोकपर्यावसायी आहेत. या वेळेपर्यंत जी.एं. च्या खाजगी आयुष्यात ‘पुरेसे’ दुःख पसरलेले होतेच. यातील काही कथा तर गूढ- रहस्य या सदरात मोडतील अशा आहेत. मानवी नात्यांचा अनाकलनीय ताण, पीळ आणि परिस्थिती, नियती, नशीब, काहीही म्हणा – त्याच्या हातातले बाहुले होऊन आयुष्य कंठण्याची वेळ आलेली माणसे ही जी.एं ची लाडकी पात्रे या कथांमधून पुन्हा पुन्हा डोकावतात. पण एकंदरीतच ही शैली काहीशी विस्कटलेली, गोंधळलेली वाटते. अनुवाद म्हणून या कथा उत्तम आहेत, पण यांबाबत जी.ए. स्वतः समाधानी असतील असे वाटत नाही. किंबहुना इंग्रजी वाङ्मयातील उत्तम कथा आणि स्वतःच्या कल्पना यातले जी.एं. चे चाचपडणे या काळात चालले असावे. यातल्या कथांच्या शेवटी ‘आधारित’ किंवा ‘इंग्रजीवरुन’ असे लिहिलेले आहे, पण त्या कथा मूळ कोणत्या आणि कोणाच्या  कथांवर आधारित आहेत हे कळाले असते, तर बरे झाले असते. लेखक म्हणून स्वतःचाच सुरू झालेला हा शोध जी.एं. च्या अखेरपर्यंत सुरुच होता. आपल्या लिखाणाबाबतचे हे असमाधान जी.एं. च्या आयुष्यात उत्तरोत्तर वाढतच गेले. पण त्याविषयी पुढे कधी तरी.

 

१९५५ मध्ये ‘मौज’ च्या अंकात त्यांनी ‘अनाकलनीयाचे आकर्षण’ हे ‘आणखी एक वासुकी’ या टोपणनावाने लिहिलेले पत्र जी.एं. च्या विकसित होणाऱ्या शैलीवर प्रकाश टाकते. जी.एं. च्या सार्वजनिक लिखाणात फारशी दिसत नसली तरी खाजगी लेखनात त्यांनी काही काही वेळा इतर लेखक, टीकाकार वगैरेंवर अगदी जहाल, विषारी शब्दांत टीका केली आहे. अगदी – आणि विशेषतः, संतवाङ्मयही यातून सुटलेले नाही. जी.एं. ची शब्दकळा इतकी प्रभावी की एखाद्याची साल काढायची म्हटली की त्याला अगदी रक्तबंबाळ केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. त्याचीच बीजे या पत्रात आढळतात. मर्ढेकरांच्या कवितांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या या पत्रात त्यांनी काव्य हे कायम अर्थपूर्णच असले पाहिजे असे म्हणणाऱ्यांवर तिरकस शेरे मारले आहेत. ते म्हणतात, ‘अर्थासाठी तळमळणाऱ्या लोकांसाठी मामलेदाराच्या स्वागतासाठी शाळामास्तरांनी लिहिलेल्या स्वागतगीतांची एक सस्ती आणि घरेलू आवृत्ती कोणी अर्थवाला प्रकाशक प्रसिद्ध करील काय?’

बालकवी आणि गडकरी यांचे काव्य यांचा जी.एं. वर काहीसा अनाकलनीय प्रभाव होता. त्या मानाने त्यांच्या मनोवृत्तीच्या जवळ जाणारे मर्ढेकर बाकी त्यांना फारसे जवळचे वाटले नाहीत. (वर उल्लेख केलेले पत्र सोडले तर जी.एं. नी मर्ढेकरांच्या समर्थनार्थ फारसे काही लिहिलेले नाही. पु. शि. रेगे हा तर आपल्या आयुष्यातला एक ‘ब्लाइंड स्पॉट’ राहिलेला आहे, असे ते लिहितात) पुढील आयुष्यात त्यांनी ग्रेसच्या कवितांचा गौरवाने उल्लेख केला आहे. आणखीही काही कवी जी.एं. ना आवडत. इतर म्युनसिपालटी कवी  त्यांनी घाऊकपणे झिडकारून टाकले आहेत. याच पत्रात जी.एं. नी ‘अन्वयार्थच सांगायचा तर त्यासाठी एखादा कवीच कशाला खर्ची घालायला पाहिजे? गिरीश आणि काव्यविहारी देखील ते काम करू शकतील’ असा एक झणझणीत फटका मारला आहे. काव्य म्हटल्यावर त्यात ‘ग्रेट युनिव्हर्सल थीम्स’ आल्या पाहिजेत असे म्हणणाऱ्या लोकांसाठी ते लिहितात, आणि ते ग्रेट युनिव्हर्सल थीम्स म्हणजे तरी काय? या शब्दांचा शब्दशः अर्थ घेतला तर जन्म आणि मृत्यू हे दोनच विषय युनिव्हर्सल ठरतात. या निकषाने मग बेळगावच्या म्युनसिपालटीतील जननमरणाचे दप्तर जगातील महाप्रचंड महाकाव्य ठरायचे! या ठिकाणी परसात वाती वळत बसलेल्या आजीबाईपासून उजदारी गटारात खेळणाऱ्या बाब्या आणि बेबीपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन जे वाचावे ते साहित्य अशी कोणी तरी केलेली सोज्वळ, बोटचेपी व भोंगळ व्याख्या मला आठवते. काव्य किंवा कला म्हणजे साऱ्यांच्या जीवनात हजर असलेल्या भावनांचा लघुतम साधारण विभाज्य नव्हे.’

जी.एं.चे हे विचार पुढे आयुष्यभर त्यांनी बाळगलेल्या लेखक आणि लेखनाविषयीच्या सगळ्या श्रद्धांवर प्रकाश टाकून जातात, असे मला वाटते. पण अशा प्रकारचे जाहीर वाद- प्रतिवाद यात जी.ए. अजिबातच  अडकलेले दिसत नाहीत. (पु. लं किंवा दळवी यांची या संदर्भात आठवण येते) याच काळात जी.एं. नी समाजातल्या ढोंगीपणावर आणि दुटप्पीपणावर वक्रोक्तिपूर्ण आणि विनोदी असेही काही लिहिले आहे. ‘मारून मुटकून पुरोगामी’ ही जी.एं. ची नाटिका अशीच. तिच्याविषयी आणि इतर काही वेगळ्या लेखनाविषयी पुढील लेखात…

धुक्यातून उलगडणारे जी ए -१

March 8, 2008

थोडेसे प्रास्ताविक:
११ डिसेंबर हा जी.ए. कुलकर्णींचा विसावा स्मृतिदिन. अशा प्रकारच्या लेखाची सुरुवात साधारणतः ‘मराठी कथाविश्वावर आपल्या लिखाणाचे लालजर्द स्वस्तिकचिन्ह उमटवून अचानक अंधारात विरून गेलेल्या ज्येष्ठ कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृतीला अनेकानेक वंदन करून..’ वगैरे अशा घसाभरू वाक्याने करण्याचा शिरस्ता आहे. या सगळ्या प्रकाराचा जी. एं. ना विलक्षण तिटकारा होता. लेखक हा फक्त त्याच्या लिखाणातून बघावा, त्यापलीकडे तो एक सर्वसाधारण माणूस असतो, त्यामुळे ‘Writing, Not the writer’ हे वाक्य जी. एं. च्या वैयक्तिक आणि खाजगी लिखाणात अनेक वेळा येते. पण इतके वस्तुनिष्ठ राहणे विशेषतः मराठी माणसाला परवडत नाही. जरा कुणी कुठे काहीसे बरे केले की कधी एकदा आपण त्याला देव करून टाकतो, असे त्याला होऊन जाते. पण ते असो. तर या निमित्ताने जी. एं चे काही तसे अनोळखी लिखाण आणि त्यांनी केलेला उदंड पत्रव्यवहार यातून या कोड्यासारख्या माणसाची लेखक म्हणून काहीशी नवी ओळख करून घेता येते हे पाहावे हा या प्रस्तावित लेखमालिकेचा उद्देश आहे.
हे करत असताना मनात पहिली भावना आहे ती अपराधीपणाची. आपल्या लिखाणाची आणि त्यातूनही आयुष्यभर जपलेल्या आपल्या खाजगी आयुष्याची अशी चिरफाड – चिरफाडच, त्याला रसग्रहण वगैरे म्हणणे योग्य नाही – जी. एं. ना अजिबात रुचले नसते. इंग्रजी लेखकांच्या मृत्यूनंतर त्यांचा पत्रव्यवहार प्रकाशित करण्याची पद्धत आहे. इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास – व्यासंगच- असणाऱ्या जी.एं. ना हे माहीत नसणे शक्यच नाही. तरीही त्यांनी आपण लिहिलेल्या बऱ्याच पत्रांत ‘हे अगदी घरगुती आणि खाजगी आहे, चुकूनही यातला एकही शब्द बाहेर जाऊ देऊ नका’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या काही पत्रांतले काही उल्लेख अस्वस्थ करणारे, क्वचित त्यांच्या आपल्या मनातल्या प्रतिमेला छेद देणारेही आहेत. मग हे सगळे कशाला करायचे? आधीच असंख्य पूर्वग्रह आणि गैरसमजांच्या जाळ्यात गुरफटलेल्या या दिवंगत साहित्यिकाचे असे विच्छेदन कशासाठी?

एकतर या सगळ्या चिल्लर- खुर्दा गोष्टींपलीकडे जाऊन एक लेखक आणि एक विचार करणारा अभ्यासू माणूस म्हणून जी.एं. नी कायकाय मिळवले होते – आणि त्याचे प्रदर्शन न मांडता ते स्वतःबरोबरच संपवून टाकले होते – हे समजून घेणे त्यांच्या लिखाणाचा एक चाहता म्हणून मला अतिशय रंजक वाटते. दुसरे असे की ‘चमत्कारिक, विक्षिप्त, माणूसघाणा’ म्हणून बदनाम झालेला हा माणूस खरा कसा होता – किंवा तो जसा बदनाम झाला तसा असला तरी तसा तो का होता याचा काहीसा उलगडा आता होतो आहे असे वाटते. अलौकिक प्रतिभावान आणि वेडसरपणा यातली सीमा अगदी धुरकट असते असे म्हणतात. आसपासच्या बुटक्या, खुज्या लोकांमध्ये वावरताना जी.एं. ना किती गुदमरल्यासारखे होत असेल याची कल्पना – फक्त कल्पनाच – करता येते. ‘बाजीचा-ए-अतफाल’ म्हणणाऱ्या गालिबसारखीच जी.एं. ची मानसिकता कशी आणि का झाली हे कळू लागते. शेवटी खांडेकरी बोधकथा ते ‘माणसे- अरभाट आणि चिल्लर’ पर्यंतचा जी.एं.चा लेखनप्रवास, एक जबरदस्त वाचक म्हणून त्यांच्यावर जगातील विविध भाषांतील लेखकांचा प्रभाव आणि यात आपले लिखाण कुठेतरी अगदी पायपुसण्यासारखे आहे अशी एक निराशेची, अतृप्ततेची त्यांची भावना अशी त्यांच्या प्रतिभेची विलक्षण गरुडझेप ध्यानात येते.

हा सगळा अभ्यासाचा – वैयक्तिक आवडीचा – कदाचित थोडासा कंटाळवाणा भाग झाला. याबरोबर जी.एं. चे नवीन लिखाण वाचताना परत त्यांची ती देदीप्यमान भाषाशैली, त्यांचा तिरकस पण निर्विष विनोद आणि मराठी (आणि इंग्रजीही) साहित्याच्या तथाकथित केंद्रबिंदूंपासून इतके दूर दडून बसूनही बारीकसारीक गोष्टींची नोंद घेण्याची आणि त्यांची संगती लावण्याची त्यांची क्षमता हे सगळे नव्याने ध्यानात येते.

असामान्य बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता यापुढे विनम्र होणे आता काळाशी सुसंगत आहे की नाही, कुणास ठाऊक! जी.ए. वरील लिखाणाच्या निमित्ताने समाजाच्या एका तुकड्याला हे तपासून पाहता आले, तरी या प्रस्तावित लिखाणाचा हेतू सफल होईल, असे वाटते.

का कल्लोळ कल्लोळ-देवराई

March 5, 2008

माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. मनाचे व्यापार, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. मानसिक रोगांचीही तीच कथा आहे. मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांची कारणे आणि नेमके उपचार याबाबतचे माणसाचे ज्ञान मर्यादितच आहे. मनोरुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही फारसा बदललेला नाही. भारतात तर नाहीच नाही.

स्किझोफ्रेनिया किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व हा असाच एक गंभीर मानसिक आजार. ‘देवराई’ मधला शेष देसाईला हा आजार झाला  आहे. मुळातच काहीसा एककल्ली, आत्ममग्न, सतत कसला ना कसला विचार करत राहणारा, पण अतिशय बुद्धीमान असा हा शेष हळूहळू जास्तजास्त चिडचिडा, तापट होत गेला आहे. त्याचे वडील लहानपणीच गेलेले, आई आणि धाकटी बहीण सीना, एवढेच त्यांचे कुटुंब. पण शेषची खरी जवळीक आहे ती कल्याणीशी. कल्याणी शेष आणि सीनाची मामेबहीण. तिची आई गेल्यावर ती तिच्या आत्याकडे, शेष आणि सीनाच्या आईकडेच वाढली आहे. कल्याणी, शेष आणि सीना यांचे बालपण कोकणातल्या त्या गावात मोठ्या मजेत गेले आहे. गावाजवळ देवराई आहे. देवराई म्हणजे सेक्रेड ग्रोव्ह – देवाच्या नावाने वाढलेले, वाढवलेले जंगल. ते तोडायचे नसते. लहानपणापासून शेषला देवराईचे वेड आहे.त्यातच वाडीवर काम करणाऱ्या पार्वतीमध्येही शेषची काही चमत्कारिक भावनिक गुंतवणूक झाली आहे, पण पार्वतीचे गावातल्यच शंभूशी लग्न झाले आणि शेषचे सगळे बिनसायला सुरुवात झाली. शंभू दिसायला दांडगा, पार्वती एवढीशी, नाजूक. शेषचा विक्षिप्तपणा वाढतच गेला. त्यातच परिस्थितीने असे काही चमत्कारिक वळण घेतले की कल्याणीला ताबडतोब तिथून निघून जावे लागले. सीनाचेही लग्न झाले. मुळात एकांडा असलेला शेष आता पार एकाकी झाला. त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले होते. त्याला जे मनापासून करायचे होते, ते देवराईवरचे संशोधन तसेच राहिले. लग्न वगैरे झाले नाहीच. मुळात अतिशय बुद्धीमान असलेलेया शेषच्या आयुष्याची अशी वाताहात झाली. त्याच्या मनात विचारांचा, कल्पनांचा एक भलामोठा गुंता झाला. त्याच्या मनातल्या दोन हळव्या बिंदूंची – पार्वतीची आणि देवराईची – गल्लत होऊ लागली. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यात देवराई तोडली जाणार असे ऐकताच तर शेषचा स्फोटच झाला. देवराई? की पार्वती? देवराई तोडणार? म्हणजे पार्वतीला मारणार? कोण? शंभू? मग हे सगळं सांगायचं कुणाला? सीना? कल्याणी? पार्वती? देवराई….

स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘देवराई’. ‘देवराई’ ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात ‘शेष… शेष…’ अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट संपूर्ण पकड घेतो. वास्तविक या चित्रपटाच्या कथेत मानसिक आजार आणि पर्यावरण असे दोन विषय आहेत. पण या दोन्ही विषयांवर प्रेक्षकाला विचार करायला लावतानाही हा चित्रपट क्षणभरही प्रचारकी थाटाचा वाटत नाही, हे महत्त्वाचे.

‘देवराई’ हा खऱ्या अर्थाने दोन कुलकर्ण्यांचा चित्रपट आहे. अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी. अतुल कुलकर्णीची शेषची भूमिका ही एकंदरीत मराठी चित्रपटांच्या इतिहासातील काही उल्लेखनीय भूमिकांपैकी एक मानली जावी, असे मला वाटते. मानसिक आजारांनी ग्रस्त लोक ज्यांनी पाहिले आहेत, त्यांना मी असे का म्हणतो हे ध्यानात येईल. शेषचा एकलकोंडेपणा, त्याचे गर्दीत मिसळतानाचे अवघडलेपण, त्याचे लोकांशी नजर न मिळवणे, चाचरत, अडखळत बोलणे आणि खरे जग आणि कल्पनेतले जग यातल्या सरमिसळीने हताश, उद्विग्न होऊन हिंसक होणे हे अभिनयाची ‘केस स्टडी’ म्हणून बघावे असे आहे. आधी खेळकर, हसरा असणारा, बहिणीचे लाड करणारा शेष, हळूहळू मानसिक आजाराच्या विळख्यात असहाय झालेला शेष, हतबलपणे ‘माझ्या डोक्यात कसंतरी होतंय’ असं म्हणणारा शेष आणि सीनाच्या घरी चाललेल्या पार्टीत ‘किस चीज का पेटंट लोगे तुम? व्हॉट डू यू नो अबाऊट बायोडायव्हर्सिटी?’ म्हणून थैमान घालणारा शेष…. त्याच्या दुखण्याच्या भीषण स्वरुपाला त्याचा लहान भाचा घाबरतो आणि ‘माझी पुस्तकं फाडू नकोस..’ असं ओरडत आपल्या आईकडं धावतो, तेंव्हा गोंधळलेला, कोसळलेला शेष ‘फाडत नाहीये, फाडत नाहीये..’ असं फाटक्या आवाजात किंचाळतो आणि आपलं मन त्याच्या विषयी कणवेनं भरून येतं. एकदा टॉयलेटमध्ये असताना त्याचा विलक्षण गोंधळ होतो. आपण आहोत नक्की कुठे? घरी? देवराईत? कधीकधी भानावर असताना आपल्या लहान बहिणीचा हात हातात घेऊन शेष कापऱ्या आवाजात म्हणतो, ‘तुला किती त्रास…आई नाहीये… कुठं जाणार मी?’ आणि आपल्या डोळ्यात त्याच्याविषयीच्या सहानुभूतीनं पाणी येतं. रुग्णांच्या एका मीटींगमध्ये तो बोलताबोलता एकदम फुटतो, हा प्रसंग तर अंगावर काटाच आणतो.त्याचा त्याच्या भाच्याबरोबरचा (बाल कलाकार आश्विन चितळे) एक प्रसंग आहे. टेबलाशी बसलेला अतुल पाण्याच्या घोटाबरोबर गोळ्या घेत असतो. खेळून दमलेला, घामेजलेला त्याचा लहानगा भाचा टेबलाशी येतो. दुसरा पेला उचलून पाणी घ्यायला लागतो. अतुल काही न बोलता त्याला आपल्या हातातला पेला देतो. संपूर्ण प्रसंगात एकही संवाद नाही, पण यातून अतुलचे हळूहळू बरे होणे, आपल्या आसपासच्या लोकांबद्दलचे भान येणे स्पष्ट होत जाते.

‘देवराई’ चे दुसरे बलस्थान म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने साकारलेली सीना ही अगदी साधी मुलगी आहे – ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणतात तशी. साधी पण चांगली मुलगी. शेषवर तिचा जीव आहे. तिच्या लग्नात शेष असाच डोक्यात राख घालून निघून गेला, अगदी तिच्या अक्षदांच्या वेळीही आला नाही – या त्याच्या चमत्कारिकपणावर ती आईजवळ रडलीही; आई गेल्यावरही शेष विक्षिप्तपणानेच वागला, पण यातले तिने काही मनात ठेवलेले नाही. शेषच्या आजारपणात त्याच्याकडे आणि आपल्या संसाराकडे लक्ष देता देता तिची तारांबळ उडते. त्यातून शेषला काय झाले आहे, हे तिला धडपणे कळतही नाही. संसाराकडे, विशेषतः आपल्या मुलाकडे तिचे दुर्लक्ष होते आहे, असे म्हटल्यावर तिचा नवरा वैतागतो. या सगळ्या कात्रीत सापडलेली सीना सोनाली कुलकर्णीने जिवंत केली आहे. तिचीही देहबोली अतुल कुलकर्णीइतकीच प्रभावी आहे. शेष हॉस्पिटलमध्ये असताना सेमिनारसाठी टूरवर गेलेला तिचा नवरा आल्याआल्या ग्लास घेऊन टीव्हीसमोर बसतो, तेंव्हा तिने म्हटलेला ‘शेष कसा आहे हे विचारावं पण वाटलं नाही ना तुम्हाला?’ हा तर अगदी घराघरात ऐकू येणारा संवाद. ‘ आता माझा भाऊ आहे, मग तुम्ही म्हणाल ते ऐकून घ्यायलाच पाहिजे मला’ हाही तसाच एक संवाद. हे, आणि इतर सगळेच संवाद सोनालीने असे म्हटले आहेत, की ती खरोखर भावावर माया करणारी बहीण वाटते. आपल्या सगळ्यांच्या बहिणीसारखी, किंवा आपल्याली जशी बहीण असावी असे वाटते, तशी. बरा होत आलेला शेष पुन्हा विचित्र बोलायला लागतो, तेंव्हा ‘अहो, बघा ना हा कसं बोलतोय…’ म्हणून नवऱ्याच्या कुशीतले तिचे ढसाढसा रडणे मनावर एक चरचरीत ओरखडा काढते. शेवटी शेषला आणि कल्याणीला गावी सोडताना ती त्याला म्हणते, ‘शेष, कल्याणी आपल्यापेक्षा लहान आहे. तिला सांभाळशील ना? तिच्यावर माया करशील ना?’ तिच्या व्यक्तीरेखेतला हा समजूतदारपणा हे लेखकाचे यश आणि ती जे बोलते, ते अगदी मनापासूनचे, खरे वाटते, हे सोनालीचे.

तुषार दळवी हा नट एक माणूस म्हणून सुसंस्कृतच दिसतो. अमेरिकेत शिकून आलेल्या रसायनशास्त्रज्ञ डॉ. सुदेश गोरेची भूमिका त्याने समजून केली आहे. हा सीनाचा नवरा. सुरुवातीला शेषबद्दलचा त्याचा तुटकेपणा हळूहळू निवळत जातो. हा बदल तुषारने फार छान दाखवला आहे. एकंदरीतच सगळ्या प्रकारांनी त्याला आलेला अस्वस्थपणा फटाफटा टीव्हीवरची चॅनल्स बदलण्यासारख्या कृतीतून दिसतो. (त्यातही ‘है सबसे मधुर वो गीत’ हे गाणं एका चॅनलवर आल्यावर तिथं तो थोडासा थबकतो, हा दिग्दर्शनाचा आणखी एक बारकावा)’ सगळा समाजच स्किझोफ्रेनिक झालाय’ हे त्याचे फ्रस्ट्रेशन तर पटतेच.

देविका दफ्तरदार या गुणी अभिनेत्रीला फक्त अशाच भूमिका का मिळातात कुणास ठाऊक! (तिची दुसरी एक छान भूमिका म्हणजे ‘नितळ’ मधली) तिने ‘कल्याणी समजून केली आहे. आता सोनालीपुढे ती थोडी फिकी वाटते खरी, पण अशी तुलना करणे काही योग्य नाही.

मनोविकारतज्ञाच्या भूमिकेत डॉक्टर मोहन आगाशेंना ‘होम ऍडव्हांटेज’ मिळाला आहे (‘देवराई’ तली त्यांची भूमिका बघून त्यांना किती नवीन पेशंट मिळाले, हे त्यांना कुणीतरी एकदा खाजगीत विचारले पाहिजे!). मनाचे क्लिष्ट व्यापार सोनालीला समजावून सांगताना त्यांच्या हाताच्या हालचाली पाहाव्यात. सामान्यतः भारतीयांना हाताच्या प्रभावी हालचाली करता येत नाहीत. डॉक्टरांनी या बाबतीत एक छोटीशी शिकवणीच घेतली आहे. ज्योती सुभाष, रमा जोशी यांच्या भूमिकाही सुरेख. अमृता सुभाषच्या जागेवर बाकी कुणीही चालले असते.

‘देवराई’ चे संवाद नुसते ऐकू नयेत, ते अभ्यासावेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात असे संवाद ऐकायला मिळत असत.(उदा. ‘मुंबईचा जावई’ चे संवाद) शेषच्या आजाराची माहिती देताना सीना डॉक्टरांना सांगते, ‘आई कधीकधी चिडली की म्हणायची, तू तुझ्या वडिलांसारखाच माथेफिरू आहेस म्हणून. पण बायकांना असं बोलायची सवयंच असते ना, त्याचा काही शब्दशः अर्थ घेता येणार नाही….’ समुद्राच्या लाटांकडे टक लावून तासनतास बघत असलेल्या शेषला कल्याणी विचारते, ‘कुठलं जग बघत असतोस रे तू? या जगाच्या पलीकडलं? काय दिसतं तुला तिथे?’
पण हे असं लिहिण्यात काही अर्थ नाही. मी वर म्हटलं आहे तसंच. संवाद अभ्यासावेत.

नाही हाकारा, पण उठले रान
घरटे समोर, सापडेना वाट
बेभान पाखरु, समजेना कोणा
का कल्लोळ कल्लोळ
का कल्लोळ कल्लोळ

आहे आग, नाही राख
रक्त रक्त, नाही बाण
पारधी पारधी, बेभान पाखरू
समजेना कोणा का कल्लोळ कल्लोळ

आहे वस्ती, नाही सखा
घर आहे, बंधू नाही
एकटे एकटे, बेभान जग
पाखरा कळेना का कल्लोळ कल्लोळ

एका वाटसरे, पसरले बाहू
हलकेच घाली, पाखरा पाखर
हाताला टोचे, वाहे डोळा पण
पण ओठा हसू, वाटसरे

जंगल जंगल, आक्रंदे पाखरू
खुषीतही
हलकेच त्याच्या, कानी कुजबूज
वाटसरू त्याला, दावे देवराई

या सुरेख, अर्थपूर्ण कवितेने ‘देवराई’ संपतो. (ही कविताही अतुल कुलकर्णीचीच!) पडद्यावर जिथे चित्रपट संपतो, तिथे तो प्रेक्षकाच्या मनात सुरू झाला पाहिजे हे वाक्य अगदी ‘क्लिशे’ झाले आहे, पण ‘देवराई’ च्या बाबतीत हे घडते. ज्याचे पाऊल तुमच्या पावलाच्या शिस्तीत पडत नाही त्याचा स्वतःचा असा वेगळा ताल असू शकतो, या अर्थाचे थोरोचे एक वाक्य आहे. ‘देवराई’ बघून ते खरे असावेसे वाटते.

काहीकाही पुस्तके, काही गाणी, काही चित्रपट कायम हाताशी राहावेत, असे वाटते. ‘जगमगाती जागती सडकोंपे आवारा फिरुं’ हे ऐकावेसे वाटले की लगेच ऐकता आले पाहिजे. ‘अरे बाळ यंकट, एक विचारायचंच इसरले, लगीन केलंस का?’ हे आठवलं की दुसऱ्या मिनिटाला ही ‘माणसं’ डोळ्यापुढे पाहिजेत. ‘व्हय, ठेवलाय वाड्यावर. पर तुमी गुमान ऱ्हावा, सांगल तेवडंच करा. जावा, म्हेनतीला जावा’ हा सज्जड दम मनात आला की पडद्यावर आणता आला पाहिजे. ‘देवराई’ हा असाच एक चित्रपट आहे. मनोरुग्ण आणि पर्यावरण यांबाबत ज्यांना थोडी का होईना, संवेदना आहे, त्यांच्यासाठी ‘देवराई’ पाहणे ही आवश्यक गोष्ट आहे, असे मला वाटते. ज्यांना अशी संवेदना नाही, त्यांच्यासाठी अत्यावश्यक.