माझे खाद्य-पेय जीवन-३

November 16, 2009 by sanjopraav

‘भूक लागली की खाणे ही प्रकृती, आपल्यातले अर्धे दुसर्‍याला देणे ही संस्कृती आणि भूक नसताना खाणे ही विकृती’ अशा चमत्कृतीजन्य फालतू सुभाषितांनी इतिहास भरलेला आहे.पोटभर नाश्ता केला की ‘सलाड आणि ग्लासभर ताक’ असले हलकेफुलके जेवण करावे हे पथ्यकर वाक्य डोळ्याआड करावे आणि दुपारचे अस्सल म्हराटी जेवण घ्यावे. दुपारचे जेवण अंगावर येऊ नये हे खरे, पण म्हणून दुपारी अर्धपोटी राहाणे हेही काही खरे नाही. आठवडाभर कचेरीत घाम गाळून कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवले की रविवारी दुपारी चाखतमाखत जेवायला आपण रिकामे होतो. शनिवारी रात्री पार्टी व्हावी आणि रविवारी दुपारी मेजवानी. रविवारी दुपारी सुस्ती उतरली की मग क्यालरीबिलरीजचा विचार सुरु करावा. त्यामुळे रविवारचे दुपारचे जेवण याला केवळ शनिवारचे पापक्षालन इतकेच अस्तित्व असू नये. इथे मग मुख्य कलाकार म्हणून भाकरी की चपाती हा वाद संभवत नाही. चपाती किंवा भाकरी, भाजी, वरण किंवा आमटी, कोशिंबीर आणि भात हे दुपारचे जेवण जमून जाते. ‘पोळी’ ही अ‍ॅनिमिक भाजीबरोबर डब्यातून न्यायची सोय आहे, तर चपाती ही मांडी घालून बडवायची हौस आहे. बाकी ही चपाती आपल्या काकांसारखी. सदैव बेरजेचे गणित मांडणारी. तूप घातलेल्या काकवीबरोबर संसार मांडणारी, तशीच भाजी – मटण- चिकन यांच्याबरोबरही जमून जाणारी. दुपारच्या जेवणात जाडसर खरपूस डागाच्या चपातीवर तूप असावे. एकवेळ तूप नसले तरी चालेल, पण चपातीबरोबर दमदार चवीची भाजी पाहिजे. बटाट्याची डोसाभाजी डोशात कितीही चविष्ट लागत असली तरी दुपारच्या जेवणात चपातीबरोबर आली की ती थकलेल्या गृहीणीची आयत्या वेळची तडजोड वाटते. एकंदरीतच बटाटा हे फसलेल्या स्वयंपाक नियोजनाचे द्योतक आहे. ज्यांना होस्टेल आणि मेस हे शब्द परिचयाचे आहेत, त्यांना बटाटा हा जिन्नस काही दु:खद दिवसांची याद दिलवून जातो. कोबी- फ्लॉवर हेही शहरी संस्कृतीचा आब राखून जगणारे गृहस्थ. बटाट्याच्या रसभाजीत फ्लॉवर खपून जातो खरा, पण तोही धर्मांतर करुन पवित्र झाल्यासारखा. भाजी खरी असावी ती देशीच. ‘भाजीत भाजी मेथीची, अमकी माझ्या प्रीतीची’ हे काही नाव घेण्यापुरतेच नाही. पीठ पेरुन केलेली मेथीची गोळाभाजी प्रसंगी अंडा बुर्जीला अस्मान दाखवून जाते.
‘मला पालेभाजी आवडत नाही’ असे अभिमानाने सांगणार्‍याला आपण दयेशिवाय काय देऊ शकतो? मेथी, पालक, राजगिरा, चाकवत यांच्या गोळाभाज्या असोत की रसभाज्या, त्यांना एक दणकेबाज मराठी चव असते. अर्थात पालेभाजीने रसना उत्तेजितच नव्हे तर तृप्त व्हायला करणारीचा (किंवा गणपासारख्या करणार्‍याचा) हात सुगरणीचा पाहिजे. पालेभाजी म्हणजे ‘मिनरल्स आणि फायबर्स’ डोळ्यासमोर ठेवून केलेली तडजोड नव्हे. ते शाकाहाराचे एक स्वतंत्र मानचिन्ह आहे. बाकी पालेभाजी भाकरीबरोबर जशी लागते, तशी चपातीबरोबर लागत नाही. भाकरी- मग ती ज्वारीची असो, बाजरीची असो, की तांदळाची – ती पालेभाजीला मस्त साथ देऊन जाते. बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, लेकुरवाळी भाजी, लोणी आणि ताजे ताक यासाठी आल्हाददायक हिवाळा संपवून रखरखीत उन्हाळ्याची चाहूल देणारी संक्रांतही चालेल असे वाटते .त्या मानाने अंबाडी, चुका, शेपू, अळू या दुय्यम समजल्या जाणार्‍या पालेभाज्या. अळू तर पात्रता फेरीतून एकदम फायनललाच जावे तसा श्राद्धापक्षांतून एकदम लग्नाच्या पंगतीतच जाऊन बसला आहे. पण पुणेरी अळूचे जोशींच्या वड्यांसारखे जरा अवास्तवच कौतुक झाले आहे. सुक्या खोबर्‍याचे तुलडे घालून केलेले अळूचे फतफते भाताबरोबर लागते बरे, पण दणकेबाज पालेभाजीची गंमत त्यात नाही. कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी हे कसे न मोजता खायचे काम आहे. सोबत शेंगदाण्याची जाडसर वाटलेली चटणी असली तर क्या कहने!
फळभाज्यांमध्ये बटाटा, कोबी आणि फ्लॉवर हे सपक फिरंगी तिरंगी सोडले तर इतर भाज्या डोंबारणीच्या उफाड्याच्या पोरीसारखे ‘उम्फ’ घेऊन येतात. भरल्या वांग्याची शेंगदाण्याचे कूट, काळा मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, गूळ आणि लालभडक तिखट घालून केलेली भरली भाजी एखाद्या आजारी माणसाचीही वासना चाळवून जाईल. घाटावर ब्राह्मणेतर कुटुंबांत वांग्याची अशी भाजी वांग्याच्या देठांसकट करतात. या भाजीत गूळ नसतो आणि मसाल्याचे तिखट कंजूषी न करता पडलेले असते. त्यातले ते शिजलेले आणि मसाल्यात मुरलेले देठही एक वेगळी चव देऊन जाते. दोडक्याला ‘करोगेटेड बॉक्स’ म्हणून हिणवणार्‍या पुळचट नागर जनांकडे येशू ख्रिस्ताच्या भूमिकेतून पाहावे. दोडक्याच्या शिरांच्या चटणीच्या कौतुकात मूळ देशी दोडक्याचे मूल्यमापन हरवले आहे. वांग्यासारखीच दोडक्याचीही भरुन भाजी करावी. बेताच्या रसात बेताचीच शिजलेली ही मसालेदार भाजी चवीने खाणार्‍याला ‘त्या’ देणार्‍यानेच ‘टेस्ट बडस’ चे एक जादा पाकिट दिलेले असते. चवीने खाणारा अशा चटकदार भाजीत मटण मसाल्याचे रुप बघतो. अशीच वंचना गवार आणि पडवळाच्या वाट्याला येते. गवारीची शेंगदाणे घालून केलेली सुकी भाजी किंवा गोळे घालून केलेली रसभाजी यांना तोड नाही. गवारीच्या जोडीलाच विविध प्रकारच्या शेंगा येतात. श्रावणघेवड्यापासून फरसबीपर्यंत या शेंगाचे विविध प्रकार अगदी मंडईत खरेदीला गेल्यापासून आल्हाद देणारे. ‘तूपघेवडा’ नावाचा एक घेवड्याचा गावठी प्रकार असतो, त्याची तुपकट भाजी आता फक्त आठवणीत राहिली आहे. शेंगांच्या उल्लेखाबरोबर आठवते ते शेवग्याचे नाव. शेवग्याच्या शेंगा म्हणे औषधी असतात. असेनात का बापड्या! पण तुरीच्या डाळीच्या आमटीतल्या शेवग्याचा शेंगा सगळे टेबल म्यानर्सबिनर्स गुंडाळून ठेवून चोखून खाताना मला तरी असले काही आठवत नाही.
पडवळ त्या मानाने जरासे दुधी भोपळ्याच्या वळणावर जाणारे. पडवळाची रसभाजी हल्ली फारशी कुणाला ठाऊक असत नाही. भिजवलेल्या हरभर्‍याची डाळ घातलेली ही भाजी एक वेगळीच चव देऊन जाते. तशीच अवस्था भेंडीची आहे. ‘भेंडी’ हा शब्द काही फारशा चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. त्यातल्या त्यात भेंडीची भाजी म्हणजे फारफारतर काचर्‍या करुन केलेली सुकी भाजी. पण भेंडीची रसभाजी खाल्ल्लीय तुम्ही? भेंडीचा बुळबुळीतपणा जावा म्हणून त्या भाजीत चिंच, आमसुल नाही तर लिंबाचा रस घालतात. ही भाजी जराशी गोडसर असते. गरम भात, तूप आणि भेंडीची ही अशी भाजी हे रात्रीचे जेवण असावे. असे ऊनऊन जेवावे आणि लवकर पांघरुणात गडप व्हावे. बाहेर जोरदार पाऊस किंवा कडाक्याची थंडी असेल तर काय, सोने पे सुहागाच! दहीभेंडी हाही एक जमून जाणारा प्रकार. हल्ली हाटेलात बुंदी रायता नावाचा एक भयानक गिळगिळीत पदार्थ देतात. मुळातच शेळपट पुरुषाने लग्नानंतर आक्रमक बायकोपुढे अगदी पोतेरे पोतेरे होऊन जावे तसला हा पदार्थ. दहीभेंडीतली भेंडी बाकी दह्यातही आपली अस्मिता जपून असते. सामान्यांचे पडवळाहून नावडते म्हणजे कारले . पण कारल्याच्या कडवटपणालाच त्याचा ‘यू एस पी’ बनवणारी सुगरण मिळाली तर कारल्याची भाजी अपरिमित आनंद देऊन जाते. ढबू मिरचीची (याचे सिमला मिरची असे नामकरण करणार्‍यांचा निषेध असो!) पीठ पेरुन केलेली भाजीही सुरेख लागते. फक्त घास कोरडा होऊन तोठरा बसण्याची शक्यता असते. यावरही उपाय आहे. सोबत वाटीभर गोड दही घ्यावे. साईचे असल्यास अधिक उत्तम. भाजीची चव द्विगुणित होते. डिंगरी हा शहरातला शब्द झाला. गावाकडे याला ‘मुळ्याच्या शेंगा’ म्हणतात. शेपूसारखीच ही अत्यंत उग्र वासाची भाजी – बर्‍याच लोकांना न आवडणारी. पण कोवळ्या डिंगर्‍यांची शेंगदाणे घालून केलेली भाजी ज्यांना आवडते त्यांना ती कोळंबीच्या कालवणासारखी चटकदार वाटते. त्या मानाने तोंडली, नवलकोल, ढेमसे, आर्वी वगैरे रणजी खेळणारे खेळाडू. शेवग्याच्या पानाची भाजी आणि ओल्या हरभर्‍याच्या पानांची भाजी हे अगदीच दर्दी खवय्यांचे काम. केळफूल आणि हादग्याचा फुलांची भाजी हेही त्याच लायनीतले मेंबर. हादग्याच्या फुलांची भाजी करताना त्यातले ‘नर’ काढून टाकावे लागतात, नाहीतर ती भाजी कडू होते. लहानपणी शेतातून असली फुले गोळ करुन आणायची आणि त्यातले नर काढून ती भाजीसाठी द्यायची हे आवडीचे काम होते. बेसन घालून केलेली हादग्याच्या फुलांची भाजी आता कोठे मिळेल बरे?
होस्टेलच्या मेसला रोज रात्री उसळ असे. ही योजना ज्याने सुरु केली त्याचे कल्याण असो. कडधान्यांची उसळ ही भाज्या महाग झाल्यावर करायची तडजोड नाही. उसळींचे शाकाहारात एक स्वतंत्र स्थान आहे. पण उसळी खाव्यात त्या चवीसाठी. फक्कड उसळीचा चमचमीत घास घेताना कुणी ‘प्रोटीन्स’ हा शब्द उच्चारला तर दाताखाली खडा आल्यासारखे वाटते. मटकीची उसळ मिसळीसाठीच अधिक प्रसिद्ध आहे, पण खर्‍या कोल्हापुरी मिसळीत (पोह्यांसारखेच) तिला स्थान नाही. हल्ली ढाब्याढाब्यांवर ‘आख्खा मसूर’ नावाची एक उसळ मिळते. कोणत्याही गोष्टीचा सतत कंटाळा येणार्‍या आणि ‘साधे वरण’ ही पाककौशल्याची कमाल मर्यादा असणार्‍या सपक पोरींच्या नवर्‍यांना कधीतरी अस्सल जेवायला मिळावे म्हणून केलेली ही सोय आहे. बाकी हाटेलात जाऊन उसळी खाणे हे हाटेलात पोहे खाण्याइतकेच निरर्थक आहे. मसुराला मोड आणता येतात, त्याने कदाचित त्यातली पोषणमूल्येही वाढत असतील; पण बिनमोडाच्या मसुराची लसूण घालून केलेली उसळ जशी चविष्ट लागते, तशी मोडाच्या मसुराची लागत नाही. वाटाण्याचेही तसेच आहे. पण काळा वाटाणा आणि हरभर्‍याची उसळ बाकी मोड आणूनच करावी. हरभर्‍याच्या उसळीवर तेलाचा ‘कट’ पाहिजे, आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीत ओले खोबरे. काळसर वाटाणे, त्यांचे शुभ्र, फडफडीत मोड, लालभडक रस्सा आणि त्यावर परत पांढरेशुभ्र खोबरे ही रंगसंगतीच भूक दुप्पट करणारी आहे. मूग पचायला सोपे असतात म्हणे. असोत बापडे. मुगाची भरपूर लसूण आणि कोथिंबीर घालून केलेली घट्ट उसळ खाताना असले काही आठवू नये. चवळी किंवा अळसुंदाची रस्सेदार उसळ अशीच मजा आणून जाते. राजमा आणि छोले बाकी त्या मानाने परके वाटतात. आम्लपित्ताची आठवण करुन देणारेही.
आमटी ही तर मराठी जेवणाची शोभा आहे. ‘भातपिठले’ आणि ‘भातआमटी’ यातले सरसनिरस ठरवणे अवघड आहे. तुरीच्या (चिंचगूळ घातलेल्या) आमटीबरोबर साधा भात पाहिजे आणि कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी. कोवळ्या हरभर्‍याची – ज्याला गवाकडे ‘सोलाणा’ म्हणतात- झणझणीत आमटी आणि गरम भाकरी हे असेच एक दिलखेचक कॉम्बिनेशन आहे. दुसरी प्रसिद्ध आमटी म्हणजे शेंगदाण्याची. वरईच्या किंवा भगरीच्या जोडीला येणार्‍या शेंगदाण्याच्या आमटीने उपवासाचे सार्थक होते. टोमॅटोचे सार ही बाकी शुद्ध फसवाफसवी आहे. सार खरे ते आमसुलाचे. आजारपणातून उठलेल्या माणसाचा आहार म्हणून किंचित बदनाम झालेले , पण एकदम भूक चाळवणारे. त्यातली तुपाची फोडणी, जिरे आणि कढीलिंब यांचे आमसुलाशी असे काही जमून जाते, की ज्याचे नाव ते! कढीही अशीच मजा आणून जाते. हल्ली कढीत कसल्याकसल्या भजी, काकडीचे तुकडे.. काय वाट्टेल ते घालतात. अस्सल कढीला असले काही नखरे लागत नाहीत. कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड .. फारफारतर लिंबाचे लोणचे. ‘माणसाला किती जागा लागते?’ या धर्तीवर ‘जगात सुखी व्हायला फार काय लागते?’ असा प्रश्न पाडणारे हे जेवण . पण खिचडी-कढी ही खरी तर हिवाळ्यातल्या रात्रीची मजा.
मराठी जेवणात ‘डाव्या उजव्याला’ फार महत्व आहे. चटणी, लोणचे, मीठ, लिंबू आणि कोशिंबीर हे अस्सल मराठी थाळीतले मानाचे शिलेदार. शेंगदाणा, लसूण, कारळे, जवस, तीळ, दोडक्याच्या शिरा या तर नेहमीच्या चटण्या झाल्या. उन्हाळ्यात गूळ, तिखट, मीठ घालून केलेल्या कैरीच्या चटणीच्या आठवणीने तोंडाला चळचळून पाणी सुटते. तसेच काहीसे कवठाच्या चटणीबाबत. पण कवठाची चटणी ही जेवणात खाण्याची गोष्ट नव्हे. कवठाची चटणी तशीच खावी आणि तीही त्या कवठाच्या भकलात घेऊन. कवठाचे बी चावून खावे. अगदी चारोळ्यासारखे लागतात. बी काढून कवठे खाणे म्हणजे साल काढून सफरचंद खाण्यासारखे आहे. आमसुलाची चटणी तिला लाभलेल्या संदर्भाने एरवी अस्पर्श झाली आहे, पण तीही एक वेगळीच खमंग चव.
कोशिंबिरीचे काकडी आणि टोमॅटो हे सेहवाग-तेंडुलकर. गाजराची फोडणी दिलेली आणि सढळ हाताने शेंगदाण्याचे कूट घातलेली कोशिंबीरही जमून जाते. बीट बाकी स्वतःचे काहीही अस्तित्व नसलेले. केवळ ‘लोह’ हा विचार करुनच खायच्या लायकीचे. मुळ्याची कोशिंबीर न आवडणारेच लोक अधिक. पण मुळ्याच्या वासाची बिअरच्या वासासारखीच सवय व्हावी लागते. आणि एकदा ही सवय झाली की मुळ्याच्या कोशिंबिरीसारखी कोशिंबीर नाही, तुम्हाला सांगतो! दहीकांदाही असाच मजा आणून जातो. दहीकांद्याचे मांसाहारी जेवणाशी नाते जोडले आहे, पण शाकाहारातही तो खपून जातो. दहीकांदा कालवताना त्यात चिमूटभर साखर आणि एवढे जिरे घालावेत. एकदम भन्नाट चव तयार होते. वांग्याचे आणि लाल भोपळ्याचे भरीत हेही ‘ऑल टाईम फेवरिट’ मध्ये मोडणारे. पण कैरीच्या कायरसाला पर्याय नाही. आंबटगोड चवीचा हा कायरस चपातीबरोबर खावा किंवा तूप भाताबरोबर. जीभ आभाराचे भाषण करु लागते!
तात्पर्य काय, की कोणतेही पक्वान्न, गोडधोड असले काही नसतानाही दुपारचे साधे शाकाहारी जेवणही कधीकधी ‘जीवन त्यांना कळले हो’ असे म्हणायला लावते. रात्रीच्या रंगीबेरेंगी जेवणाची रंगीत तालीम किंवा सकाळच्या भक्कम नाश्त्यावर उतारा एवढेच रविवार दुपारच्या जेवणाचे स्वरुप नसते. असले साधे पण मर्दानी – मर्दानी हा शब्द फक्त ‘फिगरेटिव्हली’ – जेवण झाले की कुणी दूरदर्शीपणाने आधीच आणून फ्रीजमध्ये ठेवलेली मसाला पानपट्टी लावतो, तर कुणी नुस्तीच बडीशेप खाऊन कोपर्‍यावर जाऊन आपापली विल्स, गोल्ड फ्लेक काय असेल ती शिलगावतो. हेही नको असेल तर साधे सुपारीचे एक खांड चघळत राहावे. पंखा अंमळ मोठा करावा, एखादे पातळ पांघरुण घ्यावे, डोळ्यासमोर टाईम्स धरावा…. थोड्या वेळाने हातातला टाईम्स गळून पडतो, पंख्याच्या ‘हम्म..’ अशा आवाजात एक बारीक खर्ज मिसळतो… आठवडाभर घाम गाळून उपसलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटू लागणारी रविवार दुपार सुरु झालेली असते….

माझे खाद्य-पेय जीवन-२

October 30, 2009 by sanjopraav

डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत.
वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit!

सकाळची आन्हिकं उरकली आणि नवाच्या आधी आरशासमोर उभा राहून माणूस कमरेच्या पट्ट्याशी ओढाताण करु लागला की शरीराचा कणनकण ‘खायला द्या…खायला द्या…’ म्हणून कल्लोळ करु लागतो. (महिलांनाही हेच होत असावे, पण तो अनुभव मला नाही!) ही नाश्त्याची वेळ आहे. नाश्त्याचे न्याहारी, नाश्ता आणि ब्रेकफास्ट असे तीन उपप्रकार आहेत. शिळी भाकरी गरम दुधात कुस्करुन त्याबरोबर लसणीची चटणी घेतली की ती न्याहारी. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ वाचतावाचता काटेचमच्यानी पोटात ढकलायचे बेचव अन्न म्हणजे ब्रेकफास्ट. (त्यानंतर फळाचा रस – चुकलो, फ्रूट ज्यूस- आणि ब्लडप्रेशरची किंवा मल्टिव्हिटॅमिनची गोळी नसली तरे ब्रेकफास्टच्या टायचा सामोसा नीट जमत नाही!) आणि तुम्हीआम्ही सकाळीसकाळी जे हाणतो, तो नाश्ता. नाश्ता हे तुमच्या रोजच्या जेवणातले सगळ्यात मोठे जेवण असावे, नाश्त्याला तुम्ही दिवसाभरात जेवढे खाता त्याच्या चाळीस टक्के खावे, नाश्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्स घ्या, फळे घ्या.. विज्ञान असले बरेच काही सांगते. पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे. उत्साही सकाळची उदात्त परीपूर्ती म्हणजे नाश्ता. नाश्ता असा असावा, की जो करुन झाला की त्या इंग्रजी कवीप्रमाणे ‘स्वर्गात देव आहेत, आणि एकंदरीत जगाचं बरं चाललं आहे’ असं वाटायला लागावं!
पारंपारिक मराठी नाश्त्याचे उपमा आणि पोहे हे म्हणजे पणशीकर-घाणेकर आहेत. सदासर्वदा लोकप्रिय. उपम्याचे उपमा आणि उप्पीट असेही उपप्रकार आहेत, आणि बारीक पंडुरोगी रव्याचा उडुपी उपमा आणि सणसणीत देशी जाड गव्हाचा उपमा असेही. सपक मिरचीचे लहान तुकडे आणि कढीलिंबाच्या भरड पानांनी भरपूर असा पांढरट रंगाचा शेवेने सजवलेला उपमा हे उडुपी मंडळींनी दिलेले प्रकरण आहे. गावरान देशी उप्पीटाला असली कलाकुसर परवडत नाही. त्यातल्या भरड रव्यासोबत मजबूत देशी शेंगदाणे आणि तिखट मिरचीचे मोठेमोठे तुकडे असतात. ते तुकडे बाजूला काढून ठेवायचे नसतात. फारफारतर ते दाढेखाली आले की ‘स्स..’ असे म्हणून पाण्याचा एक घोट घ्यायचा असतो. अश उप्पीटात कधीकधी आमसुलही येते. अशा उप्पीटाबरोबर काही घेणे म्हणजे अशा उप्पीटाचा अपमान केल्यासारखे आहे. पण जरा बुजरी मंडळी अशा उप्पीटावर साईचे दही घेतात, तेही बरे लागते. उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. आंबोलीहून गोव्याला जाताना घाट उतरायच्या आधी कामतांचे हाटेल आहे. तिथल्या उपम्यात वेलदोडे घातलेले असतात. तीही एक वेगळीच चव लागते.
पोहे बाकी अजरामर आहेत. कांदेपोहे आणि ‘मुलगी पाहाणे’ हा संबंध तर सर्वश्रुतच आहे. कोणत्याही गोष्टीत बटाटा घालून खाण्यार्‍या मुंबईकरांनी बटाटापोहे नावाचा एक धेडगुजरी पदार्थ बनवला. पण खरे पोहे दोनच. भरपूर ओले खोबरे आणि हिरव्या मिरच्या घालून ‘वरुन लावलेले’ ‘आलेपाक’ या अर्थहीन नावाचे विशेषेकरुन महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात खाल्ले जाणारे पातळ पोहे आणि दहीपोहे. आलेपाक हा पदार्थ बाकी नाश्यापेक्षा दुपारच्या वेळेचे खाणे म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. ‘दडपे पोहे’ हे याचे शहरी नाव. फोडणी घातल्यावर काही वेळ हे दडपून ठेवायचे असतात आणि मग कपबशीतल्या बशीतून वाढायचे असतात. किंवा चक्क वर्तमानपत्राच्या कागदावर. वाढताना बाकी वर पुन्हा खोबर्‍याची पेरणी पाहिजे. लिंबू आणि कोथिंबीर हे या पोह्यांचे प्राण. ‘है इसीमे प्यारकी आबरु, वो जफा करे, मै वफा करुं’ असे गुणगुणत हे पोहे सवडीने, रेंगाळत रेंगाळत खावे, अर्धा कप चहा घ्यावा, आणि ‘इट्टला, पांडुरंगा’ म्हणत हात झाडत उठावे. आलेपाक हा हातानेच खायचा असतो. चमच्याने आलेपाक खाणार्‍याला जो कोणी आदिबल्लवाचार्य असेल, त्याचा भीषण शाप लागतो म्हणे!
दहीपोहे हे पोहेमंडळीतले दुर्लक्षित धाकटे भावंड आहे. अगदी गुणी, पण थोरल्या भावांच्या कर्तबगारीने झाकोळून गेलेले. त्यामुळे दहीपोह्याचे काही नखरे नाहीत. दहीपोहे कसेही खावेत. फक्त ते चांगले भिजलेले असावेत. प्रेमभंगासारखेच दहीपोहे जितके मुरतील तितके अधिक स्वादिष्ट होत जातात. भिजवलेले पोहे, दूध, दही आणि मीठ ही बेसिक एडीशन. त्यावर मेतकूट, तळलेल्या मिरच्यांची फोडणी, लिंबाचे तिखट लोणचे किंवा चक्क लालभडक मसाल्याचे तिखट – हे सगळे ‘अ‍ॅड ऑन’स. फोडणीच्या दहीपोह्यात चिमूटभर साखर पाहिजे. आणि बरोबर मुरलेले माईनमुळ्याचे लोणचे असले तर क्या बात है! नरकचतुर्थीला आजही असले दहीपोहे सकाळी सात वाजता पानात येतात आणि फराळाचे सार्थक होते!
पोहे -उपम्याच्या जोडीला साबुदाण्याची खिचडी , मिसळ, दोसे-उत्ताप्पे आणि थालीपीठ ही मंडळी म्हणजे भट, दुभाषी, लागू, गोखले या लायनीतली. दर्जाने उत्तम, पण ते रोजचे काम नव्हे. खिचडी आणि मिसळ यावर सगळे बोलून लिहून झाले आहे. ईश्वराचा शोध जसा कुणाला कुठे लागेल याचा नेम नाही, तशी आपल्या चवीची मिसळ कुणाला कुठे मिळेल हेही सांगता येत नाही. ‘कोल्हापुरात कुठेही जा, मिसळ चांगलीच मिळणार’ असा अभिमान बाळगणारा मी, खुद्द कोल्हापुरात एकदोन ठिकाणी जाड फरसाण, मृतावस्थेतले पोहे, जाड कापलेला कांदा आणि कावीळ झालेला ‘कट’ याचा फुळकावणी लगदा अर्धवट टाकून उठलो आहे. आणि अगदी अपेक्षा नसताना इंदौरात तीनतीनदा रस्सा मागून घेतलेला आहे. मिसळीचे बाकी एक आहे. अस्सल कुलीन गायकाला जशी तानेगणिक दाद पाहिजे असते आणि मैफिलभर शांतता पाळून शेवटी फक्त ‘कर्टन कॉल’ करण्याने त्याचे समाधान होत नाही, तसे मिसळीला दाद घासागणिक आणि घसागणिक गेली पाहिजे. मिसळीच्या पहिल्या घासात पंचेद्रिये जागृत होत नसतील, तर त्यापेक्षा उकडलेला बटाटा खावा.
फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी ‘उठाव लुंगी-बजाव पुंगी’ म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्‍यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा. दोश्याच्या रंगावरुन आणि त्याच्या कडकपणावरुन त्याचे घराणे कळते. चेंबूरच्या एका हाटेलात (मला वाटते ‘गीता भवन’ ) राजकपूरला असा कुरकुरीत मसाला दोसा हाताने तोडून खाताना पाहिले आणि ‘दिलका हाल सुने दिलवाला’ हे पटून गेले! रवा दोसा हाही जितका कुरकुरीत आणि जाळीदार तितका अधिक चविष्ट. रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. उत्तप्पावरील कांदाही असाच खरपूस कडक झाला असला पाहिजे. ‘ओनियन टमाटो उत्तप्पा’ हा बाकी खरपूसपणाला मारकच प्रकार. एकतर त्या बियाळ टमाटोच्या चकत्या नीट शिजत नाहीत, आणि दुसरे त्या ओलसर टमाटोने त्या खरपूस उत्तप्प्याचाच लगदा होऊन जातो. आमच्या कराडचा शेट्टी त्या उत्तप्पावर तो तव्यावर असतानाच शेंगदाण्याची तिखट चटणी पेरायचा. ते गणितही झकास जमून जायचे. पण दोसा उत्तपा हे स्वयंप्रकाशित जीव. चटणी-सांबार असल्यास उत्तम, नसल्यास एकेकटेही तबीयत खुश करुन जाणारे. इडलीचे तसे नाही. इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे. सांबारस्वरुपी नवरा कायम संतापी, पण त्याच्याशिवाय इडलीला अस्तित्व नाही. हल्ली उडप्याकडे ‘सांबार मिक्स या सेबरेट?’ असा एक अपमानजनक प्रश्न विचारला जातो . इडली वेगळी आणि सांबार वेगळे म्हणजे एखाद्या सुंदर बाईने खालच्या आणि वरच्या ओठाला वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक लावण्यासारखे आहे.इडली ही सांबाराने न्हालेली नव्हे तर सांबारात बुडालेली पाहिजे. एकेक तुकडा इडली सांबाराच्या चमच्याबरोबर खाणे हे नवख्याचे काम. जाणकार कोण काय म्हणेल याची पर्वा न करता इडली आणि सांबार यांची आधी जिवाशिवाचे ऐक्य करुन घेतो. हे झाले की आणखी एक प्लेट सांबार मागवावे आणि मग जीभ रतिक्लांत होईस्तोवर हे मिश्रण हाणावे. मधून चटणी घेणे वगैरे ऐच्छिक बाबी. पुण्यातल्या ‘स्वीट होम’ने इडली सांबारात बारीक शेव घालून वेगळेपणा आणला, पण तेही तसे दुय्यमच. एरवी कळकट शेट्टीच्या हातची वाफाळती इडली आणि सुक्या मिरचीचे तुकडे घातलेले सांबार याला तोड नाही. सांबारातले भोपळ्याचे, वांग्याचे अगदी वेळीप्रसंगी दोडक्याचे तुकडेही खाता येतात, पण सांबारातल्या शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्यांचे काय करायचे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ‘जादा चटणी- सांबारला एक्स्ट्रा चार्ज पडेल’ या मेनूवरील ओळीच्या निषेधार्थ तर मनसेला सुपारी दिली पाहिजे. मटणथाळीतला पांढरा आणि तांबडा रस्सा जसा मागायला लागू नये, आणि कांदा-लिंबू तर कायम वाढता असावा, तसे इडली-मिसळीतले सांबार हे न मागता पानात आले पाहिजे. काय जादा पैसे घ्यायचे, ते नंतर घ्या ना लेको!
थालीपीठ हा समस्त शहरी समाजाची कीव करावी असा विषय आहे. पुणे -कोल्हापूर रस्त्यावरच्या भुईंजजवळच्या ‘विरंगुळा’ हाटेलातल्या थालिपिठाचे तर ‘सारेगामा’ तल्या अल्पजीवी तार्‍यांइतके अवास्तव कौतुक झाले आहे. तेलाने थबथबलेली ती कडक पिठाची तबकडी म्हणजे थालीपीठ नव्हे. खरे थालीपीठ ज्याचे होते ती नुसती भाजणी तशीच खावी इतकी खमंग असते. थालीपिठातला कांदा बाकी पांढरा पाहिजे, कोथिंबीर कोवळी आणि नुक्ती तोडलेली पाहिजे आणि लसूण-मिरची गावरान पाहिजे. असे थालिपीठ करताना त्यात तव्यावरच मधेमधे भोके पाडून त्यात तेलाची थेंब सोडला पाहिजे. आणि सोबतीला लोणी किंवा दही तर पाहिजेच पाहिजे. असे एकच थालीपीठ खावे आणि त्याच्या आठवणीवर सहा महिने काढावेत.
या बिनीच्या शिलेदारांबरोबर शेवयाचा उपमा, मक्याच्या कणसांचा उपमा, लाह्याच्या पिठांचा उपमा, धिरडी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी, कसलेकसले वडे आणि अगदीच आयत्या वेळचे म्हणून आम्लेट-ब्रेड असे नाश्त्याचे इतरही प्रकार आहेत. पण नाश्ता कोणताही असो, त्याने ‘अन्नादाता सुखी भवः’ असे म्हणावेसे वाटले पाहिजे. सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच ‘बनके पंछी गाये प्यारका तराना’ म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!

माझे खाद्य-पेय जीवन-१

October 27, 2009 by sanjopraav

‘गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉईल्ड इट बाय अ‍ॅडींग अ टंग इन इट’ हे बायकांच्या आड्यन्सला चिडवणारे वाक्य फार पूर्वी ऐकले होते. जिभेचा हा गुण जरी नवीन असला तरी सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला जरा जास्तच नखरेल जीभ लाभली आहे, हे जन्मानंतर लवकरच लक्षात आले होते. त्यातून आई, बहीण, आजी हा घरातला समग्र स्त्रीवर्ग खाना बनवण्यात आणि खिलवण्याचा शौकीन असल्याने जिभेचे मुद्दाम लाड करावे लागले नाहीतच; ते आपोआपच झाले. सणवार, व्रतवैकल्ये आणि त्यांची उद्यापने, गावच्या जत्रा आणी शेतावर होणारा विहिरीच्या पूजेचा तो कार्यक्रम ‘पारडी’ या विविध निमित्तांनी घरात आणि घराबाहेर खाल्लेल्या विविध पदार्थांच्या आस्वादाला चटावलेली आणि सोकावलेली जीभ पुढे मुर्गीमटणातही रमली. आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली. वर काजू बदामाची पेरणी केलेली बरेलीतली मलईदार ‘दीनानाथ की मशहूर लस्सी पिऊन जसा संतोष झाला, तसाच कोल्हापुरातल्या ‘ओपल’ मधला कडकडीत पांढरा रस्सा पिऊनही.
आता खाण्यात इर्षा करण्याचे दिवस मागे पडले. जीभ अजूनही चावट आहे, पण आता ‘क्वांटिटी’ पेक्षा ‘क्वालिटी’ ला अधिक महत्व देण्याचे दिवस आले. आजही मुर्ग-मसालाबरोबर पचडी तशीच लागते, पण आता कोंबडीच्या त्या घासांबरोबर ‘फायबर’ हा विचारही चावला जातो. आजही सुका मेवा तितकाच चविष्ट लागतो, पण तो खाताना ‘अक्रोड हार्टला बरे म्हणे!’ हे मनात आल्याशिवाय राहात नाही. पण ते असो. कधीतरी या लाडावलेल्या जिभेलाच आता ‘काय तुझा तेगार’ म्हणून विचारावे असे वाटले आणि आजवरच्या आयुष्यातल्या खाण्यापिण्याच्या या रंगरंगिल्या प्रवासवाटेवर मन मागेमागे रेंगाळत गेले.
कुणाकुणाला म्हणे आपले स्वतःचे उष्टावणही आठवते. कुणाला स्वतःच्या बारशात वाटलेल्या घुगर्‍यांची चवही आठवत असेल, काय सांगावे! मला असले काही आठवत नाही. पण खान पान यात्रेची (हा शब्द ‘भारतीय रेल’ कडून साभार!) सुरवात होते ती चहापासून. मुखमार्जनानंतर (हा शब्द ‘सारे प्रवासी घडीचे’ मधून साभार!) काही क्षणांतच वाफाळता चहाचा मोठा मग समोर आला नाही तर सगळे जग व्यर्थ वाटू लागते. दुधा-दह्याच्या प्रदेशात बालपण गेले असल्याने लहानपणी या चहात चहा नावापुरताच आणि भरघोस दूध असायचे. कपातल्या गोडमिट्ट चहावर खापरीसारखी दाट साय ही कल्पना आज ओशट वाटते, पण अंगाभोवती पांघरुण घट्ट गुंडाळून घेऊन असा चहा चाखतमाखत पिणे आणि रिकामा कप कुठेतरी भिरकावून परत पांघरुणात गुडुप होणे यापरते सुख नसे. शहरी चहात चहाचा स्वाद वगैरे महत्वाचा, पण गावाकडच्या आतिथ्याच्या कक्षा चहातल्या साखरेच्या प्रमाणानुसार रुंदावतात. ‘खडे चम्मचवाली चाय’ ही काही उत्तर भारतीयांची मक्तेदारी नव्हे. गावाकडच्या चहात एकवेळ चहा लहान चमच्याने पडेल, पण साखर पडते ती मुठीने. पुढे मग तारांकित हाटेलातला उंची पण मचूळ चहा, गुजरातमधली गोड आणि सुगंधी ‘मसालानु चाय’, तीन आकडी किंमत असलेला ‘ब्लॅक’ किंवा ‘आईस टी’ असले अनेक प्रकार चाखले, पण चहा तो चहाच. सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे. रविवारी बाकी चहाच्या तीन-चार फेर्‍या व्हाव्यात. शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत ‘कशी गं माझी बाय गुणाची!’ म्हणावेसे वाटते! कॉफी – तीही आसक्या दुधातली आणि वेलदोडे जायफळ घातलेली- कधीकधी मजा आणून जात असे. विशेषतः गावाकडच्या तंबूतला शिणेमा बघून रात्री परत आल्यावर असली कॉफी केवळ अफलातून लागे. कॉफी हे उच्चभ्रू लोकांचे पेय आहे आणि चहा हे जनतेचे, हा सूक्ष्म फरक कळायला बराच वेळ लागला. न कळणार्‍या चित्रांचे वातानुकूलित प्रदर्शन बघताना त्या वेळी लोक कॉफी पीत असत. (आता वाईन पितात!) नुकत्याच प्रेमात पडलेल्या (किंवा नुकतेच लग्न ठरलेल्या) युगुलांना हाटेलात जाऊन चहा पिणे जरा कमीपणाचे वाटे; म्हणून असे लोक महागड्या हाटेलांत जाऊन न परवडणारी कॉफी पीत असत. डोळ्यांत डोळे घालून बघणे, चोरटे स्पर्श, ‘एक मुलगी हवीच हं मला.. आणि नावही ठरवून ठेवलंय मी – नेहा!’ वगैरे सगळ्या साईड डिशेस. एकंदरीत काय, तर कॉफी जराशी शिष्टच. चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही. पुढे ‘ब्रिष्टॉल – विल्स – गोल्ड फ्लेक’ या प्रवासाला साथ दिली ती तर केवळ चहानेच. ‘चहा-बिडी’ हा शब्दप्रयोग काळाच्या ओघात टिकून आहे ही तर अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावावी अशी दैदिप्यमान घटना आहे!
चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही. बोर्नव्हिटा चॉकलेटच्या स्वादाचा म्हणून जरा बरा वाटे पण हॉर्लिक्स, प्रोटिनेक्स वगैरे मंडळी आजारीपणाची कडवट आठवण घेऊन येतात. कोको ही तर शुद्ध फसवाफसवीच होती. शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा कोको.
तात्पर्य काय, की कोणताही ऋतू असावा, विचारहीन शांत झोप व्हावी, ‘आज आपण जग जिंकणार’ या आत्मविश्वासाने जागे व्हावे आणि तोंड खंगाळेपर्यंत हातात ते ताम्रवर्णी अमृत हजर व्हावे. घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो! ‘उत्तेजक पेयांपासून दूर’ असणारे लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. शेवटी ‘कंबख्त तूने पीही नही’ हे काय फक्त वारुणीलाच लागू आहे? ‘कंबख्त तूने चाय पीही नही’ हेही तितकेच समर्पक आहे की! आणि व्याकरणदृष्ट्या बरोबरही!

समजत नाही… समजत नाही…

October 11, 2009 by sanjopraav

“म्हणत राहा, मित्रांनो, श्रीराम, जयराम जयजयराम..श्रीराम, जयराम जयजयराम.. ” अद्वैतच्या वडिलांनी शववाहिकेच्या खिडकीतून बाहेर बघत हात जोडले. हळू हळू वेग घेत ती गाडी  इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर पडली. आजूबाजूला हुंदके देत उभ्या  मुलामुलींनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी ठेवली. चौदा पंधरा वर्षांची ती मुलं मुसमुसत  रडू लागली.
पुन्हा डोळे पुसून मी वर पाहिलं. निरभ्र आभाळ. चांदण्यांचे क्षीण डोळे. हवेत किंचित गारवा. डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून दिसणारी इस्पितळाची भव्य इमारत. वेगवेगळ्या विभागांच्या पाट्या. त्यातल्या पहिल्या मजल्यावरचा अतिदक्षता विभाग. त्यातली एकशे तीन क्रमांकाची खोली. आणि आता त्या खोलीत नसलेला अद्वैत. कुठेच नसलेला अद्वैत. सर्व जाणिवांच्या पलीकडे गेलेला अद्वैत. 
हे असं होणार याची मानसिक तयारी करायला दोन आठवडे मिळाले होते. पंधरा दिवसांपूर्वी अद्वैत रानडेला बसची धडक बसली आणि तेंव्हापासून तो अत्यंत गंभीर अवस्थेतच होता. रोज त्याच्याविषयी वेगवेगळ्या, पण निराशाजनकच बातम्या येत होत्या. त्याच्या शाळेतले मित्र आणि त्या मित्रांचे आमच्यासारखे पालक – आम्ही सगळेच प्रचंड तणावाखाली होतो. काही चमत्कार झाला, तरच तो यातून वाचेल, हे उघड झालं होतं. पण  असला काही चमत्कार सहसा होत नाही, हे वैज्ञानिक मत खोटं ठरावं, असं अंतर्मन सतत म्हणत होतं.
आणि आता हे सत्य पचवताना मन बधीर झालं होतं. मानवी प्रयत्न, योजना, अभिलाषा, महत्त्वाकांक्षा यांच्यातला फोलपणा ध्यानात यावा असा हा क्षण. सगळं समजून काहीच न समजण्याचा हा क्षण.
अद्वैत हा माझ्या मुलाचा वर्गमित्र. दहावीतला. या वयातली मुलं जशी उत्साहानं आणि जीवनरसानं रसरसलेली असतात तसा. बोलक्या डोळ्यांचा हा चुणचुणीत मुलगा लहानपणापासून घरी यायचा. त्याची बुद्धीमत्ता, त्याने मिळवलेली बक्षिसं, त्याचं गाणं, लहानपणापासून त्यानं नाटकात केलेली कामं याचं कौतुक वाटायचं. वाढदिवसाला एखाद्याच्या घरी जमायचं, काहीतरी भरपूर हादडायचं,एका खोलीत जमिनीवर गाद्या घालायच्या आणि रात्रभर गप्पा, मोठमोठ्यांदा हसणं, रात्री मध्येच उठून रस्त्यावर भटकायला जाणं असं करून रात्र जागवायची असले या मुलांचे  प्रकार बरेच दिवस होत असत.  पुढं ही मुलं मोठी झाली तशी हळूहळू पालकांपासून सुटी होत गेली. मग त्यांचे आपापसात चाललेले खालच्या आवाजातले संवाद, एकमेकांना टाळ्या देऊन मोठ्यांदा हसणं, वरती घरात न येता तासनतास फाटकाशी आपापल्या सायकलींना रेलून गप्पा मारत राहाणं , एकमेकांना एसेमेस फॉरवर्ड करणं व  नेटवर चॅटिंग करत राहाणं सुरू झालं. त्यांचे कोवळे चेहरे आता काहीसे निबर होऊ लागले. बऱ्याच दिवसांनी त्यांच्यापैकी कोणी दिसला तर तो अचानकच ताडमाड उंच झाल्यासारखा वाटत असे. लहानपणी गोबरे गाल असलेल्या कुणाचा चेहरा एकदम बदलल्यासारखा वाटे. कुणाच्या ओठावर मिशीची रेघ उमटल्यासारखी वाटे. धड बालपण नाही, धड तारुण्य नाही अशा या आडनिड्या वयातली ही मुलं, त्यांचे कधी बालीश तर कधी प्रौढ असे विचार, त्यांचे ग्रूप्स आणि त्यातली घट्ट मैत्री हे बघताना मजा येत असे.  स्वतःच्या भूतकाळात चालत जाण्यासारखेच असे ते. दहावीचं वर्ष, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या शिकवण्या, पुढचे बेत यात गढून गेलेला असे. त्यातूनच एकत्र येऊन कधीतरी त्यांची धमाल चाले. आता त्यांचे वाढदिवस मॅक्डोलाल्डसमध्ये व्हायला लागले होते. मध्येच कधीतरी ही मुलं गंभीरपणानं ‘ आता आम्ही सगळे एकत्र असं हे शेवटचंच वर्ष. पुढया वर्षी कोण कुठल्या कॉलेजात असेल, मग आम्ही सगळे एकत्र असे कसे भेटणार? ‘ असा विचार करत.

आणि अचानक एखादा आघात व्हावा तशी अद्वैतच्या अपघाताची बातमी आली. तो अतिदक्षता विभागात आहे आणि अत्यंत गंभीर अवस्थेत आहे हे सांगताना माझ्या मुलाचा आवाज कापरा झाला होता. आणि ते कापरेपण लपवणे काही त्याला जमत नव्हते. शर्थीचे वैद्यकीय उपचार सुरुच होते. शाळेत त्याच्यासाठी प्रार्थना सुरू झाल्या. एरवी उत्साहानं फुललेल्या या मुलांचे चेहरे एकदम काळवंडून गेले. त्याला इस्पितळात भेटण्याची तर कुणालाच परवानगी नव्हती. पण त्याच्या पालकांना भेटून आलेली ही मुलंही दबकल्यासारखी झाली होती.  ’आपण त्याला हाका मारू आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ते त्याच्या उशाशी वाजवत राहू म्हणजे तो लवकर जागा होईल’ असं या मुलांचं त्याच्या मित्रांशी बोलणं ऐकलं  आणि मी त्या खोलीतून बाहेर पडलो. ‘बाबा, ही इज सिंकिंग’ असं माझ्या मुलानं मला नजर टाळत सांगितलं आणि त्याचाकडं बघून काही बोलणं मलाही जमलं नाही.  

आणि आज हे. 

इस्पितळात अद्वैतच्या वडिलांना सामोरं जायचा धीर होत नव्हता. सर्वस्वाची होळी होत असताना गुढग्यांना मिठी घालून एकटक नजरेने समोर पाहात ओढ्याकाठी बसलेले ‘बिटाकाका’ आठवले. ‘त्याला भेटा, तो एकशे तीनमध्ये आहे.. ‘ ते कसेबसे म्हणाले. त्यांच्या ‘भेटा’ या शब्दाने आतवर खोल काहीतरी भळभळू लागलं.

भेटलो. मृत्यूची चिरशांती पांघरलेला अद्वैत. पंधरा वर्षांत संपून गेलेलं एक आयुष्य. मन पूर्ण कोरं करणारा क्षण.

परत निघालो. गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. माझ्या मुलाशेजारी त्याचा एक मित्र बसला होता. एरवी दिवसेदिवस तरुण होत जाणारी ही मुलं आता अगदी लहान, अगदी असहाय वाटत होती. हवा अगदी स्वच्छ होती. माझ्या चष्म्यामागे मात्र मळभ दाटून येत होते. 

घरी आलो. अंथरुणावर पडलो. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. विविध प्रसंगांचे, आठवणींचे तुकडे मनात उलटेसुलटे फिरत होते. मृत्यूच्या विक्राळ दर्शनाने बावरलेल्या, हादरून गेलेल्या त्या कोवळ्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोरून हालत नव्हते. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.
शेवटी उठलो. एक आवडते पुस्तक काढले. शेवटचे पान उघडले आणि वाचू लागलो…

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मिकी नाहीसे झाले. त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठेतरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.
अशव्त्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित ‘समजत नाही, समजत नाही’ असे म्हणत एक उच्छ्वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात’ समजत नाही, समजत नाही, समजत नाही’
की ‘समजत नाही, समजत नाही ’ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील?  ते देखील समजत नाही .

धुक्यातून उलगडणारे जी ए – समारोप

August 16, 2009 by sanjopraav

दुःख, हळवेपणा आणि जी ए

‘धुक्यातून उलगडणारे जी ए’ ही लेखमालिका लिहिताना एक लेखक आणि त्याहीपलीकडचा एक माणूस म्हणून जी. ए. कुलकर्णींचा शोध घ्यावा असे मनात होते. आता या लेखाद्वारे ही मालिका संपवताना त्यातले फारसे काही हाती लागले नाही, अशी असमाधानाचीच भावना मनात जास्त करून आहे. याचे एक कारण असे, की जी. एंचे व्यक्तिमत्व इतके गुंतागुंतीचे आणि बहुरंगी आहे, की आता केवळ त्यांचे लिखाण आणि त्यांच्या आठवणी यांवरून त्याचा धांडोळा घेणे अशक्यप्राय वाटते. ही मालिका लिहावीशी वाटली याचे प्रमुख कारण म्हणजे जी. एं. च्या निवडक पत्रांचे प्रकाशित झालेले चार खंड. या मालिकेच्या निमित्ताने हे खंड अक्षरशः अनेकदा वाचावे लागले / वाचता आले… माझ्या दृष्टीने हेच या मालिकेचे फलित आहे. पण तसे करत असताना हा अनेक मितींचा लेखक आपल्या हाती शतांशानेही लागला नाही ही अतृप्तता प्रकर्षाने जाणवते. ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ मधील मास्तर कुणाला तरी म्हणतात. ‘याच्या डोक्याचे टोपण काढून आत काय चालले आहे, हे बघण्याची सोय असती तर.. ‘ जी. एं. च्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी त्यांची पुस्तके आणि त्यांची पत्रे यांतून हा माणूस आपल्याला कितपत कळाला याचा शोध घेताना, बहुदा काहीच कळाला नाही, असा अस्वस्थ करणारा विचार मनात येतो.
पण ते असो. जी. एं. च्या कथांमधील दुःख आणि जी. एं. चा वैयक्तिक जीवनातील हळवेपणा – संवेदनशीलता म्हणूया फार तर – यावर चार शब्द लिहून ही मालिका संपवावीशी वाटते. जी. एं. च्या बहुतके कथा या शोकांतिका आहेत, त्यात कुठे आशावादाचा किरण दिसत नाही, माणसाची हतबलता आणि नियतीशरणता या एकाच सूत्रावर त्यांच्या सगळ्या कथा बेतलेल्या आहेत- जी. एं. च्या लेखनावरील हा दुसरा मोठा आरोप. पहिला अर्थातच त्यांच्या लिखाणातल्या भाषेवरचा आणि त्या भाषेतील प्रतिमाप्रेमावरचा.
असे काय जगावेगळे दुःख या माणसाच्या वाट्याला आले असावे ज्यामुळे याचे सगळे आयुष्यच यातनेने गच्च गच्च होऊन गेले? याचा शोध घेऊ जाता जी. एं. ना लहान वयातच आलेले पोरकेपण आठवते. त्यांच्या (पत्र) लेखनात त्यांच्या एक सावत्र भावाचा उल्लेख येतो, पण तेही काही घट्ट माहेरनाते नसावे. इंदू, सुशी आणि जाई या तीन सख्ख्या बहिणी अगदी अकाली मरण पावल्याने त्यांच्या आयुष्यातल्या ‘बहिणीचे प्रेम’ या विषयावर प्रकाश पडल्यासारखा वाटतो.
जी. एंना त्यांच्या प्रकृतीने कधी चांगली साथ दिली नाही. विशेषतः पन्नाशीनंतर त्यांना कित्येक वर्षांपासून छळणारी पोटदुखी अधिकच त्रासदायक होत गेली. शेवटच्या दहा-बारा वर्षांत जी. एंनी म्हणावे असे काहीच लिहिले नाही ( सन्माननीय अपवाद म्हणजे ‘माणसे अरभाट आणि चिल्लर) याचे हेही एक कारण असावेसे वाटते . कैक वर्षे असह्य पोटदुखी आणि तिच्यावर वर्षानुवर्षे केलेले विफल उपचार आणि त्यांत खर्च झालेला वेळ, पैसा आणि शेवटी हाती उरलेला फक्त मनस्ताप – यामुळे एखादा माणूस पूर्ण खचून लोळागोळा झाला असता. धारवाडला असताना जी. एंना वारंवार फ्लू आणि खोकला यांनी त्रस्त केले होते. यातून बाहेर पडले की त्यांना विलक्षण अशक्तपणा येत असे. (आपल्याला खोकल्यावर अडुळसा हे औषध सुचवणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी मिष्किलपणाने लिहिले आहे, ‘ तुमच्या पत्नीचा खोकला अडुळशाने गेला, करण तो साधा खोकला होता, माझा खोकला हा एक इरसाल ‘हार्डंड’ स्मोकरचा आहे! ). हे इतके कमी की काय, म्हणून त्यांना नंतर मोठा दृष्टीदोष झाला. त्यांच्या डोळ्यांना रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या दुर्बळ झाल्या, आणि जी. एंची दृष्टी अगदी मंद झाली. मला वाटते, या ठिकाणी जी. एंनी आपले बस्तान आवरायला सुरवात केली असावी. ‘माझे वाचन संपले, की मी संपलोच’ असे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे. तरीही ते आपल्या अधू डोळ्यांनी पुण्यात – त्यांच्या नावडत्या पुण्यात चांगल्या वाचनीय (इंग्रजी) पुस्तकांच्या शोधात भटकत राहिले. फक्त शेवटचा ल्यूकेमिया हा त्यांनाही अनपेक्षित असावा. पण या अखेरच्या पाहुण्याचे त्यांनी अगदी मनापासून स्वागत केले असले पाहिजे, यात मला तरी तिळभर शंका वाटत नाही.
आपल्या लिखाणाच्या बाबतीतही जी. ए. कायम असमाधानीच राहिले; किमान तसेच त्यांनी इतरांना लिहिले आहे. ‘आपल्या कथा म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या आयुष्यात पाहिलेल्या व्यक्तींना वाहिलेली तिलांजली (जी. एं च्या भाषेत ‘तर्पण’) आहे’ असे ते म्हणतात, पण आपल्याला जे लिहायचे होते त्यातले काहीच कागदावर आले नाही अशी एक खंत त्यांना वाटत राहिली. कदाचित उत्तमोत्तम जागतिक साहित्य वाचल्यानंतर अशी खंत प्रत्येक विचारी लेखकालाच वाटत असावी. त्यातून आपल्याला आपल्या कथांमध्ये म्हणायचे काय होते, आणि वाचकांनी, समीक्षकांनी त्यांचा अर्थ काय लावला यातली तफावत त्यांना अस्वस्थ करून जात असावी. शेवटी ‘Is it worth it?’ हा त्यांना पडलेला प्रश्न हेच सांगून जातो. ‘प्रदक्षिणा’ या त्यांच्या कथेबाबत मी पूर्वी लिहिले होतेच. तेच त्यांच्या ‘पुनरपि’ या कथेबाबत झाले. या कथेच्या शीर्षकातच असा ठळक संकेत (‘पुनरपी जननं पुनरपी मरणं’) ठेवूनही या कथेचे आकलन फारच मोजक्या लोकांना झाले, हे त्यांना या कथेचे, पर्यायाने आपल्या लिखाणाचे अपयश वाटत होते. तेच ‘तळपट’ बाबत, तेच ‘माणसाचे काय, माकडाचे काय’ बाबत… आणि शेवटी त्यांच्या रुपककथा (जी. एं चा शब्द ‘दृष्टांतकथा’) सामान्य वाचकाने ‘पार अगम्य बुवा! ‘ म्हणून मोडीत काढल्यावर तर त्यांना ‘Is it worth it? ‘ असा प्रश्न पडणे स्वाभाविकच होते. ‘आपल्या कथा लिहून झाल्यावर आपण त्यांतून मुक्त होतो, आपल्या त्यांच्याशी अंघोळीपुरताही संबंध राहात नाही, आणि मग आपले वाचक, समीक्षक त्यांच्याविषयी काय म्हणतात याच्याशी आपल्याला काहीही घेणे असत नाही’ हा त्यांचा पवित्रा बाकी त्यांनी घातलेल्या अनेक मुखवट्यांपैकी एक असला पाहिजे. एरवी जी. एंसारख्या कमालीच्या हळव्या, संवेदनशील माणसाला वाचन, लिखाण या त्यांच्या आयुष्याचाच एक भाग होऊन गेलेल्या बाबतीत इतके जाड कातडीचे होणे शक्य नाही
जी. एंची ही संवेदनशीलता जशी त्यांच्या अनेक कथांमधून व्यक्त झाली आहे, तशीच त्यांच्या वैयक्तिक पत्रव्यवहारातूनही. या बाबतीत जी. एंनी लिहिलेली दोन पत्रे जशीच्या तशी उधृत करावीशी वाटतात. पैकी एक पत्र त्यांनी आपला लाडका लव्हबर्ड (बडरिजर) -नाद -गेल्यानंतर आपल्या बहिणीला लिहिले आहे. ते म्हणतातः
प्रिय नंदा,
एक वाईट बातमी.
नादचे छोटे निळे आयुष्य शुक्रवारी संपले. चार दिवसांपूर्वी अचानक त्याच्या पायातील शक्तीच गेली. दांडीखेरीज तो इतर कुठे बसत नसे. त्यामुळे खालून वर जायच्या धडपडीत तो वरचेवर खाली पडायला लागला. मला स्वतःला असल्याबाबतीत काय करायचे माहीत नाही आणि येथे पक्षांच्याबाबतीत (पुण्या-मुंबईप्रमाणे) डॉक्टर मिळत नाहीत. आम्ही शक्य होते ते केले. प्रभावतीने त्याच्यासाठी खालीच कापडाची गादी केली व ती त्याला हातात धरून दाणेपाणी देत होती. गुरवार रात्री तर तिने त्याला रात्रभर हातावरच ठेवले, पण या साऱ्याचा काही उपयोग झाला नाही. मी त्याला हातात घेतले तेंव्हाच मी तिला सांगितले की हा दोन दिवसांपेक्षा टिकायचा नाही. तो आमच्याजवळ दहाअकरा वर्षे होता. त्या पक्षांचे वय बारा ते पंधरा वर्षे असते, असे मी वाचले होते. कदाचित वार्धक्यामुळे हे आज ना उद्या होणार होतेच, पण झाले तेंव्हा आम्हाला एकदम फार व्याकूळ वाटले हे खरे. दोन दिवसांत त्याला झालेला त्रास पाहून मला मात्र वाटले, जर तो सुधारणार नसेल, तर शक्यतो लवकर तो संपलेलाच बरा.
तो घराचा एक भागच झाला होता. दोनचार चिमूट दाणे, थोडे पाणी, आणि कोथिंबीर एवढीच त्याची अपेक्षा, व तेवढ्यासाठी तो उत्साहाने गरगर फिरत असे. मुंबईला मी अनेक पक्षी पाहिले, त्यांत उत्साहाने तो एकदम पुढे आला, म्हणून मी त्याची निवड केली होती. तो वाढला, त्याला पिलेही झाली आणि आता सगळेच संपले.
सकाळी देवपूजेच्या वेळी घंटा वाजली की तो हटकून वरून ओरडत असे. आता मला सकाळी फार चुकल्यासारखे वाटते.
सगळ्याच गोष्टींची सवय होते त्याप्रमाणे या गोष्टीचीही सवय होईल.या आधीदेखील दोनचार पक्षी गेलेच. पण नादची गोष्ट निराळी. त्याच्या आठवणीने एकदम उदास वाटते. पण मुक्कामाचे दिवस ठरलेले असतात. आता अनेकदा वाटते, पक्षी वगैरे जिवंत गोष्टींच्या भानगडीत आपण पडायला नको होते, म्हणजे आपण होऊन आणलेली ही व्यथा सहन करावी लागली नसती.
पण मग त्याचे मऊ निळे अंग, त्याचे हातावर येऊन दाणे टिपणे आठवते, व व्यथेला मऊपणा आहे हेही जाणवते.
त्याचे राहणे तेवढेच होते. ती आठवण मी आमच्या बागेत लिंबाच्या झाडाखाली झाकून टाकली.
बराय.
तुझा,
जी. ए. कुलकर्णी
असेच एक व्याकूळ पत्र जी. एंनी श्री. पु. भागवतांना लिहिले आहे – माधव आचवल गेल्यानंतर. त्यात ते म्हणतातः

माधवविषयी श्री. भटकळांचे पत्र आले. मी थोडा वेळ खिळल्यासारखा झालो. तो आजारी होता हेदेखील मला माहीत नव्हते. त्याच्या मागच्या attack विषयी माहिती होती, पण ती फार जुनी गोष्ट.
माझ्या केवळ सुदैवाने मिळालेला हा एक रसिक मित्र. त्याने पुष्कळ पत्रे लिहिली. मोठ्या त्वेषाने वादविवाद केला. हळुवारपणे पुस्तकांविषयी लिहिले. मला वाटते, रस्त्यात पोरे गोट्या खेळतात त्यावर जरी त्यीने लिहिले असते तरी ते ताजेतवाने वाटले असते. झाडांच्या बाबतीत man with a green thumb म्हणतात त्याप्रमाणे तो होता. त्याने थोडे लिहिले; पण ते सोन्याच्या नाण्याप्रमाणे झगझगीत, बिनगंज आहे. (‘किमया’ सारखे दुसरे पुस्तक तुमच्या व भटकळांच्या यादीत नाही)
त्याने कधी कविता लिहिल्या की नाही, हे मला माहीत नाही. पण तो कवीसारखा जगला. मला त्याने कवीप्रमाणे पत्रे लिहिली. त्यामुळे मला आज एखादे गीत संपल्यासारखे वाटते. गीत आणि गीताबरोबर तो आवाजही कायमचा!
काही लिहिले तर आता शब्द टरफलाप्रमाणेच वाटतील.
Farewell, my friend. I am sure wherever you are, you will create a small, sun-filled garden around you.
And a small bird will come, and sing, not specially for you, but only for you.
हे वाचल्यानंतर हा तथाकथित माणूसघाणा, तुसडा, एकटा राहाणारा माणूस आतून किती नाजूक, हळव्या मनाचा होता, याची कल्पना येते.
या अक्षम्य दुर्गुणाच्या – दुर्गुणाच्याच म्हणतो-जोडीला जी. एंमध्ये संकोच आणि स्वाभिमान – पराकोटीचा तीव्र स्वाभिमान- हेही दोन भीषण दुर्गुण होते. ‘काजळमाया’ या त्यांच्या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले, पण काही तांत्रिक बाबींवरून त्यावर वादंग निर्माण होताच जी. एंनी ते सडेतोडपणाने परत करून टाकले. या बाबतीत त्यांच्या असंख्य चाहत्यांनी, मित्रांनी, समकालीन लेखकांनी आणि शेवटी साहित्य अकादमीनेही केलेली रदबदलीचे प्रयत्न त्यांनी कठोरपणे धुडकावून लावले. कुणाच्या घरी जेवायला जाणे असो (मग ते त्यांच्या अगदी जवळच्या सुनीताबाई देशपांड्यांच्या घरी का असेना! ) की कुणाकडून कसल्या साध्या भेटी (त्यांच्या आवडीचे दुर्मिळ पुस्तक ते सिगारेटचे एखादे पाकीट! ) स्वीकारणे असो, जी. ए. अत्यंत संकोची आणि अवघडलेले राहिले. आपल्या पुस्तकांचे सगळे अधिकार प्रकाशकाला देऊन टाकणे आणि आणि पुस्तकांची दुसरी आवृत्ती काढायलाही नकार देणे या अत्यंत अव्यवहारी गोष्टींमागेही त्यांचे हेच अवघडलेपण असावे, असे वाटते. अमोल पालेकरांनी त्यांच्या कथेवर चित्रपट काढण्यासाठी (‘कैरी’) त्या कथेचे अधिकार जी. एंकडून विकत घेतले आणि त्याबाबत जी. एंना काही रक्कम दिली; तर हा चित्रपट काढण्यास विलंब होत आहे असे दिसल्यावर जी. ए. कमालीचे अस्वस्थ झाले व त्यांनी ती रक्कम पालेकरांना (हातकणंगलेकरांतर्फे) परत करण्याची तयारी दाखवली, हे असेच एक दुसरे उदाहरण.
अशा या कापूसमनाच्या माणसाला व्यावहारिक जगात ‘तयार’ असलेल्यांनी धक्केही बरेच दिले. पैशांच्या बाबतीत त्यांची फसवणूक झाल्याचे किमान दोन पुसट उल्लेख त्यांनी लिहिलेल्या पत्रांत (अगदी नाईलाज म्हणून) येतात. आपल्या पुस्तकांचे मुद्रण, त्याचे मुखपृष्ठ याबाबत अतिशय आग्रही काटेकोर असलेल्या जी. एंना त्यांच्या काही चित्रकार मित्रांनी ऐन वेळी दगा दिल्याचे संदर्भ वाचूनही वाईट वाटते. त्यांचे अखेरच्या काळातले प्रकाशक आणि त्यांच्या पुस्तकांवरील मुखपृष्ठाचे चित्रकार यांच्यात जी. एंच्या मृत्यूनंतर ‘आपणच जी. एंच्या अधिक जवळचे कसे होतो’ हे दाखवण्याची चढाओढही आपल्याला व्यथित करून जाते. दळवींसारखा जी. एंचा घट्ट मित्र शेवटच्या काही वर्षांत जी. एंची चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवत नाही (कारणे काहीही असोत! ) आणि सुनीताबाई देशपांड्यांबरोबरचेही अत्यंत दीर्घ आणि खोल मैत्रीसंबंध हळूहळू विरून जातात… जी. एंविषयी मनात करुणा भरून येते.
आणि मग मृत्यूआधी जेमतेम दोन-तीन महिने जी. एंनी हातकणंगलेकरांना लिहिलेले ते (इंग्रजी)पत्र. बहुदा जी. एंनी लिहिलेले शेवटचेच पत्र. त्यातही जी. ए. काही नवीन वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहितात, आणि शेवटी म्हणतात, (मूळ परिच्छेदाचे मराठी भाषांतर करण्याचे धाडस माझे! )
‘तुम्ही म्हणता, हातकणंगलेकर, की मी आता पुण्यात हळूहळू रुळत चाललो आहे. तुमचे म्हणणे अगदी चूक आहे. पुण्यात मी कधी रुळू शकेन, असे मला वाटत नाही. फक्त आता या बाबतीत मी कुणाशीही काही बोलायचे नाही, असे ठरवले आहे. विशेषतः प्रभावती आणि नंदाशी. त्यांना मग फार वाईट वाटते…’
या मालिकेच्या निमित्ताने या अरभाट लेखकाची लेखकापलीकडील एक अरभाट माणूस म्हणून मला ओळख झाली हेच मला पुरेसे आहे. हे लेख लिहायला सुरवात करताना माझी जशी चाचपडल्यासारखी अवस्था होती, तशीच आजही आहे; पण मी हे लिहावे म्हणून मला वरचेवर उत्तेजन देणाऱ्यांचा आणि बरेवाईट प्रतिसाद देणाऱ्यांचा मी आभारी आहे.

नफरत करनेवालोंके..

August 10, 2009 by sanjopraav

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही अविस्मरणीय विनोदी नटांमध्ये माननीय श्री. देवानंदजी यांचे नाव घ्यावे लागेल. कारकिर्दीच्या पूर्वार्धातील त्यांचा तो केसांचा कोंबडा, त्यांची ती पक्षाघात झालेल्या तरसासारखी चाल, संधीवातावर उपचार म्हणून व्यायाम घ्यावेत तशी ती त्यांच्या सांध्यांची हालचाल वगैरे. ‘पाकिटमार’ मधल्या ‘ये नयी नयी प्रीत है’ या सुरेल गाण्यावर देवानंदजी स्प्रिंगच्या बाहुलीसारख्या हालचाली करतात. ‘मुनीमजी’ मधली गाणी बघताना तर हसू आवरत नाहीच, पण त्या गाण्यांच्या चित्रीकरणाच्या वेळी कॅमेरामन आणि सहकलाकारही हसून हसून खाली पडले असतील, असे वाटते.वर्षानुवर्षे फक्त सॅलडस खात राहिल्याने त्याने आपली कटी अगदी होती तशी राखली (त्याचे बुद्धीही अगदी होती तशी राहिली, हा त्यातला खेदाचा भाग! ) आणि पन्नाशीतही आपले देखणे रुप टिकवून ठेवले. (देवानंदचे वजन वाढले नाही, कारण त्याला क्रॉनिक आमांश आहे अशी एक फाजील वदंता आहे, पण ते सोडून देऊ! )
पण हा देवानंद हाच हिंदी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट हीरो. खराखुरा आणि एकमेव चॉकलेट हीरो. ‘ज्युएल थीफ’ मध्ये ‘एक ऐसा हार पेश करुंगा जो आपके गले से लगकर हार नही बल्की जीत लगेगा’ हे तो असं काही म्हणाला की तनुजा राप्पकन त्याच्या प्रेमातच पडली. ‘तू कहां ये बता’ असं म्हणत त्यानं आवाहन केलं आणि सिमल्यातल्या थंड रात्री दरवाजा उघडून नूतन त्याला सामोरी आली. ‘तीन देवियां’ एकाच वेळी त्याच्या प्रेमात असणं शक्य आहे असं वाटावा तो देवानंद. सोनपापडीसारख्या साधनानं ज्याच्यासाठी ‘तेरा मेरा प्यार अमर’ अशी आळवणी करावी असा एकमेव देवानंद. अशा या देवानंदला काही मोजक्या चित्रपटांत त्याचाच भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याच्या दिग्दर्शनाचा परीसस्पर्श झाला आणि देवानंद चक्क चांगले काम करून गेला. विजयानंद हा खरं तर एका वेगळ्या लेखाचाच विषय आहे. गोल्डीने देवानंदमधले गुण ओळखले आणि त्याच्यासाठी अनुरुप अशा भूमिका लिहिल्या. गोल्डीच्या दिग्दर्शनाखालीच देवानंद ताब्यात राहिला, आणि म्हणूनच गोल्डी -देव या जोडीने काही फार मनोरंजक, फार वेगळे चित्रपट दिले. आर. के. आर. नारायणच्या कथेवर गोल्डीने ‘गाईड’ केला, ए. जे. क्रॉनिनच्या ‘सिटाडेल’ वर ‘तेरे मेरे सपने’ केला, बरीच उधार उसनवारी करून ‘ज्युएल थीफ’ हा भन्नाट प्रकार केला. अशातलाच एक तद्दन गुन्हेगारी मसालापट म्हणजे ‘जॉनी मेरा नाम’. १९७० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे विजय आनंदच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाची, संवादलेखनाची, सर्व कलाकारांच्या अभिनयाची आणि गीत संगीताची जमून आलेली भट्टी. कोणताही सामाजिक संदेश नाही, कुठल्या प्रश्नाला हात घालणं नाही, काही नाही. फक्त करमणूक. शंभर टक्के अस्सल, निर्भेळ आणि दर्जेदार करमणूक. पण अगदी बांधेसूद आणि घट्ट पीळ असलेली करमणूक.
१९७० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही ताजातवाना वाटतो.हेमा मालिनी ही या सिनेमात केवळ – या शब्दाबद्दल माफ करा – ‘चिकणी’ दिसते. जुन्या जमान्यातला ‘मारू’ हा शब्द इथे वापरावासा वाटतो. पन्नाशीतला देवानंद आणि ऐन तारुण्यातली हेमा मालिनी यांचा जोडा अगदी रती मदनाचा वाटतो. देवानंदची या चित्रपटातली भूमिका बॉंडसारखी मिष्कील आहे. या रुपवान रेखाच्या आपण प्रेमात कसे पडलो याचा खुलासा प्राणजवळ करताना ‘जब दरवाजा खुला… ‘ हा लांबलचक संवाद देवानंदची मिमिक्री करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता. हेमा मालिनीही देवानंदच्या तोडीस तोड वाटते. कुठेही तिचे नवखेपण या चित्रपटात दिसत नाही. प्रेमनाथ या नटाने रणजीत आणि राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग या भूमिका झोकात केल्या आहेत. त्याची ऐयाश वासनांध वृत्ती, स्वार्थी, कुणावरही विश्वास न टाकणारा स्वभाव आणि ‘हुस्न के लाखों रंग’ या गाण्याच्या वेळी शरीरात पेटत चाललेली वासनेची आग दाखवणारी त्याची देहबोली. प्रेमनाथला चांगले दिग्दर्शक मिळाले की तोही बऱ्यापैकी काम करत असे. (दुसरे पटकन आठवणारे उदाहरण म्हणजे ‘बॉबी’ मधला जॅक ब्रिगांझा, तिसरे गोल्डीच्या दिग्दर्शनाखालचेच ‘तीसरी मंझिल’ चे). तसेच प्राणचेही. प्राणचा मेलोड्रामा भरात असताना (शम्मी कपूर, मनोज कुमार हे हीरो आणि प्राण व्हिलन असलेल्या अनेक चित्रपटातला, उदाहरणार्थ) त्याच्याकडून नैसर्गिक अभिनय करवून घेणम हे निर्विवादपणे दिग्दर्शकाचं कसब मानावं लागेल. (दुसरे उदाहरण ‘परिचय’ चे) प्राणने ‘जॉनी मेरा नाम’ मध्ये मोतीच्या भूमिकेत बहार आणली आहे. मोतीची स्वामीनिष्ठा, तरीही मालकाच्या ऐयाश वृत्तीबद्दलची त्याची नाराजी ही प्राणने सुरेख दाखवली आहे. प्राणच्या करड्या आवाजाचा विजय आनंदने छान वापर करून घेतला आहे. मुलीचे अपहरण केलेल्या पंडिताला बोलावताना त्याने ‘पंडितजी इधर’ असे काही म्हटले आहे की ज्याचे नाव ते. ‘हेमा मालिनी गुन्हेगारी काम करायला नकार देते तेंव्हा ‘रायबहाद्दून भूपिंदरसिंगकी बेटी ये कह रही है?’ या प्रश्नातला खवचटपणाही तसाच. आता ‘जॉनी…’ इतक्यांदा बघितल्यानंतर मोतीच्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पनाही करवत नाही.
सामान्य नट-नट्यांकडून असामान्य काम करून घेणे हे चांगल्या दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. आय. एस. जोहर या आचरटसम्राटाकडून विजय आनंदने धमाल काम करून घेतले आहे. जीवनही टेचात वावरला आहे. इफिखारचा चीफ इन्स्पेक्टर मेहराही झकास. हा इन्स्पेक्टरही खेळकर आहे, आणि सोहन-मोहनचा मानलेला काका आहे. भूमिकेतल्या अशा शेडस चितारणे हे दिग्दर्शकाचे विशेष. अगदी नगण्य भूमिकेतले सज्जन आणि दुलारीही लक्षात राहातात.
‘जॉनी मेरा नाम’ मधले संवाद हे त्या चित्रपटाचे एक वेगळे बलस्थान आहे. त्याची उदाहरणे द्यायची म्हटले तर या चित्रपटाची पूर्ण पटकथाच उतरवून काढावी लागेल. ‘पलभरके लिये’ या गाण्याच्या आधीचा पूर्ण सीक्वेन्स आठवा. रायबहादुरांची चौकशी करणारी रेखा आणि तिचे प्रश्न टाळत प्रेमाच्या गोष्टी करणारा जॉनी. रायबहादुरांनी भेटायला नकार दिला हे ऐकून रेखाचे ‘जॉनी, तुम जरुर मुझसे कुछ छुपा रहे हो’ असे म्हणणे. ‘छुपाने की कोशिश कर राहा हूं’ जॉनी. ‘क्या? ‘ रेखा. ‘प्यार.. ‘ तिच्या गळ्यात हात टाकत जॉनी.त्याला हाकलून लावताना दाराच्या फटीतून घुसून खास देव अंदाजातला त्याचा प्रश्न ‘केवल इतना बता दिजीये, आप हमसे प्यार तो करतीं हैं ना? ‘
‘नहीं’
‘झूठा भी नही? ‘
‘नहीं… ‘
आणि मग ते केवळ पिक्चरायझेशन असलेले गाणे ‘पल भर के लिये.. ‘ किशोरदांचा ऐन फार्मातला आवाज आणि कल्याणजी आनंदजींची बढिया धून. गाण्याची पिक्चरायझेशनस ही तर विजय आनंदची खासियतच होती. (‘दिल का भंवर करे पुकार’,'तेरे घर के सामने’,'तुमने मुझे देखा’,'देखिये साहेबों’,'होटों पे ऐसी बात’,’ ये दिल ना होता बेचारा’ अशी सहज आठवणारी नावे.)
गुन्हेगारी पार्श्वभूमीवरच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात विजय आनंद विशेष खुलून येत असे. त्यातले बारकावे टिपण्यात विजय आनंदचा हात धरणारा कुणी नाही. हीराकडे ऐंशी लाखाचे हिरे आहेत, म्हणून त्याच्या मागावर असलेले पोलीस आणि त्यांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नातला हीरा. बंदरावर आपले सामान एका मोटारीत ठेवत असताना दुसऱ्या एका मोटारीकडे तो संशयाने बघतो. त्याचवेळी त्याला ओलांडून जाणारा एक अनोळखी माणूस पुटपुटतो, “वो गाडी पुलीस की है”
‘जॉनी मेरा नाम’ चे संवाद अगदी सहज बोलल्यासारखे आहेत. कमिशनर मेहरा काठमांडूत असताना त्यांना हीरा फोन करतो, “सुना है, बंबई के पुलीस कमीशनर यहां पर आये हुये हैं, क्या मै उनसे बात कर सकता हूं? ” दुसऱ्या बाजूला इफ्तिखारच्या चेहऱ्यावर संशय येतो. तो सावधपणाने म्हणतो, “जी.. आपने गलत सुना है. आप कौन बोल रहे हैं? ” यातला जीवनचा ‘बंबई’ हा शब्द खास त्याच्या ‘नारायण, नारायण’ स्टाईलने म्हटलेला… मजा आहे! आणि आय. एस. जोहरच्या वाट्याला तर त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम संवाद ‘जॉनी’ मध्ये आले असावेत. हीराला अटक करण्याचा प्रसंग ( व त्यातले ते ‘चू चू का मुरब्बा’ वरून झालेले भांडण!), तुरुंगात हीरा व जॉनीवर पाळत ठेवतानाचा प्रसंग, जॉनीचा नकली बाप झाल्यानंतरचा प्रसंग आणि सगळ्यावर कडी म्हणजे मोतीच्या अड्ड्यावर वेटरची आणि पर्सरची गल्लत झाल्यावरचा मिशा उपटण्याचा प्रसंग….
“पहले अपने मूछों के बारे में तो बताओ”
“मूछों के बारे में क्या बतांऊ? “
“यही की इन मूछों का क्या मतलब है? “
“क्या नामर्दों का जमाना आ गया! मूछों का मतलब बताना पडता है! अरे भाई, मूछ मर्द की निशानी होती है.. “
” सो तो है. पर तुमने क्यों लगायी है? “
“लगायी? कौन सी जुबान बोलते हो भाई”
“मैं तो हिंदुस्तानी बोलता हो. तुम कौनसी समझते हो? “
“तो भाई, हिंदुस्तानी में मूछें लगाना नही बढाना कहते हैं”
“तो ये मूछें तुमने बढाई हैं? “
आणि मग नंतर ‘खींचो इसकी मूंछे” चा गोंधळ. त्यातही व्ही. गोपालचे ते ‘पकडी गयी, पकडी गयी… ‘ हसून हसून पुरेवाट!
‘जॉनी..’ मधली गाणी सदाबहार आहेत. बाबुल प्यारे, हुस्न के लाखों रंग, मोसे मोरा शाम रुठा, नफरत करनेवालोंके, पलभर के लिये.. ही नुसती नावे आठवली तरी मनात ती धून वाजायला लागते. ‘ओ मेरे राजा’ हे त्यातल्या त्यात फिके. पण त्या गाण्याचेही पिक्चरायझेशन वाहवाच आहे. ‘बाबुल प्यारे… ‘ चा सुरवातीचा आलाप आणि मग सगळे गाणेच ऐकण्यासारखे. ”मोसे मोरा शाम रुठा मधला ‘जय जय शाम राधे शाम’ हा गजर तर नास्तिकालाही ठेका धरायला लावणारा. आणि ‘हुस्न के लाखों रंग’ तर…… असो.
तर असा हा ‘जॉनी मेरा नाम’. देवानंदच्या चाहत्यांसाठी मेजवानीच. ज्यांना देवानंद आवडत नाही अशानांही ‘नफरत करनेवालोंके सीनें में प्यार भर दूं’ या त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला लावणारा.

देव आनंद – जॉनी / सोहन
हेमा मालिनी – रेखा
प्राण – मोती / मोहन
जीवन – हीरा
प्रेमनाथ – रणजीत / राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग
आय. एस. जोहर – पहले राम / दूजे राम / तीजे राम
पद्मा खन्ना – तारा
रंधवा – बाबू
सुलोचना – सोहन आणि मोहनची आई
इफ्तेखार – चीफ इन्स्पेक्टर मेहरा
सज्जन – राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग
दुलारी – पुजाऱ्याची बायको

संगीतकार – कल्याणजी आनंदजी
निर्माता- गुलशन राय
दिग्दर्शन , संवाद, पटकथा- विजय आनंद

आयुर्वेद उवाच

July 26, 2009 by sanjopraav

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्याविषयी आम्ही अपार आदर बाळगून आहोत. एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे बाजारीकरण झाले पाहिजे या ‘सकाळ’ समूहाच्या मोहिमेत आयुर्वेदाचे कार्पोरेटायझेशन करून डॉ. तांबे यांनी आपला जो खारीचा वाटा उचलला आहे तो केवळ ‘काबिले तारीफ’ आहे असे आमचे मत आहे. हे करत असतानाच तंतोतंत ‘गरीबांचे रामदेव महाराज’ ही आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात डॉ. तांबे यांना आलेले यश पाहून तर आमचा उर भरून येतो, आणि ‘कोण म्हणतो मराठी माणूस उद्योजकतेत कमी पडतो? ‘ असे आम्हाला (दारेखिडक्या बंद करुन एकांतात) ओरडावेसे वाटते. डॉ. तांबे यांची शुक्रवारी ‘सकाळ’सोबत प्रसिद्ध होणारी ‘फॅमिली डॉक्टर’ ही पुरवणी तर आम्हाला साक्षात अमृतानुभव देऊन जाते. लहानपणी ‘चांदोबा’ किंवा ‘नवनीत’ आणि त्यानंतर काही विवक्षित रंगाच्या पातळ पॉलिथीन पेपरमध्ये गुंडाळलेली समाजवर्ज्य पुस्तके आम्ही ज्या आवडीने वाचली त्या आवडीने आम्ही हल्ली ‘फॅमिली डॉक्टर’ वाचत असतो. सांधेदुखीपासून ते मानसिक रोगांपर्यंत सगळे रोग दूर करणारे मॉडर्न धन्वंतरी आम्हाला डॉक्टरांच्या रुपात दिसू लागतात. साळीच्या लाह्या, नाचणीचे सत्त्व, उकडलेली पडवळे, दुधीचा रस यांमध्ये आम्हाला तांबड्या पांढऱ्या रश्शाचा, तळलेल्या सुरमईचा आणि सुक्क्या मटणाचा भास होऊ लागतो. शिवाय ही पुरवणी वाचल्याने आमच्या सामान्यज्ञानात अपरंपार भर पडली आहे, ते वेगळेच. एरवी ‘पिचू’ ही काय भानगड आहे, आणि त्याचे काय करायचे असते, याबाबत आमच्या मनात फार म्हणजे फारच गोंधळ होता. तो दूर केल्याबद्दल डॉ. तांब्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.
इतके सगळे व्याप मागे असताना (हो, ‘फॅमिली डॉक्टर’चे संपादन, त्यात लेख लिहिणे, वाचकांच्या शंकांना उत्तरे; एका माणसाने कायकाय म्हणून करावे? ) डॉक्टरसाहेब विविध समारंभांत उपस्थिती लावतात तेंव्हा बाकी आम्हाला जवळजवळ गहिवरुनच येते. चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव घेऊन रंगमंचावरून बाबामहाराज सातारकरांप्रमाणे सतत मंद स्मित करणाऱ्या डॉक्टरांची छबी जवळजवळ रोज प्रत्येक प्रमुख मराठी वर्तमानपत्रात (म्हणजे ‘सकाळ’ मध्ये) येत असते. आजच्या ‘सकाळ’ मध्ये आलेल्या छायाचित्रात बाकी डॉक्टरांच्या जोडीला रंगमंचावर प्रतापराव पवार, अनील अवचट, मोहन धारिया अशा नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या ऐवजी मराठीतली काही गायक मंडळी दिसली तेंव्हा अचंबा वाटला. बातमी वाचली तेंव्हा ‘जीवनसंगीत’ अर्थात गाण्यांतून आयुर्वेद किंवा आयुर्वेदातून गाणे अशी काहीशी ही भानगड आहे, असे कळाले. ‘आशयघन गाणी आणि भारतीय संगीत मंत्रांसारखेच काम करतात’ असे डॉक्टरांचे मत वाचले. जरासा गोंधळ झाल्यासारखा वाटला, (गाणी आणि मंत्र? मंत्रपुष्पांजलीऐवजी ‘कळा ज्या लागल्या जीवा’ चालेल का? गायत्री मंत्राऐवजी ‘एक लाजरा न साजरा मुखडा?’- हे आमच्या चावट मनाचे प्रश्न! ) पण नेटाने पुढे वाचत राहिलो. डॉक्टर पुढे म्हणाले काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव एकत्र येते ( ‘वर्तमानपत्रात ‘येते’ असे आहे, ते ‘येतो’ असे हवे होते’ हा आमच्या चावट मनाचा विचार आम्ही त्रिफळा चूर्णासारखा गिळून टाकला.), तेंव्हा जीवनसंगीत आकाराला येते’हे बाकी काही म्हणजे काही कळाले नाही.
मग पूर्ण लेख वाचल्यावर कळाले ते असे, की गाणी ही विशिष्ट रोग किंवा अस्वास्थ्यावरील रामबाण चिकित्सा आहे असे बालाजीपंतांना म्हणायचे आहे. त्या गाण्यांची प्रात्यक्षिके आणि त्यावर डॉक्टरांचे त्या गाण्यांचा औषधी उपयोग यावरील निरुपण असा तो कार्यक्रम होता. ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे आणि ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणे यामुळे पित्ताचे संतुलन होते, ‘मेरा रंग दे बसंती ‘ या गाण्याने हृदयातली शक्ती जागृत होते, ‘हवा मे उडता जाये’ या गाण्याने शरीराच्या नाड्या व सांधे मोकळे करण्याचा अनुभव येतो असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही चकीतच झालो! म्हणजे आता निर्मात्याला गीतकार, संगीतकाराबरोबरच एखाद्या आयुर्वेदाचार्यालाही करारबद्ध करावे लागणार तर!
तांबेजी पुढे म्हणतात, ‘शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी ‘दशरथा, घे हे पायसदान’ हे गाणे उपयुक्त आहे (बरोबर! खीरच ती! -पुन्हा आमचे चावट मन! ), तर रक्तदाब, मधुमेही रुग्णांना ‘नैनों में बदरा छाये’ हे गाणे( थ्यांक्यू डॉक्टर मदनमोहन कोहली! – पु. आ. चा. म.!). स्मृतीवर्धन आणि मेंदूचे विकार यासाठी ‘जो तुम तोडो पिया’ हे ‘सिलसिला’ चित्रपटातील मीराबाईचे भजन लागू पडेल तर हृदयविकारावर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ वर बेतलेले ‘किसीके मुस्कराहटोंपे हो निसार’ हे गाणे. ( ‘किसीके मुस्कराहटोंपे ‘ हे ‘वैष्णव जन तो वर बेतलेले? ऋषीचे कूळ? गाण्याचे मूळ?- पु. आ. चा. म.! )
चला! मग बंधू आणि भगिनींनो, मेडिक्लेमच्या पॉलिसीचा प्रीमीयम भरला नसेल, तर भरू नका! तेवढ्या पैशात काही क्यासेटी आणि सिड्या विकत घ्या. रोग खल्लास!
इन्शुरन्स एजंटाला आम्ही आजच घरी बोलावले होते. त्याला येऊ नको म्हणून फोन करावा म्हणून आम्ही फोन उचलणार तोच बालाजींचा आणखी एक अक्सीर इलाज नजरेस पडला.
बालाजी म्हणतात, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. (जिच्या केवळ दर्शनाने फास्टींग आणि पीपी दोन्ही शुगर्स वाढाव्या ती साधना, आणि तिला परमेश्वराच्या मीलनाची इच्छा? तीही अतिउत्कट? – पु. आ. चा. म.!) मलविसर्जन आणि आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे!

आमच्या हातातील रिसीव्हर गळून पडला. ‘हे गाणे सादर झाल्यानंतर ‘प्रेक्षागृहाकडून स्वच्छतागृहाकडे’ किती लांब रांग लागली’ असे विचारण्याचेही आमच्या चावट मनाला सुचले नाही!
तूर्त आम्ही आमच्या तमाम वयोवृद्ध नातेवाईकांना आणि इष्टमित्रांना त्यांच्या साठ्या आणि पंचाहत्तऱ्यांसाठी भेट देण्यासाठी म्हणून ‘बेस्ट ऑफ सलील चौधरी’ ही कॅसेट घाऊक दरात मिळेल का या चौकशीत आहोत. ग्लासभर गरम पाणी, दूधतूप, सकाळचा दुसरा चहा, ‘इसपगुल’ आणि लिक्विड प्याराफीन यांपेक्षा ही दूरगामी गुंतवणूक स्वस्तात पडेल असा आमच्या चावट मनाचा होरा आहे!

मैफल

July 15, 2009 by sanjopraav

आण्णांनी तळव्यावरची तंबाखू नीट मळून घेतली. दोन-तीनदा ती या हातातून त्या हातात अशी केली. आणि मग तिचा एक तबीयतदार बार भरला. हात झटकून टाकत ते म्हणाले, “ऐका बांडुंगअली… “
गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या बुवांनी हातातल्या सिग्रेटवरची राख झटकली. ते थोडेसे पुढे सरकले.
“माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं
सांगा राघू मी न्हाई कधी म्हटलं
आता नका रुसू
जरा जवळ बसू
खुदुखुदू हसू
दोन जिवाचं भांडण मिटलं”
“व्वा, आण्णा व्वा! ” बुवांनी दाद दिली. आण्णाही आता रंगात आले.
“नका वळवू हो मान
करा शब्दाचा मान
बघा देऊन ध्यान
माझ्या अंगावर काटं उठलं

आम्हा बायकांची सवय
नाही म्हणजेच होय
आता कशाचा संशय
राजाराणीचं नातं पटलं”
“आण्णा,आण्णा… गावरान लिहावं तर तुम्हीच! ” आण्णांचे हात हातात धरून बुवा म्हणाले. “आमची पेनं आम्ही भंगारात विकावी बघा! “
“अहो तसं नाही बुवा! ” आण्णा गमतीनं म्हणाले “गद्यनगरीचे तुम्ही सरदार, तर पद्याच्या राऊळातले आम्ही पुजारी! काय खरं की नाही रामभाऊ?”
रामदादांनी मान हलवली. दादांच्या शेजारी बसलेले साध्या शर्ट-पँटमधले लहानसर चणीचे गृहस्थ हळूच म्हणाले, “बुवा, आण्णांची लेखणी पाहिली की भाईंचे शब्द आठवतात. सगळे शब्द ‘हमारे लिये कुछ सेवा’ म्हणून उभे असतील येथे! आमच्या ‘मुंबईचा जावई’च्या वेळेची गोष्ट सांगतो तुम्हाला, बुवा. शृंगारिक गाणं पाहिजे होतं आम्हाला. शृंगारिक, पण सभ्य. जरासं सूचकही. आण्णांनी जरा विचार केला आणि एका बैठकीत ‘का रे अबोला’ लिहून काढलं. त्यातली सूचकता मी तुम्हाला सांगायला नको…
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
आणि यातलं मीटर इतकं नेमकं आहे रामदादा, की मला फारसं काही करावंच लागलं नाही. नारळात जन्मतःच पाणी असावं तशी आण्णांच्या शब्दातच चाल दडलेली असते. बाकी पुढचं काम आशाबाईंनी अगदी सोपं केलं… “
आण्णा खुशीत येऊन हसले.

पलीकडे संगीताची बैठक रंगात आली होती. “‘न तुम बेवफा हो’ ची काय चाल दिल्यायस भय्या! मान गये तुमको! ” केस आणि मिशा पिकलेल्या दादांनी त्या पंजाबी तरुणाचे हात हातात घेतले होते. “और तेरे ‘कदर जाने ना’ के तो क्या कहने! “
“आपका आशीर्वाद है दादा! ” तो पंजाबी लाजल्यासारखा झाला होता. “आपके सामने तो बच्चा हूं दादा! आप तो पारखी हो! कुठूनकुठून असली रत्नं शोधून आणता खुदा जाने! आता या तपनकुमारचंच बघा ना… ” गर्दीत मागे लपलेल्या तपनकुमारला त्या पंजाब्यानं पुढं ओढून आणलं. “कहांसे लाये इस मुलायमसी आवाज को, दादा? “
“अल्लाची देन आहे भय्या! मैं तो इक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं! या तपनलाही मी पहिला चान्स दिला खरा, पण त्याचं खरं चीज तूच केलंस भय्या! ‘बेरहम आसमां’ मध्ये काय धून आहे तुझी! आणि काय गायलाय बरखुरदार!
“शुक्रिया, दादा! मेहेरबानी.. ” तो लाजरा संकोची तरुण म्हणाला.
कोपऱ्यातून मेंडोलिनचे विलक्षण करुण सूर ऐकू आले. एक देखणी पण उग्र चेहऱ्याची व्यक्ती सगळ्यांकडे पाठ फिरवून एकटीच मेंडोलीन छेडीत बसली होती.
“आप अकेले क्यूं बैठे हो मियां? महफिलमें आ जाईये.. ” दादा म्हणाले.
“मला या वाजंत्रीवाल्यांच्यात बोलावू नका दादा. मी एकटा आहे तेच बरं आहे. “
“असं कसं म्हणता मियां…? “
“मग काय म्हणू दादा? ” त्याने मेंडोलीन खाली ठेवलं. “इस पंजाबी छोरे की तारीफ कर रहे थे आप. इतरांच्या धुना चोरून त्यावर जगणारे लोक हे.माझ्या ‘ये हवा ये रात ये चांदनी’ वरुन उचलून यानं ‘तुझे क्या सुनांऊ मैं दिलरुबा’ बांधलं. आणि हा म्हणे संगीतकार! “
“अरे हो, हो, मियां! संगीत अल्लाघरची देन आहे. आप क्यूं खफा हो रहे हो? सात सुरांवर सगळ्यांचा तितकाच अधिकार आहे.. ” दादा म्हणाले.
“हां, फार तारीफ करू नका दादा. आपकोभी नही बक्षा इसने. आपल्या ‘सीनेमें सुलगते हैं अरमां’ वरनं यानं हुबेहूब ‘तुम चांद के साथ चले आओ’ घेतलंय. खोटं वाटत असेल तर विचारा त्याला.. “
भय्या जरासा शरमला. “कुबूल मियां, कुबूल. वो तर्ज है ही इतनी प्यारी..”
“हम्म. ” तो उग्र चेहऱ्याचा माणूस म्हणाला. “पण लताकडून तू जे काही करून घेतलंस त्यासाठी एक जाम भरतो भय्या मी, खुदा मुआफ करे. माझ्याखालोखाल लताला न्याय देणारा तूच. ‘एक लता गाती है, बाकी सब रोती हैं’ असं मी म्हणालो
तर सगळी इंडस्ट्री तुटून पडली माझ्यावर. तू बाकी तेच सच आहे, हे दाखवून दिलंस सगळ्यांना. शाब्बास, शाब्बास बे फौजी. “
” पण मियां, याच लताला तुम्ही म्हणे ऐकवलं होतं, ‘ लताजी ठीक से गाईये, ये हमारी तर्ज है, उस मियां की नही’? “
“हां जरुर. आणि अगदी नौशादचं नाव घेऊन ऐकवलं होतं. अरे, लता असली म्हणून काय झालं? संगीतसे बडा कौन होता है? और हम? हम उसके पुजारी है भाई, कोई नौकर नही हैं. अल्लाचा हात डोक्यावर घेऊन पैदा झालेला असतो संगीतकार. मजाल है की कोई ऐरा गैरा हमसे ऐसी वैसी बात करें? भय्या, दुनियेला जूत्याखाली ठेवलं आपण. भूखे मर गये, पर कभी किसीके पास काम मांगने नही गये… “
त्या पंजाबी तरुणाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. “सच्ची बात मियां, सच्ची बात. ही अकड फार जालिम चीज असते. हमसे अच्छा भला कौन जाने… “
त्या उग्र चेहऱ्याच्या माणसानं मेंडोलीन उचललं. हलके हलके हिमवृष्टी सुरू व्हावी तसे हृदय पिळवटून टाकणारे करुण सूर पुन्हा हळुवारपणे बरसू लागले.

स्वत:शीच कुणीतरी म्हटलेल्या काही ओळी ऐकू आल्या आणि सगळ्यांचीच नजर तिकडे गेली.
“सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांनो, मी हीन-दीन, दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे असले तरी रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे… “
हा कोण बुवा आणि तो हे काय म्हणत आहे या अर्थाने काही लोकांनी एकमेकांकडे भुवया उंचावून पाहिले.
पण त्या काळा चष्मा घातलेल्या पाठमोऱ्या माणसाने काही मागे वळून पाहिले नाही.

दुसऱ्या एका बाजूला चारच लोक काहीतरी बोलत होते. त्यातले एक चष्मेवाले, पातळ मागे फिरवलेले केस असणारे साध्या बुशशर्ट-पँटमधले गृहस्थ म्हणाले, “मलाही माझी वाट सापडायला फार वेळ लागला. सुरवातीला सामाजिक कादंबऱ्या, कथा… कायकाय लिहिलं. अहो, तुम्हाला खरं वाटणार नाही, एक नाटकही लिहून पाहिलं. मग ठरवलं की भय्या, आपली वाट वेगळी. फारशी मळलेली नाही, फार लोकप्रियही नाही. पण हेच आपण करायचं. “
“पण कधी खंत नाही वाटली तुम्हाला? तुम्ही लोकप्रिय झालात, तुमचा स्वतःचा असा वाचक वर्ग निर्माण झाला, तुमच्या कथा कादंबऱ्या गाजल्यापण. समर्थ आणि अप्पा म्हणजे मराठीतले होम्स -वॉटसन असं लोक म्हणतात. पण… माफ करा हं, कधी पहिल्या फळीतले लेखक म्हणून तुमचं नाव आलं नाही. कुठले पुरस्कार, संमेलनाचं अध्यक्षपद असलं काही नाही. कधी… कधी आपल्यावर अन्याय होतोय असं वाटलं नाही? “
ते चष्मेवाले गृहस्थ फक्त मंदपणे हसले.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंद्यांनी सिगारचा एक दीर्घ झुरका घेतला. आपल्या चष्म्यावरून एकदा प्रतिस्पर्ध्याकडं बघून घेतलं आणि पटावरील घोडा अडीच घरं पुढं नेला. “चेक, डिकास्टा” ते म्हणाले.
डिकास्टा किंचित हसला. “वाटलंच होतं! ब्रिलियंट मूव्ह, जिवाजीराव! पण हा डिकास्टाही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. हा आला आमचा राजा पांढऱ्या घरात! “
खेळ कुतुहलानं बघणाऱ्या माणिकरावांनी अडकित्त्यात बराच वेळ धरून ठेवलेली सुपारी अखेरीस फोडली. “पन मी काय म्हनतो सीयेमसायेब, तुमी आपापसात समेट का नाय करून राह्यले. “
“अहो तसं नाही, माणिकराव…. ” जिवाजीराव म्हणाले. एवढ्यात पटावर कुणाची तरी सावली पडली म्हणून त्यांनी मान वर करून बघीतलं. साधा कॉटनचा झब्बा पायजमा, चष्मा, उधळलेले कुरळे केस, खांद्याला शबनम अशी एक किरकोळ आकृती शेजारी उभी होती.
“अरे, ये ये ये.. ” जिवाजीराव उत्साहानं म्हणाले. “तुझी वाटच बघत होतो. किती उशीर केलास? काय डिकास्टा, आता आमची बाजू झाली की नाही भक्कम? “
“तुमची? की आमची? ” डिकास्टानं मिष्किलपणे विचारलं.
“हम्म. बघूया कोणाची ते. बस, तू बस रे गड्या. “
दिगू टिपणीस शेजारच्या खुर्चीत बसला.

माझ्या संग्रहातील पुस्तके – प्रकाशवाटा

June 25, 2009 by sanjopraav

प्रकाश आमटेंच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच लिहिले पाहिजे, अशी काहीशी मनाची धारणा झाली. (आणि मग तेवढी गदगद आपल्याला लिखाणात आणता येईल की नाही, याविषयी मनात शंका निर्माण झाली!) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे!) तटस्थपणे हे वाक्य बरे आहे, ही उपमा चुकली आहे, हा शेवटचा पीळ ओ. हेन्रीसारखा, अशी चिकित्सा करता येते. आमटेंचे हे पुस्तक कोणत्याही चिकित्सेपलीकडचे आहे. काही काही लिखाणांत ‘आयुष्य नावाच्या जनावराचा वास’ इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही. ‘वो खलिश कहां से होती, जो जिगर के पार होता’ सारखे ते लेखन आपल्याला भेदून जाते.
प्रकाशवाटा’ हे मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकशाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक. वस्तुतः विलक्षण कर्तबगार माणसांच्या मुलांना फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. गांधींपासून गावसकरपर्यंत अशी उदाहरणे आहेत. ब्रॅडमनच्या मुलाने आपले आडनाव यासाठी बदलले म्हणतात. बाबा आमटे हे असेच एक आभाळउंच नाव. आमटेंची मुले सामान्य आयुष्य जगती, तर त्यांना त्याचे ओझेच झाले असते. प्रकाश आणि विकास या आमटेंच्या मुलांनी बाकी बाबांनी सुरु केलेले काम पुढे नेले आहे, वाढवले आहे. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’.
१९७३ साली सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची त्या काळातली वर्णने वाचताना अंगावर शहारा येतो. आसपास घनदाट, रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, वीज, पाणी, रस्ते… यातलं काहीही नाही, राहायला घर सोडाच, झोपडीही नाही, सपाट जागाही नाही, आणि ज्या माडिया गोंड आदिवासींच्या विकासासाठी हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही वेडे तरुण लोक घरदार सोडून या जंगलात राहायला आले, ते, भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले, शहरीकरणाचे वारेही न लागलेले , अतीमागासलेले आदिवासी लोक. अशा अवस्थेत नुसते पोकळ आदर्श आणि ”काहीतरी’ करुन दाखवायचं आहे’ अशी बालीश जिद्द कामाला येत नाही. जंगल हे पर्यटकांना कितीही मोहक वाटत असलं तरी शेवटी ही मोहकता जोवर मनात रात्रीचे डाकबंगल्यातले गरम पांघरुण शाबूत आहे, तोवरच कायम असते. निसर्गाच्या भीषण स्वरुपाशी सामना करताना सगळी शारीरिक आणि मानसिक ताकद पणाला लागते. अशा समग्र ताकदीनिशी हे झपाटलेले लोक कामाला लागले आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करुन हेमलकशाचे आजचे जे रुप आहे, ते त्यांनी साकार केले. आणि या अडीअडचणींचे स्वरुप जरी पाहिले, तरी या लोकांना प्रेरित करणारी ती कोणती लोकविलक्षण शक्ती आहे, असा प्रश्न पडतो.
भामरागड हा विभाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरचा भाग. आनंदवनापासून साधारण २५० कि.मि. अंतर. रस्ते जवळजवळ नाहीतच, म्हणून हे अंतर पार करायला चक्क दोन दिवस लागायचे. सगळा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला. हे जंगल रम्य असले तरी भयानक होते. प्रचंड पाऊस, प्रचंड थंडी आणि प्रचंड उन्हाळा. काही ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीवर पोचणार नाही इतकी घनदाट झाडी. जंगली पशुपक्षी, विषारी सापविंचू, पुरात वाटेल येईल ते गिळंकृत करणार्‍या नद्या. इथले स्थानिक म्हणजे माडिया गोंड लोक. समाजाच्या मूळ प्रवाहापासून कैक योजने दूर असलेली ही अतिमागास आदिवासी जमात. शिक्षण नाही, उपजीविकेचा निश्चित असा मार्ग नाही, लोकसंपर्क नाही आणि कागदोपत्री महाराष्ट्रात असूनही मराठी भाषेचा गंध नाही. स्थानिक माडिया बोलीभाषा ही मराठीपेक्षा संपूर्ण वेगळी अशी भाषा आहे. मागासलेपण इतके, की अंगभर कपडे घातलेला शहरी माणूस पाहिला की आधी हे लोक घाबरुन चक्क पळूनच जात.
अशा रानटी जागेवर जाऊन आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी करणे हे बाबा आमटेंसारखा माणूसच करु जाणे. बाबांचे वाढते वय बघून भामरागड प्रकल्पाचे जबाबदारी प्रकाश आमटेंनी स्वीकारली. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि या दुर्गम भागात त्यांच्याबरोबर यायला त्यांच्या उच्च्शिक्षित पत्नी मंदाताई बिनतक्रार नव्हे तर आनंदाने तयार झाल्या! कुठल्या मुशीतून असले लोक तयार होतात, कोण जाणे! हेमलकसा भागातली जमीन सरकारने या प्रकल्पासाठी देऊ केली आणि काही मोजक्या सहकार्‍यांबरोबर प्रकाश आमटे इथे आले. इथल्या अडचणींना तर अंतच नव्हता. प्रकल्पासाठी सपाट जमीन आणि राहायला तंबू ठोकायचे म्हणून साफसफाई करायला सुरवात केली, तर वनखात्याच्या लोकांनी मनाई केली. त्या काळातल्या आमटेंच्या कामाची कल्पना केली तरी हादरुन जायला होते. वीज नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, माणसंही नाहीत. होतं ते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. आनंदवनात रोगमुक्त झालेले, पण तरीही समाजानं अव्हेरलेले काही कार्यकर्ते हेमलकशाला आले होते. त्यांच्या मदतीनं प्रकाश आमटेंनी काम सुरु केलं. पण ज्यांच्या विकासासाठी हे काम सुरु केलं होतं ते आदिवासी या शहरी लोकांकडे फिरकतच नव्हते. मग माडिया भाषा शिकणं आलं, आदिवासींचा विश्वास संपादन करणं आलं, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं आलं…
आणि या वैद्यकीय उपचारांचे स्वरुप तर भीती वाटावी असे आहे. माडियांची जीवनशैली – हा शब्दतरी त्यांच्या बाबतीत लागू पडतो की नाही, कुणास ठाऊक- इतकी आदिम की प्रत्येक जण प्रचंड कुपोषणाचा बळी पडलेला असे.आंबील, भात आणि मिळेल ते प्राणी एवढंच अन्न. खायच्या प्राण्यांत अगदी मुंग्याही. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका मध्यमवयीन माणसाचं वजन केवळ २३ किलो होतं हे वाचल्यानंतर आपल्या हातातला घास तसाच राहातो.मलेरिया, सेरेब्रल मलेरिया, झाडांवरुन पडून हातपाय मोडणं, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणं असल्या या माडियांच्या समस्या. अस्वलाच्या हल्ल्याची आमट्यांनी वर्णन केलेली एक कथा मनावर एक कधीही न पुसणारा डाग पाडून जाते. डाग म्हणजे केवळ एक ठिपका नव्हे, तर एखादे लोखंडी अवजार लालभडक होईपर्यंत तापवून दिलेला चरचरीत डाग.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.आमटेंनी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला.
पण ही कथा इथे संपत नाही. त्याचे दोन्ही डोळे फुटले होते, त्यामुळे त्याला शिकार, जुजबी शेती असलं काही करणं शक्य नव्हतं. अशा बिन उपयोगाच्या माणसाला कोण आणि कसे पोसणार? त्याच्या नातेवाईकांनी त्याला खायला देणं कमी केलं, आणि उपासमारीनं तो माणूस दोन वर्षांत मरण पावला.
दुसरी अशीच एक कथा आहे ती कॉलर्‍याच्या साथीची. बांबूतोडीच्या कंत्राटदाराने जंगलात हजारो मजूर बांबू तोडण्याच्या कामावर आणले, पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे वगैरेंची व्यवस्था करण्याची त्याला काही गरजच भासली नाही. त्या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीचा वापर करायला सुरवात केली, आणि नदीचं पाणी भयानक प्रदूषित झालं. माडियांच्या वस्त्यांमध्ये कॉलर्‍याची साथ पसरली. एका रात्रीत तीनशे लोक आमट्यांकडे उपचारासाठी आले.एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. उपचारांनंतर मुलाला थोडं बरं वाटायला लागल्यावर ती मुलाला तिथंच ठेवून परत जायला निघाली. तिथल्या कार्यकर्त्यांनी तिला मुलाला पूर्ण बरं वाटेपर्यंत थांबायला सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली, “माझा नवरा काल या लागणीनं मेला. दोन मुलांना लागण झाली. त्या दोन्ही मुलांना घेऊन मी इकडं यायला निघाले, तर एक मुलगा वाटेतच गेला. त्याला झाडाखाली ठेवून मी इकडे आले. आता परत जाऊन त्याला पुरुन येते.”
‘प्रकाशवाटा’ मध्ये असे मनाचे तुकडे करणारे अनेक प्रसंग आहेत.अत्यंत बिकट परिस्थितीतून, जिवावर बेतणार्‍या प्रसंगांतून, सर्पदंश, मधमाशांचा, बिबट्याचा हल्ला, या सगळ्यांतून झगडत झगडत शेवटी जिवंत राहून हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणार्‍या काही झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंनी सुरु केलेली ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळते आहे, अधिक समर्थपणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांभाळते आहे – आमटेंच्या कथनात या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नव्हे, याचा आमटे विनयपूर्वक उल्लेख करतात. हा – त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर – ‘जगन्नाथाचा रथ’ ओढण्यात अनेक लोकांचा, संस्थांचा हातभार लागला आहे. त्यातली बरीचशी नावे आपल्याला अपरिचित आहेत – म्हणजे आपल्या परिचितांपैकी फारशा कुणाचे इकडे लक्ष गेलेले दिसत नाही. ‘पु.ल. देशपांडे फाऊंडेशन’ सारखे सन्माननीय अपवाद सोडले तर. आणखी एक सुखद धक्का देऊन जाणारे नाव म्हणजे नाना पाटेकरचे. नानाने फारसा गाजावाजा न करत या कामाला गेल्या काही वर्षांत तीसेक लाख रुपये दिले आहेत, हे वाचून त्याच्याविषयीचे मतच बदलून जाते. (तसे ते ‘प्रहार’ बघूनही बदलले होते म्हणा!)
पुस्तक वाचून होताहोता डोक्यात विचारांचा ‘गल्बला’ सुरु होतो. उत्तम पुस्तकाचे हे एक गमक मानले जाते म्हणे. पण त्यातला सगळ्यात अस्वस्थ करुन जाणारा विचार हा, की कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नाही, मनुष्यबळ नाही – अशा अवस्थेत चार लोक हे इतके आभाळाइतके मोठे काम करु शकतात. शासकीय उदासीनता ही तर आता आपण गृहीतच धरली आहे (‘ग्रेट भेट्’ मध्ये निखिल वागळेंशी बोलताना आमटेंनी याचे एक उदाहरण दिले होते. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आमटेंचे नक्की काम काय आहे, आणि ते कुठे आहे, याचा मंत्रालयात पत्ता नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शासकीय अभिनंदन आले ते आनंदवनाच्या पत्त्यावर – आणि तेही कुष्ठरोगी पुनर्वसनाचे काम केल्याबद्दल!) समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे. एक जुनी उपमा वापरायची तर ‘समुद्रातून एखादी जलपरी सुळकांडी मारुन वर यावी आणि समुद्राकडे पाठ करुन बकाबका भेळ खात बसलेल्या हजारो लोकांचे तिकडे लक्षही जाऊ नये’ असे काहीसे होते आहे. यातले चित्र थोडेसे – अगदी थोडेसे जरी वेगळे असते, तर हे चार लोक कायकाय करु शकले असते? मग लक्षात येते की सरकार आणि समाज यांच्यात थोडीशी जरी संवेदनशीलता शाबूत असती, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. प्रकाश आमट्यांनी लिहिले आहे की हेमलकशाच्या जंगलातले बहुतेक पक्षी तिथल्या आदिवासींनी खाऊन संपवले आहेत; अगदी चिमण्या कावळेही. जर आपण थोडेसे अधिक जागृत असतो, तर हजारो आदिवासींबरोबरच हे लाखो पशु-पक्षीही वाचले असते!
एका बाजूला आमट्यांच्या कामाचा अभिमान वाटावा, आणि दुसर्‍या बाजूला स्वतःची लाज वाटावी अशा दोन्ही भावना एकाच वेळी मनात जागवणारे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
प्रकाशवाटा
डॉ. प्रकाश आमटे
शब्दांकन: सीमा भानू
समकालीन प्रकाशन
१५६ पृष्ठे
किंमत २०० रुपये

खरं काय आणि खोटं काय

June 15, 2009 by sanjopraav

“दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू” गौतम म्हणाला. ” ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू कथा लिहितोस. कधीकधी चांगल्याही लिहितोस” गौतमचा स्वर किंचित मिश्किल झाला. ” म्हणून तुला वाटेल की लेखकाच्या कल्पनाशक्तीसमोर सत्य हे काहीच नव्हे. तुझ्या लिखाणातली पात्रं, त्यांचे विचार जगावेगळे, अगदी झगझगीत असतात असं वाटेल तुला. पण वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. या.. आसपास वावरणाऱ्या सामान्य, अतिसामान्य अशा लोकांच्या डोक्याची टोपणं काढून बघितली तर आत भावना, वासना, विकृती, विकार यांचं असं जाळं दिसेल तुला, की ज्याचं वर्णन करायला जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या लेखकाची प्रतिभा पुरी पडणार नाही. माणसाच्या मनाचा काही अंदाजच येत नाही बघ…”

” अरे पण गौतम, कुठे लिखाणातले झगझगीत रंग आणि कुठे हे तुझं वास्तवातलं जग – निव्वळ काळं, पांढरं, किंवा करडं फार फार तर… ” मी जरा जास्तच पुस्तकी बोलून गेलो असं मला वाटलं. गौतमही जरासा हसला. ” नाही, हस तू माझ्या बोलण्यावर, पण तुझं बोलणं काही पटलं नाही बुवा आपल्याला. माझ्या पद्धतीचं लिखाण घे, रहस्यकथा. तुला असं म्हणायचंय का की अगाथा ख्रिस्तीच्या एखाद्या कादंबरीतल्या रहस्यापेक्षा एखाद्या पोलीस स्टेशनच्या क्राईम डायरीत अधिक रोमांच असेल? किंवा दुसरं उदाहरण घेऊ. अं.. समजा भयकथा. धारपांची ‘लुचाई’ किंवा ‘चंद्राची सावली’ वाचताना अजूनही मध्ये थांबून आजूबाजूला बघून घेतो मी. हो, आणि तूसुद्धा. अगदी दिवसाही. असला थरार प्रत्यक्ष ‘तशा’ जागी गेलो तरी जाणवेल आपल्याला? लेखकाच्या कौशल्याला काहीच महत्त्व नाही असं म्हणायचंय काय तुला?”

“हां. तू म्हणतोस ते अगदीच काही चूक नाही” गौतमने सिगरेट पेटवली. सिगरेटच्या धुराच्या निळसर रेषांमागून तो त्याच्या किंचित खर्जातल्या आवाजात बोलू लागला. एखाद्या प्राध्यापकासारखा. एखाद्या तत्त्वज्ञासारखा. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखा म्हणा वाटलं तर.

“वास्तवाचे काळे, पांढरे, करडे रंग म्हणालास तू बापू. आपल्या सगळ्यांची आयुष्यं अशाच रंगाची असतात. पण याच्या किती छटा, किती शेड्स! वास्तव हे कंटाळवाणं, एका साच्यातून काढल्यासारखं असलं तरी ते एकमेकाच्या फोटोकॉपीसारखं नाही” गौतम झेरॉक्स कधीच म्हणत नसे. ” प्रत्येक आयुष्याचा निराळा पीळ असतो. प्रत्येक आयुष्याचे पदर वेगळे. रस्त्याच्या कडेला खड्डा खणता खणता थोडा वेळ थांबून बिडी ओढणारा एखादा मजूर घे. त्याच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे तुम्हा लेखकांना? त्याच्या आयुष्यात काहीच नाट्य नसेल? तो कधी संतापानं इंगळासारखा लाल झाला नसेल? कधी द्वेषानं, मत्सरानं धुमसला नसेल? कधी हतबलतेनं, अगदी निराश होऊन ढासळला नसेल? का कधी एखाद्या नाजूक स्पर्शानं मोहरला नसेल? पण यातलं किती आणि काय तुम्हा लेखकांना कागदावर आणता आलं आहे? लिखाण म्हणजे … निव्वळ कागदी बुडबुडे. त्याला वास्तवाची धग नाही. एखाद्या अनुभवातला जाळ जसाच्या तसा कागदावर उतरवता येणं अगदी अशक्य आहे. मुळात लिखाण ही प्रक्रियाच इतकी कृत्रिम आहे, की तिचा स्पर्श झाला की मूळ अनुभव मेलाच म्हणून समज तू बापू. माझी तक्रार ही तुझ्या लिखाणाविषयी नाही रे. तुम्ही लेखक मंडळी अगदी निष्ठेनं काम कराल, पण तुमची अवजारंच अशी बोथट, गंजलेली आहेत, त्याला तुम्ही काय करणार बापू?”

“हं. म्हणजे आमचं लिखाण ते तेवढं कृत्रिम, आणि तुझं, काय म्हणालास ते.. वास्तव ते तेवढं जिवंत असंच म्हणायचंय ना तुला?”

“अं, अगदी तसं नाही, पण जवळजवळ तसंच.”

“मग गौतमजी, या तुमच्या वास्तवात काय जिवंत आहे बघूया हं” मीही जरा चिडलो आणि खुर्चीवर अस्ताव्यस्त पडलेला ‘सकाळ’ उचलला. “छा! पेपर तर हल्ली चाळायच्याही लायकीचे राहिले नाहीत! पण यातली कुठलीही एक बातमी घेऊ आपण गौतम. मला सांग हं यात काय नाट्य, काय जिवंतपणा आहे ते! हे बघ, ‘वडगाव मावळच्या तलाठ्याला लाच घेताना अटक’. काय नाट्य आहे यात? सरकारी अधिकारी, सामान्य जनतेला नाडणे, लाचलुचपत, अगदी असह्य झाल्यावर कुणीतरी केलेली तक्रार. आता दोनचार दिवस आत जाईल तो आणि मग कुणाच्या लक्षातपण राहणार नाही ही बातमी. काय, काय नाट्य आहे यात? “

“बापूसाहेब, तुम्ही नेमकी तुमचा स्वतःचा मुद्दा खोडून काढणारी बातमी निवडली. अरेरे! मर्फीज लॉ! ” गौतम हसत म्हणाला.
“का? काय झालं? “

“बापू, हा चौधरी मला चांगला माहीत आहे. सरकारी नोकरांत अशी माणसं अपवादानंच बघायला मिळतात. धुतल्या तांदळासारखं चारित्र्य आहे त्याचं. त्याला अडकवलाय तिथल्या आमदारानं. माहुलीच्या अभयारण्यात गेल्या महिन्यात हरिणांची शिकार झाली होती बघ. त्यात महत्त्वाची साक्ष आहे चौधरींची. संपतराव जोंधळेची चाल आहे ही सगळी. आता हा आदर्शवादी तलाठी, त्याच्यावर दबाव टाकणारी ही राजकारणी धेंडं, चौधरीला रोजच्या रोज बसणारे चटके, तरीही ताठ मानेनं जगण्याची त्याची जिद्द… यातलं काय आणि कसं तुला तुझ्या एखाद्या कथेत लिहिता येईल? आणि समजा लिहिलीसच तू एखादी कथा, तर ती किती उबवलेली, किती कृत्रिम वाटेल? तेव्हा बापूसाहेब, आपला पराभव मोठ्या मनानं मान्य करा आणि शांतपणानं एक सिगरेट ओढा.” गौतम म्हणाला.

“आणि ते.. ते चौधरी? ” मी गौतमनं पुढं केलेल्या पाकिटातली सिगरेट उचलत विचारलं.

“ते सुटतील बापू. सकाळी शिंदे वकिलांशी बोललोय मी. आपल्याला अशा माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अशा माणसांची आपल्याला गरज आहे, बापू. आपल्यालाही आणि.. “

आणि कुणाला गरज आहे हे मला आता कधीच कळणार नाही. गौतमचं वाक्य तोडून अचानक दरवाज्यावरची घंटी वाजली. काहीशा अनिश्चितपणे वाजवल्यासारखी. एकदा. दोनदा.

गौतम त्याच्या खुर्चीतून ताडकन उठला. हातातल्या सिगरेटचं थोटूक त्यानं भरून वाहत असलेल्या रक्षापात्रात चुरडून विझवलं. पश्चिमेकडची खिडकी उघडली आणि दारही उघडलं.

दारात एक तरुणी उभी होती. साधारण तीस- बस्तीस वय, किंचित स्थूलपणाकडं झुकणारा बांधा, सावळा वर्ण, महागडा पण एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला काहीसा विसंगत पोषाख आणि जरासा भडकच मेकअप. उंची डीओरंडचा वास. थोडक्यात जिला पाहिल्यावर कपाळावर एखादी आठी चढावी तशी व्यक्ती. अपेक्षेप्रमाणेच गौतमच्या कपाळावर गुरुदत्तसारखं आठ्यांचं जाळं उमटलं.

“गौतम.. गौतम सरदेसाई? “

“मीच. या, आत या. ” गौतम त्याच्या नेहमीच्या मार्दवानं म्हणाला. स्त्रीदाक्षिण्य हा आता कालबाह्य होत चाललेला गुण गौतमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होता. ‘शिव्हलरी इज डाइंग फास्ट बट इट इज नॉट क्वाईट डेड, बापू’ तो नेहमी म्हणत असे.

ती तरुणी आत आली. थोडीशी बावरलेली, गोंधळलेली. गौतमनं दाखवलेल्या खुर्चीवर जराशी अवघडूनच बसली. फिरत्या नजरेनं तिनं एकदा आसपास बघून घेतलं.

“मी शर्वरी. शर्वरी कारखानीस. मला सुनेत्राकडून तुमच्याविषयी कळलं. सुनेत्रा साखरपे…? “

“हां.. हां.. त्यांचं एक छोटंसं काम केलं होतं मी मध्ये” गौतम म्हणाला.

“तुमच्या दृष्टीनं ते छोटं असेल गौतमसाहेब, पण सुनेत्राताई म्हणते की तुमचे उपकार या जन्मात फिटायचे नाहीत. “

गौतम संकोचला. स्तुती त्याला पचवता येत नसे. विशेषतः एखाद्या स्त्रीने तोंडावर स्तुती केली की तो अगदी लाजून जात असे.
त्याचा संकोच शर्वरीच्याही लक्षात आला असावा.

“मला एक सांगा मिस कारखानीस, चष्मा तुम्ही नेहमी वापरता, की फक्त नेटसर्फिंग करताना? ” गौतमने विचारलं.
शर्वरी दचकलीच. “तुम्हाला… तुम्हाला कसं कळलं हे? ” तिनं चाचरत विचारलं.

गौतम फक्त हसला. “ते जाऊ दे. काय, प्रॉब्लेम काय आहे? ” तिच्या समोरच्या खुर्चीत बसत त्यानं विचारलं.
शर्वरीनं जरा साशंकपणानं माझ्याकडे नजर टाकली.

“ओह, हा माझा अगदी जवळचा मित्र बापू, अगदी आपला माणूस आहे. तुम्ही अगदी मोकळेपणानं बोला मिस कारखानीस. “

“गौतमजी, मी… आम्ही कोतवाल कॉलनीत राहतो. ‘इच्छापूर्ती’ बंगला. बाबांनी मोठ्या हौसेनं हा बंगला बांधला पाच वर्षांपूर्वी. पण त्यात राहायला ते काही फार दिवस जगले नाहीत. आम्ही राहायला आलो आणि सहा महिन्यांतच.. ” तिचा आवाज कापरा झाला. “हार्टचा त्रास होता त्यांना.. माझ्यावर फार जीव बाबांचा. मला भाऊ-बहीण कुणी नाही. ‘तुझं लग्न होईपर्यंत मला देवानं जगवावं बेटा’ ते नेहमी म्हणत असत. पण… “

गौतमनं पाण्याचा ग्लास तिच्यापुढं सरकवला. शर्वरीनं पाण्याचा एक घोट घेतला आणि ती बोलू लागली.

“बाबा गेले आणि वर्षभरातच आईनं दामलेकाकांशी लग्न केलं. दामलेकाका बाबांचे बिझनेसमधले पार्टनर. नाही… तसं आधीपासून काही नसावं.. ” गौतमच्या उंचावलेल्या भुवया पाहून शर्वरी म्हणाली. “दामलेकाकांचं घरी येणंजाणं होतं. बाबांचा फार विश्वास काकांवर. काकांचं लग्न राहूनच गेलं असावं बहुतेक. बाबा गेले, मी होस्टेलवर. आई फार एकटी झाली होती. काकांनीच मग आईला विचारलं वाटतं, त्या दोघांनी ठरवलं आणि मला सांगितलं. मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. शेवटी आईला तिचं आयुष्य आहेच की. “

“हम्म. ” गौतम म्हणाला.

“दामलेकाका म्हणते मी त्यांना, पण माझ्यापेक्षा फार मोठे नाहीयेत ते वयानं. इन फॅक्ट, आईपेक्षा लहानच आहेत ते जरासे. बाबांचा बिझनेस उत्तम होता. त्यांच्या गुंतवणुकीही चांगल्या आहेत. सगळ्या गुंतवणुकींची वारस म्हणून बाबांनी माझं नाव घातलंय. बंगलाही माझ्याच नावावर आहे. व्याज चांगल्यापैकी येतं मला. मी मला हवे तितके पैसे काढून घेते आणि बाकीचे आईकडं देते. तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना, गौतमजी? “

“छे, छे, उलट भलतीच इंटरेस्टिंग आहे हो तुमची ही केस. मग पुढे? “

“मी काही फार करियरिस्ट वगैरे नाही गौतमजी. ग्रॅज्युएट झाल्यावर आईनं लगेच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. एकदोन ठिकाणी जमतही आलं होतं, पण…. नाही झालं. मी तशी फार बाहेर जाणाऱ्यांतलीही नाही. वाचन, टीव्ही आणि हल्ली इंटरनेट – बस्स. एवढंच माझं आयुष्य. पण चारचौघींसारखा संसार असावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यातून माझ्या डोळ्यांमध्ये मोठा दोष आहे. तुम्हाला कसं कळलं माहिती नाही मला, पण जाड चष्मा घालूनही नीटसं दिसत नाही मला. इंटरनेटवर कविता लिहिते मी, पण स्क्रीनवर त्या वाचण्यासाठी भिंग घ्यावं लागतं मला. त्यातून तिशी झाली माझी. त्यामुळं फार अपेक्षा बिपेक्षा नाहीत माझ्या. दिलीप भेटले आणि आता सगळं ठरवल्यासारखं होईल असं वाटायला लागलं. पण नशीबच खोटं आहे हो माझं. आधी बाबा गेले आणि आता दिलीपही.. ” शर्वरी दोन्ही हातांच्या तळव्यांत चेहरा लपवून हुंदके द्यायला लागली.

मी आणि गौतमनं एकमेकांकडं बघितलं. गौतमनं मला हातानंच ‘असू दे’ अशी खूण केली आणि शर्वरीच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. पाचेक मिनिटानं शर्वरी शांत झाली.

“माफ करा, गौतमजी. कधी कधी मनावर ताबाच राहत नाही हो. ” ती जराशा अपराधीपणानं म्हणाली.
“असू दे. चालायचंच. तर काय म्हणत होता तुम्ही. हे दिलीप… “

“दिलीप दातार. वासुदेव मधलं नाव. आमचं लग्न ठरलंय, पण.. “

“थांबा, थांबा. मला जरा सविस्तर सांगा मिस कारखानीस. कोण हे दिलीप? कुठं भेटले तुम्हाला? “

“सॉरी. तर.. महिन्याभरापूर्वीची गोष्ट. गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते मी. संध्याकाळच्या रागांच्या मैफिली होत्या बघा त्या आठवडाभर. माझी आणि आईची सीझन तिकिटं होती, पण आईचा पाय मुरगाळला आणि तिला बेडरेस्ट सांगितली डॉक्टरांनी. काका येतो म्हणाले माझ्याबरोबर, पण त्यांना ऐनवेळी टूरवर जावं लागलं. मग एक तिकीट त्यांनी परत केलं आणि मी एकटीच गेले. ते तिकीट ज्यांनी आयत्या वेळी काकांकडून विकत घेतलं तेच दिलीप. दिलीप दातार. बी. ई. आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दिलीप मला भेटले त्या कार्यक्रमात आणि नंतरही आम्ही भेटलो. दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी मला मागणी घातली आणि मी हो म्हणून टाकलं. “

“आणि तुमचे आई बाबा? “

“आई तर खूशच झाली. काकांनाही आनंद झाला. साखरपुडा जोरात करायचा म्हणाले ते. त्यांचं टूरवर जाणं वाढलंय ना खूप हल्ली, पण आता टूरबिर सगळं बंद म्हणाले. साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं याची यादी पण काढली आम्ही बसून. दिलीप खूप बिझी असतात ना, त्यामुळं आम्ही संध्याकाळी सातनंतरच भेटायचो. काकांच्या ऑफिसमध्येही फॉरेन डेलिगेशन आलं होतं कुठलंसं. त्यामुळं काकांची आणि त्यांची गाठच पडेना. फोटो बघितला काकांनी दातारांचा आणि म्हणाले, नशीब काढलंस तू शर्वरी… “

“हे दातार.. कुठले हे? घरी कोण कोण असतं? कुठल्या कंपनीत आहेत नोकरीला? “

“अं… मला फारसं नाही सांगता येणार, पण सुपरसॉफ्ट की कुठली कंपनी आहे. संग्रामनगरला कुठंशी ऑफिस आहे. नवीन कंपनी आहे, आणि ऑफिसही शिफ्ट होतंय म्हणे. त्यामुळं नक्की सांगता नाही येणार मला. दातार मूळचे अमरावतीचे. आईबाबा नाहीयेत त्यांना. एक मोठी बहीण. ती भुवनेश्वरला असते. ती.. त्या यायच्या होत्या साखरपुड्याला… ” शर्वरीचा आवाज परत चोंदल्यासारखा झाला.

“आणि मग…? “

“दहा तारखेचा मुहूर्त होता साखरपुड्याचा. सगळी तयारी झाली होती. नऊ तारखेला रात्री आम्ही फिरायला गेलो होतो. मी आणि दिलीप. चांदणं पडलं होतं सुरेख. त्यांनी अंगठी घातली बोटात माझ्या. म्हणाले, ‘शर्वरी, मला वचन दे, जन्मोजन्मी माझीच होऊन राहशील… ‘. मी म्हणाले, ‘ हे असलं कसलं बोलणं? आणि अंगठी उद्याच्या मुहूर्तावर नाही का घालायची? ‘ तर म्हणाले, ‘खरं प्रेम करणाऱ्यांना मुहूर्ताचा संकेत लागत नाही शर्वरी’ मी वचन दिलं त्यांना तेव्हा गहिवरले ते. म्हणाले, ‘आयुष्यभर प्रेमाला पारखा झालेला माणूस आहे मी. तू माझ्या जीवनात हिरवळ फुलवलीस, शर्वरी. ‘ नऊ वाजता त्यांनी मला घरी सोडलं तेव्हा माझा हात हातात घेऊन म्हणाले, ‘उद्या भेटू, आयुष्यभर एकमेकांचे होऊन राहण्यासाठी.. ‘ किती, किती आनंदात होते मी गौतमजी त्या दिवशी.. “

मी गौतमकडे पाहिलं. रोमँटिक बोलण्याला तो फार कंटाळत असे. गौतमला कंटाळा आला असला तरी त्यानं तो चेहऱ्यावर दाखवला नव्हता.

“ही गोष्ट नऊ तारखेची, मिस कारखानीस. म्हणजे चार दिवसांपूर्वीची. पुढे काय झालं? “

“तेच काही कळत नाही गौतमजी. दहा तारखेला सकाळी आठ वाजता त्यांची बहीण, भावजी आणि मुलांना घेऊन हॉलवर यायचे होते दिलीप. आठ वाजले, नऊ वाजले.. त्यांचा पत्ता नाही. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. बाकी कुठला पत्ता, काही ठावठिकाणा नाही. आम्ही सगळे गोंधळून गेलो. आई तर रडायलाच लागली. इतकी सगळी माणसं आलेली आमच्याकडची. इतकं चोरट्यासारखं झालं आम्हाला. आणि मी तर घाबरूनच गेले. कुठे असतील हो दिलीप? काय झालं असेल त्यांना? हल्ली कायकाय वाचतो ना आपण पेपरमध्ये. आणि त्यांची बहीण, भावजी, मुलं.. ते लोक तरी कुठे आहेत?.. ” शर्वरी रडवेल्या चेहऱ्यानं विचारत होती.

नशीब तरी काय एकेक प्रश्न मांडून ठेवतं माणसांपुढं! मला त्या मुलीची दया आली. गौतम बाकी नेहमीप्रमाणं स्थितप्रज्ञ होता. आपल्या डायरीत काहीतरी नोंद करून ठेवत त्यानं विचारलं. “मग तुम्ही काय केलं? “

“आम्ही पोलिसांत गेलो, गौतमजी. इतके हलकटासारखे वागले पोलीस! म्हणे पत्ता काय, कंपनी काय, काही माहिती नाही, आम्ही तपास तरी कशाच्या जोरावर करायचा? एक कसला तरी रिपोर्ट लिहिला आणि म्हणाले आठ दिवसांनी फोन करून बघा. आई तर अंथरुणावरच आहे गेले चार दिवस. काका इतके चिडलेत, म्हणाले, सापडू तर दे, खूनच करतो त्याचा. पण माझं मन मला सांगतंय गौतमजी. दिलीप धोका देणाऱ्यातले नाहीत. त्यांच्यावर नक्कीच काहीतरी संकट कोसळलंय गौतमजी. प्लीज, प्लीज मला मदत करा.. “

“हम्म. मिस कारखानीस, या दिलीप दातारांचा फोटो आहे तुमच्याकडं म्हणालात तुम्ही.. “

शर्वरीनं तिच्या पर्समधून एक पासपोर्ट साइज फोटो काढला. “फारसा स्पष्ट नाही आलेला फोटो हा, आणि अलीकडचाही नाहीये. पण तुम्हाला कल्पना येईल. ” ती म्हणाली.

गौतमच्या खांद्यावरून मी त्या फोटोकडं नजर टाकली. चाळिशीचा माणूस. विरळ होत चाललेले केस, सर्वसाधारण नाकडोळे, डोळ्यांवर गॉगल. “डोळ्यांना तीव्र उजेड सहन होत नाही त्यांना. म्हणून डॉक्टरांनी गॉगल वापरायला सांगितलाय त्यांना. ” शर्वरीनं खुलासा केला

“आणखी काही? “

“स्वभावानं खूप भोळे आहेत हो दिलीप. आणि अगदी सज्जन. स्वभाव अगदी लोण्यासारखा बघा. आवाजही अगदी मृदू आहे त्यांचा. लहानपणी टॉन्सिल्सचा खूप त्रास झाला म्हणे त्यांना. म्हणून अगदी हळुवारपणे बोलतात ते. पण इतके प्रेमळ म्हणून सांगू… “

“मिस कारखानीस, त्यांचे काही इतर डिटेल्स आहेत तुमच्याकडं? त्यांचं कार्ड म्हणा, त्यांच्या कंपनीचा नंबर म्हणा.. “

“अं.. त्यांचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे, पण तो… हं, ते मी सांगितलंच तुम्हाला. आणि हो, त्यांनी काही इ-मेल्स पाठवल्या होत्या मला. त्यांचेही प्रिंट आऊटस आणलेत मी. “

गौतमच्या चेहऱ्यावर अचानक उत्सुकता आली. “कुठलं.. कंपनीचं अकाउंट आहे त्यांचं? ” त्यानं विचारलं.

“नाही. कंपनीच्या अकाउंटमधून आपली बोलणी नको म्हणाले ते. जीमेल अकाउंट आहे त्यांचं. हे ते चार प्रिंट आऊटस.. अं.. जरा खाजगी मेल्स आहेत गौतमजी, तेव्हा.. “

“आय अंडरस्टॅंड मिस कारखानीस. या खोलीतल्या गोष्टी कधीच बाहेर जात नाहीत. मी बघतो काय करायचं ते. तुमचा नंबर देऊन ठेवा. मी कळवतो तुम्हाला काय ते. दरम्यान स्वतःला जरा सावरा. आईकडेही लक्ष द्या. आणि हो, मन जरा घट्ट करा”

“म्हणजे? मला दिलीप भेटतील ना परत? ” शर्वरीनं धीर एकवटून विचारल्यासारखं विचारलं.

“स्पष्ट सांगायचं तर मला फारशी आशा वाटत नाही, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला. “तेव्हा तुम्ही या दातारांना विसरण्याचा प्रयत्न करावा, हे उत्तम. “

“ते या जन्मी तरी शक्य नाही गौतमजी. मी वचन दिलंय दिलीपना. माझ्या नशिबात सुख असेल तर ते मला भेटतीलच. इथं, किंवा जिथं ते असतील तिथं. हा माझा नंबर गौतमजी. आणि हो, तुमचा काही ऍडव्हान्स..? ” शर्वरीनं पर्स उघडली.

गौतम हसला. “तशी वेळ आली तर मी तुम्हाला सांगीन, मिस कारखानीस. सध्या काही नको. “

“मग येऊ मी? ” शर्वरी खुर्चीतून उठली

“या, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला.
मी दरवाजा बंद करून वळलो तो गौतम एक नवी सिगरेट पेटवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होतं.
“काय मग बापूसाहेब, काय म्हणतायत तुमच्या शर्वरीताई? ” त्यानं विचारलं.

“हं. म्हणजे नेहमीप्रमाणं तू माझ्याकडून काढून घेऊन मग मला ते चुकीचं कसं आहे, हे सांगणार म्हण की. ”

“तसं समज. पण काय, तुला वाटतं तरी काय या मुलीबद्दल? ” गौतमनं विचारलं.

“हे बघ गौतम, मी काही तुझ्यासारखा व्यावसायिक नाही. पण तुझं बघून बघून जे शिकलोय ते सांगतो. बघ तुला पटतंय का.. ” मी म्हणालो.

“बापू तू बोल तर खरा. मग बघू आपण तर्क काय, निष्कर्ष काय ते. ” गौतम म्हणाला.

“हम्म. शर्वरी कारखानीस… ” मी मगाशी राहिलेली सिगरेट उचलली. “वय काय, तीस- बत्तीस. आर्थिक सुस्थिती तर दिसतेच आहे. भारी ड्रेस, कानातल्या हिऱ्याच्या कुड्या, बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तर असणारच. आणखी काय सांगू? आणि हो, ते चष्मा आणि नेटसर्फिंगचं काही ध्यानात नाही आलं बुवा माझ्या.. “

“माझ्या तर्कसंगतीची पद्धत वापर ना बापू. कितीही उत्तम दर्जाची चष्म्याची फ्रेम असली तरी ती सतत वापरणाऱ्याच्या नाकावर एक लहानशी आडवी रेघ दिसते. मिस कारखानिसांनी ती मेकअपनं लपवण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण अस्पष्ट का होईना, ती रेघ दिसतेच. तर मग चष्मा. बाहेर जाताना तिनं तो लावला नाही, याचं कारण म्हणजे तिला त्याची लाज वाटते. म्हणजे त्याचा नंबर बराच जास्त असला पाहिजे. तिनं कॉंटॅक्ट लेन्सेस लावल्या होत्या, हे तर तुझ्या लक्षात आलं असेलच. आणि तिच्या ड्रेसच्या बाह्या बघितल्यास तू? सतत कंप्युटरचा माऊस हाताळणाऱ्या व्यक्तींच्या बाहीवर ती बाही टेबलच्या कडेवर जिथं घासली जाते, तिथे एक आडवी खाच येते. या शर्वरीची आर्थिक स्थिती सामान्य असती, तर ती कुठंतरी नोकरी करते, असा निष्कर्ष मी काढला असता. पण तसं नाही. आणि बाहेर गाडी तर होतीच तिची. मगाशी खिडकी उघडायला मी उठलो तेव्हाच रस्त्यावर पार्क केलेली तिची होंडा सिटी मला दिसली. मग अशा सुस्थितीतल्या मुलीला तासनतास टेबलाशी बसायला कोणती गोष्ट प्रवृत्त करत असेल? उत्तर अगदी उघड आहे. इंटरनेट! “

“वा, काय लॉजिक आहे गौतम! मानलं तुला… ” मी कौतुकानं म्हणालो. ” आणखी काही? “

“आणखी बरंच काही. ” गौतम म्हणाला. “त्या मुलीच्या कपड्यांबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल तू म्हणालास, पण तिचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तू काही बोलला नाहीस. तिचे कपडे, दागिने आठव. जरासे भडकच नव्हते वाटत? अशा अडचणीच्या वेळीही ती पूर्ण मेकअप करून आली होती. आणि तिची भाषा.. दिलीपविषयी, तिच्या बाबांविषयी बोलताना किती स्वप्नाळूपणे बोलत होती ती.. ‘अहो दिलीप’ असा उल्लेख… टीव्हीवरल्या मराठी मालिका बघत असणार ही मुलगी. आणि इंटरनेटवर काय लिहिते ही? कविता! “

” अच्छा. म्हणजे ही लग्नाचं वय उलटून चाललेली, आपल्या शारीरिक दुबळेपणाविषयी काहीशी खंतावलेली, श्रीमंत घरातली, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी आणि काहीशी उथळच मुलगी, नाही का गौतम? “

“बरोबर. आणि मग तिला हा भेटतो, कोण, काय म्हणता तुम्ही लेखक मंडळी त्याला.. हां, तिच्या स्वप्नांतला राजकुमार. हाही वय होत चाललेला, शरीरानं आणि मनानं दुबळा आणि खऱ्या प्रेमाला आंचवलेला. अशा स्वप्नाळू, कवीमनाच्या मुलींना फार आकर्षण असतं अशा मुलांचं. रांगड्या, मॅचो मुलांपेक्षा अशी काहीशी बायलीच मुलं आवडतात त्यांना. वात्सल्य आणि ममत्व ही तर मॅमेलियन्सची वैशिष्ट्येच आहेत. ‘बायका एरवी कितीही कंठाळ्या असल्या तरी ज्या दिवशी तुम्हाला हँगओव्हर असतो, त्या दिवशी त्या अगदी देवदूतच होतात’ असं वुडहाऊस म्हणतो, आठवतं? आणि मग त्यांचं प्रेम, शपथा, आणाभाका – ते चांदणं, ती हिरवळ, ते एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून कॉफी पिणं वगैरे… सगळे सगळे ते तुमचे शब्दांचे बुडबुडे! “

“पण त्या दिलीपचं पुढं झालं काय? तो आणि त्याची बहीण, मेव्हणे वगैरे गेले तरी कुठं? “

” ते बघू आपण. पण सध्या तरी आपण त्या दिलीपनं पाठवलेल्या मेल्स वाचू. अं काय लिहितो हा… अरेरे, वाचू नये रे कुणाचं खाजगी काही.. त्यातल्या त्यात प्रेमात पडलेल्या माणसांचं.. ” गौतमनं त्या प्रिंट आऊटसचे कागद उलगडले. “अरे वा, अगदी रसिक आहेत हो ‘हे’ दिलीप. बघ की, पहिल्याच मेलमध्ये गालिब कोट केलाय त्यानं.. इष्क पर जोर नहीं, है ये वो आतिश गालिब, जो लगाये ना लगे और बुझाये ना बने’ “

“क्या बात है, गौतम. लोक अजूनही प्रेमपत्रांत गालिब वगैरे लिहितात? “

“अरे पुढं ऐक. ‘युवर स्टॅच्युएस्क फिगर रिव्हॉल्वज इन माय ड्रीम्स… ‘ ही शर्वरी आणि स्टॅच्युएस्क? तिला अवरग्लास फिगर म्हटलं नाही, हे नशीबच आपलं बापू. “

“आईज ऑफ दी बिहोल्डर, गौतम, आईज ऑफ दी बिहोल्डर. “

“हम्म. खरं आहे तू म्हणतोयस ते. आणि आपले दिलीप चांगले वाचकही दिसताहेत. डिलेक्टेबल डिनर, इनक्रेडिबल इंबेसिलिटी ऑफ माय काँफ्रेअर्स, माय अनएंडिंग पेरिग्रेशन्स… वा वा वा.. लेखक व्हायचा हा माणूस इंजिनिअर कसा काय झाला? आणि हे बघ, ऑफिसमधल्या राजकारणाला ‘बेत न्वा’ हा शब्द वापरलाय यानं.. आणि हे काय? ‘फॉरएव्हर युवर्स टिल दी ग्रिम रिपर सेपरेटस अस… ‘ म्हणजे तत्त्वज्ञानीही दिसताहेत हे दिलीप. आणि ‘काऊंटलेस ऑस्क्युलेशन्स? ‘ बापू, नको रे पुढचं वाचायला आपण. ती शर्वरी हे कागद द्यायला का संकोचत होती ते कळतंय मला आत. “

” पण यातनं काही कळतंय का आपल्याला? “

“हम्म. बरंच काही कळतंय बापू. आता फक्त एक करायचं आपण. शर्वरीच्या आईबाबांशी एकदा बोलून घेऊ. तिचा नंबर लिहिलेला कागद होता ना इथं कुठंतरी? एक काम कर. तिला फोन लाव, आणि तिच्या घरचा आणि दामलेंचा फोन नंबर घे तिच्याकडून. आणि दामलेंचा मेल आयडीपण घे. “

“तू काय करतोयस? “

“आता फारसं करता येण्यासारखं काही नाही बापू. तू तेवढे डिटेल्स घे, मी बघतो सकाळी अर्धवट राहिलेलं शब्दकोडं सुटतंय का ते! ” गौतम म्हणाला.

संध्याकाळी मी गौतमच्या फ्लॅटवर आलो तेंव्हा गौतम खुर्चीच्या दांड्यांवर पाय ठेवून पेंगत होता. माझ्याजवळच्या किल्लीनं मी दार उघडलं आणि तो आवाज ऐकून त्यानं आपले झोपाळलेले डोळे उघडले.
“भले शाब्बास! ” मी म्हणालो. “आम्ही इकडे कोडं सुटतंय का ते बघतोय, आणि महाराज झोपा काढतायत! “
“कोडं सुटलं की. ” गौतम म्हणाला.
“सुटलं? “
“हो. बत्तीस आडवा शब्द ‘पचंग’ आहे, ‘पंचांग’ नाही. आपण ‘पंचांग’ धरून चाललो होतो, त्यामुळं सगळा घोळ झाला. ‘पचंग बांधुनी तयार व्हा रे’”
“गौतम…मित्रा, शब्दकोड्याविषयी बोलत नाही मी. शर्वरी… मिस कारखानीसांचं कोडं सुटलं की नाही? “
“हां ते होय! ते काही फारसं अवघड कोडं नाही. सुटेल. वाजले किती? पाच? चल, आपण एक चहा मारून येऊ आणि बघू मग त्या मिस कारखानीसचं कोडं सुटतंय का ते.”
चहा पिऊन आम्ही परत येत होतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून गौतम म्हणाला, “बापू, माझी एक जुनी धारणा आहे बघ. एखादं कोडं सोडवताना, जे जे निव्वळ अशक्य आहे, ते काढून टाकत जायचं. मग जे शेवटी शिल्लक राहील, तेच सत्य असलं पाहिजे; मग ते कितीही असंभव का असेना… “
“खरं आहे. ” मी म्हणालो.
“आता ही शर्वरीचीच केस बघ. या दिलीपच्या गायब होण्यामागं काय कारणं असतील? त्यानं त्याच्याविषयी, त्याच्या नोकरीविषयी दिलेली माहिती अशी अर्धवट, गूढ का आहे? या दिलीपच्या नाहीसं होण्यानं कुणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे? मी अशी केस सोडवताना नेहमी स्वतःला त्या गुन्हेगाराच्या जागावर ठेवतो. या केसची गंमत अशी आहे, की यात गुन्हेगार कोण आहे, तेच कळत नाही. दिलीप? त्याचं तर शर्वरीवर खरंखुरं प्रेम दिसतंय. बरं, त्यानं शर्वरीकडून काही पैसे वगैरे उकळले असते, तर तेही समजण्यासारखें होतं. पण शर्वरीच्या बोलण्यात तसंही काही आलेलं नाही. मग काय? तुला काय वाटतं? “
“काही कळत नाही गौतम. “
“हम्म. आपल्यासमोर या साखळीच्या कड्या विखरून पडल्या आहेत बापू. फक्त त्यांना जोडणारा एक धागा अजून अदृष्य आहे. एकदा तो धागा दिसला की सगळं सगळं स्पष्ट होईल. चल, मी संध्याकाळी शर्वरीच्या आईवडीलांना भेटायला
बोलावलं आहे. बघूया त्यांच्या भेटीतून काही नवीन कळतं का ते. “
आम्ही वर गेलो. गौतमनं कंप्यूटर सुरू केला. ई मेल्स तपासता तपासता त्याच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आलं. त्यानं त्याची डायरी उघडली आणि त्यातली नोंद वाचत तो म्हणाला, ” त्या दिलीपचं पूर्ण नाव काय म्हणाली शर्वरी? दिलीप वासुदेव दातार, नाही का? जीनीयस! बापू कोडं सुटलं आपलं! “
“सुटलं? काय झालं मग या दिलीपचं? कुठं आहे तो? “
गौतमनं एक प्रिंट कमांड दिली आणि तो प्रिंट आऊट माझ्यासमोर धरुन काही बोलायला तो तोंड उघडणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी पुढं होऊन दार उघडलं. दारात एक मध्यम उंचीचे, चाळीशीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते. माझ्याकडं बघून काहीसे हसत ते म्हणाले, “मी नंदकुमार दामले. शर्वरी… मुलगी माझी. मला गौतम सरदेसाईंना भेटायचं आहे. आपण…? “
“मी बापू. गौतम आत आहेत. या ना, आत या. “
दामलेंनी मोकळेपणानं माझा हात आपल्या हातात घेतला. “तुमच्याविषयीही बोलली शर्वरी माझ्याशी. तुम्हा दोघांशी बोलल्यावर खूप धीर आलाय, म्हणाली. काय बघा ना वेळ आली तिच्यावर. सोन्यासारखी मुलगी.. “
“काळजी करू नका, दामले. सगळं ठीक होईल. ” मी त्यांना आतल्या खोलीत नेत म्हणालो.
गौतमनं दामलेंना बसायला सांगितलं. तिसऱ्या खुर्चीत मी बसलो. मी दामलेंकडं निरखून पाहिलं. कोकणस्थी रंग, चाळीशीनंतरही टिकलेले घनदाट केस. ते काळजीपूर्वक वळवलेले. डायही केला असावा. उत्तम कपडे. आणि भेदक बुद्धीमान डोळे. खोलवर घुसणारे तीक्ष्ण घारे डोळे.
“काय घेणार? चहा? कॉफी? ” गौतमनं विचारलं.
“काही नको, थँक्स. गेले चार दिवस अन्नपाण्यावरची वासनाच उडालीय आमची. ही तर खचलीच आहे. म्हणून तुमच्या मेलमध्ये तुम्ही तिला घेऊन या म्हणून लिहिलं होतं, पण काही शक्य झालं नाही ते. ” दामले म्हणाले.
गौतम आपल्या खुर्चीत जरासा रेलला. “हं. तुमचं उत्तर वाचलं मी दामले. आणि ते वाचून मला वाटलं तुम्ही मिस कारखानिसांच्या आईंना बरोबर आणलं नाही तेच बरं केलं. ” तो म्हणाला.
मला गौतमच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. शब्दांचं आणि शब्दांच्या निवडीचंही.
“हो, आता निराशा पचवण्याची ताकद नाही आहे हो तिच्यात. ” दामले म्हणाले. “मी त्या दोघींनाही सांगतोय गेले चार दिवस, की आपण दिलीपला विसरून जायला हवं; पण त्यांना ते शक्य होत नाहीये. शर्वरी तर.. मला भीती वाटते गौतमसाहेब, ती काही बरंवाईट तर… “
“अरे, नवल आहे. ” गौतम हसत म्हणाला. “मी तर तुम्हाला आज इथं चांगली बातमी द्यायला बोलावलं होतं.”
दामलेंच्या डोळ्यांत आता रागाची किंचित लाली आली. “काय.. अर्थ काय तुमच्या बोलण्याचा? ” त्यांनी जरा चढ्या स्वरात विचारलं.
“अर्थ असा दामलेसाहेब, की तुमचे दिलीप वासुदेव दातार मला सापडले आहेत. “
दामले ताडकन उठून उभे राहिले. “क्क.. कुठे आहेत ते? ” त्यांनी विचारलं.
गौतमनं हातातली पेन्सिल वरखाली हालवली. “खाली बसा दामले. स्वतःला फार हुषार समजता नाही का तुम्ही. आता इतक्या सहजासहजी सुटका नाही व्हायची तुमची. खाली बसा आणि मी सांगतो ती गोष्ट ऐका.”
“या पाताळयंत्री माणसाचा नीचपणा बघ, बापू, ” माझ्याकडं वळून गौतम म्हणाला. ” वयानं आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाईशी यानं लग्न केलं ते निव्वळ पैशाकडं बघून. कारखानिसांना हार्ट ट्रबल सुरू झाल्यावरच याच्या डोक्यात ती चक्रं फिरायला लागलेली असणार. पण लग्न झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की इस्टेट सगळी शर्वरीच्या नावावर आहे. जोवर शर्वरीचं लग्न होत नाही, तोवर ती बिचारी नेमानं तिच्या आईकडं पैसे देत राहील, आणि तिच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर हा हरामखोर चैन करत राहील..पण पुढं काय? एकदा का शर्वरीचं लग्न झालं की सगळा पैसा, सगळी इस्टेट गेली याच्या हातातून. “
दामलेंनी खिशातला रुमाल काढून घाम पुसला.
“मग हा करतो काय? तर शर्वरीचं लग्नंच होऊ नये यासाठी प्रयत्न करायला लागतो. एकदोनदा जुळत आलेलं लग्न नाही जमलं असं म्हणाली ती. मला खात्री आहे, यानंच त्याच्यात मोडता घातलेला असणार. पण हे फार दिवस चालणार नाही, हे कळाल्यावर हा एक वेगळीच शक्कल लढवतो. “
मी अवाक होऊन ऐकत होतो. दामले खाली मान घालून बसले होते. “शर्वरी किती हळवी, किती भावनाप्रधान आहे हे आपण बघीतलं बापू. याच्याही हे ध्यानात आलेलं असणार. शिवाय शर्वरीची कमकुवत नजर. त्याचाच फायदा घ्यायचा ठरवला यानं. हा करतो काय, तर स्वतःच वेषांतर करून दातार होतो. दिलीप वासुदेव दातार. शर्वरीला हा भेटतो तेही संध्याकाळनंतर. त्याचा गॉगल, त्याचा कमकुवत आवाज, त्याचे जाड कपडे… हा फोटो बघ बापू… आणि कुणीतरी अप्रतिम मेकअप आर्टिस्ट.शर्वरीला काही शंका येत नाही. ती त्याच्यात गुंतत जाते. मग त्या आणाभाका, त्या शपथा.. कशासाठी? तर तिनं पुन्हा लग्नाचा विचारही करू नये याच्यासाठी! आणि साखरपुड्याला तो उगवतच नाही. उगवणार कसा? होणारा जावई म्हणजे खुद्द सासराच आहे ना! “
गौतमनं दामलेंकडं तिरस्कारानं बघीतलं. “अमरावतीचं घर, भुवनेश्वरची बहीण, मेव्हणे, भाचे.. सगळ्या थापा!” शर्वरीनं आणलेले इ मेलचे प्रिंट आऊटस दामलेंसमोर टेबलवर फेकले. ” इंग्रजी उत्तम लिहिता तुम्ही दामले. फ्रेंचही शिकलायत वाटतं! छान, छान! शर्वरीला आलेली ‘बिले दू’ काय? यू हॅव माय ‘कॅस्ट ब्लाँश’ मिस्टर सरदेसाई काय? आणि शायरीची काय आधीपासूनच आवड आहे की या कामासाठी वाचली खास? आं?”
आपल्या खुर्चीतून उठून गौतम आता खोलीत येरझाऱ्या घालत होता. ” काय माणूस आहे बघ हा बापू. किती विलक्षण बुद्धीमत्ता! पण चुकीच्या ठिकाणी लावली कामाला. आपल्या बुद्धीचा माज चढला ना एखाद्याला, की तो माज उतरायलाही वेळ लागत नाही. दामले, फार मस्त गेम खेळलात तुम्ही. पण टाईप करताना ती स्पेलचेक लावण्याची सवय तेवढी लावून घ्या बुवा. टाईप करताना ‘एस’च्या जागेवर घाईघाईत कधीकधी ‘ए’ टाईप होतो तुमचा. या मेल्स बघा दिलीप दातारच्या आणि ही तुमची मेल मघाची. आणखीही एकदोन गोष्टी आहेत सारख्या. की सायबरक्राईमला फोन करून दोन्हींचे आय पी ऍड्रेसेस चेक करायला सांगू? पण तुम्ही तयार लोक नाही का! दोन वेगवेगळ्या ठिकाणांहूनही पाठवल्या असतील मेल्स.. “
“गंमत.. गंमत होती ती सरदेसाई” दामले तुटक आवाजात म्हणाले.
“गंमत? एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळणं ही गंमत? अरे नीच माणसा… “
“हे बघा सरदेसाई, उगीच शिव्या द्यायचं काम नाही. ” दामलेंच्या आवाजात आता मग्रुरी आली होती. ते उठून उभे राहिले होते. “तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. बाकी तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही पोलिसात जा, कोर्टात जा… “
“पोलीस! हूं! ” गौतम तुच्छतेनं म्हणाला. दामलेंच्या समोर उभं राहून त्यानं दामलेंच्या डोळ्यांत रोखून बघीतलं. “दामले, एक लक्षात ठेव. पुन्हा त्या मुलीला काही त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही धक्का लावशील तर पस्तावशील. तिच्यामागं कुणी नाही असं समजू नकोस. तिच्यामागं हा गौतम सरदेसाई आपल्या सगळ्या शक्तीनिशी उभा आहे… “
“आणखी काही? ” दामले कुऱ्यात म्हणाला.
“गेट आऊट! “
दामलेंनी नाटकीपणानं मान झुकवली आणि बुटांचा टपटप आवाज करत ते निघून गेले.
गौतमनं सिगरेट पेटवली. “तुला माहिती आहे, बापू, आफ्रिकेतल्या जंगलांत काही वेली आहेत. पहिली काही वर्षं त्या अगदी निरुपद्रवी, अगदी सामान्य असतात. एका ठराविक वयानंतर बाकी त्यांच्यातल्या रसाचं जणू जहर व्हायला लागतं. त्यांच्या लाईफसायकलच्या एका विशिष्ट स्टेजला त्या अगदी विषारी, प्राणघातक होतात. असं का होतं हे अद्याप कुणालाही कळालं नाही. पण तसं ते होतं खरं. हा माणूस, दामले, तसलाच वाटतो मला. मूळचा हुषार, अगदी प्रतिभावान, पण अक्कल कुठे वापरली बघ त्यानं.. “
मी काहीच बोललो नाही.
“आणखी एक, एखादा कलाकार जसा आपल्या कलाकृतीवर कुठेतरी आपली स्वाक्षरी नोंदवून ठेवतो, तसे हे गुन्हेगारही आपल्या गुन्ह्यांवर कुठेतरी आपले फिंगरप्रिंटस ठेवून जातात. भिंतीत कलात्मक भोक पाडून चोरी करणारा आणि ‘कल जब लोग देखेंगे तब प्रशंसा होनी चाहिये’ म्हणणारा ‘उत्सव’ मधला चोर आठवतो ना तुला. या गुन्ह्यावरही दामलेनं स्वतःची एक स्वाक्षरी ठेवली आहे. त्यामुळंच तर मला पक्की खात्री पटली.
“काय? कुठली स्वाक्षरी? “
“दिलीप. दिलीप वासुदेव दातार. त्याची आद्याक्षरं घे, दि. वा. दातार. काही आठवतं? “
“दिवाकर दातार! “
“बरोबर! बाकी गोष्टींनी माझा संशय बळावतच चालला होता, या एका गोष्टीनं बाकी खात्री झाली. ” गौतम म्हणाला.

“पण गौतम.. हा माणूस… काका म्हणते ती मुलगी त्याला. कित्येक वर्षांचे संबंध त्यांचे. तो माणूस इतका नीचपणा करू शकेल? कशासाठी? फक्त – फक्त पैशासाठी? माणूस इतका घसरू शकतो? “
“हेच बापू, हेच. मी म्हणत होतो ते जळतं, धगधगीत वास्तव हेच. सगळी नाती, मानवी मूल्यं आणि कायकाय तुमच्या शब्दांच्या कागदी होड्या बुडवून टाकणारा माणसाचा स्वार्थ, माणसाची विकृती, हेच ते वास्तव. आता मला सांग बापू, आहे का कुणा लेखकाच्या लेखणीत ताकद.. असलं काही कागदावर आणण्याची? “
“पण हा हलकट तर… आणि त्याला शिक्षा काहीच नाही? “
“दुर्दैवानं – काहीच नाही. या खोलीत जे झालं ते आपण न्यायालयात सिद्ध करू शकणार नाही, आणि सिद्ध झालं तरी एखाद्या मुलीचा प्रेमभंग करणं याला आपल्या घटनेत शिक्षा नाही अजून. “
“आणि शर्वरी.. तिचं काय? “
“आपण काय करू शकतो बापू? तिला सावध करणारं एक पत्र टाकतो मी आज. स्पष्ट काही लिहित नाही, पण त्या दामलेपासून जरा सावध राहा, असं लिहितो. तिला ‘ता’ वरनं ताकभात कळत असेल, तर तिच्या लक्षात येईल. नाहीतर ती आणि तिचं नशीब. त्या दिलीपच्या स्वप्नांतून बाकी ती काही बाहेर येईल असं वाटत नाही. पण दिलीपच्या गायब होण्यामागं दामलेचा हात आहे, एवढं जरी तिला कळालं, तरी दामले संपलाच म्हणून समज. अरे, एखाद्या स्त्रीच्या स्वप्नांशी खेळणं म्हणजे वाघिणीच्या गुहेत शिरून तिच्या बछड्यांना हात घालण्यासारखं आहे. होय की नाही? घे, सिगरेट घे बापू. “

(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या ‘ अ केस ऑफ आयडेंटिटी’ वर आधारित )