दिवाकरांच्या नाट्यछटा

१९११ ते १९३१ या काळात दिवाकर यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिल्या.इतक्या वर्षांच्या कालौघात त्या आजही टिकून आहेत. त्यानंतर बाकी बावन्नावी टिकून रहाणारी (बावनकशी) नाट्यछटा कुणी लिहिल्याचे ऐकिवात नाही. दिवाकरांना नाट्यछटा हा प्रकार सुचला तो ब्राऊनिंगच्या ‘मोनोलॉग’ या काव्यप्रकारावरून. ब्राऊनिंगकडून उसने घेतलेले हे बीज त्यांनी अस्सल मराठी बाजाने फुलवले. It does not matter what you borrow, but what you make of your borrowing हे सिद्ध् व्हावे असे. नाट्यछटा म्हणजे नाटकाची संक्षिप्त आवृती नव्हे, स्वगतासारखे एकांगी संभाषणही नव्हे. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दांत एखाद्या प्रासंगिक वर्णनातून अधिक व्यापक सूत्र समोर मांडणारा एक स्वतंत्र साहित्यप्रकार. नाट्यछटेत वापरली जाणारी विरामचिन्हे, बोलीभाषेतले शब्द, तात्कालिन संदर्भ, मधूनमधून घेतले पॉजेस यातून एक मोठे चित्र उभे रहाते.
दिवाकरांनी हा प्रकार आपल्या अभिव्यक्तीसाठी का निवडला असावा? मला समजते त्यानुसार दिवाकर हे अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कमालीचे संवेदनशील होते. त्या काळातील इतर साहित्यप्रकारांचा विचार केला तर त्यांत त्या वेळी एक साचेबंदपणा, तोचतोचपणा आलेला असावा – अपवाद अर्थात केशवसुतांचा- त्या काळात वर्डस्वर्थ्, शेली, कीट्स् वगैरे कवींच्या वाचनाने दिवाकरांना लिखाणाच्या या नवीन प्रकाराची निर्मिती करण्याची स्फूर्ती मिळाली असावी. त्याआधी त्यांनी शेक्स्पिअरच्या नाटकांवर आधारित काही नाटके लिहिण्याचा प्रयत्नही केला होता. तो मात्र काही सफल झाला नाही. स्वभावाने अबोल आणि भिडस्त असणार्‍या दिवाकरांना आपले अंतरंग, त्यातली सुखदु:खे – म्हणजे सुखे कमी, दु:खेच जास्त – व्यक्त करण्यासाठी नाट्यछटेचा जिवंतपणा आणि त्यातली किंचित सांकेतिकता अधिक भावली असावी.
दिवाकरांच्या नाट्यछटा समजून घ्यायच्या म्हणजे त्या काळातली स्थिती समजून घ्यायला हवी. एका बाजूला परकीय साम्राज्यामुळे समजलेले इंग्रजी लेखकांचे विचार आणि त्यामुळे आपल्या समाजातील न्यूनांची होत असलेली जाणीव असावी. दुसरीकडे जानवी, सोवळी, एकादष्ण्या आणि श्रावण्या यात करकचून बांधलेला समाज असावा. एकीकडे बालविवाह आणि बालविधवा, केशवपन आणि विधवांचे सर्व प्रकारांने शोषण हे राजरोसपणे चाललेले असावे, तर दुसरीकडे बाळंतरोगाने तान्ह्याला जन्म देऊन मरणारी तरुण आई आणि इन्फ्लुएंझा ते प्लेगाने पटापट मरणारी माणसे असावीत, असे हे कोणत्याही संवेदनशील माणसाला कमालीचे अस्वस्थ करणारे विसंवादी सामाजिक वातावरण असावे. या सगळ्यातून दिवाकर तरले ते केवळ वाचनामुळे. या अफाट वाचनातूनच त्यांना लेखनाची स्फूर्ती मिळाली असावी. नाट्यसंवाद हा नाट्यप्रसंगांसारखा प्रकार त्यांनी हाताळल्याचे दिसते. ‘कारकून’ हे नाटक आणि ‘सगळेच आपण ह्यः ह्यः’, ‘ऐट करू नकोस!’ या नाटिका त्यांनी लिहिल्याची माहिती आहे. मेटरलिंकच्या ‘ द साइटलेस’ या नाट्यकृतीचे त्यांनी भाषांतर केल्याचीही माहिती आहे,आज हे सगळे कुठे आहे कोण जाणे!
दिवाकर हे इंग्रजीचे उत्तम शिक्षक होते. शिक्षक म्हटल्यावर त्याचा व्यासंग असलाच पाहिजे अशा जुन्या विचारसरणीचे हे लोक. ऑस्कर वाइल्ड, पुशकिन, पिनिअरो, गॉर्की वगैरे लेखकांचे साहित्यही दिवाकरांनी वाचल्याचे उल्लेख आहेत. रविकिरण मंडळाचेहही ते सदस्य होते. दिवाकरांच्या नाट्यछटा ‘उद्यान’ मासिकात आणि ‘ज्ञानप्रकाशा’त छटेमागे एक रुपया या मानधनाने प्रसिद्ध झाल्या. शेवटी दिवाकरांनी काही भावकथाही लिहिल्या. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी इन्फ्लुएंझाने दिवाकर मरण पावले.
आता थोडेसे ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’ या नाट्यछटेविषयी. या कथेला संदर्भ आहे तो रमाबाई रानडे यांच्या मृत्यूचा. पण तोही केवळ संदर्भ म्हणून. या छटेच्या निमित्ताने दिवाकर माणसाच्या दुटप्पी स्वभावावर, दिखाऊपणावर नेमके बोट ठेवतात.”चला! मोठी एक कर्तीसवरती बाई गेली!” असे म्हणून रमाबाईंच्या मोठेपणाचे गळे काढणारे हे प्राध्यापकमहोदय त्यांच्या अंत्यदर्शनाला जायचा विषय काढतात, पण त्यातला त्यांचा हेतू वेगळाच आहे. मृतांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या तथाकथित प्रतिष्ठित माणसांची – बव्हंशी प्राध्यापकांची – यादी ‘ज्ञानप्रकाशा’त प्रसिद्ध् होत असे. या निमित्ताने का होईना, आपले नाव या वर्तमानपत्रात छापून यावे अशी ती प्रसिद्धीची लालसा आहे. ‘पेज थ्री’ या सिनेमात सोनी राजदानने आत्महत्या केल्याचा निरोप येतो तेंव्हा डॉली ठाकूर कपड्यांची खरेदी करत असते. आता अंत्यदर्शनाला जावे लागणार, मग तिथे नवे कपडे नकोत का असा तात्काळ थेट रोख विचार करून ती त्या विक्रेत्याला ‘शो मी समथिंग इन व्हाईट’ असे निर्विकारपणे सांगते – तेच हे माणसात लपलेले गिधाड! “मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा!” यात त्याचा हिडीस चेहरा दिसतो, पण पुढे “कारण आता गेले काय अन् न गेले काय सारखेच!” अशी फिलॉसॉफिकल सारवासारव केल्याने तो अधिकच बेगडी आणि भेसूर दिसू लागतो! ‘प्यासा’ मध्ये जिवंत असताना ज्या भावाला हिडीसफिडीस केली त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कवितेच्या रॉयल्टीच्या रकमेवर घासाघीस करणारे त्याचे भाऊ याच वैश्विक कुटुंबातले!
अडीचएकशे शब्दांच्या दिवाकरांच्या या नाट्यछटेत हे इतके सगळे लपलेले आहे. संभाषण सुरु आहे असे वाटावे अशी भाषा हे तर नाट्यछटेचे वैशिष्ट्यच असते. “…हो, बरोबर….” अशी सुरुवात, “-केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास?” असा प्रश्न. “….बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा!” अशी वाक्ये, यांनी या छटेला एक ‘परफॉर्मिंग क्वालिटी आली आहे. असे वाटते, की हा माणूस समोर आहे, बोलतो आहे!
नुसत्या संवादांतून स्वभाव आणि प्रसंग रेखाटन हे चांगल्या नाट्यछटेचे गमक आहे. दिवाकरांना ते इथे उत्तम रीत्या साधले आहे ‘तेवढेच ‘ज्ञानप्रकाशा’ त!’ मला दिवाकरांच्या सर्वोत्तम छटांपैकी एक वाटते ती त्यामुळेच.

तेवढेच ‘ज्ञानप्रकाशां’ त

“… हो, बरोबर, दोनदा आपल्याकडे येऊन गेलो मी. – नाही, काल नाही, संध्याकाळी आलो होतो ते परवा आणि सकाळचे जे म्हणता ती कालची गोष्ट. असो, गाठ पडली. चला. – हो ते विचारणारच होतो, की शेजारी एवढी गडबड कसली? सारख्या मोटारी अन् गाड्या येताहेत! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे! – केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास? – नाही बोवा, तुम्ही सांगेपर्यंत वार्तासुद्धा नव्हती याची मला! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जात-येत नाहीत, येवढे ठाऊक होते! पण इतक्यात काही होईलसे.. बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा! …साठ का हो! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या!..असो.चला! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली! पेशवाईनंतर महाराष्ट्रात इतक्या योग्यतेची मला नाही वाटत दुसरी कोणी असेलशी! खरे आहे.अगदी खरे आहे! मनुष्य आपल्यामध्ये असते, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते! – स्वभावाने ना? वा! फारच छान! अतिशय मनमिळाऊ आणि शांत! कटकट म्हणून नाही! – हळूहळू, थोडं थोडं , पण खरोखर मोठं कार्य केलं! अन् फारसा गाजावाजा न करता! – आधीच थोरामोठ्यातली ती! अन् रावसाहेबांचे वळण! मग काय विचारता! – बोलणे काय, चालणे काय आणि – हो! लिहिणेसुद्धा – तेच म्हणतो मी – की ‘आठवणी’ कशा नमुनेदार लिहिल्या आहेत! – मराठीत असे पुस्तक नाही आहे! – ते काय विचारायला नको! आज गर्दी म्हणजे – सगळा गाव लोटायचा आता! मोटारी आणि गाड्यांचा चालला आहे धडाका! – काय? खूपच लोटली आहे हो! दर्शनासाठी दिवाणखान्यातच ठेवलेले दिसते आहे त्यांना! चला येत असलात तर… जाऊ म्हणतो! इतकी माणसे जात आहेत तेंव्हा- हो गर्दी तर आहेच्! – राह्यलं. तब्येत बरोबर नसली तर नाही गेले! मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा! कारण आता गेले काय, अन् न गेले काय सारखेच! पण् बोवा ‘अमुक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला!’ तेवढेच ‘ज्ञानप्रकाशा’त….’

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

2 Responses to दिवाकरांच्या नाट्यछटा

 1. surekha rahigude कहते हैं:

  I am a big fan of Diavka’s natyachata.please
  send me audio cd of divakar’s natyachata if
  available.I have search for it in many shops but I couldn,t get it.
  I am ready to pay for the same.

 2. Shital कहते हैं:

  Just got curious because surname is same.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s