गीतकार साहिरच्या कारकीर्दीचे मी चार टप्पे मानतो.
१. १९५० ते १९५७ – याला सचिनदेव बर्मन पर्व म्हणू या. कारण या काळात त्याने प्रामुख्याने त्यांच्यासाठीच गीते लिहिली. यातील अजूनही बरीचशी गाणी मलाही माहिती नाहीत. “सजा” मधल्या ” तुम न जाने किस जहाँ में खो गये” पासून सुरूवात झाली. मग देव आनंदच्या बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, फंटुश, घर नं. ४४, मुनीमजी, जाल बऱ्याचशा चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली. देव आनंदच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत अशी हलकीफुलकी गाणी लिहिली, ती बरीच लोकप्रिय पण झाली. पण “जाये तो जाये कहाँ”, “दुखी मन मेरे, सुन मेरा कहना” वगैरे गाणी मला कविता म्हणून सामान्य वाटतात. मात्र “जाल”मधले “पिघला है सोना दूर गगन में फैल हरे है शाम के साये”, घर. नं ४४ मधले “फैली हुई है सपनोंकी बाहे”, तसेच “मुनीमजी” मधले ” साजन बिन नींद न आए” ही मला अतिशय आवडतात.
देव आनंद शिवाय इतर चित्रपटांपैकी “देवदास” मधली जास्त प्रसिद्ध झाली. संजोप रावांनी “जिसे तू कबूल कर ले” चा आवडत्या गाण्यांमध्ये उल्लेख केला आहे म्हणून एक मजा सांगतो. शकील बदायुनींनी १९५३ सालच्या दिल ए नादान मध्ये एक गाणे लिहिले होते “जो खुशीसे चोट खाए वो जिगर कहाँ से लाऊँ”. त्यातल्या ह्या ओळी पहा.
मुझे तेरी आरजू है
मेरे दिल में तू ही तू है
बसे गैर जिस में आकर
मैं वो घर कहाँ से लाऊँ
आता १९५५ सालच्या “देवदास” मधल्या “जिसे तू…” मधल्या या ओळी पहा.
तुझे और की तमन्ना
मुझे तेरी आरजू है
तेरे दिल में गम ही गम है
मेरे दिल में तू ही तू है
आता याला काय म्हणावे?
बाकी “अंगारे ” मध्ये तलत चे एक सुंदर गीत आहे, ” डूब गये आकाश के तारे जाके न तुम आये”. त्यातल्या
बहते बहते चाँद की कश्ती दूर गगन में खोने लगी
आस की इक नन्हीं सी किरन थी वो भी ओझल होने लगी
अशा सुंदर ओळी आहेत. आणखी राधाकृष्ण, शहेनशहा, जीवनज्योती वगैरे चित्रपटातली गीते मीच जास्त ऐकली नाहीत.
सचिनदेव बर्मन सोडून त्या काळात मदनमोहनसाठी “रेल्वे प्लॅटफॉर्म” मध्ये, अनिल बिस्वास साठी “दो राहा” मध्ये (एकच गाणे), जयदेव साठी “जोरू का भाई” व श्यामसुंदर “अलिफ़ लैला” साठी गाणी लिहिली. यातील बरीचशी गाणी अप्रसिद्ध असली तरी देव आनंदच्या वर सांगितलेल्या चित्रपटातल्या गाण्यांपेक्षा जास्त सुंदर आहेत. ज्यांनी “चाँद मध्यम है”, “मुहब्बत तर्क की मैंने”, “अब तेरा इंतजार कौन करे” आणि “बहार आई खिली कलियाँ” ज्यांनी ऐकली आहेत त्यांना मी काय म्हणतो ते समजेल.
त्यानंतर १९५७ मध्ये ‘प्यासा’ आला.