संवादकला -१: सभाधीटपणा

समाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा. ‘वक्ता दससहस्त्रेषु’ याचे कारण हेच असावे. चार लोकांसमोर देण्याचे प्रेझेंटेशन असो किंवा हजार लोकांच्या सभेत करायचे भाषण असो, नवीन वक्त्याची अवस्था साधारण सारखीच असते. हृदयाची धडधड वाढणे, तोंडाला कोरड पडणे, आवाज थरथरणे, पाय कापणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्मरणशक्तीने पूर्ण दगा देऊन काहीही न आठवणे. याचा परिणाम म्हणून मग तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, अतिशय गडबडीने बोलणे आणि लवकरात लवकर आपले भाषण संपवणे अशी नवख्या वक्त्याची प्रतिक्रिया होते. ‘नको ती सभा आणि नको ते बोलणे’ म्हणून असे प्रसंग टाळण्याकडेच लोकांचा कल असतो.

या सगळ्या प्रतिक्रियेचे कारण अतिशय आदिम आणि भौतिक आहे. संकटाला सामोरे जायची वेळ आली की एकतर त्याचा सामना करणे किंवा त्याच्यापासून पळून जाणे हे प्राणिमात्रांच्या रक्तात फार पूर्वीपासून भिनले आहे. ‘फाईट ऑर फ्लाईट’ रिस्पॉन्स म्हणतात तो हाच. दोन मांजरे एकमेकांची भांडताना जशी आपल्या अंगावरचे सगळे केस फुलवून आपला आकार आहे त्यापेक्षा मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसेच हेही. संकटाशी सामना करायची वेळ आली की अंगावरचे केस उभे रहाणे, रक्तातल्या विशिष्ट हार्मोन्सचे प्रमाण वाढून हृदयाच्या स्पंदनाचा वेग वाढणे, मलमूत्र विसर्जनाची भावना होणे (अनावश्यक वजन कमी करुन अधिक वेगाने पळून जाता यावे या कारणासाठी) ही सगळी अगदी सामान्यतः आढळणारी लक्षणे आहेत. भीती वाटली की थोड्याफार प्रमाणात सगळ्यांची हीच अवस्था होते.

पण चार लोकांसमोर बोलताना हे असे का व्हावे? ही भीती नेमकी कशाची आहे? भीतीचे कारण कळाले की भीतीवर मात करणेही सोपे जाते असे सोपे मानसशास्त्र आहे. अंधार्‍या बोगद्यात जायची आपल्याला भीती वाटते याचे कारण अंधार नव्हे. अंधारात भिण्यासारखे काही नाही, हे आपल्यालाही माहिती असते. हे भय असते अंधारात दबा धरुन बसलेल्या अज्ञाताचे. विजेरीच्या प्रकाशात बोगद्यात काही नाही हे कळाले, की हे भयही नष्ट होते. ‘फिअर ऑफ दी अननोन’. सभेत बोलण्याचेही असेच आहे. ही भीती चार लोकांसमोर बोलण्याची नाही. तर बोलताना आपले काहीतरी चुकेल आणि श्रोते आपल्याला हसतील आणि आपल्या आत्मसन्मानाला जखम होईल, हे ते भय आहे. आता भयाचे हे कारण समजून घेतले तर त्या भयावर मात करणेही शक्य झाले पाहिजे. सभेत बोलण्याचे भय कमी करुन सभाधीटपणा कसा वाढवता येईल याची काही सूत्रे आपण येथे पाहू.

एकतर श्रोते आपल्याला हसतील, आपली टिंगल करतील ही भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करा. असे करण्याचे बरेच मार्ग तज्ञांनी सुचवले आहेत. श्रोते अजिबात महत्वाचे नाहीत अशी कल्पना करणे, श्रोते हे विदूषकी टोप्या घातलेली तीन चार वर्षांची मुले आहेत अशे चित्र डोळ्यासमोर आणणे किंवा ते चक्क नग्नावस्थेत बसले आहेत अशी कल्पना करणे वगैरे. माझ्या मते हे सगळे मार्ग नकारात्मक आहेत. माझ्या मते सगळ्यात योग्य मार्ग म्हणजे सगळे श्रोते हे आपल्या बाजूने आहेत, आपले मित्र आहेत आणि आपण एखादी चूक केली तरी फारसे गंभीर काही होणार नाही अशी कल्पना करणे. येथे भीती या नकारात्मक उर्जेचा आपण सकारात्मक उपयोग करुन घेतो. एकदा असे झाले की मग तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची देहबोली सुधारते आणि हळूहळू तुमचे भाषण अधिकाधिक प्रभावी होऊ लागते.

पण फक्त श्रोत्यांची भीती गेली म्हणजे सगळे झाले असे नव्हे. एखादे छोटेसे प्रेझेंटेशन असो, किंवा दीड तासाचे व्याख्यान असो, कसून तयारी करण्याला पर्याय नाही. तुमच्या विषयातली सखोल आणि अद्यावत माहिती मिळवा, भाषणाचा कच्चा आराखडा तयार करा,( ‘टेल देम व्हॉट यू आर गोईंग टु टेल देम, टेल देम, टेल देम व्हॉट यू हॅव टोल्ड देम’) त्यातले कच्चे दुवे शोधा, कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील याचा अंदाज घ्या, त्याची उत्तरे तयार करा. शक्य होईल तेंव्हा पॉवर पॉइंट, किमान ओएचपीच्या स्लाईडस वापरा. पण सर्वस्वी त्यांवर अवलंबून राहू नका. पीपीटी न उघडणे, वीज जाणे असे होऊ शकते. बॅकअप म्हणून एका छोट्याशा कार्डवर महत्वाचे मुद्दे लिहून ते स्वतःजवळ ठेवा. भाषण पाठ करु नका, फक्त महत्वाचे मुद्दे लक्षात ठेऊन उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न करा. सवयीने हे जमते.

तुम्ही पहिल्यांदाच भाषण देत असाल किंवा एखादे महत्वाचे भाषण द्यायचे असेल तर त्याची रंगीत तालीम जरुर करा. आरशासमोर राहून स्वतःशी अधिकाधिक नेत्रसंपर्क साधण्याचा सराव करा. श्रोत्यांशी सहजसोपा आणि नैसर्गिक नेत्रसंपर्क साधता येणे हे आत्मविश्वासाचे द्योतक आहे. जमिनीकडे, छताकडे किंवा खिडकीबाहेर बघत बोलणारा वक्ता न्यूनगंडाने पीडित असतो. किमान श्रोत्यांना तरी तसेच वाटते. तुम्हाला जर विशिष्ट कालमर्यादेत भाषण द्यायचे असेल तर तुमचे भाषण रेकॉर्ड करा. भाषणाची कालमर्यादा न पाळणे हे अव्यावसायिक समजले जाते. अगदी शेवटी काही जवळच्या मित्रांसमोर तुमच्या भाषणाची रंगीत तालीम करा. मित्र असे असावेत की जे तुमचे दोष आणि तुमच्या चुकाही तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतील.

एखाद्या नवीन ठिकाणी भाषण द्यायचे असेल तर त्या ठिकाणाला आधी जरुर भेट द्या. व्यासपीठ, श्रोत्यांची बसण्याची रचना, ध्वनीवर्धक हे तुमच्या परिचयाचे होऊ द्या. व्यासपीठावरील जागेचा तुम्हाला प्रभावी वापर करता आला पाहिजे.

आणि अगदी भाषणाच्या आयत्या वेळी तणावरहित रहाण्याचा प्रयत्न करा. पाणी प्यावेसे वाटले तर ते भाषणाच्या आधी किंवा नंतर प्या. अगदीच मोठे भाषण असेल तर गोष्ट वेगळी. आपल्या जागेवरुन उठण्याआधी, प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आणि प्रत्येक वाक्यानंतर एक मोठा श्वास घ्या. व्यासपीठावर पोचल्यावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी काही सेकंद शांत उभे रहा. याने श्रोत्यांचे लक्ष आता हा माणूस काय बोलणार आहे या उत्सुकतेने तुमच्यावर केंद्रित होईल. एखाद्या मित्राकडे पहा (गरज वाटत असेल तर अशा एखाद्या मित्राला मुद्दाम पहिल्या रांगेत बसवण्याची व्यवस्था करा), नंतर इतरांकडेही पहा आणि हसर्‍या मुद्रेने बोलायला सुरुवात करा. एखादा दर्जेदार आणि बहुतेकांना माहिती नसलेला विनोद, एखादा खेळकर प्रश्न यांनी भाषणाची सुरुवात करता आली तर पहा, पण ओढूनताणून तसा प्रयत्न करु नका. सावकाश आणि स्पष्टपणे बोला. भाषणाची सुरुवात नेहमी सकारात्मक ठेवा. ‘हे माझे पहिलेच भाषण आहे, कृपया सांभाळून घ्या’,’हा काही फारसा रंजक विषय नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे’ अशी सुरुवात टाळा. आधी झालेल्या भाषणांशी तुमच्या भाषणाची तुलना करु नका. धर्म, जात, राजकीय मते, शारिरीक व्यंग असे उल्लेख टाळा. स्वतःचे भाषण तुम्हाला स्वतःला ‘ऍन्जॉय’ करता आले पाहिजे. भाषणाचा शेवट एखाद्या हुकमी एक्क्याने करा. आपल्याला नक्की कुठे थांबायचे आहे याचे भान असू द्या, आणि तेथेच थांबा.

वक्तृत्वकला ही काही अंशी तरी प्रयत्नसाध्य आहे. एखादे सुरेख भाषण संपवल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट मनात केवढे मोठे कारंजे फुलवतो, हे शब्दांत सांगता येणार नाही. आणि इतरांकडून होणारी प्रशंसा कशाला, ‘दि रिवॉर्ड ऑफ अ जॉब वेल डन, इज हॅविंग डन इट’ या न्यायाने एक चांगले भाषण संपवून खाली उतरताना हलकी झालेली पावले त्या भाषणाच्या तयारीसाठी घेतलेले सारे श्रम आनंदाने विसरायला लावतात, हे काय कमी आहे?

शुभेच्छा.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

1 Response to संवादकला -१: सभाधीटपणा

  1. Vikas Shukla कहते हैं:

    I was visiting your blog daily to find out whether you have written new article. But after a long gap of 14 days I found these 2 new posts. Best, as always. Keep is up. Do write fast. I am at PUne on 29-30.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s