धुक्यातून उलगडणारे जी ए-३

जी.एं. चे इंग्रजी वाचन

‘शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ईच टाईम ट्राईंग टु कट निअरर टु द एकिंग नर्व्ह’ 
                                                       -स्ट्रिंडबर्ग

चांगला लेखक हा उत्तम वाचक असलाच पाहिजे यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही.  जी.एं चे इंग्रजी साहित्याचे वाचन अफाट होते. (याला त्यांचे इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक असणे एवढेच कारण असावे असे वाटत नाही. प्राध्यापकांचे वाचन आणि त्यांचा व्यासंग चांगला असला पाहिजे, हे सूत्र तर कधीच कालबाह्य झाले आहे!)  कर्नाटक विश्वविद्यालयाचे वाचनालय हे तर त्यांचे दुसरे घरच होते. जगातले उत्तमोत्तम साहित्य मिळवून ते वाचणे, त्यावर विचार, चिंतन (! ) करणे हा जातिवंत वैचारिक गुण जी. एंमध्ये प्रकर्षाने दिसतो. धारवाडमध्ये त्यांच्या घरी स्वतः विकत घेतलेल्या चार – साडेचार हजार पुस्तकांचा संग्रह होता. चार – साडेचार हजार! याशिवाय वेळोवेळी वाचनालयातून आणून वाचलेली, मित्रांनी, स्नेह्यांनी वाचायला दिलेली असंख्य पुस्तके, जवळजवळ तितकीच मासिके – हे निव्वळ आकडेच चकरावून टाकणारे आहेत. जी. एंचे इंग्रजी वाचन हे थोडेसे त्यांच्या पेशातील गरजेमुळे, आणि बरेचसे त्यांच्या इंग्रजीवरील प्रेमामुळे झाले आहे. ‘इंग्रजी भाषेला एक आणि सिगारेटला एक – अशा दोन गोष्टींना अर्पण करण्यासाठी मला दोन पुस्तके लिहायची आहेत’  असे त्यांनी म्हटले आहे.

जी. एंच्या इंग्रजी वाचनाचा धांडोळा घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.  एकतर त्यांनी आपले आवडते म्हणून जे लेखक/ कवी सांगितले आहेत, ते भलतेच आहेत. ‘गावाचे एक तर गावड्याचे (गावंढ्याचे? ) एक’ हे तर त्यांचे आवडते वाक्य. ‘जे जे लोकप्रिय आहे, ते दर्जेदार नसतेच’ हा त्यांचा जबरदस्त पूर्वग्रह इथेही तितक्याच प्रभावीपणे दिसतो.  ‘इफ अ बुक इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर, आय बिकम सस्पिशिअस अबाउट इट. दी लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर ऑफ इंटेलिजन्स इन ऍन ऑर्डिनरी रीडर इज सो लो, दॅट इफ अ बुक टचेस दॅट, ऑलवेज इन्व्हेरिएबली दी बुक मस्ट बी बॅड’ असे त्यांनी म्हटले आहे. थोडा विचार केला तर हे पटूही लागते. ‘वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की सहा महिने त्याच्याकडे बघवतही नाही’ या एका वाक्यात ते त्या थोर लेखकाची वाट लावून टाकतात. अमेरिकन पेपरबॅक्सवर तर त्यांनी निव्वळ जहरीपणाने लिहिलेले आहे. आयन रँड ही लोकप्रिय लेखिकाही जी. एंना वर्ज्यच होती. ‘काळ्या काचेचे मणी घालून एखाद्या प्रॉफेटेसचा आव आणणारी ही बाई म्हणजे एक बुडबुडा होती’ असे त्यांना वाटते. तिची ‘वुई द लिव्हिंग’ ही कादंबरी दोस्तोव्हस्कीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समजणाऱ्या एका मित्राशी त्यांचे संबंध दुरावले. ही कादंबरी फार फार तर एखाद्या हिंदी चित्रपटासाठी योग्य आहे, असे त्यांना वाटे. जी. एंचे हिंदी चित्रपटांविषयीचे मत ध्यानात घेता धिस इज सेईंग अ लॉट!

दोस्तोव्हस्की हे तर त्यांचे व्यसनच होते. दोस्तोव्हस्की आणि ओ’नील यांच्या कथांमधील आकर्षक साचाहीनता ओ. हेन्रीच्या कथांमधील निव्वळ कसबापेक्षा त्यांना कितीतरी सरस वाटत असे. इंग्रजी साहित्यातले जी.एं. चे स्वतःचे आवडते लेखक अगदी दुर्लक्षित, लोकप्रिय नसलेले असे होते. ल्यूक्रेशियस हा इसवीसनपूर्व काळातला रोमन कवी आणि तत्त्वज्ञ जी.एं. नी स्वतःच्या तिशीच्या आत वाचला होता आणि त्याने ते बरेच प्रभावितही झाले होते. ल्यूक्रेशियस नंतर त्यांना बराच अपूर्ण वाटत असे. असेच त्यांचे झ्वाईगच्या बाबतीतही झाले होते. एक वाचक म्हणून मला स्वतःला जी. एंचा हा मोठा गुण वाटतो. वयानुसार आणि अनुभवानुसार अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यकच आहे, असे मला वाटते. अगदी पालापाचोळा तुलना करायची तर ‘ग्रीन सॅलड डेज’ मध्ये व. पु. काळे वाचणे व त्या पुस्तकांच्या प्रेमात वगैरे पडणे आणि नंतर त्यांचे कोणतेही पुस्तक हातातही न धरवणे – अशी जशी अगदी सामान्य वाचकाची उत्क्रांती होते तसे!  (लग्नानंतर प्रथम शरीरसंबंधाचा अनुभव घेतल्यानंतर या सगळ्याचा अर्थ काय असा प्रश्न पडणारा ‘पार्टनर’ मधला नायक  आजही थोडा सुसंगत वाटतो, पण यावर उत्तर म्हणून ‘चांदनी रात सनम चांदके लच्छे लच्छे, दो उंगली चमडी के लिये, मर गये अच्छे अच्छे’ लिहिणारा पार्टनर त्या वेळी फार मोठा तत्त्वज्ञ वगैरे वाटला होता, आज तो पोरकटच नव्हे तर चक्क खुळचट वाटतो ! असो. ) आवडता कलाकार हा अथपासून इतिपर्यंत आवडला पाहिजे या भाबडेपणापासूनही  जी. ए. दूर होते. इथे जी. एं आणि पु. ल. यांच्यातला मोठा फरक दिसून येतो. ‘वुडहाऊस हा बालगंधर्वांच्या गाण्यासारखा आहे, तो एकतर पूर्ण आवडतो, किंवा अजिबात आवडत नाही’ असे पु. लंचे मत आहे. एक आस्वादक म्हणून मला जी. एंची वस्तुनिष्ठता अधिक पटते. ‘रायटिंग, नॉट द रायटर!’ मग एखाद्या आवडत्या लेखकाच्या लिखाणात हिणकस काही आले, तर ते तसे आहे, हे सांगण्याचे धैर्य पाहिजे.  (वुडहाऊअसचे तरी सगळे लिखाण कुठे दर्जेदार आहे? ) ‘मी उगाच सांगत नाही ‘ या गडकऱ्यांच्या ओळींवर ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ मध्ये जी टिंगल आहे, ती जी.एंच्या याच मताचे प्रतिबिंब आहे. ऑलिव्ह श्रायनर या लेखिकेचे ‘स्टोरी ऑफ ऍन आफ्रिकन फार्म’ हे जी. एंचे आवडते पुस्तक. त्याचे भाषांतर करण्याचाही त्यांना कैकदा मोह झालेला आहे. पण या लेखिकेच्या इतर कादंबऱ्या ‘ आपल्याकडे स्त्री लेखिका ज्या लायकीच्या कादंबऱ्या लिहितात, त्याच लायकीच्या’ असे जी. एंचे मत होते. स्त्री लेखिकांविषयी जी. एंची मते ध्यानात घेता त्यांना काय म्हणायचे आहे, ते कळते. हेन्री जेम्सचे फक्त ‘आर्ट ऑफ फिक्शन’ हे पुस्तक जी. एंना आवडत होते. त्याची इतर पुस्तके न वाचण्याच्या लायकीची असे त्यांचे रोखठोक मत होते. या सगळ्या यादीत मॉमचा समावेश असावा, याची गंमत वाटते. मॉम हा तसा लोकप्रिय लेखक. तरी जी. एंनी तो त्यांच्या प्रसिद्ध नियमाला बगल देऊन वाचला, आणि त्याचे ‘ऑफ ह्यूमन बॉंडेजेस’ त्यांना आवडले, हे एक नवलच. नीत्शे या तत्त्वज्ञ कवीच्या ‘बर्थ ऑफ ट्रॅजेडी’ या पुस्तकाचा ते तसाच आवडलेल्या पुस्तकांत उल्लेख करतात . विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे, हे तर सर्वज्ञातच आहे. ओ’नीलच्या ‘लाँग डेज जर्नी इंटू नाईट’ या नाटकाचाही त्यांनी ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ या नावाने अनुवाद केला आहे. (आपल्या) दुर्दैवाने त्यांनी त्या हस्तलिखितावर ‘हे प्रकाशनार्थ नाही’ असे स्पष्टपणे लिहिले असल्याने तो अनुवाद वाचकांसाठी उपलब्ध नाही.

बेलॉक हा जी. एंचा आवडता लेखक. बेलॉकच्या ‘हिज सिन्स वेअर स्कार्लेट, बट हिज बुक्स वेअर रेड’ या वाक्याचा आणि त्यातील ‘रेड’ या शब्दावरील श्लेषाचा ते उल्लेख करतात.  याशिवाय Wole Soyinka या आफ्रिकन नाटककाराचे The Strong Breed हे व इतर नाटके, मार्टीन ब्यूबर नावाचा एक ज्यूईश तत्त्वज्ञ, अनेक अप्रसिद्ध लेखकांची प्रवासवर्णने, थोर हेरुडू नावाच्या लेखकाचे ‘अकू अकु’ हे पुस्तक, प्रेस्कॉट या लेखकाचे ‘कॉंक्वेस्ट ऑफ पेरु’ हे पुस्तक… बापरे! यातली बरीचशी पुस्तके वाचणे तर सोडाच, पण त्यांची आणि त्यांच्या लेखकांची नावेही ऐकलेली नाहीत.  

ऑलिव्ह श्रेनर, कॉनराड रिक्टर, डब्ल्यू. एच. हडसन हेही जी.एंचे आवडते लेखक. रिक्टरच्या कादंबऱ्यांचे तर त्यांनी अनुवादही केले आहेत. निसर्ग विरुद्ध माणूस हा संघर्ष हा जी. एंच्या वाचनाचा आणखी एक आवडता विषय. त्यातही जी.एंचा नियतीवादी (आणि निराशावादीही) पिंड लक्षात घेता कष्ट आणि यश यापेक्षा करुणा आणि भीषणता याकडे त्यांचे मन अधिक आकर्षित होत असले पाहिजे. ‘नाईल नदीचा उगम शोधत जाणारे प्रवासी, वेश पालटून मक्केला जाऊन येणारा रिचर्ड बर्टन, ऍथेऑनच्या खोऱ्यात वेड्याप्रमाणे शिरलेली माणसे, उघड्या डोळ्यांनी मृत्यू पत्करणारा ओटस.. या विविध माणसांत असमाधानाचा असला कोणता अंगार होता की ज्यासाठी आम्ही क्षुद्र माणसे कणाकणाने झिजत शेणगोळा आयुष्य जगतो, ते सगळे बाजूला सारून त्यांना असला जुगार खेळणेच भाग पडावे? ‘असा प्रश्न त्यांना पडतो. हाच तो जी. एंच्या वाचनातला दुसरा विशेष. सरधोपट, मिळमिळीत आयुष्यापेंक्षा, अनुभवांपेक्षा तीव्र, टोकदार आणि दाहक अनुभव जी. एंना जास्त आकर्षक वाटत असत असे दिसते. ‘आपले स्वतःचे आयुष्य असेच नीरस, कोमट, निरर्थक  झाले म्हणून जी.ए. हतबल, निराश झाल्यासारखे वाटतात’ असे जी. एंच्या पत्रांच्या चौथ्या खंडाची प्रस्तावना लिहिणारे विजय पाडळकर यांना वाटते.  आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल – विशेषतः आपल्या लिखाणाबद्दल जी. ए. असमाधानी असतीलही – किंबहुना होतेच- ‘आत्मचरित्र लिहिणे म्हणजे एका अर्थाने आपले आयुष्य पुन्हा जगणे – आणि माझे एकच आयुष्य इतके असह्य आहे, की ते पुन्हा जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही’ या अर्थाचे त्यांनी काहीसे लिहिले आहे. कदाचित म्हणूनच जगावेगळे तीक्ष्ण अनुभव त्यांना अधिक आकर्षक वाटत असावेत. मृत्यूविषयीचे जबरदस्त आकर्षण हेही त्यांच्या याच वृत्तीचे द्योतक वाटते.  

‘आत्महत्या आणि खून या दोन बिंदूंशिवाय जास्त उत्कट, जळजळीत काही असूच शकणार नाही, आणि नेमके हेच शब्द वाड.मयाला कधी गवसत नाहीत’ असे जी. एंना वाटत असे. त्यामुळेच की काय, जी. एंच्या आवडत्या बऱ्याच साहित्यीकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कोसलर, सिल्व्हिया प्लाथ, बेरिमन, स्टीफन झ्वाइग, कावाबाटा, हेमिंग्वे इत्यादि.   जी. एंचा स्वतःचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच होती.

या सगळ्याशी अत्यंत विसंगत अशी गोष्ट म्हणजे लैंगिक साहित्याचे वाचन. ‘माझ्याजवळ जितके लैंगिक साहित्य आहे, तितके इतर कोणत्याही लेखकाकडे असणार नाही’ असे त्यांनी (म. द. हातकणंगलेकरांना) लिहिल्याचे आठवते. त्या काळात अगदी इरसाल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लैंगिक साहित्याचे जी. एंनी अगदी भरपूर वाचन केले होते. त्यातल्या खाचाखोचा, एकंदरीत स्त्री-पुरुषांमधल्या शारिरीक संबंधाबाबत सगळी नैसर्गिक (आणि अर्थातच अनैसर्गिक) माहिती त्यांना होती.

पण हा काही जी. एंनी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकांचा ताळेबंद नव्हे. जी. एंच्या एकंदर वाचनातील दहा टक्केसुद्धा नावे या लेखात आली नसतील. पण तो मुद्दाच नाही. एखाद्या आडगावी राहून, जगाच्या कानाकोपऱ्यातून दुर्मिळ, अनोळखी लेखकांना धुंडाळून सातत्याने त्यांचे वाचन करणे- व्यासंग हा एरवी सस्ता वाटणारा शब्द इथे चपखल बसावा – एवढेच नव्हे, तर त्यावर स्वतःची रसग्रहणात्मक – टीकात्मक मते तयार करणे, त्यांची समकालीन लेखकांशी, मित्रांशी दीर्घ पत्रांतून देवाणघेवाण करणे – हा सगळा केवढा जगड्व्याळ उपक्रम आहे! आणि हे सगळे करत असताना प्रत्यक्ष स्वतःचे लेखन या सगळ्याशी अंघोळीपुरताही संबंध नसलेल्या मराठी भाषेतून करणे हे आणखी एक थोर. इंग्रजीप्रमाणे जी. एंचे मराठी वाचनही जबरदस्तच होते.   

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

4 Responses to धुक्यातून उलगडणारे जी ए-३

 1. harekrishnaji कहते हैं:

  जी. एं बद्द्ल ही नवी माहीती मिळाली.

 2. Manish कहते हैं:

  Man, you can really do PhD on GA! 🙂

  Very nice information here…however some generalizations did sound rather prejudiced & irrational; just as they are in case of GA as well.

 3. meghana bhuskute कहते हैं:

  आधीच्या दोहोंपेक्षा हा भाग जरा कमी पडणारा वाटला. काहीसा वर्णनात्मक. निष्कर्षात्मक…? पण ती या प्रकारच्या लिखाणाचीच मर्यादा. लिहीत रहा…. वाट पाहिली जाते.

 4. शुचि कहते हैं:

  (१) >>आत्महत्या आणि खून या दोन बिंदूंशिवाय जास्त उत्कट, जळजळीत काही असूच शकणार नाही, आणि नेमके हेच शब्द वाड.मयाला कधी गवसत नाहीत’ असे जी. एंना वाटत असे.>>
  (२) >>या सगळ्याशी अत्यंत विसंगत अशी गोष्ट म्हणजे लैंगिक साहित्याचे वाचन. ‘माझ्याजवळ जितके लैंगिक साहित्य आहे, तितके इतर कोणत्याही लेखकाकडे असणार नाही’ ‘ असे त्यांनी (म. द. हातकणंगलेकरांना) लिहिल्याचे आठवते>>
  गोष्ट (३) पटली तर (१) आणि (२) विधानं विसंगत वाटणार नाहीत, मला वाटत नाही .
  (३) La petite mort, French for “the little death”, is a metaphor for orgasm.
  More widely, it can refer to the spiritual release that comes with orgasm, or a short period of melancholy or transcendence, as a result of the expenditure of the “life force”.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s