जुने घर

गावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्‍याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून ‘इथे चार खण काढ, इथे एक ठेप दे, इथे एक मोरी बांध, इथे माळवदावर जायला जिना काढ’ असले काहीतरी सांगून ते बांधवून घेतले असावे. गवंड्यानेही काही पुढचा-मागचा, सोयी-गैरसोयीचा विचार न करता अगदी हुंबपणाने हाताला येईल ते सामान घेऊन दिवाळीतला किल्ला बांधावा तसे ते दणकट, ऐसपैस पण अत्यंत गैरसोयीचे घर बांधून टाकले असावे. जुने घर शाळेपासून, गावंदरी मळ्यापासून लांब वाटत असे. मळा अगदी गावाच्या कडेला लागून एस टी स्टँडजवळच होता. मळ्यातल्या घरासमोर एक प्रचंड मोठे वडाचे झाड होते. मळ्यात विहीर होती आणि विहिरीला भरपूर पाणी असे. मळ्यातल्या घराभोवती भरपूर रिकामी जागा होती आणि मळ्यात बैल, गायी, म्हशी, वासरे आणि रेडके असत. त्यामुळे मळ्यात जायला अगदी मजा येत असे. गावातले घर हे या सगळ्यांपासून दूर, वेड्यावाकड्या अरुंद आणि खडबडीत रस्त्याने बरेच अंतर चालून गेले की एका गल्लीवजा रस्त्यावर गचडीत बसलेले होते. जुन्या घरासमोरचा रस्ता अगदीच निरुंद होता आणि त्यावर कधीच डांबराचा थर पडलेला नव्हता. त्यामुळे जुन्या घरासमोरच्या रस्त्यावरून एका वेळी दोन एक्क्या बैलगाड्या काही जाऊ शकत नसत. मग ही गाडी डाव्या अंगाला घे, ती उजवीकडे वळव असे करावे लागत असे. त्यात कधीकधी त्या गाड्यांची चाके रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या गटारात जात आणि वेसणीचा फास बसून फुसफुसणार्‍या बैलांचे डोळे टरारल्यासारखे होत. एखाद्याने अंग मोकळे करण्यासाठी हातपाय ताणून अंगाला डाव्या-उजव्या बाजूने झोले द्यावेत तसा तो रस्ता इकडे तिकडे मनाला येईल तसा वळत वळत गेलेला होता आणि त्याला उतारही फार होता. जैनाच्या बस्तीपाशी दोन चार जोराचे पायडल मारले की मग पाय वर घेतले तरी सायकल त्या रस्त्याने खडखडत, उसळ्या घेत थेट पेठेपर्यंत जात असे.

जुने घर रस्त्याच्या पातळीपासून हातभर उंचीवर होते आणि दोन पायर्‍या चढूनच घरात जावे लागे. या पायर्‍यांचे दगडही निसटायला आले होते. गावातल्या सगळ्या घरांसारखे या घराच्या दारातूनच ग्राम पंचायतीचे गटार गेले होते. ते सदा तुंबलेले असे. कधीतरी ग्राम पंचायतीचा एखादा सफाई कामगार येऊन हातातल्या लोखंडी फावड्याने त्या गटारातली गदळ काढून त्याचे त्या गटारालगतच बारके बारके ढीग घालत असे. चार दिवस गटारातून काळे पाणी वाहत राही. मग वार्‍या-पावसाने, येणार्‍या-जाणार्‍या बैलगाड्या, माणसे यांच्या वर्दळीने आणि गल्लीत सदैव चालत असलेल्या कुत्र्यांच्या दंगलीने हे कचर्‍याचे ढीग पुन्हा विस्कटून गटारातच पडत आणि गटार पुन्हा तुंबत असे.

घराचा मुख्य दरवाजा चांगला बारा फूट उंचीचा होता. कोणे एके काळी त्याला चांगली मजबूत लाकडी दारेही असतील. पण मला आठवते तसे ती दारे अगदीच खिळखिळी झालेली होती. दोन्ही दारे चिरफाळलेली होती आणि त्या दारांच्या लाकडांना कीड लागलेली होती. दरवाजा लावताना दरवाज्यांवरच्या बारीक भोकांमधून पिवळसर भुक्की भुरुभुरू पडत असे. दाराच्या आतल्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीला तर काही अर्थच नव्हता. दरवाज्यातल्या फटीतून हात घालून बाहेरच्या माणसाला ती सहज काढता येत असे. दाराच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी म्हणून बसवलेले घडीव आयताकृती दगड बाकी अगदी ठसठशीतपणाने टिकून होते. त्यातल्या उजव्या बाजूच्या दगडावर बसून आजी समोरच्या घरातल्या धनगराच्या म्हातारीबरोबर गप्पा मारत असे. दरवाजाच्या आत गेल्यागेल्या दोन्ही बाजूला दोन ढेलजी होत्या. एका बाजूच्या ढेलजीवरचे छप्पर काही दिवस शाबूत होते आणि त्या ढेलजीतल्या अंधार्‍या कोंदट खोलीत काही दिवस कल्लव्वा आणि तिची अकरा का बारा मुले भाड्याने राहात होती. दुसर्‍या बाजूची ढेलज बाकी अगदी पडून गेली होती. तिच्यात गाईची वाळलेली वैरण नाहीतर शेणकुटे, तुरकाट्या असले काहीतरी जळण कसेतरी ठेवलेले असे.

आत गेल्यावर खडबडीत आणि उंचसखल असे चिंचोळे अंगण होते. वर्षातून एकदा पायाला अगदीच खडे टोचायला लागले की चार पाट्या मुरुम टाकून धुमुसाने नाहीतर बडवण्याने बडवून ते अंगण जरा त्यातल्या त्यात सपाट केले जाई. पण चार दिवस गेले की पावसापाण्याने वरची माती वाहून जाई आणि परत पायाला खडे टोचायला लागत. रोज अंगण झाडून काढणे आणि शेणकाल्याचा सडा टाकणे हे एक नित्याचे काम होते. अंगणात एक तुळशीवृंदावन होते . रोजची रांगोळी त्या वृंदावनापुरती असे. पण दिवाळीत बाकी अंगणभरच नव्हे, तर रस्त्यापर्यंत रांगोळ्या काढल्या जात. त्या अंगणाच्या मधूनच सांडपाण्याचा एक ओहोळ दरवाज्याकडे गेलेला होता. त्या ओहोळाला बाहेरच्या गटारात जायला काही साधन ठेवलेले नव्हते. एखाद्या बेवारशी कुत्र्यासारखा तो ओहोळ इथे-तिथेच पडलेला असे. अंगणात डाव्या हाताला पाण्याचा हौद होता. ग्राम पंचायतीचे पाणी अगदी कमी दाबाने यायचे, म्हणून त्या पाण्याची तोटी जमिनीपासून अगदी कमी उंचीवर होती. तिच्याखाली एक लहानशी बादली किंवा कळशी कशीबशी मावत असे. त्या कळशा, घागरी भरभरून तो अंगणातला पाण्याचा हौद भरणे हे एक मोठे काम होऊन बसले होते. ग्राम पंचायतीच्या पाण्याचा काही भरवसा नसे. ते कधी येई, कधी येत नसे. आले तरी किती वेळ टिकेल हेही काही सांगता येत नसे. उन्हाळ्यात तर आठवडाच्या आठवडा नळाला पाणी नसे. मग मळ्यातल्या विहिरीतून पाण्याचा मोठा हौद भरून तो बैलगाडीत घालून गावातल्या घरात आणावा लागे. ते पाणी बादल्याबादल्याने अंगणातल्या हौदात भरावे लागे. त्या बाहेरच्या हौदातून घराच्या परसात असलेल्या हौदात पाणी नेऊन टाकणे हे तर महाकठीण असे काम होते. घरात जायचे म्हणजे दगडी पायर्‍या, उंच उंबरे, जाती, उखळे,लहानमोठे कट्टे असे असंख्य अडथळे पार करत जावे लागत असे. त्यात घरातली एक चौकट काही दुसरीच्या आकाराची नव्हती. त्यामुळे सतत कुठे कमी तर कुठे जास्त वाकूनच एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जावे लागे. पण त्याची इतकी सवय झाली होती की न चुकता त्या त्या दारातून कमीजास्त वाकून लोक भराभरा दुसर्‍या खोलीत जात असत. कुणाला चौकट डोक्याला लागून जखम झाली आणि खोक पडली असे मला तरी आठवत नाही. पाणी भरण्याचे काम आम्ही लहान असताना गडीमाणसे करत. हे गडीही बहुदा वर्षाच्या कराराने बांधून घेतलेले असत. एक पोते जोंधळे आणि अकराशे-बाराशे रुपये यावर तो गडी वर्षभर पडेल ते काम करत असे. माझ्या वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षापासून अशी कामे करायला माणसे मिळेनाशी झाली, तेव्हा हे काम आमच्यावर आले. सकाळी बाहेरचा हौद भरणे आणि रात्री तेच पाणी आतल्या हौदात नेऊन टाकणे हे काम अत्यंत उत्साहाने कितीतरी वर्षे केल्याचे मला आठवते. नंतर नंतर तर दोन्ही हातात भरलेल्या कळशा घेऊन जवळजवळ धावतच अंगण, पडवी, सोपा, माजघर, स्वयंपाकघर ओलांडून जागोजागी वाकत वाकत परसात जायचे आणि तिथल्या हौदात धबाल करून त्या कळशा ओतायच्या यात मजाच मजा वाटत असे. बाहेरच्या हौदापासून आतल्या हौदापर्यंत एक पाईप आणि अर्ध्या हॉर्सपॉवरची एक मोटार यासाठी पैशाची जुळवाजुळव करायला माझ्या वडिलांना कित्येक वर्षे लागली. एकूणातच पाणी हा जुन्या घरातला एक फारच मोठा प्रश्न होता. घरातल्या बर्‍याच लोकांचा दिवसातला बराच वेळ पाण्याची व्यवस्था करण्यातच जात असे.

जुन्या घराचे अंगण काही फार मोठे नव्हते, पण त्यात एक बाग असावी अशी माझी शाळकरी महत्त्वाकांक्षा होती. बाग करण्याचे माझे लहानपणीचे कितीतरी प्रयत्न वाया गेले. शेवटी दांडगाईने मुर्दाडासारखी वाढलेली काही कर्दळीची झाडे एवढेच त्या बागेचे स्वरुप शिल्लक राहिले. बाकी मी लावलेली रोपे म्हणजे तरी काय म्हणा, कुणीतरी दिलेल्या गावठी गुलाबाच्या फांद्या, मळ्यातूनच आणलेले एखादे मोगर्‍याचे रोप किंवा शाळेतूनच उपटून आणलेले एखादे चिनी गुलाबाचे झुडूप. पण यातले काही म्हणजे काही त्या बागेत जगले नाही. पण एकदा कसे कुणास ठाऊक, माझ्या चुलत आत्याने मठातून आणलेले एक पारिजातकाचे झाड त्या बागेत रुजले आणि हां हां म्हणता ताडमाड वाढून बसले. मोजता येणार नाही इतक्या फुलांनी ते झाड फुलत असे आणि दर वर्षी श्रावणात आजी त्या फुलांचा लक्ष करत असे. त्या झाडाच्या भिंतीपलीकडे गेलेल्या फांद्या सावरायला म्हणून मी भिंतीवर चढलो आणि पायाखालची वीट फुटून धाडकन खाली कोसळलो होतो. मला लागले फारसे नव्हते पण घाबरून आणि मुक्या माराने मला हबक भरल्यासारखे झाले होते. सकाळी उठून ते पारिजातकाचे झाल हलवणे आणि त्याची परडीभर फुले गोळा करून ती परडी देवघराच्या कट्ट्यावर आणून ठेवणे हे घरातल्या मुलांचे आवडीचे काम होते. पुढे एका पावसाळ्यात रपारपा पाऊस पडत होता आणि नेहमीसारखेच दिवे गेलेले होते. एकदम वीज कडाडली आणि तसलाच काहीसा आवाज अंगणातूनही आला. अंधारात काही दिसले नाही पण ‘झाड पडलं जणु’ असे कोणीसे म्हणाले. दुसर्‍या दिवशीसकाळी बघतो तर खरेच तो पारिजातकाचा वृक्ष उन्मळून पडला होता. मग कुर्‍हाडीने तो तोडला आणि एखादे मेलेले जनावर गावाबाहेर नेऊन टाकावे तसे त्याचे रुक्ष खोड आणि खरखरीत फांद्या उकीरड्यावर नेऊन टाकल्या. घरातले एखादे माणूस जावे तसे काहीसे त्यावेळी झाल्याचे आठवते. त्या भुंड्या जागेकडे बरेच दिवस बघवतही नव्हते.

अंगणातल्या उजव्या बाजूला गुरांना दिवसा बांधायची जागा होती. कधी गाय, कधी म्हैस असले काहीतरी दुभते जनावर आणि त्याचे एखादे वासरु, रेडकू तेथे दिवसा बांधलेले असे. बर्‍याच वेळा भाकड जनावरे मळ्यातच असत. एखादी गाय किंवा म्हैस व्याली आणि तिच्या चिकाचे दिवस संपले की मग तिला घराकडे दुभत्यासाठी आणले जाई. काही वेळा घरातही गाईचे वेत होई. गाईचा पाडा असला किंवा म्हशीची रेडी असली तर त्यांना गाई-म्हशीचे थोडे दूध राखून ठेवलेले असे, म्हणून ती जरा तजेलदार दिसत. कालवडी किंवा रेडे पाळणे बाकी परवडत नसे. कालवडींचे दूध तुटले की त्या कुठल्या तरी कुळवाड्याकडे अर्धलेनी म्हणून दिल्या जात. मग अशा कालवडी मोठ्या होऊन गाभण राहिल्या की मग घरी परत येत. मग त्यांची अंदाजे काहीतरी किंमत ठरवून त्या किंमतीचा निम्माभाग त्या कुळवाड्याला दिला जाई, म्हणजे बहुतेक वेळा त्यांनी अंगावर घेतलेल्या उसनवारीतून वळता केला जाई. वासरांचा बाकी घरातल्या लहान मुलांना लगेच लळा लागे. बारके नुकतेच जन्मलेले वासरू धडपडत आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना घरातली मुले त्याच्या अवतीभवती असत. त्या वासराची नाळदेखील पूर्ण सुकलेली नसे. आपल्या मोठ्या, काळ्याभोर डोळ्यांनी ते वासरू टुकुटुकू इकडे-तिकडे बघत असे. मधूनच ‘बें.. ‘ असा काहीतरी आवाज काढी. शेजारीच बांधलेली त्याची आई घशातल्या घशात ‘डुर्र..’ असे काहीतरी करी. वासराच्या तोंडावरुन, पाठीवरून हात फिरव, त्याच्या ओलसर नाकाला हात लावून बघ, त्याच्या कानात बघ, असे तासनतास निघून जात. वासरे मोठी होऊन एखादे पान चघळायला लागली की त्याला वैरण भरवण्याची चढाओढ लागे. ते वासरू बाकी दिवसदिवस एकच पान चघळत बसलेले असे. रेडे बाकी त्यामानाने मठ्ठ असत. त्यांच्याकडे मोठ्या माणसांप्रमाणे मुलांचेही दुर्लक्षच होत असे. थंड, भावशून्य नजरेने आयुष्यात कसलीही उमेद नसलेल्या माणसासारखे ते तासनतास उभे असत. नुकत्याच जन्मलेल्या रेड्यालासुद्धा जन्मल्याचा आनंद असा काही होत असेल, असे त्याच्या चेहर्‍यावरून वाटत तरी नसे. पुढे म्हैस परत गाभण राहिली आणि तिचे दूध खारट व्हायला लागले की ते रेडे एक दिवस दिसेनासे होत. ते कुठे जात हे त्या वेळी कळत नसे. ते कापायला जात हे आज ध्यानात येते.

अंगण ओलांडले की घराचे मुख्य दार होते. त्याला ‘पत्र्याचे दार’ म्हणत. ते दार काही पत्र्याचे नव्हते, पण त्या दारानंतर जी पडवी होती, तिच्यावर पत्रा घातलेला होता. म्हणून त्याला पत्र्याचे दार म्हणत असावेत. पडवीत दगडी फरशी घातलेली होती. पडवीतच एका बाजूला गोठा होता. दुभते जनावर आणि तिचे वासरु, रेडकू जे काय असेल ते रात्री या गोठ्यात बांधले जाई. पडवीत मधोमध एक हातपंप होता. फार पूर्वी त्याला कधीतरी भरपूर पाणी होते म्हणे. पण आता वापरात नसल्याने त्याच्या जमिनीखालच्या सगळ्या नळ्या गंजून गेल्या होत्या. कधीतरी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्या हातपंपाशी खेळण्याची लहर येई. त्या पंपाचा लांब, लोखंडी दांडा कुठेतरी इकडेतिकडे ठेवलेला असे. तो शोधून काढून तो त्या पंपाला बसवून त्याच्याशी चांगली अर्धा पाऊण तास झटापट केली की मग तो दांडा जड लागायला लागे आणि मग एकदम त्या नळातून गंजलेले लालभडक पाणी यायला लागे. ते काही म्हणजे काही कामाचे नसे. मोरीतून बाहेर जाऊन ते पाणी अंगणात पसरे आणि अंगण लालेलाल दिसायला लागे. गंजक्या लोखंडाचा वास पडवीभर पसरलेला असे आणि घरातली मोठी माणसे वैतागलेली असत.

पडवीच्या वर दोन पायर्‍या चढून सोपा होता. हा सोपाही सगळ्या घरासारखा दणकट, पण ओबडधोबड होता. मोठमोठे खांब, तुळ्या, त्या तुळ्या खचू नयेत म्हणून त्यांना आधारासाठी दिलेल्या ठेपा, असला सगळा हुमदांडगा कारभार होता.सोप्याच्या एका कोपर्‍यात एक लोखंडी हौद होता. हा हौद धान्याच्या साठवणीसाठी होता. ही धान्येही बहुदा जोंधळे किंवा खपली अशीच असत. क्वचित भात असे. भात म्हणजे न सडलेला तांदूळ. हे जोंधळे निवडून पिठाच्या गिरणीतून त्याचे भाकरीसाठी पीठ करून आणणे, खपली भरडून त्याचे गहू करून आणणे, ते गहू पाखडून, निवडून त्याचे परत गिरणीतून पीठ करून आणणे, भात मिठाच्या पाण्यात भिजत घालून ते दुसर्‍या दिवशी पाण्यातून उपसून लहानशा पोत्यांमध्ये घालून सायकलवरून शेजारच्या शहरातल्या पोह्याच्या भट्टीत घेऊन जाणे आणि त्याचे पोहे करून आणणे, असली प्रचंड कष्टाची कामे करण्यात घरातल्या लोकांचा बराच वेळ जात असे. हौदाच्या शेजारच्या कोनाड्यात कंदील, चिमण्या, सुंदर्‍या असा उजेडाचा जामानिमा असे. रोज संध्याकाळी कंदिलांच्या वाती साफ करणे, चिमण्यांत रॉकेल भरणे आणि मुख्य म्हणजे रांगोळीने कंदील आणि सुंदर्‍यांच्या काचा साफ करणे हे न चुकता करायचे काम असे.

सोप्यातली सगळ्यात सुखाची जागा म्हणजे सोप्यातला झोपाळा. त्या झोपळ्याच्या मागे लगेच वर माडीवर जाणारा लाकडी जिना होता, म्हणून झोपाळ्याचा झोका काही फार मोठा घेता येत नसे. पण त्या झोपाळ्यावर जेवणाच्या आधी पोटात भुकेने कासावीस होत असताना आणि पोटभर जेवणानंतर डोळ्यावर झोपेची सुरेख गुंगी येत असताना बसून हलके हलके झोके घेणे यात अपार आनंद वाटत असे. झोपाळ्यावर एका कडीला टेकवून ठेवलेला एक घट्ट तक्क्या होता. त्याला टेकून पायाने जमिनीला रेटा देऊन झोका घेतला की मग तर आपण एखाद्या लहानशा राज्याचे सम्राट आहोत असेच वाटत असे. त्या झोपाळ्याखाली जमिनीत एक पेव आहे, असे आजी सांगत असे.
झोपाळ्याशेजारच्या भिंतीत एक अतिशय खोल असा कोनाडा होता. त्यात जुना व्हॉल्वचा रेडीओ होता. त्यावर रेडीओ सिलोन आणि आकाशवाणी पुण्याचे सहक्षेपित होणारे कार्यक्रम अजूनही लक्षात आहेत. ‘आपली आवड’ नावाचा मराठी गाण्यांचा एक फर्मायशी कार्यक्रम त्या काळात फार प्रसिद्ध होता. त्या कार्यक्रमापेक्षा त्याचे’टायटल म्यूझिक’च अधिक आकर्षक वाटत असे. सिलोनवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’,’सदाबहार नग़मे’, ‘बदलते हुए साथी’, ‘जब आप गा उठें’ असे कार्यक्रम ऐकायला मजा येत असे. ‘गैरफिल्मी नज़में और गज़लें’ लागली की बाकी कंटाळा येत असे.

पडवीच्या भिंतींच्या वरच्या अर्ध्या भागात लोखंडी गज बसवलेले होते. त्यामुळे सोप्यात तसा बर्‍यापैकी उजेड येत असे. दारासमोर बसले की थेट रस्त्यावरून येणारी जाणारी माणसे दिसत. सोप्यातल्या भिंतींवर रविवर्म्याच्या चित्रांच्या स्वस्तातल्या प्रतींच्या मोठमोठ्या चौकटी होत्या. तिथेच दारासमोर हरणाच्या कातड्यावर बसून आजोबा गुरुचरित्राची पोथी वाचत असत.रविवारी येणारा जानबा न्हावी तिथेच बसून आजोबांची दाढी करत असे. मळ्यात जाताना हातात धरायची आजोबांची काठी तिथेच ठेवलेली असे.दसर्‍याला सोने द्यायला आजोबांकडे खूप लोकांची गर्दी होत असे. कोट-टोपी घालून आजोबा त्यांच्या त्या बैठकीवर बसलेले असत. त्यांच्या शेजारी चवल्या-पावल्यांनी भरलेले एक ताट असे. सोने देऊन वाकून नमस्कार करणार्‍यांना आजोबा हाताला येईल ते नाणेही देत असत. पुढे आजोबांना दिसायचे कमी झाले तेव्हा अक्षराला अक्षर लावून सोप्यात बसून मी आजोबांना ‘सत्यवादी’ वाचून दाखवत असे. पुढे काही वर्षांनी आजोबा गेले तेव्हा त्यांचे पार्थिव याच सोप्यात ठेवले होते. पूर्ण कावर्‍याबावर्‍या झालेल्या माझ्या वयाच्या घरातल्या मुलांना कुणीतरी घाईघाईने ‘आजोबांना नमस्कार करायला चला’ म्हणून सोप्यात नेले आणि तितक्याच घाईने दुसरीकडे घेऊन गेले, ते सगळे याच सोप्यात.

जुन्या घरातल्या भिंती चांगल्या तीन-तीन फुटी रुंद होत्या. घराच्या दोन्ही बाजूला चिकटूनच दुसरी घरे असल्यामुळे आतल्या खोल्यांना खिडक्या वगैरे असणे शक्यच नव्हते. सोप्यातून माजघरात गेले की एकदम गार वाटत असे. माजघर प्रचंड अंधारे होते. दिवा लावला नसेल तर माजघरात डोळ्यांत बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख असे. सोप्यातून माजघरात जाताना वाटेत एक अतिशय उंच असा उंबरा होता. तो इतका उंच का होता आणि माजघरातून स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा इतका बुटका का होता हे मला आजपर्यंत कळालेले नाही. माजघरातून माडीवर जाणारा दुसरा दगडी जिना होता. तोही असाच एखाद्या गडाच्या पायर्‍या असाव्या तसा भक्कम, पण ओबडधोबड होता. त्याला काही कठडाबिठडा नव्हता, त्यामुळे त्यावरून जाताना जपून जावे लागे. तो जिनावरून बंद करता येईल असे एक छतातले दार होते. ते कशासाठी होते हेही कधी कळाले नाही. दोन्ही जिन्यांमधून पळापळी करताना पाय घसरून गडगडत खाली आल्याचे बाकी मला चांगले आठवते.

जुन्या घरातले स्वयंपाकघरही असलेच गैरसोयीचे होते. बराच काळ स्वयंपाक चुलीवरच होत असे. चुलीच्या जळणाची व्यवस्था करणे हे एक मोठे काम होते. शेतात तोडलेल्या झाडांच्या लाकडांचे लहानमोठे ढलपे, शेणकुटे,मक्याची बुरकुंडे, तुरकाट्या असले काहीबाही सरपण शेतावरून गाड्याच्या गाड्या भरून घरी येत असे. ते सरपण स्वयंपाकघराच्या माळ्यावर रचून ठेवलेले असे. आठ-पंधरा दिवसांतून हारेच्या हारे भरून ते सरपण खाली काढून द्यावे लागे. मग त्यावर स्वयंपाक आणि अंघोळीचे पाणी तापवले जाई. स्वयंपाकघरात चुलीवर बडवल्या जाणार्‍या गरम भाकरी, वाईलीवर उकळणारी मुगाची उदंड देशी लसूण घालून केलेली उसळ आणि घरच्या तांदळाचा भात हे म्हणजे ‘त्रैमूर्ती अवतार मनोहर’ वाटावे असे जेवण असे. जुन्या घरात जसे जेवलो, तसे पुढे आयुष्यात कुठेच मिळाले नाही. ताटभर गरमागरम माडगे ताट तोंडाला लावून प्यालो. गणपतीच्या एकवीस मोदकांचे ताट प्रत्येक मोदकावर एक चमचा तूप घालून संपवले. घरच्या आंब्यांचा आमरस बरोबरीने आसके दूध घालून वाडग्याने प्यालो. गरम भाकरीवर भरलेल्या दोडक्याची भाजी घालून तिचा काला करून जिभेला चटके देत चटकपटक खाल्ला आणि देशी रव्याचा गूळ, सुंठ आणि वेलदोडे घालून केलेला सांजा दूध-तूप घालून पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ला. जुने घर पूर्ण शाकाहारी होते. जुन्या घरात साधे एक अंडेही कधी फुटले नाही. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र ‘लुटुनी काय नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले ‘ अशी माझी भावना आहे. दूध-दही-तूप तर घरचेच असे. स्वयंपाकघरात दुभत्याचे एक भिंतीतले फडताळ होते. दूध, ताक, झाकपाक केलेले अन्न हे गार पाण्याच्या भांड्यांमध्ये घालून त्या फडताळातच ठेवलेले असे. फ्रीज ही वस्तू गावातच कुणाकडे नव्हती.

स्वयंपाकघरातच एका बाजूला घरातील इतर सर्व जागांप्रमाणे अतिशय गैरसोयीचे असे देवघर होते. एका जुन्या देव्हार्‍यात असंख्य देवांच्या मूर्ती, शाळीग्राम, लंगडा बाळकृष्ण, शंख, देवांचे टाक असे गचडीने ठेवले होते. देवपूजेला वेगळा पुजारी वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती किंवा ऐपत नव्हती म्हणा. पूजेचे शास्त्र बाकी काटेकोरपणे पाळावे लागे. चंदनाचे खोड, सहाण,पूजेचे वस्त्र हे सगळे जागच्या जागी ठेवावे लागे. गणपतीला दुर्वा, द्राशाळाचे फूल, शंकराला पांढरे फूल हे चुकवून चालत नसे. परसात दगडाची एक प्रचंड पिंड होती. तिच्यावर एरवी उन-पावसाचाच अभिषेक होत असे. पण शिवरात्रीला तिच्यावरही पांढरे फूल चढत असे.

स्वयंपाकघरातून परसात गेले की तिथे न्हाणीघर होते. त्या अंधार्‍या,दिव्याची आणि उजेडाची सोयसुद्धा नसलेल्या जागेला मला दुसरा शब्द सुचत नाही. वर्षानुवर्षे त्या न्हाणीघरातल्या चुलवणावर काळ्याकुट्ट पडलेल्या एका जुनाट हंड्यात अंघोळीचे पाणी तापवले जाई. पाणी तापवायचा बंब आला तोही फार नंतर. न्हाणीघर सतत ओले आणि अंधारे असे आणि त्याच्या कोपर्‍यात लठ्ठ,किळसवाण्या बेडक्या बसलेल्या असत.परसात एका कोनाड्यात दोन वरवंट्यासारखे दगड होते. त्या ‘ताईबाई’ आहेत असे म्हटले जाई. दर अमावस्येला ताईबाईला नारळ वाढवावा लागे.

जुन्या घराला अत्यंत बेंगरुळपणाने बांधलेली माडी होती. सोप्यावरच्या माडीला ‘बाहेरची माडी’ आणि माजघरावरच्या माडीला ‘आतली माडी’ असे नाव होते. दोन बहिणींपैकी झकपक असणार्‍या एकीने शिकून-सवरून नोकरी करावी आणि शहरात राहणारा सुशिक्षित नवरा पटकवावा आणि दुसरीने आपली बेताची बुद्धी आणि सामान्य रुप याची जाण ठेवून खेड्यातल्या एखाद्या शेतकर्‍याच्या गळ्यात माळ घालावी तसे या दोन माड्यांचे झाले होते. बाहेरच्या माडीवर नंतर फरशी केली, भिंतींना गिलावा केला आणि घरातला एकुलता एक सीलिंग फॅनही बाहेरच्या माडीतच लागला. आतली माडी ही बाकी वर्षानुवर्षे तशीच बिनगिलाव्याची, खडबडीत आणि पोपडे उडालेल्या जमिनीची आणि कोंदट राहिली होती. बाहेरच्या माडीला समोर पत्र्याची का असेना, पण एक गच्ची होती आणि कोजागिरीला आटवलेले दूध प्यायला किंवा चंद्रग्रहण बघायला ही गच्ची वापरली जात असे. आतल्या माडीत एका बाजूला ज्वारीची पोती रचलेली असत आणि एका कोपर्‍यात साठवणीचे कांदे ठेवलेले असत. बाहेरच्या माडीत आमच्या अभ्यासाच्या पुस्तकांचे कपाट होते, तर आतल्या माडीच्या छतांच्या वाशांना लसणाच्या माळा टांगलेल्या असत. आतल्या माडीत नाही म्हणायला उन्हाळ्यात आंब्याची अढी घातली जात असे तेव्हा ती माडी पिकलेल्या आंब्यांच्या सुवासाने दरवळून जात असे. उन्हाळ्यात दोन्ही माड्या चरचरीत तापत आणि पावसाळ्यात गच्चीतल्या पत्र्यावर जोराचा तडतड पाऊस वाजू लागला की छपरांतून सुरवंट टपटप अंथरुणात पडत.

त्या रानवट, गावठी जुन्या घरात, असल्या सगळ्या वेड्यावाकड्या,गाठीगाठीच्या आयुष्यात धडपडत, मिळेल तशी मुसंडी मारत, प्रसंगी अंग चोरून घेत माझे बालपण जगण्याचा प्रयत्न करत होते!

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

1 Response to जुने घर

  1. Anonymous कहते हैं:

    लेख खूप आवडला.

    – डी एन

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s