सुनीताबाई

सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली गेली. गंमत म्हणजे यातली बरीचशी त्यांच्या कानावरही गेलेली होती. पु.लंच्या एकूण बहुरुपी व्यक्तिमत्वापुढे सुनीताबाईंची प्रतिमा (आणि प्रतिभा) काळवंडलेली, झाकोळल्यासारखीच राहिली असे खूप लोकांचे –अगदी खुद्द – पुलंचेही मत होते. ’आहे मनोहर तरी..’ नंतर तर त्यात भरच पडली. ’आहे मनोहर तरी…’ चे जसे कौतुक झाले तशी त्यावर सडकून टीकाही झाली. कितीतरी (भाबड्या) लोकांना हा सुनीताबाईंनी हेतुपुरस्सर केलेला मूर्तीभंजनाचा प्रकार वाटला. दरम्यान पुलंना महाराष्ट्रातील रसिकांनी आपले दैवत वगैरे बनवून टाकलेले होतेच. लेखन, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा अनेक कलाक्षेत्रांत लीलया संचार करणारा हा माणूस चार भिंतींच्या आत तुमच्याआमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, एक टिपिकल नवरा आहे – किंवा कुठलाही माणूस, नवरा तसाच असतो- हे काहीसे कटु सत्य वाचकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम ’आहे मनोहर तरी..’ ने केले. सामान्य वाचकांच्या त्या पुस्तकावर उड्या पडल्या त्या पुलं आणि सुनीताबाई यांच्या खाजगी जीवनाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या कुतुहलामुळेच. ’आहे मनोहर तरी…’ या पुस्तकात इतर बरेच काही आहे, पण त्यातून लक्षात राहिला तो म्हणजे सुनीताबाईंनी पुलंच्या आयुष्यात आणलेला व्यवहारीपणा, त्याला लावलेली शिस्त आणि त्यामुळे पुलंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात पडलेला फरक.
पुढे जी.ए.कुलकर्णी यांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांचा एक मोठा खंड, सुनीताबाईंनी जी.एंना लिहिलेल्या पत्रांचे ’प्रिय जी.ए.’ हे पुस्तक, त्याशिवाय सुनीताबाईंनी स्वतंत्रपणे लिहिलेली ’सोयरे सकळ’, ’मण्यांची माळ’, ’समांतर जीवन’ ही पुस्तके प्रकाशित झाली. यांतून सुनीताबाईंची एक स्वतंत्र, स्वयंप्रकाशी प्रतिमा वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी राहात गेली. मंगला गोडबोल्यांनी लिहिलेले व अरुणा ढेरे यांच्या एका स्वतंत्र लेखाचा समावेश असलेले, सुनीताबाईंच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध झालेले ’सुनीताबाई’ हे पुस्तक नुकतेच माझ्या संग्रहात आले आहे.
मंगला गोडबोले या काही माझ्या फार आवडीच्या लेखिका आहेत असे म्हणता येणार नाही. त्यांची विनोदी पुस्तके एका विवक्षित वर्गात कितीही लो्कप्रिय झालेली असली तरी ’बडीशेप चघळताना वाचायची पुस्तके’ यापलीकडे त्यांचे फारसे अस्तित्व नाही असे माझे मत आहे. एकूणात चिंचाआवळी भाबडेपणा हाच त्यांच्या पुस्तकांचा स्थायीभाव आहे. त्यातल्या त्यात पु.ल.देशपांड्यांबद्दल लिहिताना तर मंगलाबाई देवघरात निरांजन लावून हातात मीठमोहर्‍या घेऊनच लिहायला बसत असल्यासारख्या वाटतात. असो. या पुस्तकात हा भाबडेपणा त्यांनी टाळला आहे असे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, पण सुनीताबाईंशी अत्यंत मोजका परिचय असताना त्यांनी सुनीताबाईंचे इतके तपशीलवार चरित्र लिहिणे हे म्हणजे भास्करबुवा बखल्यांना एकदाही न पहाता किंवा त्यांची एकही रेकॉर्ड न ऐकता त्यांच्या गायकीविषयी पुलंनी लिहिलेल्या लेखाइतके विचित्र वाटते. पण हा एक दोष सोडला तर मंगलाबाईंनी हे पुस्तक लिहून एक फार दांडगे काम केले आहे.
The borderline between genius and insanity is very thin असे म्हणतात. अलौकिक प्रतिभा आणि वैयक्तिक आयुष्यातले यश, त्यातली शिस्त असा एकत्र मिलाफ क्वचितच बघायला मिळतो. नित्यनूतननिर्मितीचा वर आणि विस्कटलेल्या आयुष्याचा शाप हेच बहुदा एकत्र नांदताना दिसतात. पुलंची एकूण वृत्ती आणि संस्कारांतून त्यांची झालेली जडणघडण यातून एरवी त्यांचे आयुष्य काही उधळले गेले असते असे वाटत नाही, पण ते इतके सार्थ झाले असते असेही नाही. अर्थात अमुक झाले असते तर, तमुक झाले असते तर अशा कल्पनांना काही अर्थ नाही, पण व्यवस्थितपणा, व्यवहारीपणा, गोष्टी वेळच्या वेळी करणे, लक्षात ठेऊन करणे हे अपला स्वभावातच नाही याची जाहीर कबुली पुलंनी दिलेली आहे. सुनीताबाईंनी पुलंच्या जीवनातला हा सगळा व्यवहार काटेकोरपणे सांभाळला. सुनीताबाईंना ओळखणार्‍या लोकांना त्यांच्या परवानगीशिवाय पुलंचे दर्शनसुद्धा कसे अशक्य होते याची कल्पना आहे. सुनीताबाई या स्वत: अत्यंत तत्वनिष्ठ, आदर्शवादी आणि कणखर स्वभावाच्या होत्या. याउलट पुलंचा स्वभाव काहीसा घळ्या म्हणता येईल असा. पुलंच्या या स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेणे हे एकदा सोडून अनेकदा झाले. (’गुळाचा गणपती’ चे उदाहरण सर्वश्रुतच आहे) त्यामुळे पुलंमधली सर्जनशीलता जपायची असेल आणि त्यांच्या हातून अधिकाधिक नवनिर्मिती व्हायची असेल तर त्यांच्यावर आणि त्यापेक्षा अधिक त्यांच्या चाहत्यांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे असे सुनीताबाईंना वाटले असावे. हा अंकुश ठेवणे म्हणजे तरी काय? तर त्यांच्या लेखना-वाचनाच्या वेळा सांभाळणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांच्या नाट्यप्रयोगांची, पुस्तकांच्या आवृत्यांची, काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची, प्रवासाची व्यवस्था बघणे आणि यापलीकडे जाऊन पु.ल.देशपांडे फाऊंडेशन चे सतत विस्तारत जाणारे काम बघणे. ही नुसती यादी बघीतली – आणि तशी ती फारच अपूर्ण आहे- तरी सुनीताबाईंच्या कामाची व्याप्ती ध्यानात येते.
हे सगळे सुनीताबाईंनी आनंदाने, प्रेमाने केले. पुलंच्या आयुष्यात विलक्षण उंची गाठून गेलेले काही क्षण केवळ सुनीताबाईंच्या आग्रहामुळे, काही वेळा अट्टाहासामुळे आले. मग ते कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करणे असो नाहीतर आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या सरकारस्थापनेच्या गौरवसभेत जाहीर भाषण करण्याला नकार देणे असो. पुलंच्या एका नाट्यप्रयोगाचे पन्नास प्रयोग झाले की त्यांनी दुसरा प्रयोग लिहायला घ्यायचा या सुनीताबाईंच्या आग्रहामुळेच पुलंकडून इतके विपुल लिखाण लिहून झाले हे अगदी सुनीताबाईंच्या टीकाकारांनाही नाकारता येणार नाही. याशिवाय ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीच्या सुनीताबाईंनी जे जे करायचे ते उत्तमच झाले पाहिजे असा सतत आग्रह धरला. म्हणूनच पुलंचे लिखाण, त्यांचे नाट्यप्रयोग, कवितावाचन आणि मुख्य म्हणजे पु.ल. देशपांडे फाऊंडेशनचे सामाजिक कार्य इतके चोख, निर्दोष आणि देखणे झाले. आपले काम उत्तमच असावे, असे प्रत्येकालाच वाटते, पण त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्याची किती लोकांची तयारी असते? अशी मेहनत सुनीताबाईंनी आयुष्यभर घेतली. मग ते पुलंनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे मुद्रणशोधन असो की पुलंच्या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान क्षणभर विंगेत येणाया पुलंसाठी हातात घोटभर पाण्याचा ग्लास घेऊन उभे राहाणे असो. पुलंच्या प्रयोगांची तिकिटविक्री, ध्वनिक्षेपण यंत्रणा, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था, कलाकारांची येण्याजाण्याची व्यवस्था, त्यांना देण्यात येणारे मानधन यात कुठेही चूक होता कामा नये यासाठीच सुनीताबाईंनी अत्यंत चोख आणि अथक प्रयत्न केले. Behind every successful man there is a woman हे म्हणायला ठीक आहे, पण सुनीताबाईंनी ते आपल्या कणखरपणाने सिद्ध करुन दाखवले.
सुनीताबाईंच्या या कणखरपणाची कितीतरी उदाहरणे या पुस्तकात आहेत. त्यातली बरीचशी वाचताना ’हे जरा जास्तच होते आहे की काय?’ असे वाटते. काही प्रसंग बाकी माणसात इतके आंतरिक बळ येते तरी कुठून असा प्रश्न पडावा असे आहेत. मालेगावच्या महात्मा गांधी विद्यालयचा बोजवारा उडाल्यावर आणि भाऊसाहेब हिरे आणि शंकरराव देव कितीही आदर्शवादी असले तरी मखरात बसलेले मातीच्या पायांचे देव आहेत हे ध्यानात आल्यावर सुनीताबाईंनी त्यांच्या फटकळ स्वभावानुसार तडकाफडकी राजिनामा दिला. मालेगावातल्या गैरव्यवहाराची कबुली देणारी आणि त्याबद्दल माफी मागणारी भाऊसाहेब हिर्‍यांची पत्रे सुनीताबाईंकडे आहेत हे कळाल्यावर त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न आचार्य अत्र्यांनी केला. ती पत्रे मिळवण्यासाठी अत्र्यांनी विनवण्या, पैशाची लालूच दाखवणे आणि नंतर चक्क दमदाटी असले प्रकार केले, पण सुनीताबाई मुळीच बधल्या नाहीत. अत्रे हे त्या काळात फार मोठे प्रकरण होते. त्यांच्यासमोर त्या तुलनेने सर्वार्थाने अगदी लहान असलेल्या सुनीताबाईंचा हा कणखरपणा थक्क करुन टाकणारा आहे. असा खंबीरपणा त्यांनी आयुष्यात बर्‍याच वेळा दाखवला. पुलंच्या प्रत्येक नाट्यप्रयोगाची रॉयल्टी मिळण्याबाबत असो, की पु.ल देशपांडे फाऊंडेशनचा चोख व्यवहार सांभाळण्याबाबत असो, सुनीताबाईंनी कधीही तडजोड केली नाही.
या पुस्तकाच्या निमित्ताने संसारात नवराबायकोने एकमेकांवर किती अधिकार गाजवावा असा एक प्रश्न वाचकाच्या मनात येतो. खुद्द सुनीताबाईंनाही पुलंच्या हयातीत (आणि विशेषत: पुलंच्या निधनानंतर) ’आपण जरा जास्तच केले की काय?’ अशी टोचणी लागली होती. ’मी त्याचा गिनिपिग तर केला नाही ना?’ असा प्रश्न त्यांनी ’आहे मनोहर तरी..’ मध्ये स्वत:लाच विचारला आहे. सुनीताबाईंच्या या प्रचंड कष्टाळू, झपाटलेल्या आणि ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीचा अतिरेक होतो आहे की काय असे वाटावे असे काही उल्लेख या पुस्तकात आहेत. सुनीताबाईंच्या अतिचिकित्सक वृत्तीमुळे पुलंचे, एकूण मराठी साहित्यविश्वाचे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा आणि पुलं यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या असंख्य रसिकांचे नुकसान झाले की काय असे वाटावे असेच हे उल्लेख आहेत. परदेशात लेखकाच्या निधनानंतर त्याला आलेली (आणि बहुतेक वेळा त्याने इतरांना लिहिलेली) पत्रे प्रकाशित करण्याची पद्धत आहे. मराठीत ’जीएंची निवडक पत्रे’ चे चार खंड आणि ’प्रिय जी.ए., सप्रेम नमस्कार’ यांचे ढळढळीत उदाहरण आहे. पुलंच्या मृत्यूनंतर पुलंना आलेली मान्यवर लोकांची सुमारे अडीच हजार पत्रे प्रकाशित करावी, त्यातून समाजाच्या त्या काळातल्या जडणघडणीवर काही प्रकाश पडावा अशी योजना पुढे आली होती. पण पत्रावर प्रताधिकार कुणाचा – पत्र पाठवणार्‍याचा की पत्र ज्याला पाठवलं त्याचा यावर सुनीताबाईंनी इतका खल केला की शेवटी ती योजनाच बारगळली. कदाचित त्यांना आधी आलेल्या एकदोन कटु अनुभवांमुळे असेल, पण ’पुस्तक छापून आल्यावर एकाही पत्रलेखकानं आक्षेप घेतलेला मला चालणार नाही’ अशी भूमिका सुनीताबाईंनी घेतली. त्यांच्या या अलवचिक धोरणामुळे यातलं एकही पत्र आजवर प्रकाशित होऊ शकलेलं नाही. काही गोष्टी वेळच्या वेळी होण्यात गंमत असते. आता तर पुलं जाऊनही अकरा वर्षे होऊन गेली. आता अशी पत्रे प्रकाशित झाली तरी पुलंना आणि त्यांच्या जबर्‍या लोकसंग्रहाला ओळखणारी पिढीच आता हळूहळू संपत चालली आहे. सुनीताबाईंनी त्यांची ताठर भूमिका किंचित शिथील केली असती तर हा अनमोल ठेवा रसिकांसमोर वेळेत आला असता. असेच काहीसे खुद्द पुलंनी लिहिलेल्या पत्रांबाबतही वाटते. पुलं स्वत: जबरे पत्रलेखक होते. पुलंच्या निधनानंतर ’पुलंची निवडक पत्रे’ काही प्रसिद्ध झाली नाहीत. जी.एंच्या पत्रांच्या प्रसिद्धीबाबबत पुढाकार घेणार्‍या सुनीताबाईंनी याबाबत असे का केले असावे?
पुलंच्या नाट्यप्रयोगांबाबतही असेच झालेले दिसते. ऐन बहरातल्या पुलंच्या नाट्यप्रयोगाचे चित्रीकरण सुनीताबाईंनी करु दिले नाही. चित्रीकरण करताना पुलं कॉन्शस होतील, प्रेक्षकांचा रसभंग होईल, या चित्रीकरणाचा पुढे दुरुपयोग होईल अशा सबबी पुढे करुन सुनीताबाईंनी पुलंच्या प्रयोगांचे चित्रीकरण करण्यास मनाई केली. यामागची निश्चित मानसिकता आजही ध्यानात येत नाही. पुलंच्या आज उपलब्द्ध असलेल्या चित्रफितींचा दर्जा अत्यंत सामान्य आहे. याहून उत्तम दर्जाचे चित्रीकरण करुन पुलंचे हे असामान्य प्रयोग अजरामर करुन ठेवता आले असते. सुनीताबाईंच्या या भूमिकेमागचे, त्यांना असे चित्रीकरण करण्यामागचे ऐतिहासिक महत्त्व त्यावेळी ध्यानात आले नसावे हे कारण आज पटत नाही. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या स्त्रीला रंगमंचावर घडणारे हे असले काही विलक्षण नाट्य अजरामर करुन ठेवण्याचे महत्त्व नक्की कळाले असणार. मग सुनीताबाईंनी हे चित्रीकरण का करु दिले नाही? यावर लेखिकेने सुचवलेले दुसरे कारण – या ना त्या प्रकारे आपला पुलंच्या प्रयोगावरच नव्हे तर आयुष्यावर वरचष्मा असावा असे सुनीताबाईंना वाटले असावे – हेच खरे असावे असे वाटते आणि मग ते कारण आपल्याला अस्वस्थ करुन जाते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना स्वत:लाही आपल्या या वर्तनाचा पश्चाताप झाला असावा असे दिसते आणि मग तर या वरकरणी एकमेकांना अत्यंत अनुरुप अशा जोडप्यामधला हा कळत नकळत जाणवणारा विसंवाद मनाला खिन्न करुन जातो. अगदी कोणतीही पुरुषी मानसिकता बाळगायची नाही असे ठरवले तरीही अशा प्रसंगी पुलंनी किती तडजोडी केल्या असतील, त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना येते आणि अशा कटुतेचे कोणतेही प्रतिसाद आपल्या वागण्यात, जगण्यात आणि लिखाणात उमटू न देणार्‍या त्या पुरुषोत्तमाविषयीचा आदर वाढीला लागतो.
’ललित’ मध्ये पुलंनी मासिक सदर लिहावं अशा प्रस्तावाला पुलं काहीसे अनुकूलच होते. पण सुनीताबाईंनी नाना शंका, प्रश्न उपस्थित करुन त्या प्रस्तावाला फाटे फोडले. शेवटी ते झाले नाहीच. हे करण्यामागचा सुनीताबाईंचा उद्देश कितीही पवित्र असला – की सदरलेखनात पुलंची प्रतिभा त्यांच्या मते ’वाया’ जाऊ नये – तरी त्यामुळे पुलंच्या लेखनाचा एक वेगळा आणि अनोळखी पैलू कायमचा अंधारात राहिला हे डोळ्यांआड करता येत नाही. माणसांमध्ये रमणार्‍या पुलंच्या लोकसंग्रहावर, लोकसंवादावर सुनीताबाईंनी मर्यादा आणल्या. यात पुलंसारख्या प्रतिभावंत कलाकाराचा वेळ वाया जाऊ नये हा सुनीताबाईंचा हेतू उदात्त असेलही; पण पुलंच्या वैयक्तिक आनंदाचे काय? नवनिर्मितीचे समाधान मिळावे म्हणून आपल्या वैयक्तिक खुषीचे असे किती क्षण पुलंना आपल्या मनाविरुद्ध कुर्बान करावे लागले असतील? पुलंच्या अवघ्या आयुष्याची ’योजना’ करणाया, त्यांच्या आयुष्याचेच व्यवस्थापन करणाया सुनीताबाई जेंव्हा पुलंच्या सन्मानार्थ दुसर्‍या कुणीतरी आयोजित केलेल्या मेजवानीचा ’मेनू’ ठरवू लागतात, ’भाईला हे आवडतं, हे त्याला सोसत नाही..’ असं सांगू लागतात आणि न राहावून ती मेजवानी आयोजित करणार्‍यांपैकी कुणीतरी धीर एकवटून त्यांना सांगतो की पुलंना आवडते ते त्यांना खाऊ घालणे हा आमचा आनंद आहे, तो कृपया आम्हाला मिळू द्या, त्यांना काय आवडतं, काय नाही हे त्यांना सांगू द्या तेंव्हा आपल्या कडक शिस्तीने पुलंच्या प्रतिभेला नवनवीन पालवी फुटू देणाया सुनीताबाईंची शिस्त ही तुरुंगातील, इस्पितळातील शिस्त वाटू लागते. पुलंविषयीच्या कणवेने मन भरुन येते. पण तो सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला.
पुलं गेल्यानंतर सुनीताबाईंनीही आवराआवरीला सुरुवात केली होती. पुलंच्या आकाशवाणीवरील भाषणांचे व श्रुतिकांचे ’रेडिओवरील भाषणे व श्रुतिका’ हे पुस्तक त्यांनी पुलंच्या पहिल्या स्मृतिदिनाला मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध करुन घेतले. पुलंच्या इतर भाषणांचे ’सृजनहो’ हे पुस्तक त्यानंतर वर्षाने प्रसिद्ध झाले. पुलंचा खाजगी पत्रव्यवहार नष्ट करण्याचे प्रचंड काम त्यांनी काही मदतनिसांना हाताशी घेऊन पूर्ण केले. पुलंसारखी आपली आपल्या शेवटच्या आजारात अवस्था होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये या आशयाचं ‘ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह फॉर हेल्थ केअर’ नावाचं इच्छापत्र तयार करुन घेतलं. त्यानंतर सुनीताबाईंनी स्वत:ला जवळजवळ घरात कोंडूनच घेतलं. काही मोजके प्रसंग सोडले तर त्यानंतर त्या घराबाहेर पडल्याच नाहीत. सावरकरांप्रमाणे आपल्याला कुणी या गलितगात्र अवस्थेत बघू नये, आपली जनमानसातली प्रतिमा ढळू नये यासाठीच ही धडपड होती का? कुणास ठाऊक! पण पुलं गेल्यानंतर जगण्याचे प्रयोजनच संपावे अशी सुनीताबाईंनी स्वत:ची करुन घेतलेली अवस्था समजण्याच्या पलीकडची होती. पहिला जी.ए.कुलकर्णी पुरस्कार स्वीकारायलाही त्या आल्या नाहीत. तो पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला आणि त्याची चित्रफीत दुसया दिवशी रसिकांना दाखवली गेली. त्या चित्रफीतीत अशक्तपणे आपले केस सावरणार्‍या, आपण चांगले दिसतो आहोत की नाही याबाबत कॉन्शस झालेल्या सुनीताबाई बघून मनाला यातना झाल्या. ’परी यासम हा..’ हा लघुपट रसिकांबरोबर बघणारे आणि तो संपल्यावर टाळ्यांच्या गजरात रसिकांकडे वळून त्यांना नम्रपणे नमस्कार करणारे हे जोडपे आठवले. ’ध्यानीमनी’ नाटकाचा प्रयोग पहिल्या रांगेतून बघणारे आणि तो प्रयोग संपल्यावर कितीतरी वेळ टाळ्या वाजवणारे हे जोडपे आठवले. या दोन्ही प्रसंगात वाजणारी एक टाळी माझी होती हेही मला आठवले.
असे स्वयंप्रकाशी, तेज:पुंज सार्थ आयुष्य लाभलेल्या सुनीताबाईंचा शेवट पुलंप्रमाणेच करुण व्हावा हे बाकी मनाला पटत नाही. पुलं अखेरपर्यंत प्रकाशात राहिले, त्यामुळे त्यांची प्रकृती, त्यांच्या वेदना, त्यांचे केविलवाणे परावलंबित्व लोकांना माहिती होत राहिले. सुनीताबाईंच्या बाबतीत असे झाले नाही. ऑगस्ट २००८ ला घरच्या घरी सुनीताबाई तोल जाऊन पडल्या आणि मग अगदी शेवटपर्यंत ७ नोव्हेंबर २००९ पर्यंत त्या अंथरुणाला खिळूनच राहिल्या. त्या काळात त्यांना नको ते परावलंबित्व, आर्थ्रायटिसच्या यातना आणि एकटेपण असे कायकाय सहन करावे लागले. इतके संपन्न आयुष्य जगलेल्या सुनीताबाईंचा असा परावलंबी अवस्थेत कणाकणाने शेवट व्हावा हे काही बरे झाले नाही. शेवटपर्यंत आपला दिमाख, तोरा न सोडलेल्या सुनीताबाई तशाच, एखादी वीज चमकून नाहीशी व्हावी तशा, एखादा तारा निखळून पडावा तशा लुप्त व्हायला पाहिजे होत्या असे वाटले.
’सुनीताबाई’ हे पुस्तक मला आवडलेच, पण या पुस्तकाने मला अस्वस्थ केले. याच पुस्तकात ’ऐसे कठिण कोवळेपणे’ या नावाचा अरुणा ढेरे यांचा सुनीताबाईंवरचा एक सुंदर लेख आहे. अरुणा ढेरे यांना देशपांडे कुटुंबाचा प्रत्यक्ष सहवास बराच काळ लाभला. अरुणाबाईंचा हा लेख म्हणजे या पुस्तकावरचा कळसच आहे.
अशी पांखरुन छाया, लावोनियां माया
आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया
या आरती प्रभूंच्या या लेखात ढेरे यांनी उधृत केलेल्या ओळी या जोडप्याला किती समर्पक होत्या असे वाटून जाते.
या पुस्तकात काही दुर्मिळ सुंदर छायाचित्रेही आहेत. त्यातली बरीचशी मंडळी आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. एका पानावर पूर्ण पानभर सुनीताबाईंचे एक कृष्णधवल छायाचित्र आहे. लख्ख गोर्‍यापान वर्णाच्या, साधीशी साडी नेसलेल्या करारी मुद्रेच्या ताठ उभ्या असलेल्या सुनीताबाई. पु.ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची पत्नी यापलीकडे आपल्या तत्वांशी, मूल्यांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या, सच्च्या मनाच्या, संवेदनशील, कष्टाळू, प्रतिभावान आणि रसिक सुनीताबाई. या पुस्तकाचे मुखपृष्ठ याच चित्रावर आधारलेले आहे. सगळे पुस्तक वाचून झाल्यावर मनात विचाराविचारांचा गल्बला होतो, घशाशी काही कढ येतात, ’न मागता दिलेल्या आणि न सांगता परत नेलेल्या या देवाघरच्या माणसां’ बद्दल बरेच काही वाटत राहाते. पण शेवटी लक्षात राहातात त्या या सुनीताबाई.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

14 Responses to सुनीताबाई

 1. saati कहते हैं:

  छान लेख संजोपराव.
  तुमचा ब्लॉग बघून परत एकदा फार बरे वाटले.

 2. Anonymous कहते हैं:

  ‘वरवर पाहता आनन्दी वाटणारा, पण स्वत:च्या ज़ेवणातले पदार्थही बायकोच्या परवानगीशिवाय खाऊ न शकणारा’, ‘वैयक्तिक आनन्दाची राखरांगोळी झालेला’ (पु लं च्या वैयक्तिक आनन्दाचे काय?) अशी पु लं ची अत्यंत अतिरंजित आणि अवास्तव प्रतिमा बरेचदा उभी करण्यात येते. हे पुस्तक मी काही महिन्यांपूर्वी घाईघाईत पाहिले आहे, आणि अरुणाबाई ढेरे यांचा लेख एक पवित्रा घेऊन लिहिल्यासारखा, बराच कृत्रिम वाटला होता, अशी अंधुक आठवण आहे. उलट सुनीताबाई स्वैंपाक करत असल्या तरी घराचं दार त्यांनाच उघडायला लावणारा, आपल्या आळसाच्या तत्त्वाशी पक्की निष्ठा राखणारा टोण्या अशीही ओळख सुनीताबाईंनीच ‘मनोहर तरी’ मधे दिली आहे. दार त्याच उघडायच्या हा पतिदेवांच्या आयुष्यावर ताबा ठेवण्याचा भाग नव्हता, तर त्याला एक नाईलाज़ाचेही परिमाण होते असावे. (हा ‘होते असावे’ हा एक सुनीताबाईंनी अनेकदा वापरलेला विचित्र शब्दप्रयोग.)

  ‘माझ्या आयुष्यात (पन्नास पूर्ण होताना, १९७६-सुमारास) एक पर्व आले होते’ असा एका ठिकाणी बाईंनी अत्यंत मोघम उल्लेख केला आहे. ते पर्व का आले होते, त्या नक्की कशाला वैतागल्या होत्या, त्या पर्वाचा पुढल्या १०-१५ वर्षांवर काय परिणाम झाला याविषयी काहीच माहिती मिळत नाही.

  – डी एन

 3. आपला स्वभाव आळशी आहे याची पुलंनी कबुली दिली होतीच. किंवा कबुली देऊन ते आळशीपणा करायला मोकळे झाले होते म्हणा. भाईबरोबर राहाताना कधीकधी मला असह्य त्रास होतो, त्याच्यासोबत राहाणं अशक्य आहे असं वाटतं, पण त्याच्याशिवाय राहाणंही मला शक्य नाही असं सुनीताबाई लिहितात तेंव्हा त्या नवरा-बायकोच्या नात्यांमधलं एक मर्म सांगून जातात, असं मला वाटतं.
  प्रतिसादाबद्दल आभार.

 4. विद्याधर कहते हैं:

  अतिशय सुंदर लेख! खूप आवडला!

 5. Sachin कहते हैं:

  सावरकरांप्रमाणे आपल्याला कुणी या गलितगात्र अवस्थेत बघू नये, आपली जनमानसातली प्रतिमा ढळू नये यासाठीच ही धडपड होती का? कुणास ठाऊक!

  हे वाक्य तुम्हाला सुचलं हे वाचून थोडं आश्चर्य वाटलं. जी एन्सारखा त्यानाही Waste -Land मधून चालल्या सारखं वाटत नसेल का?
  त्यांच्या डोळस आणि उत्कट काव्यप्रेमावर अजून लिहिलं पाहिजे…..

 6. Anonymous कहते हैं:

  mhatar paan kunachahi asach jaata mag sunita bai asalya nahi tar Pu La apan
  famous lokkan kadun thoda wegala expect karato

  tyanna normal manus mhanun acceptach karat nahi haa apala dosha ahe tyancha nahi

 7. jayashri mohite कहते हैं:

  lekh khupach avadala.puladeshpandeche chahate asnaraya amachyasarkhanya sunitatainchi swabhavshaili kalali.

 8. Shilpa Pendharkar कहते हैं:

  Chan lihila ahe lekh.

 9. abhiruchidnyate कहते हैं:

  फार सुंदर लिहिलंय.. खूप आवडला लेख.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s