ती

तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला.
“हॅलो, कोण बोलतंय?….” ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही.
“हॅलो… बाबा…. आहेत का?” मी चाचरत विचारले.
“ह्हो…” पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज.”बाबा, तुझा फोन आहे.”
मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले. तिच्याकडे बघताना अगदी प्रथम जाणवला आला तो तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास. सहा-सात वर्षे वय, लहानसर चण, गोरा म्हणता येईल असा वर्ण, सोनेरी छटा असलेले मोकळे सोडलेले सुळसुळीत केस, पांढरेशुभ्र, लहानसे, एकसारखे रेखीव दात, चमकदार भिरभिरते डोळे आणि चेहर्‍यावर आत्मविश्वास. नुकतेच सगळे जग जिंकले आहे असा आत्मविश्वास. ही मुलगी मला प्रथमदर्शनीच आवडून गेली.
“ये इकडे” मी तिला जवळ बोलावले. या वयाच्या मुली साधारण असे कुणी जवळ बोलावले की लाज लाज लाजतात. आपल्या आई बाबांच्या अंगावर लोळण घेतात , पळून जातात आणि काही म्हणजे काही केले तरी जवळ येत नाहीत. इथे या मुलीने पहिला धक्का दिला. ती चक्क माझ्या व माझ्या पत्नीच्या शेजारी येऊन बसली. नावगाव विचारले तर तिने ते अगदी स्पष्ट शब्दांत न लाजता सांगितले आणि मी तिला देऊ केलेले चॉकलेट माझ्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतले. मी हसलो. “राहतेस का आमच्याबरोबर इथेच हॉटेलात?” मी तिला विचारले. “च्क्क…” ती म्हणाली. “माझी मॅथ्सची टेस्ट आहे उद्या..” मग बघता बघता तिच्याशी गट्टी जमली. तिने मग तिच्या वर्गातील सगळ्या मुला-मुलींची एक ते एकोणचाळीस अशा वर्गक्रमांकानुसार नावे म्हणून दाखवली (हे या वयातल्या मुला-मुलींच्या लक्षात कसे राहाते कुणास ठाऊक!), मांडीवर उलटा-सुलटा हात आपटत ती शिकत असलेल्या कर्नाटक संगीतातले एक गाणे म्हणून दाखवले (तिचे वडील मागून ‘आता पुरे… हं, आता बास…अशा खाणाखुणा करत होते!), माझ्या मुलाचा मोबाईल फोन हातात घेऊन त्यातल्या कायकाय गंमतीजंमती बघीतल्या आणि उरलेला वेळ कधी एका पायावर तर कधी दोन्ही पायावर नाचत मस्त धुडगूस घातला.
मग एकदोन दिवसांत आम्हाला त्यांच्या घरी एक दिवस राहायला जायचा योग आला. तो दिवसभर ही मुलगी भिंगरीसारखी भिरभिरत होती. दुपारच्या जड जेवणानंतर तिने कुणाच्या डोळ्याला डोळाही लागू दिला नाही. सतत तिची काही ना काही बडबड, कधी आपली चित्रे दाखवणे, आपल्या शाळेबद्दल काही सांगणे असे काहीकाही सुरु होते. दुपारी आम्ही बाहेर गेलो. गाडीत जरा गर्दी होत होती, म्हणून मी तिला पुढच्या सीटवर माझ्याजवळ बोलावले. माझ्या मांडीवर बसून ती मला त्या शहरातल्या वेगवेगळ्या जागांविषयी, ठिकाणांविषयी सांगत होती. तिची स्कूल बस कुठे येते, किती वाजता येते, शाळेत पहिली सुट्टी किती वाजता होते, मग लंच ब्रेकमध्ये ती डब्यातून नेलेले कायकाय खाते हे सगळे सगळे तिने सांगून घेतले. मध्येच गाडी पार्क करताना गाडीच्या मागच्या बाजूला एक कुत्रे आले तर ती अस्सल कोल्हापुरी हेल काढून म्हणाली,”कुत्रं मरतंय आता..” आणि पुन्हा खळखळून हसली. मला हसू आवरेना. महाराष्ट्राबाहेर जन्मलेली, वाढलेली ही एवढीएवढी मुलगी – घर सोडले तर आसपास मराठी बोलणारेही कुणी नसावे- तिच्यात हे कृष्णेचे-पंचगंगेचे पाणी कुठून आले? कॉलेजात असताना शिकलेल्या जेनेटिक्स या विषयाला परत एकदा सलाम करावासा वाटला.
त्याच दिवशी आम्हाला परत यायला निघायचे होते. आमच्या त्या स्नेह्यांच्या पत्नीने त्या मुलीच्या हातात आम्हाला देण्यासाठी काही भेटवस्तू दिल्या. त्या मुलीने मग “दादा , हे तुला, काकू, हे तुला..” असे म्हणून त्या आमच्या हातात दिल्या. त्या कुटुंबाच्या आदरातिथ्याने आधीच संकोचलेलो आम्ही अधिकच संकोचलो. “आवडलं का तुम्हाला?” त्या मुलीने धीटपणे आम्हाला विचारले. तिला तिच्या आईने तसे विचारायला सांगितले असावे.
त्या छोट्या मुलीला मी जवळ घेतले. “हो, खूप खूप आवडलं” मी म्हणालो. “पण सगळ्यात जास्त आम्हाला तू आवडलीस…”
आमचे स्नेही आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येणार होते. त्या मुलीला व तिच्या आईला वेगळीकडे जायचे होते. त्या दोघींना रिक्षा स्टँडवर सोडून आम्ही पुढे निघालो तेंव्हा तिच्या आईबरोबर तिनेही तिचा छोटासा पंजा हलवून आम्हाला निरोप दिला. रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात तिचे सुळसुळीत केस चमकत होते आणि तिच्या लहानशा चेहर्‍यावर तेच आत्मविश्वासपूर्ण हसू होते.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

6 Responses to ती

  1. उदय पाटील कहते हैं:

    ‘ती’ लईच आवडली.

  2. shilpa कहते हैं:

    लेख आवडला. माझी लेक पण अशीच जाम धीट आहे, फक्त मराठीत बोलायला नीट जमत नाही.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s